माझी इटलीची भ्रमणगाथा: भाग १, भाग २, भाग ३, भाग ४
काप्री करून आमची सहल परत नेपल्स मुक्कामी आली तोवर रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती.परत ते "प" पासून नाव असणारे पदार्थ खायची जराही इच्छा नव्हती! म्हणून एखादे फळ खाऊन घेऊ ठरवून भोजनगृहात गेले तर तिथे म्हणे आज व्हरायटी आहे इटालियन जेवणाची.खाऊन तर बघा! म्हंटलं बघूया! मग शेफने लसान्या आणि ब्रुशेट्टा अगदी दिमाखात स्वतः येऊन वाढलं.हे दोन्ही पदार्थ आमच्या डोंबिवलीच्या प्रसाद हॉटेलमध्ये मी बर्याचदा खाते.चक्क चांगले लागतात! पण इथे लसान्या म्हणजे चामट पास्ता शीट्स मध्ये बेक करून चीज.निव्वळ वाईट लागत होते.ते सोडून ब्रुशेट्टा खावे तर त्यात कोरड्या ब्रेड्वर फक्त टोमॅटो घातलेला! आमच्या डोंबिवलीकर शेफकडून इटालियन शेफला ट्रेनिंग देणे अत्यंत जरूरी आहे अशी खूणगाठ मनाशी बांधून जेवणातून पळ काढला!दुसर्या दिवशी ट्रेवी फाऊंटन आणि वॅटिकन सिटी असा मोठा दौरा होता.
सकाळी लवकरच बस निघाली.तीन तासांनंतर रोममधल्या एका बोगद्यापाशी सर्वांना सोडून बस गेली.इथुन पुढे पर्यटकांच्या बस रोमच्या आत येऊ शकत नाहीत.इथून रोमचा पदयात्री पण अतिशय गर्दी असणारा विभाग सुरू झाला.जिथे बघावे तिथे हिन्दी चिनी भाई भाई! आजूबाजूला भिकारी त्रस्त करत होते,त्यात स्मरणवस्तू विकणारे हैराण करत होते.थोड्याशाच चालीनंतर ट्रेवी फाउंटनला पोहोचलो तर तिथे काम सुरू असल्याने कारंजे बंद होते!
एका मोठ्याश्या इमारतीच्या पुढ्यात हे जलशिल्प उभे आहे.अनेक पुतळे,स्तंभ,कमानींनी सुशोभीत असं हे कारंजं आहे.
( जालावरून साभार)
समोर चार खांब आणि त्यांच्यामध्ये विजय कमान आहे.या कमानीच्या मध्यभागी समुद्रदेव नेपच्युन शिंपल्याच्या रथावर आरूढ झालाय.त्याच्या शांत आणि अशांत अशा घोड्यांना ग्रीक पुराणातले नायक आवरू पाहात आहेत.हे घोडे सागरच्या लहरी लाटांचे प्रतिक समजले जातात.बाजूच्या कमानीत समृध्दी आणि आरोग्याच्या मूर्ती आहेत.आरोग्य देवीच्या हातात सर्व ग्रीक ,रोमन आरोग्य देवतेच्या पुतळ्यांमध्ये असतो तसा साप आहे.समृध्दीच्या हातात कलश.या दोन्हीतून पाणी वाहात असतं.आम्ही गेलो तेव्हा बंद होतं.सम्राट ऑगस्टसचा जावई सेनानी अग्रिप्पाने पाण्याचे तीन वेगळे स्त्रोत असणारा हा झरा अॅक्वीडक्टमधून रोममध्ये आणला.त्यामुळेच एका बाजूच्या कोनाड्यात त्याचा पुतळा आणि दुसर्या कोनाड्यात त्याला हा झरा दाखवणार्या त्रिव्हियाचा पुतळा आहे.
