अशी शक्यता आहे की तुम्ही लोक लेखाचे शिर्षक "केस कापणे : एक (दुर्दैवी) अनुभव" वाचूनच गोंधळात पडला असाल! बरोबर आहे ना , त्यात असा मोठा तीर मारला मी "केस कापून" ? त्यात काय नविन ? का आपलं आम्ही वाचतो म्हणून काही पण लिहाल ? तुमचं हे तर 'सुभाष घाई, रामु आणि करन जोहर सारख्या मंडळींच्या वर झाले , कारण त्यांचा असा विश्वास आहे की आपण काही पण दाखवले तरी लोक बघतातच ना, मग नंतर घालेनात का शिव्या आपले तर तुंबडी भरायचे काम झाले आहे... असो. तर खूप विषयांतर झाले, या "फिल्म-इंडस्ट्री' वर लिहण्यासारखं बरचं काही आहे पण तर नंतर कधीतरी ....
आस्मादिकांच्या "ब्लोग" वर भेट दिलेल्या सज्जनाच्या लक्षात असेलच की आम्हाला "केस वाढवण्याचा शौक " आहे. तर त्यानुसार आम्ही बऱ्याच काळापासून ( वर्षापासून) मानेवर रूळण्यापर्यंत मोठी केशसंपदा ( च्यायला असे मोठे शब्द आठवून लिहूस्तोवर दम लागतो , पण करणार काय त्याशिवाय लेखाला वजन येत नाही. ) बाळगून आहोत. त्यां शिंच्या "जॉन अब्राहम" की काय त्याने नंतर आमची नक्कल केली व 'बिपाशा' पण पटवली, आम्ही आपले इथेच. असो [ म्हणावेच लागेल, दुसरं काय ?]. साधारणता क़ॉलेजला असल्यापासून आम्हाला हे खूळ लागले व आम्ही ते खूप आवडीने जोपासले, त्याला खतपाणी (म्हणजे शाम्पू, हेअर क्रीम चा खूराक ) घातले व त्याचा परिणाम म्हणजे आमची १०० लोकात उठून दिसणारी "हेअर-स्टाईल" (गेले ते दिवस आता , सध्या आम्हाला १०० सोडा हो १० लोकात जायला कसेतरीच होते ).
६ महिन्यापूर्वी पर्यंत आमची तैनाती "पुणे प्रांती" असल्यामुळे आम्हाला हा 'केशसंगोपनाचा' छंद जोपासताना तसा काही त्रास झाला नाही कारण म्हणजे जेव्हा कधी केस कापण्याची पाळी यायची तेव्हा "आपले लोक, आपला प्रांत व आपली भाषा ( मग ती हिंदी का असेना) जाणणारे लोक" असल्यामुळे नेमकी कशी 'हेअर स्टाईल पाहिज' हे आम्ही व्यवस्थीत पणे "केशकर्तनकाराला" [ गेले ते दिवस आता न्हावी म्हणायचे] समजावून सांगत असू व आश्चर्य म्हणजे त्याला पण ते समजत असल्याने आमचा कधी "पोपट" झाला नाही. आहं, काय दिवस होते ते ? खरचं मस्त ... पण आस्मादिकांच्या लक्षात असेल की काही 'अंतर्गत राजकारणामुळे' आम्हाला 'पुणे प्रांताची' चाकरी सोडून ह्या अनिळखी 'कन्नड' भाषा असलेल्या 'बेंगलोर प्रांतात चाकरी पत्करावी लागली. येथे येताना आमच्या मनात धास्ती होतीच की "या केसांचे काय करायचे आता ?" बेंगलोरला जायच्या आधीच "ह्या कूल हेअर स्टाईल " ला तिलांजली द्यायची व चंपक बनून जायचे का तिव्ह्यायला होईल ते बघू म्हणून बिनधास्त राहायचे ? शेवटी बऱ्याच विचारांती आम्ही 'केशसंभार' जतन करण्याचा निर्णय घेतला...
