जपान, जपानी आणि मी! ....भाग १

पद्मावति's picture
पद्मावति in जनातलं, मनातलं
9 Oct 2015 - 6:46 pm

'' पमीचान, यु आर अ बेरी गुड कूकर''.....माझ्या हातचा खतरर्नाक स्वयंपाक खाउन सुद्धा मला " गुड कूकर" म्हणणार्या बाईकडे मी थक्क होऊन पहात होते.

पुढे हळूहळू जपानी लोकांच्या या अती नम्रपणाची इतकी सवय झाली की मग त्यांनी मला 'यू आर बेरी स्मार्त' किंवा अगदी 'यू आर बेरी थीन' वगैरे म्हटले तरी मी अजिबात दचकायचे नाही. खरंच कौतुक करताहेत का टोमणा मारताहेत असलं फालतू टेन्शन न घेता बेधडकपणे थॅंक यू ..आरिगातो गोझाईमास म्हणून टाकायचे.
पण देश, भाषा, संस्कृती, रंग- सगळ्याच बाबतीत परक्या असलेल्या मला, या जपानी स्त्रियांनी 'पमीचान' म्हणत आपल्या वर्तुळात अलगद सामावून घेतलं होतं, अगदी सहजपणे.
जपान मधे पुरूष असो वा स्त्री, सगळ्यांनाच सरसकट नावामागे' सान' लावण्याची पद्धत आहे. जसे की अक्षय सान, अमोल सान तसेच टीना सान, गौरी सान वगैरे. नाहीतर मग 'चान' हे संबोधन. लहान मुलांना किंवा आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणीला प्रेमाने चान म्हणायची पद्धत आहे.

माझ्या मिस्टरांच्या नोकरीच्या निमित्ताने काही वर्षे आम्ही जपानी लोकांच्या निकट सहवासात घालवली. काही काळ जपानमधे आणि बराचसा काळ जपानच्या बाहेरसुद्धा या लोकांबरोबर राहिल्यामुळे त्यांची विचारपद्धती, चालीरीती, बोलण्या-वागण्याची पद्धत मला अगदी जवळून अनुभवता आली. या लेखातून मी माझ्या मर्यादित नजरेला दिसलेले, कळलेले आणि प्रचंड भावलेले जपानी समाजमन मांडण्याचा थोडाफार प्रयत्न करतेय. माझे काही अनुभव, काही निरिक्षणे, काही गमती आणि आठवणी....

जपान मधे रहातांना आम्ही आमच्या कंपनीच्या कॉलनी मधे राहात होतो. एक पंधरा वीस इमारतींची ही सोसायटी. एकेक इमारत पाच मजल्यांची. अगदी जुनं बांधकाम. रंगरंगोटी कधीतरी पुरातन काळात केलेली. लिफ्ट वगैरे लाड नाहीच. साधारणपणे सहा फुट बाय आठ फुट अशा मापाचे पाच चौकोन आखून अख्खा फ्लॅट त्यात बसवला होता.
स्वयंपाकघर, लिविंग रूम, एक आमची बेडरूम आणि गेस्ट रूम आणि बाथरूम/ टॉयलेट. हे सर्व 3००--३५० स्क्वेर फुट मधे बसविणे हे त्या आर्किटेक्ट्स चं कौशल्य होतं.
या सगळ्या घरांना जमिनीवर फरशीच्या जागी तातामी चटाया. या तातामीची जमीन दिसायला फार छान दिसते. जागा वाचवण्यासाठी घरात सगळी सरकणारी दारं असायची. तसेच आमच्या घरी सोफे किंवा झोपायला पलंग हे प्रकार नव्हतेच, ठेवणार कुठे? लिविंग रूम मधे बसायला गाद्या आणि लोडांची भारतीय बैठक आणि बेडरूममधे झोपायला जपानी गाद्या-फूतोन.

स्वयंपाकघरात वॉटर हीटिंग नसल्यामुळे हिवाळ्यात बर्फाळ पाण्यात भांडी घासतांना मात्र मला खूप त्रास व्हायचा. लिविंग रूम आणि स्वयंपाकघर मिळून एक आम्ही एसी घेतला होता. त्याचा डक्ट बाहेर गॅलरीत होता. उन्हाळ्यात हवेत दमटपणा इतका की त्या डक्ट मधून सतत पाणी गळणार. ते पाणी गॅलरीत साचू नये म्हणून त्या डक्ट खाली मी एक बादली ठेवली होती. ती बादली दर दोन तासांनी भरून रिकामी करायला लागायची इतकी दमट हवा.