या कारंज्याबद्दल एक समजूत आहे.रोमला परत येण्यासाठी त्यात एक नाणं,लग्न होण्यासाठी दोन आणि मोडण्यासाठी तीन नाणी त्यात फेकायची! माझ्या आजूबाजूचे बुवा तीन नाणी टाकतात का दोन हे निरीक्षण बराच वेळ केल्याने माझा नवरा या ट्रीपला आलेला नाही याचा मला भारीच आनंद झाला!! रोमला परत येणार हे निश्चित त्यासाठी नाणी कशाला फेकायची असा विचार करून मी कोणतही नाणं न फेकता बाहेर आले!
यानंतर जे बघायचा अट्टाहास करून मी इटलीला आले होते त्या वॅटिकनला जायला निघालो.इथला चित्र शिल्पांचा खजिना कधी बघेन असं झालं होतं.वॅटिकन म्हणजे ख्रिश्चन धर्माची काशीच! कितीतरी वेळ बस तटबंदीच्या बाजूने धावत होती.जगतलं सर्वात छोटं का होईना राष्ट्रं आहे ते.एवढा तर वेळ जायला लागायला हवाच!
मध्ययुगीन काळात पोप हे इटलीचे जणू सर्वेसर्वा झाले होते.त्यांच्या जवळ स्वतःचे सैन्य देखील असायचे.अफाट संपत्ती आणि सैन्याच्या जीवावर पोप इटलीचे राजेच झाले होते.१८६०मध्ये इटलीचे प्रजासत्ताक राज्य आल्यावर पोपचे काय करायचे हा इटलीतला चिघळणारा प्रश्न बनला होता.शेवटी मुसोलिनीने पोपशी चर्चा करून इटलीतच स्वतंत्र राष्ट्र म्हणून वॅटिकनला मान्यता दिली. तेव्हापासून कॅथलिक ख्रिश्चनांचे हे सर्वात महत्वाचे धार्मिक अधिष्ठान झाले आहे.या स्वतंत्र राष्ट्रला स्वतःचे सैनिक स्विस गार्ड्स आहेत.त्यांचा विदुषकी पंचरंगी पोषाख म्हणे मायकेल अन्जेलोने डिझाईन केलेला आहे!इथे छोटंसं पोस्ट ऑफिस ,कोर्ट्,फायर ब्रिगेड्,बँक्,वीज निर्मिती केन्द्र असं हे स्वयंपूर्ण राष्ट्र आहे.या सर्वांचा राजा अर्थातच पोप.
सेंट पिटर इथला पहिला पोप.याच ठिकाणी त्याचा छळ करून त्याला मारलं गेलं.त्याला खिश्चन धर्माच्या चाव्या खुद्द देवाने दिल्या असे मानले जाते. त्याचा सुरेख पुतळा बॅसिलिकाच्या समोरच आहे.समोरून हे कॅथिड्रल इतकं देखणं दिसतं,विशेषतः त्याचा सुबक घूमट आणि त्यावरचा टोकदार लँटर्न.या दोन्हीचा जनक मायकेल अॅन्जेलो.अर्थात त्याच्या येण्याअधीच हे काम सुरू झालं होतं.पण घूमट खासा मायकेल अॅन्जेलोच्या हातचा! घुमटाच्या दोन्ही बाजूने येशू आणि त्याच्या बारा शिष्यांचे पुतळे आहेत. कथीड्रलच्या अंगणात इजिप्तहून आणलेली ओबेलिस्क आहे.मधोमध भलंमोठं कारंजं.बाजूच्या इमारतीच्या गॅलरीतून पोप आशिर्वाद देण्यासाठी बाहेर येतात.जी आपण अनेकदा टिव्हीवर बघतो.
