"साssलाss ! ही रात्र नेहमी काळीच का असते बे?" वैतागलेल्या सुन्याने एकदाचे तोंड उघडले.
"अबे पहाट गुलाबी असते ना, म्हणुन रात्र काळी..., हाकानाका!" पक्या खुसखुसला.....
"गपे, उगाच फालतू जोक्स मारु नकोस. साला इथे बुडाला रग लागलीये बसुन बसुन. तुझा तो वाघ काही येत नाही पाणी प्यायला आज. आ़ज दिसायची शक्यता कमीच वाटतेय मला. बहुतेक निर्जळी अमावस्या दिसतेय त्याची." सुन्या करवादला.
सुन्या उर्फ सुनील जगताप आणि पक्या उर्फ प्रकाश देशमाने...... दोन जिवलग मित्र! लहानपणापासुन एकत्र वाढलेले, शिकलेले. सुदैवाने नोकरीही एकाच शहरात आणि अजुन दोघेही बॅचलर्स. त्यामुळे प्रत्येक विकांताला कुठे ना कुठे भटकंती ठरलेली. यावेळी मात्र दोघेही आठवडाभराची रजा काढून भटकायला निघाले होते. पहिले तीन्-चार दिवस कुठे कुठे निरुद्देश्य भटकून शेवटच्या दोन दिवसासांठी म्हणून घोराळ्याच्या जंगलात शिरले होते. मागच्या वेळी पक्याच्या काही मित्रांनी घोराळ्याला भेट दिली होती. त्यावेळी इथल्या जंगलात वाघ असतात असे कळाले होते. तेव्हा वाघ बघण्यासाठी म्हणुन हे दोघे मित्र घोराळ्याच्या जंगलात येवुन दाखल झाले होते. गेल्या दोन रात्री जंगलातील मचाणावर काढाव्या लागल्याने सुन्या वैतागला होता. वाघ तर दुरच लांडगा पण दिसला नव्हता अजुन. नाही म्हणायला वास काढत आलेली रानटी कुत्र्यांची एक टोळी मचाणाखाली बराच वेळ गोंधळ घालून परत गेली होती. त्यामुळे आधीच टरकलेला सुन्या आता भडकायला लागला होता. मध्यरात्र व्हायला आली होती. आजही एकतर दुपारी दिडच्या दरम्यान जेवण झालेले, त्यानंतर काहीच नाही, त्यामुळे सडकुन भुक लागली होती. त्यात सध्याची परिस्थीती अशी की जवळचे पाणीही संपलेले!
रात्रीचे दिड वाजून गेले होते. साधारण रात्रीच्या दहानंतर जंगलातले प्राणी पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर यायला सुरूवात होते. तशी झालीही होती. आत्तापर्यंत हरणाची एक जोडी आणि त्यांच्या मागावर आलेले दोन रानटी कुत्रे येवुन गेले होते. पण त्यानंतर सगळीकडे भीषण शांतता.
घोराळ्याचं हे जंगल तसं अस्पर्श्यच राहीलेलं आहे. अर्थात वाघामुळे नाही तर त्याबद्दल असलेल्या अनेक किवदंतींमुळे! अगदी गावातली माणसेदेखिल भर दिवसासुद्धा सोबत असल्याशिवाय जंगलात शिरत नाहीत. रात्रीतर विचारच सोडा. त्यांच्यामते रात्रीच्या वेळी जंगलात शिरणारी माणसे कधीच परत येत नाहीत. काल दुपारी जेव्हा गावातल्या चावडीवर सुन्या आणि पक्या पोहोचले तेव्हा कुठल्याही खेडेगावात अनोळखी व्यक्तीचं होतं तसंच त्यांचंही स्वागत झालं होतं. गावातली जवळजवळ प्रत्येक नजर एकदा का होइना पण दोघांवर दृष्टीक्षेप टाकून गेलेली. साहजिकच होते म्हणा ते. मुळात घोराळे गाव, गाव कसलं वस्तीच ती. इनमीन ३०-३५ घरांची आदिवासी वस्ती. सह्याद्रीच्या कुठल्यातरी एका कोपर्यात असलेली, सर्वसाधारण विकासापासून दुर राहीलेली हि एक आदिवासी वस्ती. सगळी मिळुन १५०-२०० ची लोकसंख्या. शिक्षणाचा, विकासाचा गंध नाही. सरपण, जंगलातील लाख, डिंक, जडी-बुटी यासारखी वनसंपदा आसपासच्या गावातून विकून त्यावर गुजराण करणारे हे लोक. मुळात पैसा-रुपया हे विनिमयाचे चलनदेखील अलिकडेच माहीत झालेले, त्यामुळे हल्लीच समाजाशी संपर्क वाढला होता त्यांचा. नाहीतर हि सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर वाढलेली सह्याद्रीची लेकरं पुर्णपणे अज्ञातच होती. आणि अशा वस्तीत जिथे कंबरेला गुंडाळलेले एखादे जुनाट वस्त्र , स्त्रियांच्या बाबतीत दोन वस्त्रे हा पेहराव तिथे हे दोन नमुने पोहोचले....
