ज्ञानेश्वरीतील शब्द मालवणी बोलीत...
सातशे वर्षांपूर्वी रचलेला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आज वाचताना त्यात काही शब्द असे आढळतात की जे आता नागर मराठीत प्रचलित नाहीत. मात्र मालवणी बोलीत जसेच्या तसे आणि त्याच अर्थाने वापरात आहेत. मराठी भाषेपूर्वी प्राकृत भाषा महाराष्ट्रात सर्वत्र प्रचलित असावी. नंतर मराठी आली. त्या भाषेने साहजिकच अनेक शब्द प्राकृतातून घेतले. जुन्या मराठीतील ते प्राकृत शब्द अर्वाचीन मराठीत अस्तंगत झाले. पण त्यांतील काही शब्द मालवणीसारख्या बोलीभाषेत टिकून राहिले. (ज्ञानेश्वरांचा मालवणी भाषेशी कधी संबंध आला असण्याची शक्यता नाही.) असे काही शब्द पुढीलप्रमाणे:--(महाराष्ट्रातील अन्य बोलींतही ज्ञानेश्वरीतील काही शब्द असण्याचा दाट संभव आहे. शोधायला हवेत.)
..............................................................................................................
*मुडा:- गवत आणि गवताचे वेठ वापरून बांधलेली पेरणीसाठी ठेवलेल्या भात बियांची मोटली.
मुडा फोडून बीज काढिले । मग निर्वाळलीये जागी पेरले। तरी ते सांडी विखुरी वाया गेले । म्हणोचि नये॥.....(अ.९,ओवी ३९)
.....
बिरडे: दोरीची सरकती गाठ.
म्हणे कैसे हे बिरडे फिटेल । कैसा स्वामी भेटेल ।युगाहुनी वडील । निमिष मानी॥.....(अ.१३,ओवी ३७८)
....
गोरवां: गुरे ढोरे.
आणि प्रजा जे झाली। ते वसती कीर आली। गोरुवें बैसली । रुखातळीं॥।....(अ.१३,ओवी ५९६)
..
कानी: लहान दोरी
ऐसे सत्त्व सुखज्ञानी । जीवासी लावुनी कानी । बैलाची करी वानी । पांगुळाचिये॥....(अ.१४,ओवी १५८)
...
उंडी: घास,कवळ
हे काळानळाच्या कुंडी । घातली लोणियाची उंडी । माशी पांखु पाखडी । तंव हें सरे॥....(अ.१३, ओ.११०३)
....
आर: अजगर.
अंत्यु राणिवे बैसला । आरें धारणु गिळिला । तैसा गर्वे फुगला । देखसी जो॥...(अ.१३,ओ.७२४)
...
ऐलाडी: अलिकडच्या तीरावर.
प्रवृत्ती माघौती मोहरे। समाधी ऐलाडी उतरे। आघवे अभ्यासे सरे । बैसता खेवो॥...(अ.६,ओ.१९१)
...
पैलाडी: पलिकडच्या तीरावर.
मग समुद्रा पैलाडी देखे । स्वर्गीय आलोचू आइके।मनोगत ओळखे मुंगियेचे ॥...(अ.६,ओ.२६९)
...
बांबुळी: शेवाळ
परी उदकें झाली बांबुळी । ते उदकासी जैसी झाकोळी। कां वायाचि आभाळीं । आकाश लोपे॥...(अ.७,ओ.६०)
....
कोलती: पेटती शिरपुटी, कोलीत (हा शब्द नागर मराठीत आहे. पण मालवणीत कोलती असा शब्द वापरतात. तोच ज्ञानेश्वरीत आहे.)
हे बहु असो झडती । अंधारे भोवंडिता कोलती । ते दिसे जैसी आयती । चक्राकार.
....
खाजें: हे मालवणी खाद्य प्रसिद्ध आहे.
जैसा वायसीं चंद्र नोळखिजे। तैसा ग्रंथु हा प्राकृतीं नेणिजे । आणि तो हिमांशुचि जेवि खाजें । चकोरांचे ...(६-२९)
....
हीर : यां पासून वाडवण( झाडू) बनवितात. पु.लं. च्या " म्हैस" या लेखातील ,"मग हीर नाय मोडत " हे वाक्य आठवावे.
अस्थींचे नळे निरपे । शिरांचे हीर ओरपे । तंव बाहेरी विरूढी करपे । रोमबीजांची ॥...(६-२३४)
...
