माझी इटलीची भ्रमणगाथा -भाग ७ पिसाचा झुकता मनोरा.

अजया's picture
अजया in भटकंती
19 Jun 2015 - 10:23 am

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६

ट्रिप सुरु होऊन आता पाच दिवस होऊन गेले होते. दोघीच आलेल्या आम्हाला बघून आश्चर्याची जागा हेव्याने घ्यायला सुरु झाली होती! आमचा मैत्रीण परिवार पण वाढत चालला होता. दिवसभर फिरुन आल्यावर जेवणानंतर आमच्या रुमचा महिला अड्डा बनायला सुरुवात झालेली. बर्‍याच जणी डॉक्टर असल्याने विषयाला कमतरता नव्हतीच. रात्री गप्पांनी आमची रूम दणाणून जायला सुरुवात झाली! बसमध्येही आमच्या आजुबाजूच्या सीट्सवरचे लोक मागे पडून आमचा मोठा खिदळणारा कंपू ;) तयार झाला होता! उद्या फ्लोरेन्सला जायला निघायचे होते.

जाताना रोम शहराचे न संपणारे अवशेष लागत होते. जसा टस्कनी प्रांत जवळ येऊ लागला अनेक सुंदर निसर्ग दृष्य दिसायला सुरुवात झाली. टस्कनी इटलीचा निसर्गरम्य,समृद्ध प्रांत. तिथली राजधानी फ्लोरेंस. रेनेसान्सची सुरुवात याच भागात झाली. या भागात पिसा,सॅन जिमियॅनो,फ्लोरेन्स अशी अनेक महत्वाची प्रेक्षणीय स्थळं आहेत. इटलीतला हा भाग जास्त शहाण्या लोकांचा म्हणून देखील ओळखला जातो! असंच एक आपल्या ओळखीचं शहर आठवलं;) आज आम्ही प्रथम पिसाला जाणार होतो.

जगातली सर्व आश्चर्य बघायचं माझं स्वप्न आहे. पिसाचा झुकता मनोरा, बघण्याच्या यादीत मला वाटतं अगदी बालपणापासुन असावा! सगळं जग सरळ तर हा तिरका! मुलं लपंडाव खेळताना मध्येच खांबाआडून डोकावतो तसा डोकावणारा. वेडिंगकेकसारखा दिसणारा. कधी एकदा बघू असं झालं होतं.
पिसाच्या पार्किंग पासुन एक बस मनोर्‍याजवळ घेऊन जाते. पार्किंगवर वस्तुविक्रेत्यांनी उच्छाद मांडला होता. भारतीय लोक बघुन हिंदीच काय, एक अफ्रिकन बाबा मला चक्क मराठीत छत्री हवी मॅडम? म्हणाला!! मग मी विरघळून घेतलीच छत्री काखोटीला मारुन!

बाराव्या तेराव्या शतकात पिसा हे भुमध्य समुद्रावरचं एक महत्वाचं बंदर होतं. त्याबरोबरच पैसा आणि सत्ता यांचंही अधिष्ठान लाभलेलं. त्यामुळे एखाद्या स्वतंत्र राष्ट्रासारखं लष्कर्, नौदल बाळगून असणारं हे स्वतंत्र संस्थान होतं. त्यामुळेच आपलं वैभव दाखवण्यासाठी इथे अनेक भव्य बांधकामं सुरू केली गेली. त्यातला सर्वात प्रेक्षणीय हा मनोरा असणारा चौक,"काम्पो दाइ मिराकोली" म्हणजेच चमत्कारांचे प्रांगण. प्रांगणाच्या सर्व बाजूनी मोठी तटबंदी आहे. आत बॅप्टिस्ट्री,कथीड्रल आणि कथेड्रलचा बेल टॉवर म्हणून बांधला गेलेला झुकता मनोरा आणि स्मशानभूमी अशा इमारतींचं हे संकूल आहे. यातली प्रत्येक इमारत ही वास्तूशास्त्राची अतिशय सुंदर उदाहरणं आहेत.

