उघड्या घराचे कोंदट श्वास
आता जाहलेत मोकळे
लख्ख डोळ्यानी, निरख वाटा
दिशा दाखवतील वादळवारे
आता घे आवरते सारे ||
प्रत्येक जगण्याने साथ सोडली
गवाक्षी उरलेत पक्ष्यांचे थवे
किती डोळ्यांच्या वाटा करशील
का वाहतोस आठवांचे भारे
आता घे आवरते सारे ||
जनापवाद कुणा न टळला
का बंद करतोस कवाडे ?
मान मनाचे सामर्थ्य तुझीया
अंधारातच तेवतात तारे
आता घे आवरते सारे ||
वाहत्या आसवांनी कुणी का परतते ?
सोडूनी वर्तमानास भविष्य येते
कुरवाळुनी अवमानीत भुतकाळाला
कुणी असे जगतात का रे ?
आता घे आवरते सारे ||
बघ जगी , दुख राहीले भरून
सुख मिळते का कधी मरुन ?
परवेदनेस मानूनी आपले
डोळे पुसण्यासाठी जग रे
आता घे आवरते सारे ||
जगभरूनी वाहतात आसवे
कुणी वाहते का त्यासवे ?
पिऊनी सा-या यातनासागराला
एकदा तरी अगस्ती बन रे
आता घे आवरते सारे ||
विजयकुमार.....................
14 / 12 / 2008
प्रतिक्रिया
14 Jan 2016 - 9:13 pm | पालीचा खंडोबा १
आता असे वेगळे लिहिले तर कोणिच वाचत नाहि
14 Jan 2016 - 9:23 pm | चांदणे संदीप
ओ मालक... तुमची शप्पथ! आधीच वाचलेली.
प्रतिसादच द्यायला आलो होतो, तोवर तुमचा प्रतिसाद हजर!
कविता उत्तम जमली आहे! वेगळा प्रयत्न करताय याबद्दल अभिनंदन!
संध्य
14 Jan 2016 - 9:33 pm | चांदणे संदीप
माझ्या नावाचा नवा अवतार = संध्य = Sandy
15 Jan 2016 - 7:34 am | प्राची अश्विनी
नेहमीप्रमाणेच कविता आवडली. पण तुम्ही असा प्रतिसादांचा जोगवा मागू नका हो, तुमचं लेखन त्याहून खूप वरच्या प्रतीच आहे.
15 Jan 2016 - 7:52 am | चांदणे संदीप
+१
15 Jan 2016 - 9:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता वाचनीय असतात. प्रतिसादाची चिंता करू नका.
-दिलीप बिरुटे
14 Jan 2016 - 9:45 pm | पैसा
सकारात्मक आहे खूप.
14 Jan 2016 - 10:49 pm | पद्मावति
छान लिहिलंय.
15 Jan 2016 - 8:32 am | अत्रुप्त आत्मा
कविता आवडली.
15 Jan 2016 - 11:06 am | पालीचा खंडोबा १
प्रतिसादाची चिंता नाही हो. तो तर तुम्ही देताच परंतु माझ्या नेहमीच्या शैलीशी फारकत घेवून काही लिहिले तर ते माझ्या मित्र परिवाराने वाचावे हि माफक अपेक्षा
15 Jan 2016 - 11:09 am | अजया
कविता आवडलीच.
15 Jan 2016 - 11:16 am | सस्नेह
रंगीत शब्दांचे खडे बोचले नाहीत त्यामुळे आवडली.
15 Jan 2016 - 11:29 am | कविता१९७८
छान कविता