सैतानाचे मनोगत

येडा खवीस's picture
येडा खवीस in काथ्याकूट
2 Dec 2008 - 9:10 am
गाभा: 

( नेहमी देव श्रेष्ठ आणि दानव वाईट हेच गृहित धरले जाते आणि त्याचं प्री-फोर्मेटेड विचारातुन आपण आपलं आध्यात्म पुढे चालवतो.. हे कितपत खरं आहे ते माहित नसतानाही सतत केवळ देव श्रेष्ठ आणि दानव वाईट याच भुमिकेत आपण रहातो त्यामुळे कधीतरी एकदा "तिकडची" बाजु काय आहे ते जाणुन घेण्याची इच्छा झाली....आणि हे सुचलं...बघा कसं वाटतय तुम्हाला, पटतय का?) जर हे मनोगत वाचल्यावर तुम्हाला मी यातुन देवांविषयी वाईट वक्तव्ये केली आहेत असं वाटलं तर मी आधिच क्षमा मागतो. पण हे मनोगत पुर्णपणे सैतानी विचारधारणेतुन बघितलं तर पटेल तुम्हालाही....सद्यपरिस्थितीशी किती मिळतेजुळते आहे की नाही ते बघा.....

नमस्कार,

या काळ्या शिसवी सिंहासनात बसलेला हा महाभयंकर दिसणारा कोण बरं हा माणुस? असा विचार करताय ना....कुठेतरी बघितल्यासारखा वाट्ट्तोय का चेहरा? बरोब्बर...मीच तो....सैतान..तुमच्यातल्या सगळ्या टिपिकल बाबा-बुवा आणी संंतांनी दुषणे देऊन बदनाम केलेला मीच तो....तुमच्या देवाच्या टीमचा प्रतिस्पर्धी...मानवी समाजाच्या उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यात दर लढाईत "शेवटी" हरलेला मीच तो महाभाग...महाभाग नाही....महाअभागी म्हणा हवं तर....अरे हो बसा बसा, उभे का....ते जे डाव्याबाजुला छोटे सिंहासन आहे न त्यावर बसा, मानवी चामडे आणि बकऱ्याच्या कातडीच्या कॉम्बिनेशन मधुन त्याची अपहोल्स्ट्री बनवलीये मी, आणि सिंहासनाच्या लाकडाऐवजी हाडे लावलीयेत..बसा की....अरे हो हो....क्षमा करा, तुमच्या दृष्टिने हे घाण, अशुभ, वाईट...मग उभेच रहा....अर्थात त्यात तुमचीही चुक नाहीच म्हणा....तुमचं प्रोग्रॅमिंगच तसं झालय त्याला तुम्ही काय करणार?....शुभ-अशुभ, चांगलं-वाईट, नैतिक-अनैतिक, पांढरं-काळं असा जन्मजात फरक करण्याची सवयच आहे तुमच्या मेंदुला म्हणुन हे सगळ होतं....असो....सैतान म्हणजे वाईट, अधोगतीला नेणारा, दुष्ट अशीच इमेज बनवलीये माझी त्यांनी... काय करणार आम्ही पडलो गरीब, अहो वरवर कितीही क्रुरतेचा आव आणला तरी आमच्या टीमचे खेळाडु हे शेवटी हरतातच....तशी योजनाच आहे ना....