सोसायटीच्या खाली खुल्या जागेत पार्किंग लॉट आणि सार्वजनिक बाग होती. बाग म्हणजे काय होतं की प्रत्येक कुटुंबाला एक असा जमिनीचा एक चिमुकला भाग नेमुन दिला होता. त्या जागेत तुम्ही भाजी किंवा फुलं काहीही लावा. जपानी लोकांना बागकाम फार प्रिय. त्या छोट्याश्या वाफ्यातसुद्धा या बायका हौसेहौसेनी काकड्या, टोमॅटो, मिरच्या काय काय लावायच्या. सगळ्यांचाच अंगठा हिरवा.. दुपारी कधीही बघितलं की सर्व बायका डोक्यावर टोपी, बागकामाचे हातमोजे घालून बागकाम करायच्या आणि बरोबर त्यांची बच्चे कंपनी सुद्धा हातात पाण्याची झारी किंवा हातात खुरपणी घेऊन आईला मदत करायची.

या देशात खरंतर सर्व इमारती भूकंपाच्या दृष्टीने सुरक्षित साहित्य वापरुन बंधल्या असतात. पण या आमच्या इमारती जुन्या असल्यामुळे आम्हाला तशी काही सुरक्षितता नसायची. मोठा भूकंप झालाच तर पाच मजले आपल्याला उतरता येतील का अशी थोडी काळजी वाटायची.
मी तिथे असतांना मोठा धक्का कधी नाही बसला पण अधून मधून जरा झुम्मकन चक्करल्यासारखी बिल्डिंग हलायची मग सगळ्या बायका गॅलरीत येऊन भूकंप किती रिक्टर स्केल चा असावा यावर थोडीफार चर्चा करायच्या मग आपापल्या कामाला लागायच्या.

या लहान घरं असलेल्या, जुन्या आणि आणि गैरसोयी असलेल्या सोसायटी मधे राहण्याचे आमच्या सकट सगळयांचे एकमेव कारण की हे कंपनी अपार्टमेंट्स असल्यामुळे अत्यंत स्वस्त दरात आम्हाला मिळायचे. नोकरीच्या सुरुवातीच्या दिवसात आणि जपानच्या प्रचंड महागाईत ही छोटीशी घरं आम्हा सगळ्यांसाठी मोठ्या वरदानासारखी होती. लोकं वयाच्या पस्तीस-छत्तीस वर्षांपर्यंत इथे राहात असत. मग वयानुसार एक दोन प्रमोशन्स घेऊन बॅंक बॅलेन्स वाढला की मग स्वत:चे मोठे घर घ्यायचे.

वयानुसार प्रमोशन्स हे जपानी कंपनी मधे शब्दश: असते. म्हणजे सुरुवातीला इंजीनीयर म्हणून माणूस लागला की डोळे मिटून तो सांगू शकतो की आजपासून तीन वर्षांनी मला पहिली बढती मिळेल, मग त्यानंतर चार वर्षांनी दुसरी. आजपासून दहा वर्षांनी मी अमक्या अमक्या हुद्द्यावर असणार आणि माझा पगार इतका इतका असणार. म्हणजे करियर ग्राफ हा ठरलेला.
म्हणजे एखाद्याच्या हुशारीबद्दल त्याला सटासट बढती मिळेल असे नाही किंवा एखाद्याला माठपणाबद्दल बढती नाकारली असेही नाही. सगळं वक्तशीर आणि ठरलेलं.

आमच्या इथल्या स्त्रिया तशा पस्तीशीच्या आतल्या. वयाच्या पस्तीस-छत्तीस नंतर थोडी आर्थिक सुबत्ता आली की मग या सोसायटीमधून बाहेर, स्वत:च्या हक्काच्या घरात जायच्या. सगळ्याजणींची साधारणपणे एकसारखीच मध्यमवर्गीय पार्श्वभूमी. शिक्षण झाल्यानंतर या नोकरीला लागलेल्या. बहुतेक करून जवळ जवळ सगळ्याजणी आमच्या ( म्हणजे जिथे माझे मिस्टर काम करायचे त्या) कंपनीच्याच माजी कर्मचारी. काम सेक्रेटरीयल, क्लरिकल अशा स्वरूपाचं. काम करता करता तिथल्याच तरुण इंजीनीअर्सची ओळख. ओळखीचं रुपांतर आधी प्रेमात आणि मग लग्नात. या सर्व घडामोडींमधे वय तिशीला आलेलं त्यामुळे लग्नाची आणि मग मूल होऊ देण्याची घाई.
लग्नाआधी ऑफिस मधे काम करणार्या, फूल पाखरासारखे स्वच्छंद जगणार्या या मुली लग्न होऊन आमच्या कंपनी अपार्टमेंट (शाताकू) मधे येईपर्यंत अगदी टिपिकल चूल आणि मूल टाइप ताई, माई, अक्का बनून जायच्या. पण अतिशय उत्कृष्ट गृहिणी! फार हौसेनी संसार करतात या मुली . इतकेसे घर, तितकीच लहानशी बाग, आपली गोडम गोड मुलं आणि आपले थोडेसे गंभीर, अबोल नवरे अगदी मनापासून सांभाळतात.