.

आत शिरताच प्रथम दिसते ती गोलाकर बॅप्टिस्ट्रीची इमारत मग कथीड्रल आणि त्याच्या आडून हळूच डोकावणारा तो मनोरा! आजूबाजूला सुंदर हिरवळ. प्रांगण इतकं मोठं आहे की गर्दी असूनही जाणवत नाही. सर्व लोकांचा एकच उद्योग सुरू झाला, फोटोत आपल्या हाताने जोर लावून मनोरा सरळ करण्याचा! आम्हीही त्यात सामिल झालो अर्थातच! इतर इमारती सोडून पहिली धाव घेतली मनोर्‍याकडे. पांढराशुभ्र ,कमानी आणि जाळीच्या खिडक्या असल्याने उगाचच हलकाफुलका वाटणारा देखणा मनोरा. तो झुकलेला नसता तरी अतिशय सुंदर मनोरा म्हणून प्रसिद्ध झालाच असता. बाराव्या शतकात तो बांधायची सुरुवात झाली. पुढे दोनशे वर्ष निरनिराळ्या टप्प्यात त्याचं बांधकाम सुरूच होतं. बांधकाम सुरू असतानाच तो पाया मजबूत नसल्याने झुकायला सुरुवात झालेली. त्यामुळे पुढची शंभर वर्ष त्याच्यावर काहीच काम केलं गेलं नाही. मग आतली जमीन पक्की होउन मनोरा थोडा स्थिर झाल्यावर वरचे मजले बांधले गेले. या मजल्यांची एक गम्मत आहे. तिरपेपणा सामावून घ्यायला ते एका बाजूने उंच बांधलेले आहेत! तरीही पुढची सहाशे वर्ष हा मनोरा कलेकलेने झुकतच होता.त्यामुळे एवढा झुकूनही हा पडत नाही म्हणजे कॅथेड्रलमधल्या मेरी मातेचाच हा चमत्कार म्हणून या चौकालाच चमत्कारचा चौक नाव पडलं!
तरीही विसाव्या शतकात हा पडायला येण्याइतका झुकला होता.तो झुकता असल्याने त्याला बघायला येणारे पर्यटक इटलीला हवे होते. मग तो झुकता पण स्थिर ठेवण्यासाठी जगभरातून विचार घेऊन त्याच्या सरळ बाजूला कित्येक टन शिसं ओतलं गेलं. मग तो हळूहळू कलता पण स्थिर झालाय.

मनोर्‍याला एकूण सात मजले आहेत. ते एखाद्या केकसारखे एकावर एक रचलेले. बाजूने रोमन खांबांच्या गॅलरीज. सर्वात वरचा आठवा मजला तर मुकुटासारखा गोलाकार, मधोमध आहे. तिथे ब्रॉन्झच्या अजस्त्र घंटा बांधलेल्या आहेत. वर जाण्यासाठी सोळा युरोचं वेग़ळं तिकिट काढावं लागतं. तिकिटाची वेळ संपत आली होती. अक्षरशः धावत पळत तिकिट मिळवलं.आतमध्ये अंधार्‍या जिन्यावरून गोलगोल आत वर चढत जायचं. अतिशय अरुंद अशा २९६ पायर्‍या. आधी जीवावरच आलं होतं चढायचं! पण आता नाही तर परत कधी म्हणून लागलोच चढायला!सातव्या मजल्याला पायर्‍या इतक्या अरुंद होतात की कसंबसं वर जाता येतं. पण वर गेल्यावर अफाट दृश्य! खाली हिरवळीवर मुंग्यांसारखी दिसणारी माणसं, दूरवर दिसणारा समुद्र, हिरवीगार शेतं आणि डोंगर. पायाखालची जमीन तिरपी! तिरप्या बाजूने खाली पाहिलं की आता मनोर्‍यासकट आपण खाली पडू असं वाटायला लागतं इतकं त्याचं झुकलेपण जाणवतं.
खाली येऊन एक गोल चक्कर मारून त्याला मनात साठवून घ्यायला लागलो! एखादी बिघडलेली गोष्ट कशी सार्‍या दुनियेला आनंद देऊन गेल्याचं हे एकमेव उदाहरण असावं!

