दिवस पाचवा आणि सहावा -अमृतसर, मनाली, लेह,कारगिल,श्रीनगर, जम्मू.

सतिश पाटील's picture
सतिश पाटील in भटकंती
15 Jan 2016 - 6:12 pm

पूर्वतयारी आणि दिवस पहिला - अमृतसर, मनाली, लेह,कारगिल,श्रीनगर, जम्मू.

दिवस दुसरा -अमृतसर, मनाली, लेह,कारगिल,श्रीनगर, जम्मू.

दिवस तिसरा आणि चौथा-अमृतसर, मनाली, लेह,कारगिल,श्रीनगर, जम्मू.

दिवस पाचवा- मनाली

जाग आली तीच सकाळी ११ वाजता. डोळ्यावारचे पांघरूण बाजूला करून खिडकीत पहिले तर बाहेर लक्ख उजेड पडलेला.उठून खिडकी उघडली आणि थंडगार वारा अंगावर आला.
वां....... थकवा आणि डोळ्यांवरची झोप एका क्षणात उडून गेली...

मनालीच्या त्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या, इथे आल्यावर प्रेयसीला खूप दिवसांनी भेटल्यासारखे वाटत होते , कडकडून मिठी मारावीशी वाटत होती, डार्लिंग मी आलोय...

आमची ती रूम तशी भरपूर मोठी होती, परंतु एका रात्रीत आम्ही त्या रूमची अवस्था एखाद्या स्टोर रूम सारखी केली होती, जिकडे तिकडे नुसते समान पसरले होते, ओले कपडे, स्वेटर, ज्याकेट, बूट, स्लीपिंग ब्याग, पाण्याच्या बाटल्या.
त्याचा सामानात पलंगाशेजारी खाली बाबा झोपला होता, कसे बसे रिकाम्या जागी पाय ठेवत फोनजवळ पोहोचलो आणि आणि २ चहाची ऑर्डर दिली, बाबाने झोपतच स्मितहास्य केले, आणि मग जुलीनेपण कॉफीची फर्मायीश केली, पलंगावर चादरीच्या खाली एक अवाढव्य शरीर पसरले होते, तो पोटावर फोन ठेवून झोपला होता.

"चल आवरा लवकर लवकर आपल्याला आता फिरायला जायचे आहे", सगळ्यात आळशी माणसाने ऑर्डर दिल्यावर ते माझ्याकडे बघत हसत होते, "पप्या हे तू बोलतोयस, आवरा लवकर लवकर ?" बाबा दाढी खाजवत आळस देत माझ्याकडे कुत्सित नजरेने बघत होता, "मायला पप्या त्याच्या गावाला आलाय बघ किती खुश आहे, आपल्या आधी उठून आवरायची तयारी करतोय," आता जुलीपण त्याला सामील झाला.

अरे कसे सांगू तुम्हाला इतक्या दिवसांनी पुन्हा येउन माझ्या मनालीला भेटायला किती उत्सुक झालोय, आवरा लवकर ... गायत्री मंदिरापासून आपल्याला भटकायची सुरुवात करायची आहे, माझ्या अंगातला टूर म्यानेजर आता जागा होत होता.
मुंबईतून निघाल्यापासून एक गोष्ट करायची करायची म्हणून मी सारखी विसरत होतो.
डॉक्टर कडे जायला. आज जायचेच असे चंग बांधला. नाहीतर हि सर्दी मला जगू देणार नाही. श्वास घ्यायला त्रास आणि नाकातून येणारे रक्त, सर्दीमध्ये हा त्रास मला इथे आल्यावर नेहमीचाच.

१२ वाजता तयार होऊन आम्ही जवळच्याच गायत्री मंदिराकडे कूच करण्यासाठी निघालो, हेल्मेट घेऊया का म्हणून जुलीने विचारले, नको बाजूलाच आहे मंदिर त्तीथून परत रूमवर येऊया आणि जेवून मग हेल्मेट घेऊन पुढच्या भटकंतीला निघूया, असे बोलून आम्ही जगतसुख येथील गायत्री मंदिराच्या दिशेने निघालो, इथे चूक झाली.

रमत गमत १० मिनिटात जगतसुख या गावी गायत्री मंदिरात पोहोचलो, मंदिर तसे लहानच परंतु फार सुंदर, पोहोचताच त्यांना सांगितले, आत मध्ये एक म्हातारी बसते, तिला सर्वजण दादी म्हणतात, पुजारी आहे, पिढ्यांपासून या मंदिराची पूजा त्यांचे घराणेच करते, फार चिवट आहे, बडबड करते, तिच्याशी कमीत कमी बोला, आत गेल्यवर मांडी घालून बसवेल, पूजा अर्चा करायला लावेल, नंतर कहाणी सुरु करेल, आणि जाताना खिसे ढिले करेल, तेव्हा जर जपूनच.