त्यांच्याशी बोलतांना मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला की मुलं झाल्यानंतर त्या करियर का नाही सुरू ठेवत. त्यांच्या उत्तरावरुन लक्षात आलं की या सर्व मुली फार उच्च शिक्षीत किंवा महत्वकांक्षी अशा नव्हत्या. साधारण शिक्षण आणि मग छोटे मोठे कोर्सेस करून नोकरीला लागलेल्या. करियर पाथ फार काही जोमदार नाही. नवरा मात्र छान शिकलेला स्थिर नोकरीत, योग्य सांपत्तिक स्थती असलेला असा मिळाला की त्या समाधानी असत. पुन्हा मूल झाल्यावर त्याला डेकेअर मधे पाठवणे म्हणजे सगळा आपला पगार डे केअर ला देण्यासारखंच होतं. या देशात बाकी सर्व गोष्टींप्रमाणेच ही सुविधा पण खूप महाग. मग आपणच घरी राहून फुल टाइम गृहिणी का न बना? हा विचार. यामधे जपानच्या पारंपरिक जुन्या पुरुषप्रधान संस्कृतीचाही मोठा पगडा आहेच. या देशात नोकरी करणार्या स्त्रियांचं प्रमाण जरी खूप असलं तरी वरच्या जागांवर, सीनियर लेवल वर स्त्रियांचं प्रमाण कमी दिसतं. उघडपणे कबूल नाही करणार कदाचित पण स्त्रीची पारंपरिक चूल आणि मूल ही प्रतिमा इथे आदर्श मानली जाते. आता नवीन पिढीत मात्र हे प्रमाण खूप कमी होत आहे, सुदैवाने.

या आमच्या सोसायटीमधे दर महिन्यात एक सामूहिक साफसफाई (सोजी)चा दिवस असायचा. त्या दिवशी सकाळी आम्ही सर्व बायका आपापला झाडू, पुसपास करायला स्वच्छ फडकी घेऊन बिल्डिंग च्या खाली उतरायचो. पुढचे दोन एक तास पार्किंग लॉट, सोसायटीचे रस्ते, बगिचा सर्व गोष्टींची साफसफाई व्हायची. तसं तर सोसायटीच्या साफसफाई साठी सफाई कर्मचारी यायचेच. कॉलनीची स्वच्छता ही काही आमच्या महिन्यात एकदा होणार्या सोजी वर अवलंबुन होती असे अर्थातच नाही पण तरीही ही प्रथा लोकं अगदी मनापासून पाळायचे.

जपानमधे अशा सामूहिक उपक्रमांचे फार महत्व असते. या सर्व लोकांमधे माझा देश, माझं शहर किंवा माझी सोसायटी या विषयी एक सशक्त सामजिक बंधिलकीची भावना असते. हे लोकं स्वत:च्या भावना तीव्र पणे व्यक्त करत नाही पण लहानपणापासून ही सामजिक जबाबदारी यांच्या मनावर अशी काही बिंबवली जाते की श्वास घेण्याच्या सहजतेने ही लोकं या अशा सामूहिक उपक्रमांमधला आपापला वाटा उचलतात. माझ्या मिस्टरांच्या ऑफिस मधे सुद्धा महिन्यातुन एकदा ऑफीस समोरच्या बागेची अशीच सफाई मोहिम असायची. कंपनी सी ई ओ पासून शॉप फ्लोर वरच्या कर्मचार्यापर्यंत प्रत्येक जण यात सामील व्हायचा.