.
.
.

मनोर्‍याबाजूचे सुरेख कथिड्रल बघायचे सोडून आमच्या बरोबरचे लोक खरेदीला धावले आणि एका अतिशय सुंदर प्रेक्षणीय स्थळाला मुकले! मध्ययुगीन काळात हल्लेखोरांना धाक बसावा म्हणून हे भव्य कथिड्रल बांधले गेले. हिरव्या पांढर्‍या संगमरवरात केलेली,रोमनेस्क वास्तूशास्त्राचा देखणा नमूना असणारी इमारत आतून बाहेरून बघण्यासारखी आहे. बाहेर रोमन खांबांच्या भव्य रांगांच्या मध्ये त्रिकोणी पेडिमेन्ट्स आहेत.त्यात सोनेरी मुलामा असणारी मोझाइक आणि सुंदर पुतळे आहेत.

.
.

अतीभव्य सुंदर कोरीव काम असणार्‍या ब्रॉन्झ दरवाजातून आपण आत प्रवेश करतो.आणि अनपेक्षिपणे चर्चचा देखणा अंतर्भाग सामोरा येतो. अगदी समोर सोनेरी रंगाचे अतीभव्य मोझाइक्, वर सोनेरी,निळ्या रंगांनी रंगवलेले कोरीव छत,सर्व भिंतींवर भव्य चित्रं.काय बघू आणि काय नको होउन जातं.

.
.
(जालावरून साभार)

समोरच्या मोझाइककडे आपसूक पाय ओढले गेले! मोझाइकच्या मध्य भागात सिंहासनावर बसलेला येशू आहे. त्याच्या हातात पुस्तक धरलेले आहे. तर दुसरा हात आशिर्वाद मुद्रेत आहे. खाली या चर्चची अधिष्ठात्री मेरी आहे. सोळाव्या शतकात हे कथिड्रल आगीने भस्मसात झाले होते. तरीही या मोझाइकला मेरीमातेच्या कृपेने काहीही झाले नाही हेही एक कारण या संकूलाला चमत्कारांचे प्रांगण म्हणण्याचे!!

.
या कथिड्रलचे मुख्य पल्पिट(जिथून प्रवचन केले जाते) हे मध्ययुगीन कोरीवकामाचा अप्रतिम नमूना आहे.तेही सुदैवाने आगीतून वाचले. पण आता ते चर्चच्या मध्यभागी ठेवलेले आहे.
.
उजव्या बाजूला पिसाचा सेन्ट रानिएरीचे शव जतन केले आहे.गोव्याच्या सेन्ट झेवियरसारखा याचाही पिसाला उत्सव केला जातो.
.
डाव्या भागात रोमन राजा सातवा हेन्रीची कबर आहे.
दोन्ही बाजूनी वर अप्रतिम रंगांचे उधळण करणार्‍या रंगीत काचांच्या खिडक्या आहेत.

.

एव्हाना आम्ही दिसत नाही बघून आमच्या सहलीतली काही मंडळी इथे नक्कीच काहीतरी विशेष असणार हे ओळखून आत आली. त्यांना सर्व दाखवण्यात भरपूर उशीर झाला होता तरीही बॅप्टिस्ट्रीची गोल इमारत खुणावत होतीच! आत एक बॅप्टिझमला लागणारा हौद आहे. पण इमारतीच्या आत काही विशेष नाही ती बाहेरूनच बघायला सुंदर आहे. विशेषत: तिचे रोमनेस्क प्रकाराचे अर्किटेक्चर.
.