बेंगलोरला नव्या कंपनीत दाखल झाल्यावर ह्या मोठ्या केसांमुले बरेच फायदे झाले. एकतर आमची ऑफीसमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण झाली, चांगल्याचांगल्या मुलांशी ओळखी झाल्या , आम्हाला वरच्या वाऱ्याला लागलेले पोर समजून कंपनीतले घासू व चाटू लोक दूर राहू लागले, कंपनीच्या "टेबलटेनीसच्या टीम" मध्ये सिलेक्शन झाले [ त्या एच. आर. च्या पोरीला माझ्या खेळापेक्षा माझे खेळताना उडणारे केस आवडले व तिने मला हे म्हणून दाखवले.]... त्यामुळे पहिले काही दिवस मजेत गेले. पण नंतर जेव्हा केसांना पुन्हा एकदा व्यवस्थीत वळण व शेप द्यायची पाळी आली तेव्हा आता आपल्या केसांचे काय टारले होणार याच्या चिंतेने माझी 'रातोंकी निंद हराम' झाली. काही निवडक दोस्तांबरोबर ठिकठिकाणच्या 'केशकर्तनालयांचे सर्वेक्षण ' केल्यावर 'बेंगलोर' हे आपल्याला केस कापण्यासाठी योग्य ठिकाण नाही अशा निर्णयांती आम्ही पोहचलो. याचे कारण म्हणजे इथल्या 'कारागीर'लोकांना "कन्नड" सोडून अवगत नसलेली दुसरी भाषा, इथल्या 'दक्षिण भारतीय' केशसंभार ' पद्धतीचे त्यांच्या हाताला पडलेले वळण, हिंदी शिकण्याची इछ्छा नसणे व इंग्रजी न येणे अशा अनेक अडचणी समोर आल्या व त्यामुळे आम्ही 'बेंगलोरमध्ये केस न कापण्याची प्रतिज्ञा केली. जेव्हा जेव्हा केस कापण्याची पाळी आली तेव्हा तेव्हा मी काहितर कारण काढून 'पुण्याच्या दिशेने धाव' घेतली व यशस्वीपणे माझी हेअर स्टाईल संभाळली...
असे साधारणता ६ महिने गेल्यावर मागच्या आठवड्यात 'फिरंग्यांच्या भारत भेटीची तयारी करा ' असा मेल आला. त्याच वेळी आमचा पुण्याला जायचा प्लान चालू होता ( कारण केस वाढले होते) पण या अचानकच्या संकटामुळे आमचे पार धाबे दणाणून गेले. भेटीची तयारी म्हणजे केस कापणे आलेच व आता पुने त्रीप ची शक्यता नसल्या मुले ते इथेच बेंगलोरला कापणे आले. यावर आमच्यावर जळणाऱ्या काही 'टकलू जमातीतील' मित्रांनी " अब आया उंट पहाड के निचे" असा कूजकट शेरा मारला पण आम्ही त्याच्याकडे दूर्लक्ष केले, आम्ही म्हणले " जलते है तो जलने दो "
आखेर तो घातवार [ पक्षी शनिवार] उगवला , आमचे चांगले चिंतणाऱ्या एका दोस्ताला बरोबर घेउन मी 'केस कापण्याच्या मोहिमेला' निघालो. बऱ्याच दुकानात कुणाला हिंदी अगर इंग्लिश येत नसल्या कारणाने आम्हाला तेथून काढता पाय घ्यावा लागला. शेवटी एका दुकानात एक महान 'कारागिराची गाठ ' पडली , त्याने डायरेक्ट हिंदीतच 'हा कोई बात नही, मै बराबर फीट करता हूं" म्हणून मला दिलासा दिला. मी आणि माझ्या मित्राने सर्व परिस्थीती म्हणजे दूकान व दूकानदाराची कंडीशन याची चाचपणी करून आपल्यावर 'केशसंस्कार करून घेण्याचा निर्णय घेतला. मग पुढचे १० मिनिट त्या महान माणसाला "कुठले केस कापायचे, कुठले नाही कापायचे, जे कापायचे ते किती कापायचे, जे नाही कापायचे ते किती नाही