१३ ऑगस्ट साधारण दुपारी १२ वाजता मोबाईल वाजला तर पलीकडून बाबा चमत्कार..." मी पण येणार आहे, तिकीट काढा.."
काय चक्रम आहे का हा बाबा? आज संध्याकाळी ची ट्रेन आहे आणि हा आता सांगतो तिकीट काढ म्हणून? अस म्हणत जुलीने माझ्याकडे पाहिले.
साधारण ४ महिने आधीच प्लान झाला होता कि आपल्याला लडाख ला जायचे, तेव्हा मोठ्या उत्साहाने " येस आय यम फकीन इन " असा डायलॉग मारला होता त्याने. ३ महिने आधी तिकीट काढले, त्यानंतर तयारी सुरु झाली आणि हळूहळू या बाबाचा इंटरेस्ट कमी होत गेला, मला संशय यायला लागला कि हा आपल्याला कल्टी देणार बहुतेक.
आणि त्याला विचारले कि म्हण्याचा हो मी येणार आहे. शेवटी हा काही आपल्यासोबत येणार असे वाटत नाही तेव्हा याला गृहीत धरू नका आणि पुढच्या तयारीला लागा असे सांगितले बाकीच्यांना आणि ७ दिवस अगोदर हा बाबा म्हणतो " मला जमणार नाही यायला, तेव्हा तुम्ही जाऊन या."
आणि १२ ऑगस्टला आम्ही त्याचे उद्याचे तिकीट क्यान्सल केले.
आणि शेवटी बाबा ने ऐनवेळी आपला चमत्कार दाखवलाच!!! उगाच त्याला आम्ही बाबा चमत्कार नाव नाही ठेवले.
नेमक्या दिवशी आता ट्रेनच्या तिकिटांचा जुगाड करायचा कुठून अस प्रश्न उभा राहिला. शेवटी जे ७०० रुपयांचे तिकीट आम्ही काल क्यान्सल केले तेच तिकीट आम्ही आज १७०० रुपयात बक केले.
आता हातात फक्त ७ तास शिल्लक होते आणि त्यात या बाबाची कायकाय शॉपिंग कशी करायची असा प्रश्न उभा राहिला. आणि गाडी घेऊन ऐरोलीला खरेदीला सटकलो.
"लडाख ? आणि बाईक घेऊन? काय यडबीड लागलाय का तुम्हाला?
७०% लोकांची " साधारण अशीच प्रतिक्रिया होती. टूर म्यानेजर म्हणून मानली मध्ये साधारण ५५ वेळा भटकलो असेन, तेव्हा रोहतांग पास हा आमचा शेवटचा मैलाचा दगड होता तो मी कधीच पार केला न्हवता. काय बरे असेल पलीकडे? कसे असे इथून पुढचे जग? अस प्रश्न मला नेहमीच पडायचा. कारण रोहतांग पास म्हणजे नेहमी धुक्यात गुरफटलेले. समुद्रसपाटीपासून १३०४० फुट उंचावर, बर्फाने आच्छादलेले, कधी पाउस,ऑक्सिजनचा त्रास तर नेहमीच ठरलेला,दुरदुरपर्यंत झाडच काय पण खुरट गावातही कधी नजरेस पडले न्हवते. आसपास कुठेच मनुष्यवस्ती नाही, पर्यटक म्हणून फिरायला आलेली माणसे आणि BRO कामगारांसोबत काम करणारी गाढवे सोडली तर आजूबाजूला कुठच सजीव न्हवते, न मोबाईल चे टावर न कुठे लायटीचे खांब, स्थावर बांधकाम तर फार लांबची गोष्ट. आर्मीच्या गाड्या आणि त्यांच्यासाठीचे डीजेल घेऊन जाणारे tanker, आणि काही बुलेटवाले एवढेच फक्त त्या रोहतांग पास लिह्ल्येल्या फलकाच्या पुढे जात असत.
तेव्हा टूर म्यानेजर म्हणून काम करताना मी पाहायचो कि असल्या मरणाच्या थंडीत जेव्हा ते बुलेट वाले धडधड करीत तिथून जात असत तेव्हा मला त्यांचे फार अप्रूप वाटे.च्यायला आपण सुद्धा एकदा अस येवूया अशी कल्पना मी करायचो.