इटलीतले काही महान सुपुत्र पिसाचे आहेत. खगोलशास्त्रज्ञ गॅलेलिओ इथलाच. बॅप्टिस्ट्रीच्या हौदावरचा लोंबणारा कंदिल बघून त्याला पेंड्युलर मोशनची कल्पना स्फुरली. अणूबॉम्बचा जनक एन्रिको फर्मीही इथलाच.
सगळं बघत आम्हाला खूप उशीर झाला होता.पिसाचा मनोरा बघितल्यावर या बायका अजून काय टाइमपास करत फिरत आहेत,हे न कळल्याने बसमधले अन्य लोक आमच्याकडे वैतागाने बघत होते. त्यांचे हात भरपूर खरेदीच्या पिशव्यांनी भरलेले होते आणि आमचं डोकं त्या मनोरम वास्तूंच्या दर्शनानी!

क्रमशः

माझी इटलीची भ्रमणगाथा -भाग ८-सॅन जिम्नियानो

प्रतिक्रिया

सुचेता's picture

19 Jun 2015 - 10:52 am | सुचेता

अगदे सुरेख चालली आहे सफर, तुझ्यासोबत आमचीही

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jun 2015 - 11:16 am | अत्रुप्त आत्मा

व्वाह!

बोका-ए-आझम's picture

19 Jun 2015 - 11:48 am | बोका-ए-आझम

प्रवासवर्णन आणि फोटो बढिया!

मधुरा देशपांडे's picture

19 Jun 2015 - 1:23 pm | मधुरा देशपांडे

मस्त. शेवटचं वाक्य विशेष आवडलं.

खटपट्या's picture

19 Jun 2015 - 1:39 pm | खटपट्या

खूप छान फोटो आणि माहीती..

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jun 2015 - 1:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर चालली आहे सफर !

पुभाप्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jun 2015 - 6:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

आणि हो, आम्हाला पण त्या वाकड्या मनोर्‍याला थोडासा धक्का देऊन त्याचा कल ०.००००००१ अंशानी का होईना पण कमी करायचा आहे ;) सद्या इनो घेऊन शांत आहे :(

उमा @ मिपा's picture

19 Jun 2015 - 2:22 pm | उमा @ मिपा

वा, मस्तच!
सर्वात वरच्या मजल्यावर पोचल्यावर दिसणाऱ्या दृश्याचं वर्णन विशेष आवडलं.

मोनू's picture

19 Jun 2015 - 2:31 pm | मोनू

आज निवांत वाचले बघ सगळे भाग...अफलातून लिहीले आहेस... फोटोग्राफी फारच सुरेख... धम्माल आली असेल तुम्ही दोघी मैत्रिणी बरोबर असल्याने.

अप्रतिम .. निव्वळ अप्रतिम ... मस्त एकदम .. वाचुन छान वाटले.. तिरपा मनोरा जाणुन बुजुन तिरपा बांधलेला नाहियेतर.. मला वाटले असे तिरके बांधणारे लोक पण किती ग्रेट असतील ना.. तरीही त्याची किंमत कमी होत नाहीच म्हणा..

पुढील भागाच्या प्रतिक्षेत

प्रचेतस's picture

19 Jun 2015 - 2:55 pm | प्रचेतस

हा भाग पण मस्तच.

पियुशा's picture

19 Jun 2015 - 3:16 pm | पियुशा

तुझा सफरिचा भाग आला की मी अधाशासार्ख वाचुन टाकते सगळ :)
" मला वेड लागले ..................... " :)

सस्नेह's picture

19 Jun 2015 - 3:21 pm | सस्नेह

सुन्दर फोटो आणि रंजक माहितीबरोबरच खुसखुशीत लेखनामुळे मालिका सुरेख झाली आहे.
पुभाप्र.

मितभाषी's picture

20 Jun 2015 - 10:37 pm | मितभाषी

असेच म्हणतो.

