साहित्यः
ताजे मश्रूम - २०० ग्रॅम
कांदे - २ मध्यम
टोमॅटो - १ मध्यम
लसूण - ८ पाकळ्या
आलं - १ इंच
अख्खी काळी मिरी - ४-५
लवंगा - २-३
दालचिनी - १इंच
हिरवी वेलची - २-३
दही - अर्धी वाटी
धणे पावडर - १ टी स्पून
जिरे पावडर - १/२ टी स्पून
गरम मसाला - १ टी स्पून (सपाट)
हळद - १/२ टी स्पून
तिखट - १ ते १-१/२ टी स्पून
कसूरी मेथी पावडर - १/२ टी स्पून
मीठ - चवी नुसार.
कोथिंबीर - सजावटी साठी
तेल.
तयारी:
मश्रूमचे प्रत्येकी ४ ते ६ तुकडे करून घ्या.
कांदे आणि टोमॅटो लांब - लांब चिरून घ्या.
लसूण आणि आलं सोलून चिरून घ्या.
दही फेटून घ्या.
कृती:
कढईत ३-४ टेबल स्पून तेल गरम करा. तेल गरम झालं की आलं-लसूणाचे तुकडे त्यात टाकून परता. लसूण लाल झाला की काळीमिरी, लवंग, दालचीनी , वेलची घालून परता. मसाला चांगला तळला गेला की कांदा टाकून परता. कांदा गुलाबीसर झाला की टोमॅटो टाकून परता. पाणी न घालता टोमॅटो परतून शिजवून घ्या. आता हे सर्व मिश्रण एका ताटलीत काढून थंड होऊ द्या.
पुन्हा कढईत २-३ टेबल स्पून तेल टाकून गरम करा. तेल गरम झालं की फेटलेले दही त्यात घाला. त्यावर धणे-जिरे पावडर, गरम मसाला, हळद, लाल तिखट, कसूरी मेथी पावडर, मीठ घालून तेल सुटे पर्यंत परता. तेल सुटले की चिरून ठेवलेले मश्रूम त्यात घालून परता. अगदी अर्धी वाटी पाणी घालून मश्रूम शिजवून घ्या.
मश्रूम शिजेपर्यंत, थंड झालेले कांदा, टोमॅटो आणि अख्ख्या मसाल्याचे मिश्रण मिक्सर मधून गंधासारखं मुलायम वाटून घ्या.
मश्रूम शिजले की त्यात हे कांदा, टोमॅटो, मसाल्याचे वाटलेले मिश्रण टाकून किंचित पाण्याने मिक्सरचे भांडे धुवून ते पाणी मश्रूममध्ये टाका.
आता मश्रूम मसाला छान उकळून दाटसर करा.
एखद्या सर्व्हींग बाऊल मध्ये काढून त्यावर बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर भुरभूरून सजवा.
शुभेच्छा....!
प्रतिक्रिया
6 Apr 2008 - 2:47 pm | स्वाती दिनेश
मस्त डिश आहे,माझी आवडती... आता नक्कीच करून पाहिन. मशरुम भुर्जी खाल्ली होती मी बर्याच वर्षांपूर्वी मुलुंडला बहुतेक विश्वमहल मध्ये..नंतर जमलेच नाही:( ,त्याची रेसिपी असली तर द्या ना..
स्वाती
6 Apr 2008 - 2:53 pm | विसोबा खेचर
क्षमा करा पेठकरशेठ, परंतु पाकृ चांगली वाटत असूनही आणि फोटो आवडला असूनही यावेळेस मात्र मनमोकळी दाद नाही देऊ शकत!
कारण आम्हाला कधी मश्रुम हा प्रकार आवडलाच नाही! :(
कोई बात नही, पसंद अपनी अपनी!
बाय द वे, आता मिपाच्या मुखपृष्ठावर टाकण्यासाठी तुमच्या पाकृमधल्या छायाचित्रांचा मला उपयोग करता येईल.. ! :)
तात्या.
6 Apr 2008 - 3:07 pm | केशवसुमार
क्षमा करा पेठकरशेठ, परंतु पाकृ चांगली वाटत असूनही आणि फोटो आवडला असूनही यावेळेस मात्र मनमोकळी दाद नाही देऊ शकत!
कारण आम्हाला कधी मश्रुम हा प्रकार आवडलाच नाही! :(
कोई बात नही, पसंद अपनी अपनी!
म्हणणार होतो..
मश्रूमच्या जागी बटाटे /अंडे वापरता येईल का?
(मश्रूम म्हणल की पावसाळ्यात उगवणारी कुत्र्याची छत्री आठवणारा)केशवसुमार.
6 Apr 2008 - 6:30 pm | प्रभाकर पेठकर
श्री. केशवसुमार,
मश्रूमच्या जागी बटाटे /अंडे वापरता येईल का?
काहीच हरकत नाही. ग्रेव्हीच महत्त्वाची. तशीही, मश्रूमला स्वतःची अशी चव नसतेच म्हंटले तरी चालेल.
बटाट्याच्या आणि अंड्यांच्या रश्श्यांच्या पाककृती येतीलच मिपावर.