रावण, दुर्योधन, लादेन, हिटलर ही सगळी माझीच रुपे आहेत. एका विशिष्ट ध्येय्याने प्रेरीत होऊन मीच त्यांच्यामार्फत वेगवेगळ्या रुपात वावरत होतो. पण तुमचे ते डिझायनर कपडे घालणारे देव...कृष्ण, राम, दत्त छे छे!!! आदिमायेने माझ्यावर खुप अन्याय केलाय..अरे आम्ही दोघेही म्हणजे मी आणि तुमचा देव ही दोघेही तिचीच लेकरे आहोत..."विश्वाचा समतोल ठेवण्यासाठी तुला बनवतेय" असं सांगुन तिने माझ्यावर मोठा अन्याय केलाय. स्वत:च्या दोन्ही मुलांना एकाच नाटकात दोन वेगवेगळे म्हणजे चांगले आणि वाईट रोल देणारी ती कुमाता आहे असंच मी म्हणेन...मागे एका युध्दात तर मलाच मारुन स्वत;ला "महिषासुरमर्दिनी" म्हणवुन घेणारी तिच्यासारखी आई तिच रे बाबांनो!!! मी काय करु...तुमच्या भाषेत म्हणायचं तर माझे "जेनेटिक्स" हे मुळातच तसं बनलय, त्याला मी तरी काय करणार? हा माझा महाल बघताय ना....डावीकडे मानवी रक्ताने बनविलेली खास मदिरालये, ही कातड्य़ांची सिंहासने, शेजारच्या दालनातले द्युताचे भव्य मंडप, त्यापलिकडचे वेश्यालय हीच माझी काय ती प्रॉपर्टि आणि इस्टेट...मी असाच म्हणजे असाच रहाणार बदलणार नाही.

शेवटी "पर्सेप्शन" महत्वाचे....मी म्हणतो ना...तुमचं प्रोग्रॅमिंगच तसं झालय...तु लहानपणी जेव्हा दंगामस्ती करायचास ना तेव्हा तुला घाबरवणारा "अंधारतला बागुलबुवा" मीच होतो रे...तुला पहिल्यांदा मदिरालयात घेऊन जाणारा,वेश्येकडे नेणारा, जुगारात हरवणारा आणि पुन्हा खेळण्यासाठी भाग पाडणारा तुझा तो मित्र आठवतोय....अरे मीच होतो त्याच्या रुपात....हे मला आवडतय असं तुला वाटतय का? छे छे...सतत लोकांचे शिव्याशाप घेत जगणं मला देखील आवडत नाही....पण मी असाच रहाणार बदलणार नाही....तशी योजनाच केलीये त्या महामायेने.....देव चांगले आणि आम्ही वाईट...मी केवळ तुझ्या धर्माविषयीच बोलतो असं नाही, प्रत्येक धर्मात आम्ही वेगवेगळ्या रुपात आहोतच...पण त्यात "तो" हिरो आणी "मी" व्हिलन...शक्यता किंवा ज्याला पॉसिबिलिटिज म्हणतात त्याला मर्यादा घातलेल्या आहेत तुम्हीच. मला एक सांग, मेल्यावर स्वर्ग आहे, त्यामुळे वाईटापासुन लांब रहा हे तुमचे संत बेंबीच्या देठापासुन ओरडुन सांगतात ना, त्यांच्यापैकी एकतरी आलाय का परत "स्वर्गाचे लाईव्ह टेलिकास्ट" द्यायला...अरे येईलच कसा? असं काही नसतचं मुळी....

मी म्हणतो मुळात "चांगलं आणि वाईट" या कन्सेप्टच मुळी तुम्ही "पाप पुण्याशी" जोडता तिथेच मोठ्ठा प्रॉब्लेम येतो. हे जे काही मी करतो ते पाप आणि देवाची पुजाअर्चा केली की पुण्य ( म्हणे स्वर्गाचे दरवाजे उघडतात) बाष्कळपणा आहे दुसरं काय!!! अरे असं काही नसतं....इथेही स्वर्गच आहे की नाही बघ....शेजारचा पडदा नुसता बाजुला करुन बघ, जुगारात हरलेले पुन्हा खेळतात आणि जिंकलेले पुन्हा हरतात किती आनंद दिसतोय बघं त्यांच्या चेहऱ्यावर...बाजुच्या वेश्यालयातल्या त्या सुंदर-कमनीय बांध्याच्या, मादक तरुणी बघ एकदा, त्या इंद्राच्या दरबारातल्या अप्सरा झकं मारतील त्यांच्यापुढे....जा घे मनसोक्त उपभोग त्यांच्या जवान शरिराचा, मद्याचे चषक रिचव तुला कोणीही ओरडणार नाही, पापाची भिती घालणार नाही.....अरे बघतोय्स काय शुंभासारखा...जा!!
ओह हो!!! कसं जाणार तिथे...ते म्हणजे काहीतरी "वाईट्ट" असतं नाही का? मुर्ख माणसा, ...आम्ही वाईट का? याचं उत्तर कोणाकडेच नाहीये समजलं...हे वाईट आणि ते चांगलं हे ठरवणार कोण? तुम्ही, तुमचे संत, की तुमचे देव यांनी सांगीतलं ते चांगलं आणि बाकीचं वाईट!! काय रे, त्या तुमच्या देवाच्या राजाच्या दोन मिनिटे शरिरात शिरुन गौतम ऋषिंच्या पत्निचा उपभोग घेणारा महान आत्मा मीच होतो....काय वाकडं केलं त्या इंद्र्याने माझं? पण आयुष्यभर स्वत:चीच बदनामी झाली ना?...पण तो काय बाबा देवांचा राजा, त्याला सगळं माफ....आणि आम्हाला शिक्षा कायमची...असुदे!! आमच्या कुमातेनेच हे रचलेले कुभांड कधीतरी एकदा नाही तिच्यावर आणि त्या देवावर उलटवलं तर नावाचा "सैतान" नाही....

