भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५,भाग ६,भाग ७
प्रवास करण्याची मजा किंवा सजा, बरेचदा सुखद किंवा दु:खद अपेक्षाभंग अनुभवून देतात! सॅन जिम्नियानो हे नाव प्रवासाच्या सूचीत पहिलं होतं.पण या गावाबद्दल कधीच काही ऐकलं नसल्याने कोणतीच प्रतिमा मनात नव्हती.मला वाटत होतं आठ दिवसात बारा शहरं दाखवण्याची ही प्रवासी कंपनीची क्लृप्ती आहे.रोमराज्यमध्येही अगदी थोडक्यात या गावाबद्दल लिहिलेलं होतं.त्यामुळे आज आपण सॅन जिम्नियानोला जाणार म्हंटल्यावर आमच्या मनात कसलीच उत्सुकता नव्हती.त्यामुळेच एका अत्यंत सुखद अपेक्षाभंगाने या गावाने मजा आणली.ती कशी ? वाचा आता पुढे!
अतिशय सुंदर हिरव्यागार परिसरातून आमची बस एका छानश्या घराशी आम्हाला उतरवून पार्किंगला निघून गेली.इथे प्रथम आम्ही जेवणार होतो.मग गाव फिरायचे होते.हिरवी झाडी, आल्हाददायक हवा,सुंदर बंगले बघत रमतगमत एका घर कम हॉटेलपाशी आमची गाईड उभे होती. तिच्याबरोबर प्रथमच ट्रीपमधले मस्त स्थानिक जेवण चापले!पास्ता आणि पिझ्झा नसलेले शाकाहारी इटालियन जेवण.कसलासा भात्,बीन्सची भाजी,सॅलड्,ब्रेड्स् ,फळांचे डेझर्ट असे छान जेवून त्या हॉटेलच्या अंगणात आलो तर समोर एक सुरेख स्कायलाइन उभी! सॅन जिम्नियानोचे मॅनहॅटन! निरनिराळ्या उंचीचे चौकोनी मनोरे हीच या गावाची खासीयत .ते इतके गोड दिसत असतील नव्हतं माहित!
आता ते गाव बघायची उत्सुकता वाटायला लागली. थोड्या चढावरून चालत एका लांब रूंद किल्याच्या वेशीपाशी येऊन आमची गाइड उभी राहिली.आजूबाजूचा परिसर टस्कनी प्रांताची ख्याती पटवणारा हिरवागार.या भागात द्राक्षाचं मुबलक पिक घेतलं जातं.ते मळे दूरवर पसरलेले दिसत होते.
हे गाव तटबंदीच्या आड लपलेलं जरासं चढणीवर आहे.तिथे पोहोचेपर्यंतच आमच्यातले ज्येष्ठ खेळाडू आउट झाले.पुढे तीन तास चालायचं म्हंटल्यावर त्यानी पुढे यायला नकार दिला.तसंही अगदी बाहेर नुसतं कॅफेमध्ये बसून न्याहळत राहावं असं हे टुमदार गाव.आतल्या रस्त्याला दुतर्फा अनेक लोभस वस्तू समोर मांडून ठेवलेली दुकानं.कोणाला कंटाळा येऊच नये!
ठिकठिकाणचे मनोरे आता दिसायला लागले होते.त्यांची जन्मकथा चालता चालता आमच्या गाइडने सांगायला सुरूवात केली.मध्ययुगीन काळातलं हे प्रसिद्ध नांदतं गाजतं गाव.भरभराटीला आलेलं.इथे अनेक मालदार ,जमीनदार आसामी राहायचे.गावावरचं आपलं वर्चस्व दाखवायला त्यांना काहीतरी उत्तूंग करून दाखवायचे असे.म्हणजे गावच्या राजकारणात त्यांचा आब राही.यासाठी हे मनोरे बांधायची टूम कोणा जमीनदाराने काढली.मग, "भला इसका मनोरा मेरेवालेसे बडा क्युं"! म्हणत त्याचा शेजारी त्याच्याहून उंच मनोरा बांधे.असे करता करता इथे ७२ मनोरे इथे बांधले गेले! त्यातले चौदा आता शिल्लक आहेत.यातला मेयरचा मनोरा सर्वात उंच! कारण? कारण त्याने स्वतःहून उंच मनोरा कोणीही बांधायचा नाही असा फतवाच काढला!
आतून हे मनोरे अतिशय चिंचोळे आहेत. विटांनी बांधलेले साधेसे.याच्या आत खाली जमीनदारांची ऑफिसेस असत. पहिल्या मजल्यावर बेडरूम आणि सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात वरच्या मजल्यावर स्वयंपाकघर असे.
