माझी इटलीची भ्रमणगाथा - भाग १० - व्हेनिस

अजया's picture
अजया in भटकंती
16 Aug 2015 - 2:02 am

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग८, भाग९
बघताबघता आमच्या सहलीचे आठ दिवस उडून गेले. आता वेध लागले होते व्हेनिसचे. इटलीला येण्याआधी प्रत्येक जण मी व्हेनिसला जाणारेना याची चौकशी जरूर करत असे. काहिंनी तर व्हेनिस शिवाय इटलीत पाहण्यासारखं काय असंही विचारलं होतं! जगातलं सर्वाधिक पर्यटक खेचणारं पर्यटन स्थळ म्हणून व्हेनिस ख्यातनाम आहे. हे सर्व वाचून ऐकून कधी एकदा बघणार व्हेनिस असं झालेलं! खुद्द व्हेनिस बेटावर हॉटेल्स अतिशय महाग आहेत. त्यामुळे जवळच्या उपनगरात एका छानशा होटेलात आम्ही उतरलो होतो.अनेक खोल्या असलेल्या या होटेलला लिफ्ट मात्र एकच होती! त्यात बस भरून भरून चिनी लोक येत होते. त्यातले काही, लोक वाट बघत थांबले आहेत बघूनसुद्धा लिफ्ट हाताने थांबवून फोटो घेणे वगैरे चाळे करत होते. यात आबालवृद्ध सामील! काय बोलावे...

बर्‍याच प्रतिक्षेनंतर आम्ही सामानासकट रूमवर पोहोचलो. दर वेळी रूम ताब्यात घेण्याआधी तिथले सर्व उपकरणं चालू अवस्थेत आहेत का मोडलेली हे बघत जा असे आम्हाला निक्षून बजावलेले होते.कारण रूम सोड्ताना हेयर ड्रायर वगैरे मोडलेले आढळल्यास आपल्याला त्याचा खर्च भरून द्यावा लागतो. त्याप्रमाणे बाथरूम चेक करायला गेले आणि "तो" दिसला! माझिया माहेरचा ओळखीचा! एक मोट्ठा टपोरा डास!! इतक्या लांब परदेशात असं माहेरचं ओळखीचं दिसलं कोणी तर, आनंद पोटात माझ्या मावेना!!

व्हेनिसच्या रस्त्यावरच पदोवा हे फेरारी म्युझियमचं गाव लागतं. इथे आमचा एक छोटा ब्रेक होता. तिथे फेरारीच्या वेगवेगळ्या गाड्यांची मॉडेल्स आणि इन्जिन्स ठेवलेली होती. तिथल्या छोट्याश्या थिएटरमध्ये फेरारी वापरलेली आहे अशा हॉलिवूडच्या चित्रपटातले प्रसंग दाखवणारी मस्त फिल्म सुरू होती. मला गाड्यांमधलं काहीही कळ्त नसल्याने मी ती फिल्म बघत बसले. जेम्स बॉण्ड्च्या चित्रपटातले बरेचसे ओळखीचे सिन्स फेरारीवर चित्रित आहेत. पिअर्स ब्रॉस्ननला बघून अजून पण कुछ कुछ होता है! या सुखद साक्षात्कारानंतर मी गाड्यांकडे मग डायरेक्ट बाहेर निघणार होते. तोच इथे फेरारी की सवारी करता येते २० युरोमध्ये असे सांगत मैत्रीणी आल्या. म्हणून तिथे गेलो.तर आम्ही ताटकळतोय आधीपासून तरी तिथला मॅनेजर गोरे लोक बघून आधी सोड्त होता. ते सर्व बघून डोकं फिरवून घेऊन मी सवारी न करताच परत आले.तिथे फेरारीच्या अनेक वस्तू विक्रीला होत्या. खरेदीची धमाल सुरू होती. बांग्लादेशात शिवून फेरारीचा टॅग मिरवणारे टि शर्ट्स ७० युरो आणि पुढे होते! फेरारीचे परफ्युम मात्र छान असतात. तिथल्या कॅफेटेरियात प्रवासी कंपनीकडून कुपन्स दिलेली होती. ती घेऊन अतिशय सुंदर कॉफी पिऊन आम्ही खुद्द व्हेनिसकडे जायला प्रस्थान ठेवले.