तसेच: खडूळ(११-५५७०), गुंडे (१३-४७), पाडा (८-८), चावदस (१३-८१८), सांवर (९-१७४), मेर (८-७४) असे शब्द आहेत. धांडोळा घेतल्यास आणखी सापडावेत.
(कंसातील संख्या अध्याय-ओवी या क्रमाने आहेत.)
प्रतिक्रिया
20 Feb 2016 - 5:45 am | अजया
रोचक लेख.अजून वाचायला आवडेल.
20 Feb 2016 - 6:15 am | यशोधरा
अजूनही शोधता येतील. लेख आवडला.
20 Feb 2016 - 6:40 am | प्रचेतस
मस्त.
पण एकूणातच यादवकालीन मराठीवर कन्नड भाषेचाही मोठा प्रभाव होता. मालवणीतील हे शब्द अस्सल मराठी का कन्नडमधून उत्क्रांत झालेले हे शोधले पाहिजे.
20 Feb 2016 - 12:15 pm | संजय पाटिल
+१; सहमत.
20 Feb 2016 - 7:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडला लेख.
-दिलीप बिरुटे
20 Feb 2016 - 7:59 am | विजय पुरोहित
अतिशय आवडला लेख...
20 Feb 2016 - 9:59 am | जेपी
रोचक माहिती..
20 Feb 2016 - 10:21 am | नाखु
असे विस्मृतीत गेलेले किंवा इतर भाषांमध्ये मिसळलेले शब्दांबद्दल वाचायला आवडेल.
बॅट्या कुठेस तू ये या धाग्यावर (तरी) ये !
20 Feb 2016 - 10:21 am | प्रीत-मोहर
सुरेख
मुडा, गोरवां, आर, कोलती, खाजें, हीर ,पाडा, मेर, सांवर , गुंडे( फातर, दगड) हे शब्द तर कोकणी आणि चित्पावनीत आणि भटी भाषेत ही जसेच्या तसे वापरले जातात.
22 Feb 2016 - 2:23 pm | बॅटमॅन
या दोन्ही वेगळ्या भाषा आहेत? भटी भाषा हे नाव प्रथमच ऐकतोय. कोकणापुरते बोलायचे तर भट = चित्पावन आणि बामण = सारस्वत असे क्लासिफिकेशन ऐकलेले आहे, त्यामुळे भटी = चित्पावनी असे वाटते. तसे नसेल तर भटी म्हणजे कुठली भाषा याचा खुलासा व्हावा ही विनंती.
22 Feb 2016 - 2:26 pm | यशोधरा
सहमत.
22 Feb 2016 - 2:39 pm | पैसा
http://www.misalpav.com/node/23993 इथल्या चर्चेत याबद्दल लिहिलेले आहे.
22 Feb 2016 - 2:53 pm | पिशी अबोली
या दोन्ही वेगळ्या बोली आहेत.
कोंकणपट्टा, गोवा व कर्नाटकातील मराठी ब्राह्मणी बोलींमध्ये चित्पावनी, कऱ्हाडी, पद्ये असे प्रकार आहेत. चित्पावनीसुद्धा रत्नागिरी, गोवा आणि कर्नाटकात वेगवेगळी बोलली जाते असे निरीक्षण आहे, पण त्याबद्दल प्रीमो जास्त चांगले सांगू शकेल.
कऱ्हाडी कर्नाटकात बऱ्यापैकी जिवंत आहे असे ऐकून आहे. कोकणात बोलतात का कल्पना नाही. गोव्यातील जुन्या पिढीचे लोक बोलायचे. आता अगदी तुरळक असतील, पण जवळपास कर्हाडे घरांमध्ये मराठीच बोलली जाते.(कुणाला ही बोली बोलणारे गोवा/महाराष्ट्रातील लोक माहिती असल्यास कृपया सांगा. डॉक्यूमेंट करायची आहे.)
भटी/पद्ये मात्र केवळ गोव्यात बोलली जाते. ही करहाड्यांचीच पोटजात सर्वसामान्यपणे मानतात. पण हे लोक कुठून आले याबद्दल मतभेद आहेत. पद्ये लोकांबद्दल सह्याद्री खंडात उल्लेख आहे.