स्वच्छता, वक्तशीरपणा, सचोटी या बाबतीत जबाबदारीचे तीव्र भान असणारे हे लोक काही बाबतीत अतिशय उदासीन असतात. मला खूप खटकणारी यांची गोष्ट म्हणजे अतिरेकी धूम्रपान. ट्रेन स्टेशन्स, दुकानं, रेस्टोरेंट्स, ऑफीस सगळीकडे अगदी बिनदिक्कत या लोकांचे धूम्रपान चालू असते. आपल्याबरोबर आपण दुसर्यांच्याही तब्बेतिला धोक्यात टाकतोय किंवा साधे बेसिक मॅनर्स सुद्धा या वेळी ही लोक गुंडाळून ठेवतात.
मद्यपान करून गाडी न चालविण्याच्या बाबतीत मात्र हे लोक अगदी काटेकोर असतात. रात्री कुठे बाहेर डिनर/ /ड्रिंक्स ला जायचे असेल तर ही लोक सरळ ट्रेन किंवा बस ने जाणार आणि येतांना त्यांच्या बायका गाडी घेऊन त्यांना पिकअप करायला येणार, अगदी शिस्तीत.
म्हणजे दारू प्यायची किंवा नाही हा ज्याचा त्याचा वैयत्तिक प्रश्न आहे पण प्यायल्यावर रस्त्यावर गाडी चालविणे हा मग मात्र वैयत्तिक प्रश्न राहात नाही मग तो सामाजिक गुन्हा ठरतो. तिथे झीरो टॉलरन्स! धूम्रपानाच्या बाबतीत मात्र हा काटेकोरपणा कुठे जातो काय माहीत.

असो. एकूण या देशात माझे मस्तं मजेत दिवस चालले होते. नवीन गोष्टी, नवीन ठिकाणं पहात होते. चुकत होते, धडपडत होते तरीही नित्य नवीन शिकत होते.
अशातच आमच्या बदलीचे वारे सुरू झाले आणि एक दिवस संध्याकाळी हे त्यांच्या बॉस कडून बदलीचा आदेश घेऊन घरी आले. आमच्या कंपनीच्याच अमेरिकेतील ब्रांच मधे आमची बदली झाली होती.
हा देश सोडायची हूरहुर तर होती पण अमेरिकेला जाण्याची उत्सुकताही तेव्हडीच होती. नवीन देश, नवीन मित्र , नवीन संस्कृती अनुभवायला मिळणार याची गंमत वाटत होती.
पॅकिंग करायला मूविंग कंपनीचे लोक आले त्यांनी आमचं अगदी इतकेसे समान दोन तीन तासात पटापट बांधून ट्रक वर चढविले. लहान घर असल्याचा एक मोठा फायदा आमच्या लक्षात येत होता. ठेवायचं कुठे म्हणून आम्ही कमीत कमी गोष्टींचा संचय केला होता. त्या अत्यंत कमी असलेल्या सामानामुळे आमचं झट पॅकिंग, पट मूविंग झालं होतं.

बदलीची ऑर्डर हातात पडल्यापासून बरोब्बर दहाव्या दिवशी आम्ही नारिता विमानतळावरून डेट्रॉइट ला जाणार्या विमानात बसलो....'पूर्वरंग' मनात साठवून घेत आम्ही आता 'अपूर्वाई' च्या दिशेने निघालो होतो.

क्रमश:

भाग 2 इथे वाचा

समाज

प्रतिक्रिया

मधुरा देशपांडे's picture

9 Oct 2015 - 6:57 pm | मधुरा देशपांडे

खूप छान लिहिलंय पद्मावतीसान. आवडलं.
जपानमध्ये २ महिने होते त्यामुळे अनेक आठवणींना उजाळा मिळाला. बर्‍याचशा गोष्टी, अति नम्रपणा, धुम्रपान, बागकाम, सफाई अनेक बाबतीत सहमत. खास करुन लहान, खरंतर मायक्रो किचन मधला स्वयंपाक आणि तसंच लहानसं घर हे वाचताना तर ती सगळी धमाल आणि त्याच वेळी होणारी चिडचिड सगळे काही आठवले. आता हसु येतंय.
लेखासाठी आरिगातो!! पुभाप्र.