व्हेनिसला जायला वापारेत्तो म्हणून मोटारबोट असतात त्या धक्क्यावरून घेऊन जातात. थोडं अंतर जाताच व्हेनिसच्या सुप्रसिद्ध इमारती दिसायला सुरूवात होते. दोन्ही बाजूला सुंदर इमारती आणि थंडगार हवा, बोटीच्या डेकवर इतक्या दिवसात अगदी ओळखीची झालेली मित्रमंडळी सोबत! सुहाना सफर नाही झाली तर नवल!



व्हेनिस हे एड्रियाटीक समुद्रात वसलेला बेटांचा समूह आहे.बाराव्या शतकात अटिला हूणाला घाबरून इटलीतल्या नागरिकांनी या बेटाचा आश्रय घेतला. इथे फक्त पाणीच असल्याने ते मासेमारी करून पोट भरायला लागले. शत्रूची भिती गेल्यावर त्यांनी इथे उत्तम बंदर वसवलं. व्यापारी धनाढ्य झाले. पैसा आला तशी सुंदर बांधकामं होऊ लागली. तीही समुद्रात लाकडी पाया ठोकून!बेटं एक्मेकाना जोडली गेली.मग त्यांच्यात्यांच्यात भांडणं सुरू झाली. या सर्वांवर एक शास्ता असावा म्हणून मग कौन्सिल आलं. त्याच्या मुख्य "दोज" असे. या दोजसाठी महाल बांधला गेला. या दोजनी घातलेल्या शिस्तीमुळे व्हेनिसची अजून भरभराट होउ लगली. त्यांचा जहाज बांधणीचा व्यवसाय फोफावला. मार्को पोलो व्हेनिसचाच रहिवासी. तो पूर्वेची संपत्ती बघून आला आणि व्हेनिस आक्ख्या युरोपात एकटंच त्या देशांशी व्यापार करू लागलं. व्हेनिसची कॉस्टेंटिनोपलची वसाहत सर्वात श्रीमंत. त्यांची संपत्ती तिथल्या लोकांनी लुटली.हे कळताच व्हेनिसच्या लोकांनी तिथे धाड मारून कॉस्टँटिनोपल लुटले. व्हेनिसच्या सेन्ट मार्क्स चर्चवरचं चार ब्रॉन्झ घोड्यांचे शिल्प क्वाड्रिगा त्याची साक्ष पटवत उभं आहे!व्हेनिसच्या इमारतींवर त्यामुळेच बिझेन्टाईन छाप दिसते.

शेक्स्पिअरच्या मर्चंट ऑफ व्हेनिसची कथा इथल्याच व्यापारावर आहे.त्याचं ऑथेल्लोदेखील व्हेनिसच्या पार्श्वभूमीवरची कथा आहे. असं त्या काळापासून या शहराचं गारूड युरोपावर आहे.
असं हे व्हेनिस दाखवत बोटीने सेन्ट मार्क्स असलेल्या धक्क्यावर सोडलं. व्हेनिस बेट सगळं कालव्या कालव्यांचं. त्यावरचे वेगवेगळे पूल प्रसिद्ध आहेत. त्यातला ब्रिज ऑफ साइज म्हणजे नि:श्वासांचा पूल जाता जाताच लागला.पूर्वी कैद्यांना तुरूंगात नेताना इथून व्हेनिसचं शेवटचं दर्शन होत असे म्हणून हा ब्रिज ऑफ साइज! याच्या खालून गोंडोलाने गेलं की प्रेम सफल होतं(म्हणे!)अशी आख्यायिका आहे!



