शतशब्दकथा या कथा प्रकारावर मनात आलेले उलट-सुलट विचार शब्दात पकडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. त्यात अजून भर घातल्यास नव्याने अशी कथा लिहिणाऱ्याला मार्गदर्शक होईल असे वाटते .
अतिवास यांनी लिहिलेली शतशब्दकथा मिसळपाव वर मागच्या वर्षी पहिल्यांदा वाचली तेव्हाच छान वाटली. म्हणजे या प्रकाराचं हे नाव नंतर ठरलं- तेव्हा आणखी एक वैशिष्ट्य जाणवलं इतकंच.
मग कथा पुन्हा एकदा आवडली. एका छोटीच्या निरागस मनातले विचार विविध प्रसंगातून वाचायला मिळत आहेत.
नंतर मीही एक शतशब्द कथा लिहून पाहिली. मस्त वाटलं. प्रत्यक्ष पाहिलेल्या घटनेवर होती म्हणून सोपं गेलं. अजून एक काल्पनिक पण लिहू असं वाटलं, पण मग थांबलो. म्हटलं थोडा या प्रकाराचा अजून विचार करूयात. मिपा वर अतिवास यांनी 55 word story बद्दल कुठेतरी माहिती दिलीच होती. तशा खूप इंग्रजी लघुकथा जालावर वाचायला मिळाल्या.
असंच इंग्रजी ५५ शब्द कथेचं एक उदाहरण बघू:
The world's last genie's lamp was discovered accidentally by a crocodile who brushed past it while prowling the depths of a watering hole in Kenya. This was why the world's last burst of real magic raised no eyebrows; only a few biologists noticed when the local gazelles suddenly became plumper, slower, and much, much thirstier.
परिकथेचा संदर्भ, उपहास, काळा विनोद, अशा अनेक रंग छटा या इवल्याश्या कथेत कश्या मिसळल्यात!
आता मराठीत हे पोहोचवायचं , तर पंचावन्न शब्द कसे पुरणार? कदाचित कुणी करेलही प्रयत्न. पण मग संदर्भाशिवाय ती त्रोटक होण्याचा धोका पण आहे. त्यापेक्षा शंभर शब्द म्हणजे बरेच बरे!
हा कथा प्रकार लिहिताना काय हवं? तर मोजक्या शंभर इतक्या कमी शब्दांत मांडण्याचं कौशल्य, ती रोचक ठेवण्याचं आव्हान, सोपे संदर्भ, आणि अधिकाधिक वाचक समूहाला ती कथा आपली वाटण्यासारखी रचना.
कथा म्हटली की एक चित्र मनात उभं रहातं, आपण आधी पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या घटनां प्रमाणे तपशील येत जातात. म्हणजे शाळा, गुरुजी, आजी, राजवाडा वगैरे गोष्टींचा एक साचा मनात तयार असतो, त्यात आपण नकळत समोर आलेल्या नव्या गोष्टीतल्या पात्रांना अन ठिकाणांना बसवतो. साहजिकच आपल्या वेगळ्या पूर्व अनुभवामुळे तीच कथा वेगवेगळ्या व्यक्तीना कमी-अधिक आवडेल. त्यातून संदेश पण कदाचित वेगवेगळा जाईल.
बोधकथा थोड्याश्या वेगळ्या. त्याही त्रोटक वाटतात. गौतम बुध्दाची शिकवण लोकाना समजण्यासारख्या भाषेत लिहिलेल्या नीतीकथा. मनोरंजन हा त्यांचा मूळ उद्देश नाही. पण संस्कार क्षम वयात मुलांनी मनोरंजन म्हणून वाचाव्यात आणि नकळत संस्कार व्हावेत असा काहीसा उद्देश.