मधुरा देशपांडे's picture

10 Oct 2015 - 3:53 am | मधुरा देशपांडे

अति नम्रपणाचा अनुभव जागोजागी येतो. ट्रेन मधले डायव्हर हा माझ्यासाठी वेगळाच अनुभव होता. अगदी रोबोट सारखे काम, चोख अर्थातच. पांढरे हातमोजे आणि काळा कोट असायचा, त्यांचे प्रत्येक स्टेशनला गाडी थांबवताना आणी तिथुन निघतानाचे जे काही नियम असायचे, त्याप्रमाणे डावीकडे बघा, उजवीकडे बघा यावर विशिष्ट हातवारे करायचे जे पहिल्यांदा बघणार्‍याला खूप विनोदी वाटायचे. पण त्यांच्या कामात त्याने काही फरक पडायचा नाही.
दुकानात खरेदी करताना तर प्रचंड आग्रह, शक्य तेवढे इंग्लिश मधुन बोलुन, म्हणजे खरे तर एकच शब्द..प्रेझेंत्त. :)
स्वयंपाकघर म्हणजे तर कहर होता. दोन इंडक्शन प्लेट्स आणि त्याच्या वर एक कपाट. बास. "इन किचन' असे नाही, 'अ‍ॅट किचन' असे मी गमतीने म्हणायचे तेव्हा. त्याच्या बाजुला एक भिंत आणि भिंतीपलीकडे वॉशिंग मशिन होतं. त्यावर मी पोळ्या लाटायचे आणि इकडे भाजायचे. असेच फोडण्या देताना. भाज्या चिरताना पण. आणि बेड म्हणजे एक मोठ्ठं कपाट. फोटो शोधायला हवेत त्याचे. ३ पायर्‍या चढुन बेडवर जायचे. खाली बरंच सामान जाईल अशी जागा. पण तरीही त्या घरात सोयी सगळ्या होत्या, अगदी पुरेपुर उपयोग होता जागेचा.
माझ्या ऑफिसातही आम्ही १०-१२ भारतीय आणी १०-१२ जपानी. तिथेही मी एकटीच मुलगी होते आणि तिथली एक रिसेप्शनिस्ट यायची तीही फक्त २ तास. बाकी तसे बहुतांशी पुरुषच दिसले कामाच्या ठिकाणी. भाषेचा प्रॉब्लेम तर यायचाच, अगदी लहान गावात ऑफिस असल्याने जास्त वाटायचे ते.
कलाकुसरीत पण हे लोक अफाट आहेत, दुकानात, हॉटेलात कुटेही एवढ्या सुबक सुंदर वस्तु, त्यांचे रचना, सजावट फारच सुंदर.
फक्त सगळ्यात नावडलेली बाब म्हणजे जपानी लोकांचा वर्कोहोलिक पणा. वेड्यासारखे काम करतात आणि करायलाही लावतात. ऑफिसात झोपायचे ते लोक खुर्चीवर रात्रभर गरज पडल्यास. शनि रवि फक्त काम. सकाळी ८ ते रात्री ८-९ आणि विकेंडलाही काम हे रुटीन कधी एकदा संपतेय असे झाले होते. त्यातही सकाळी त्याआधी उठुन डबे आणि रोजचा प्रवास. पण ते ऑफिसचे लोकेशन, तिथे जवळपास पब्लिक ट्रान्सपोर्ट नसणे वगैरे इतर बाबींमुळेही जास्त त्रासदायक वाटायचे. ३ तासांवर असुनही मी अजुन फॅमिलिला भेटलो नाही असे जेव्हा एक जण म्हणाला तेव्हा मी बघतच बसले होते. आणि असेच बरेच होते की जे फक्तच काम आणि काम करतात. हेही एक कारण आहे तेथील बायका शक्यतो गृहिणी म्हणुन प्रीफर करतात असे ऐकले होते, कारण घराकडे मुलांकडे लक्ष द्यायला वेळ तर हवाच, स्वाभाविक आहे. पण तिथेही बरेच फरक असतील, इतक्या कमी वास्तव्यात मी फार काही सरसकटीकरण करणार नाही.
तेव्हा बर्‍याच गोष्टींचा त्रास वाटायचा, या सगळ्याला कंटाळुन मी कधीही जपानला परत येणार नाही असा पणच केला होता. आता मात्र त्यातुन शिकलेले धडे दिसतात आणि त्या आठवणी छान वाटतात.
आज या सुंदर लेखाने नोस्टॅलजिक होउन लिहायला भाग पाडले. जरा जास्तच लांबलाय प्रतिसाद. :P
पुढचे भाग येऊ देत लवकर.

होय वर्कोहोलिझम बद्दल ऐकून आहे. तसेच दीर्घायुष्य व वृद्ध स्त्रियांची देखील काम करत रहाण्याची वृत्ती याबद्दल ऐकून आहे. हर्बल चहा खूप पितात म्हणे. एक मोठ्ठा फ्लास्क भरुन .. दिवसभर त्या फ्लास्कमधील चहा सिप करत रहातात. त्यामुळे व कामात व कामात व्यग्र असल्याने की काय दीर्घायुषी असतात की काय कोण जाणे.
.
लेख खूप माहीतीपूर्ण तसेच रोचक झाला आहे.

मांत्रिक's picture

9 Oct 2015 - 6:58 pm | मांत्रिक

सुंदर लिहिलयंत!!! अगदी अप्रतिम!!! पण थोडा अजून सांस्कृतिक जीवनावर प्रकाश टाकायला पाहिजे होता. बाकी उत्तम!!!

बाबा योगिराज's picture

9 Oct 2015 - 7:08 pm | बाबा योगिराज

थोड़स काही तरी कमी पडल्या सारख वाटतंय.
परंतु लेखनशैली खासच आहे.
पुढील भाग फोटो सगट येऊ द्या.
शुभेच्छा.