बूट काढून त्या थंडगार लादीवर पाय ठेवला, अंगात शिर्शिरीच आली, आत शिरलो तर ती दादी बसलेलीच होती, शांत होती, हातानेच तिने बसण्यास सांगितले, बाबा आणि मी मांडी घालून बसलो,

जुलीची शरीर रचना मांडी घालून बसण्यासाठी देवाने न केल्याने तो उभाच होता.अखंड बडबड करणारी ती दादी आज अगदी शांत वाटत होती, चेहऱ्यावरचे तेज गुडूप झाले होते, हसू मावळले होते, बोलके डोळे आज काहीच बोलत न्हव्ते, ३ -४ वर्षात ती मला आज अचानक म्हातारी झाल्यासारखी वाटू लागली, मोजून २- ३ मिनिटात पूजा आटोपली, एरवी पूजेनंतर देवाची आणि स्वतःच्या घराण्याची कहाणी सांगणारी त्या दादीने आज न कहाणी सांगितली न दक्षिणा मागितली, न राहवून मीच तिला विचारले,
" क्या दादी पैचाना क्या? " तशी ती नुसतीच हसली, मी कोण ओळखीचा आहे कि नाही एवढे जाणून घेण्याची सुद्धा इच्छा तिला न्हवती, "दादी, मी अमुक अमुक टूर म्यानेजर.."
"अच्छा अच्छा " ती एवढेच बोलली. मग आम्हीच आमच्या मनाने खिसे जरा ढिले केले.

गायत्री मंदिरातील काही फोटो


गायत्री मंदिराच्या मागील बाजूस असलेले शिवमंदिर

बाहेर येउन क्यामेरात फोटो काढणे चालू होते, मंदिराच्या बाजूला २ उंच लाकडी खांब रोवण्यात आलेत, जेव्हा मंदिराचे जीर्णोद्धार केला जातो तेव्हा जीर्णोद्धार पूर्ण होई पर्यंत गावातील सर्वात उंच झाड तोडून त्याला रोवून त्याची देव म्हणून पूजा केली जाते, २ लाकडी खांब म्हणजे त्या मंदिराचा २ वेळा जीर्णोद्धार केला गेला आहे.

बाबा ने विचारले हे खांब कसले आहेत, आता मला मौका मिळाला होता, म्हटले चला जरा गम्मत करूया, मी म्हटले " अरे पूर्ण भक्तिभावाने मन शांत ठेवून डोळे बंद करून जर आपण मिठी मारून आपले हृदय आणि कान त्या खांबाला टेकवून जर ऐकले तर गायत्री मंत्र ऐकू येतो."
मग काय बाबा चढला त्या चौथऱ्यावर, घट्ट मिठी मारून त्या खांबातून गायत्री मंत्र ऐकण्याचा प्रयत्न करीत होता, त्याच्यामागे आम्ही तोंड दाबून हसू आवारात होतो, आजूबाजूचे पर्यटक हा काय वेडेपणा करतोय म्हणून त्याला पाहत होते, थोड्या वेळाने बाबाने मिठी सोडली आणि प्रसन्न भाव घेऊन आमच्याकडे पाहू लागला, जणू काही त्याला काहीतरी साक्षात्कार झाला होता, मी विचारले " आलं का रे ऐकायला गायत्री मंत्र?" " हो थोडा थोडा आला ऐकायला..." आणि डोळे बंद करून आकाशाकडे पाहून काहीतरी पुटपुटायला लागला.
मग मात्र आम्हाला हसू आवरले नाही " अरे भाय्ताडा त्या पप्याने तुला चुत्या बनवले रे, तिथून काही मंत्र बिंत्र नाही ऐकू येत. आणि तू आम्हाला बनव, कि ऐकला मंत्र म्हणे," जुली पचकला .

आपला मोठा पोपट झालाय आणि लोक आपल्याकडे विचित्र नजरेने पाहतायत आपल्या अब्रू च खोबर झालाय म्हणून मग बाबा दगड घेऊन माझ्या मागे लागला.


खांबाला चिकटलेला बाबा चमत्कार

तिकडून मग आम्ही वशिष्ठ गुरूंच्या मंदिराकडे मोर्चा वळवला. वाटेत २ पोलिस दुचाकीवर बसून आम्हाला ओवरटेक कडून गेला. जातान मागचा पोलिस आमच्याकडे वळून पाहत होता. अर्थातच आमच्या डोक्यावर हेल्मेट न्हव्ते. पुढल्या वळणावर तो गाडी थांबवून एकाची पावती फाडत होता. आम्हालाही मग फावती फाडावी लागली. पर्यटक असल्यामुळे पावतीत १०० रुपयांची सूट मिळाली.