लगेचच पुढे दोज पॅलेसची घवघवीत इमारत उभी होती.दोज म्हणजे व्हेनिसचा कारभारी. श्रीमंत व्हेनिसच्या कारभार्‍याचं निवासस्थान तसच जंगी!व्हेनेशियन गॉथिक शैलीचा अप्रतिम नमूना आहे ही इमारत.

आतून हा पॅलेस बघण्यासारखा आहे.सहलीत अंतर्भूत नसल्याने आम्ही तो पाहू शकलो नाही याचे शल्य राहून जाणार:(
इथून पुढे सेन्ट मार्क संकूल सुरू होते.सुरूवातीला दोन भव्य खांबांवर व्हेनिसचे चिन्ह उडता सिंह आणि तिथला खरा संत थिओडोरचं शिल्प आहे.इथेच देखणा बेल टॉवर आहे. बेटाच्या आकारामुळे सेंट मार्क कथेड्रलचा बेल टॉवर असा बाजूला आहे.तरी अतिशय सुबक सुंदर इमारत.

व्हेनिस जसं श्रीमंत झालं त्यांना बांधलेल्या कथीड्रलसाठी नामवंत संताचे अवशेष असावेसे वाटायला लागले. मग त्यांची दृष्टी वळली सेन्ट मार्ककडे. तो ख्रिस्ताचा सुरुवातीपासूनचा अनुयायी. नाव मोठं! मग व्हेनिसच्या सैन्यानी इजिप्तमध्ये हल्ला करून हे अवशेष पळवले. ते एका टोपलीत घालून वर डुकराचे मास ठेवले. त्यामुळे मुसलमान अधिकार्‍यानी न बघताच त्या टोपल्या बाहेर जाऊ दिल्या! अशा रितीने पळवून आणून सेंट मार्क कवटीशिवाय व्हेनिसमध्ये दाखल झाला! कारण हल्ल्याच्या लुटालुटीत कवटी मागे राहीली!! मग जुना संत थिओडोर बाहेर ऊंच खांबावर गेला आणि सोन्याने मढवलेल्या कथीड्रलमध्ये वाजतगाजत सेण्ट मार्क्सचे अवशेष विसावले. हा सर्व इतिहास कथिड्रलच्या दारावरच्या मोझाइक्स वर चित्रीत केलेला आहे. कथेड्रल बिझेन्टाइन प्रभावामुळे घुमटाकार आहे. त्यावर अनेक शिल्पं आहेत. आतून सोनेरी मोझाइक्सने सजवलेलं हे कथिड्रल,सहप्रवाशांच्या खरेदी करण्याच्या ओघात फक्त मी आणि मैत्रीणीने पहिलं. बाकी सर्व चक्क बाहेरून बघून निघून गेले! आतमध्ये प्रचंड मोठी सोनेरी मोझाइक्स आहेत. त्या काळातल्या नामवंत चित्रकारांनी काढलेली.

सेंट थिओडोर


(अंतर्भाग)

(दारावरील मोझाइक)
(वरील तिन्ही चित्रे जालावरून साभार)
कथिड्रलच्या बाजूलाच टाऊनहॉलची इमारत आहे. तिथेही फ्लोरेन्ससारखे घड्याळ आहे. तासातासाला दोन पुतळे बाहेर येऊन टोले देतात.
.

कथिड्रलच्या पुढ्यात आहे लांबलचक जगप्रसिद्ध सेंट मार्क्स स्क्वेअर. दोन्ही बाजूला नेपोलियनने बांधलेल्या इमारती, समोर कथिड्रल, बाजूच्या ओवर्‍यांमध्ये कॅफेटेरिया. इथे बसून चवीचवीने व्हेनिस एन्जॉय करावे. मला अतिशय आवडला व्हेनिसचा हा भाग!

