प्रत्येकजण भराभर सॅक्स उचलून बाहेर पडायची घाई करीत होता. तो थोडासा थांबला. नकळत रितूदेखील थोडी थांबलेली आहे हे त्याच्या लक्षात आलं. आता मुद्दाम काहीतरी कारण काढून मागे थांबणं आलं. पण नाही, रितू तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर पडली. ती त्याच्यासाठी थांबलेली नव्हती. विवेक ती बाहेर पडेपर्यंत तिच्याकडे पहात होता. तिच्यामागे अजून दोन तीन मुली होत्या. एकसलग बडबड चाललेली त्यांची. काहीतरी चुकीचं घडलं आहे हे त्यांच्या कुणाच्याच लक्षात आलं नाही. पण विवेकने ते पाहिलं. त्याला ही संधी पाहिजेच होती. तो लगेच खुशीत धावला.
एव्हांना त्या सर्वजणी ग्रंथालयापर्यंत पोहोचलेल्या सुद्धा होत्या. रितू आज थोडी रेंगाळत मागेच चालत होती. तो पटकन तिच्यापर्यंत पोहोचला.
‘थांबा जरा कृपया.’
***
ती अचानक थबकली. हे कदाचित तिला अजिबात अपेक्षित नव्हतं. ‘काय आहे?’ तिनं थोडंसं आश्चर्यानेच विचारलं. चेहे-यावर एखाद्या बावरलेल्या हरिणीचे भाव दाटून आलेले होते. विवेकने हात पुढे केला ‘हे घ्या. तुमची इयररिंग. मघाशी वर्गातच पडली तुम्ही बाहेर येताना.’
‘ओह. धन्यवाद.’
..
..
..
..
दोघांनाही काहीतरी बोलायचं होतं. कुणीतरी बोलण्यात पहिल्यांदा पुढाकार घेईल असं दोघांनाही वाटत होतं. पण ते कुणालाच शक्य झालं नाही. दोघं उगाच नजरा चोरण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते. पण पुन्हा पुन्हा नजरा एकमेकाला बघायला, चुंबकसुई कशी उत्तरेकडेच सतत वळत राहते, तशा वळत होत्या.
तो तिच्याकडे पहात होता. सकाळच्या कोवळ्या उन्हात मंद वा-यावर हळूच डुलणा-या अबोलीच्या फुलासारखी त्याला ती वाटली. साधी, सुंदर, नाजूक. एखाद्या हरिणीसारखे तिचे डोळे कावरेबावरे होऊन कधी त्याच्याकडे तर कधी दुसरीकडे बघत होते. पहाटेच्या वेळीस पारिजातकाच्या झाडाला लागलेल्या अलगदशा धक्क्याने टपाटपा फुले खाली पडावीत तसं काहीसं ते वातावरण. धुंद, सुगंधित, अस्तित्व विसरुन टाकणारं.
तीसुद्धा त्याच्याकडे पहात होती. तिच्यापेक्षा उंच होता तो. सावळा, खुरटी दाढी वाढवलेला, पिळदार, मजबूत शरीराचा. त्याची शांत, आश्वासक नजर तिला न्याहाळत होती. तिला अगदी खोल हृदयापर्यंत स्पर्श करीत होती. त्यानं काहीतरी बोलावं असं खूप खूप वाटत होतं तिला. पण काहीतरी बोलायची इच्छा असून देखील त्याला बोलायला सुचत नव्हतं.
काहीच मिनिटं गेली असतील. पण अगदी काही तास गेल्यासारखे वाटले त्यांना. आपल्या मैत्रिणी थोड्या अस्वस्थ झाल्या आहेत, हे रितूच्या लक्षात आलं. ती चटकन वळून त्यांच्याकडे निघून गेली. पण जाताना एक छोटंसं स्माईल द्यायला विसरली नाही मात्र.
