ह्याआधी:-
कृष्णबन- १
कृष्णबन- २
आता धबधबा, तो ही जर्मनीतला सर्वात उंच धबधबा बघायचा होता. आधीच धबधबा म्हटलं की कोसळत,धबाबा येणार्या पाण्याच्या धारा,तो पाण्याचा खळाळता आवाजच संमोहित करतो, इथे तर जर्मनीतला सगळ्यात उंच धबधबा पहायचा होता. १६३ मी. उंचीवरुन कोसळत तो गुटाख नदीकडे धाव घेतो. उत्साहाने आणि उत्सुकतेने आम्ही चालायला सुरूवात केली. थोडं पुढे गेल्यावर एका चौकात लाकडाची मोठ्ठी खारुताई ऐटीत शेंगा खाण्याच्या पोझमध्ये बसलेली दिसली आणि तिथेच थोडं पुढे धबधब्याकडे जाणारी मोठ्ठी पाटी दिसली. इथे मात्र बरीच चहलपहल जाणवली. आता लोकं दिसायला लागले होते. पाण्याचा खळाळता तो परिचित आवाज यायलाच लागला होता. एक चढण चढून वर गेलो आणि एका कोपर्यात अजून एक लाकडाची खारुताई तशाच ऐटीत बसलेली दिसली. समोरच तिकिटखिडकी. तिकिटांबरोबरच तिथे असलेल्या खारुताईंना खाऊ म्हणून भुइमुगाच्या शेंगाचे पुडे विक्रीला ठेवलेले होते, गंमत वाटली.
आत शिरता शिरताच खारुताईंची टोळीच दिसते. आता त्या लाकडी खारुतायांमागचं कारण समजलं. धबधब्यावर जवळजवळ रोजच खूप लोकं जातच असतात. त्यांना पाहून पाहून सगळ्या खारुताया माणसाळल्या असाव्यात. धीटपणे पुढे येऊन पायात शेंग पकडून खात होत्या बाईसाहेब. पण इथली खारुताई अंगापिंडाने जरा थोराडच असते ,शेपटी जरा जास्तच झुबकेदार.. आणि पाठीवर 'रामाची बोटंही' नसतात. चार शेंगा त्यांना घालून आम्ही चढायला सुरुवात केली. इथे चढणीचे दोन रस्ते आहेत. एक सोपा पण लांबचा , दुसरा कमी अंतराचा पण जास्त चढणीचा. आमच्या पुढेच असलेला आजीआजोबांच्या ग्रुपनेही कमी अंतराचा रस्ता निवडलेला पाहून आम्हीही त्यांच्या मागे चढायला सुरूवात केली.
पक्षांची किलबिल, खारींचा आवाज आणि खळाळत्या पाण्याचा आवाज, सगळे एकमेकात मिसळत होते. चढणीच्या बाजूने साधेनेचे, सिल्वरफर्न उगवलेले दिसत होते. पाइन ,चिनार आणि थुजा तर होतेच. सात टप्प्यात हा धबधबा कोसळतो आणि त्याच्या कोसळण्याच्या प्रत्येकच स्टेजला त्याला भेटायला लाकडी प्लॅटफॉर्म, व्हरांडे केलेले आहेत. तेथून त्याचे मनोरम दृश्य पाहताना खरंच हरखून जायला होते. त्याच्याशी अगदी गप्पा मारत आपण वरपर्यंत जातो. जोडीला सिल्व्हर फर्न, पाइनची हिरवाई असते आणि खारींचे,पक्षांचे आवाज सोबतीला असतातच. खाली उतरतानाही त्यांची सोबत असतेच आणि आपल्यासारखेच येणारे लोकंही हसून हॅलो करतात. एकमेकांचे फोटो काढायला उत्साहाने तयार असतात. आणि एकीकडे माहितीची देवाण घेवाणही होते. काही जणांच्या मते बेरेस्टेसगाडन ओबरसे येथला रोथबाखफाल हा जर्मनीतला सर्वात उंच धबधबा, तो तर ४७० मी वरुन कोसळतो आणि हा फक्त १६३ च मी वरून .. अधिक खोलात न शिरता इथला निसर्ग, त्याची सुंदरता निरखत बराच वेळ थांबलो. पण वेळेची मर्यादा होतीच. नाइलाजाने खाली उतरून आलो.
