कुंपणापलीकडली हुरहूर

पालीचा खंडोबा १'s picture
पालीचा खंडोबा १ in जे न देखे रवी...
15 Jan 2016 - 11:28 am

माझ्या अंतर्मनावर ओरखडे
ठेवून तू
क्षितिजापार गेलीस
मावळत्या संध्येसारखी,
क्षितीजाचं रसरसलेपण तसचं
ओरखड्यात ताजं अन्
ती कातरवेळेची हुरहूर
मला मावळत असते.

मुठ्मातीनंतर मी कितीदा
ठरवलं, तुझ्या "त्या"
चीरशांतीच्या विश्रामस्थळास
भेट देईन
का कुणास ठाऊक ?
फाटकाच्या आत पाउल
कधी पडलचं नाही
मात्र
गंजलेल फाटक कुरकुरत
असताना मी
तुझं ते पांढरं
आच्छादन न्यहाळत असतो,
पुसट होत जाणारं
वाढत्या रात्रीबरोबर
कमी होत जाणा-या
हुरहुरीसारखं .

हळूहळू सगळच
पांढूरकं होत जात
अन् तुला शोधणं
मुश्कील होतं
तू लहानपणी दडवलेला
तो लाकडी रंगीत घोडाही
सापडत नाही
कुठतरी हरवलायं
रंग हरवल्यासारखा.
गोठल्या जानेवारीत एकदा
म्हणे वासे फिरल्या घरात
लाकडे नव्हती
बंबात घालायला,
आईने ग्रामोफोनसहीत बरीच
लाकडे त्यात घातली
त्या ज्वाळेच्या रंगात
त्या रंगीत घोड्याचे रंगही
वितळले असतील,
तुझ्याबरोबर बघितलेल्या
स्वप्नांसारखे.

तू मागे ठेवून गेलेली पातळे
एकालाही अंग न लावलेली,
न्यहाळत बसायचीस
खांद्यावर बाळगून आरश्यासमोर,
ते रंग आता
आरश्यात उतरलेत
अन्
भकास आरसा शून्यात
बघत असतो.

तिन्हीसांजेला हळदीकुंकू वाहताना
मी आईच्या डोळ्यात बघू शकत नाही,
पाणावल्या डोळ्यांनी ती
तुझं मस्तक धुंडाळत असते
कधी समोर न येणारं,
हवेत हळदीकुंकू झाडून आई
कपाळाला लावते,
माझे डोळे पाणावतात
हळदीकुंकू डोळ्यात गेलयं
असा भ्रम निर्माण करून
ती शांतपणे हसते.

त्या शांत डोळ्यात मी
कुंपणापलीकडचं पांढरेपण बघतो
अन्
फाटकासारखं माझं
गंजलं मन करकरू लागतं
बेसावध क्षणी तिचा पदर
डोळ्याकडे जाताच
माझं मन मी उशीत
रिकामं करतो
अन्
सारं घर चैत्रगौरीतल्या सजावटीतल्या
चुन्याच्या भिंतीसारखं
पांढरफटक पडतं.

विजयकुमार.........
२५.११.२००९, मुंबई

कविता

प्रतिक्रिया

व्यथा चांगली माडलेली आहे.
रचना आवडली. धन्यवाद.

राघव

पालीचा खंडोबा १'s picture

15 Jan 2016 - 9:42 pm | पालीचा खंडोबा १

आभार राघव

पैसा's picture

15 Jan 2016 - 10:28 pm | पैसा

:(

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jan 2016 - 11:00 pm | अत्रुप्त आत्मा

अशक्य लिहितो हा माणूस!

पद्मावति's picture

15 Jan 2016 - 11:02 pm | पद्मावति

:(