मित्रांनो, खूप दिवस झाले मनात काही तरी घोळत होते, पण सांगड बसत नव्हती... आणि अशातच 'व्हॅलेन्टाईन डे'ला कुठून तरी प्रेरणा मिळाली आणि गोष्टी आपोआप जुळत गेल्या... शब्द साधे आहेत, कुठे चुकलो तर समजून घ्या...
तू डोळे, मी काजळ
तू डोंगर, मी नदी
तू ढग, मी वारा
तू कमळ, मी चिखल...
तू रस्ता मी दिशा
तू श्वास, मी ध्यास
तू पाऊस, मी छत्री
तू ऊन, मी सावली...
तू टेबल, मी खुर्ची
तू अंगठी, मी बोट
तू चंद्र, मी तारा
तू मांजर, मी कुत्रा...
तू फळा, मी खडू
तू सवय, मी खोड
तू सुई, मी दोरा
तू चष्मा, मी नाक...
तू ऍक्टिवा, मी डिस्कवर
तू मायक्रोमॅक्स, मी मोटोरोला
तू टेस्टर, मी डेव्हलपर
तू कर्वेनगर, मी चंदन नगर...
तू घड्याळ, मी टिक टिक
तू चिमणी, मी काजळी
तू माठ, मी तिवई
तू माचीस, मी काडी...
तू समुद्र, मी आभाळ
तू थंडी, मी ऊब
तू हृदय मी धड धड
तू सूर, मी ताल...
तू शब्द, मी अर्थ
तू जांभई, मी झोप
तू स्वप्न, मी भास
तू पापणी, मी पाणी...
तू शिंक, मी सर्दी
तू कट्टा, मी गप्पा
तू वाळू, मी खोपा
तू लाट, मी किनारा...
तू रुसवा, मी थट्टा
तू अबोला, मी समजूत
तू ओठ, मी थर-थर
तू भेट, मी ओढ
तू प्रतीक्षा... मी तळमळ...
- प्रसाद पांडुरंग कुलकर्णी
प्रतिक्रिया
18 Feb 2016 - 3:09 pm | कविता१९७८
तू शिंक, मी सर्दी
यक्क
18 Feb 2016 - 3:16 pm | अभ्या..
"तू प्रसाद मी शिरा" करत आता लै जणं येणार भावा.
तेरी तो चल पडी.
18 Feb 2016 - 3:20 pm | प्रसाद_कुलकर्णी
हा हा हा
18 Feb 2016 - 3:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी राधा तू पावा
नव सदस्याला त्रास देऊ नको भावा.
-दिलीप बिरुटे
18 Feb 2016 - 4:04 pm | प्रसाद_कुलकर्णी
समजून घेतल्याबद्दल आभार :)
18 Feb 2016 - 4:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तू रस्ता मी दिशा
तू श्वास, मी ध्यास
तू पाऊस, मी छत्री
तू ऊन, मी सावली,
आणि
तू रुसवा, मी थट्टा
तू अबोला, मी समजूत
तू ओठ, मी थर-थर
तू भेट, मी ओढ
तू प्रतीक्षा... मी तळमळ...
आवडलं.
-दिलीप बिरुटे
(प्रतिक्षा करून तळमळत असलेला)
18 Feb 2016 - 4:40 pm | टवाळ कार्टा
तू चिकन, मी मसाला
तू मटार, मी उसळ
तू मिसळ, मी पाव
18 Feb 2016 - 4:52 pm | नाखु
तू धागा,मी अवांतर
तू चिवट,मी समांतर
तू भांडे,मी कल्हई
तू थंडी,मी दुलई
तू बंदा,मी चिल्लर
तू गप्पा,मी थिल्लर
तू कफनी,मी खडावा
तू वड,मी बहावा
तू खफ्,मी व्यनी
तू बोका,मी मनी
पुढे चालू........
जेप्या बॅटन घे हाती
21 Feb 2016 - 10:08 am | जेपी
तु कुलुप, मी चावी..
तु माजी,मी भावी,
तु पुरी,मी भाजी,
तु ह्लकट,मी पाजी,
बास आज एवढच
18 Feb 2016 - 5:04 pm | चांदणे संदीप
तू चालू, मी बंद
मी हुशार, तू मंद
तू लोड, मी उशी
मी मच्छर, तू माशी
तू काल, मी आज
मी बक्कल, तू काज
या रे बाकीचे....
18 Feb 2016 - 5:22 pm | प्रसाद_कुलकर्णी
सभासदांची कल्पनाशक्ती वाखाणण्याजोगी आहे... :P मजा आली.
20 Feb 2016 - 4:25 pm | एकप्रवासी
तू चंदन मी पाणी
तू जीभ मी वाणी
तू पाउस मी सरी
तू पंख मी परी
तू वीज मी प्रकाश
तू क्षितीज मी आकाश ......
22 Feb 2016 - 10:03 am | प्रसाद_कुलकर्णी
क्या बात है !!!
20 Feb 2016 - 4:51 pm | चिनार
माझ्या वतीने नाना बोलेल
कैसे बताऊ मैं तुम्हे मेरे लिये तुम कौन हो..
https://www.youtube.com/watch?v=8XTP8r0UCAM
20 Feb 2016 - 4:55 pm | चांदणे संदीप
तू वादळ, मी किनारा
तू घर, मी पसारा
तू मोबाईल, मी चार्जर
तू वडापाव, मी पार्सल
तू किती? मी अती?
अती तेथे माती...... बास, इथे आपला पास!
Sandy
20 Feb 2016 - 10:44 pm | एस
तू आयडी, मी डुआयडी
तू ट्रोल, मी संपादक
तू खरड, मी व्यनि
तू वेलणकर, मी अभ्यंकर
तू मनोगत, मी मिपा
तू मिपा तर मी ऐसी
तू कौल, मी खफ
तू धागा, मी बाफ
चल आता नको दवडू तोंडाची वाफ!
22 Feb 2016 - 10:09 am | यशोधरा
मुंपुमुं २ चा प्रभाव का हा?
22 Feb 2016 - 11:38 am | नाखु
मुंपुमुं २ वर यांचाच प्रभाव (पक्षी प्रसाद) आहे आणि शिल्लक राहिलेल्याचे इथे वाटप चालू आहे.
खुलासेदार नाखु
22 Feb 2016 - 12:44 pm | रातराणी
तू राघू मी मैना
तू दिवस मी रैना
तू काम मी सुट्टी
तू वेल मी बुट्टी
तू झोप मी जाग
तू पाणी मी आग
तू कर्तव्य मी कर्म
तू आयुष्य मी मर्म