भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग८
इटलीला जायचे ठरल्यापासूनच फ्लोरेंस बघायची उत्सुकता होती. फ्लोरेंस ही चित्र शिल्पकारांची काशी. टस्कनी प्रांताची राजधानी असलेल्या या एका गावाने मायकेल एन्जेलो, बोत्तीचेल्ली, लिओनार्दो सारखे अनेक मोठे कलावंत जगाला दिले .मायकेल तर स्वत:ला अभिमानाने फ्लोरेन्सचा सुपुत्र म्हणवून घेत असे. इटलीत -हेनेसांसची सुरुवात फ्लोरेन्सपासूनच झाली.आर्नो नदीच्या काठचं हे गाव दोन हजार वर्षांपूर्वी जुलियस सीझरने व्यापाराच्या हेतूने वसवलं आणि त्याचं फ्लोरेंस म्हणजे उत्कर्ष हे नाव सार्थ करत हे गाव भरभराटीला आलं. पंधराव्या शतकात मेडिची घराण्यातल्या गडगंज श्रीमंती आणि कलाप्रेमामुळे अनेक कलावंताना लोकाश्रय, राजाश्रय मिळाला. त्या काळात प्लेगच्या साथीमुळे तसंच पोपच्या बेबंद वागण्याने कलवंतांचे लक्ष देव धर्म या नेहेमीच्या कल्पना सोडून ग्रीकांनी डोळसपणे जपलेल्या, रोमनांनी वाढवलेल्या कलांकडे जाऊ लागलं. दैवी चित्रण सोडून ते अधिकाधिक मानवी सौंदर्याकडे वळू लागले. चित्रात नैसर्गिक भाव दिसायला लागले तर शिल्प सुडौल होऊ लागली.अशाप्रकारे ही पुनर्ज्जीवनाची साथ सर्वच कलाप्रकारात आली. इथली अनेक चर्चेस, कथिड्रल्स सर्वत्र या कलांना आश्रय मिळायला लागला. मुख्य म्हणजे हे सगळं शतकानुशतके टिकवलं गेलं. त्यामुळे आजही पर्यटकांचा ओढा या शहराकडे असतोच.
फ्लोरेन्समध्ये बघायाची ठिकाणं अनेक. त्यामुळे आज आमची सफर लवकरच निघाली. चर्चच्या चौकात आमची गाइड उभीच होती.तिने सुरुवातीलाच आज भरपूर चालायचे आहे अशी धमकी देउन ठेवली! आम्ही तर सज्जच होतो,युरोपचा सांस्कृतिक ठेवा समजलं जाणार्या फ्लोरेंसवर स्वारी करायला आत्ता आम्ही उभे होतो फ्लोरेन्सच्या सर्वात महत्त्वाच्या कथिड्रलच्या पुढ्यात. "संता मारिया डेल फ़िओरे" म्हणजेच मेरीला वाहिलेलं हे चर्च हा फ्लोरेन्सचा धार्मिक गाभा आहे. फ्लोरेन्सची श्रीमंती वाढत गेली तसं त्यांना तिथे भव्य दिव्य कथिड्रल हवंसं झालं.त्याला जगाने बघून तोंडात बोट घालावं असा घुमटदेखील हवा होता.त्या काळात ब्रुनेलेस्कीने हे काम स्वीकारून, कृत्रिम सिलिंगची कल्पना वापरून जगातला एक अत्यंत सुंदर घुमट तयार केला. असं हे सुंदर कथिड्रल! गुलाबी पांढर्या हिरव्या संगमरवराने बांधलेलं हे अफ़ाट मोठं कथिड्रल क्यामेरात मावत नाही! त्याच्या बाजूलाच ज्योत्तोने बांधलेला देखणा बेल टॉवर आहे. आणि समोर सेंट जॉन द बॅप्टिस्टच्या नावाने बांधलेली अष्टकोनी बॅप्टिस्ट्री आहे. तिच्या चारही ब्राँझ दरवाज्यांवर सोन्याचा मुलामा दिलेली चित्रं आहेत. हे काम घीबेर्ती या कलावंताचं. त्याने एकवीस वर्ष खपून ही सुंदर दारं तयार केली.यावर बायबलच्या जुन्या काराराताल्या कथा कोरलेल्या आहेत. या दरवाज्यांना मायकेल अॅन्जेलो "गेट्स ऑफ पॅराडाइझ "म्हणत असे.त्याच नावाने ती आता प्रसिद्ध आहेत.