त्या वेगळ्या जगात जाण्याची आता वेळ आली होती. मी, बाबा ( सुबोध तायडे ), जुली ( क्षितीज खानविलकर ), आणि जेम्स ( अमोल पांढरकर ) असे चौघे तयार झालो होतो. पैकी जेम्स आम्हाला मनालीला भेटणार होता.
जे मिळेल ते बाबासाठी खरेदी करून आम्ही आमच्या ब्यागा भरायला लागलो, आणि नकळत मन फ्ल्याश्ब्याक मध्ये गेले.
प्लान तर झाला होता पण पुढील महत्वाचे प्रश्न समोर उभे राहिले होते, ते म्हणजे घरातून परवानगी कशी घ्यायची? शेवटी बॉम्ब फोड्लाच, " मी २० दिवस लडाख ला जाणार आहे बाइक घेऊन." आणि मग पसरली भयाण शांतता .... आई गवार सोलत होती ती तशीच हातात ठेवून पहात राहिली स्तब्धपणे, वडील माझ्याकडे फुल खुन्नस देऊन चष्मा घालत होते, कदाचित माझे कानफड फोडताना नेम चुकू नये अशी त्यांची इच्छा होती. ( १० वीला गणितात नापास झाल्यावर एकदा ते माझ्या कानाखाली जाळ काढत असताना मी सराइतपणे मानेसकट खाली वाकलो आणि वडिलांनी त्या लोखंडी गोदरेजच्या कपाटावर जाळ काढला होता, आणि मग हात चोळत होते, मला त्यातही हसू आले आणि ते काठी शोधायला हॉल मध्ये गेले, पुढे काय झाले असेल याची आपणच कल्पना करा,)
बायको हातात उल्तान घेऊनच किचन च्या बाहेर आली, आमचा बोका शेपूट वर करून शोकेसवर जाऊन बसला. रोहातांग्ला जसे क्षणात वातावरण बदलते तसेच आज घरात बदलले होते. मला वाटले कि, मी चुकून लदाख च्या ऐवजी चंद्र किंवा पाकिस्तान हा शब्द तर नाही न उच्चारला ?
बोक्याने म्यांव केले आणि सुरु झाली प्रश्नमंजुषा..आयत्या वेळी मला ब्वांब फोडायची सवय होती, आणि माझी हि सवय माझ्या घरच्यांनाही माहित होती, पण आज मी नुसता ब्वाम्बच नाही तर मिसायील सोडली होती, महत्प्रयासाने कशीबशी परवानगी मिळवली आणि आता पुढची पायरी होती ती म्हणजे ऑफिस मधून सुट्टी मिळवण्याची.
' अरे एवढी २० दिवस सुट्टी आपल्या ऑफिस मध्ये नाही मिळत पैज लाव हवी तर,,' आशिषने माझ्या उत्साहावर विरजण लावले. " मी पण सुट्टी घेऊनच दाखवतो, बघच तू.." मी पण प्रत्युत्तर दिले.
शेवटी पैजा लागल्या.
आमचा बॉस दुबईला स्थाईक आहे तो फेब्रुवारीमध्ये अप्रेसल मिटींगसाठी येणार होता, म्हटले तेव्हाच देऊ बार उडवून,
बॉस आला, कॅबीन मध्ये जाण्याचा आता माझा नंबर आला होता, आत शिरतानाच सगळ्यांनी आल द बेष्ट म्हटले, काहीच्या चेहऱ्यावर ते मला हिणवत आहेत हे स्पष्ट दिसत होते.
अप्रेसल साठी मुलाखात सुरु झाली , वर्षभर काय काय दिवे लावले याचा हिशोब झाला, मला अपेक्षित असलेल्या रकमेत वाढ झाली, बॉसचा मूड बारा होता, म्हटले हीच वेळ आहे, "सर मला ऑगस्ट महिन्यात सुट्टी हवी आहे २० दिवस साठी."......