(जालावरून साभार)
कथीड्रलच्या ब्रॉन्झच्या भव्य दरवाज्यातून आत गेल्यावर आपण एका अती भव्य जगात जाऊन पोहोचतो.आतमध्ये अंधार,शांतता,मंदिराच्या ठिकाणी आपोआप जाणवून येणारे गांभीर्य अशा अनेक गोष्टी एकदम जाणवतात. दिसणारा प्रत्येक खांब न खांब भिंत सर्वत्र चित्र्,शिल्प नक्षी. काय बघू न काय नको अशी स्थिती होउन जाते .अधाशासारखे सगळे बघत ग्रुपबरोबर चालणे हा एक वैताग !त्यात आमच्या गाईडला आतमध्ये यायची परवानगी नाकारली. मग सगळीकडे आधीच घरून लिहून आणलेल्या नोट्स वाचत एकेक बघत हिंडणार्या मला हेरून काही जणांनी चक्क गाईड बनवून टाकलं!
दारात शिरल्या शिरल्या उजवीकडेच मायकेल अॅन्जेलोचा सर्वप्रथम आणि सर्वोत्तम पिएता म्हणजे येशूचे मृत्यूशिल्प आहे.मेरीने तिच्या मृत मुलाला मांडीवर घेतलाय.त्याचे निर्जीव पाय लोंंबकळत आहेत.मेरीमातेने हाताने त्याचा देह सावरलाय.मायकेल अॅन्जेलोची श्रेष्ठ्ता यातल्या येशूच्या निर्जीव आणि मेरीच्या सजीव शिल्पामधून दिसून येते.इतकी शतकं होउनही काचेच्या तावदानामागूनही त्या शिल्पाचं झळाळतं पॉलिश मायकेलॅन्जेलोचं श्रेष्ठत्व दाखवून जातं. हे शिल्प त्याने वयाच्या फक्त एकविसाव्या वर्षी घडवलंय!
आतमध्ये सेंट पिटरच्या कबरीच्या वरच बाल्दाकिनो म्हणजे मेघडंबरी आहे.ब्रॉन्झचे पिळदार ऊन्च खांब तिची शोभा वाढवतात.तिच्यावर सोन्याचा झगमगीत क्रॉस.चारी कोपर्यावर देवदूतांची शिल्पं.वर घुमटावरच्या स्वर्गाच्या चित्रांकडे आप्ले लक्ष आपोआप वेधले जाते अशी रचना.त्याच्या समोरच कथीड्रा म्हणजे देवाचे आसन ठेवलेले आहे.यावरूनच कथीड्रल शब्द आलाय.मागे पेत्रा ग्लोरिया म्हणजे एक खिडकी आहे.बाजूने बारा शिष्यांचे प्रतिक म्हणून बारा सोनेरी किरणं फाकलेली आहेत.त्याभोवती विहरणारे देवदूत.ही या चर्च मधली सर्वात पवित्र जागा.एका साखळीमागे उभे राहून हे बघता येतं.बाजूलाच सेंट पिटरचा ब्रॉन्झमध्ये घडवलेला पुतळा आहे.अनेक शतकं भाविकांनी हात लावून लावून त्याचं एक पाऊल सोनेरी गुळगुळीत झालंय.हे सर्व बघता बघता अचानक चर्चच्या बेल्स वाजायला लागल्या आणि कॉयरचे संगीत सुरू झाले. त्या वातवरणात ते सूर अजब जादू करून जातात आणि आपण भारावून जातो.
(जालावरून साभार)
हा ख्रिश्चन धर्माचा पवित्रतम भाग मानला जातो.इथे जणू देवाचीच वस्ती आहे असा समज आहे.आजपर्यंतच्या सर्व पोपच्या समाध्या,अनेक राजा राण्यांच्या समाध्या इकडे आहेत.
आजूबाजूची नामवंत चित्रकारांची चित्रं बघत बाहेर आलो.आता वेध लागले होते व्हॅटिकनचा खरा खजिना,व्हॅटिकन म्युझियमचे.ते पुढच्या भागात!