जुन्या ऐकलेल्या कऱ्हाडी आणि चित्पावनीबद्दल असे निरीक्षण आहे, की या स्वतंत्रपणे बोली म्हणून विकसित झाल्या. त्यांची स्वत:ची बोलीवैशिष्ट्ये आहेत. पण पद्ये मात्र मधे मधे आधुनिक कोंकणी आणि पोर्तुगीज शब्द पेरलेली जुनी मराठी वाटते. अर्थात असे सरसकट विधान चुकीचे आहे, पण तिच्या स्वरूपाबद्दल एक कल्पना यावी म्हणून फक्त.
22 Feb 2016 - 3:01 pm | बॅटमॅन
भटी = पद्ये असं तुमच्या प्रतिसादावरून वाटतंय हे बरोबर का मग? अजून जास्त संज्ञा न वापरता उत्तर मिळाले तर प्रकाश लगेच पडेल.
22 Feb 2016 - 4:10 pm | प्रीत-मोहर
तुमच्या प्रश्नाचे उत्तर हो असे आहे!!!
(माहेरी चित्पावनी आणि सासरी भटी भाषा बोलणारी) प्री मो
22 Feb 2016 - 6:15 pm | बॅटमॅन
धन्यवाद.
20 Feb 2016 - 11:22 am | एस
फार छान व माहितीपूर्ण लेख. अजून माहिती आवडली असती.
20 Feb 2016 - 11:50 am | सतिश गावडे
छान लेख !!
20 Feb 2016 - 12:19 pm | स्पा
मस्त लेख
20 Feb 2016 - 2:39 pm | उगा काहितरीच
चांगला लेख. अजून वाचायला आवडेल .
20 Feb 2016 - 3:49 pm | मित्रहो
आवडला
20 Feb 2016 - 4:49 pm | चांदणे संदीप
लेख आवडला
Sandy
20 Feb 2016 - 9:02 pm | राही
केवळ कोंकणी-मालवणीतच नाही तर उत्तर कोंकणातल्या काही बोलींतही यादवकालीन मराठीतले अनेक शब्द आहेत. किंबहुना कोंकण प्रांत भौगोलिक रचनेमुळे उर्वरित महाराष्ट्रापासून अलग(आय्सोलेटेड) राहिल्यामुळे हे जुन्या मराठीशी असलेले नाते टिकून राहिलेले आहे. या बाबतीत कै. अशोक सावे यांनी बरेच संशोधन केले होते. 'तयाचा वेलू गेला गगनावेरी' हे उदाहरण ते नेहमी देत असत. वेरी म्हणजे पर्यंत. नव्या मराठीत 'वेरी'चे 'वर' झाले. जसे: तोवर जाऊ नको, किंवा मी येईस्तोवर थांब. पण उत्तर कोंकणी बोलींत अजूनही 'वेरी'च वापरतात. असे अनेक शब्द आहेत. जुन्या मराठीतले अनेक शब्द प्रमाणित मराठीतून नष्ट झाले, पण बोलीभाषांतून टिकून राहिले आहेत. समांतर उदाहरण द्यायचे झाले तर जुनी अभिजन संस्कृती(कपडे, नेसण, लोकव्यवहार इ.) आजच्या अभिजनसंस्कृतीत दिसत नाही पण आदिवासी किंवा भटक्या-विमुक्तांच्या चालीरीतीतून दिसते.
जाता जाता: 'हीर'संबंधी ओवीत "तंव बाहेरीं विरुढी करपे| रोमबीजांची" यातला 'विरुढी' म्हणजे सध्याचे बिरडे. वि+रुह- रुजणे, पण ज्ञानेश्वरकाळात बिरडें म्हणजे दोरीची सरकती गांठ. तसेच 'वाडवण' म्हणजे 'वाढवण' -वाढवणारी, पर्यायाने लक्ष्मी. केरसुणीला लक्ष्मी समजतात कारण ती घरातली अडगळ केरकचरा दूर सारते, नको असलेल्या जुन्या वस्तू दूर करते, नव्याला जागा निर्माण करते.
20 Feb 2016 - 11:27 pm | अभ्या..
कन्नडमध्ये (र) वरेगे म्हणजे पर्यंत. महाराश्ट्र, द. कोकण, कारवार, कर्नाटक अशी लिंक असण्यास हरकत नाही.
यादवकालीन मराठीत कन्नड प्रभाव असणारच. कानडी वारकरी मंडळीना इतर संतांच्या अभंगापेक्षा ज्ञानेश्वरी बरीच समजते असे बघितलेय.
21 Feb 2016 - 1:51 pm | यनावाला
@राही
...