इथून पुढे उजवीकडे वळले की ग्रँड कनाल सामोरा येतो. इथे गोंडोला राइड घ्यायची होती.काळ्याभोर शिसवी लाकडाचे गोंडोले आतून आपल्या शिकार्‍यासारखे सजवलेले असतात. पण बरेच अरूंद. या राइडबद्दल अनेक रोमॅंटिक वर्णनं, खास व्हेनिसला याचसाठी मधूचंद्राला गेलेलो अशी ऐकलेली असल्याने फार उत्सुकता होती. गोंडोला सुरू झाल्यावर तो गल्ल्या गल्ल्यातून वाट काढत जाऊ लागला. आमच्याबरोबर बसलेल्यांनी उत्साहाने, दो लब्जोंकी हे गोंडोलात चित्रीत झालेलं गाणं म्हणायला सुरुवात केली. मला मात्र मजा येईना! एक तर काळंढूस पाणी. त्याला गटारासारखा वास येत होता. रोमॅंटिक कसलं इथे मला मळमळायला लागलेलं! व्हेनिसचं सर्व सांडपाणीही ग्रँड कनालमध्येच जात असावं. जाताना व्हेनिसचा झुकता मनोरा पण दर्शन देऊन गेला!



मला अजिबात न आवडलेला हा प्रवास एकदाचा संपला बाबा! आणि आम्ही ग्लास फॅक्टरी बघायला निघालो.इथे काचेपासून घोडा बनवायचे प्रात्यक्षिक दाखवतात. काचेच्या अनेक सुंदर वस्तू दिसतात. माझे खरेदी न करण्याचे सर्व मनसुबे उधळून टाकत मी इथे क्रिस्टलचा सेट घेतलाच!!येताना बरेच जण वेनेशियन मास्क घेत होते. हे मास्क म्हणजे व्हेनिसच्या नितिमत्तेला बट्टा लागलेल्या काळाचे प्रतिक! तोंडावर मुखवटा चढवावा आणि कार्निव्हल्, मद्य ,मदनिका यांच्यात सामिल होउन जावं! आता मात्र व्हेनिसची खूण म्हणून लोक हे विकत घेतात!

यानंतर मात्र बाकीचे शॉपिंगला गेल्यावर मी एकटीच सेंट मार्क्स स्क्वेअरमध्ये मनसोक्त हिंडले. कॉफी प्यायली. रमतगमत सर्व मनभरून बघत बसले.
आजचा ट्रीपचा शेवटचा दिवस होता. एव्हाना सर्व सहप्रवाशांबरोबर घट्ट मैत्र जुळले होते. त्यांना सोडून जायचं म्हणून हुरहुर वाटायला लागलेली तर आठ दिवसात न भेटलेल्या लेकाला कधी बघिनसं पण झालं होतं!
परतताना सगळेच शांत बसले होते बोटीत. हॉटेलला गेल्यावर मी परत गोंडोला राइड न घेता इकडे तिकडे हिंडत होते हे कळल्यावर मैत्रिणींनी तुला रोमॅन्स कशाशी खातात कळत नाही असं सर्टिफिकेट दिलं!!
आता पिझ्झा, पास्ता आणि रोमॅन्स कशाशी खातात हे एकदा कळलं की अर्ध बघायचं राहिलेलं रोम आणि पाऊण राहिलेलं फ्लोरेन्स परत करीन म्हणते!
तोपर्यंत अरिविदार्ची!!गुडबाय!!

(समाप्त)

प्रतिक्रिया

निवेदिता-ताई's picture

16 Aug 2015 - 7:22 am | निवेदिता-ताई

सुंदर वर्णन... ओघवती भाषा.

कविता१९७८'s picture

16 Aug 2015 - 7:29 am | कविता१९७८

मस्तच , बर्‍याच गोष्टी खटकण्यासारख्याच आहेत अन "तो" दिसला म्हणजे अगदी ईमानदार निघाला बघ...

मनुराणी's picture

16 Aug 2015 - 7:32 am | मनुराणी

सगळी लेखमाला छान झाली आहे. पुढच्या अशाच खुसखशीत प्रवासवर्णनाच्या प्रतीक्षेत.

