कृष्णबन- ४

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in भटकंती
6 Jul 2015 - 3:13 pm

ह्याआधी:-
कृष्णबन- १
कृष्णबन- २
कृष्णबन- ३

.

हजारी घड्याळांच्या घरासमोरुन एक फुलराणीवजा गाडी जाताना दिसली. चौकशी केल्यावर समजले की ती ट्रिबेर्गदर्शनाची गाडी आहे. लगेचच तिच्या थांब्यावर पुढची फेरी कधी आहे ते पाहिले. दहाच मिनिटात पुढची गाडी असल्याचे वेळापत्रक दाखवत होते. त्या फुलराणीत बसल्यावर जर्मन आणि इंग्लिश दोन्ही भाषांतून काँमेटरी सुरू झाली. गावातून, डोंगरातल्या रस्त्यातून आमचा फेरफटका सुरू झाला. उतरत्या छपरांची लाकडी घरे, रंगीत फुलांच्या कुंड्यांनी सजवलेले व्हरांडे, हिरव्या पाचूच्या अंगणातले सुबक फुलवाफे तर एकीकडे उंच उंच डोंगरमाथ्यावर आकाशाला हात लावू पाहणार्‍या, सूर्याला पोहोचू न देणार्‍या पाईन,चिनारांची दाटी.. कय आणि किती पाहू असं झालं होतं. ट्रिबेर्ग रेल्वे स्टेशनाबाहेर आमची फुलराणी थांबली. गर्द बनातले अगदी चिमुकले स्टेशन, तेथे ठेवलेले जुने रेल इंजिन, आजूबाजूच्या हिरव्या डोंगरमाळा, त्यावरची लाल छपरांची घरे.. सगळेच विलोभनीय!

.

.

राट हाऊस म्हणजे टाऊन हॉलची टुमदार इमारत, त्यासमोरची फुलांची सजावट इतकी सुंदर आहे. इतक्या देखण्या सरकारी इमारती युरोपातच पहायला मिळतात. म्युनिकच्या राट हाऊसची इमारत फुलांनी सजलेली असते तर कलोनचे राटहाऊस मध्ययुगातल्या खुणा जपत असते तर फ्रांकफुर्टचे राटहाउस नेपोलियन एक रात्र राहिल्याचा इतिहास जपत असते तर ब्रुसेल्सच्या राट हाऊसच्या चौकात दर दोन वर्षांनी फुलांच्या गालिचाचा कुसुमोत्सव असतो

.

ट्रिबेर्ग दर्शन झाल्यानंतर मात्र शोनाखबाखला जायचे वेध लागले होते. रिटाज् मध्ये जो फॉर्म भरून दिला होता त्या पासावर ट्रिबेर्ग आणि आसपासच्या परिसरात बस, रेल्वेने आम्ही प्रवास करू शकत होतो. शोनाखबाखचे घड्याळ काल उभ्या उभ्या भेटले होते. आज शोनाखमधले पहिले मोठे कुकु घड्याळ पाहिले पण आता शोनाखबाखला जायचे होते. एका बाजूला शोनाखबाख तर दुसर्‍या बाजूला शोनाख आणि मध्ये ट्रिबेर्ग अशी ही गावे अगदी एकमेकांना लागूनच आहेत. येताना रस्ता माहित झाला होता. अगदी सरळ सरळ एकच रस्ता होता. फार तर ४- ५ किमी असेल. त्यातून शोनाखबाखचे हे घड्याळ तर अगदी हायवेवरच आहे. पुढे लगेचच मोठा बोगदा लागतो आणि ट्रिबेर्ग स्टेशनही येथून फार लांब नाही. जाता येताना गाडी थोडी आत घेऊन, थांबवून पाहता येईल असे. त्यामुळे येथे खूपदा गर्दी असतेच. आम्हाला तेथल्या कुकुलाही भेटायचे होतेच. तेथे पोहोचलो तेव्हा आजूबाजूला बरेच लोकंही होते. पण इथल्या निसर्गाचाच परिणाम की काय? कसलाच कलकलाट नव्हता. ह्या कुकुघड्याळाच्या शेजारीच मोठ्ठे कुकुक्लॉक्सचे दुकान आहे, तेथेही गर्दी दिसली. ह्या हायवेने थोडे पुढे गेले की येथेही देखणे हजारी घड्याळघर आहे. ते पाहण्यात आणि तेथल्या कुकुंचे सहस्त्रावर्तन ऐकण्यातही वेळ कसा जातो समजत नाही.

.

.

.

ब्लॅक फॉरेस्ट केक आणि कुकु घड्याळांबरोबरच कृष्णबनाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली काचेवरची कारागिरी. इथले काचसामानही प्रसिध्द आहे. टेटेसे जवळच असलेल्या एका म्युझिअम वजा दुकानात ही काचेची शोभा पाहण्यासाठी गेलो. कटग्लास, ख्रिस्टलचे काचकामाचे अप्रतिम नमुने तेथे होते. वेगवेगळ्या पेयांसाठीचे पेले, निराळ्या आकाराचे बाऊल्स इतक्या सुंदरतेने मांडण्यांमध्ये रचून ठेवले होते. तेथे फिरताना चुकून आपला धक्का लागून एखादा पेला फुटला तर.. ह्या विचारानेच काचेशी फार सलगी न करता तेथून बाहेर पडलो.