वशिष्ट गुरूंच्या मंदिरात कुठलातरी धार्मिक उत्सव सुरु होता, सगळीकडे गांजाचा सुगंध सुटला होता.इतक्या वेळेला येउन्सुद्धा कधी बाजूच्या गरम पाण्याच्या कुंडात अंघोळ करण्याचा योग आला न्हवता. उद्याची अंघोळ आपण इथे येउन करायची हे ठरवून आम्ही तिकडून माझ्या आवडत्या हाडीम्बा मंदिरात निघालो.इथे गर्दी कमी असल्याने मनसोक्त गप्पा मारत मंदिर निरखत बसलो.

वशिष्ठ गुरूंच्या मंदिरातील काही फोटो


गरम पाण्याचे कुंड वशिष्ठ मंदिर.


माझा नवीन मित्र.

हाडीम्बा मंदिरातील काही फोटो


तिथून निघून आम्ही सायंकाळी मग मनु मंदिरात निघालो. मनु मंदिर हा भाग जुन्या मनालीत येतो. येथील घरांची रचना जुनी आहे.आणि एकूण जुने मानली हे नवीन म्हणजे आपण आता जे जाणतो त्या मनालीपेक्षा खूप वेगळे आहे. बरेच परदेशी पर्यटक इकडे महिनेन महिने पडून असतात.मणीरत्नमचा रोज सिनेमा, त्यातील बरेचसे शुटींग इथेच झाले आहे.

मनु मंदिरातील काही फोटो


रात्री मार्केट मध्ये हिंडून थोडीफार खरेदी केली आणि खाण्यापिण्याचे बरेचसे समान घेऊन हॉटेलकडे प्रस्थान केले. सकाळी लवकर उठायचे अशी ताकीद देऊन झोपी गेलो.

सहज काढलेले फोटो

दिवस सहावा

सकाळी मीच लवकर उठलो ९ वाजता. बाकीचे दोघेही ठार झालेले होते. पटापट आवरून तयार झालो तेवढ्यात जेम्सचा फोन आपल. " २० मिन्टतात मनाली पोहोचतोय. जेम्स उर्फ अमोल आमचा ४था साथीदार.

त्याला घेऊन हॉटेलवर पोहोचलो तरी हे दोघे अजून शुद्धीत आले न्हव्ते. जबरदस्तीने त्यांना उठवले, गरम पाण्याच्या कुंडात अंघोळ करण्यासाठी आम्ही वशिष्ट गुरूंच्या मंदिरात निघालो.
कुंडात २ ४ गोरे लोक ध्यान लावून बसले होते. त्याचं शरीर लाल पडले होते.
उत्साहाने मी पाण्यात पाय टाकला तर बापरे, जेवढी अपेक्षा केली होती त्यापेक्षा कैक पटीने पाणी गरम होते. सहन होत न्हव्ते तरीही पाण्यात पाय टाकून बसलो, आणि बरेच प्रयत्न करून देखील २ पेक्षा जास्त डुबक्या पाण्यात मारू शकलो नाही.बाकीचे मात्र निवांत रेडा पाण्यात पडल्यासारखे पडले होते.

एक बाप आपल्या ४-५ वर्षाच्या मुक्या आणि बहिऱ्या पोराला पाण्यात कपडे बुचकळून काढावे तसे त्या पोराला बुचकळून काढत होता. तो पोरगा धाय मोकलून रडत होता.सुरुवातील सगळे हसत होते. नंतर मी त्या बापाला न राहवून म्हणालो , अरे बाबा कायको बच्चे को डूबा राहे हो, कितना रो राहा है वो."
" साबजी इस जादू के पाणी मी नाहायेगा तभी तो कूच इलाज होगा इस गुंगे बेहरे बच्चे का." आणि मी निशब्द .

अन्घोळून रोह्तान्गसाठी बायीकचे परमिशन आणि रजिस्ट्रेशन करायला कार्यालयात गेलो, सहज पायाकडे लक्ष गेले तर माझे पाय त्या गरम पाण्यामुळे भाजून गेल्यामुळे जांभळ्या रंगाचे दिसत होते.जादू का पानीने कमाल दिखाया. आजचा संपूर्ण दिवस मार्केटमध्ये घालवला,

अरे पप्या तुझे बरेचसे ओळखीचे हॉटेल वाले आहेत इकडे, तेव्हा एखाद्या चांगल्या हॉटेल मध्ये नेउन जेवायला घाल न आम्हाला फुकटचे म्हणून यांनी माझ्याकडे गळ घातली. आयडिया वायीट नाही म्हणू आता कुठल्या हॉटेलात फुकट खायला जाऊया म्हणून विचार करत बसलो. म्हटले चला संध्याकाळी mountain top hotel मध्ये जाऊ. त्याला फोन करून मी आल्याची वर्दी दिली. "साब फिर आप हमारे हॉटेल मी क्यू नाही ठेहरे ? २ दिन से इधर हो आप अभी बात राहे हो, वो कूच नाही आप शाम को खाना खाणे यह आओ."


