'पण हा फोन आहे कुठे? आणि तो वापरायचा कसा?'
'सांगत्ये ऐका' बंड्याला बसते करीत नर्स म्हणाली.
*************************************************************
'आयफोन-१२ म्हणजे एक एकसंध चौकोनी ठोकळा नाही. त्याचे वेगवेगळे पार्ट्स तुमच्या शरीराशी इंटिग्रेट करण्यात आले आहेत, जेणेकरून तुमचा फोन वापरणं हे तुमच्या शरीराचा एखादा अवयव वापरण्याइतकंच सोपं झालं आहे. उदाहरणार्थ, तुमच्या टाळूमध्ये त्याची जीपीएस चिप बसवली आहे. तुमच्या कानांमध्ये त्याचे स्पीकर्स बसवण्यात आले आहेत. तुमच्या हिरडीमध्ये मायक्रोफोन बसवला आहे. आणि हे पहा' असे म्हणून तिने त्याच्यासमोर आरसा धरला. बंड्याने आरशात पाहिले. त्याचा एक दात उपटून त्याजागी एक निळा दात बसवण्यात आला होता. 'हा तुमचा ब्लूटूथ. याचा वापर करून तुम्ही तुमच्या कारच्या एंटरटेनमेंट सिस्टीमशी किंवा अन्य कोणत्याही ब्लूटूथ डिव्हाईसशी कनेक्ट होऊ शकता. शिवाय तुम्हाला बत्तीस टेराबाईटसची मेमरी उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि तुम्ही ती भविष्यात दोनशेछप्पन टेराबाईट्सपर्यंत अपग्रेड करू शकता. अरे हो, तुमच्या उजव्या बुब्बुळात फोनचा कॅमेरा बसवला आहे. आता तुमचा कॅमेरा सतत तुमच्या बरोबर असेल. तुमच्या जीवनातला कुठलाही क्षण आता कॅमेर्याअभावी तुम्हाला रेकॉर्ड करता आला नाही असं होणार नाही. तुमचा कॅमेरा तुम्ही खेळताना, पावसात, पाण्याखाली, केव्हाही, कुठेही वापरू शकता'.
हे सर्व ऐकून बंड्या फारच खूष झाला.
'हे सर्व पार्ट्स टायटॅनियम वायर्सच्या सहाय्याने एकमेकांशी जोडण्यात आले आहेत. आणि अर्थात या सगळ्या भागांना उर्जा पुरवणारी बॅटरी देखिल तुमच्या शरीरात पर्मनंटली इन्स्टॉल केलेली आहे.'
त्या खोलीत सर्वत्र फोनसाठी लागणारे स्पेअर पार्ट्स ठेवले होते. त्यांपैकी 'बॅटरीज' असे लिहिलेल्या एका बॉक्सकडे बंड्याचे लक्ष कधीपासून गेले होते. त्यात वाट्यांसारखे दिसणारे दोन गोलाकार भाग ठेवले होते.
'आर दोज द बॅटरीज?'
'अंऽऽऽऽ...हो. पण त्या तुमच्यासाठी नाहीत सर. त्या लेडीज बॅटरीज आहेत.'
'??!!'
'त्याचं असं आहे सर, लेडीज फोनवर सतत बोलत असतात ना म्हणून त्यांना दुप्पट बॅटरी कपॅसिटी लागते. शिवाय या बॅटर्यांनी सौंदर्यवृद्धी होते ती वेगळीच. टू बर्ड्स इन वन स्टोन. मीसुद्धा त्याच बॅटर्या वापरते.'
बंड्याची ट्युब पेटली. नर्सच्या सौष्ठवाचे रहस्य त्याच्या अचानक लक्षात आले.
'हम्म्म... टू बर्ड्स इंडीड!' बंड्या म्हणाला आणि नर्सने त्याला डोळा मारला.
'बरं मग माझी बॅटरी कुठे आहे?'