कापायचे, कुठले केस कुठे वळवायचे " यावर बौद्धिक घेतले. त्याने पण "पर्वा नही, सब फीट कर दूंगा" अशी वाक्ये फेकून चैतन्य निर्माण केले. यानंतर मी माझा "चष्मा काढून" त्या "सुळावर चढलो" व माझ्या मित्राने 'फिल्मफेअर मासिकात ताजे ताजे फोटो' बघण्याच्या उदात्त कार्यात स्वताला गूंतवून घेतले. तर प्रोब्लेम असा आहे की एकदा चष्मा काढल्याव्र बऱ्यापैकी दूर अंतरावर असणाऱ्या आरषात आपल्या डॉक्याचे काय टारले होउन त्याचे पक्षाचे घरटे होत आहे हे बिलकूल कळत नाही, त्यामुळे पुन्हा आम्ही त्याला सगळी कृती रिपीट केली व त्याने पण "पर्वा नही" अशी ग्वाही दिली. त्याने कात्री वगैरे पराजून माझ्या कानावर रूळणार्य़ा केसाच्या एका झूपक्याला हात घातला, लगेच मी त्याला "आरामसे" असा सला दिला व त्याने नुसतीच मान डोलावून समले असल्याची खूण केली. पण हाय रे माझे कर्म ! त्याने डायरेक्ट त्या झुपक्याचा "लचाकाच तोडला" व केसांची लांबी ओरिजनलच्या फक्त ३० % करून टाकली. मला नक्की काय घडले आहे याची कल्पना आली व मी पटकन चष्मा चढवला "पर अब देर हू चूकी थी", मी त्याच्यावर चिडून त्याला खडे बोल सुनावले, त्याच्या कौशल्यावर टीका केली पण यामुळे त्याचा चेहरा खूनषी व नाखूष दिसाय लागला. मग मला पुढे वाढून ठेवलेल्या संकटाची कल्पना आली. आत्ता शांतपणे जे काही होत आहे ते सहन करण्यापलीकडे माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता करण मी जर अजून त्याला डिवचले तर तो अजून माझी दूर्दशा करण्याची शक्यता होती. त्याचे सगळे प्रयोग संपल्यावर त्याने " हा साब, हो गया एकदम परफेक्ट" असा निर्वाळा दिला,. मी चष्मा लाउन माझ्याकेसांकडे पाहिल्यावर माझे डोळे ओले व्हायची वेळ आली. ती हेअर स्टाईल फार फार तर "शेतात काम करणारे गडी , खेड्यातले लहान मुल, कॉलेजमध्ये पुढे पुढे करणारी टीपिकल भावमारू पुनेरी पोरं, गावात येड्यासारखे हिंडणारी चंपक लोक" यांच्या लायकीची होती. पण आता वेळ गेली होती. त्याने केलेल्या " महान कार्याबद्दल " त्याचे आभार मानून मी घरी परतलो.
आल्याआल्या रूमवरच्या चांडाळांनी गदाबळा लोळत हसून घेतले व त्यावर कडी म्हणजे लगेच "मोबाईलवर फोटो " काढून तो "इंटरनेट द्वारे आख्ख्या जगभर पसरलेल्या आमच्या मित्रांना " व्यवस्थीत वर्णनासगट पाठवून दिला...
दुसऱ्यादिवशी ऑफीसमधे तर विचारू नका, लोक काहितरी कारण काढून हळूच केबिनमध्ये यायचे व बाहेर जाताना हसत निधून जायचे, आमच्या ड्रायव्हरने ने पण " साब, वही अछ्छा लगता था, ये एकदम बोगस है" असा शेरा मारला, मुळींचे तर विचारू नका त्यांना "रूमालात किती हसू आणो किती नको" असे झाले होते....
तर अशी ही माझी "अनोळखी भाषा बोळणार्य़ा प्रदेशात केस कापण्याच्या प्रयोगाची कहाणी साठाउत्तरे 'दु'ष्फल संपूर्ण ........
आता तुम्ही पण माझ्यावर पोट घरू धरू हसा बर का ..........