"घेऊन टाक " . आश्चर्याने मी खुर्चीवरून १ फूट उडालोच आता माझ्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला होता बॉसला. सरळ सुट्टी घेऊन टाक म्हटल्यावर आता माझ्याकडे पुढे बोलायला काहीच न्हव्ते, मी म्हटले " सर विचारा न कशाला घेतोय सुट्टी? सर- " कशाला घेतोयस सुट्टी"? मी-" सर लदाख ला जातोय मी. सर-" मस्त जा आणि मजा कर." मी कुठ मरायला जातोय ह्यात माझ्या बॉस ला कदाचित इंटरेस्ट नसावा, मी मात्र उड्या मारत कॅबीन च्या बाहेर आलो तर, सिनेमात जसे ऑपरेशन थेटरच्या बाहेर नातेवाईक उभे राहून डॉक्टर ला घेरतात तसे माझे सहकारी मला घेरून उभे राहिले, काय झाले काय झाले दिली का सुट्टी? किती दिवस दिली? झाले का अप्रेसल? किती वाढवले?
मी जर कॉलर वर केली, आणि स्टायील मध्ये म्हटले, हो आपली दोन्ही कामे झाली.सगळ्यांनी अभिनंदन वगैरे केले, बरेच जण नुस्त सोपस्कार पूर्ण करत होते असे वाटले. असो,.. किंवा ... नसो.
त्यानंतर सुरु झाले ते मोफतचे सल्ले.बर्याच ज्ञानी अज्ञानी लोकांचे सल्ले ऐकून माझी मस्त करमणूक होत होती. महाबळेश्वर ला कधी न गेलेले मला हिमालयाचे ज्ञान पाजत होते, बुलेट तिकडून भाड्याने घेणार का आता नवीनच विकत घेणार? मी म्हटले " मी बुलेट वेगैरे नाही घेणार मी माझीच गाडी घेऊन जाणार आहे."
" काय डिस्कवर घेऊन जाणार तू ? वेडा बिडा आहेस का? तिकडे हि गाडी चालत नाही रे तिकडे बुलेटच चालते." मी म्हटले का बरे बुलेटच पाहिजे जरा सांगता का? कधी १०० किमी सलग बाईक न चालवलेले लोकांना याचे व्यवस्थित स्पष्टीकरण देत येत न्हव्ते. मी ठरवले होते, बुलेट घेण्याएवढे पैसे सध्या आपल्याकडे नाहीत, तेव्हा उगच आपली स्वतःची गाडी घरी ठेऊन दुसर्याची गाडी पैसे देऊन भाड्याने का चालवावी ? भले ती बुलेटच का असेना. व्यवस्थित अभ्यास करून मी माझी १२५ CC डिस्कवर ST घेऊन जाण्याचे ठरवले.
२४ जुलै रोजी एक घटना घडली ज्यामुळे पूर्णपणे हादरून गेलो. वाशी APMC मार्केट मधला माझा एक व्यापारी मित्र, सागर विजय शिंदे जो शाळेपासूनच माझा खूप जवळचा होता, त्याचा पामबीच मार्गावर दुचाकीवर अपघात झाला. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.अत्यंत साधी राहणी असलेला भोळाभाबडा माझा मित्र मला सोडून गेला होता. त्याला दुचाकी चालवता येत न्हवती, तो कधी कोणाच्याच दुचाकीवर बसत सुद्धा न्हवता, त्यादिवशी वडिलांना उशीर झाला, दोघेही एकत्र मार्केटला जात असत, त्यादिवशी रिक्षा stand वर वडिलांची वाट पाहत उभा होता, इतक्यात मार्केट चा एक मित्र दुचाकी घेऊन आला, म्हटला चल दोघे एकत्र जाऊ, तो त्याच्या सोबत मागे बसला आणि भरधाव इनोवाने त्यांना उडवले त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
नेहमी घरी येणेजाणे असल्याने केवळ माझ्या घरातीलच न्हवे तर अख्खा परिसर त्याला ओळखत होता, फारच मनमिळावू होता तो. त्याच्या अंतयात्रेवेळी माझी आई आणि बायकोसुद्धा हजर होती, त्यांनी त्याचे ते अपघातातील रक्ताने माखलेले विद्रूप शरीर पाहिले. आता नक्कीच आपल्याला लदाख साठी परवानगी मिळणार नाही असा स्वार्थी विचार त्यावेळी माझ्या मनात आला.