'इट्स इन युवर लेफ्ट चीक, सर'
बंड्याने अभावितपणे आपल्या डाव्या गालाला हात लावून पाहिला.
'नॉट दॅट चीक, सर!'
बंड्याला आपल्या पार्श्वभागात डाव्या बाजूला थोडे ठणकत असल्याची त्यावेळी प्रथमच जाणीव झाली. त्याने त्या जागी हात लावून पाहिले आणि तिथे काही टणक वस्तू असल्याचे त्याला जाणवले.
'तुमचं शरीर आणि तुमचा फोन आता वेगळे नाही. आता तुम्ही कोणत्याही वेळी, कोणत्याही अवस्थेत तुमच्या फोनचा वापर करू शकता. आता मी तुम्हाला या सगळ्याचा वापर कसा करायचा ते दाखवते हं...' असे म्हणून नर्सने तिच्या समोरच्या टचस्क्रीनवर काही टाईप केले, आणि अचानक बंड्याच्या कानात ॲपलचा चिरपरीचित रिंगटोन वाजू लागला. त्याच्या उजव्या डोळ्यातून प्रोजेक्टरसारखा प्रकाश आला आणि त्याच्या डोळ्यासमोर एक होलोग्राफिक प्रोजेक्शन तयार झाले. एक स्क्रीन त्याच्या डोळ्यासमोर उभी राहिली आणि तिच्यावर 'वेलकम कॉल फ्रॉम ॲपल हेडक्वार्टर्स' असा मेसेज दिसू लागला. त्या मेसेजखाली 'ॲक्सेप्ट' आणि 'रिजेक्ट' अशा दोन आयकॉन्स उगवल्या. बंड्या आश्चर्यचकित होऊन स्क्रीनकडे पहात राहिला. 'प्लिज ॲक्सेप्ट द वेलकम कॉल, सर' नर्स म्हणाली आणि बंड्याने अनवधानाने हवेतलेच बटण दाबायचा प्रयत्न केला. नर्स खळखळून हसली.
'सर, तुम्ही फक्त 'ॲक्सेप्ट' असं तोंडाने म्हणायचं असतं.'
बंड्याने तसे केले आणि त्याच्या कानांमधल्या स्पीकर्समधून एक यांत्रिक आवाज उमटला 'वेलकम टू आयफोन-१२'. त्या आवाजाने बंड्याला आयफोन वापरण्याची जुजबी माहिती दिली, आणि त्याच्याकडून काही बेसिक प्रेफरन्सेस विचारून घेऊन त्याचा फोन सेटप करून दिला. शेवटी 'थॅन्क यु फॉर चुझिंग अवर प्रॉडक्ट' असे म्हणून तो आवाज बंद झाला आणि बंड्यासमोरची स्क्रीनही अंतर्धान पावली.
बंड्याचा चेहरा आनंद, आश्चर्य आणि कौतुकाने फुलून गेला होता.
एव्हाना नर्सच्या सर्व तपासण्याही संपत आल्या होत्या.
'तुमचे सर्व पोस्ट-ऑपरेशन रिपोर्ट नॉर्मल दिसत आहेत. आता तुम्ही जाऊ शकता. त्यापूर्वी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असल्यास मला विचारू शकता'
बंड्या भानावर आला आणि त्याने काही वेळ विचार केला.
अं...हो आठवलं, हा फोन कायम चालूच असतो की त्याला ऑन-ऑफ स्विच आहे?'
'अरे हो, मी सांगायला विसरलेच. फोनचा पॉवर स्विच तुमच्या डाव्या काखेत आहे. हा फोन प्राथमिक अवस्थेत असल्यामुळे अधूनमधून काही बग्स येत असतात. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम जाणवला तर फोन रिसेट करण्यासाठी काखेतल्या बटणाचा वापर करून फोन रिसेट करू शकता' ती म्हणाली. बंड्याचे समाधान झाले.