सध्या माझं एक बरं चाललय...साधु आणि संत जे पुर्वीचे टाईम टेस्टेड होते ना, त्यांच्या शरिरात शिरायला वाव नव्हता, अरे ते रे तुमचे साईबाबा,स्वामी समर्थ वगैरे मंडळी....त्यांना आपण जरा टरकुन होतो...लई पॉवरबाज माणसं होती (अजुनही आहेत, मी कधी त्यांच्या समाधिच्या आसपास फिरकत नाही) पण सध्याचे जे बाबा,बुवा आणि मंडळी आहेत ना...ती माझंच काम मस्त करतायतं, " मुंह मे राम बगल मे छुरी" त्यामुळे मला सध्या जरा आराम आहे. लास-वेगास ला ओव्हरलोड आहे कामाचं, तुमचा तो काय जेम्स बॉंड का कोण तो "कसिनो रोयाल"मध्ये पत्ते पिसताना बघितल्यावर लोकांना पण जाम स्फुरण आलं आता खुप जणं खेळतात पत्ते आणि स्वत:चे आयुष्य पणाला लावतात...खुप मजा येते....अरे तुमच्या त्या सार्वजनिक गणेशोत्सवात पण बाप्पाच्या मुर्तीच्या मागे मीच खेळवतो पत्त्यांचे फड, दिवाळीत तर लक्ष्मिपुजनाला "जुगार" खेळण्याची मजेशीर प्रथा पाडलीये कोणीतरी....त्यामुळे सध्या दिवस बरे चाललेत माझे....सत्ययुगात कोपऱ्यात पडलेला मी आता हिरो बनलोय कलियुगात!!!....चमडीचा धंदा तर सही चाललाय, मुळात माणुस म्हणजे पुरुष साला स्खलनशील...त्याच प्रवृत्तीचा फायदा घेऊन रंडीखाने पण जोरात चाल्लेत.....दारुचं तर विचारुच नको, रोज एक नवा ब्रॅंंड बाजारात कसा येईल याची तजवीज मी करतो आता तर ब्लेंडीग हा एक नवा कोर्स करता येतो...ऑफिशिअली, "दारु पिणे म्हणजे प्रतिष्ठा"हे समीकरण ज्या महाभागाने बनवले त्याचे तर शतश: धन्यवाद....एकंदरीत सगळं आलबेल आहे!!

तुला मी हे का सांगतोय ते समजतय का?...एवढ्याच करता की मी हरलेलो नाही, आणि हरणारही नाही...या नव्या युगात, नव्या जोमाने आणि प्रतिष्ठेने वावरणार आहे मी.. देवांच्या दोन पावलं पुढे असेन मी....एक वेळ अशी येईल की माझीही मंदिरे होतील, माझी सुक्ते लिहिली जातील, माझे स्तवन तुम्ही गाल मुक्तस्वरात!!!.....

