मन्या आणि डावक्या
==============
मन्या आणि डावक्या दोघं एकाच शाळेमध्ये , एकाच इयत्तेत शिकत होते . दोघांचे वर्ग तेवढे वेगळे होते . शाळेला जाण्या येण्याच्या बसमध्ये हे दोघे कायम एकत्र असत . त्यामुळे त्यांची चांगली मैत्री झाली होती .
तसे बघायला गेले तर डावक्याचे खरे नाव "रवीकिरण" असे होते . पण त्याच्या वर्गामध्ये तो एकटाच डावखुरा होता . त्यामुळे वर्गातील इतर मुलांनी त्याचे नाव "डावरया" पाडले होते . तेच पुढे बदलत बदलत "डावक्या" असे झाले होते .
आज मधली सुट्टी संपल्यानंतर मन्याच्या वर्गात गणिताचा तास होता . सरांनी काही गणिते सगळ्या मुलांना सोडवायला दिली होती . इतर मुलांप्रमाणेच मन्याही आपल्या वहीमध्ये गणितांशी दोन हात करत होता .
अचानक डावक्याने त्यांच्या वर्गात प्रवेश केल्याचे त्याने पाहिले . मन्या जरा चकीतच झाला . डावक्या शांतपणे चालत सरांपाशी आला . अगदी हलक्या आवाजात त्याने सरांना काहितरी सांगितले . सरांनी त्याला मान हलवून संमती दिली.
डावक्या मग वर्गातील मुलांच्या एकेका रांगेमधून फिरू लागला. फिरताना प्रत्येक मुलाकडे तो बारकाईने पाहात होता .
मन्याला डावक्याचा हा काय प्रकार चालला आहे हे काहिच समजेना . तेवढ्यातल्या वेळात त्याने आपल्या शेजारी बसलेल्या मुलाला " हा डावक्या , आपला मित्र आहे . बसमध्ये आम्ही नेहमी एकत्र असतो" असे फुशारकीने सांगितले.
थोड्याच वेळात डावक्या मन्या बसलेला होता , त्या रांगेमधून फिरत मन्यापाशी आला .
"काय रे डावक्या . काय झालं ? " असे म्हणत मन्याने ओळखीचे हसत डावक्याकडे पाहिले . आपली डावक्याशी असलेली दोस्ती त्याला सर्वांना दाखवायची होती .
डावक्याचा चेहरा मात्र एकदम कोरा , अनोळखी होता . तो काहीच बोलला नाही . त्याने मन्याकडे गंभीरपणे पाहिले आणि तो पुढल्या रांगेकडे निघून गेला . मन्या चांगलाच गोरामोरा झाला .
" फुस्स्स्स्स्स्स . मित्र होय ? " मन्याच्या शेजारच्या मुलाने हळुच आवाज काढला . मन्याची फजिती झाली होती .
अखेर डावक्या परत सरांपाशी आला. सरांकडे बघून त्याने नकारात्मक मान हलवली . मग तो वर्गातून निघून गेला .
मन्याचा मात्र इकडे चांगलाच तिळपापड उडाला होता . तो मनाशी ठरवू लागला .
" हा डावक्या अलीकडे फारच शेफारला आहे . जरा त्याला वठणीवर आणलच पाहि़जे आता "
शाळा सुटल्यावर बसमध्ये डावक्या मन्याशी नेहमीसारखे बोलायला लागला . मन्याने त्याला जरा फुरगंटूनच विचारले
"काय रे डावक्या , आज तु वर्गात मला ओळख का दाखविली नाहिस ? तु काय स्वताला फार भारी समजतोस काय ?"
डावक्या त्याला शांतपणे , समजूतीच्या सुरात म्हणाला -
"अरे मन्या, लेका , मी आज तुमच्या वर्गामध्ये डयुटीवर आलो होतो . डयुटीवर असताना अशी ओळख दाखवता येत नाही राजा ."
"डयुटीवर ? म्हणजे काय ?" मन्याने जरा गोंधळूनच विचारले . त्याला हा शब्द नवा होता .
"आज मधल्या सुट्टीत , आमच्या वर्गातील एका मुलाला दुसरया वर्गातील एका मुलाने मारले . मी आमच्या वर्गाचा सेक्रेटरी . त्यामुळे आमच्या वर्गाच्या सरांनी त्या मुलाला घेउन आणायला मला सांगितले . तो मुलगा तुमच्या तुकडीमधला असावा असे मला वाटले . म्हणून मी तुमच्या वर्गामध्ये त्याला शोधायच्या डयुटीवर आलो होतो ."
डावक्याचा हा खुलासा ऐकून मन्या खूष झाला . त्याला आता डावक्याचा अभिमान वाटू लागला .
"शाबास रे पठ्ठे . एकदम भारी . आता तू पुढल्या वेळेला कधी आमच्या वर्गात आलास , तर मीसुद्धा तुला ओळख दाखविणार नाही . कारण आता मला माहिती आहे की तू तुमच्या वर्गाच्या डयुटीवर आहेस. " मन्या म्ह्णाला .