....हा राही यांनी दिलेला अर्थ पटला. पूर्वी पुण्यात लग्नाच्या जेवणात "बिरड्याची उसळ " हा पदार्थ अत्यावश्यक होता. बिरडे म्हणजे अंकुरलेले(मोड आलेले ),विरुढलेले, कडवे वाल.
21 Feb 2016 - 2:08 pm | यनावाला
असे राही लिहितात ते ठीकच आहे.योगायोग म्हणजे याच मालिकेतील "ओबामा आलारे ! " या बोली भाषेतील गोष्टीत वेरी हे अव्यय , पर्यंत,पावेतो या अर्थी, दोनदा आले आहे. मराठी पद्यलेखनात याच अर्थाचा "वरी" असा पर्याय आहे.उदा,
"जोवरी पैसा,तोवरी बैसा."
"तोंवरी रे तोंवरी । जंबूक गर्जना करी। जोंवरी पंचानना देखिला नाही रे बाप ।"
22 Feb 2016 - 1:05 pm | राही
मराठीत वरी/वर हा प्रत्यय 'पर्यंत' या अर्थाने काळाचे अंतर दाखवण्यासाठी किंवा नेमका काळ सांगण्यासाठी वापरले जाते. 'वेलु गेला गगनावेरी'मध्ये 'वेरी' प्रत्यय स्थळाचे अंतर दाखवण्यासाठी वापरला आहे आणि अपरान्ती मराठीत तो ह्याच अर्थाने वापरला जातो. म्हणजे 'थांब, विहिरीवेरी जाऊन येते'-अर्थात 'थांब, विहिरीपर्यंत जाऊन येते'. आपणही कधीकधी म्हणतो, नदीवर जाऊया, काठावर चपला ठेवूया'. या वाक्यात नदीवर म्हणजे नदीपर्यंत हे ठीक पण काठावर म्हणजे काठापर्यंत हे बरोबर नाही. काठावर हे खुर्चीवर, टेबलावरप्रमाणे समजले पाहिजे, इंग्लिश ऑन अथवा ऑन द टॉप ऑव या अर्थाने.
20 Feb 2016 - 9:06 pm | राही
काही कोंकणी लोक ज्ञानेश्वरीची भाषा कोंकणीच आहे असे मानतात. कोंकणी कित्येक शतके स्टॅग्नंट राहिली, मराठी मात्र खूप बदलली आणि यादवकालीन भाषेपेक्षा वेगळी झाली. (आता मात्र कोंकणीच्या वाढीने वेग पकडला आहे.)
20 Feb 2016 - 10:58 pm | एस
कोंकणी कित्येक शतके स्टॅग्नंट राहिली हे विधान थोडे तपासून पहावे लागेल. अशी कुठली भाषा वा बोलीभाषाही अविचल राहणे जरा अवघड वाटतेय.
21 Feb 2016 - 8:10 am | राही
स्टॅग्नंट म्हणताना 'अगदीच जडशीळ' असा अर्थ मनात नव्हता. पोर्तुगीज़ काळात कोंकणीला महत्त्व दिले गेले नाही. सुरुवातीला फक्त धर्मप्रसाराच्या हेतूने, सामान्य लोकांस कळावे म्हणून क्रिस्टियन धर्मसाहित्य कोंकणीत लिहिले गेले. फा.स्तीफनचे क्रिस्तपुराण वगैरे. नंतर मुख्य भूमीशी गोव्याचा संपर्क राहिला नाही आणि बाहेर झालेल्या बदलांचा ठसा कोंकणीवर उमटला नाही. हे एक प्रकारे चांगलेच झाले, कारण त्यामुळे भाषेचे मूळ रूप टिकून राहिले. आज ज्ञानेश्वरी ही मराठी भाषकांना कळेल त्यापेक्षा अधिक कोंकणी भाषकांना कळेल. कारण आजच्या मराठी यादवकालीन मराठीपासून खूपच वेगळी झाली आहे, पण कोंकणी थोड्या कमी प्रमाणात वेगळी झाली आहे.
उत्तर आणि दक्षिण कोंकणात पोर्तुगीज़ प्रभाव नव्हता पण पठारी प्रदेशापासून भौगोलिक विलगता होती. त्यामुळे मराठीचे जुने रूप थोड्या प्रमाणात कोंकणात अधिक टिकून राहिले असावे.
21 Feb 2016 - 8:31 am | प्रचेतस
यावरून अवांतर- ख्रिस्तपुराण कोंकणीत- मराठीत लिहिले गेले हे खरेच पण लिहिताना फादर स्टीफनने रोमन लिपी वापरली होती ना?