स्रुजा's picture

9 Oct 2015 - 7:10 pm | स्रुजा

क्या बात ! तुमची लेखन शैली फार आवडते. थोडं अजुन वाढवा ना कंटेंट.

रेवती's picture

9 Oct 2015 - 7:10 pm | रेवती

वाह! मस्त लिहितियेस. सार्वजनिक साफसफाईचाही दिवस असतो हे वाचून छान वाटले.

मित्रहो's picture

9 Oct 2015 - 7:14 pm | मित्रहो

मस्त लेख छान ओळख करुन दिली जपानी लोकांची
जपानी लोक फार नम्र असतात. मला वाटते टोकीयोसारख्या शहरात स्त्रीयांनी नोकरी करणे ही गरज आहे. सतत होणाऱ्या भूकंपामुळे घरे छोटी असतात.

द-बाहुबली's picture

9 Oct 2015 - 7:19 pm | द-बाहुबली

मोषी मोषी पद्मावती सान... लेख आवडला.

स्वाती दिनेश's picture

9 Oct 2015 - 7:21 pm | स्वाती दिनेश

लेख छान!
जपानमधल्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या..
स्वाती

इडली डोसा's picture

9 Oct 2015 - 7:32 pm | इडली डोसा

वाखु साठवली आहे.

नि३सोलपुरकर's picture

9 Oct 2015 - 8:00 pm | नि३सोलपुरकर

'' पमीचान, यु आर अ बेरी गुड रायटर ",
मस्त लेख आणी छान ओळख करुन दिली जपानी लोकांची.

पु ले शु.

जपानची धावती ओळख आवडली. आशेच ल्हीत र्‍हा.

बाकी ते 'चान' वाचून मिपावरचं 'चान चान' आठवलं एकदम. =))

सानिकास्वप्निल's picture

9 Oct 2015 - 8:38 pm | सानिकास्वप्निल

छान लिहिले आहेस गं, तुझे लेखनशैली खासचं आहे.
लेख खूप आवडला.
पुभाप्र

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Oct 2015 - 8:50 pm | बिपिन कार्यकर्ते

चान चान हो पमीचान! पटकन लिहा बरं! खूपच छान फ्लो आहे तुमच्या लेखनाला.

बाप्पू's picture

9 Oct 2015 - 9:10 pm | बाप्पू

खूप छान. लेखन आवडले.
जपान मधील शिस्त, वक्तशीरपणा, लोकांचे देशप्रेम, त्यांचा नम्र स्वभाव, आपुलकी, आणि मुख्य म्हणजे कोणत्याही संकटाने खचून न जाणे , या सर्व गोष्टींमुळे जपान बद्दल नेहमीच आदर वाटतो.
काही दिवसांपूर्वी जपान मधील रेल्वे सेवेबद्दल टीवी वर एक मालिका पहिली. तेथे असणारी रेल्वे सेवा खरच खूप आधुनिक आहे. रेल्वे अपघात क्वचितच होतात तिथे.
तिथे कोठेतरी एक छोटासा अपघात झाला होता. जेव्हा रेल्वे ड्रायवर ची चौकशी केली तेव्हा असे समोर आले कि तो तणावाखाली रेल्वे चालवीत होता. आणि तणावाचे कारण होते कि रेल्वे निर्धारित वेळेपेक्षा काही सेकंद उशिरा धावत होती. आश्चर्य वाटले. कि खरच इतके वक्तशीर असतात का तिथले लोक ?

सूड's picture

9 Oct 2015 - 9:10 pm | सूड

आवडलं, पुभाप्र!!

विशाखा पाटील's picture

9 Oct 2015 - 10:04 pm | विशाखा पाटील

आवडले. जपानवर अजून लिहा.

एस's picture

9 Oct 2015 - 10:24 pm | एस

वा! मस्त लिहिलंय!

पुभा आवर्जून टा.

पैसा's picture

9 Oct 2015 - 10:39 pm | पैसा

मस्त लिहिलंय! लिही लौकर लौकर!

जातवेद's picture

9 Oct 2015 - 10:58 pm | जातवेद

जपानी गृहिणींचं छान वर्णन केले आहे आणि त्यांना कार्यालयात हलक्या दर्जाचीच कामे असतात हे खरच आहे. बाकी जपान मधली पुरूष मंडळी आणि तिथले वर्क कल्चर यावर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. हे अबोल लोक, कुठे रात्री दोन ग्लास चढवले की चांगलाच दंगा घालायला सुरू करतात. एरवी घरी आणि कामाच्या ठिकाणी मात्र फार दबून असतात.