शतशब्दकथेचा विचार करता मुख्य उद्देश मनोरंजन, त्या खालोखाल कांही विचार देता आला तर अजून चांगले! विविध घटकांची वा व्यक्तींची विचार करण्याची वेगळी पद्धत किंवा वर्णन वाचून आणखी गम्मत वाटणे यात मजा आहे. त्यासाठी शेवटचा ट्विस्ट महत्वाचा वाटतो. शेवटी प्रश्न राहतो संदर्भांचा, लोकभाषेत लिहिलेली कथा असेल तर मूळ वाक्यप्रयोग तसेच्या तसे येतील, पण सर्वाना ते शब्द माहीत नसतील, पण म्हणून प्रमाण भाषेत लिहिल्यास मूळ प्रादेशिक भाषेचे सौंदर्य रहाणार नाही. हेच शतशब्द कथा लिहिताना आव्हान आहे असे म्हणता येईल.
शाळेत असताना आपल्या सगळ्याना कविता होत्या आणि रस ग्रहण करायला चक्क शिकवले जाई.
बहिणाबाई, शांताबाई, केशवसुत आणि अनिल यांच्या रचना सर्वाना सारख्याच कशा कळणार? किती नवीन शब्द आणि संदर्भ! म्हणून कविता पण शिकवायच्या. इथं पर्यंत ते ठीक सुद्धा आहे. पण त्याची परीक्षा मात्र नको वाटायची. म्हणजे आम्ही कविता वाचू, त्यातून आनंद घेऊ पण कवितेची परीक्षा मात्र नाही, (ही स्थिती- म्हणजेच आताची अवस्था). कदाचित त्यामुळे आपण आज कवितेचा आस्वाद घेऊ शकतोय.
पण मुळात शालेय जीवनात कविता अभ्यासल्या नसत्या तर? कदाचित आपल्याला आताच्या स्थितीत जालीय कवितांचा आनंद घेता आला नसता. आपण मराठी शिवाय हिंदी आणि इंग्रजी कविता शिकल्या हा अजून एक फ़ायदाच.
थोडक्यात, काव्याच्या सौंदर्याचे असे काही नियम नाहीत, पण काव्य कसे काय असावे/ असते, त्याचे भाषीय नियम आपण शिकलो, त्यापुढे मग कवीची प्रतिभा, दिलेल्या उपमा, चमत्कृती, मांडलेली एक विशिष्ठ कल्पना आणि शेवटी त्यातून आलेलं सौंदर्य असा काहीसां अभ्यास आपण शाळेत असताना केला असं म्हणता येईल.
अन्य भाषेतून आलेल्या प्रकारांपैकी सुनीत या प्रकारचं उदाहरण घेऊ. मूळ इंग्रजी सॉनेट प्रमाणे चौदा ओळी, ठराविक मीटर आणि शेवटच्या दोन ओळीत सारांश. (लगेच केशवसुत आणि केशवकुमार आठवतात!) म्हणजे मूळ कल्पनेतून मराठीत आणलेला प्रकार कालांतराने आपलाच वाटू लागतो.
आता असेच नियम शतशब्द कथेसाठी पण असावेत का? आणि बनवायचे झालेच तर काय असावेत? मला सुचलेले काही असे:
१. शीर्षक सोडून फक्त शंभरच शब्द असावेत. बसत नसेल तर खास प्रयत्न करावेत. जमेलच.
२. कथेचा सारांश म्हणून एक काही मुद्दा सांगता येण्यासारखा असावा.
३. कथा संपताना काहीतरी रोचक वळण असावे.
४. क्रमशः असू नये.
५. फार क्लिष्ट नियम असू नयेत!
अजून काय काय?
शतशब्दकथा भाषांतरित, काव्यरुपात पण असू शकेल. मात्र शंभर शब्द्संख्या महत्वाची.
(कुणाला असंही वाटेल काय करायचेत नियम वग्रॆ ? असे ना का फ्री फॉर्मेट- वाचा आणि सोडून द्या.)
पण एक नवा साहित्य प्रकार उदयाला वगैरे येत असेल तर विचार करून तर बघू!
प्रतिक्रिया
5 Jan 2014 - 10:03 am | मारकुटे
चांगला प्रयत्न.
5 Jan 2014 - 10:42 am | आतिवास
'रोचक' हा शब्द फार सापेक्ष आहे.