नामस्मरण, पुजाअर्चा,स्वर्ग, मोक्ष ही सगळी थोतांड आहेत....तुमच्या वेदमहर्षिंनी लिहिलेली बाष्कळ विधाने दुसरं काय? असं काहीही नसतं, सत्य मी सांगतो ते ऐक, सत्य इतकंच आहे ते म्हणजे तुमचे "अस्तित्व" तुमचा "एक्झिसस्टन्स"....वर्तमान....तो जगा तुम्हाला हवा तसा....आनंदाने....मजेने....हेच सत्य आहे. "जिथे उपभोग तिथे मी" हे माझं समीकरण आहे....माझा अस्तित्वापुरते बनवलेले....एक त्रिवार सांगतो मी हरणार नाही आणि संपणार तर नाहीच नाही.....

लौकीकार्थाने मला नेहमी प्रत्येक स्टोरीत संपवतात आणि तुमचा हिरॊ जिंकतो असं दाखवतात, पण तसं नसतं...संपतं ते केवळ वर्तमानातलं नाटक...तुम्हाला बरं वाटावं म्हणुन, शेवटी सत्याचा, देवाचा विजय होतो हेच तुमच्या मनावर वारंवार ठासवलं जातं...तुला सांगतो, प्रत्येक नाट्यात मी सुध्दा देवासारखाच लढा देतो. पण ही आदिमाया त्याला ऐनवेळेस काहीतरी "एक्स्ट्रा ऑर्डिनरी" शस्त्रे पुरवते आणि मला संपवते...हे असं का? तर याला त्यांच्या दृष्टीने सोयिस्कर कारणे काय, तर मी अहंकाराने, मदाने संपतो...आणि म्हणे मी संपायलाच हवाय....नॉनसेन्स!!! मग मला केलाच का निर्माण...तर म्हणे, माझ्याशिवाय देवाचे व्यक्तिमत्व उठुन दिसत नाही. बरोबर आहे, जोपर्यंत काळी बॅकग्राउंड नाही तो पर्यंत त्या पांढऱ्या रंगाचे कौतुक करणार तरी कोण...खरंय....अरे पण माझा विचार करा की एकदा तरी. तुला सांगतो, मी सुध्दा सध्या डिप्लोमॅटिक स्ट्रेटेजी अवलंबलेली आहे. तुमच्या तमाम फॅशन डिझायनर्सना गाठुन म्हणजे त्यांच्यावर माझा प्रभाव टाकुन काळ्या रंगाचं महत्व पटवलय की नाही बघ....आता जो तो माझ्या "ब्लॅक इज हॅपनिंग" थिअरी ला बळी पडतोय की नाही बघ...एकवेळ येणारच आहे..."ज्योतिर्मा तमसो मय"ची...सगळीकडे अंध:काराचे साम्राज्य पसरवेन.... याला तु तुझ्या नेहमीच्या स्टाईलने अहंकार म्हणशील, पण मी याला "ऍटिट्युड" म्हणतो...तो असल्याशिवाय विजय मिळत नाही कोणालाच...

एक दिवस असेल माझाही........अंध:कारमय, तमसोमय....सुर्य झाकोळेल, तेज संपेल, सर्वत्र मीच उरेन....नितीमत्ता नावालाही उरणार नाही. मद्याचे चषक धुंद भरुन वहात असतील, द्युताचे फड रंगात येतील, वेश्यालयांना ग्लॅमर आलेलं असेल, संसारांची राखरांगोळी झालेली असेल. कोणीच कोणाचा नसेल..लोकांना फक्त शस्त्रांचीच भाषा समजत असेल. नातीगोती संपलेली असतील. जो तो एखाद्या स्वतंत्र बेटासारखा रहात असेल. मंदीरे, प्रार्थनास्थळांची ओसाड वाळवंटे बनतील....कतली, मांसाहार, रक्तपात होतील. तुमच्या मंगलमय वेदघोषांऐवजी बंदुकांच्या फैरींचेच निनाद ऐकु येतील. स्तोत्रांच्या पवित्र स्वरांऐवजी, बेसुर-बेताल संगीताच्या ठेक्यावर लोकं धुंद होऊन नाचतील. तुमच्या वेदांवर धुळीची पुटे चढतील आणि माझे नवीन उपभोगाचे तत्वज्ञान उदयाला येईल....

