माझ्यापाशी सुरेख वारा आणि भोवती अक्षरधारा
बोलायाचे कितीक आहे पण ओठातुन झिरपत नाही
फुरफुरणारे बाहू माझे प्रचंड शक्ती आणि उसासे
तोडायाचे बंधन जे जे आवेशातुन उतरत नाही
थरथरणार्या स्वरात माझ्या कंपुन उठतिल भाव-भावना
स्वच्छंदी गाण्यात परंतू तान मोकळी येतच नाही
दहा दिशांच्या रिंगणातुनि क्षितीज सुद्धा उल्लंघिन मी
एकवटाया सारे बळ परि मनगट ते सरसावत नाही
रंग उषेचे हातामधुनि उधळित जाईन पानोपानी
घेतो मी कुंचला तसा अन् विचार तेव्हा रंगत नाही
मी वेडा आनंदासाठी धुंद मोकळ्या श्वासासाठी
मन्मनात जे आता आहे अंतरातुनि बरसत नाही
उगाच फिरतो पृथ्वीवरती शोधित जातो उजाड नाती
मी माझ्याशी ठेऊन नाते माझ्याशीही बोलत नाही
कवितेची पार्श्वभूमी-
पुरुषोत्तम करंडक २००६ मधे COEP (पुणे अभियांत्रिकी महाविद्यालय) ने सादर केलेल्या "होते कुरूप वेडे" या एकांकिकेसाठी लिहिलेली ही कविता आहे.
लेखन, कविता यांची आवड असलेल्या, पण परिस्थिती/ पालकांच्या दबावामुळे आपल्या आवडी-निवडींकडे दुर्लक्ष करून केवळ पाठ्य अभ्यासात बुडून गेलेल्या मुलाची घुसमट या एकांकिकेमधे आहे. तो मुलगा (समीर) रोज अनुदिनी (डायरी) लिहीत असतो. या एकांकिकेमधे डायरी हे एक पात्र आहे. आपल्या क्षमतांची जाणीव झालेला, पण भविष्याविषयी साशंक झालेला समीर मनातल्या मनातच घुसमटतो आणि आपल्या भावना ह्या कवितेतून डायरीला सांगतो, अशी कल्पना आहे.
प्रतिक्रिया
5 Nov 2007 - 9:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शंतनुसेठ,
लय भारी कविता !
माझ्यापाशी सुरेख वारा आणि भोवती अक्षरधारा
बोलायाचे कितीक आहे पण ओठातुन झिरपत नाही.
आणि ...........!
मी वेडा आनंदासाठी धुंद मोकळ्या श्वासासाठी
मन्मनात जे आता आहे अंतरातुनि बरसत नाही.
या आवडल्या ओळी !
काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामधे भक्ती तोलणार नाही ची आठवण झाली !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
5 Nov 2007 - 10:29 am | बेसनलाडू
कविता आवडली. लयबद्ध नि जोशपूर्ण आहे.
माझ्यापाशी सुरेख वारा आणि भोवती अक्षरधारा
बोलायाचे कितीक आहे पण ओठातुन झिरपत नाही
रंग उषेचे हातामधुनि उधळित जाईन पानोपानी
घेतो मी कुंचला तसा अन् विचार तेव्हा रंगत नाही
मी वेडा आनंदासाठी धुंद मोकळ्या श्वासासाठी
मन्मनात जे आता आहे अंतरातुनि बरसत नाही
या तीन द्विपदी विशेष आवडल्या. शेवटच्या द्विपदीचा अर्थ मात्र नीटसा कळला नाही.
एकूणच कविता वाचून तुम्हाला वृत्ते आणि लयबद्धतेची जाण आहे, असे जाणवले. मात्र केवळ वृत्तभंग टाळण्यासाठी र्हस्व-दीर्घाची सूट (उल्लंघिन, परंतू, उधळित इत्यादी)घेण्यापूर्वी पर्यायी शब्दयोजनेचा जरूर विचार करावा, असा आगाऊ सल्ला द्यावासा वाटतो. पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.
(आगाऊ)बेसनलाडू
5 Nov 2007 - 5:32 pm | धनंजय
"मी माझ्याशी ठेऊन नाते माझ्याशीही बोलत नाही"
कविता आवडली.
6 Nov 2007 - 12:27 am | सर्किट (not verified)
पण त्या ओळीतले "माझ्याशीही" खटकले.
त्या ऐवजी,
नाते जरि माझे माझ्याशी, मी माझ्याशी बोलत नाही
असे अधिक ठसकेदार वाटते का ?
