माझी इटलीची भ्रमणगाथा! भाग १-उपोद्घात!!

अजया's picture
अजया in भटकंती
17 May 2015 - 8:24 pm

खूप दिवसांपासून युरोप ट्रिप करायचं डोक्यात घोळत होतं.निरनिराळ्या ट्रॅव्हल कंपन्यांच्या सफरींचे कार्यक्रम बघत होते.तो पंधरा वीस दिवसात अक्खा खंड पहायचा चिवडा काही पसंतीला येईना.मला चित्र,शिल्प,संस्कृती,निसर्ग सगळंच अनुभवायचं होतं.त्यातच मीना प्रभूंचं रोमराज्य वाचण्यात आलं आणि मायकेल अ‍ॅन्जेलो लिओनार्दो बरोबरच अजून काही चित्रकार शिल्पकारांची माहिती झाली.त्यातल्या कार्व्हाज्जीओच्या चित्रांनी तर वेडंच केलं.आणि इट्लीला जायचं नक्की केलं.मग ऑनलाईन हॉटेल बुकिंग करू,तिथलीच लोकल ट्रीप बूक करू असे मनात मांडे रचायला सुरुवात केली.माझ्या सख्ख्या मैत्रीणीला प्लॅन सांगितला आणि नवर्‍याला! मैत्रीण असल्याने ती अर्थातच लगेच तयार झाली,नवर्‍याने मात्र सुट्टी मिळेल का नाही सांगता येत नाही वगैरे रडायला सुरुवात केली.मग मी आलास तर तुझ्यासोबत न आल्यास सुनीता आहेच असं बाणेदारपणे सांगून माझ्या इटलीप्रवास शोधाचा अभ्यास सुरु केला! इटलीबाबत विचारणा केल्यावर जऊन आलेल्या प्रत्येकाने चोर्‍यांची भिती घालायला सुरुवात केली. आपल्या मिपाकरांनी देखील हे चोरीचे अनुभव घेतले आहेत ऐकल्यावर जरा बिचकायला झालं(मिपाकर चतूर,चाणाक्ष असताना चोरी??)! ते ऐकुन मला कुठेही कधीही काहीही करायला नाही न म्हणणार्‍या नवर्‍याने(तसं प्रशिक्षण दिलंय त्याला ;) )अजिबात एकटी जायचं नाही,जायचं तर ग्रूपने जा ,निदान पासपोर्ट वगैरे चोरीला गेला तर आधार होईल म्हणून, मी पाहिलेलं, पाठीवर पडशी टाकून मी हातात नकाशा घेऊन हिंड्तीये वगैरे स्वप्न मोडून टाकलं :(
मग मी कोणत्या प्रवासी कंपन्या फक्त इट्ली दाखवतात त्या शोधाला लागले.मला हवी असणारी दुसरा कोणताही देश न दाखवता पूर्ण इटलीची सफर फक्त एका प्रवासी संस्थेकडे होती.मग त्यांच्या वाशी ऑफिसला जाऊन थडकले.तिथल्या मुलीने मला या सफरीचे पत्रक देऊन व्हिसाला लागणार्‍या कागदपत्रांबद्दल सांगितले.सोपं दिसत होतं! त्यांच्या स्पेसिफिकेशन प्रमाणे फोटो,फॉर्म भरायचा,बँकेचे स्टेटमेंट्,गुंतवणूकीसंबंधी कागदपत्र इ .म्हंट्लं बरंय हे,मला काही कटकट नाही.सहलीच्या एक महिना आधी त्यांच्या यादीप्रमाणे कागदपत्र घेऊन गेले.त्याआधी त्यांच्या व्हिसा सल्लागाराला अजून काही नको ना विचारले होतेच,फोन करून.तिथे गेल्यावर त्याने आधी बँक स्टेटमेंट्वर नजर टाकली.इतकेच आहेत सेव्हिंग्जला? असे विचारून माझा माझ्या सांपत्तीक स्थितीबाबत असलेल्या कल्पनेला सुरूंग लावला.हे कमी आहेत का??माझा प्रश्न! हम्म्म,ठिक आहेत पण शेंगेनसाठी सेव्हिंगला पाच सहा लाख असले तर बरे दिसतात.इति व्हिसा सल्ला गार!!
आता?
तीन महिन्यापासून महिना पन्नास हजार टाकायचे ना.
तुम्ही सांगितलं नाहीत तेव्हा.त्याचे मौन!
शेंगेनला तगडा बँक बॅलन्स लागतो मॅडम!
आहे त्यात तुमच्या सहलीचा येऊन जाऊन खर्च निघेल की.आणि बाकीच्या गुंतवणूकी आहेत ना?
एक काम करा आता.जरा पन्नास हजार तरी वाढवून आणाच यात!
एवढच लागेल ना की अजून काही?
नाही.एवढंच!
झालं! तिसर्‍या दिवशी मी त्याच्यापुढे परत हजर.तो आला,त्याने पहिले आणि...
मॅडम, तुम्ही पन्नास हजारच्यावर का टाकलेत?
का?आता काय झालं?
आता तुम्हाला स्पष्टिकरण द्यावे लागेल्,इतके पैसे कुठुन आणलेत!!!
मग देईन की.
अहो,पन्नासच्या वर ट्रॅन्झॅक्शन दाखवायचं नाही असं अचानक.
हे मला आधी सांगायचं ना मग.त्याचं मौनव्रत!
आता हा एक फॉर्म भरून द्या. पैशाचा सोर्स काय लिहू? भेट ?
अजिबात नाही.मला कोण एवढे पैसे भेट देणारे? लिहा की व्यवसायातून मिळालेले. दुसर्‍या बँकेतून एफ डी तोडून टाकलंय.
व्यवसायातून?
का हो, आम्हाला मिळत नसतील असं वाटतं का!!! हेच कारण लिहा. खोट्या भेटी नको!!
ठिक आहे.जशी तुमची मर्जी.अरे,तुम्ही मिस्टरांचे लेटर नाही आणलं का?
ते इथे नसतात.काय लेटर लागणार आहे?
काही विशेष नाही.त्यांनी या ट्रिपला जायला तुम्हला परवानगी दिली आहे,त्यांना महिती आहे असं!!
हे ऐकून माझ्यातली अनाहिता जागी झालीच! हे पत्र एकट्या जाणार्‍या नवर्‍यालाही बायकोकडून घ्यावे लागते का?
नाही. त्यांना नाही लागत.
मग एखाद्या बाईने नवर्‍याला सोडले आहे तर तिला व्हिसा मिळत नाही? ...मौन

