साहित्यः
* ३ अंडी
* २ मध्यम कांदे बारिक चिरुन
* १ मध्यम टोमॅटो चिरुन
* २-३ हिरव्या मिरच्या बारिक चिरुन
* आवडी प्रमाणे कोथिंबीर बारिक चिरुन
* २ चमचे गरम मसाला
* १ चमचा तिखट
झटपट कृती:
१. कढई अथवा न-चिकट भांडयात तेल गरम करुन कांदा परता
२. कांद थोडा परतला गेला कि हिरवी मिरची घालुन किंचित परतुन घ्या
३. कोथिंबीर घालुन परतुन घ्या
४. गरम मसाला आणि तिखट घालुन परतुन घ्या
५. ह्या मिश्रणामधेच अंडी फोडा
६. मिश्रण हलक्या हाताने पसरवा आणि चिरलेला टोमॅटो घाला
७. आता कमी/अधिक प्रमाणात हे मिश्रण हलवुन थोडा वेळ परतु द्या.
सादरीकरणः
वरुन कोथिंबीर पेरुन भाजलेल्या पावासोबत खायला द्या. अर्थात कांदा आणि टोमॅटो हवाच!!!
----------
अंडा बुर्जी बनविणे हि कृति नसुन कला आहे. ज्या मिपाकरांनी रस्त्याच्या कडेला गाडिवर बुर्जी खाल्ली आहे त्यांना हे नक्कीच पटेल.
बारिक चिरलेल्या कांद्याचे ताट, अंड्याचे ट्रे, गॅसबत्ती, पावाच्या लाद्या अतिशय कमी जागेत कलाकुसरिने रचुन ठेवलेल्या असतात. गाडिच्या आतल्या बाजुला मसाल्याचा ड्ब्बा, कोथिंबीर, टोमॅटोची ताटं आणि अविरत भडभड्णारा स्टोव्ह. गाडिच्या भोवती खवय्ये, बायको माहेरि गेलेले नवरे, रिक्षावाले, मजुर, लहाने-मोठे आणि मुख्य म्हणजे मादक पेयांचे पेले रिचवलेले किंवा पेले रिचवायच्या तयारीत असणारे, अश्या अनेकांची भाऊगर्दि असते. ह्या गर्दिला आणि तिच्या दर्दी भुकेला सामोरे जायला गाडिच्या पलिकडे भक्कमपणे उभे असतात - बल्लवाचार्य.
समोरुन ऑर्डरींच्या नुसत्या फैरी झडत असतात - "एक सिंगल द्या...दोन डबल द्या...एक पावजोडी आणा...एक सिंगल आम्लेट...थोडा कांदा द्या...हे पैसे घ्या...मालक ग्लास कुठे आहेत...". बल्लवाचार्यहि न डगमगता दोनच हातांनी दहा हाताची कामे करत असतात (एका तोंडाने दहा तोंडाच्या शिव्या देणे पण चालु असते कामावरच्या पोर्यावर...पण मनातुन नाहि...तर त्यामुळे वातावरणाला वेगळीच शोभा येते म्हणुन)... बुर्जीसाठी कढई ठेव, कांदा टाका, भसाभस मसाले टाका (मोजमाप वैगेरे काहि नाहि पण प्रमाण चुकल्याच आठवत नाहि)...अंडी फोडा....हातातल्या उलथण्याने कढईतल्या मिश्रणावर सपासप वार चालु असतात -- ठॅक ठॅक ठ्क ठ्क ठुम ठॅम आणि मग उलथण्याला लागलेले मिश्रण काढायला एक मोठा ठणाण ठणण...कि परत चालु...समोर ताटल्या मांड्ल्या जातात...बिना चुकता सगळ्या ताटल्यांमधे रपारप माल भरला जातो...लगेच समोरच्या स्टोव्हवर कढई जाउन तवा येतो....बुर्जी गार व्हायच्या आत सटासट पाव भाजले जातात...ताटल्यांमधे वाढले जातात...पोरगं गिर्हाईकांना बरोबर ताटल्या पोचतं करत...