चालतानाच पुढे एक माहिती केंद्र लागते.तिथे एका स्थानिक कलाकराराने या संपूर्ण गावाचे मॉडेल करून ठेवले आहे.इथे एक प्रदर्शनदेखील आहे.तसंच या गावतल्या प्रसिद्ध वेर्नाकिया या व्हाइट वाइनचे टेस्टिंग करता येते.तेही त्यांच्या पद्धतीने,तिथेच बनवली जाणारी एक प्रकारचे बिस्किटं या वाईनबरोबर खाउन.वाइन छानच होती! पण आता आम्ही किआन्तीच्या प्रदेशात आलो असल्याने किती बरोबर नेणार आणि किती पुरणार असा निर्मोही ;) विचार करून तिथुन बाहेर आलो.
इथुन पुढे जाताना लागते मध्ययुगीन काळातले न्यायालय.इथली फ्रिस्को प्रकारची चित्र प्रसिद्ध आहेत.यातलं एका बाजूचे
गरीब श्रीमंतांच्या न्यायनिवाड्याचे चित्र प्रसिद्ध आहे.यात वकिलांचा संत आयव्होने दाखवलाय.श्रीमंत लोक थैल्या घेऊन त्याला आमिष दाखवत आहेत.तर गरीब न्यायासाठी आशेने बघत आहे.संत मात्र लाचेला न बधता न्यायदान करतो आहे!(नुसतं वाचा.गेले ते दिवस! इटलीत कधीतरी होते हे बघून इटालियन लोकांना बरे वाटत असावे ,हे चित्र बघून!!)
दुसर्या भिंतीवर न्यायदेवता आहे.तसच इथलं मॅडोना विथ चाइल्ड हेही चित्र बघण्यासारखं आहे.
डाव्या हाताच्या भिंतीवर परत एक प्रसिध्द फ्रिस्को आहे.यात न्याय देणार्या संत खोट्याला थारा देत नाही हे दाखवलं आहे.त्याच्या एका बाजूला नागडं सत्य आहे तर दुसर्या बाजूला डोक्यावर काळा पक्षी आणि हातात सापाची काठी घेतलेलं चातूर्य आहे.
इथुन पुढे चालत आपण गावाच्या मुख्य चौकात येतो.इथे डाव्या हाताला न्युयॉर्कच्या ट्विन टॉवर्सची आठवण देणारे जुळे मनोरे दिसतात.चौकाचा एक भाग इथल्या प्रसिद्ध चर्चने व्यापलेला आहे आहे,काॅलेजिएट चर्च . हे पूर्ण चर्च अप्रतिम फ्रेस्कोजने सजलेले आहे.चौदाव्या शतकतली पण अजूनही ताजी दिसणारी,बायबलच्या जुन्या,नव्या करारातली कथा सांगणारी सुंदर रंगीत चित्रं ही इथली खासियत.प्रवासी कंपन्या हे न दाखवता वेळ वाचवण्यासाठी पुढे जायला लावतात. हे एक ठिकाण असे आहे आहे की टूर लिडरचे अजीबात न ऐकता थांबून ही चित्रं पाहावीत.
(जालावरुन साभार)
यानंतर आपण येतो पिआझ्झा देल्ला सिस्टर्ना या विभागात.या विभागात मध्ययुगातली रोमनेस्क्,गॉथिक अर्किटेक्चरचे नमूने असलेली घरं दिसतात.या चौकाच्या मध्यभागीएक विहिर आहे.तिच्यावरूनच या चौकाला हे नाव पडलंय.या भागातल्या घरांना या विहिरीतून पाणीपुरवठा होई.इथेच जगातली सगळ्यात जुनी बँक देखील आहे.
(जालावरून साभार)
(जालावरून साभार)
इथून पुढे या गावातले गल्लीबोळ पार करत जायचे.गाव खेडवळ दिसले तरी मध्ययुगीन बांधकामचा सर्वोत्कृष्ट नमूना म्हणून मुद्दाम तसे राखलेले आहे.हे संपूर्ण गाव वर्ल्ड हेरिटेज साइट जाहीर झालेले आहे. आत्ताच्या गलीबोळातून हिंडताना मात्र हा भाग कुठेतरी पाहिलाय असं सारखं वाटत होतं.त्याचा उलगडा मात्र येतानाच्या विमान प्रवासात चित्रपट बघताना झाला.माझा अतीशय आवडता चित्रपट,"लाइफ इज ब्युटिफुल" इथेच चित्रीत झालाय! "बोन्जुर्नो प्रिन्चिपेसा" करत येता जाता हिरॉइनच्या पुढ्यात तडफडणारा रॉबर्तो बेनीनी याच गल्ल्यांमध्ये फिरताना दाखवलाय.हसता हसता रडवणारा जागतिक महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरचा हा महान चित्रपट बघता बघता, आपण पाहिलेली ठिकाणं दिसायला लागली आणि या सुंदर गावाच्या माझ्या सफरीला चार चाँद लागल्यासारखं वाटून गेलं!
(जालावरून साभार)
(क्रमशः)
प्रतिक्रिया
5 Jul 2015 - 8:52 pm | एस
वा! मस्त.