तुमच्या घराचे वर्णन वाचून जपानमधे राहणे म्हणजे कोण त्रास असे काहिंना वाटू शकते. पण इतरांसाठी सांगायचं तर, बहुतेक भारतीय तिथे जपान सरकारच्या "यु. आर." अपर्ट्मेंट मधे राहतात जिथे आपल्या १BHK, २BHK सारखीच घरं असतात आणि अगदी आरामात राहता येते. घरासाठी लागणारे सर्व सामानसुधा इतर भारतीयांच्या कडून लगेचच आणि स्वस्त किमतीत उपलब्ध होत असते.

पुलेशु

इडली डोसा's picture

9 Oct 2015 - 11:22 pm | इडली डोसा

चांगल लिहिलये. सध्या तोत्तोचानचं पुनर्वाचन करत असल्यामुळे जिथे जिथे जपानचा उल्लेख येईल ते सगळ वाचायला आवडतये.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Oct 2015 - 2:01 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लिहीले आहे ! जरा जास्त विस्ताराने लिहीलेत तर अजून मजा येईल.

रातराणी's picture

10 Oct 2015 - 2:31 am | रातराणी

मस्त! आवडलं ! पु भा प्र. :)

श्रीरंग_जोशी's picture

10 Oct 2015 - 6:48 am | श्रीरंग_जोशी

जपानी लोकजीवनाबाबत इथक्या सहजशैलीने केलेले अनुभवकथन वाचून खूप छान वाटले.

माझ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय विमानप्रवासात अमेरिकेला जाताना नारिता विमानतळावर थांबा होता. तिथे विमानात बोर्डिंग करताना बुटांच्या रॅन्डम तपासणीत मलाच अडवले गेले. एक मध्यमवर्गीय व एक महाविद्यालयीन वाटेल एवढी तरुण स्त्री ते काम करत होत्या. माझे बुट तपासायचे आहेत हे त्यांनी इतके विनम्रपणे व हसतमुखतेने सांगितले की कदाचित बुट काढल्यावर येणारा मोजांचा वास त्यांच्या नाकात जाईल तेव्हा नकळतपणे आपण त्यांना त्रासच देतोय अशी माझी भावना झाली. मी त्यांना म्हंटले पण दे मे स्मेल बॅड. त्यावर तेवढ्याच हसतमुखतेने नो वरीज असे काहीसे उत्तर मिळाले :-) .

नंतर पुढच्या विमानप्रवासात माझ्या शेजारी अमेरिकेत शिकणारे तरुण व तरुणी बसले होते. तर जपानी हवाईसुंदर्‍या त्यांना इतक्या प्रेमाने खाण्यापिण्याचा आग्रह करत होत्या की जणू नातेवाईकच आहेत ;-) .

मुक्त विहारि's picture

10 Oct 2015 - 7:36 am | मुक्त विहारि

जपानी माणसांबद्दल आणि तिथल्या अनुभवांबद्दल अजून लिहायला हवे होते.

पुभाप्र.

चुकलामाकला's picture

10 Oct 2015 - 7:46 am | चुकलामाकला

आवडले.

छान लिहिले आहेस पद्मावती.अजून वाचायला आवडेल.सार्वजनिक स्वच्छता दिवस वगैरे वाचून रडू येते! तेवढे टाळत जा लिहायचे;)
@मधुरासान ,जपानवर लिहायचं बघा नक्की!

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Oct 2015 - 8:13 am | कैलासवासी सोन्याबापु

फारच अप्रतिम आहे हे सगळे! विलक्षण चित्रदर्शी ! जापानी लोकांबद्दल खुप काही ऐकून होतो आता समक्ष अनुभव वाचणे झाले मस्त वाटले.

प्रचेतस's picture

10 Oct 2015 - 9:12 am | प्रचेतस

लेखन आवडलंच.
पुभाप्र.

बोका-ए-आझम's picture

10 Oct 2015 - 9:19 am | बोका-ए-आझम

सगळ्यांचाच अंगठा हिरवा >>> हे खासच!
पुभाप्र!