मजकडे क्रिस्ताच्या वधस्तंभारोहणप्रसंगीचे विळाप नावाचे क्रिस्तपुराणालाच समकालीन असलेले एक दुर्मिळ पुस्तक आहे. जे कोंकणी मराठीत परंतु रोमन लिपीत लिहिले गेले आहे.
21 Feb 2016 - 9:59 am | राही
लिपीविषयी मला माहिती नाही, पण ती रोमनच असावी. तोपर्यंत कोंकणाचे बहुतेक सर्व धार्मिक वाङ्मय मराठीत होते. आजही आरत्या वगैरे बहुतांशी मराठीच आहेत. सांखळी येथील दत्तमंदिरातले काही पेणे (पेणे म्हणजे प्रवासातली थांब्याची अथवा पडावाची जागा. त्यावरून पालखी प्रदक्षिणेत पालखी काही जागी थांबते तिथे म्हणावयाचे अभंग अथवा स्तोत्रे.) कानडीदेखील आहेत. म्हणजे कोंकणीत फारसे धार्मिक साहित्य त्या काळी नसावे, आणि सामान्य जनांचा धार्मिक व्यवहार मराठी/संस्कृतातून असावा. त्या काळी निरक्षरता फार असल्यामुळे सामान्य माणसाला लिपीशी देणेघेणे नसावे. कीर्तने-पोथ्या-पुराणे/अभंग/ओव्या/स्तोत्रे यांचे श्रवण आणि गायन यालाच अधिक महत्त्व असावे. पण मिशनर्यांकडे पठणाची मौखिक परंपरा नसणार. तेव्हा त्यांना त्यांच्या धार्मिक साहित्याच्या प्रचारासाठी (लोकांना श्रवणासाठी वाचून दाखवताना) लिपीची गरज पडली असणार. त्यांनी स्वतःच्या सोयीची रोमन लिपी वापरली असावी आणि नंतर राज्यकारभारात ती सार्वत्रिक झाली असावी..
21 Feb 2016 - 1:42 pm | यनावाला
@प्रचेतस
...
फादर स्टिफन्स्चे ख्रिस्त पुराण रोमन लिपीतच छापले होते. कारण त्याकाळी देवनागरी टंक तयार केला नव्हता.
गोव्यात छपाई यंत्र आले. त्यानंतर एका शतकाने ते मुंबईत आले असे वाचल्याचे स्मरते.
21 Feb 2016 - 2:07 pm | अभ्या..
हो. १५५६ मध्ये अॅबसिनिअन जेसुइटांनी गोव्यात पहिली प्रेस आणली. त्यात सगळे रोमन टायीप्स होते. १५७७ मध्ये देवनागरी टायीप्स तयार झाले. १६२६ ला पोर्तुगीज टू कोंकणी डिक्शनरी तयार झाली.
21 Feb 2016 - 4:03 pm | प्रचेतस
राही, अभ्या, यनावाला तिघांचेही माहितीपूर्ण प्रतिसाद आवडले.
20 Feb 2016 - 10:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
रोचक माहिती !
21 Feb 2016 - 11:51 am | सस्नेह
वेगळेच अनवट शब्द !
ज्ञानेश्वरीतील मराठी नागर भाषेपेक्षा वेगळी वाटते खरी.
21 Feb 2016 - 4:12 pm | सतिश गावडे
थोडासा वेगळा प्रश्न आहे माझा.
ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरीतील भाषा आणि त्यांच्या "मोगरा फुलला" किंवा "पैल तो गे काऊ कोकताहे" या अभंगांतील भाषा यामध्ये खुपच फरक जाणवतो. ज्ञानेश्वरी ही गीतेवरील टीका आहे. त्यामुळे ग्रंथलेखन आणि उस्फुर्त काव्य याविषयीच्या भाषा वापराचे काही संकेत त्या काळी असावेत का?
21 Feb 2016 - 4:15 pm | अभ्या..
ओन्ली राहीताई नाहीतर बॅटमॅनदादा डिझर्व्ह.
इथे आमची मती खुंटली.