प्रतिक्रिया
4 Jun 2015 - 11:26 pm | रेवती
वाचतिये. रोमांचित लेखन. ;)
4 Jun 2015 - 11:54 pm | रुपी
लेखनशैली नेहमीप्रमाणेच छान आहे! जेवणाचे वाचून फार मजा आली, पण इतकी सहल तुम्ही कशी केलीत याचे कौतुकही वाटले!
व्हॅटिकनबद्दल "ओअॅसिसच्या शोधात" मध्ये वाचले होते, तेव्हापासूनच भेट द्यायची इच्छा आहे. मेरीने येशूचे कलेवर मांडीवर घेतलेल्या शिल्पाबद्दल तर त्यांनी खूप सुंदर शब्दांत लिहिले आहे.
4 Jun 2015 - 11:57 pm | पियुशा
जियो अजया जियो , क्या बात क्या बात ! कधी योग येईल ,येईल की नाही ते ही माहीत नाही पण तूझी इटली सफ़र मला आताच इटली फिरतेय जणू असा फील देतेय :)
5 Jun 2015 - 12:09 am | मधुरा देशपांडे
वाह! मस्त झालाय हा भागही.
5 Jun 2015 - 12:29 am | श्रीरंग_जोशी
या भागातल्या अप्रतिम स्थापत्यसौदंर्याचे तुमच्या सौदर्यदृष्टीने केलेले रसग्रहण वाचून धन्य झालो.
ओघवत्या लेखनशैलीमुळे असं वाटत राहतं की मी स्वतःच व्हॅटिकनमध्ये फिरतोय.
5 Jun 2015 - 12:30 am | पद्मावति
लिखाणाची शैली तर तुमची आहेच सुरेख, पण अभ्यासही तुमचा उत्तम आहे. प्रत्येक गोष्टीची पार्श्वभूमी छान सांगत आहात. तक्रार एकच----एकेक भागाची फार वाट बघायला लावताय. पुढल्या भागाची उत्सुकतेने वाट पाहत आहे.
5 Jun 2015 - 8:20 am | अजया
वेळ लागतोय भाग टाकायला हे खरंय!पण वेळ मिळत नाहीये सध्या हे पण खरं!
5 Jun 2015 - 8:42 am | प्रमोद देर्देकर
पाचही भाग एकदम वाचुन काढलेत. मस्तच चाललीय सफर.
5 Jun 2015 - 9:07 am | जुइ
माहिती खूप चांगली दिली आहेस. खाण्याबाबत मला वाटते की आपल्या भारतीय चवीच्या जीभांना असे खाण्याची सवय व्हायला वेळ लागतो
5 Jun 2015 - 9:26 am | अजया
हो.ते एक कारण आहेच.आणि मला वाटतं रेस्टाॅरंटमध्ये इटालियन फुड खाणे आणि वास्तव्य असणार्या हाॅटेलचे फूड यात दर्जाचा फरक असावा.कारण रेस्टाॅरंट्समध्ये बरे असायचे खाद्यपदार्थ.पण हे चिनी भारतीय सगळ्यांना एकच बुफे लावणारे हाॅटेलवाले चवीत गंडत होते!
5 Jun 2015 - 1:07 pm | मधुरा देशपांडे
हो हे काही प्रमाणात असु शकतेच. शिवाय पर्यटन स्थळ म्हणुन नावाजलेल्य शहरांमध्ये अजुनच जास्त गंडवले जाते. तसे इटालियन फुड आपल्या भारतीय चवीशी अधिक मिळतेजुळते आहे. काही ईटालियन रेस्टाॅरंटमध्ये तर पास्त्यासाठी जास्त तिखट हवंय का असे विचारतात देखील. :) पण बुफे मध्ये एका बाहेरुन अगदी चांगल्या वाटलेल्या रेस्टाॅरंटबाबत देखील असाच वाईट अनुभव आला होता.
5 Jun 2015 - 1:29 pm | मोहनराव
बाहेरच्या देशात भारतीय गेले की खाण्यापिण्याची जरा आबाळ्च होते. त्यात शाकाहारी असाल तर जास्तच.