मित्रहो's picture

10 Oct 2015 - 10:16 am | मित्रहो

मी २००२ नंतर जपानला गेलो नाही. काही मजेशीर आठवणी अजूनही लक्षात आहेत.
असाही आणि किरीन इकीबान बीयर. टोकियोमधे चौकाचौकत व्हेंडींग मशीन होत्या ज्यात या बीयर मिळायच्या. रात्री, अपरात्रीही बीयरची सोय होती. असाहीची तर बिल्डींगसुद्धा बीयरच्या बॉटलच्या आकाराची होती. साके ही राइस वाइन मात्र मला फारसी आवडली नाही त्यापेक्षा शोचू वाइन आवडायची. शोचू आणि उरुंचा (हा जपानी चहा होता)
जेआर यामानोते लाइनच्या गाड्यांना रोज असनारी प्रचंड गर्दी. मी दोन दिवस प्रयत्न केले आणि नंतर सोडून दिले. दोनच स्टेशन जावे लागायचे तेंव्हा पायीच जायचो. शिंजूकू स्टेशनला असनारी गर्दी. सीएसटी सारखी गर्दी कधीही जा.
हॉटेलमधे प्रवेश करताना आणि हॉटेल सोडताना सारे कर्मचारी ओरडतात मला वाटते स्वागत (सिरा साइ मासेन) धन्यवाद(अरीगातो गोझायमास्ता). जाणकारांनी जापानीझ शब्द दुरुस्त करावे. पहील्यांदी तर मी घाबरलोच होतो हे असे का ओरडतात. माझा काही चुकले का.
वर म्हटल्याप्रमाणे ऑफीसमधे असलेली हायराकी. बॉसच्या अगोदर यायचे आणि बॉस गेल्यावर ऑफिस सोडायचे. वरच्यानी सांगितल्याशिवाय काही फारसे करायचे नाही. माझ्या पीसीवर जापनीझ व्हिजव्हल स्टुडीओ होता. आमचे त्या भाषेचे ज्ञान अति दिव्य. मी तिथल्या आयटीवाल्याला इंग्रजी व्हिजव्हल स्टुडीओ द्या सांगितले. त्यानंतर त्यांची आपसात चर्चा सुरु झाली. माझा मित्र मला गंमतीने म्हणाला अच्छा खासा आराम कर रहे थे तुने उनको कामपे लगा दिया. त्यांचा बॉस सिगरेटसाठी बाहेर आला तेंव्हा दोन सेकंदात प्रश्न मिटला. नंतरही का कुणास ठाऊक सारे इंग्रजी असले तरी को़ड कंपाइल किंवा रन केल्यानंतर ज्या चुका यायच्या त्या जापानीझ मधे. मग तो चुक नंबर गुगलमधे टाकायचा त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि कोड बदलायचा. हळूहळू मला नंबर पाठ झाले.
खूप चांगली माणसे भेटली आणि त्यांच्याकडून बरेच काही शिकयला मिळाले.

हेमंत लाटकर's picture

10 Oct 2015 - 11:33 am | हेमंत लाटकर

पद्मावती सान, जपान विषयी छान माहिती सांगितली. थोडी विस्ताराने सांगितली असती तर मजा आली असती.

जगप्रवासी's picture

10 Oct 2015 - 12:26 pm | जगप्रवासी

'पूर्वरंग' मनात साठवून घेत आम्ही आता 'अपूर्वाई' च्या दिशेने निघालो होतो>>>>>>>

हे छान…. दोन्ही आवडत्या पुस्तकांची नाव गुंफलात

अप्रतिम लेख,जपानी लोकांच्या
विषयी आणखीन एक नवीन सदर लिहिल्यास , योग्य ठरेल.

जव्हेरगंज's picture

10 Oct 2015 - 9:00 pm | जव्हेरगंज

मस्त! फ्रेश लिखाण!!

तर्राट जोकर's picture

10 Oct 2015 - 10:49 pm | तर्राट जोकर

लय भारि--- जपानदर्शन आवडले

पिशी अबोली's picture

10 Oct 2015 - 11:26 pm | पिशी अबोली

छानच वर्णन. लिहायची शैली फार आवडली.भाग १ आहे म्हणजे पुढच्यांची वाट बघेन..

विवेकपटाईत's picture

11 Oct 2015 - 6:49 pm | विवेकपटाईत

लेख आवडला. जपानी लोकांबाबत आणि संस्कृती बाबत माहिती मिळाली.

नूतन सावंत's picture

11 Oct 2015 - 7:10 pm | नूतन सावंत

पद्मावति,छान जपान सफर घडवलीस.

प्रीत-मोहर's picture

12 Oct 2015 - 6:52 am | प्रीत-मोहर

सुरेख पमाचान पुभाप्र

जुइ's picture

15 Oct 2015 - 12:58 am | जुइ

चांगले लिहिले आहेस. सार्वजनिक स्वच्छतेचा दिवस असतो हे ऐकून खास वाटले.

सौन्दर्य's picture

15 Oct 2015 - 8:01 am | सौन्दर्य

खूप छान लिहिले आहे, तरी "ये दिल मांगे और" अशी स्थिती झाली आहे. आता पुढच्या लेखात अमेरिकेवर लिहिणार वाटतं. अजून थोडे जपान विषयी यावे असे वाटते.