अरे तरीही अंतस्थ एक भिती सतत असेल रे मला....न जाणॊ कोणी "अभ्युथानं अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम"चा शंखनाद केला तर....तो परत येईल का रे? हीच असुरक्षिततेची भावना मला नेहमी संपवत आलीये....पण या खेपेस नाही..सत्ता, संपत्ती, मायेचा प्रचंड झंझावात आता निर्माण करेन की त्यात सगळ्या सत्य, न्याय्य, नैतिक, उदात्त विचारांचा पालापाचोळा होऊन उडुन जाईल...सगळंच संपेल आणि शिल्लक राहील तो मी आणि माझं तत्वज्ञान...नवे उपभोगाचे, विचारशुन्यतेचे, दहशतीचे, अनाचाराचे तत्वज्ञान..

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

2 Dec 2008 - 10:30 am | घाशीराम कोतवाल १.२

सैतानी मनोगतातल आवड्लेल वाक्य
"ऍटिट्युड" असल्याशिवाय विजय मिळत नाही कोणालाच

मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...

ऊचापत्या's picture

2 Dec 2008 - 11:31 am | ऊचापत्या

मुम्बई मधे जे घडले ते एका समाजाने वर्शानुवर्शे , अत्त्यन्त भ्रश्ट, बेजबाब्दार आणि भोन्गळ अशी राज्कीय अणि प्रशासन व्यवस्था सहन केल्या बद्दल मोजलेलि किम्मत आहे.
आता सर्व जण राज्कीय नेत्यान्ना शिव्या घालत आहेत. अर्थात ते योग्यहि आहे. पण त्या बरोबरच अतीशय अकार्यक्शम पणे काम करणार्या प्रशासकीय अधिकर्यान विशयी कोणीच काहि बोलताना दिसत नाहि. वास्तवीक हे अधिकारि,( सगळे नाहि त पण त्यातले बरेच), हे भ्रश्ट अस्तात आणि स्वताहाला राज्कारण्यान्चे गुलाम बनवून घेण्यात धन्न्यता मानतात.
त्यात किरण बेदि किन्वा हेमन्त करकरे एखादेच निघतआत. बाकि सगळे एका माळेचे मणि. आपण या भ्रश्ट अधिकार्यान विरुद्ध आवाज का उठवत नाहि?
का सोडतोय यान्ना?

परिकथेतील राजकुमार's picture

2 Dec 2008 - 11:34 am | परिकथेतील राजकुमार

लेख वाचला आणी कधि काळी वाचलेले "For The World I Am An Atheist.....But For God I Am The Loyal Opposition." हे वाक्य का कोणास ठाउक झटकन आठवले !
मनोगत फारच छान आहे, आणी पहिल्या पासुन आम्ही बुवा कर्ण आणी सुयोधनाच्या (दुष्ट लोक दुर्योधन म्हणतात) पक्षातले त्यामुळे वाचताना अजुनच मज्जा आली. खुप दिवस इच्छा आहे कि कर्ण आणी सुयोधनावर लिहावे, लवकरच लिहिन आता.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

अनिल हटेला's picture

2 Dec 2008 - 12:00 pm | अनिल हटेला

>>>एक दिवस असेल माझाही........अंध:कारमय, तमसोमय....सुर्य झाकोळेल, तेज संपेल, सर्वत्र मीच उरेन....नितीमत्ता नावालाही उरणार नाही<<<

खरये बाबा सैताना !!
लवकरच ही भविष्यवाणी खरी होनार आहे !!

जमलये मनोगत ...बढीया !!!!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

येडा खवीस's picture

5 Dec 2008 - 12:04 pm | येडा खवीस

धन्यवाद!!! पण मला अजुन काही प्रतिक्रिया ऐकायला आवडेल

-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com