धन्यवाद.
6 Apr 2008 - 6:21 pm | प्रभाकर पेठकर
आता मिपाच्या मुखपृष्ठावर टाकण्यासाठी तुमच्या पाकृमधल्या छायाचित्रांचा मला उपयोग करता येईल
अवश्य करा तात्या. त्या सोबत पाककृतीची 'लिंक' देण्याची प्रथाही सुरू करा. म्हणजे आम्हालाही इतरांच्या पाककृती झटकन वाचता/शिकता येतील.
धन्यवाद.
10 Jan 2009 - 8:23 am | समिधा
:H खुपच आवडली करुन बघितली
10 Jan 2009 - 8:38 am | प्राजु
पेठकाका, किती दिवसानी तुम्ही रेसिपी दिलीत इथे! असो..
मश्रुम मला आवडता पण नवर्याला विशेष नाही आवडत. त्यामुळे माझ्यासाठी मश्रुम घालून करेन, नवर्यासाठी तीच ग्रेव्ही वापरून बटाटा किंवा, पनीर घालून करेन.
मस्तच.
काका, चिकन मसाला करतात त्यातही हीच ग्रेव्ही असते का? फक्त मश्रुम्स च्या जागी चिकन पिसेस घातले तर चालतील का?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Jan 2009 - 8:40 am | घाटावरचे भट
प्राजुतै, रेशिपी जुनीच आहे. सा म्हैने होउन गेले. हे सगळे 'धागा-मासेमारी' अर्थात थ्रेड फिशिंगचे प्रकार आहेत....
10 Jan 2009 - 8:44 am | प्राजु
भट साहेब.. धन्यवाद. लक्षातच नाही आलं माझ्या.
असो.. तरिही पेठकाका माझ्या प्रश्नांची उत्तरे देतील अशी आशा आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Jan 2009 - 1:28 pm | प्रभाकर पेठकर
प्राजु,
चिकन मसाला करतात त्यातही हीच ग्रेव्ही असते का?
चिकन, मटण बनवायच्या विविध पाककृती आहेत. एकच अशी सर्वसमावेशक पाककृती नाही. (त्याने आहारातील वैविध्य नाहिसे होईल). माझ्या पद्धतीत चिकन, मटणाला जरा वेगळा मसाला मी वापरतो. चिकन मसाल्यात धणे पावडर जास्त तर मटण मसाल्यात जीरे पावडर जास्त वापरतो. तसेच मटण मसाल्यात बडिशोप, बाद्यान इत्यादी मसालेही वापरतो जे शक्यतो चिकन प्रकारात वापरत नाही.
वरील ग्रेव्हीत उकडली अंडी वापरता येतील.
चिकनच्या (उरलेल्या) ग्रेव्हीत चिकन सॉसेजीस वापरता येतील.
मटणाच्या (उरलेल्या) ग्रेव्हीत मटण कलेजी वापरता येईल.
असो.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
10 Jan 2009 - 8:40 am | शितल
खुपच धन्यवाद काका,
मश्रुम घरी आहेतच, मस्त पैकी उद्याच तुम्ही वर सांगितल्या प्रमाणे पाककृती करून पहाते. :)
10 Jan 2009 - 12:37 pm | मदनबाण
जेव्हा मी पहिल्यांदा मश्रूम मसालाची भाजी खाल्ली होती तेव्हा मला तो पदार्थ मांसाहारी आहे असे वाटले होते,,कारण मुळात मश्रूम चवीला कसे लागते ते माहितच नव्हते !!!
पनीर नंतर माझा हा सर्वात आवडता पदार्थ आहे.. :)
(खादाड)
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
10 Jan 2009 - 1:30 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद शितल आणि मदनबाण.
शितल,
मश्रूम मसाला करून, कसा झाला जरूर कळव.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
10 Jan 2009 - 7:58 pm | स्वाती राजेश
फोटोत शेजारी जर बटर नान ठेवले असते तर? खाता आली असती भाजी. नुसती कशी खायची? :)
बाकी ग्रेव्ही करयची पद्धत आवडली. करून पाहीन पण मशरुम ऐवजी मिक्स व्हेजिटबल्स घालेन कारण मशरुम घरी कोणाला आवडत नाहीत.
फोटो फारच छान आला आहे.
19 Jun 2014 - 10:33 pm | मोनू
आज केली होती ही भाजी...लेकाला खूप आवडली...धन्यवाद पेठकर काका. *smile*
20 Jun 2014 - 11:02 am | कंजूस
प्रथम पंजाबी पध्दतीने जाऊन मसाल्याच्या कृतीने मंडी हिमाचलची वाट पकडली .(कांदा टमाटो फ्राय नंतर दही बडिशोप फ्राय) .मश्रुमला पर्याय फ्लॉवरचे मोठे तुकडे शेवटी शेवटी टाकावेत .अगोदर टाकले तर फार शिजतात .
20 Jun 2014 - 5:27 pm | मनीषा
छान आहे पा कृ
नक्की करणार ...