प्रतिक्रिया
6 Mar 2008 - 10:41 am | छोटा डॉन
"मुळींचे तर विचारू नका त्यांना "रूमालात किती हसू आणो किती नको" असे झाले होते...."
हे , मुलींचे तर ..... असे वाचावे ..........
छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या "http://chhota-don.blogspot.com/ "]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........
21 Dec 2008 - 4:48 pm | टारझन
आग्गायायाया =)) =)) =)) मेलं रे मेलं !!!
बाकी माझे केसं जेंव्हा लांब वाढवलेले होते ... च्यायला गल्ली सोडाच ... कंपनीत णविण जॉइन झालेलो ती लोकं पण टरकून होती ... च्यायला म्हंटलं आपली गुंडगीरी बास ... आणि आम्ही स्वेच्छेने केसं कापून आलो ... त्या दिवशी माझं वजन १० किलो कमी झाल्यासारखं वाटलं! ... तेंव्हा आमच्या जवळ येऊन कोणी बोलायचं धाडस केलं !!!
बाकी डाण्या .... एवढं मोठ लिहीण्यापेक्षा फक्त तुझा स्नॅप जरी लावला असता तरी तुझ्या भावणा पोचल्या असत्या. .. परत =)) असं हसता आलं असतं त्ये येगळंच !
- टी.आर. ढोणी
6 Mar 2008 - 10:41 am | राजमुद्रा
फारच दुर्दैवी :(
थोडा धीर धरा, पुन्हा केस वाढतील.
राजमुद्रा :)
6 Mar 2008 - 11:32 am | तात्या विन्चू
आमच्या बेंगलोर मधील वास्तव्यात आम्हालाही अशाच प्रकारच्या अनुभवास १-२ वेळेस सामोरे जावे लागले होते. पण सरते शेवटी 'कोरामन्गला ८ वा ब्लोक' येथे आम्ही एक हिन्दी जाणणारा न्हावी शोधून काढला.
आपला,
एन्जोय माडी....सक्कत होट मगा....एवढच कन्नड जाणणारा
तात्या विन्चू
6 Mar 2008 - 1:15 pm | छोटा डॉन
"शेवटी 'कोरामन्गला ८ वा ब्लोक' येथे आम्ही एक हिन्दी जाणणारा न्हावी शोधून काढला"
नक्की कुठशिकं हो ? मी पण कोरामंगला मध्येच राहतो ....
८ वा ब्लॉक म्हणाजे "फोरम मॉल" ना ?
छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या "http://chhota-don.blogspot.com/ "]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........
6 Mar 2008 - 1:17 pm | तात्या विन्चू
हो, बरोबर! ७ व ब्लोक म्हणजे फोरम, ७ व्या ब्लोकलाच लागून ८ वा ब्लोक आहे ( फोरम कडून National Games Village ला जाणार्या रोड वर)
याच रोड वर, बजाज शोरूम कडुन डावीकडे वळल्यावर, तिसरा राईट्.....त्या रोड वरती आहे हा न्हावी.......
आपला,
ओम फट स्वाहा....
तात्या विन्चू
6 Mar 2008 - 2:08 pm | जुना अभिजित
मीही हैदराबादला असताना तिकडे १-१.५ वर्षात फक्त दोन तीन वेळा केस कापले. तिकडे हिंदी कळते पण मजा नाही येत. हैदराबादमध्ये एक मात्र खास होतं दहा रुपयात डोक्याची झकास मालीश करून मिळायची.
एकंदरीत मराठी माणसाला मराठी माणसाकडूनच हजामत करुन घ्यायला आवडते असं दिसतय.
ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
6 Mar 2008 - 11:01 pm | सुधीर कांदळकर
खमंग आणि खुसखुशीत शैलीचा छोटा डॉन. वाचून ताजेतवाने प्रसन्न वाटले. केस धरून हसलो. पुढच्याखेपेस असे नुकसान न होता खुसखुशीत वाचायला मिळो. लवकरच केस पूर्ववत वाढोत ही शुभेच्छा.