४ दिवसांनी मी पुन्हा विषय काढल्यावर कोणीही विरोध केला नाही, याचे मला आश्चर्य वाटले.
त्याला जाऊन महिनाही झाला नाही आणि त्याच्या मृत्यूला कारणीभूत होती ती दुचाकी, आणि दुचाकी घेऊन २० दिवस लडाख सारख्या ठिकाणी मी फिरायला जातोय. हे योग्य आहे ? हेच माझ्या डोक्यात कित्येक दिवस भिरभिरत होते. मी लडाख ला जातोय हे त्याला माहित होते, " मजा आहे यार तुझी तू मस्त लाईफ एन्जोय करतोस, नेहमी कुठे न कुठे फिरायला जातोस मानला यार तुला " अस तो म्हणाला होता, माझ्या चांगल्या गोष्टीला चांगल आणि वाईट गोष्टीला वाईट तो नेहमीच माझ्या तोंडावर म्हणयचा. मी तिकडे लडाख फिरायला जातोय याचं आनंद त्याच्या चेहऱ्यावर मला स्पष्ट जाणवत होता.
शेवटी मी जाण्याचा निर्णय घेतला.
चला यार साडे सहा वाजले, साडे नऊची ट्रेन आहे, अस म्हणत आम्ही आमचे समान गाडी मध्ये भरायला बाहेर काढले, १०-१२ मित्र घोळका करून गाडीपाशी उभे होते, दे मी ठेवतो समान अस म्हणत हलकं फुलकं समान जसे स्लीपिंग म्याट वेगैरे गाडीत ठेवत होते, जड सामानाकडे मात्र कुणी ढुंकूनही पाहत न्हव्ते, त्यांना मस्त पैकी गाडीत बसून स्टेशन पर्यंत यायचे होते हे मी समजलो होतो,शेवटी वाढती गर्दी पाहून मी म्हणालो बाबांनो या गाडीत जरी नेहमी १० जण बसत असू, आज मात्र फक्त ५-६ जण मुश्किलीने बसू शकतो , आमच्या तिघांकडे मिळून भरपूर समान आहे, तेव्हा सगळ्यांनी कमी व्हा". माझे वाक्य संपते न संपते तोच ४-५ जण गाडीत घुसली आणि जागा पकडल्या, शेवटी आम्ही पण गाडीत घुसून बसण्यापुरती जागा करून घेतली. आणि गाडी मुंबई सेन्ट्रल च्या दिशेने रवाना झाली.
स्टेशनवर गाडी लागलेलीच होती, आमच्या डब्याजवळ समान ठेऊन आधी आम्ही माल डब्याच्या जवळ पोचलो तर आमच्या गाड्यासुद्धा प्रवासाला तयार होत्या, कागदपत्रांची पूर्तता करून मग आम्ही आमच्या डब्याजवळ येउन थांबलो, तोपर्यंत मित्रांनी आमचे सामान आमच्या सीट जवळ नेउन्सुद्धा ठेवले होते, बाबाचे तिकीट ऐनवेळी काढल्याने त्याची सीट दुसर्या डब्यात होती, मित्रांनी तीसुद्धा सेटिंग करून बाबाला आमच्या बाजूची सीट उपलब्ध करून दिली.
ट्रेन हलली आणि मित्रांना टाटा करून आम्ही अमृतसरच्या दिशेने निघालो. स्थानापन्न होतो न होतो तोच आजूबाजूचे लोक आमचे ते विचित्र ब्याग आणि सामान सुमान निरखून पाहू लागले.
"पोलिस मी हो क्या? आर्मी वाले हो? " बाजूच्या पंजाबी म्हातारीने चौकशी सुरु केली.