परंतु जिथे जाल तिथली स्पेशॅलिटी ट्राय करावी अश्या मताचा मी आहे.
तुमचे लेखन छान झाले आहे. व्हॅटिकनचे काही फोटोज करेन इथे शेअर. पुभाप्र.
5 Jun 2015 - 1:23 pm | धर्मराजमुटके
खिक्क !
याच न्यायाने मग चिन्यांना पण आपल्याकडच्या चायनीज पदार्थांच्या गाडीवरुन ट्रेनिंग द्यावे काय ?
:)
6 Jun 2015 - 1:39 am | डॉ सुहास म्हात्रे
चिन्यांना पण आपल्याकडच्या चायनीज पदार्थांच्या गाडीवरुन ट्रेनिंग द्यावे काय ?
भारतातल्याच गाडीवरचे नाही तर (चीन सोडून) जगभरच्या खास चिनी रेस्तराँमध्ये मिळणारे प्रसिद्ध चिनी पदार्थ चीनमध्ये नावालापण मिळत नाहीत ! :)
13 Jun 2015 - 4:33 pm | स्पंदना
सगळ्यात मजा यायची ती सिंगापुरात चिंडीयन हॉटेलात? हे मन्चाव? अस म्हणत वेगवेगळी सुप्स आणि भारतीय चायनीज डीशेस खाणारे चायनीज बघताना.
चायनीज कुझीन हा जगभर त्या त्या देशाच्या जीभेला रुचेल असा बनवला गेला आहे.
5 Jun 2015 - 1:36 pm | मदनबाण
वाचतोय...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूक
5 Jun 2015 - 3:15 pm | सानिकास्वप्निल
छान झालाय हा ही भाग.
तुझी लेखनशैली तर सुरेखचं आहे, आपण तर पंखी झालो ब्वॉ ;)
5 Jun 2015 - 4:22 pm | पिलीयन रायडर
जाणार जाणार.. आता तर युरोप मध्ये नक्कीच जाणार..!
आणि घरुन नोट्स काढुन नेल्या होत्यास???!!
दंडवत माते!!
मस्त लिहीत आहेस.. लिहीत रहा..
5 Jun 2015 - 4:39 pm | Mrunalini
मस्त लेख ताई.. वर्णन आवडले. आम्हि केलेली ट्रिप परत आठवली. :)
त्या दिवशी आम्ही रोम मधले फेमस ५ चर्च बघायची टुर केली होती. तेव्हा तिथे एका चर्च मधे प्रत्यक्ष पोपना भेटायची संधी मिळाली होती. खुप छान वाटले होते.
5 Jun 2015 - 4:48 pm | पॉइंट ब्लँक
सविस्तर आणि मस्त वर्णन :)
5 Jun 2015 - 5:43 pm | काळा पहाड
लोकांचे ऑथेंटीक इटालियन खाण्याबद्दल बरेच गैर समज आहेत. मी इटलीत खाल्लेला व्हेज पिझ्झा म्हणजे मार्गारिटा पिझ्झा वर भुरभुरलेल्या ऑलिव्ह ऑईल मध्ये तळलेल्या आणि भारतीयांना फारसं माहीत नसलेल्या ब्रॉकोली टाईप भाज्या आणि एक्झॉटीक हर्ब्स. एकतर आपल्याला ऑलिव्ह ऑईल ची सवय नसते, त्या भाज्या ऑलिव्ह ऑईल मुळे कडवट असतात. शिवाय मी एक्ट्यानं पिझा मागवणं (१५ युरो) आणि तो एकट्यानं संपवणं अशक्य असतं. त्यात त्या पिझ्झावर चीज ओतलेलं असतं. इतकं चीज आपल्याला पचत नाही (भारतीय माईंडसेट मुळे टाकवत पण नाही).