लगेचच पुढे गेले की समोरच्याच चौकात "Haus der 1000 Uhren" म्हणजेच "House of 1000 clocks" आहे. बाहेरच एक मोठेसे कुकु घड्याळ आहे आणि दुकानाच्या वर एक अस्वलबुवा पाठीवर दुरुस्तीचे घड्याळ घेऊन दोरावरुन चढतो आहे. एका टेबलावर एक घड्याळजी अस्वल चष्मा लावून दुरुस्तीचे काम करतो आहे, तर अस्वलीणबाई उभ्या राहून, हातवारे करत काहीतरी सांगत आहेत. शेजारच्या झोपाळ्यावर बेबी अस्वल दर १५ मिनिटांनी झोके घेते. ती झोके घ्यायला लागली की दोरावरचा मॅकेनिक घड्याळजी दोर चढू लागतो, शेजारच्या दोन मोठ्या खिडक्यातून कुकु डोकावतात आणि खालच्या मोठ्ठ्या घड्याळात सव्वा, साडे किवा पावणे.. वाजतात. जेव्हा तास पूर्ण होतो तेव्हा जितके वाजलेले असतील तितक्यांदा कुकु डोकावून ओरडतात. ते सगळं बघायला इतकी मजा येते. त्या घरासमोरच्या फूटपाथवर एक लहानशी कॉफीची टपरी आहे. छ्त्र्या वगैरे उभारुन, खुर्च्याही टाकल्या आहेत तिथे. मस्त कॉफी पित हा खेळ बघण्यात वेळेचे भान समोर घड्याळ असूनही राहत नाही. अजून १५ मिनिटे, अजून १५ मिनिटे असं करत आपण तेथेच खिळून राहतो.
दुकानाच्या आत शिरले की बाहेरच्या दुप्पट वेळ आत घालवतो. आतमध्ये तर सहस्त्र कुकुंचे आवर्तन चालू असते. आपल्या घराच्या भिंतीला आणि आपल्या खिशाला परवडेल असं कुकु क्लॉक घेतोच घेतो आणि मगच पुढे जातो. हे दुकान जिथे आहे तो ट्रिबेर्गचा मेन रोड! ह्याच्या आजूबाजूलाही कुकु क्लॉक्सची आणि लाकडी कारागिरीच्या शोभेच्या वस्तूंची, सुविनियरांची दुकाने आहेत. घनदाट जंगलांमुळे भरपूर लाकूड उपलब्ध आणि कडाक्याच्या, हाडे गोठवणार्या थंडीत घरात बसून दुसरं करता येण्यासारखं काय होतं? १७ व्या शतकातला हिवाळा इतका वाईट होता की कधी कधी त्या थंडीत गोठ्यातून घरापर्यंत आणताना दूधही गोठायचे. त्या काळात मनोरंजनाची साधनं तुटपुंजी, नुसते घरात बसून काय करणार? त्यामुळेच येथे लाकूडकामाचा व्यवसाय बहरला.
सन १६८० च्या आसपास एक काचव्यापार्याने झेकोस्लाव्हाकियातल्या बॉहमेन भागातून एक लाकडी घड्याळ आणले.त्याला लंबक नव्हता तर लाकडाचा तुकडा (त्याला 'वाग' म्हणत) घड्याळाच्या डायल वर पुढेमागे होत होता. घड्याळांचा व्यवसाय त्यावेळी ऐन बहरात होता.आपल्या व्यवसायात नाविन्य आणण्यासाठी ह्या नवीन प्रकारच्या घड्याळात कृष्णबनातल्या घड्याळजींनी अनेक सुधारणा केल्या. थंडीच्या दिवसात हे उअरश्लेपर्स घड्याळे बनवित आणि वसंतात ते विकायला देशोदेशी जात असत. सन १७३८ मध्ये म्हणजे जवळपास ५० वर्षांनंतर आंतोन केटरर ह्या घड्याळजीच्या कल्पक डोक्यात कुकुने कुहू केले आणि आजही तिचे कोकिळगान कृष्णबनातल्या घड्याळातून फक्त वसंतच नव्हे तर सर्व ऋतूंत चालू आहे.
पोटात ओरडणार्या कुकूंना शांत करण्यासाठी समोरच्याच उपाहारगृहात काफे उन्ड कुकन साठी आत शिरलो. एकीकडे पाण्याची खळखळ आणि कुकुगान ऐकत कृष्णबनात बसून ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री आणि कॉफी! आणखी काय हवं?