...तवा मस्त तापत ठेवुन बल्लवाचार्य आम्लेटच्या ऑर्डरकडे वळतात...एका पेल्यात एक-दोन अंडी फोडुन त्यात लगोलग कांदा,मिरची,कोथिंबीर,तिखट्,मसाले घालुन मालक ते मिश्रण अश्या काहि बळाने घुसळतात कि देवा-असुरांना समुद्रमंथनाच्या प्रसंगाची याद यावी....मग गर्रकन ते मिश्रण तव्यावर येतं ...चुर्र्र असा एक मधुर आवाज होतो आणि आम्लेट्चा एक खरपुस वास आसपास पसरतो...झर्रकन ते आम्लेट मागे खोपटात चाललेल्या "खास प्रोग्रामाच्या" ठिकाणी गायब होतं....
...परत तवा जाउन कढई येते...परत तवा...कढई....आणि तेच चक्र झपाट्यानं चालु राहतं....मधे अधे भांडण सांडण वाद विवाद चालुच असतात...हा सोहळा मध्यरात्री पर्यंत साग्रसंगीत चालु असतो...मग एकदाचा लालदिवा येतो...काठ्यांची शिट्ट्यांची (कर्कश्श) आदळापट होते...एकदोन पार्सलं गाडिकडे जातात...मालक उरलेल्या गिर्हाईकांना आवरतो...सामानाची आवराआवर होते...झाडझुड होते...गाडी रोजच्या ठिकाणी लावुन...शिणल-भागलेलं शरीर आणि मन घेउन घराची वाट चालु लागतात....
काय मंडळी येणार का मग आमच्या गाडिवर?
(गाडी गाडी ची बुर्जी खाल्लेला) बुर्जीर्ग पांथस्थ....
प्रतिक्रिया
17 Dec 2008 - 1:00 am | टारझन
अंडा बुर्जी जशी हातगाडीवर मिळते तशी आजतागायत कोणत्याही हॉटेलात खायला मिळाल्याचा अनुभव माझ्याकडे तरी नाही... जाताना हायजीनचा विचार मात्र करू नये.... आपल्याला तर बॉ आश्चर्य वाटतं त्या हातगाडीवाल्यांचं
पांतस्थांनी जबरा लिवलंय .. डायरेक्ट अनुभवलेलं ... पांतस्थ... पाकृ बरोबर असेच किस्से पण लिवत जावा बॉ ..
अंमळ मजा आली ... जाऊन देत लै अवांतर झालं .. जास लिवलं तर संपादक बाबा कात्री लावायचे आणि एखादी खरड पडायची ;)
- (अंड्याची सर्व अपरूपे चापून खाणारा) टारझ्या
17 Dec 2008 - 11:31 am | पांथस्थ
एकदम बरोबर टारोबा. तेलच जास्त आहे, तिखट्जाळ आहे, गाडी स्वच्छ नाहि, ताट्ल्या धुत नाहिये....ह्या मंडळींनी घरिच बुर्जी खावी
माझा अनुभव असा आहे कि गाडी जेवढी कळकट्ट, कसेतरी कांदे/टोमॅटो वापरलेले तेवढि बुर्जी चवदार!
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
17 Dec 2008 - 1:02 am | लवंगी
परत भूक लागली मला..
17 Dec 2008 - 1:02 am | नंदन
पाकृ आणि त्यानंतरचे वर्णन आवडले. बुर्जीर्गही विशेष. गोवा गाड्या रत्नागिरीजवळ लांज्याला हटकून थांबत. तिथे एका गाडीवर मिळणार्या आम्लेट-पावाची आणि बुर्जीची चव तुमच्या लेखाने पुन्हा आठवली :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
17 Dec 2008 - 1:35 am | विसोबा खेचर
फोटू पाहून संपलो...!