5 Jul 2015 - 9:06 pm | अरवीन्द नरहर जोशि.
मस्त
5 Jul 2015 - 9:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं ! तुमच्याबरोबर आम्हीही युरोपियन मध्ययुगाची सफर केली !!
5 Jul 2015 - 9:16 pm | रेवती
वाह! फोटू तर सुरेख आहेतच पण वर्णनही झकास झालेय.
5 Jul 2015 - 9:19 pm | सानिकास्वप्निल
सुंदर लिहिले आहे, मस्तं भाग.
लाईफ इज ब्युटिफूल अतिशय आवडता चित्रपट, सुंदर तितकाच मनाला चटका लावून जाणारा.
5 Jul 2015 - 9:41 pm | पियुशा
निव्वळ अप्रतिम !पु भा प्र
6 Jul 2015 - 12:53 am | मधुरा देशपांडे
हाही भाग आवडला. सॅन जिम्नियानो इटलीच्या लिस्ट मध्ये अॅडवले आहे.
6 Jul 2015 - 12:59 am | यशोधरा
मस्त!
6 Jul 2015 - 1:33 am | बहारिन् चा खलिफा
सुंदर लेख
6 Jul 2015 - 2:51 am | पद्मावति
इटली मधल्या अगदी नवीनच ठिकाणाची ओळख.
फारच छान. वर्णन, फोटो दोन्हीही मस्तं.
6 Jul 2015 - 7:44 am | बोका-ए-आझम
कधी गेलोच इटलीला, तर तुमचे लेख बरोबर घेऊनच जाणार अजयाताई!
6 Jul 2015 - 8:52 am | नूतन सावंत
१००%सहमत.
वा अजया,सही वर्णन.आणि लाइफ इज ब्युटीफुल परत पाहून पुन:प्रत्ययाचा आनंद घेतला.
6 Jul 2015 - 1:53 pm | अजया
धन्यवाद सर्वांचे!
6 Jul 2015 - 2:03 pm | विशाखा पाटील
आवडला. हे गाव बघण्यासाठी इटलीला परत जायला हवं.
6 Jul 2015 - 3:21 pm | खटपट्या
मस्त सफर..
6 Jul 2015 - 3:35 pm | अत्रुप्त आत्मा
आवडलं.
6 Jul 2015 - 5:22 pm | स्पंदना
निव्वळ सुरेख गावं. अतिशय सुंदर चित्रे आणि खुमासदार वर्णन!!
6 Jul 2015 - 5:50 pm | Mrunalini
ताई खुप छान लिहले आहेस गं... आता ही मुव्ही पण बघायला पाहिजे मला.
6 Jul 2015 - 5:54 pm | सुधांशुनूलकर
शेवटून तिसर्या आणि दुसर्या फोटोतली विहीर आणि तो चौक ओळखीचा वाटत होता, शेवटचा फोटो पाहिल्यावर ओळख पटली. 'लाइफ इ ज ब्यूटिफुल' हा माझाही अत्यंत आवडता चित्रपट.
बाकी सफर मस्तच. भोज्या केल्यासारखी प्रेक्षणीय स्थळं न पाहता त्या देशाची / ठिकाणची संस्कॄती, खाद्यसंस्कॄती इ. मस्त अनुभवली आणि मांडली आहे.
6 Jul 2015 - 7:50 pm | अजया
अगदी बरोबर.त्या विहिरीच्या भागापासुनच पुढे सर्व ओळखीचं वाटत जातं!
6 Jul 2015 - 6:41 pm | प्रचेतस
जबराट झालाय हा भाग.
इमारतींच्या शैली, चित्र आणि तुमचं वर्णन..सर्वच सुरेख.
6 Jul 2015 - 8:03 pm | पैसा
लिहिलेलं आणि चित्रं! झक्कास एकदम!
6 Jul 2015 - 8:24 pm | सूड
सहीच!!
6 Jul 2015 - 8:29 pm | स्वाती दिनेश
छान वर्णन!
स्वाती
7 Jul 2015 - 12:13 am | जुइ
नेहमीप्रमाणेच अफलातून लिहिले आहे. उंच मनोरा बांधायची स्पर्धा खासंच!
7 Jul 2015 - 5:11 am | श्रीरंग_जोशी
नेहमीपेक्षा वेगळ्या गावाचे वर्णन आवडले. लाइफ इज ब्युटिफुल चित्रपट पाहिला नसल्याने तो आता नक्की पाहीन.
7 Jul 2015 - 9:43 am | उमा @ मिपा
परवा विचारणार होते तुला, पुढचा भाग कधी? पण तू किती बिझी आहेस माहिती होतं म्हणून नाही विचारलं.
अगदी भरून पावल्यासारखं झालं हा भाग वाचताना. अप्रतिम!
7 Jul 2015 - 12:00 pm | सस्नेह
मस्त चाललीय सफर! वाचतेय...
7 Jul 2015 - 3:52 pm | अजया
धन्यवाद सर्वांचे__/\__
7 Jul 2015 - 4:15 pm | स्पा
याक्दाम झ्याकास