(जालावरून साभार)
बाहेरूनचच एवढं दिपवून टाकणारं कथिड्रल आतून कसं असेल याची आता उत्सुकता लागली होती. आत शिरल्या शिरल्याप्रथम जाणवतो तो आतला अंधारा भव्य प्राकार.स्टेन्ड ग्लासच्या खिडक्यांमधून रंग उधळणारी सुंदर चित्रं. खालची जमीन बाहेरसारखीच पट्ट्यापट्ट्याच्या संगमरवरी लाद्यांची. थंड. आजूबाजूला भव्य चित्रं.यातलं दान्तेच्या डिवाइन कॉमेडीवरचं चित्रं प्रसिद्ध आहे. यात खुद्द दान्ते दाखवला आहेच पण कथिड्रल बांधायच्या खूप आधीच काढलेल्या या चित्रात जे कथिड्रल दाखवलंय तसंच ते आत्ताही दिसतं. बाजूचा डोंगर म्हणजे स्वर्ग! मध्ये येशूला मांडीवर घेतलेली मेरी. आमच्या गाइडला चित्रांमध्ये खूप इंटरेस्ट होता.त्यामुळे लवकरच इतर सहप्रवासी चित्रं बघून कंटाळले आणि ती मला एकटीलाच सापडली! त्यामुळे मला धनलाभ झाल्यासारखा आनंद झाला. याच चित्राच्या बाजूला सिएन्नाच्या घोडेस्वाराचं चित्र आहे. ते तर चक्क त्रिमित असल्याचा भास होतो!
(जालावरून साभार)
आता फिरत फिरत घुमटाखाली आलो. खूप उंचावरच्या खिडकी पासून ते तळापर्यंत घुमट अप्रतिम सुंदर चित्रांनी नटलेला आहे. विषय नेहेमीचाच, शेवटचा न्यायनिवाडा. व्हाझारीने त्या उंचीवर इतके अफाट काम करून ठेवून या कथिड्रलची उंची कलेनेदेखील वाढवली आहे.
परतताना समोर प्रवेशद्वारावर प्रचंड मोठं घड्याळ दिसतं.या प्रकारची दिवसाचे चोवीस तास, ॠतू, सूर्यास्ताबरोबर दिवस संपवणारी दोनच घड्याळं आहेत. एक इथे आणि एक व्हेनिसला. इथलं धार्मिक महत्वाचं कारण त्याच्याभोवती असणारी संतांची चित्रं.
कथिड्रलची जादू मनात साठवून आम्ही फ्लोरेन्सच्या मुख्य चौकात शिरलो. इथे पूर्वीपासून बाजार भरत असे. ती इमारत अजूनही तशीच राखलीये. आता तिथे स्मरणवस्तूंचा बाजार!जागोजागी वेषभूषा करून पुतळ्यासारखे भिकारी बसलेले होते! ते मधेच हातवारे करून दचकून सोडत! या बाजरातच एक डूकराचे तोंड असणारी पाणपोई आहे.तिला हात लावल्यास फ्लोरेन्सला परत जाता येतं म्हणे! मग तर मी त्या डुकरूला कुरवाळूनच आले!!
(जालावरून साभार)
हाच रस्ता पुढे अर्नो नदीच्या सुप्रसिद्ध पुलावर जातो. याच पूलावरून कल्पना घेऊन लंडनचा जूना सुप्रसिद्ध ब्रिज बांधलेला होता. दुतर्फा सोन्याच्या दगिन्यांची महागडी दुकानं इथे पूर्वीपासून आहेत.मध्यावर चेल्लीनीचा सुरेख पुतळा आहे.तिथे समोरच नदीवरचा अनेक चित्रपटातून दिसणारा पूल आहे.
(जालावरून साभार)
इथून पुढचा रस्ता आच्छादलेल्या ओवर्यांचा, खास राजेराण्यांसाठी बांधलेला. हा रस्ता आपल्याला जगद्विख्यात उफिझी गॅलरी संग्रहालयापाशी आणतो. इथे येताना फ्लोरेन्सच्या सुपुत्रांचे पुतळे असणारे उघडे संग्रहालय आहे.