स्पंदना's picture

19 Jun 2015 - 3:30 pm | स्पंदना

आश्चर्याची जागा हेव्याने घ्यायला सुरु झाली होती!आमचा मैत्रीण परिवार पण वाढत चालला होता.दिवसभर फिरुन आल्यावर जेवणानंतर अामच्या रुमचा महिला अड्डा बनायला सुरुवात झालेली.बर्‍याच जणी डाॅक्टर असल्याने विषयाला कमतरता नव्हतीच.रात्री गप्पांनी आमची रूम दणाणून जायला सुरुवात झाली!बसमध्येही आमच्या आजुबाजूच्या सीट्सवरचे लोक मागे पडून आमचा मोठा खिदळणारा कंपू ;)तयार झाला होता!

इथेपण? कम्माल आहे बाई!!
असो.
लेखाच्या शेवटच वाक्य

यांचे हात भरपूर खरेदीच्या पिशव्यांनी भरलेले होते आणि आमचं डो़कं त्या मनोरम वास्तूंच्या दर्शनानी!

एकदम सही!!
वर्णन, माहिती आणि फोटोज अतिशय सुंदर.

स्वाती दिनेश's picture

19 Jun 2015 - 3:33 pm | स्वाती दिनेश

तुझ्याबरोबर मी ही परत परत इट्ली फिरतेय.. पिसाच्या मनोर्‍याच्या इथे विशिष्ट पोझ मध्ये छब्या काढून घेणारी मंडळी दिसली की नाही? म्हणजे काही अंतरावर अशी ढकलायची पोझ घेऊन उभे असतात लोकं.. आणि फटूत मनोरा ढकलून सरळ करतोय असा आविर्भाव असतो.
(ताजमहालच्या इथे पण त्या वरच्या चांदाला हाय लावलाय असले फटू काढतं पब्लिक..)
स्वाती

सानिकास्वप्निल's picture

19 Jun 2015 - 3:49 pm | सानिकास्वप्निल

हा हा हा !! हो गं हो असे पोझ देऊन फोटो आपण ही काढल्याचे आठवले ;) काही तर हाताच्या पंजात अख्खा मनोरा धरतात :)
ताईने ही धक्का देऊन मनोरा सरळ करता येतो का बघितला असेलचं :P

जोक्स अपार्ट खूप सुंदर झालाय हा भाग, सारखं -सारखं तुझ्या लेखनशैलीबद्दल काय कौतुक करावे, सिपंली ग्रेट !
फोटो ही सुंदर आहेत.
पुभाप्र

हो होती ना.लिहिलंय बघ मी!

सर्व लोकांचा एकच उद्योग सुरू झाला, फोटोत आपल्या हाताने जोर लावून मनोरा सरळ करण्याचा! आम्हीही त्यात सामिल झालो अर्थातच!

रेवती's picture

19 Jun 2015 - 3:55 pm | रेवती

सुरेखच आहेत फोटू. कॅथिड्रलच्या बाग्राऊंडवर मनोर्‍याचे झुकलेपण जास्त जाणवतेय. मनोर्‍यावरील व बॅप्टिस्ट्रीवरील काम सुंदर आहे. माहिती आवडली.

कवितानागेश's picture

19 Jun 2015 - 6:12 pm | कवितानागेश

वाचतेय...... जावसं वाटतंय...... :)

तिमा's picture

19 Jun 2015 - 6:22 pm | तिमा

वर्णन व फोटो छानच आहेत.
इटलीतला हा भाग जास्त शहाण्या लोकांचा म्हणून देखील ओळखला जातो! असंच एक आपल्या ओळखीचं शहर आठवलं;

अरे वा, चिमटा इतका सफाईदार घेतलाय की त्यांना इतके शहाणे असूनही कळलं नाहीये.

कविता१९७८'s picture

19 Jun 2015 - 9:08 pm | कविता१९७८

मस्तच , स्वत: तिथे हजर आहे असेच वाटले

इटलीतला हा भाग जास्त शहाण्या लोकांचा म्हणून देखील ओळखला जातो! असंच एक आपल्या ओळखीचं शहर आठवलं;

हा हा हा

स्वप्नांची राणी's picture

19 Jun 2015 - 9:17 pm | स्वप्नांची राणी

वा...मस्त सफर!! तो मनोरा थोडासा सरळ करण्यात माझाही हातभार लागलाय हां..!!

