मर्त्य

त्रिपुरा's picture
त्रिपुरा in जे न देखे रवी...
18 Mar 2016 - 2:03 pm

तू नाहीस मुळी मर्यादापुरुषोत्तम वगैरे,
तरीही प्रत्येकीला हवाहवासा साताजन्मांचा हक्काचा सखा!
रथाचाच काय, महाभारताच्या भाग्याचाही सारथी,
शपथेवर जरी असलास, तुझ्या शस्त्रांना पारखा!!

तुझ्या ओठांवर बासरी, किरीटाला मोरपीस,
प्रेम उत्कट जगण्यावर, चैतन्याचा झरा मनी
देणारा संधी, भरेपर्यंत घडा पापांचा
आवेशानं लकाकत्या सुदर्शनचक्राचा, तूच संयमी धनी

तुझ्या रासलीला, बाललीलांइतक्याच मोहक, मधाळ
निरागसतेचं खट्याळपळाशी, जणू झालेलं एकजीव रसायन
तुझा मार्ग घडवणारे तुझेच मापदंड,
कधी दुभंगून नदीपात्र, प्रसंगी सोडून रण!!

नावांइतकीच विविधांगी, तुझ्या प्रेमाचीही तऱ्हा
राधा, मीराच काय, देवकी- यशोदेसाठीही निरनिराळी
अधिक उण्या वृत्तीचा गोवर्धन सगळ्यांचा,
पण तो पेलणारी, तुझी जगावेगळी करंगळी

प्रत्येक नातं जपायची अलगद मेख,
तुझ्या द्वारकेसारखीच, छुपी तरीही तेजाने सळसळती
आपल्यातच धुंद  वंशाच्या रक्ताने माखलेली,
जखम तुझ्या टाचेची मात्र अविरत भळभळती

ऐकताना आयुष्याच्या प्रश्नांचा उथळ खळखळाट,
तुझं अस्तित्वच, तुझ्या गीतेपेक्षाही वाटतं खोल
साक्षात अवतारी भगवंत असणाऱ्या तुलाही,
रोखीनच मोजावं लागलं, या मर्त्यजन्माचं मोल......

फ्री स्टाइलकविता

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

18 Mar 2016 - 2:39 pm | चांदणे संदीप

अप्रतिम!!

सलाम घ्या!

Sandy

पद्मावति's picture

18 Mar 2016 - 2:56 pm | पद्मावति

केवळ अप्रतिम!

नीलमोहर's picture

18 Mar 2016 - 3:10 pm | नीलमोहर

उत्कट आणि प्रभावी !!

प्राची अश्विनी's picture

18 Mar 2016 - 6:13 pm | प्राची अश्विनी

सुंदर!

अत्रुप्त आत्मा's picture

18 Mar 2016 - 8:14 pm | अत्रुप्त आत्मा

अतिशय उत्कट !
अप्रतिम रचना.

त्रिपुरा's picture

20 Mar 2016 - 2:56 pm | त्रिपुरा

धन्यवाद!