.

कृष्णबनातलं अजून एक आकर्षण म्हणजे येथली सरोवरे. टेटेसे, श्लुकसे, श्ल्युष्टसे, फेल्डसे, मुमेलसे ही त्यातली काही मोजकी आणि महत्त्वाची. श्लुकसे हे ब्लॅकफॉरेस्ट मधलं सगळ्यात मोठ्ठं सरोवर तर श्ल्युष्टसे हे श्लुकसेच्या अगदीच जवळ असलेलं लहानसं तळं. ब्लॅकफॉरेस्ट मधला सगळ्यात मोठ्या डोंगराच्या पायथ्याशी असलेलं, पोटात अनेक दुर्मिळ पाणवनस्पतींना घेऊन नांदणारं फेल्डसे तर स्पा रिसॉर्ट मिरवणारं नखरेल टेटेसे.. सगळीच आपापलं निसर्गवैभव दिमाखात मिरवणारी. आम्ही टेटेसेचा नखरा आणि निसर्ग पहायचे ठरवले. टेटेसेच्या परिसरात केंपिंगप्लाट्झ म्हणजे कॅरावानसाठी किवा तंबू टाकण्यासाठी जागा आहेत. 'इथेच टाका तंबू..' म्हणत तिथे एक रात्र तरी थांबण्याचा मोह होतोच होतो.

.

.

.

समुद्रसपाटीपासून ८५० मी उंचीवर २ किमी लांब, १ किमी रुंद आणि ४० किमी खोल असलेला हिमयुगात जन्मलेला कृष्णबनातला हा निळा मोती! सरोवराच्या काठाने फिरताना त्या निळाईत, रानाची मिसळलेली हिरवाई पाहताना भान विसरायला होते हेच खरे. ह्या तळ्याकाकाठी तंबू टाकून चार दिवस राहण्याची मजा काही औरच! गाडीच्या टपावर आपलं होडगं बांधून आणायचं, नाहीतर येथे भाड्याने घ्यायचं आणि त्या निळाईवर एक ठिपका होऊन तरंगायचं. पण सगळ्यांनाच वेळेअभावी किवा साधनांअभावी ते शक्य होत नाही. म्हणून मग क्रूझ राइड तरी घ्यायचीच. वर निळंभोर आकाश, चहुबाजूला गर्द हिरवे, सावळेकाळे पाईन, मनात सुरू असलेलं गाणं... अजून काय हवं? आपली बोट तेथून बाहेर पडूच नये असं वाटत असताना बोट काठावर आल्याचा भोंगा वाजतो. परतीची वेळ जवळ आलेली असते पण ह्या कॄष्णबनात परत परत येणे होणारच असते.

.

(काही प्र. चित्रे जालावरून साभार)

प्रतिक्रिया

पाटील हो's picture

6 Jul 2015 - 3:57 pm | पाटील हो

वा . सुन्दर

पद्मावति's picture

6 Jul 2015 - 5:25 pm | पद्मावति

काय सुंदर....नुसतं वर्णन वाचूनही कृष्णबनात फिरून आल्यासारखं वाटत आहे.

मधुरा देशपांडे's picture

7 Jul 2015 - 1:14 am | मधुरा देशपांडे

सुंदर वर्णन आणि फोटो. श्लुकसेचे (Schluchsee) अजुन काही फोटो.

.

.

तळ्याकाठाने धावणारी ट्रेन.
.

.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jul 2015 - 2:01 am | डॉ सुहास म्हात्रे

कृष्णबन ऐकल्यापेक्षा जास्त भयंकर सुंदर आहे हे समजते आहे ! सर्वसाधारण सहलीत त्याच्या भेटीला ठेवलेले २-३ दिवस खूपच तुटपु़ंजे वाटणार यात वाद नाही. काहीतरी वेगळे तिकडम करणे भाग आहे !

अफाट सुंदर आहे सगळं.मस्त मस्त.

श्रीरंग_जोशी's picture

7 Jul 2015 - 7:34 am | श्रीरंग_जोशी

नेहमीपेक्षा वेगळे अन निवांत वाटणारे स्थलवर्णन.
या जागेच्या प्रेमात पाडणारी लेखमालिका आहे ही.

मनःपूर्वक धन्यवाद.

उमा @ मिपा's picture

7 Jul 2015 - 9:51 am | उमा @ मिपा

निळा मोती! अहाहा!
नामकरण किती चपखल आणि सुंदर करतेस तू!
लेखातले आणि मधुराने पोस्ट केलेले सगळे फोटो सुरेख!

जुइ's picture

8 Jul 2015 - 8:53 am | जुइ

कृष्णबनच्या परिसराचे छान वर्णन केले आहे. एकंदरीतच निवांत पर्यटन स्थळ वाटले.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Jul 2015 - 9:32 am | अत्रुप्त आत्मा

आहाहाहा! काय फ़ोटू! काय वर्णन!

.
.
.
कधी जायला मिळणार अश्या ठिकाणी! :-\