तो पाठमोर्या तिला पहात राहिला. आत्ता नक्की कुठे होता तो? ते काही क्षण काळ कुठे थांबलेला? काही काहीच अस्तित्वात नव्हतं त्या चार पाच क्षणांत. हा अनुभव फार नवा होता त्याला. एखाद्या दारु चढलेल्या माणसासारखा तो हॉस्टेलकडे चालू लागला. आपण कुठे चाललोय, रस्त्यावर इकडे तिकडे बघतोय का, गाड्या हॉर्न वाजवतायत का? काहीच भान नव्हतं त्याला. सगळं कसं मस्त मस्त वाटायला लागलेलं होतं. सगळं जगच सुंदर सुंदर झालेलं. कुणाल आणि आदी मागून त्याला हाका मारत येत होते, हे पण लक्षात आलं नाही त्याच्या.
हॉस्टेलवर पोहोचतानाच कुणाल आणि आदीने खाली चहावाल्याला रूमवर स्पेशल चहा द्यायला सांगितलं. ते दोघं रूमवर पोहोचले तेव्हां विवेक नेहमीप्रमाणे गप्पा मारण्यासाठी त्यांची वाट बघत बसलेला नव्हता. बेडवर पडून निवांत छताकडे कुठे तरी शून्यात बघत बसलेला होता. मधूनच स्वतःशी हसत होता, काहीतरी गुणगुणत होता.
दोघे आता त्याच्याशी बोलायला कशी सुरुवात करावी याचा खल करत होते. तेवढ्यात वेलची स्वादाचा वाफाळलेला चहा घेऊन कॅंटीनवाला आला. सराईतपणे त्याने कागदी कप तिथल्या एकुलत्या एका डुगडुगत्या टेबलावर ठेवले. किटलीतला चहा कपात ओतताक्षणीच वेलचीचा घमघमीत सुगंध दरवळला. एकदम विवेकसुद्धा हवेतल्या प्रेमराज्यातून खाली येऊन चहाकडे बघू लागला.
चहावाला निघून गेल्यावर प्रत्येकाने आपापले कप उचलले. विवेकने घरातून बांधून आणलेले शंकरपाळे काढले. त्याला चहाबरोबर खूप आवडत. कुणालने आदीकडे बघून घसा खाकरला. विवेकच्या लक्षात त्यांची चुळबुळ आली. त्याने आदीला विचारले ‘काय रे? एवढं काय बोलायचं असून पण लपवताय?’
शेवटी आदी बोलला ‘विवेक आता जे घडलं ते कॉलेजमध्ये ब-याचजणांनी पाहिलं.’
विवेकः ‘बरं मग? त्यात विशेष काय घडलं?’
आदीः ‘अरे, तसं नाही रे. तू पुढं गेलास निघून कुठल्यातरी नादात. पण आपल्याबरोबरचा घाडगे आहे नं, त्यानं आम्हाला लगेच येऊन सांगितलं की ती नाना टाफळेंची कन्या आहे.’
विवेकः ‘आता हे नाना टाफळे कोण?’
आदीः ‘अरे इथले जिल्हा परिषद सदस्य आहेत. राजकारणात बराच वट आहे त्यांचा इथं. तू रितूला विसरुन जावंस हेच बरं. नाहीतर हातपाय मोडून घ्यायची वेळ येईल.’
विवेकः ‘अरे, पण यात माझी काय चूक काहे? पहिल्यापासून जे घडत गेलं ते तर तुम्ही पाहिलंच आहेत नं? मी काय तिच्यामागे धावत सुटलेलो नव्हतो. ती स्वतःहूनच माझ्यात interest घेत आहे. यात माझा काय दोष?’
आदीः ‘हो, पण हे तिच्या बापाला पटणार आहे का? तो स्वतःच्या मुलीचीच बाजू घेणार. तुझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या पोराला तो थोडीच वाजत गाजत जावई करुन घेणार आहे?’
विवेकः ‘हं. खरं आहे.’