पांथस्था, वर्णनही अगदी करेक्ट केलं आहेस रे. तुझी निरिक्षणाला दाद देतो.. मुंबईत रात्री कुठल्याही भूर्जीपावाच्या गाडीभोवती अगदी अशीच परिस्थिती असते..!
झमझम बारची नौकरी संपवून घरी परतताना बर्याचदा ठाणे ठेसनाच्या बाहेर रात्री एक दीडच्या सुमारास मी अगदी मनसोक्त भूर्जीपाव चापायचो त्याची आठवण झाली! :)
तात्या.
17 Dec 2008 - 1:49 am | सुक्या
अशी गाडीची बुर्जी (आम्ही भुर्जी म्हनायचो) खायची चटक मला कालेजात शिकत असताना लागली ती आज्पर्यंत कायम आहे. आजकाल २ दिवसाआड तरी मला भुर्जी लागते. कालेजात आम्ही बास्केट्बॉलचा सराव करत असताना खेळुन झाल्यावर सर्वजन आमलेट / भुर्जी शोट खेळायचो. ग्राउंड च्या मध्यावरुन प्रत्येकजन ५ बास्केट करायचा प्रयत्न करी. ज्याच्या सर्वात कमी बास्केट होत किंवा ज्याचा फेकलेला बॉल बास्केट च्या जाळीला टच करत नसे तो सर्वांना आमलेट / भुर्जी खाउ घाली.
आज ही प्रतीक्रिया लिहीताना त्या मंतरलेल्या दिवसांची अठवण झाली. धन्यवाद पांथस्था.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
17 Dec 2008 - 1:56 am | चतुरंग
लाजवाब कृती आणि जीवघेणे फोटू!! आणि कातिल वर्णन! एकदम सह्ही!!
(तू असतोस कुठे? भारतात की अमेरिकेत की अन्य कोठे? भारत किंवा अमेरिकेत असलास तर तुझ्याकडे एकदा सविस्तर आलं पाहिजे! :B )
अरे कालेजात असताना रात्री मेसच्या भुक्कड वातड चपात्या तोडण्यापेक्षा आम्ही हॉस्टेलकरी मंडळी रात्री ९-९.३० ला टोळक्याने गाडीभोवती जमत असू. आमची वाटच बघत बसलेला असायचा जसा काही तो. गाडीशेजारीच लाकडी बाकडी टाकलेली. प्रत्येकी एक डबल अंडाबुर्जी + २ पाव हे मिनिमम ठरलेलंच त्यामुळे तयारच करायला घ्यायचा. फटाफट वाफाळती बुर्जी आणि खरपूस भाजलेले पाव समोर आले की कधी ताटली रिकामी व्हायची समजायचे नाही! मग लागेल तशी पुढची ऑर्डर (लेडीज हॉस्टेलवरुन कोणी दर्शनीय 'सामान' गाडीवर आलेलं असेल तर आणखी एक डबल बुर्जी फस्त! ;)). वरुन एकेक कप पेश्शल चा मारला की तबियत एकदम खुष! सुट्टा मारणारे लगेच त्यांच्या चैतन्यकांड्या शिलगवायचे आणि रमतगमत आम्ही हॉस्टेलला परतायचो.
चतुरंग
17 Dec 2008 - 10:24 am | भडकमकर मास्तर
पांथस्थाचा उत्तम लेख...फोटो मस्त आणि पुढचे चित्रदर्शी वगैरे वर्णन त्याहून मस्त.....
... मीही हॉस्टेलवरच पहिल्यांदा भुर्जी खायला शिकलो...नंतर बर्याचदा नाटकाच्या प्रॅक्टिसनंतर रात्री दीड दोनला बुर्जी की भुर्जी कार्यक्रम...