"तो मुलगा सापडला का मग ?" थोडया वेळाने मन्याने परत उत्सुकतेने विचारले.
"हो . तो मुलगा ब तुकडीमध्ये सापडला . त्याला घेउन आमच्या वर्गात गेलो . आमच्या सरांनी त्याला खुप मारले . आणि सर निघुन गेल्यावर आम्हीसुद्धा त्याला चोपले " डावक्याने माहिती दिली .
" अरे बापरे . पण, हे जर ब तुकडीतल्या मुलांना कळले तर ती तुम्हाला मारायला येतील " मन्याने शंका काढली .
"येउ देत की . आमचीपण तयारी आहे . होउन जाउ दे. बघु तरी त्यांच्यात काय ताकद आहे ते." डावक्या बोलला . तो असे बोलतो तेव्हा त्याचा होणारा कठोर चेहरा पाहुन मन्याला शोले मधल्या अमजद खानची आठवण येते .
दुसरया दिवशी , होणारया या दंगलीची खबर बहुतेक सर्व वर्गातील मुलांना लागली होती . सर्व मुलांनी छोट्या मधल्या सुट्टीमध्येच आपापले डबे खाउन घेतले . कारण नंतरच्या मोठ्या मधल्या सुट्टीचा वेळ त्यांना रिकामा ठेवायचा होता .
मोठी मधली सुट्टी झाली तशी ब वर्गातली आणी डावक्याच्या वर्गातली मुले हळुहळु एकमेकांशी युद्धाच्या तयारीने वर्गाबाहेरील पॅसेजमध्ये जमू लागली . मन्या आणी त्याच्यासारखीच इतर वर्गातली मुले हे युद्ध बघायला बाजुला जमली .
दोन्ही वर्गातील पहिल्या फळीतील बालसैनिकांनी हातामध्ये पट्टी , पट्टे , करटक अशी हत्यारे धरली होती . काही जणांनी वर्गातील बाकांचे खिळे , मोळे उचकटून काढुन आणले होते . ज्यांच्याकडे अशी शस्त्रे नव्हती ती मुले सैन्याच्या
दुसरया फळीतील वीर बनले होते . काही जणांनी हाताला स्वसंरक्षणासाठी रुमाल बांधला होता . तर काहीजण नुसत्याच हाताच्या मुठी वळुन सज्ज होते .
थोड्याच वेळात दोन्ही फौजांनी एकमेकांच्या दिशेने कुच करायला सुरुवात केली . एका गटाने जोशात "उठा राष्ट्रवीर हो .. सुसज्ज व्हा उठा चला" हे रणगीत म्हणायला सुरुवात केली . त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसरया गटाने "माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमचे सुरु , जिंकू किंवा मरू " हे वीरगीत म्हणायला सुरुवात केली .
हि रणधुमाळी पाहून मन्याला अगदी भारावून आले . देशाच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावुन लढणारया सैनिकांची त्याला हे आपल्या वर्गाच्या प्रतिष्ठेसाठी युद्ध करणारे बालवीर पाहून आठवण झाली . पण हि दंगल बघणारया इतर खवचट मुलांनी मात्र "जंगी कुस्तीचे सामने , हमभी है जोशममें, बातें कर होशमें " असे शेरे मारायला सुरुवात केली .
मन्याने अनेकदा सिनेमांतील गाण्यांमध्ये पाहिले होते की , नायक नायिका एखादया पार्टीमध्ये नाचत गात असतात . आणी आजुबाजुला पार्टीतील इतर मान्यवर लोक हातामध्ये ग्लास घेउन त्यातले सरबत पीत असतात . त्या ग्लासमध्ये सरबत असते असे त्याला त्याच्याच कॉलनीत राहणारया अमोलदादाने सांगितले होते . असे सरबत प्यायला मिळत असेल तर मन्याची सिनेमामध्ये हिरोपेक्षा पार्टीतील इतर मान्यवर लोक बनण्याची तयारी होती . आज त्याला हि रणधुमाळी पाहताना हातामध्ये सरबत प्यायला एखादा सरबताचा ग्लास असावा असे वाटत होते . किंवा मग बरेचदा तो सिनेमाला गेला की मध्यंतरानंतर पॉपकॉर्न घेउन ते खात खात सिनेमा बघत असे . आज त्याला पॉपकॉर्नचीही आठवण येउ लागली .
इकडे दोन्ही बालफौजा एकमेकांच्या अगदी समोर आल्या . हातातली शस्त्रे परजत आता लढाईला सुरुवात होणारच , तेवढ्यात .... "फुर्ररररर" असा शिट्टीचा जोरदार आवाज ऐकू आला . सर्वांनी दचकून बघितले तर काय - पीटीच्या देवगडकरसरांनी तिथे प्रवेश केला होता . एका हातातील छडीने व दुसरया हाताने ते समोर जो मुलगा दिसेल त्याला बडवायला लागले . हे देवगडकरसर नावातील गडाप्रमाणेच धिप्पाड , उंचेपुरे होते . त्यांच्या नुसत्या हाताचा धपाटा जोरदार लागत असे . इतकावेळ आवेशाने सरसावणारया सर्व बालवीरांची एकच पळापळ झाली . ज्याप्रमाणे उंदरांच्या गर्दीमध्ये अचानक एखादा बोका अवतरला , तर त्या उंदरांची जशी धावपळ उडेल तशीच या बालवीरांची धांदल उडाली .