हा कागद वकिलाकडून शंभर रुपयाच्या बॉण्डपेपरवर लिहून नोटरी करून आणा आता!
अहो,पण सहीला नवरा? ( एनाराय नवरा हा कुंकवाचा तसाच सहीचा देखील धनी लागतो!! प्रवासाने चातूर्य येते ते असे!)
ते आपण मॅनेज करू!
आँ! पण मी असा कागद द्यायला तयारच नाहीये.शुद्ध अपमान आहे हा स्त्रीयांचा.माझा प्रवास्,खर्च माझा मी करणार.नवरा कोण टिकोजी मला परवानगी देणार??
मॅडम्,मिस्टरांनी परवानगी दिली तरच जाणार ना तुम्ही??मग एक पेपर द्यायला काय प्रॉब्लेम?
प्रश्न तत्वाचा आहे आणि मी अनाहिता आहे! मी काही असलं नवर्‍याकडून लिहून घेणार नाही.
माझ्या बरोबर येणारी मैत्रीण पण याच गोष्टीने हैराण झालेली. प्रगत समजला जाणार्‍या युरोपला जायला असा पेपर लागावा? मग आम्ही कंपूबाजी (ह्यॅ ह्यॅ ह्यॅ) करायची ठरवली! घरी येऊन शेंगेनची वेबसाईट चेक केली.त्यात असा उल्लेख मिळाला नाही.माउथशट डॉट कॉम वर अगदी आमच्यासरखंच हा पेपर खटकल्याने इटालीयन कॉन्स्युलेटशी पत्रव्यवहार केलेल्या एकीचं वाचायला मिळालं आणि हुरूप आला. तिला अशा पेपरची ती स्वतः खर्च करत असताना गरज नाही असं सांगितलं गेलं होतं.ते वाचून परत प्रवासी संस्थेला फोन केला,हे असं वाचलंय सांगायला.तो आमच्यावर उखडला.म्हणे मी इतकी वर्ष काम करतोय व्हिसाचं.तुम्हाला काय प्रॉब्लेम एक लेटर मिस्टरांकडून घ्यायला?असं कोणीच करत नाहीत.त्याला आमचं दोघींचं नवर्‍याशी बरं नाही असं वाटायला लागलेलं एकूण!
आम्ही म्हंटलं असं पत्र न देता होत असेल तर बघा,नाहीतर या आम्ही चाललो! कंपूबाजीचा विजय असो!! त्याने मी बघतो काय ते,म्हणून बाकीची कागदपत्रं घेतली.नवर्‍याचे पत्र त्यातली परवानगीची भाषा बदलून दिलं.युरोमधले चलन भरले आणि व्हिसाची वाट बघायला लागलो!
माझं एक आहे.पुलंनी अनेक योग लिहिलेत त्याप्रमाणे ,माझी गाडी टोलला रांगेत असेल ती रांग सगळ्यात हळू जाते,मी इमिग्रेशनच्या रांगेत असेल ती संपतच नाही.त्याला अनुसरून माझ्या मैत्रीणीचा व्हिसा आठ दिवसात आला! त्यानंतर एक आठवडा झाला तरी माझा नाही! दुसरा झाला,तरी नाही! मला वाटलं कंपूबाजी केली तर कॉन्स्युलेट फार तर कविता करेल,विडंबन टाकेल पण व्हिसा नाही म्हणजे बॅन केल्यासारखं वाटतं राव ;) थ्री इडियट मध्ये एक डायलॉग आहे,अपना दोस्त फेल होता है तो दुख होता है लेकिन फर्स्ट आता है तो जादा दुख होता है!! अगदी अस्संच मैत्रीणीच्या लगेच झालेल्या व्हिसाने मला वाटायला लागलेलं!!शेवटी जायला दहा दिवस असताना आला बाबा व्हिसा! आणि निघाले की मी इटलीला!!