'व्हेरी गुड' असे म्हणून बंड्या जाण्यासाठी उठला. त्याने नर्सचा निरोप घेतला आणि बॅटरी बसवलेल्या ठिकाणी सौम्यशी कळ येत असल्याने त्याने थोडे लंगडतच दोन पावले टाकली. अचानक त्याला काही आठवले आणि तो भेदरून मागे वळला.
'ही ब-ब-बॅटरी चार्ज क-कुठून करायची' त्याने भयभीत होऊन विचारले.
'काळजी करू नका. तुमच्या बॅटरीला चार्जरची गरज नाही. तुमच्या शरीराच्या उष्णतेने बॅटरी आपोआप चार्ज होत असते.' नर्स म्हणाली आणि बंड्याने समाधानाचा सुस्कारा सोडला.
'आणखी काही इश्श्युज असल्या तर तुम्ही केव्हाही हेल्पडेस्कला फोन करून विचारू शकता. हॅव अ नाईस डे'
नर्सचे पुन्हा आभार मानून बंड्या वळला आणि शीळ घालतच तिथून बाहेर पडला.
कारमध्ये येऊन बसल्याबसल्या त्याने आपल्या फोनचा वापर सुरू केला. त्याने पहिली कुठली गोष्ट केली असेल तर ढगातून आपला सर्व डेटा, गाणी, गेम्स, फोटो इ. आपल्या शरीरातल्या हार्ड ड्राईव्हमध्ये डाऊनलोड करून घेतले. त्यानंतर त्याने आपला निळा दात गाडीच्या ब्लूटूथशी सिंक करून घेतला आणि ट्रायल म्हणून 'प्ले सम डान्स म्युझिक' अशी आज्ञा दिली. तत्काळ त्याच्या कारच्या ऑडिओ सिस्टीमवर 'शांताबाई' सुरू झाले. ते पाहून तो भलता खूष झाला! आपल्या नव्या फोनची बातमी कोणालातरी आत्ताच्या आत्ता सांगितलीच पाहिजे असे त्याला वाटले. त्याने 'कॉल अभिजित फाटक' असे म्हणून ताबडतोब त्याच्या मित्राला फोन लावला.
'फाटक्या भडव्या आज संध्याकाळी भेटतोयस ना? तुला असली भन्नाट चीज दाखवतो की ठार वेडा होशील' त्याने व्हॉईस मेसेज ठेवला आणि गाडी सुरू केली. ही अचाट बातमी त्याला तत्काळ त्याच्या मित्रांना सांगायची होती पण आणखी एक-दोघांना फोन करूनही कुणीच फोन न घेतल्यामुळे तो थोडा खट्टू झाला. त्याने गाडी रस्त्यावर घेतली आणि शांताबाईच्या तालावर गदागदा डोके हलवत (कारण तो गाडी चालवत असल्यामुळे हातपाय हलवण्याच्या स्थितीत नव्हता) तो सुसाट निघाला आणि एक्स्प्रेसवे कडे जाणार्या लेनमध्ये घुसला.
'सर थेथुरसून जांव नकात! आय-फोरनाईन्टीफायवर ट्रॅफिकचा पुरता रोंबाट झाला हां. दोन ट्रकांनी एकमेकांक ठोकला हां थंयसर. तुम्ही काय करा, राईटाक वळा आणि म्याक्यालिस्टर रोडावरसून जावा' त्याच्या गाडीतून आवाज आला आणि बंड्या पुरता दचकला. त्याने भर रस्त्यातच ब्रेक मारला. मागून येणार्या दोनतीन गाड्या करकचून हॉर्न देत त्याच्या डावी-उजवीकडून निघून गेल्या.
बंड्याने चमकून मागे पाहिले पण गाडीत त्याच्याशिवाय कोणीच नव्हते.
'कोण बोल्ला तां... आपलं... हू वॉज दॅट!' तो ओरडला.