_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
17 Dec 2008 - 11:46 am | पांथस्थ
क्या बात है. साला तुम्हि पण आमच्या कालीज चे (काळिज खल्लास व्हायचे म्हणुन कालीज - कॉलेज नव्हे) दिवसांची आठ्वण करुन दिलीत बघा. सामान हा शब्द शाळेत असतांना फक्त वापरायला मिळाला बाळगायला कधिच नाहि :(
इथे बेंगळुर मधे बुर्जी पण न्हाय आणि पेश्शल तर अजिबात न्हाय. मी बेंगळुरुमधे ऑक्ट २००४ मधे आलो. आल्या आल्या एक अंडागाडी वाल्याकडे गेलो. तर तिथे बुर्जीच न्हाय. फक्त आम्लेट आणि अंडा राईस. म्हटलं काहि नाहि तर आम्लेट दे बाबा. तर गड्याने एका पानावर आम्लेट दिले पावच नाहि. म्हणे आमच्या इथे असेच खातात. त्या दिवशीच मला जाणिव झाली की मित्रा - 'तु गलत जगह फस गया है'. करता काय.
असो, आमची घरगुती गाडी बेंगळुरात पुट्टेनहळ्ली भागात लागते. सर्व मिपाकरांचे स्वागत आहे.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
17 Dec 2008 - 2:10 am | मीनल
वाचा और जाना!
मी शाकाहारी.म्हणजे अंडी शाकाहारी नाही असे मानणारी .
त्यामुळे मला पाकृ पेक्षा नंतरचेच वर्णन आवडले.
समोर देखावा उभा राहिले.
म्हणजे `दे ` म्हणणारा आणि `खावा ` म्हणणारा सुध्दा.
क्लास!
मीनल.
17 Dec 2008 - 3:45 am | संदीप चित्रे
लै मस्त फोटू आणि रेसिपी....
अमेरिकेचा विजा पहिल्यांदा मिळाला तेव्हा दुपारी ष्टाईलमधे मी आणि बायको ऑबेरॉय टॉवर्समधे जेवायला गेलो होतो -- सेलिब्रेशन म्हणून !
उगाच काहीतरी खाल्यासारखं वाटलं च्यायला !!
रात्री पुण्यात आल्यावर स्टेशनसमोरच मस्त अंडा-बुर्जी, पाव आणि चहा पोटात टाकलं तेव्हा कुठे खर्या अर्थाने सेलिब्रेशन झालं ते आठवलं :)
17 Dec 2008 - 11:49 am | पांथस्थ
तिथे एक प्लेट कांदा काटके ला अशी मुन्ना छाप आर्डर नाय दिलीस का? =))
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
17 Dec 2008 - 3:26 pm | संताजी धनाजी
आणि एसी इधर घुमा पण!
- संताजी धनाजी
17 Dec 2008 - 3:52 am | घाटावरचे भट
स्टेशनावरची बुर्जी आठवली आणि जीव कासावीस झाला.
--घाटावरचे (मठ्ठ) भट
आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
17 Dec 2008 - 7:31 am | रेवती
मोठा चवदार लेख आहे.
मी कधीही गाडीवरची बुर्जी खाल्लेली नाही पण तुमची गोष्ट वाचून
तो अनुभव मिळाला.
गाडी भोवतालच्या वातावरणाचे अगदी तंतोतंत वर्णन केलेत.
असच काहीसं वातावरण, संवाद भेळेच्या गाडीपाशीही अनुभवायला मिळतात.
रेवती
17 Dec 2008 - 7:55 am | झकासराव
मी शाकाहारी आहे पण तुम्ही जे वर्णन केल आहे ते खल्लास आहे. :)
पाकृ विथ फोटु देण्याची तुमची कल्पना भारीच आहे.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
17 Dec 2008 - 8:02 am | सहज
फोटो , पाकृ नेहमीप्रमाणे छानच पण ते पुढचे वर्णन जास्त चविष्ट.