भुमी's picture

16 Aug 2015 - 7:37 am | भुमी

अभ्यासपूर्ण वर्णन, सुंदर नेटका व्रुत्तांत :)

बोका-ए-आझम's picture

16 Aug 2015 - 7:55 am | बोका-ए-आझम

डास माहेरचा वाट पाही हाटेलात असं झालेलं दिसतंय तुमचं. बाकी वर्णन आणि फोटो सुंदर. आणि इतकी सुंदर प्रवासवर्णन मालिका संपली, त्याची जरा चुटपुटही लागली, पण तुम्ही परत कुठेतरी जाल, आणि आम्हाला अशा मालिकांची मेजवानी द्याल अशी अपेक्षा आणि खात्री आहे!

जेपी's picture

16 Aug 2015 - 8:53 am | जेपी

सुंदर प्रवासमालिका.
एका सुंदर देशाचा प्रवास घडवल्याबद्दल मन:पुर्वक धन्यवाद.

इशा१२३'s picture

16 Aug 2015 - 9:36 am | इशा१२३

अप्रतिम फोटो.
सुरेख झाली लेखमाला.तुझ्याबरोबर परत एकदा इटली सफर घडली.धन्यवाद.

माहेरचे आणि सासरचे डास वेगळे कसे ओळखता तुम्ही? कदाचित गोंडोलांच्या काळ्या पाण्याला नाव ठेवलंत ना,म्हणून्आला असेल शिक्षा करायला.... आणि शेवटच्या वाक्याने हिरकणीचा पुनर्जन्म झालाय असं वाटलं

पियुशा's picture

16 Aug 2015 - 10:09 am | पियुशा

वा , कसल सुन्दर लिहीलीयेस एक्दम टापटिप न मस्त ओघवती लेखन शैली , तुझी लेखमाला सम्पुच नये अस वाटत
ही लेखमला वाचुन अयुश्यात एकदा तरी "जिवाची इट्ली" करायची च आहे :)

यशोधरा's picture

16 Aug 2015 - 11:18 am | यशोधरा

मस्त समारोप.

दिव्यश्री's picture

16 Aug 2015 - 1:00 pm | दिव्यश्री

अजयाताई मस्त लेख . सगळे लेख वाचुण आमच्या भटकंतीची आठवण झाली . सेंट मार्क्स च्या चौकात कबुतराणा खावू घातलेकी णाही हे समजले णाही . ;) आम्ही चुकूण बळी पडलो होतो . आधी वाटले कि याचे सेंट्स(युरो) घेणार णाही पण णमतर तो बाबा पिच्छा सोडेणा मग दिलेच शेवटी किती दिले हे विचारू णये.

णाही गं. कबुतरं मला अगदी आवडत णाहित! मय कुठल्याच चिडियोंको दाणा णही डालती!!!

पद्मावति's picture

16 Aug 2015 - 1:04 pm | पद्मावति

संपल्याची रुखरुख वाटते आहे. सगळेच भाग फारच मस्तं झाले होते. खूप छान वाटत होतं वाचतांना.

नूतन सावंत's picture

16 Aug 2015 - 1:20 pm | नूतन सावंत

मीन प्रभूंचे रोमराज्य वाचल्यापासून तिथे जायचे ठरवले होते.तुझे प्रवासवर्णन वाचल्यापासून ओढ दुप्पट झाली. अगदी आटीव दुधाप्रमाणे भट्टी जमलीये आणि जिथे जायचे तिथला इतिहास माहीत करून जायचे नि सहल पुरेपूर उपभोगायची या तुझ्या आवडीने दुधात साखरच पडलीय.परत जाशील तेव्हा शक्य झालंच तर तुझ्यासोबत आपले आपण जायचं असं ठरवावसं वाटतंय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Aug 2015 - 2:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेखमालिका !

ओघवते वर्णन आणि मनोहारी फोटोसह असलेली ही इटलीची सफर इतक्यात संपू नये असेच वाटत होते.

