(कवितेत टाकू की कथेत कळले नाही तर कवितेतच टाकून मोकळा होतो...)
काम्पिल्य नगरात राहणारा
गरीब, पापभीरु,
ईश्वर साधनेत रमलेला..
स्टिरिओटाईप्ड एक 'क्ष',
दंडकारण्यात राहणाऱ्या
काळ्याकभिन्न, राकट, हिंस्र..
स्टिरिओटाईप्ड एका 'य' ला
पम्पा सरोवराकाठी भेटला.
य ने सरोवरात भाले मारून मासे पकडले.
क्ष ने वनातून कंदमुळे, फळे गोळा केली.
य ने सरोवरातून पाणी शेंदले.
क्ष ने त्याच सरोवरातून पाणी शेंदले.
(हे मात्र कुणीच कुठेच नाही लिहीले.)
य ने आपली वेगळी चूल मांडली.
क्ष ने आपली वेगळी चूल मांडली.
दोघांनी आपापल्या संस्कृतीप्रमाणे
स्वयंपाक रांधला.
तोवर दोघे गप्पा मारत बसले.
क्ष ने य ला विचित्र भाषेत काहीतरी
लयबद्ध म्हणून दाखवले.
य सॉलिड इम्प्रेस झाला.
य ने क्ष ला जंगलातल्या प्राण्यांची गुपिते सांगितली.
क्ष सॉलिड इम्प्रेस झाला.
आता दोघांनी पत्रावळी आणि द्रोण बनवले.
जेवणाला सुरुवात करणार होते दोघेही.
क्ष परत विचित्र भाषेत काहीतरी पुटपुटला
आणि एक घास बाहेर काढून ठेवला.
य ने गळ्यातून आवाज काढला.
एक रानमांजर आली,
तिला माशाचा एक तुकडा त्याने फेकला.
तेवढ्यात एक टोळी तिथे आली.
क्षने पुढे जाऊन त्यांचे स्वागत केले.
विचित्र भाषेत त्यांनी क्ष शी संवाद साधला.
क्ष ने य ला सांगितले की,
ही मंडळी नैमिषारण्यातली आहेत.
अरण्य शब्द ऐकताच य खुलला.
त्याने त्या टोळीच्या प्रमुखाला विचारले..
नैमिषारण्यातली प्राण्यांविषयी, पक्ष्यांविषयी,
तिथे राहणाऱ्या लोकांविषयी.
टोळीप्रमुख म्हणाला, " भूक लागली आहे,
43 काही मिळेल का?
दमलो आम्ही प्रवासाने."
य ने आपली पत्रावळी पुढे केली.
क्ष ने आपली पत्रावळी पुढे केली
टोळी बसली क्ष च्या पत्रावळीपाशी.
ते पहिला घास घेणार तेवढ्यात..
एक तेजःपुंज, रागाने लालबुंद चेहऱ्याचा
एक म्हातारा तिथे आला.
सगळ्यांनी त्याला लोटांगण घातले,
म्हणून य ने ही लोटांगण घातले.
तो म्हातारा गरजला, "खायला द्या!"
क्ष ची थाळी लगेच पुढे सरकली.
तो परत गरजला,
"तुम्ही पण सोबतच जेवा, नाहीतर मी देईन एक शाप! "
आता आली पंचाईत!
तेवढ्यात य ने आपली थाळी पुढे केली.
नैमिषारण्यातली टोळी आणि
काम्पिल्य नगरातील क्ष
दोघांनीही घाबरत घाबरत
य च्या थाळीतील पहिला घास उचलला
आणि गळ्याखाली कसाबसा ढकलला.
.
.
.
अजूनही पम्पा सरोवर परिसरात ऐकू येतात
युगानुुयुगांच्या तृप्तीच्या ढेकरा!
-- स्वामी संकेतानंद
प्रतिक्रिया
14 Feb 2016 - 9:49 pm | जव्हेरगंज
___/\___
15 Feb 2016 - 9:34 am | ज्ञानोबाचे पैजार
तृप्ती ला निसर्गोपाचाराची गरज आहे.
डॉ. आरती साठे या दुखण्या बद्दल इथे असं सांगतात की
"सहन होत नाही आणि सांगता येत नाही,' अशा दुखण्यांपैकी पोटात वायू (गॅस) होणे, हे एक दुखणे होय. सतत ढेकरा येणे अथवा गुदद्वारामार्गे वायू बाहेर पडणे, हे रुग्णाला घरात अथवा घराबाहेर वावरताना संकोचास्पद वाटतेच; पण पोटातील अस्वस्थता व संडासच्या तक्रारींमुळे तो हवालदिल होऊन जातो. सुरवातीला क्षुल्लक वाटणारे हे दुखणे पुढे अनेक गंभीर दुखण्यांना आमंत्रण देऊ शकते. जसे वायूमुळे पचनमार्गातील अन्न पुढे ढकलण्याची क्रिया मंदावते, अर्धवट पचलेले अन्न अथवा मलही पुढे न सरकल्यामुळे आतील भागास चिकटते. याचा परिणाम म्हणून संडासला साफ न होऊन बद्धकोष्ठ अथवा मूळव्याधीची तक्रार निर्माण होऊ शकते. असे वारंवार घडत राहिले, तर आतड्यास सूज निर्माण होऊन कोलायटीस व त्याहीपुढे कदाचित अल्सराइटिव्ह कोलायटीसचा त्रास होऊ शकतो. यकृताचे कार्य मंदावल्यामुळेसुद्धा अन्नपचनावर परिणाम होऊ शकतो. हाच वायू संधिवात, रक्ताभिसरण क्रियेवर परिणाम, डोके दुखणे, छातीत दुखणे इत्यादी त्रास निर्माण करू शकतो. म्हणूनच आपल्याला जाणवणारी लक्षणे तज्ज्ञांना वेळीच सांगून उपचार सुरू करणे गरजेचे ठरते.
तृप्ती भेटली की तिला तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला सांगावा
पैजारबुवा,
15 Feb 2016 - 9:57 am | पैसा
झकास! कांपिल्य आणि नैमिषारण्यातील मंडळी कोणाच्या तरी धाकाने का होईना एकत्र नांदायला तयार झाली हे मस्त!
15 Feb 2016 - 8:26 pm | शिव कन्या
:-) आवडली !
16 Feb 2016 - 2:13 pm | वेल्लाभट
ही 'कविता' आहे?
16 Feb 2016 - 8:48 pm | स्वामी संकेतानंद
मलाही नाही वाटत. :P मुळात मी कथा लिहीली होती,पण आधुनिक मुक्तछंद पद्धतीने मांडणी केलेली असल्याने अखेर कवितेतच टाकली. वर लिहीले आहेच की, की कथेत टाकावे की कवितेत ते कळले नाही म्हणून.
16 Feb 2016 - 9:59 pm | चांदणे संदीप
स्वामीजी, ही कविताच आहे आणि खूपच आवडली आहे एवढे बोलून मी आपणांस मिटवून घ्यायची(कथा की कविता? हा सुरू न झालेला वाद!) विनंती करतो. काय्ये, मिपावर आजकाल कुठलाही प्रश्न, चर्चा, काकू खूप्च लां.......ब जाऊन पोचण्याची भिती वाटते! :(
Sandy