'सर मी सिरी बोल्तंय. तुमका ट्रॅफिक अपडेट देत होतंय!' पुन्हा आवाज आला. तेव्हा बंड्याच्या लक्षात आले. तो आवाज त्याच्या कानांतूनच येत होता.
'हू... सिरी??? व्हाय आर यु टॉकिंग लाईक दॅट??'
'आय ॲम सॉरी सर. डिड आय मेक अ मिस्टेक? आय हर्ड यु टॉकिंग ऑन द फोन ॲण्ड आय ॲझ्युम्ड दॅट युवर मदर लॅन्ग्वेज इज मराठी' सिरी म्हणाली.
'सिरी!!...यु कॅन स्पीक मराठी?...'
'आय कॅन स्पीक एनी लॅन्ग्वेज इन द वर्ल्ड, सर. वुड यु प्रिफर टू स्पीक इन सम अदर लॅन्ग्वेज?'
'नो नो नो! फक्त एकच चूक झाली. तू बोलत असलेली लॅन्ग्वेज मालवणी होती, मराठी नव्हे'
'आय ॲम सॉरी सर! आय ॲम रिपोर्टिंग धिस बग टू ॲपल हेडक्वार्टर्स राईट अवे. बरं, मी आत्ता बोलतेय ती मराठी आहे ना?'
'येस येस परफेक्ट!'
'व्हेरी गुड सर!'
बंड्या वेडापिसा झाला. त्याला आश्चर्याचे धक्क्यांवर धक्के बसत होते.
त्याने सिरीची ट्रायल घेण्यासाठी तिला मराठीतून काही प्रश्न विचारले.
'सिरी आजचं वेदर कसं आहे?'
'सिरी आजच्या ताज्या बातम्या सांग'
'सिरी प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बलच्या स्टॉकची लेटेस्ट पोझिशन काय आहे?'
'सिरी माझं मेल चेक कर'
'सिरी सध्या बिग डाटासाठी कोणत्या कंपन्या रिक्रुट करतायत?'
'सिरी न्युयॉर्कमध्ये पोह्यांचे पापड कुठे मिळतील?'
'सिरी पुरंदरच्या तहाची कलमं काय होती?'
सिरीने त्याला सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरं दिली. बंड्या भलताच इंप्रेस झाला.
घराच्या दिशेने जाताजाता त्याला आठवले, त्याची बरीच छोटीमोठी कामे करायची राहिली होती. घरी जाण्यापूर्वी ती उरकून घेऊ म्हणून तो 'मिडटाऊन मॉल' च्या दिशेने वळला.
'इथे जवळपास शूज ची दुकानं आहेत का गं सिरी?' त्याने विचारले.
'आहेत की. शू बार्न - १.२ मैलांवर, शू पॅलेस - २.८ मैलांवर, शू प्लॅनेट - ४.१ मैलांवर, आज तिथे बाय वन गेट वन फ्री सेल आहे सर!' सिरीने माहिती पुरवली. बंड्या शू प्लॅनेटच्या दिशेने वळला. अपेक्षेप्रमाणे त्याला चांगले डील मिळाले. पण त्याला हवे असलेले शूज त्याच्या साईझमध्ये तिथे उपलब्ध नव्हते. तत्काळ सिरीने 'शू प्लॅनेट'च्या शहरातील सर्व शाखांमध्ये सर्च करून दुसर्या दुकानात त्याची साईझ असल्याची माहिती पुरवली. बंड्याने लगेचच तिथे धाव मारून डील मिळवले. त्यानंतर हिवाळा तोंडावर आला असल्यामुळे जॅकेट घेण्यासाठी तो एका दुकानात गेला. त्याने एक जॅकेट पसंत केले होते, पण त्याने त्याच्यावरचा प्राईस टॅग पाहिला आणि त्याची अडीचशे डॉलर किंमत पाहून तो बिचकला. पण तेवढ्यात त्याच्या डोळ्यातल्या कॅमेर्यातून एक लेझरची रेषा आली आणि त्या टॅगवरून फिरली. सिरीने त्या जॅकेटचा युपीसी कोड स्कॅन केला होता.