याच चौकात चेल्लीनीचा सुप्रसिद्ध पर्सियस मेड्युसा पुतळा आहे. आणि मध्यवर्ती मायकेल अन्जेलोच्या डेव्हीडची अकादेमिया गॅलरीतली प्रतिकृती आहे. हा डेव्हिडचा पुतळा हे मायकेल अॅन्जेलोचे सर्वोत्तम काम समजले जाते. अनेक शिल्पकारांनी डेव्हिड साकारलाय. पण प्रमाणबद्धता, शिल्पाचा देखणेपणा याबरोबरच देव्हिडच्या चेहेर्यावरचे भाव या सर्वांनी या शिल्पाला एकमेवाद्वितीय बनवलंय. मायकेलच्या अन्य पुतळ्यांप्रमाणेच हाही नग्न आहे. तो लढाईला निघालाय.त्याच्या चेहेर्यावरचा जोश, त्याची उभं राहाण्याची ढब सगळं काही बघण्यासरखं. त्याचं पाऊल तर पुतळ्याबाहेर कधीही सरकेल आणि तो चालू लगेल असं वाटत राहतं. महान कलावंताच्या महान कलाकृतीची फक्त प्रतिकृती पहायला मिळाल्याने मी ग्रूप टूरने आल्याबद्दल स्वतःला अनेक शिव्या घातल्या. इथे जाताना काही महिने आधी अकादेमिया गॅलरीचे तिकिट बूक करून ठेवावे लागते.
इथून पुढे चाल चाल चालल्यावर अर्नो नदीकाठी आमची बस घ्यायला आली.ती घेऊन गेली फ्लोरेन्सच्या सर्वोच्च मायकेल अॅन्जेलो पॉइंटला. इथून ते देखणं शहर डोळ्यात साठवून घ्यायचं!
इतकं बघूनही फ्लोरेन्स पाव भागदेखील बघितले गेले नाहिये. एका दिवसात बघणं हा या शहरावर अन्याय आहे! मी परत जाणार फ्लोरेन्सला ठरवूनच आमच्या प्रवासातल्या शेवटच्या शहराकडे म्हणजेच स्वप्नसुंदरी व्हेनिसकडे प्रस्थान ठेवलं! आत पुढच्या भागात व्हेनिस!
क्रमशः
प्रतिक्रिया
19 Jul 2015 - 1:27 pm | टवाळ कार्टा
:)
19 Jul 2015 - 1:54 pm | बोका-ए-आझम
डुकराची भविष्यवाणीही खरी होवो ही सदिच्छा!मस्त प्रवासवर्णन वाचायला मिळेल आम्हाला!
19 Jul 2015 - 2:26 pm | पद्मावति
काय अप्रतिम लिहिलय. खूप आवडलं.
फ्लोरेन्स हे शहर माझ्यामते जगातील सर्वात देखण्या शहरांपैकी एक आहे. कॅथेड्रल तर अद्भूतच आहे.
या सुंदर ठिकाणाची तेवढीच सुंदर सफर आम्हाला घडविल्याबदद्ल धन्यवाद.
19 Jul 2015 - 4:41 pm | सानिकास्वप्निल
अप्रतिम भाग झालाय हा, फ्लोरेन्स अतिशय आवडते ठिकाण.
Basilica de Santa Maria del Fiore मध्ये कॅंडल्स लाईट केल्या का? किती संदर आहे ते शँडिलियर. बॅप्टीस्ट्री ब्राँझ डोअर खूपचं संदर आहे.
डेव्हीडच्या प्रतिकृती येथे palazzo vecchio चा फोटो नाही का काढला? Loggia dei Lanzi येथे असलेल सगळे पुतळे अगदी बघण्यासारखे आहेत.
मायकेलअॅन्जेलो पॉईंटवरुन दिसणारे शहर आणि duomo डोळ्यात साठवून घ्यावे हे अगदी खरं बोललीस बघ पण मन सारखे ते सुंदर दृश्य असेच बघत रहावे हेच सुचवत असतं
21 Jul 2015 - 8:28 am | अजया
लाॅगियामधले पुतळे खरंच सुंदर.विस्तारभयास्तव बरीच चित्र आणि फोटो टाळलेत!
पण वरिजनल डेव्हिड पाहायला न मिळाल्याची खंत आहेच:(
19 Jul 2015 - 5:03 pm | स्पंदना
ब्युटिफुल!
19 Jul 2015 - 6:13 pm | नूतन सावंत
सुपर्ब अजया.तुझं निरीक्षण आणि ते जसंच्या तसं वर्णन करायची हातोटी सुरेखच.तू पुन्हा जाताना मलाही विचार . वेळ वखत जमून आलाच तर ते डुक्कर कुरवाळायला जोडीने जाऊया.
20 Jul 2015 - 12:32 am | डॉ सुहास म्हात्रे
अप्रतिम शहर, त्याचे वर्णन आणि फोटो !
डुक्कर प्रसन्न होवो हीच शुभेच्छा !