पैसा's picture

19 Jun 2015 - 10:00 pm | पैसा

बोले तो झक्कास!

फारच भारी! या जागांबद्दल वाचून माहिती आहे, पण तुमच्या लेखनशैलीमुळे फारच मजा येते वाचायला.

श्रीरंग_जोशी's picture

20 Jun 2015 - 1:51 am | श्रीरंग_जोशी

नेहमीप्रमाणेच सुंदर ओघवते वर्णन. हाही भाग आवडला.
पुभाप्र.

प्रभाकर पेठकर's picture

20 Jun 2015 - 3:18 am | प्रभाकर पेठकर

सुंदर वर्णन. पिसाचा झुकता मनोरा डोळे भरून पाहणे हा उत्सव आम्हीही साजरा केला. पण मनोर्‍यावर नाही गेलो. २-३ कारणं. माझं पुण्यातलं राहतं घरच ७ व्या मजल्यावर आहे. त्यामुळे जो अनुभव आपण रोज फुकटात घेतो त्यास 'तिकीट काढून' अनुभवणे कांही मनाला पटले नाही. शिवाय, ८ मजले पायी पायर्‍याचढत जायचं आता शरीराला आनंद देत नाही. तेंव्हा टाळलं. पण मनोरा बघण्यासारखा आहे. निर्विवाद.
आम्ही गेलो असताना आकाशातून एक पॅराट्रूपर तिथल्या लॉन वर उतरला. हे मिलिट्रीच्या नेहमीच्या सरावातील आहे असे ऐकले. मजा वाटली पाहताना.
पिसा बाहेरील स्मरणवस्तू की काय तुम्ही म्हणता ते विकणारे विक्रेते भयंकर लुबाडतात. भाव करावा लागतो. ५० टक्क्यांच्या खालूनच सुरुवात करावी लागते. असो.
पिसाच्या समोरच्या गल्लीतून गेल्यावर एका पंजाब्याचे उपहारगृह आहे. चव छान आहे. डेकोर छान आहे. पण दारूच्या बाटल्यांच्या गर्दीतच गणपती विसावला आहे.

:)मी फारशी खरेदी केलीच नाही!त्यामुळे या दिव्यातून सुटले म्हणायचे!

सुधीर कांदळकर's picture

20 Jun 2015 - 8:33 am | सुधीर कांदळकर

शास्त्रज्ञांची आठवंण ठेवणे आणि खरेदीत व्यर्थ वेळ न दवडणे फारच आवडले.

नूतन सावंत's picture

20 Jun 2015 - 11:04 am | नूतन सावंत

आहा!अजया,इतके सुरेख लिहिले आहेस की,सूक्ष्मदेह जणू तुझ्यासोबत होताच असे वाटायला लागले आहे . जे पाहिले त्याचे वर्णन करण्याची हातोटी तुला छान साधली आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Jun 2015 - 11:35 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

वा. मस्तं फोटू.

अनन्न्या's picture

20 Jun 2015 - 1:49 pm | अनन्न्या

आधी वाचून काढली माहिती, व्यवस्थित लिहीलस. फोटो अप्रतिम!

इशा१२३'s picture

20 Jun 2015 - 2:21 pm | इशा१२३

मीहि आठवणी ताज्या करतेय तुझ्याबरोबर.अप्रतिम आहे मनोरा.मुख्य म्हणजे मलाहि लहानपणी पासुन ७ आश्चर्य पहायची हौस होतीच त्यात या मनोर्‍याचा नंबर वरचा होता.प्रत्यक्ष पाहिल्यावर तर आवडलाच.पांढराशुभ्र मनोरा सुरेख दिसतो.
हा मनोरा न पडता कसा झुकलाय हे पहायला जायचे तर तिथे गेल्या गेल्या माझ्या छोट्या लेकिने विचारले कि आई आता हा पडणार आहे का?म्हटल नाहि पडत म्ह्णूनच पहायला आलोय.
बाकी ते फोटो काढण्याचे विविध प्रकार बघायला मिळालेच.लेकानेहि स्वताचा मनोर्‍याला धक्का देताना फोटो काढुन घेतलाच.