प्रतिक्रिया
1 Jul 2015 - 6:06 pm | पद्मावति
वाह, हाही भाग मस्तं जमलाय.
1 Jul 2015 - 6:36 pm | उमा @ मिपा
खारुताई, धबधबा, house of 1000 clocks मस्तच!
लाकडी प्लॅटफॉर्मची व्यवस्था अगदी सोयीस्कर.
पण यावेळी एक तक्रार - पहिल्या भागाच्या सुरुवातीलाच अख्ख्या केकचा फोटो दिला होता ना, मग परत पेस्ट्रीचा इतका tempting फोटो द्यायला हवाच होता का?
1 Jul 2015 - 6:49 pm | सूड
झेऽऽर म्हणजे झेऽऽरच श्योन!! ;)
2 Jul 2015 - 6:51 am | सुधीर कांदळकर
दृश्ये आणि स्वप्नवत लिखाण. अविस्मरणीय.
2 Jul 2015 - 7:20 am | अजया
काय मस्तंय गं सर्वच.तो धबधबा,वनराई अस्वलबुवांचं कुकू क्लाॅक!फोटोही छान आहेत,धबधब्याचे.
2 Jul 2015 - 11:03 am | जिन्गल बेल
खूप छान...आमची ट्रिबेर्ग ट्रिप आठवली....
खूप मस्त आहे हा प्रदेश...
2 Jul 2015 - 11:15 am | स्मिता श्रीपाद
काय फोटो आहेत सगळे...मस्त मस्त मस्त...
केकचा ईतका टेम्प्टींग फोटो दिल्याबद्दल जाहीर निषेध !!! ;-)
2 Jul 2015 - 11:40 am | कविता१९७८
सुंदर वर्णन , छान फोटो , ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री तर मस्तच
2 Jul 2015 - 2:23 pm | एस
फारच छान!
2 Jul 2015 - 4:28 pm | सर्वसाक्षी
स्वाती
ही भ्रमंतीही आवडली.
2 Jul 2015 - 5:12 pm | अत्रुप्त आत्मा
लेख आवडलाच..
पण शेवटच्या फोटूनी वाट लावली आहे. :-/
आता पूना ब्येक्री गाठणे आले.
3 Jul 2015 - 1:41 am | मधुरा देशपांडे
मस्त. आम्ही ट्रिबेर्गला गेलो तेव्हा जरा जास्तच अपेक्षेने गेलो आणि त्यामानाने पाणी खूपच कमी वाटले, त्यामुळे थोडी निराशा झाली होती, पण तो परिसर सुंदर आहेच. छान लिहिले आहेस.
3 Jul 2015 - 1:07 pm | स्वाती दिनेश
हिमवर्षा आणि पावसाचे प्रमाण ह्यावर धबधब्याचे पाणी कमी जास्त होते असे समजले. ह्या वेळी छान, भरपूर पाणी होते. मागे एकदा गेलो असताना कमी पाणी होते.
स्वाती
3 Jul 2015 - 4:50 am | नंदन
वर्णन आणि फोटो - दोन्ही खास!
ह्या वाक्यात (अभावितपणे?) कोटी जुळून आली आहे :)
3 Jul 2015 - 7:08 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
स्क्विरल्स खुप मस्तं !!
3 Jul 2015 - 1:43 pm | जगप्रवासी
कुठे ते निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी बनवलेले लाकडी प्लॅटफॉर्म आणि कुठे आपल्या इथे धबधब्याजवळ फोडलेल्या दारूच्या बाटल्या. जाऊ दे पण तुमचा लेख छान, फोटो आणि धावत वर्णन आवडल
3 Jul 2015 - 1:46 pm | सानिकास्वप्निल
वाह!! वाह!! काय मस्तं भाग आहे हा, फोटो ही सुरेख.
अस्वलाचे कुकू क्लॉक गोडुले आहे आणि शेवटच्या फोटोंनी तोंपासु.
खारुताई, धबधबा सुपर्ब !!
3 Jul 2015 - 4:46 pm | पैसा
मस्तच!
3 Jul 2015 - 5:16 pm | स्मिता.
कृष्णबन आणि त्याच्यासारखीच लेखमाला, दोन्हीही सानिका म्हणते तसे सुपर्ब!!
3 Jul 2015 - 5:49 pm | विवेकपटाईत
मस्त वर्णन,न जाता ही अश्या लेखांमुळे जाण्याचा अनुभव घेता येतो.