21 Feb 2016 - 10:35 pm | राही
तसेच असावे. हे अभंग आणि हरिपाठाचे अभंग शब्द आणि वाक्यरचनेच्या दृष्टीने ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभवापेक्षा समजायला सोपे वाटतात. लेखकाची पूर्वपीठिका, त्याचा परिसर, उपजीविकेचे साधन, डोळ्यांसमोरचा वाचकवर्ग (टार्गेटेड ऑडियन्स) या सर्वांचा प्रभाव लेखकाची भाषाशैली आणि शब्दनिवड यांवर पडत असावा. ज्ञानेश्वरांना काहीसे समकालीन नामदेव समजायला सोपे पण थोड्या आधीच्या मुकुंदराजांचा विवेकसिंधु अतिअवघड. पुढील काळातही दासबोध सोपा पण देशी शब्दांचा भरणा असलेला गाथा कठिण. पण त्याचबरोबर 'जे का रंजले गांजले' सोपे. शब्दयोजनेच्या दृष्टीने ग्रेस-मर्ढेकर कठिण पण बापट-पाडगावकर-करंदीकर सोपे.
खरा प्रश्न असा की मूळ भगवद्गीतेचे संस्कृत हे संस्कृत भाषा अगदी प्राथमिक स्तरावर जाणणार्यालाही समजण्याइतके सोपे तर गीता सोपी करणारी ज्ञानेश्वरी कठिण का वाटते? मला असे सुचते की संस्कृतमध्ये आता शेकडो वर्षांत बदल घडलेले नाहीत. ती जैसे थे आहे. पण मराठी(आणि अन्य अनेक समकालीन भाषा) ही लोकव्यवहाराची भाषा राहिल्याने बदलते आहे. दुसरे म्हणजे ज्ञानेश्वरीतले अस्सल देशी आणि प्राकृत शब्द वापरातून गेले आहेत. याचे कारण १३३४ सालच्या देवगिरीच्या पाडावानंतर थेट १५९५मध्ये मालोजीराव जाधवांना निज़ामशहाकडून पुणे-चाकणची जहागिरी मिळेपर्यंत अडीजशे वर्षे महाराष्ट्रावर परभाषक राजवटींनी राज्य केले. प्राकृत आणि कानडीचा प्रभाव असलेली मराठी राजव्यवहारातून जाऊन त्या जागी फारसी, तुर्की शब्द आले. मराठीचे रूप बदलले. नंतर शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहारात संस्कृतनिष्ठ मराठीला प्राधान्य दिले तेव्हा कुठे फारसीचा प्रभाव हटला. पण दरम्यानच्या काळात वापरातून गेलेले जुने शब्द पुन्हा प्रचारात काही आले नाहीत. मराठी बदलली ती बदललीच.
21 Feb 2016 - 10:39 pm | सतिश गावडे
धन्यवाद राही.
हरीपाठाचे अभंग तर अगदी काल परवा लिहिलेले असावेत इतके आजच्या भाषेशी साम्य दाखवतात.
21 Feb 2016 - 10:42 pm | राही
संपादक, कृपया वरील पहिला प्रतिसाद काढून टाकावा, तो दोनदा पडला आहे. नंतरचा ठेवावा.
21 Feb 2016 - 10:38 pm | राही
तसेच असावे. हे अभंग आणि हरिपाठाचे अभंग शब्द आणि वाक्यरचनेच्या दृष्टीने ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभवापेक्षा समजायला सोपे वाटतात. लेखकाची पूर्वपीठिका, त्याचा परिसर, उपजीविकेचे साधन, डोळ्यांसमोरचा वाचकवर्ग (टार्गेटेड ऑडियन्स) या सर्वांचा प्रभाव लेखकाची भाषाशैली आणि शब्दनिवड यांवर पडत असावा. ज्ञानेश्वरांना काहीसे समकालीन नामदेव समजायला सोपे पण थोड्या आधीच्या मुकुंदराजांचा विवेकसिंधु अतिअवघड. पुढील काळातही दासबोध सोपा पण देशी शब्दांचा भरणा असलेला गाथा कठिण. पण त्याचबरोबर 'जे का रंजले गांजले' सोपे. शब्दयोजनेच्या दृष्टीने ग्रेस-मर्ढेकर कठिण पण बापट-पाडगावकर-करंदीकर सोपे.