अभ्या..'s picture

16 Aug 2015 - 2:38 pm | अभ्या..

ब्येश्टच
फोटो अप्रतिम.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Aug 2015 - 3:17 pm | अत्रुप्त आत्मा

संपूर्ण लेखमालेसाठी http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/hands-clapping-applause-smiley-emoticon.gif
आणि..
फोटूंसाठी http://www.sherv.net/cm/emoticons/yes/big-thumbs-up-smiley-emoticon.gif

मधुरा देशपांडे's picture

16 Aug 2015 - 7:16 pm | मधुरा देशपांडे

लेखमाला खूप आवडली. व्हेनिसला आम्ही २ दिवस होतो. आणि प्रत्येक गल्लीबोळ पालथी घातली होती. तिथुन जवळच असणारी मुरानो आणि बुरानो ही दोन्ही बेटे पण सुंदर आहेत. तु ग्लास फॅक्टरीचे लिहिले आहेस ते मुरानो. तिथी मीही भरपुर खरेदी केली होती. बुरानो बेट पण मला फार आवडले होते. व्हेनिसला तिरामिसु वेड्यासारखे खाल्ले होते आणि इटालियन कॉफीपण. गोंडोलाबाबत दे टाळी. आम्हीही हेच ऐकुन/वाचुन गेलो होतो की गोंडोला राईड घ्यायलाच हवी वगैरे. प्रत्यक्षात आम्ही ते पाणी, तिथली अवस्था बघुन 'हे काय रोमँटिक वगैरे नाही' असे म्हणुन ते टाळले. सेंट मार्क्स स्क्वेअरला मनसोक्त फिरलो होतो. आता पुढच्या वर्षी अशीच मस्त युरोप (पक्षी: जर्मनी) सहल कर आणि लेखमालिका लिही. आणि नंतर इटालियन लेक्स सुद्धा लिस्टवर ठेव.

सानिकास्वप्निल's picture

16 Aug 2015 - 8:29 pm | सानिकास्वप्निल

मस्तं लेख लिहिला आहेस. अप्रतिम वर्णनशैली, माहितीपूर्ण अशी ही लेखमाला झाली.
व्हेनिस तर खूप आवडले होते पण गोंडोला राईड घेताना कधी एकदा गोंडोल्यातून बाहेर पडू असे मला ही झाले होते. तो वास अगदीच नाकात, डोक्यात गेला होता ;)

मुरानोला खरेदी मस्टचं त्याशिवाय पुढे पाऊलचं टाकता येत नाही ;)

छानचं लिहिली ही लेखमाला, पुढच्या लेखनासाठी खूप शुभेच्छा !!

श्रीरंग_जोशी's picture

17 Aug 2015 - 5:56 am | श्रीरंग_जोशी

ही लेखमालिका म्हणजे एक पर्वणीच होती.

शेवटचा भागही उत्तम आहे. आता पुढचा भाग नसणार याची रुखरुख लागली आहे.

काचेपासून बनवलेल्या कलात्मक वस्तू आम्हालाही खूप आवडतात. संधी मिळेल तेव्हा पर्यटनस्थळी खरेदी करत असतोच.

मालिका संपल्याची रुखरुख आहे. पुढील सहलीला लवकरच जाशील आणि पुन्हा प्रवासवर्णन लिहिण्यासाठी शुभेच्छा!!

लेखमालिका आवडली. इटलीचे दर्शन घडले. गोंडोलांची आणि पाण्याच्या स्वच्छतेबद्दल शंका होतीच, ती या लेखामुळे खरी ठरली.

जयंत कुलकर्णी's picture

17 Aug 2015 - 7:37 am | जयंत कुलकर्णी

मस्तच !

विशाखा पाटील's picture

17 Aug 2015 - 8:16 am | विशाखा पाटील

मस्त! छान वर्णन आणि माहितीपूर्ण. व्हेनिसच्या गोंडोला राईडबद्दल सहमत.

संपूर्ण लेखमाला सलग वाचली !
ओघवतं वर्णन, प्रत्ययकारी फोटो आणि सोबतीला महितीपूर्ण विवेचन !!! खूप सुंदर !