व्यक्तीसापेक्ष तर आहेच (कुणाला एखादी कथा भलतीच आवडेल तर इतर कुणाला ती अत्यंत भंपक वाटेल) पण कालसापेक्ष (एके काळी 'क्ष'चे लेखन भलतेच आवडायचे आता हातात धरवत नाही) देखील आहे.
साहित्यप्रकार नियमांच्या चौकटीत बांधला जातो तो अनेकदा काही ठराविक व्यक्तींच्या सोयीसाठी (समीक्षक,प्राध्यापक, विद्यार्थी वगैरे मंडळी...) - वाचकाला मात्र अशी चौकट गरजेची नसते. कथा (कोणताही साहित्यप्रकार, खरं तर कोणतीही कलाकृती) वाचकापर्यंत 'पोचली' की त्याला/तिला ती कलाकृती आवडते.
या 'आस्वादानुभवाचं' काही गणित मांडता येईल का याबद्दल साशंक आहे. इतर प्रतिसाद काही नवं सांगतील अशी आशा आहे.
5 Jan 2014 - 12:50 pm | विजुभाऊ
शंभर शब्द हा एकच नियाम लागु झाल्यावर इतर नियम कशाला? ज्याला जसे लिहायचे तसे त्ते लिहीतील. प्रत्येक कथा रोचकच असावी असे नव्हे. एखादवेळेस तीची चव पूरक असू शकते.
5 Jan 2014 - 1:16 pm | सस्नेह
रोचकता शब्दसंख्येवर अवलंबून नसावी. कौशल्य आहे ते रोचकतेला शंभर शब्दांच्या मापात बसविण्याचे. आतिवासताईंना जमले आहे, सर्वांना जमेलच असे नाही.
बाकी, कवितांना रसग्रहण नामक मीटर लावायच्या फंदात, शालेय जीवनात खरी कविता समजलीच नाही.
9 Jan 2014 - 8:40 pm | पैसा
शंभर शब्दांची मर्यादा हा एक नियम लावून घेतला. जशा सुनीत प्रकारात १४ ओळी असतात तशा. बस. मग त्या आकृतीबंधात कथा कशी बसवायची हे लेखकाचे कौशल्य. काही काळापूर्वी (बहुतेक) तुमचा अभिषेक याने धक्कातंत्र न वापरता अशी कथा लिहिली होती आणि ती चांगली वाटली होती. पूर्ण कथा शंभर शब्दात वाचकापर्यंत पोचली पाहिजे मग त्यात धक्का दिलेला असो की नसो. धक्कातंत्र न वापरताही सुंदर कथा लिहिल्या जातातच की!
20 May 2015 - 3:54 am | एस
हा धागा नजरेतून सुटला होता. लिंक दिल्याबद्दल श्रीरंग जोशी यांना धन्यवाद!
शतशब्दकथेला एक शब्दमर्यादेचे बंधन वगळता इतर बंधने नसावीत. शेवटी धक्कातंत्राचा वापर केल्यासच ती वाचकांस रोचक वाटेल, आवडेल असं नक्की म्हणता येणार नाही. पण या आकृतीबंधात (फॉरमॅटमध्ये) शेवट कसा केलाय यालाही महत्त्व आहे. एकतर छोट्या आकारामुळे शतशब्दकथेची सुरुवात ही नेमकी, थेट आणि न रेंगाळणारी अशी असावी लागते. त्यामुळे मध्यभाग हा सुरुवात परिणामकारक नसेल तर खुलवण्यास अवघड जातो. सुरुवात आणि मध्यभाग हे वेगवेगळे ओळखता आल्यास (म्हणजे जमून आल्यास) शेवट हा कमीत कमी शब्दांत ठसवता येतो.
बहुतेकदा शतशब्दकथेचा आवाका हा एखाद्या घटनेपलिकडे जात नसल्याने शेवट परिणामकारक होण्यासाठी तेथे धक्कातंत्राचा वापर करणे हे एक सोपे तंत्र असले तरी ती शतशब्दकथाप्रकाराची ओळख ठरू नये. ते केवळ एक तंत्र आहे आणि त्यापलिकडे त्यास फार महत्त्व द्यावयास नको असे मला वाटते.