खरा प्रश्न असा की मूळ भगवद्गीतेचे संस्कृत हे अगदी प्राथमिक स्तरावर संस्कृत जाणणार्यालाही समजण्याइतके सोपे तर गीता सोपी करणारी ज्ञानेश्वरी कठिण का वाटते? मला असे सुचते की संस्कृतमध्ये आता शेकडो वर्षांत बदल घडलेले नाहीत. ती जैसे थे आहे. पण मराठी(आणि अन्य अनेक समकालीन भाषा) ही लोकव्यवहाराची भाषा राहिल्याने बदलते आहे. दुसरे म्हणजे ज्ञानेश्वरीतले अस्सल देशी आणि प्राकृत शब्द वापरातून गेले आहेत. याचे कारण १३३४ सालच्या देवगिरीच्या पाडावानंतर थेट १५९५मध्ये मालोजीराव जाधवांना निज़ामशहाकडून पुणे-चाकणची जहागिरी मिळेपर्यंत अडीजशे वर्षे महाराष्ट्रावर परभाषक राजवटींनी राज्य केले. प्राकृत आणि कानडीचा प्रभाव असलेली मराठी भाषा राजव्यवहारातून जाऊन त्या जागी फारसी, तुर्की शब्द आले. मराठीचे रूप बदलले. नंतर शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहारात संस्कृतनिष्ठ मराठीला प्राधान्य दिले तेव्हा कुठे फारसीचा प्रभाव हटला. पण दरम्यानच्या काळात वापरातून गेलेले जुने शब्द पुन्हा प्रचारात काही आले नाहीत. मराठी बदलली ती बदललीच.
22 Feb 2016 - 9:08 am | अजया
प्रश्न आणि प्रतिसाद देखील आवडले.या सप्ताहानिमित्ताने बोलीभाषांवर चर्चा होत आहे याचा फार आनंद वाटतो आहे.
21 Feb 2016 - 10:29 pm | पैसा
लेख आवडला. अशी अनेक साम्यस्थळे सांगता येतील. त्याबद्दल मी थोडेफार लिहिले होते. http://www.misalpav.com/node/23993
21 Feb 2016 - 10:34 pm | यनावाला
@ सतीश
..
सतिश गावडे पृच्छा करतात,
..असे संकेत असण्याची मुळीच शक्यता नाही. मात्र तुमचा प्रश्न मूलभूत आहे. ज्ञानेश्वरीची भाषा आणि ज्ञानदेवांच्या अभंगांची भाषा यांत मोठी भिन्नता आहे ही गोष्ट तुमच्या ध्यानी आली हे प्रशंसनीय आहे. विचारपूर्वक वाचले, थोडी भाषाचिकित्सा केली तरच हे लक्षात येऊ शकते. [तुम्हाला पडलेल्या प्रश्नावर गेली कांही वर्षे विचार करतो आहे. (सतत नव्हे. आठवेल तेव्हा. ) तीन पर्याय सुचतात. लेखन पूर्ण झालेले नाही. असो. ]
ज्ञानेश्वर नाथपंथीय होते. ज्ञानेश्वरीत याचा उल्लेख आहे (अ.सहावा). त्यांचे गुरू निवृत्तिनाथ हेही नाथपंथीच होते. नाथपंथात विठ्ठल भक्तीला स्थान नाही. ज्ञानेश्वरीत विठोबा,पंढरपूर, वारी,भागवत पंथ यांचा कुठेही उल्लेख नाही. तुम्ही म्हणाल गीतेत नाही म्हणून ज्ञानेश्वरीत नाही. गीता आहे सातशे श्लोकांची तर ज्ञानेश्वरीत आहेत नऊसहस्र ओव्या.गीतेत नसलेल्या कित्येक गोष्टी ज्ञानेश्वरीत आहेत. ज्ञानेश्वरी म्हणजे केवळ गीतेवरील टीका नव्हे. ती स्वतंत्र रचना आहे. ज्ञानेश्वरी,अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या तीनही रचनांची भाषा समजण्यास क्लिष्ट आहे. तर ज्ञानदेवांचे हरिपाठाचे अभंग तसेच "बाप रखुमादेवीवरू" ही नाममुद्रा असलेले अभंग अगदी प्रासादिक म्हणजे आकलनसुलभ आहेत. "अवघाची संसार सुखाचा करीन ।आनंदे भरीन तिन्ही लोक । जाईन गे माये तया पंढरपूरा ।भेटेन माहेरा..." हा अभंग ज्ञानदेवांचा आहे. (असा माझा समज आहे.)
सतीश गावडे यांना पडलेला प्रश्न ज्ञानेश्वरांच्या रचनांचा थोडा- फार परिचय असणार्या सर्वांनाच पडावा असा आहे.
22 Feb 2016 - 12:28 pm | स्वच्छंदी_मनोज
मस्त चर्चा चालू आहे.