15 Jun 2015 - 12:31 pm | प्रभाकर पेठकर
इटली मध्ये इटालियन उपहारगृहात मागविलेला पिझ्झा एकतर भयंकर महाग होता आणि टॉपिंगच्या बाबतीत भलताच गरीब होता. एव्हढे पैसे मोजल्यामुळे बळेच संपविला पुन्हा न मागविण्याच्या निश्चयानेच.
स्वित्झर्लंडच्या झरमॅट शहरी पिझ्झा मागविल्या नंतर जो पदार्थ आला तो मैद्याच्या पोळीवरून ऑलीव्ह ऑईल आणि पातळ चिझ ओघळत होतं. ते शेवटी आमटी-पोळी सारखं खाल्लं.
मला वाटतं आपल्याला ज्या पिझ्झाची सवय असते तो अमेरिकन स्टाईल पिझ्झा असतो.
युरोपात शाकाहारी जेवणाची फार आबाळ होते.
5 Jun 2015 - 6:53 pm | नूतन सावंत
अजया,एकदा मीना प्रभूबरोबर पहिले,आता तुझ्याबरोबर पाहतेय.खरेच जायचा योग येईल तेव्हा तुझा हा लेख बरोबर नेणार. तुझ्या नोट्स साठी नंबर लावतेय हं.
5 Jun 2015 - 7:11 pm | सविता००१
सुंदर लिहिते आहेस गं.
5 Jun 2015 - 9:21 pm | बहारिन् चा खलिफा
वाचतोय. पुभाप्र.
6 Jun 2015 - 1:35 am | डॉ सुहास म्हात्रे
मस्तच ! रोम-वॅटिकन-मध्ये फिरतोय असाच भास झाला !
6 Jun 2015 - 10:25 am | प्रचेतस
जबरी...!!!
अशक्य कलाकुसर आहे ही.
6 Jun 2015 - 10:33 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
फोटो आणि माहिती दोन्ही जब्बर आहेत :)!!
6 Jun 2015 - 6:58 pm | स्वाती दिनेश
इटलीचे वर्णन छान!
परत परत तिथे जाऊन आले..
स्वाती
6 Jun 2015 - 9:13 pm | स्वाती राजेश
लिखाण ...अन फोटो .. फ्लोरेंन्स, मिलान ला मला खुप व्हेज ओप्शन पाहायला मि ळा ले. अन टेस्टी सुद्धा. रोम चे माहीत नाही.या लेखाचा मला रोम ट्रीप ला नक्की उपयोग होइल...
7 Jun 2015 - 7:17 am | भाग्यश्री कुलकर्णी
मस्तच....
7 Jun 2015 - 7:57 am | राघवेंद्र
खुप सुंदर ट्रिप चालु आहे.
पु. भा. प्र.
7 Jun 2015 - 2:19 pm | तिमा
छानच प्रवास चाललाय. तुमच्या टूर ऑपरेटर चा पत्ता आणि त्यांच्या व्यवस्थेबद्दलचे तुमचे मत व्य.नि. कराल का ?
7 Jun 2015 - 6:33 pm | एस
इतके दिवस मला झाडून सर्व दंतवैद्य निष्ठूर आणि संवेदनशून्य, कोरडे असे वाटायचे. त्या यादीतून तुमचे नाव वगळण्यात येत आहे. ;-)
9 Jun 2015 - 12:08 pm | उमा @ मिपा
ज्यादिवशी हा भाग टाकलास त्याचदिवशी मोबाईलवरुन वाचला होता (गेला एक आठवडा laptop मला मिळतंच नाहीये, मोबाइलवर मात्र रोजच्या रोज मिपा वाचतेय) पण तिथून टाईप करणं जमत नसल्याने प्रतिक्रिया देता आली नाही.
रोमला साजेसं वर्णन!
उत्तम अभ्यास, नोट्स लिहून घेऊन जाणं आणि आल्यावर पुन्हा ते सगळं इतकं छान लिहिणं _/\_
9 Jun 2015 - 12:26 pm | चुकलामाकला
छान!