पक्या पुर्ण कपड्यात म्हणजे जीन्सची पँट, स्पोर्टस शुज, जॅकेट तर सुन्या टी शर्ट बर्मुडामध्ये ! खांद्यावर मिलीट्रीच्या असतात तशा रक सॅक्स, गॉगल्स आणि पक्याकडची सागवानी 'केन' ! (केन : पोलीस अधिकार्यांजवळ असते ती एक ते दीड फुटी लाकडी काठी) . या केनमध्ये एक छुपी गुप्ती होती. जंगले किंवा दर्या-खोर्यातून भटकताना पक्या कायम ही केन जवळ ठेवायचा. कधी गरज पडेल ते सांगता येत नाही. त्या आदिवास्यांमध्ये आणि या दोघांमध्ये एक साम्य मात्र होते. खांद्यापर्यंत रुळणारे केस. फक्त सुन्या त्याची पोनीटेल बांधायचा तर पक्याने ते तसेच संजय दत्त स्टाईलमध्ये मोकळे सोडलेले असायचे. तेवढे एक साम्य सोडले तर पुर्ण आधुनिक वेशातली ही जोडगोळी त्या वस्तीवरच्या लोकांचे आकर्षण ठरली नसती तरच नवल. अर्थात सह्याद्रीच्या दर्या-खोर्यात भटकण्यात आतापर्यंतचे सगळे आयुष्य घालवल्याने पक्याला या लोकांशी कसे वागायचे असते त्याची कल्पना होती. थोड्याफार प्रमाणात अशा आदिवासी वस्त्यांवर बोलल्या जाणार्या बोली भाषांचेही ज्ञान पक्याला होते.
आपल्या मोडक्या-तोडक्या ज्ञानानुसार त्याने या लोकांशी संपर्क साधला होता. आधी कुणी जवळ यायलाच तयार नव्हते. पण यावरही उपाय पक्याकडे होता. त्याने आपल्या बॅगेतली चिलीम काढली, त्यात तंबाखु भरून शिलगावली. दोन दीर्घ झुरके घेतले आणि गावकर्यांना आमंत्रण दिले. यानंतर मात्र त्या लोकांशी दोस्ती व्हायला वेळ लागला नाही. थोड्याच वेळात त्यांच्यापैकी काही लोक त्यांना वस्तीच्या मुख्याकडे घेवून गेले. त्यांना , खासकरुन पक्याला बघताच त्या मुख्याच्या चेहर्यावर एक वेगळीच चमक आली. त्याने अगदी उठुन स्वागत केलं पक्याचं.
"च्यायला यांची ओळख आहे की काय पुर्वीची?" सुन्या स्वतःशीच पुटपुटत त्या म्हातार्याला न्याहाळायला लागला.
'देसु बिरसा' थोडंसं विचित्र भासणारं नाव असणारा हा मुखिया पण विचित्रच वाटत होता. वयाचा अंदाज येत नव्हता पण ऐंशीच्या पुढे नक्कीच असावं त्याचं वय. पण चाळीशीतल्या तरुणासारखा काटक वाटत होता. सगळ्या चेहर्यावर व्यापलेल्या असंख्य सुरकुत्या त्याच्या चेहर्याला अजुनच भीतीदायक बनवत होत्या. वेणी घालता येइल एवढे वाढलेले केस, पण त्यांच्या जटा झालेल्या. कंबरेला एक लंगोट. डोक्याला एक रानटी वेल गुंडाळुन त्यात एक रानफुल खोवलेलं. (हा अधिकार फक्त मुखियालाच होता म्हणे, बाकीच्यांच्या डोक्याला नुसत्याच रानवेली गुंडाळलेल्या). देसुने त्यांना कसलेसे एक पेय ऑफर केले. थोडीशी गुळमट वाटली तरी चव चांगलीच होती.