आमची फुकटच चमचमीत खाण्याची सोय झाली .

भरपोट खाऊन आमच्या जीन्स कमरेला घट्ट व्हायला लागल्या, सकाळी ७ ला उठायचे आहे, लवकर झोपा आणि सकाळी उशीर नका करू, उद्या आपण रोह्तान्ग्मार्गे जीस्पाला पोहोचायचे आहे. पहिला मोठा टास्क आहे रोहतांग तेव्हा गंभीरपणे घ्या . जरा दमबाजी करून मी रात्री झोपी गेलो.

रोहतांग - आतापर्यंत ५० वेळा गेलो असेन पण प्रत्येक वेळी हे कसे टाळता येईल याचा डोक्यात विचार असायचा. उद्यातर बायीकवर जायचे आहे. आणि यावेळी टाळण्यासाठी नाही तर मुद्दाम करण्यासाठी बायिक घेऊन एवढ्या लांबून आलोय, याची स्वतःला आठवण करून दिली.

प्रतिक्रिया

असंका's picture

15 Jan 2016 - 6:23 pm | असंका

टूर ओप्रेटर आहात होय!!

फोटो छान आलेत.

मातारीचं वाचून जरा कसंतरी झालं. नक्की काय समस्या होती कळलं नाही का?

सतिश पाटील's picture

16 Jan 2016 - 11:35 am | सतिश पाटील

नाही न म्हातारी काही बोललीच नाही, त्यामुळे काही कळले नाही.

बाबा योगिराज's picture

16 Jan 2016 - 11:48 am | बाबा योगिराज

मायला पप्प्या,
मनलित आमाला नै पार्टी दिलिस. तू भेट अता. मेलास बे तू.

पाचवा भाग इतक्या उशिरा???

सतिश पाटील's picture

16 Jan 2016 - 2:25 pm | सतिश पाटील

आव तेवा मी युनिफोर्मात हुतो ना
तेवा असलं पार्टी करण्याची परवानगी न्हवती..

रोजच्या कामाच्या यापातून येळ मिळत न्हाई तवा जरा उशीरच झाला लिवायला

मुक्त विहारि's picture

16 Jan 2016 - 2:45 pm | मुक्त विहारि

पुभाप्र

बाबा योगिराज's picture

16 Jan 2016 - 2:48 pm | बाबा योगिराज

सतिष रॉ,
त्ये (बाबाजी की) बुटी बनवायला झाड़पाला नै आनलात.

सतिश पाटील's picture

16 Jan 2016 - 5:25 pm | सतिश पाटील

झाडपाला आणला हुता पर संपला त्यो.

एस's picture

17 Jan 2016 - 9:46 am | एस

मस्त भाग.

पैसा's picture

17 Jan 2016 - 11:04 pm | पैसा

लिखाण आणि फोटो आवडले.

सतिश पाटील's picture

18 Jan 2016 - 12:01 pm | सतिश पाटील

धन्यवाद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jan 2016 - 12:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छायाचित्र आणि वृत्तांत छान.

-दिलीप बिरुटे

जगप्रवासी's picture

18 Jan 2016 - 2:20 pm | जगप्रवासी

मस्त लेख

सतिश पाटील's picture

4 Mar 2016 - 5:52 pm | सतिश पाटील

पुढील भाग लिहून झालाय परंतु फोटो टाकता येत नाही.
कोणी करेल का मदत.

पिकासाव्यातिरिक्त आणखी कुठून टाकू शकतो का फोटो.?

राजकुमार१२३४५६'s picture

4 Mar 2016 - 9:42 pm | राजकुमार१२३४५६

dropbox चा वापर करा. तिथे फोटो अपलोड करा. तिथे लिंक्स शेअरिंग चा ऑप्शन असतो. त्यावरून लिंक्स कॉपी करा. नाहीतर सरळ गुगल ब्लॉग वरती फोटो अपलोड करा. आणि तिथून राईट क्लिक करून लिंक्स कॉपी करा.

सतिश पाटील's picture

5 Mar 2016 - 11:06 am | सतिश पाटील

प्रयत्न करून बघतो.