'सर हेच जॅकेट तीन मैलांवर 'जेरीज् जॅकेट्स' मध्ये एकशेसाठला उपलब्ध आहे' तिने सांगितले.
दुसर्याच मिनिटाला बंड्या जेरीज् च्या दिशेने सुसाट सुटला होता.
हे आयफोन-१२ प्रकरण फार म्हणजे फारच उपयुक्त आहे असे त्याच्या लक्षात आले. एवढा भन्नाट प्रॉडक्ट निर्माण केल्याबद्दल त्याने ॲपलला लाख दुवा दिल्या. त्याने सगळी खरेदी आटपली आणि भरपूर शॉपिंग बॅग्स आणि सिरीच्या कृपेने अजूनही बर्यापैकी जड असलेले पाकीट घेऊन तो घरी पोहोचला.
खरे तर नर्सने त्याला घरी जाऊन आराम करायला सांगितले होते. सर्जरीमुळे त्याचे शरीर ठिकठिकाणी थोडे थोडे ठुसकत होते पण बंड्या प्रचंड एक्साईट झाला होता. त्याने पटकन दोन घास खाऊन घेतले आणि आपल्या नव्या फोनची फीचर्स पहात बसला. पहिल्यांदा त्याने उगीचच एकदोन फोन कॉल्स, एकदोन एसेमेस करून पाहिले. त्यानंतर त्याने आपली होलोग्राफिक स्क्रीन चालू केली आणि थोडावेळ वेब-सर्फिंग केले, थोडे गेम्स खेळला. मध्येच त्याला 'कळ' आली आणि तो टॉयलेटमध्ये गेला. मात्र तिथे बसल्याबसल्याही त्याने कयाक.कॉमवर जाऊन थोडे कंपॅरिझन शॉपिंग केले आणि येत्या ख्रिसमस ब्रेकसाठी लास वेगासचे विमान, हॉटेल इ.चे बुकिंग करून टाकले. त्यानंतर त्याला थकल्यामुळे पेंग येऊ लागली. तो आरामखुर्चीत जाऊन पडला आणि 'द वॉकिंग डेड' चा एक भाग त्याचा बघायचा राहिला होता तो डाऊनलोड करून त्याने पाहून टाकला. भन्नाट एपिसोड होता तो! आणि त्याच्या डोळ्यांसमोर उमटणारं चित्रही इतकं खरं वाटत होतं की एक-दोनदा ते मुडदे खरंच आपल्या अंगावर येत आहेत असे वाटून तो किंचाळला देखिल! अखेर दिवसभराच्या धावपळीचा आणि एक्झाईटमेंटचा परिणाम त्याच्यावर झालाच आणि नकळत त्याचा डोळा लागला.
बंड्याला जाग आली ती त्याच्या कानात वाजलेल्या 'टिंगऽऽ' मुळे. त्याने उजवा डोळा उघडला आणि हवेत उमटलेल्या स्क्रीनवर पाहिले. अभिजितचा एसेमेस होता. संध्याकाळी भेटायचे आधीच ठरलेले असताना देखिल त्याने टांग दिली होती. बंड्याने मनात त्याला चार शिव्या घातल्या आणि तो आळोखेपिळोखे देत उठला. त्याने घड्याळाकडे पाहिले. सात वाजले होते. आता काय करावे त्याच्या लक्षात येईना. अभिजितने इव्हिनिंगचा कचरा केला होता. आता आयत्यावेळी काय प्लॅन करावा हे त्याला समजेनासे झाले.
इकडे रात्र तरूण होत चालली होती. बंड्यासारख्या माणसाने सॅटरडे नाईट घरात बसून घालवायची म्हणजे... नामुमकीन!