मध्यरात्री बर्याच टपर्यांवर भुर्जी खाल्ली आहे. पुण्यात जंगली महाराजरोडवर त्या दुचाकी पुलाच्या अलिकडच्या पदपथावर कुल्फीवाला व पलीकडे भुर्जीवाला दोघांना गब्बर केले आहे. :-)
17 Dec 2008 - 11:59 am | धमाल मुलगा
ती भुर्जीची गाडी पप्याची! म्हणजे आधी त्याचे वडिल चालवायचे ते वारल्यापासून पप्या चालवतो. आणि कुल्फीवाला सोमनाथ :)
पांथस्थ, लय भारी वर्णन हो महाराजा...एकदम तंतोतंत !!!!! मजा आली...
आम्हीतर च्यामारी, कट्ट्यावर दंगा करुन भूक लागली की भुर्जी खायला रात्री अपरात्री जायचो त्याची आठवण झाली.
आणि हो, टार्या म्हणतो तसं ते 'हायजीन-फियजीन' गप घरी फ्रीजमध्ये ठेऊन मगच ह्या गाड्यांवर यावं तरच मजा येते.
एकदा पप्याच्या अंडाभुर्जी गाडीवर लय गर्दी होती तेव्हा आमची ऑर्डर मिळायला वेळ लागायला लागला तसं पप्याला आपणतर कांदाही कापून दिला आहे :)
भुर्जी के लिये साला कुच भी करेंगा :)
17 Dec 2008 - 12:04 pm | पांथस्थ
धमाल्या कडक रे मित्रा!
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
17 Dec 2008 - 8:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाकृती आणि भुर्जी वर्णन जब्रा !!!
(चखण्याला अंडाभूर्जीचाच आग्रह धरणारे अनेक मित्र आहेत)
-दिलीप बिरुटे
17 Dec 2008 - 12:50 pm | विसोबा खेचर
चखण्याला अंडाभूर्जीचाच आग्रह धरणारे अनेक मित्र आहेत)
हरकत नाही, आम्ही औरंगाबादेत येऊ तेव्हा आपणही चकणा म्हणून अंडाभूर्जीच ठेवा.. :)
तात्या.
17 Dec 2008 - 9:56 am | वल्लरी
गाडीवरची बुर्जी खाल्लेली नाही पण एकुण वर्णनाने डोळ्यासमोर तंतोतंत चित्र उभे राहीले...
निरिक्षण शक्ती दांडगी आहे तुमची पांथस्थ ....
17 Dec 2008 - 10:35 am | वेताळ
गाडीवर बुर्जी खायला काही वेगळीच मजा आहे.घरी पण बुर्जी व ऑम्लेट स्वःत करुन खाताना खुप मजा येते.
खुप वर्षापुर्वी सुरभि कार्यक्रमात हैद्राबाद येथील स्पेशल ऑम्लेट वर झलक दाखवली होती. त्यात दोन अंडी एका मगामध्ये जोरात फेटुन त्याचे फेसाळ मिश्रण तो ऑम्लेटवाला तयार करत असे. त्याची ती ऑम्लेट एक ताट भरुन मोठी होत असे.सदर ऑम्लेट हैद्राबादमध्ये खुप फेमस आहे म्हणे .त्याची पा़कृ कुणाला माहित असेल तर इथे देणे.
पाथंस्था बद्दल नवीन असे काय लिहणार. आता तो राहतो कुठे शोधुन सरळ जेवायलाच जायला पाहिजे :D जबराट सुगरण्या आहे तो.
वेताळ
17 Dec 2008 - 12:09 pm | पांथस्थ
वेताळा तु सरळ गाडी पकडुन ये बेंगळूर ला...