८ वर्षांपूर्वी केलेली इटली सफर या लेखमालिकेच्या निमित्ताने पुन्हा केली ! बाकी व्हेनिस बघून आपल्याला अजिबातच रोमॅन्टिक का काय ते वाटत नाहिये....वगेरे विचारांनी आलेला शिल्प्-वास्तु-चित्र कलेबाबत येऊन गेलेला न्यूनगंड हा शेवटचा लेख वाचून गेला =))

सुधांशुनूलकर's picture

17 Aug 2015 - 9:38 am | सुधांशुनूलकर

संपूर्ण लेखमाला आवडली.
आता यानंतर कुठे जाणार? (म्हणजे आम्हाला आणखी एक मस्त प्रवासवर्णन लेखमाला वाचायला मिळेल..)

प्रीत-मोहर's picture

17 Aug 2015 - 9:46 am | प्रीत-मोहर

मस्त लेखमालिका!!!!

मदनबाण's picture

17 Aug 2015 - 10:06 am | मदनबाण
पिलीयन रायडर's picture

17 Aug 2015 - 10:12 am | पिलीयन रायडर

फार सुंदर झाली लेखमाला! जेव्हा केव्हा इटलीची सफर करेन तेव्हा अगदी वाचुन ट्रिप प्लान करावी इतकी माहितिपुर्ण!

अशीच फिरत रहा..लिहीत रहा..

सस्नेह's picture

17 Aug 2015 - 11:18 am | सस्नेह

व्हेनिसची डौलदार अन भव्य स्थापत्यशिल्पे निळ्याशार (फोटोत तरी काळं दिसत नाहीये गं) पाहून पाहून डोळ्यांचे समाधान होईना !
बाकी गोंडोलाची सफर फारशी रोचक झाली नाही हे वाचून नवल वाटले नाही ! मलापण च्यामारी, पाण्यातला, तोही घाण पाण्यातला प्रवास आवडत नाही...

एक एकटा एकटाच's picture

17 Aug 2015 - 12:48 pm | एक एकटा एकटाच

निव्वळ अप्रतिम

धन्यवाद सर्व वाचकांचे!

खटपट्या's picture

17 Aug 2015 - 3:37 pm | खटपट्या

सर्व भाग खूप आवडले.

रमतगमत सर्व मनभरून बघत बसले.

मलाही कोणत्याही प्रेक्षणीय स्थळी ग्रुपने गेलो तरी एकट्यानेच फिरायला आवडते. कारण ग्रुपबरोबर वाहवत जायला होतं. आपल्याला जे बघावसं वाटतं त्यात ग्रुपला इंटरेस्ट नसतो वगैरे....

स्मिता श्रीपाद's picture

17 Aug 2015 - 5:42 pm | स्मिता श्रीपाद

मस्त मस्त मस्त..
खुप छान फिरवून आणलस ग ताई...

प्राची अश्विनी's picture

17 Aug 2015 - 5:53 pm | प्राची अश्विनी

छान लिहिलेयस ग!!!

ताई मस्त झालाय हा भाग पण. आम्हीहि केली होती गंडोला राईड. आम्हाला दोघांनाही आवडली होती. त्यावेळी आमचे मुरानो, बुरानो राहिले. त्यासाठी परत एकदा व्हेनिसला जायचे आहे.

मृ,तुला गोंडोला राइड आवडली म्हणजे तुला रोमॅन्स कशाशी खातात कळलंय ;)

स्वप्नांची राणी's picture

17 Aug 2015 - 8:12 pm | स्वप्नांची राणी

सगळी लेखमालाच खूप आवडली, अजया!

त्या गोंडोला राईडबद्दल माझं पण सेम मत....

प्रचेतस's picture

19 Aug 2015 - 8:58 am | प्रचेतस

सुरेख लेखमाला.
हाही भाग फारच आवडला.

नीलमोहर's picture

19 Aug 2015 - 11:12 am | नीलमोहर

फोटो आणि लेखमाला अतिशय सुंदर..

अतिशय सुंदर लिहिलंय .तुला पुढच्या भटकंती साठी खूप खूप शुभेच्छा ..