आदीः ‘आणि हो, सगळ्यात मुख्य म्हणजे ती रितू कशी आहे, काय आहे, आपल्याला काय माहीत? तिचा स्वभाव तुला माहीत आहे का? ऐनवेळीस तिनं घूमजाव केलं तर तुला ठणाणा करायचीच वेळ येईल. शेवटपर्यंत ती खंबीरपणे साथ देईलच तुझी, याची काय खात्री आहे?’
विवेकः ‘ठीक आहे. मी तिच्याशी भेटून बोलतो एकदा या विषयावर. मला विसरून जा म्हणून सांगतो.’
आदीः ‘पुन्हा तेच! अरे तिच्या जवळसुद्धा जाऊ नकोस आता. तू अगोदरच बरेच जणांच्या लक्षात आलायंस. अर्थात केवळ कानातून पडलेली इयररिंग परत केली म्हणून काही फारसा बोभाटा होणार नाही. पण यापुढे नकोच संपर्क.’
इतका वेळ त्यांचं बोलणं नीट ऐकत बसलेला कुणाल आता पुढे सरसावला. ‘विवेक, माझ्या मते तू तिच्याशी बोलूनच बघ या विषयावर. असा तिच्या प्रेमाचा अपमान करणं मला तरी बरोबर नाही वाटत. तिला अगोदरच कल्पना दे. तिचे वडिल याला विरोध करणारच, मग तेव्हां ती खंबीरपणे तुझी साथ देईल का? हा प्रश्न स्पष्टपणे विचार. तितकी विचारी ती नक्कीच असेल. आपल्या वडीलांचा स्वभाव माहीत असून देखील ती तुझ्याकडे आकर्षित झालेली आहे म्हणजे तिनं नक्कीच पुढच्या शक्यतांचा विचार केलेला असेल. पण हे काहीच न बोलता एकदम झिडकारुन लावणे म्हणजे खूप वाईट. तुला आणि तिला दोघांना आयुष्यभर त्याचा मानसिक त्रास होईल. पाहिजे तर मी येतो तुझ्याबरोबर तेव्हां.’ कुणाल मनापासून बोलत होता.
विवेकचा चेहरा आता उजळला. ‘तू म्हणतोयस ते पटलं मला कुणाल. आपण बोलूच तिच्याशी. न बोलता विनाकारण घुसमटत राहणं नक्कीच चुकीचं होईल.’ दोघांनी आपले चहाचे कप ‘चिअर्स’ स्टाईलमध्ये भिडवले.
आदी मात्र काहीच न बोलता चहाचे घुटके घेत राहिला…
(क्रमशः)
प्रतिक्रिया
24 Nov 2015 - 11:28 am | मयुरMK
अवधूत , इशकजादे लेख मस्तच आहे राव . असेच लिहित रहा
24 Nov 2015 - 2:06 pm | अजया
पुभाप्र!
24 Nov 2015 - 2:31 pm | जातवेद
पुभाप्र.
24 Nov 2015 - 2:37 pm | नाखु
इतना तो याद है मुझे
पुभाप्र
24 Nov 2015 - 2:41 pm | यशोधरा
ह्म्म..
24 Nov 2015 - 3:02 pm | बाबा योगिराज
भेष्ट. असच लिहित रावा.... पुल्डे भाग लवकर लवकर येऊ द्या.
24 Nov 2015 - 3:16 pm | पियुशा
कहाणी पुरी फिल्मी है ;) येउ द्या पुढचे भाग पटापट :)
24 Nov 2015 - 3:41 pm | रातराणी
पुभाप्र.
25 Nov 2015 - 8:23 pm | मांत्रिक
धन्यवाद वाचक आणि प्रतिसादक मंडळी...
2 Dec 2015 - 9:56 am | एक एकटा एकटाच
लयभारी
2 Dec 2015 - 1:55 pm | ज्ञानोबाचे पैजार
शारुखान अन काज्योलाचाच शिनेमा हाय ह्यो जानू.
पण वाचताना लई मज्जा येतीया.
पुढचा बीगी बीगी लिवा.
पैजारबुवा,