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
17 Dec 2008 - 11:59 am | स्मिता श्रीपाद
अंडा बुर्जी खाण्याच्या गडबडीत मीठ विसरलात कि ... :-)
असो..पण बुर्जी जबराटच दिसते आहे.......:-) आम्ही मीठ वरुन भुरभुरुन घेउ ...;-)
अंडा बुर्जी बनविणे हि कृति नसुन कला आहे. ज्या मिपाकरांनी रस्त्याच्या कडेला गाडिवर बुर्जी खाल्ली आहे त्यांना हे नक्कीच पटेल
कॉलेजात असताना रात्री ३ वाजता शिवाजीनगर्,पुणे स्टेशनबाहेरील बुर्जी आठवली हो...
मजा आली.....
(कॉलेजच्या आठवणीने कासाविस झालेली)स्मिता श्रीपाद
17 Dec 2008 - 12:05 pm | पांथस्थ
ह्याला म्हणतात जागरुक खवय्ये. आठवण करुन दिल्याबद्दल धन्यु.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
17 Dec 2008 - 12:22 pm | स्मिता श्रीपाद
मीठाचं खाणार त्यालाच,चव कळणार ..:-)
17 Dec 2008 - 12:55 pm | विसोबा खेचर
मीठाचं खाणार त्यालाच,चव कळणार ..
वा! :)
17 Dec 2008 - 12:13 pm | पांथस्थ
प्रतिक्रिया दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार. मला वाटतं इथे दर्दी बुर्जी प्रेमींची चांगलीच गर्दी आहे. तेव्हा एक धागा "आपली आवडती बुर्जी ठिकाणे" असा सुरु करावा असा विचार आहे? काय म्हणता मंडळी??
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
17 Dec 2008 - 12:23 pm | धमाल मुलगा
होऊन जाऊ द्या शेठ!!!
शुभस्य शिघ्रम्...शिघ्रम् शिघ्रम्.... :)
17 Dec 2008 - 1:02 pm | निखिलराव
लवकर हा धागा सुरु करा........
आज संध्याकाळचाच बेत करतोय......
पुण्याचा बुर्जी प्रेमी....
निखिल
17 Dec 2008 - 12:29 pm | राघव
जबरा... मस्त. फोटू १ नंबर.. :)
मला नागपूरच्या सावजी ची आठवण झाली..
अवांतरः
याला फक्त जीव घेणं असंच म्हणतात...!!!! कुठून दुर्बुद्धी झाली अन् नॉन्व्हेज खाणं सोडलं असं वाटायला लागलंय..
म्या बिच्चार्या शाकाहारी माणसावर किती अत्याचार करायचे... हां???? :( :''( =(( :W
(दुर्दैवी शाकाहारी) मुमुक्षु :)
17 Dec 2008 - 7:17 pm | विजुभाऊ
हाहाहाहा हाहाहाहाहाहा मस्त रे भौ
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
17 Dec 2008 - 7:26 pm | शंकरराव
अंडा बुर्जी बनविणे हि कृति नसुन कला आहे.
जबरा अनुभव अनेक... स्मुती जाग्या जाहल्या
17 Dec 2008 - 7:28 pm | लिखाळ
ठॅक ठॅक ठ्क ठ्क ठुम ठॅम आणि मग उलथण्याला लागलेले मिश्रण काढायला एक मोठा ठणाण ठणण...
मस्त.. मस्त.. वर्णन एकदम आवडले.
भुर्जी आवडतेच.
-- लिखाळ.
18 Dec 2008 - 12:38 pm | ज्योति
अ॑डा भुर्जी छानच. मसाला तिखट ऐवजी का॑दा लसुण मसाला घालावा. मस्तच चव येते.
7 Dec 2012 - 11:01 pm | आनंदी गोपाळ
हिरवी चटणी असते. हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे, मीठ हे पातळसर वाटून तयार केलेली चटणी घालून केलीत तर मस्त टेस्टि होईल ;) तिखट कमी वाटले तर वरतून इतर मसाले घालावेत.
25 Jan 2009 - 2:06 pm | आचरट कार्टा
कालथ्याने किंवा चक्क सुरीने (हे म्हणजे अगदीच.... असो) अंडं फोडलं बुर्जीवाल्याने, की समजावं, आज अवघड आहे.