अचानक त्याला सिरीची आठवण झाली.
'सिरी, सध्या कुठला चांगला पिक्चर लागला आहे'
सिरीने त्याला आसपासच्या थिएटर्समध्ये लागलेल्या पिक्चर्सची नावे सांगितली. त्याने तिला एक दोन चित्रपटांचे ट्रेलर दाखवायला सांगितले, पण त्याला कोणताच ट्रेलर काही खास वाटला नाही.
'आणखी काही इंटरेस्टिंग थिंग्स टू डू, एनी इव्हेंट्स टुडे, निअरबाय?'
तिने त्याला ब्रॉडवेवर चालू असलेल्या काही नाटकांबद्दल, काही ऑपेरांबद्दल सांगितले.
'छ्याः, ते तसलं काही मी बघत नाही'
'सॉरी सर. मग तुम्हाला एखादा नवीन रेस्टॉरंट ट्राय करायचा आहे का?'
बंड्याला रेस्टॉरंटमध्ये जाण्याचाही मूड नव्हता.
'हाऊ अबाउट अ पब? 'द पर्पल मंकी' नुकताच सुरू झाला आहे. त्याच्याबद्दलचे रिव्ह्युज चांगले आहेत'
'रिअली? हाऊ फार इज इट?'
'१०.३ मैलांवर'
बंड्याने विचार केला. त्याला ती ऐडिया वाईट वाटली नाही.
'ठीक आहे'
बंड्याने घाईघाईत शॉवर घेतला, कपडे घातले आणि तो निघाला. पब, नाईटक्लबमध्ये जायला तो नेहमीच तयार असे. त्याच्यासाठी पब म्हणजे पोरी गटवण्याची बेस्ट जागा.
बाहेरून गोदामासारख्या दिसणार्या एका बिल्डींगसमोर सिरीने त्याला नेऊन पोचवले. तिला एक छोटेसे दार होते आणि त्याच्यावर 'द पर्पल मंकी' अशी साईन चमकत होती. दरवाज्यासमोर एक बाउन्सर उभा होता. बंड्या त्याच्यासमोर जाऊन उभा राहिला. त्याने बंड्याला एकदा आपादमस्तक न्याहाळले आणि आत जाण्याचा इशारा केला. बंड्याने आत पाऊल टाकले. सॅटरडे नाईट असल्यामुळे आज तिथे तुफान गर्दी होती. कानठळ्या बसवणारे ढाँय ढाँय म्युझिक चालू होते आणि त्या म्युझिकवर आवाज काढून प्रत्येकजण दुसर्याबरोबर तारस्वरात किंचाळून बोलत होता. स्ट्रोब लाईट्सच्या प्रकाशात नाचणार्या आकृत्या डान्स फ्लोअरवर दिसत होत्या आणि सगळीकडे सिगरेटचा धूर भरून राहिला होता.
त्या गर्दीतून वाट काढत तो गेला आणि बारटेंडरच्या समोर जाऊन एका बारस्टूलवर चढून बसला. 'जॅक ॲण्ड कोक, प्लीज' बारटेंडरच्या हातात आपले क्रेडीट कार्ड देत त्याने ऑर्डर दिली आणि आजूबाजूची गर्दी न्याहाळली. त्या गर्दीत विशेष प्रेक्षणीय असे त्याला काही दिसले नाही. ज्या काही प्रेक्षणीय वस्तू होत्या त्या आपल्या मित्रांच्या हातांवर रेलून थिरकत होत्या. बंड्याने चौफेर नजर फिरवली आणि तो पुन्हा मागे वळला. त्याचे ड्रिंक त्याच्यासमोर आले होते. त्याने एक घुटका घेतला आणि तो काहीवेळ समोरच्या टीव्हीवरचा गेम पहात बसला. एवढ्यात त्याच्या शेजारी कुणीतरी येऊन बसल्याचे त्याला डोळ्यांच्या कोपर्यातून दिसले. त्याने मान वळवून त्या व्यक्तिकडे पाहिले आणि तो मंत्रमुग्ध होऊन पहातच राहिला.