त्याच्याशी बोलता बोलता पक्याने आपला मुख्य उद्देश्य जाहीर केला. हे दोघे घोराळ्याच्या जंगलात वाघ बघायला आले आहेत म्हणल्यावर म्हातारा चमकलाच. आधी तर त्याने विरोधच केला जायला. सुन्याला थोडं आश्चर्यच वाटलं. सगळं आयुष्य त्या जंगलात गेलेली, अजुनही तिथेच वावरणारी हि माणसं, त्याच जंगलात यायला घाबरतात म्हणजे काय? काय कारण असावे? पक्या आपल्या मोडक्या तोडक्या शब्दात देसुबरोबर बोलत होता, पण ती भाषा डोक्यावरुन जात असल्याने सुन्याचे लक्ष त्यांच्या संभाषणात नव्हते. तो देसुची झोपडी निरखत होता. एका गोष्टीचे त्याला आश्चर्य वाटले. सगळ्या झोपडीत हाडांच्या माळा लावल्या होत्या. मातीने सारवलेल्या कुडाच्या भिंतींवर कसलीतरी अगम्य, भीती वाटावी असली चित्रे आणि आकृत्या रेखाटलेल्या होत्या.
तेवढ्यात पक्याचे आणि देसुचे बोलणे संपले आणि पक्याने सांगितलेल्या कहाणीवरुन त्याला असे समजले की रानात पाणवठ्यापाशी काहीतरी अमानवी, पाशवी अशा शक्तींचा वास आहे. त्यांच्यापैकी काही आदिवासी त्या जागेपाशी गायब झालेले आहेत. त्यामुळे तिथे जायला ते घाबरतात. पण देसुला त्यांच्या देवर्ष्याने कसलातरी ताईत दिला आहे, त्यामुळे तो तिथे जाऊ शकतो. तरीही खुप आढेवेढे घेतल्यानंतर, पक्याने त्याला गांजाच्या दोन पुड्या आणि काही पैसे ऑफर केल्यावरच देसु त्यांना फक्त जंगलातील पाणवठ्यापर्यंत पोचवायला तयार झाला आहे.
"आयला म्हणजे भुतं बघायला मिळण्याची शक्यता आहे!" सुन्या खदखदायला लागला. तसा पक्याही त्याच्याबरोबर हसायला लागला.....
"अबे तू आहेसच की, अजुन काय बघायचय?".........................
"हे हे हे...बाय द वे, तुझ्याकडे हा मसाला पण आहे हे बोलला नाहीस बे पक्या तू मला!" सुन्या देसुच्या हातातल्या गांजाच्या पुड्यांकडे बघत बोलला.
त्यानंतर देसुने त्यांना त्या पाणवठ्यापाशी सोडले होते. फ़क्त एक सुचना देसुने केली होती की तिथे एका जुनाट झाडावर बांधलेल्या मचाणावरच बसुन त्यांनी वाघाची वाट बघावी. त्याच्यामते ते झाड त्यांच्या देवऋष्याने मंत्रीत करुन ठेवले होते, त्यावर बसणार्यांना कसलीही भीती नव्हती. पण कुठल्याही परिस्थितीत रात्रीच्या वेळी झाडावरुन उतरायचे नाही अशी चेतावणी द्यायलाही तो विसरला नव्हता. देसु त्यांना तिथे सोडुन गेल्याला आता किती तरी तास उलटुन गेले होते. मध्यंतरी कालची रात्र उलटुन गेल्यावर आजचा दिवसभर त्यांनी जंगलात एक फेरफटका मारला होता. पण त्यांना तिथे काहीही भीतीदायक वाटावे असे आढळले नव्हते. उलट जंगलातील निसर्गसौंदर्याने वेड लागल्यासारखे झाले होते दोघांनाही. पण ज्यासाठी आले होते तो वाघ काही दिसत नव्हता. पक्या जंगलभर शोध घेत होता पण त्याला काही तो वाघ सापडला नाही. शेवटी आजची एक रात्र वाट बघायची आणि सकाळी परतीची वाट धरायची असे ठरवून दोघेही पुन्हा एकदा मचाणावर हजर झाले होते. मात्र मध्यरात्र झाली तरी अजुनही वाघाचे दर्शन झाले नव्हते.