एक्स्पर्ट बुर्जीवाला सरळ अंडं हातात घेतो, कढईच्या कडेवर नजाकतीने मारतो, अन कढईत रिकामं करतो, ती लय बघण्यासारखी असते... आहाहा... नुस्तं बघूनच भूक वाढते.
आणि फोटो ही तर एकदम अडस कल्पना... (अडस हे रत्नागिरीकरांनी "भन्नाट" या शब्दाला दिलेलं तेजस्वी भावंड! :) )
स्वगत: आज बुर्जी खाल्ल्याशिवाय चैन नाही पडणार... :)
25 Jan 2009 - 2:51 pm | नितिन थत्ते
मिपाकरांपैकी ज्या स्त्री सदस्यांना गाडीवर भुर्जी खाण्याच्या आनंदापासून वंचित रहावे लागले असेल त्यांना सर्व समाजातर्फे क्षमस्व.
ज्यांना टोमॅटोच्या फोडी आवडत नाहीत त्यांनी कांदा टोमॅटो एकदम परतावेत म्हणजे शिजून पल्प होतो. नंतर अंडी घालावी (वाकडा विचार करू नका). मी गरम मसाल्याऐवजी काळा (गोडा) मसाला घालतो.
26 Jan 2009 - 12:13 am | पक्या
वा...वा पांथस्था , काय वर्णन केलंत ...एकदम जबरा. फोटू आणि रेसिपी क्लासच .
एक रेसिपि बुक काढा आता राव. फोटू, रेसिपीज आणि त्यासोबत केलेलं आठवणींचं लेखन...जबरदस्त कलेक्शन होईल.
7 Dec 2012 - 7:01 pm | प्रकाश घाटपांडे
आज घरी बायको नसल्याने बुर्जीची पाककृती शोधत होतो. माझ्यासाठी हा अन्नदाता धागा.
7 Dec 2012 - 10:56 pm | आनंदी गोपाळ
बॉइल्ड भुर्जी नामक एक प्रकार आहे, उकडलेल्या अंड्यांची भुर्जी. केली की फोटूसकट टाकीन इथे.
भुर्जीच्या गाडीजवळ गोटी-सोड्याच्या गाड्या उभ्या असतात. त्या कशाला? हा विचार कधीच मनात न आलेल्या मिपाकरांचे अभिनंदन. भुर्जीच्या गाडीवर, किंवा त्या सोड्याच्या गाडीवर, उत्तम स्वस्त देशी/विदेशी दारू ओपन एयर मिळते हे किती लोकांना ठाऊक आहे इथे?
7 Dec 2012 - 11:11 pm | दादा कोंडके
:)
अनेक वर्षे अशा गाडीवर भुर्जीपाव खाल्लाय. एक लमाणी जोडपं ही गाडी चालवीत होतं. आणि इच्छुकांना स्टीलच्या ग्लासातून दारू सर्व करीत असत. मोठ्या पसरट तव्यावर उलतन्याचा खट-खट आवाज करत भुर्जी होत आली असताना लिंबू पिळून केलेल्या भुर्जीची चव अजून तोंडात रेंगाळत आहे.
8 Dec 2012 - 3:19 am | अभ्या..
लै लहानपणापासून माहीत आहे. भुर्जीच्या गाड्या दोनच ठिकाणी असायच्या आधी. एकतर स्टेशन/स्टँडजवळ नायतर थेटराजवळ. आता बर्याच ठिकाणी दिसतात. तिथे दारू मिळते पण वाईनशॉप मधुन घेऊन येणारे जास्त्त असतात. कारण बारचा रेट आणि भुर्जीची टेस्ट. (मात्र तिथे उत्तम दारू मिळते हे नवीनच कळले. कारण तेथेच जास्त ब्रँड डुप्लिकेट जातात)