"नही, हम घुमने जा रहे है, लडाख मे." त्यांच्याशी गप्पा सुरु झाल्या, आणि इकडे जुलीने खाऊचा डब्बा काढला, चिकनवर मनसोक्त ताव मारून झाल्यावर जरा निवांत झालो, खिडकीतून बाहेर अंधार दिसत होता, आणि ट्रेन मध्ये सुद्धा "पाहण्यासारखे" काही न्हव्ते, त्यामुळे मी झोपायला वरच्या बेडवर गेलो, जुली आणि बाबा मोबाईल काढून सोशल नेट्वर्किंग करण्यात गुंग झाले, मी मात्र माझा फोन अएरोप्लेन मोड वर टाकून आपण १५ ऑगस्टला अमृतसर ला पोहोचणार या उत्सुक्तेमध्ये निद्रेधीन झालो.
प्रतिक्रिया
18 Sep 2015 - 7:12 pm | पीके
भारी लिवलय पाटिलसायब, क्रमःशा र्हायलं काय? बरं लवकर टाका म्होरला भाग...
रच्याकन, मी पयला बर का...
19 Sep 2015 - 11:13 am | सतिश पाटील
व्है पुढचा भाग लवकरच यील
18 Sep 2015 - 7:34 pm | कपिलमुनी
पुभाप्र !
18 Sep 2015 - 8:06 pm | अनिरुद्ध.वैद्य
लेखन आवडले! पुढील भागांच्या प्रतीक्षेत :)
19 Sep 2015 - 11:20 am | सुबोध खरे
+१
18 Sep 2015 - 8:09 pm | बाबा योगिराज
सुरुवात चांगलिये.....
मामा फोटु कूड़ै???
त्या बडल्यात आता रोज एक भाग फोटु सगट टंकन्याची शिक्षा देण्यात येत आहे.
.
.
.
पायला नम्बर हुकला आन फोटु णै म्हणून चिडलेला बाबा
19 Sep 2015 - 11:15 am | सतिश पाटील
फोटू कशे टाकायचे समजलं न्हवत, अजून नवीन हाय म्या, अभ्यास करून पुढल्या भागात टाकतो..
18 Sep 2015 - 8:13 pm | बाबा योगिराज
अवांतर रायल न भौ.
जूली, बाबा चमत्कार????
याचा किस्सा टेबलवर बसून आयेकणाऱ्
19 Sep 2015 - 11:19 am | सतिश पाटील
तुम्ही टेबल बुक कराच , मी येतोच लगेच.
19 Sep 2015 - 1:12 am | उगा काहितरीच
मस्त ! मलाही इच्छा आहे लदाख ला जायची , पाहू कधी योग येतो ते.
19 Sep 2015 - 11:17 am | सतिश पाटील
हातपाय चालतात, थंडी सहन होते, अंगात रग आहे, तरुण आहात तोवर जाऊन या म्हणतो मी, फारच वेगळे जग आहे ते.
19 Sep 2015 - 7:01 am | पीके
आणि तिकडे सिग्नल वगैरे तोडु नका....
19 Sep 2015 - 11:26 am | सतिश पाटील
खिक्क ...
19 Sep 2015 - 12:47 pm | एस
खुमासदार लिहिलेय! पुभाप्र.
19 Sep 2015 - 2:54 pm | असंका
मजा येणार आहे....
पुभाप्र.
19 Sep 2015 - 5:11 pm | आनंदराव
भारी!
लय डेरिंग लागते बाबा
19 Sep 2015 - 7:38 pm | पद्मावति
झालीय. पुढील भागापासून फोटो टाकले तर लेख आणखीनच छान होईल.
26 Sep 2015 - 9:58 am | बोका-ए-आझम
मस्तच.
1 Oct 2015 - 5:29 pm | हेमंत लाटकर
छान!
20 Oct 2015 - 5:06 pm | पैसा
खूप सुरेख लिहिलंय. तुमच्या मित्राबद्दल वाचून मात्र वाईट वाटले.
20 Oct 2015 - 5:20 pm | मांत्रिक
अगदी झकासच आहे कल्पना. लिहिलंय देखील मस्त.
तुमच्या मित्राबद्दल वाचून वाईट वाटले.
फोटो टाकण्यात मात्र कंजूषपणा करु नका.