"हे नमुने बाहेर सिनेमे बघतात , आणि शाळेत येउन मारामारी करतात . एकेकाला सरळ केले पाहिजे" देवगडकरसरांच्या तोंडाचा पट्टा त्यांच्या छडीप्रमाणेच चालू होता . सगळे बालवीर आपापल्या वर्गात जाउन घाबरुन बाकांखाली जाउन लपुन बसले .
"फुर्ररररर" देवगडकरसरांनी इतर वर्गांतील मुलांकडे पाहुन शिट्टी वाजवली व त्यांनाही आपापल्या वर्गांत जाण्यास फर्मावले . ती मुलेही घाबरुन वर्गांमध्ये आली . मन्याही त्यांच्यातीलच एक होता .
त्या दिवशी शाळा सुटल्यावर मन्याची आणी डावक्याची बसमध्ये भेट झाली . डावक्याचा चेहरा चांगलाच फिकट पडला होता . चालतानाही तो जरा लंगडत होता .
"आज वर्गात बाईंनी सगळ्या मुलांना खुप मारले . आणी मग अंगठे धरून उभे केले " डावक्या मलूल आवाजात बोलला. त्याचा रडवेला चेहरा पाहुन मन्याला शोलेमधल्या रामुकाकाची आठवण झाली .
दोघेही काहिही न बोलता शांतपणे बसुन राहिले .
===== समाप्त ====== काल्पनिक ==========================================
प्रतिक्रिया
16 Jan 2016 - 11:39 pm | पैसा
मस्त आहे!
16 Jan 2016 - 11:43 pm | यशोधरा
आवडली कथा.
17 Jan 2016 - 7:58 am | रेवती
हा हा हा. छान.
17 Jan 2016 - 9:18 am | योगी९००
छान....आवडली कथा. लेखनशैली सुद्दा आवडली.
मी चवथीत असताना कोल्हापुरच्या प्रायव्हेट हायस्कूल मध्ये अशीच आम्हा मुलांची मारामारी झाली होती. त्यात आम्ही कोठून तरी मिळालेल्या वाकड्या काठ्या आणल्या होत्या आणि त्या तलवारीसारख्या वापरत होतो. त्याकाळात आलेल्या गनिमी कावा, धन्य ते संताजी धनाजी वगैरे भाल़जींच्या चित्रपटाची आमच्यावर छाप होती. नंतर मेंगाणे सरांनी एकेकाला धु धु धुतला होता...
17 Jan 2016 - 9:34 am | DEADPOOL
मस्त!
17 Jan 2016 - 9:54 am | उगा काहितरीच
हे खटकलं ! हे असं गाणं बिणं म्हणत नाहीत हो पोरं !
बाकी कथा आवडली. लिहीण्याची शैलीही आवडली.
17 Jan 2016 - 4:04 pm | सस्नेह
गमतीशीर कथा. तरीही शाळकरी मुलांचे गँग वाॅर गंभीर करून गेले.
17 Jan 2016 - 4:34 pm | सिरुसेरि
आपणा सर्वांना मन्या आणि डावक्याच्या या आठवणी आवडल्याचे वाचून खूप आनंद झाला . आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे .
-----एका गटाने जोशात "उठा राष्ट्रवीर हो .. सुसज्ज व्हा उठा चला" हे रणगीत म्हणायला सुरुवात केली . त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसरया गटाने "माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमचे सुरु , जिंकू किंवा मरू " हे वीरगीत म्हणायला सुरुवात केली .---------
या प्रसंगासंदर्भात माझे निरीक्षण असे आहे -- अनेक शाळांमध्ये शाळा सुरु होण्यापुर्वी १५ , २० मिनीटे आधीपासुन
ध्वनीक्षेपकांमधून "जयोस्तुते" ,"उठा राष्ट्रवीर हो" ,"माणुसकीच्या शत्रुसंगे" , "पसायदान" अशी राष्ट्रभक्तीची व बोधप्रद गाणी ऐकवली जातात . त्यामधुन मुलांवर चांगले ,राष्ट्रभक्तीचे संस्कार घडावेत असा हेतू असतो . मुलांना हि गाणी सतत ऐकून तोंडपाठ होतात . व बरेचदा एखाद्या जोशपुर्ण प्रसंगात त्या ओळी मुलांच्या तोंडून आपसुक बाहेर पडतात .
17 Jan 2016 - 4:37 pm | सिरुसेरि
गमतीशीर कथा. --- धन्यवाद .
तरीही शाळकरी मुलांचे गँग वाॅर गंभीर करून गेले. -- याबद्दल सर्वच शाळांमध्ये , मुलांना सिनेमा आणि बाहेरचे जग यातला फरक समजावून सांगण्याची गरज निर्माण झाली आहे .