20 Jul 2015 - 12:57 am | श्रीरंग_जोशी
फटु पाहून अन वर्णन वाचून डोळ्यांचे पारणे फिटले.
पुभाप्र.
20 Jul 2015 - 4:24 am | जुइ
वर्णन देखिल नेहमीप्रमानेच उत्त्म! पुढिल भागाच्या प्रतिक्षेत.
20 Jul 2015 - 8:38 am | प्रचेतस
जबराट आहेत चित्रं आणि छायाचित्रं.
वर्णनही अतिशय सुरेख.
20 Jul 2015 - 1:22 pm | इशा१२३
नेहेमीप्रमाणेच सुरेख.
खरच आहे फ्लॉरेन्स बघायला कितिहि दिवस कमी पडतील.
एन्जेलो पॉईंट्वरून दिसणारे शहर आणि द्युमा अप्रतिमच.प्रचंड पाउस असुनहि तिथुन हलवत न्हवते.
एक देखणे शहर.
20 Jul 2015 - 1:23 pm | इशा१२३
नेहेमीप्रमाणेच सुरेख.
खरच आहे फ्लॉरेन्स बघायला कितिहि दिवस कमी पडतील.
एन्जेलो पॉईंट्वरून दिसणारे शहर आणि द्युमा अप्रतिमच.प्रचंड पाउस असुनहि तिथुन हलवत न्हवते.
एक देखणे शहर.
20 Jul 2015 - 11:15 pm | स्वाती दिनेश
लेख आणि फोटो छानच! इटलीतलं अगदी आवडतं शहर.. कलानगरीच ती! मनाने परत फिरून आलेच..
स्वाती
21 Jul 2015 - 11:35 am | सुधीर कांदळकर
या भागाचे सुरेख आयसिन्ग. आता चेरीची वाट पाहातोय.
21 Jul 2015 - 12:49 pm | खटपट्या
सर्व फोटो अप्रतीम आहेत. घड्याळाचा फोटो विशेष आवडला.
21 Jul 2015 - 2:54 pm | Mrunalini
ताई मस्तच लिहले आहेस. आमच्या इटलीच्या टुरमधे सगळ्यात जास्त आवडलेले शहर म्हंअजे फ्लोरेन्स.
ह्या पुलावरुन पुढे मायकेल अॅन्जेलो पॉइंटला जाताना डाव्या बाजुला वळल्यावर समोरच एक मोठे जिलाटोचे शॉप होते. पुर्ण १५ दिवसच्या टुरमधले सगळ्यात मस्त आणि टेस्टी जिलाटो आम्हाला तिथे मिळाले होते. मी चीजकेक फ्लेवर घेतला होता. अजुनही मला ती टेस्ट आठवते. फक्त त्या जिलाटो साठी मला परत फ्लोरेन्सला जायचे आहे. ;)
21 Jul 2015 - 3:23 pm | विभावरी
21 Jul 2015 - 3:25 pm | विभावरी
फोटो आणि लेख छानच आहे !!!!
22 Jul 2015 - 12:11 pm | अजया
धन्यवाद सर्वांचे!
22 Jul 2015 - 3:09 pm | पुण्याचे वटवाघूळ
मस्त फोटू आणि प्रवासवर्णन. आवडले.
22 Jul 2015 - 4:02 pm | पिशी अबोली
सगळे भाग एका ओळीत वाचून काढले. मस्तच!!! :)
22 Jul 2015 - 6:16 pm | कविता१९७८
मस्तच , फोटो तर छानच, नक्कीच जाशील पुन्हा
23 Jul 2015 - 11:10 am | उमा @ मिपा
भव्य, सुरेख, विलक्षण!
तुझं लिखाण त्याला साजेसं!
23 Jul 2015 - 12:15 pm | प्रीत-मोहर
ही लेखमाला माझ्या वाखुत ठेवली आहे. किती छान लिहिलय :)
26 Jul 2015 - 3:06 pm | दिपक.कुवेत
भारतवारी झाल्यामुळे सुटलेले मधले भाग एक एक करुन वाचून काढले. लीहलं तर छान आहेसच. फोटोहि खास आलेत. सध्या तरी फोटो पाहून समाधान मानून घेतो.
27 Jul 2015 - 11:16 am | सस्नेह
फ्लोरेन्सबद्दल बरंच वाचलय.
..याखेपी फोटोंपेक्षा वर्णन सरस !
27 Jul 2015 - 6:19 pm | पैसा
सगळी मालिका अप्रतिम लिहिते आहेस! हे सुंदर पुतळे बघताना आपल्याकडची हात पाय तुटलेली शिल्पे आठवत रहातात.