- सर्किट
5 Nov 2007 - 9:16 pm | सुवर्णमयी
उगाच फिरतो पृथ्वीवरती शोधित जातो उजाड नाती
मी माझ्याशी ठेऊन नाते माझ्याशीही बोलत नाही
कविता आवडली. कित्येक कल्पना सुरेख आहेत. शेवट तर खूप मस्त..
6 Nov 2007 - 9:25 am | पुष्कर
डॉ. बिरुटे, बेसनलाडू, धनंजय, सर्किट, सुवर्णमयी - तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचल्या. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
बेसनलाडूंचा आगाऊ सल्ला शिरोधार्य. यापुढे र्हस्व-दीर्घांची सूट घेण्यापूर्वी पर्यायी शब्दांचा विचार नक्कीच केला जाईल.
सर्कीटने सुचवलेला बदल आवडला. "नाते जरि माझे माझ्याशी, मी माझ्याशी बोलत नाही" - कवितेचे सर्कीट कम्प्लीट झाल्यासारखे वाटते. तूर्तास मूळ कवितेमधे बदल करत नाही, पण योग्य वेळी बदल आमलात आणला जाईल (तुमच्या उल्लेखासह).
प्रतिसादामधला काही भाग वाचून कवितेबद्दल थोडा खुलासा करणे आवश्यक वाटत आहे. तो खुलासा आता कवितेखाली प्रसिद्ध करतो आहे. "तीन द्विपदी विशेष आवडल्या. शेवटच्या द्विपदीचा अर्थ मात्र नीटसा कळला नाही."या बेसनलाडूंच्या शंकेचेही समाधान त्यातून होईल अशी आशा करतो.
मिसळपावातल्या माझ्या पहिल्या तर्रीला फोडणी दिल्याबद्दल पुन्हा धन्यवाद
7 Nov 2007 - 1:24 am | विसोबा खेचर
माझ्यापाशी सुरेख वारा आणि भोवती अक्षरधारा
बोलायाचे कितीक आहे पण ओठातुन झिरपत नाही
रंग उषेचे हातामधुनि उधळित जाईन पानोपानी
घेतो मी कुंचला तसा अन् विचार तेव्हा रंगत नाही
सुरेख कविता! वरील ओळी अतिशय आवडल्या..
तात्या.
8 Nov 2007 - 1:40 am | स्वाती राजेश
माझ्यापाशी सुरेख वारा आणि भोवती अक्षरधारा
बोलायाचे कितीक आहे पण ओठातुन झिरपत नाही
सुरवातच अतिशय सुंदर..
त्यातून त्याची मनाची घालमेल शब्दरुपाने बाहेर पडते.
29 Nov 2008 - 6:05 pm | विनायक पाचलग
एकच शब्द
लय भारी....................................
अगदी योग्य
झणझणीत (हा पण कोल्हापुरी शब्द )
30 Nov 2008 - 9:15 am | प्राजु
शेवटही खूप आवडला.
पु ले शु.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 Dec 2008 - 4:36 pm | पुष्कर
कोल्हापुरी दादा आणि प्राजू, एक वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेली कविता तुम्ही कशी काय शोधून काढलीत बुवा? तुमचे मनापासून आभार. तात्या आणि स्वाती, तुम्हाला मी जरा उशिराच प्रतिक्रिया देत आहे, त्याबद्दल क्षमस्व. माझ्या ओळी आवडल्या म्हणालात, भरून पावलो...
मूळ एकांकिकेमध्ये 'डायरी' हे देखिल एक पात्र आहे. ह्या कवितेमध्ये प्रत्येक कडव्याचं पहिलं वाक्य डायरी म्हणते, आणि दुसरं वाक्य समीर म्हणतो. डायरी आपल्या वाक्यांमधून समीरच्या मनाला उभारी देण्याचा प्रयत्न करते, पण लगेचच दुसर्या वाक्यातून समीरचं खचलेलं मन बोलतं. एकांकिकेमध्ये आपल्याला जरी दोन पात्रांचा संवाद दिसत असला, तरी ती एकाच व्यक्तिच्या मनातली घालमेल आहे असं दिसावं अशी आमची कल्पना होती.
-पुष्कर
1 Dec 2008 - 4:40 pm | मदनबाण
व्वा..सुरेख कविता..
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
1 Dec 2008 - 4:49 pm | राघव
फार सुंदर कविता.
सगळीच्या सगळी आवडली.
शुभेच्छा!
मुमुक्षु