7 Mar 2008 - 8:50 am | विसोबा खेचर
खमंग आणि खुसखुशीत शैलीचा छोटा डॉन. वाचून ताजेतवाने प्रसन्न वाटले. केस धरून हसलो.
हा हा हा! हेच म्हण्तो...
छोट्या डॉना, और भी लिख्खो...
तात्या.
7 Mar 2008 - 9:16 am | छोटा डॉन
"खमंग आणि खुसखुशीत शैलीचा छोटा डॉन. वाचून ताजेतवाने प्रसन्न वाटले. केस धरून हसलो. "
"डब्बल तात्यासाहेब, सुधीर कांदळकर , राजमुद्रा, जुना अभिजीत " आपल्या सर्वांचे मला मिळालेल्या "सजे ची" कथा वाचून " मजा आल्याबद्दल" व त्याची प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार ...
इथून पुढे केस कापण्यासाठी आम्ही फक्त आणि फक्त "पुणे" यालाच प्राधान्य देऊ असे आम्ही येथे नमूद करू ईच्छितो ....
छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या "http://chhota-don.blogspot.com/ " ]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........
7 Mar 2008 - 10:36 pm | देवदत्त
येतील केस पुन्हा... दुसर्याच्या चुकीमुळे किंवा दुर्लक्षामुळे झाल्याचे वाईट वाटले.
मी दाढी-मिशी वर प्रयोग करत असतो. म्हणतात ना घरकी खेती है ;)
ठिकठिकाणच्या 'केशकर्तनालयांचे सर्वेक्षण ' केल्यावर 'बेंगलोर' हे आपल्याला केस कापण्यासाठी योग्य ठिकाण नाही अशा निर्णयांती आम्ही पोहचलो.
मी असले सर्वेक्षण केले नाही. परंतु माझ्या २ वर्षांच्या वास्तव्यात मी ही कधीच बंगळूरू ला केस कापले नाहीत. नेहमी ठाण्याला घरी आल्यावरच केस कापण्याचा कार्यक्रम पाडत असे.(बंगळूरच काय पुण्यालाही नाही). मी आणि माझा मित्र तर असे ठरवायचो की लांब केस वाढवायचे आणि मग मॅनेजर ला सांगायचे "सर, सुट्टी द्या ना. घरी जायचे आहे". पण सुदैवाने माझ्या मॅनेजर ने ती पाळी येऊ दिली नाही. :)
7 Mar 2008 - 10:53 pm | टिउ
एक नंबर लिहिलंय.
आमचाही असाच अनुभव आहे. आमचे केस ना धड कुरळे ना धड सरळ. त्यामुळे सलुनमधला सगळ्यात अनुभवी न्हावीच आमच्या केसांना हात (म्हणजे कात्री) लावायची हिंम्मत करतो. बरं केस कापतांना बाकिच्या ट्रेनी न्हाव्यांना बोलावुन आमच्या केसांवर शिकवण्या घेतो.
एखाद्या डॉक्टरकडे अवघड केस आल्यावर तो जसा बाकी शिकाउ डॉक्टरांना बोलावुन सांगतो की 'बघा. असे पेशंट नेहमी नेहमी बघायला मिळत नाहीत. परत असा अनुभव मिळणार नाही' तसा काहीतरी प्रकार.
केसांवर असे काहिही प्रयोग करता येतात म्हणुनच डॉक्टर लोक 'केस' हाताळत असतील का?
21 Dec 2008 - 6:57 pm | सखाराम_गटणे™
चांगले लिहीले आहे.
आता पुण्यात येशील तेव्हा चांगले सगळे केस फिट कर
----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
21 Dec 2008 - 5:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
झक्कास! डान्या, तुझी लेखणी (का कीबोर्ड) भारीच चालतो.