ज्ञानेश्वरी ही काही एक उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन ठरावीक लोकांसमोर त्याना समजेल आणी महत्वाचे म्हणजे पटेल आणी रुचेल अश्या भाषेत लिहीली असेल काय? एका सलग कालखंडात लिहीली/सांगितली आणी एका निश्चीत उद्देशाने (समाज प्रबोधन हा एक आहेच पण शिवाय लोकांना एका ठरावीक विचारधारेकडे वळवण्यासाठी, थोडेफार पहील्या शतकातल्या शंकराचार्यांसारखे) जर सांगितली असेल तर त्याकाळी वापरात असलेल्या भाषेतच ज्ञानेश्वरी लिहीणे भाग पडले अशू शकेल. दुसरे म्हणजे ज्ञानेश्वरीतील भाषेवर ज्याने ही लिहीली त्याच्या वापरातल्या बोली भाषेचा प्रभाव पडला असेल काय?
ज्ञानेश्वरांचे बाकीचे अभंग हे एक सलग उद्देशाशिवाय (जसे की गीतेवरील टीका) वेळेपरत्वे वेगवेगळ्या गावांतून जर रचले गेले असतील तर भाषेत फरक पडून जास्त प्रमाण किंवा ज्ञानेश्वरांच्या स्वतःच्या रोजच्या वापरातल्या भाषेत ते रचले जाण्याची जास्त शक्यता वाटते.
22 Feb 2016 - 8:54 pm | प्रचेतस
अमृतानुभवात कदाचित योग आणि तत्वज्ञानावर जास्त भर दिलेला असल्याने ते समजण्यास कठीण झाले असावे का? ज्ञानेश्वरी सामान्यांनाहि समजावी म्हणून सोप्या भाषेत रचली असावी. अमृतानुभव ही माऊलींची शेवटची रचना आहे. कित्येक अभ्यासक तीज ज्ञानेश्वरीपेक्षाही श्रेष्ठ मानतात. पण क्लिष्टतेमुळे अमृतानुभव सामान्यांपासून तसा दूरच गेला.
23 Feb 2016 - 10:42 am | राही
ज्ञानेश्वरांना दीक्षा नाथपंथाची मिळाली, पण त्यांचे अनुयायी नाथपंथी नव्हते. प्रत्येक धर्म अथवा पंथसंस्थापक हा आधी कुठल्या ना कुठल्या धर्म/पंथाचा असतो मात्र त्याच्याकडून त्याच्या मूळ धर्मात सुधारणा/बदल झाल्यामुळे आणि ते लोकांना पटल्यामुळे नवीन पंथ तयार होतो. नाथपंथ/संप्रदाय हा प्रामुख्याने शैव मताचा होता. नंतर त्यावर तंत्राचा पगडा वाढला. आदिनाथ हा शिवच असे अनेक अभ्यासू लोक मानतात. जैनही आदिनाथांना त्यांचा प्रथम तीर्थंकर आणि जैनमताचा प्रथम उद्गाता मानतात. नाथांची काही बाह्यलक्षणे असतात. त्यांची दीक्षेची आणि उपासनेची पद्धतही वेगळी असते. ज्ञानेश्वरांनी हे सर्व पुढे न नेता भक्तीचा मार्ग लोकांना दाखवला. नाथांचेही उद्दिष्ट मोक्षच, पण साधन आणि मार्ग वेगळा. गीतेमध्ये ज्ञान, भक्ति, कर्म, सांख्य असे अनेक मार्ग मुक्तीसाठी सांगितले आहेत. त्यातला भक्तिमार्ग ज्ञानेश्वरांना कदाचित सर्वसामान्यांसाठी सोपा वाटला असेल, म्हणून हरिपाठातून त्यांनी भक्तीचा पुरस्कार केला.
दुसरे म्हणजे शैवमतात तंत्राचे अवडंबर माजू लागले होते. ज्ञानेश्वरांनंतर भक्तिमार्गामध्ये त्याची गरज उरली नाही. वैष्णव पंथाला उत्थान मिळाले. येशूला ज्यू किंवा गुरु नानकांना हिंदू ठरवणे जितके चुकीचे तितके ज्ञानेश्वरांना नाथपंथी मानणे चुकीचे आहे.
22 Feb 2016 - 8:35 am | यशोधरा
सुरेख चर्चा सुरु आहे! वाखु साठवता आली असते तर बरे झाले असते.