"पक्या, आता मात्र कहर झालाय यार! तुझा वाघ कधी येणार आहे. अपॉईंटमेंट घेतली होतीस ना तू? च्यायला इथे मरणाची भुक लागली. आता तुझा तो वाघ आणि तू... दोघे मिळून गोंधळ घाला. मी चाललो" आणि चिडलेला सुन्या मचाणावरून खाली उतरायला लागला.
"थांब सुन्या.....! मी तुझ्याशी थोडं खोटं बोललोय ! मी तुला इथे वाघ बघायला नाही आणलय. इथे येण्याचं कारण काही वेगळं आहे. खरेतर मला कुणाचीतरी सोबत हवी होती कारण इथे एकट्याने यायची माझी हिंमत नव्हती, माझ्याकडे तेवढे धाडस नव्हते."
***********************************
क्रमश:
तळटिप : इतरत्र पूर्वप्रकाशित
मंडळी कथा लांबल्याने दोन भागात विभागली आहे. दूसरा भाग १-२ दिवसात येइलच. तोपर्यंत क्षमस्व.
प्रतिक्रिया
2 Dec 2015 - 3:51 pm | पैसा
घाबरवणारी कथा! पुढचा भाग वाचायचा आहे. पण रात्रीचा टाकू नको!
2 Dec 2015 - 4:08 pm | प्रसाद को
सस्पेन्स कायम ......अगदि बरोबर कथा थाम्बवलीत
------/\------
2 Dec 2015 - 4:14 pm | महासंग्राम
येवूद्या …। पुभाप्र
3 Dec 2015 - 12:52 pm | उगा काहितरीच
उत्कंठावर्धक... पुभाप्र ...
3 Dec 2015 - 1:06 pm | मृत्युन्जय
आधी वाचली आहे. ही तुम्ही आधी माबोवर प्रकाशित केली आहे का? दूसरा भाग लवकर द्या. विसरलो आता उत्तरार्ध. आज वाचायचाच आहे,
3 Dec 2015 - 9:35 pm | एक एकटा एकटाच
जबरदस्त
विशाल दा
यक नंबर
4 Dec 2015 - 9:24 pm | दिनु गवळी
वाचलीय मी पन डेकाने पक्या अन सुन्या ला मारल्यावर पुढे काय होते ते मी स्वतः स्वप्नात बघितलय
4 Dec 2015 - 9:32 pm | कविता१९७८
मस्त कथा
5 Dec 2015 - 5:35 pm | एक एकटा एकटाच
अरे विशाल दा
पुढचा भाग टाक की
बिगी बिगी
5 Dec 2015 - 5:38 pm | बिन्नी
छान लिहिता तुम्ही. तुमचे इतर लेखनही आवडले.
या कथेच्या पुढच्या भागाची वाट पाहते.
5 Dec 2015 - 8:31 pm | अभिजीत अवलिया
पु. भा. प्र.
5 Dec 2015 - 9:05 pm | स्वामी संकेतानंद
वर्तुळ करू नका. पुलेशु!
7 Dec 2015 - 9:10 pm | विशाल कुलकर्णी
पुढचा भाग उद्या टाकतो. लॅपटॉप आजारी होता म्हणून अडलं होतं मंडळी. उद्या नक्की !
आणि हो धन्यवाद :)
8 Dec 2015 - 7:37 am | दिनु गवळी
मी ही कथा २०१२ मधे वाचली होती तुम्ही संपवली तिथुन पुढे मी सुरवात करतोय लिहायला
8 Dec 2015 - 8:36 am | योगी९००
आयला...!!ही कथा कशी काय मिसली मी...? ते पण विशाल भाऊंचा पंखा असून...!!