क्रमश:
प्रतिक्रिया
3 Feb 2016 - 11:15 am | टवाळ कार्टा
;)
3 Feb 2016 - 12:17 pm | पद्मावति
अरे वाह, खूपच मस्तं चाललीय कथा. सिरी चे ट्रॅफिक अपडेट्स खूप आवडले:)
पुढचा भाग लवकर टाका प्लीज़. फारच इण्टरेस्टिंग आहे.
3 Feb 2016 - 12:26 pm | प्राची अश्विनी
एकदम मस्त ! खर तर विज्ञान लेखमालेत देखील चांगली वाटली असती.:)
3 Feb 2016 - 12:36 pm | शंतनु _०३१
भन्नाट...
पुढील भाग लवकर टाका /टंका
3 Feb 2016 - 12:55 pm | नीलमोहर
मालवणी सिरी !
3 Feb 2016 - 2:47 pm | मयुरMK
सिरी :) भन्नाट लेख
पु.भा.प्र
3 Feb 2016 - 3:25 pm | एस
हहाहाअहाआआह्ह्हाअहहा!!!! खल्लास लिहिलेय! ;-)
3 Feb 2016 - 5:24 pm | विवेक ठाकूर
याला म्हणतात कल्पनाविलास!
3 Feb 2016 - 7:41 pm | अभ्या..
बहुतेक याला म्हणतात सिरीबंड्या,
पुढच्या भागात जोडी जुळेल, तोपर्यंत सिरी ही सही.
3 Feb 2016 - 7:56 pm | असंका
जोरदारच लिहिलंय!!
धन्यवाद !
पुभाप्र...
4 Feb 2016 - 10:41 am | नाखु
तंतोतंत सहमत
4 Feb 2016 - 1:34 am | उगा काहितरीच
मस्त ... वाचतो आहे. पुभाप्र ...
4 Feb 2016 - 1:54 am | इष्टुर फाकडा
'ही ब-ब-बॅटरी चार्ज क-कुठून करायची'
जाम खुश झालो बोल. येक लंबर. पुभालटा !!
4 Feb 2016 - 2:07 am | यशोधरा
मस्तच!
4 Feb 2016 - 6:57 am | अजया
मजा येतेय वाचायला.पुभालटा!
4 Feb 2016 - 6:58 am | प्रणवजोशी
उत्सुकता चाळवली जात आहे पुढचा भाग लवकर येउदे.
4 Feb 2016 - 8:43 am | भंकस बाबा
फारच छान
4 Feb 2016 - 11:33 am | आतिवास
आवडलं.
पहिल्या भागाचा दुवा द्याल याच लेखात तर बरं होईल.
4 Feb 2016 - 1:35 pm | राजेंद्र मेहेंदळे
मस्त चाललेय स्टोरि.
अवांतर-- स्टिव्ह जॉब्स दादा कोंडके कडे येउन म्हणतो की "दादा, माझे फोन जास्त खपायला काय करु"
दादा उत्तर देतात "आय घाल"..स्टिव्ह ताबडतोब सगळ्या प्रॉडक्टच्या नावामध्ये "आय" घालतो आणि काय??? रिझल्ट तुम्ही बघताच आहात
5 Feb 2016 - 11:45 am | रातराणी
मस्त!
5 Feb 2016 - 3:23 pm | ज्ञानोबाचे पैजार
बॅटरी शेजारी फॅक्स मशिन पण बसवुन टाकायचे एकाच दगडात दोन पक्षी मेले असते.
पैजारबुवा,
17 Mar 2016 - 1:52 pm | राजाभाउ
मस्त !!!
हे पण अर्धवट सोडलय राव तुम्ही. ते लॉटरी पण तसच अर्धवट पडलय. पुर्ण करा कि राव.