हम्म्. तरीच म्हटलं या लेखाला का एवढा ट्यार्पी मिळाला.

स्नेहानिकेत's picture

21 Jun 2015 - 12:03 am | स्नेहानिकेत

अजया तै खुपच छान लिहिलयस ग!!! अप्रतिम फ़ोटो!!!

जुइ's picture

21 Jun 2015 - 4:09 am | जुइ

शेवट अधिक भावला!

गवि's picture

22 Jun 2015 - 1:01 pm | गवि

वा वा.. मस्त सफर.

पिसाच्या बसस्टँडपासून बॅसिलिकाच्या कंपाउंडच्या दारापर्यंत ते फेरीवाले जे काही मांजरासारखे पायात पायात येतात त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. खिसापाकीट सांभाळूनच रहावं लागतं. बर्‍यापैकी बुजबुजाट अन गळेपडूपणा आहे. बहुतांश आफ्रिकन इल्लीगल इमिग्रंट्स आणि त्याखालोखाल आपलेच भारतीय फेरीवाले बांधव.

छत्र्या, डुप्लिकेट पर्सेस अन स्मरणचिन्हे विकताविकता आपले खिसे अन्य मार्गानेही थेट मोकळे करण्याचा उद्देश त्यांच्या नजरेत आणि हालचालींत स्पष्ट दिसतो (ऑर सो आय थॉट)..

बॅसिलिकाच्या गेटपासून आत त्यांना पूर्ण प्रवेशबंदी केलेली असल्यानेच केवळ हे ठिकाण शांत मनाने पाहणं शक्य आहे, अन्यथा कधी एकदा इथून सुटतो असंच झालं असतं. आतले टपरीवाले अधिकृत (!?) दुकानदार असे कावळ्यांसारखे मागे लागत नाहीत.

बाकी खाद्यधर्माला स्मरुनः आईसक्रीम अजिबात आवडत नसूनही इथे मनोर्‍याच्या बरोबर समोर असलेल्या चौकातच इटालियन गेलाटो की जेलाटो की येलाटो (जे काही शिंचं असेल ते) झकास मिळून गेलं होतं. बाकी जागोजागी सर्वच रेस्टारंटांत उभ्याउभ्या मद्याचे घोट मारण्यात तर आख्खे युरोप जगाच्या पुढे आहे.

चांगली सफर घडवत आहात. पुन्हा एकदा फिरतोय या लेखमालिकेमुळे. ते पिसाला हात लावून ढकलायचे फोटो आम्हीही काढलेत. कॉलेजमध्ये होतो त्यावेळी. ७-८ मित्र मिळुन पुर्ण युरोप फिरलो होतो. जाम मजा आली होती.

स्पा's picture

22 Jun 2015 - 4:05 pm | स्पा

वोव

मजा आली :)

चुकलामाकला's picture

22 Jun 2015 - 6:32 pm | चुकलामाकला

आवडेश!

पद्मावति's picture

26 Jun 2015 - 5:56 pm | पद्मावति

आहा....पीसा चा मनोरा काय मस्तं दिसतोय. वर्णनही नेहमीप्रमाणेच क्लास....

नंदन's picture

27 Jun 2015 - 5:41 am | नंदन

सातही भाग आज सलग वाचून काढले. अगदी ओघवतं आणि रंगतदार प्रवासवर्णन झालं आहे. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

मदनबाण's picture

27 Jun 2015 - 7:50 pm | मदनबाण

शब्दच संपले !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दारु Peeke डांन्स... ;) :- Kuch Kuch Locha Hai

यशोधरा's picture

6 Jul 2015 - 2:15 am | यशोधरा

झकास!