11 Jul 2014 - 2:50 am | स्रुजा
तुमची ही पाक कृती दोन मैत्रिणी बोलावून केली पहिल्यांदा …. त्यांना आणि नंतर नवऱ्याला पण फार आवडली :) मग मी नवऱ्याच्या ऑफिस च्या अंगत पंगत मध्ये पण करून पाठवली . मला एका अल्जेरियन , एका रोमेनियन आणि एका कॅनडियन चा निरोप आला की पाककृती फार च छान :) म्हणलं ज्याचं श्रेय त्याला द्यावं म्हणून लगेच प्रतिसाद द्यायला आले .
रंग फक्त थेट तुमच्या चित्र सारखा आला नाही कदाचित इथले टमाटे एवढे लाल नसतील .
धन्यवाद इतक्या छान आणि कुठलीही काजू , क्रिम न घालता चविष्ट पाक कृती बद्दल .
11 Jul 2014 - 9:55 am | प्रभाकर पेठकर
धन्यवाद स्रुजा. अशा प्रामाणिक प्रतिसादांनीच नवनविन पाककृती प्रयोग करायला हुरुप येतो.
12 Jul 2014 - 7:57 pm | स्रुजा
:)
11 Jul 2014 - 3:29 am | खटपट्या
आज करुन बघतो.
11 Jul 2014 - 8:13 am | खटपट्या
करून बघितला.
एकदम हॉटेल सारखी चव येतेय.
धन्यवाद पेठकर काका
11 Jul 2014 - 9:58 am | प्रभाकर पेठकर
धन्यवाद खटपट्या,
मश्रूम हा शारीरिक पोषणमुल्यांत, प्रथिने पुरविणारा एक चांगला स्रोत आहे. आठवड्यातून एकदा तरी मश्रूम (कुठल्याही प्रकारे) केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, स्नायू बळकट करणे वगैरेसाठी फायदेशीर असतात.
12 Jul 2014 - 11:08 pm | मुक्त विहारि
मश्रूम अधिक सोयाबीन अधिक येसर असा एक वेगळा प्रयोग केला.
मिक्सर नसल्याने, लसूण चटणी टाकली.
प्रयोग यशस्वी झाला.
13 Jul 2014 - 1:19 am | प्रभाकर पेठकर
'येसर' हे काय असतं?
13 Jul 2014 - 9:38 am | मुक्त विहारि
हे एक मिश्र डाळींचे पीठ आहे.
ऐन वेळी रस्सा करायला किंवा आमटी करायला एकदम मस्त.
मध्यंतरी मितान ताईंनी हा प्रकार मिपावर टाकला होता आणि आमच्या सारख्या आळशी माणसांची सोय केली.
जमल्यास लिंक देतो.
13 Jul 2014 - 11:39 am | प्रभाकर पेठकर
धन्यवाद मुक्त विहारी साहेब.
मिळाली मितान ह्यांची ही पाककृती.
13 Jul 2014 - 3:00 pm | मुक्त विहारि
३/४ महिने बघायला नको.
साधारण पणे १ किलो (एकूण वजन, सगळ्या डाळींचे मिळून) आणि भरपूर लवंगा,दालचिनी,मिरे,धणे,जिरे आणि सुक्या मिरच्या घातल्या की, वेगळ्या गरम मसाल्याची गरज पण भासत नाही.
13 Jul 2014 - 4:02 pm | प्रभाकर पेठकर
आजच बनविले. मितान ह्यांच्या पाककृती नुसार आणि त्या त्या प्रमाणात बनविले. २ टे. स्पू. पिठाला ४ वाट्या पाणी ह्या प्रमाणामुळे आमटी बरीच पातळ झाली . चव चांगली होती पण त्याला दाटपणा येण्यासाठी वरण मिसळवावं का? असा विचार करतो आहे.
13 Jul 2014 - 7:06 pm | मुक्त विहारि
४ चमचे येसर घेतो.
पाण्याचे आणि येसरचे प्रमाण किती असावे? ह्याचा अंदाज सुरुवातीला येत नाही.
पण एक २/४ वेळा करून बघीतलेत की नक्की येईल.
कधी-कधी मूड लागला तर ह्या येसरचे कांदा आणि लसूण चटणी वापरून पिठले पण करतो.
14 Jul 2014 - 4:10 am | प्रभाकर पेठकर
हम्म्म! माझाही तोच विचार आहे. चव आणि रंग कुळथाच्या जवळ जाणारा आहे. मीही अजून २-४ प्रयोग करणार आहेच.
13 Jul 2014 - 9:31 am | अत्रुप्त आत्मा
आवडले!!! *i-m_so_happy*
14 Jul 2014 - 8:24 am | अजया
काका,आज तुमच्या पद्धतीने भाजी केली.पनीर घालुन.मस्त झाली आहे.थोडीशी साखर घातली मसल्याचा उग्रपणा कमी करायला.
14 Jul 2014 - 12:21 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद.
आपल्याला आवडणार्या पाककृती आपल्या आणि घरच्यांच्या आवडीनुसार जुळवून घ्यायच्या असतातच. त्या करणं हे जास्त महत्वाचं.