मायकेल अन्जेलोचा डिझयनर पोशाख भारी आवड्ल्या गेला आहे .
11 Jun 2015 - 5:50 pm | इशा१२३
मस्तच!इटालियन पदार्थांबद्दल सहमत.तिथली चव घ्यायची म्हणुन पिझ्झा न पास्ता घेतले खरे पण दोन्हिहि आवडले नाहि.तसे ते एरवी आवडत नसल्याने झाले असावे असे वाटले पण बरोबरच्या इतर लोकांनाचेहि तेच मत होते.बाकी ट्रेवि फाउंटन सुंदर आहे.म्युझियम तर सुरेखच.खजिना आहे.रोम मला आवडलेल्या शहरानमधे पहिला नंबरवर आहे.
परत नक्की जाणार.
पु.भाग लवकर टाक.
13 Jun 2015 - 4:36 pm | स्पंदना
सव्विस्तर माहीती, तसेच फोटो आणि रसभरीत वर्णन.
काय हवं काय आणखी सहलीत सहभागी व्हायला.
बाकी निघण्याआधी तू बराच अभ्यास करुन गेली असशील हे माहीत होतं, पण नोटस काढून नेल्यास म्हणजे....
आता त्या ट्रीप मधले लोक इथुन पुढे तू कोठे जाणार? हे नक्किच विचारत असणार.
14 Jun 2015 - 8:30 am | अत्रुप्त आत्मा
क्या बात है! लै मजा आया वाचताना.
15 Jun 2015 - 12:45 pm | प्रभाकर पेठकर
व्हॅटीकन देशाचे बहुतांशी दर्शन बसमधूनच झाले. कॅथड्रीलचे दर्शनही बाहेरूनच घेतले. (हा लेख वाचल्यावर आता त्या कद्रूपणाचे वाईट वाटते आहे.) आम्ही तिथे भटकत असताना पाऊस पडत होता. अगदी गारा वगैरे पडल्या. हाडं गोठविणारी थंडी आणि झोडपून काढणारा वारा.
शिल्प पाहताना त्याबद्दलची माहिति सांगणारं कोणी असेल तर पहायला आवडतं अन्याथा मजा नाही येत. विकी वरून माहिती काढणे नोट्स काढणे वगैरे सुचलेच नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा व्हॅटिकन भेट जरूरी ठरली आहे.
पोप ह्या ख्रिश्चन धर्मगुरूचे महत्व पूर्वीच्या काळी फार होते. पोप हे राजाचा कान धरून त्याला लोकोपयोगी कल्पना राबविण्यसाठी मनवू शकत होते. राजसत्ते इतकीच धर्मसत्ता शक्तीमान होती. पोपच्या निर्देशाने राजसत्ता उलथू शकत होती. त्यामुळे धर्मसत्तेच्या विरुद्ध जाणे राजसत्तेला परवडणारे नसायचे. कित्येक पोप्सनी राजाला सांगून राज्यात सुधारणा करून घेतल्या. जसे रस्ते, शिक्षण, वैद्यकियसेवा, न्यायव्यवस्था इ.इ.इ..
16 Jun 2015 - 1:48 pm | पेरु
छान आहे हे प्रवासवर्णन.
इट प्रे लव्ह मध्ये थोडीफार माहिती मिळाली होती या देशाविषयी. पुस्तकात तर नेपल्समधे सर्वोत्कृष्ट पिझ्झा मिळतो असे लिहिले आहे. खाण्यापुण्याची एवढी आबाळ होते का?
16 Jun 2015 - 6:41 pm | पैसा
खूप छान चालू आहे!
17 Jun 2015 - 1:00 pm | सस्नेह
रोम हर्षक माहितीचा खजिना !
17 Jun 2015 - 1:22 pm | विशाल कुलकर्णी
वाह अप्रतिम प्रचि आणि माहिती ..
6 Jul 2015 - 1:35 am | यशोधरा
छान जमलाय हाही भाग.