धक्कातंत्राशिवायही शतशब्दकथा परिणामकारक बनवता येते आणि ते सर्वस्वी लेखकाचे कौशल्य ठरेल.
यादृष्टीने पाहू गेल्यास वरील जाणकारांनी मांडलेले या आकृतीबंधासंबंधीचे मुद्दे योग्यच आहेत हे जाणवते.
एका चांगल्या लेखाबद्दल धन्यवाद!
23 May 2015 - 10:25 pm | शब्दबम्बाळ
शतशब्दकथेमध्ये शंभरच शब्द असावेत असे म्हणण्यापेक्षा शंभरपर्यंत शब्द असावेत असे मला वाटते. कथेच्या आशयाला अमुक अमुक शब्दांचे अगदी जाचक बंधन असू नये. कारण वाचक कथेमध्ये बरोब्बर शंभर शब्द आहेत का हे पाहून ती वाचायला घेणार नाही!
यावरून लाइफ ऑफ पाय मधला माझा आवडता उतारा आठवला, जरा अवांतर होईल पण तरीही देतो! :)
"What a terrible thing it is to botch a farewell. I am a person who believes in form, in the harmony of order. Where we can, we must give things a meaningful shape. For example - I wonder - could you tell my jumbled story in exactly one hundred chapters, not one more, not one less? I'll tell you, that's one thing I have about my nickname, the way the number runs on forever. It's important in life to conclude things properly. Only then can you let go. Otherwise you are left with words you should have said but never did, and your heart is heavy with remorse."
23 May 2015 - 10:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
शतशब्दकथा म्हणजे शिर्षक सोडून शंभर शब्द असलेली कथा.
चांगली शतशब्दकथा म्हणजे शिर्षक सोडून शंभर शब्द असलेली अशी कथा की जी वाचून वाचकाच्या तोंडी "वाह्" असा उद्गार येईल.
28 Jan 2016 - 11:47 pm | जव्हेरगंज
मिपावरच्या शतशब्दकथांचे संकलन कोठे वाचायला मिळेल?
29 Jan 2016 - 11:41 am | खेडूत
एकत्रित मिळत नाहीत . गुगलून शोधाव्या लागतात. स्पर्धेच्या वेळी एक दुवा होता तो आता चालत नाही बहुधा .
अतिवास यांच्या आणि माझ्याही काही अश्या संग्रही आहेत .
अतिवास यांच्या शतशब्दकथा:
शरयत
सपान
दिसली समद्यांना
मर्जी
क्षमा
नाटेठोम
दुस्री
मद्दान
शिक्षा
गपचिप
टकाटक
नौस
फुस्स…
हसू
गपगार
वाट
पैला नंबर
खेडूतच्या शतशब्दकथा
निकाल
म्हण
म्हादा
सांगावा
भविष्य
टेंडर
कमिटी
गम्मत
इष्टाप
शितोळे
29 Jan 2016 - 1:15 pm | जव्हेरगंज
वाह! लय भारी आज पारायण करतो.
रच्याकने , माझाही एक प्रयत्न देतो ( एक दोन शब्द कमीजास्त आहेत बहूदा)
मटण www.misalpav.com/node/32474
इतरांनीही आपापल्या आवडीच्या कथेच्या लिंका द्याव्यात ही विनंती!!
29 Jan 2016 - 2:48 pm | बहुगुणी
सृजनचौर्य: निमिष सोनार
येक रुपाया: चांदणे संदीप
थोडक्यात वाचलो!: बहुगुणी
लोकमान्य, लोक्शाई: मृत्युन्जय
निकाल: मधुरा देशपांडे
वन नाईट इन द ट्रेन: प्राची अश्विनी
29 Jan 2016 - 4:06 pm | जव्हेरगंज
थोडक्यात वाचलो >> _/\_
पुर्वार्ध वाचताना बेकार हसलो :-D