डान्या, मलाही माझ्या युकेतल्या दिवसांची आठवण झाली. एका मैत्रीणीच्या केसांचं २५ पाऊंड देऊन जे काही टोपलं झालं ते बघून, ट्रेनच्या भाड्याचे ६ पाऊंड, केस कापण्याचे २५ पाऊंड आणि शिवाय या सगळ्या प्रकारासाठी लागणारे दोन-अडीच तास (स्टेशनला जायला १५ मिनिटं, मग ट्रेनमधे १० मिनिटं असं मोजत) हे सगळे वाचवून मी स्वतःचे स्वतः केस कापायला शिकले. गंमत म्हणजे तिकडच्या सुंदर शेक्रेटरीणींनीही मी "कुठून केस कापून घेतले, मलाही आता गरज आहे केस कापण्याची" अशी चौकशी केली तेव्हा "जमलं बुवा एकदाचं" याचा आनंद झाला. त्या आनंदात मी पुन्हा तीन महिन्यांनी केस कापले. पण मग मात्र जरा घोटाळाच झाला. मधल्या तीन महिन्यात घरात नवीनच आलेल्या चिनी मुलीने तिचे केस कापून देण्याची विनंती केली. गेले होते खगोलशास्त्र शिकायला पण त्याबरोबरच पार्लरवालीचं कामही शिकून आले.
(आता सवयीला जागून अवांतरः हा एवढा जुना लेख एकदम वर कसा रे आला?)
21 Dec 2008 - 6:12 pm | यशोधरा
"अब आया उंट पहाड के निचे" हे कन्नड भाषेत तुझ्या मित्रांनी कसे म्हटले रे डान्या?? :D
21 Dec 2008 - 6:55 pm | शितल
डॉन्या,
एकदम सह्ही लिहिले आहेस. :)
तु़झी हेअर स्टाईल एका फोटोत छान दिसते आहे , ती ह्या बेंगलोरी न्हाव्याने केलेली असावी बहुधा ;)
22 Dec 2008 - 3:36 am | रेवती
लेख. मलाही असाच अनुभव आला पण अमेरिकन कारागिरणीचा.
माझ्या भावाचे लग्न ठरले. आम्ही येथून निघून आठव्या दिवशी परत येणार होतो, म्हणजे फार
घाईगर्दीची भारतवारी होती. म्हट्ले केसाचे काम तिथे गेल्यावर नको, तेवढेच एक काम कमी.
त्या कर्तिकेला सांगितलं,"जसा आत्ता आहे तसाच हेयर कट असू दे, फक्त ट्रीम कर दोन इंच."
आणि तीला फोन आला. झालं , बाईसाहेबांचा जो मूड गेला तो परत आलाच नाही. माझ्या केसांचं
टोपलं झालं. रागावून तीला मी टिप दिली नाही व हेयरकट चुकल्याचे सांगितले.
लग्नात सगळेजण मला विचारत होते की मी अशी वेगळीच का दिसतीये.
लग्नाचे फोटू त्या हेयरकटची आठवण करून देतात.
रेवती
28 Dec 2008 - 10:02 am | विजुभाऊ
डान्या खरे आहे रे. तुझ्या दु:खात सहमत आहे
हल्ली मी केस कापायला जातो तेंव्हा तो नाभीक मला खुर्चीवर बसवतो केसाम्वर पाण्याचा फवारा मारतो. भांग पाडतो आणि " हो गया भौ " असे सांगुन खुर्चीवरुन पायउतार होण्यास सांगतो
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
29 Dec 2008 - 12:51 am | भास्कर केन्डे
वा डॉन भाऊ... नेहमीप्रमाणे मस्त खुसखुशीत लिहिले आहे!
हसून हसून आमची पुरेवाट होण्यासाठी तुम्हाला तुमच्या केशभुशेचा बळी द्यावा लागला हे वाचून अंमळ वाईट वाटले. थोडा धीर धरा. शेतात पिके पुन्हा लवकरच डोलायला लागतील व पिकावंर पुन्हा पक्षी चिवचिव करत घिरट्या घालायला लागतील.
आम्हाला वाटले होते की आम्हा आंग्लदेशात आलेल्यांनाच आपल्या कडच्या केशकर्तनकारांच्या सेवेला मुकावे लागते. पण तुमचा अनुभव वाचून खुद्द भारतात सुद्धा अशी वेळ येते हे ज्ञान नवीनच मिळाले.
आपला,
(समदु:खी) भास्कर
आम्ही येथे वसतो.