माझी इटलीची भ्रमणगाथा - भाग २ -रोम

प्रतिक्रिया

सानिकास्वप्निल's picture

17 May 2015 - 8:41 pm | सानिकास्वप्निल

वाह! वाह!

सफरीची सुरुवात छान झालिये, मस्तं मस्तं.
इटलीबद्दल काय आणि किती बोलू सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला तुझ्या ह्या छान ट्रीपमुळे.
लवकरच पुढचे भाग लिहि आणि हो फोटोसुद्धा पाहिजेत :)

कविता१९७८'s picture

17 May 2015 - 8:42 pm | कविता१९७८

मस्त, पटापट भाग टाक सगळे, तुझ्या निमित्ताने आम्हीही फीरुन घेतो.

त्रिवेणी's picture

17 May 2015 - 8:48 pm | त्रिवेणी

ज ब र द स्त ए क द म ज ब र द स्त. आ आ ता पु ढ चे भा ग प ण ये वु दे त प टा प ट.

स्नेहानिकेत's picture

17 May 2015 - 9:10 pm | स्नेहानिकेत

वाह! वाह! मस्त सुरुवात ... आता आमची इटलीची सफर सुरू झाली. पुढचे भाग पटापट येऊदेत !!!!

स्रुजा's picture

17 May 2015 - 9:25 pm | स्रुजा

वाह वाह ! मस्त सुरुवात. कंपुबाजी आवडली ;)

चला आता इटली सफरीला अजयाच्या संगे पु भा ची आतुरतेने वाट पाहतो आहोत :)

चित्रगुप्त's picture

17 May 2015 - 9:28 pm | चित्रगुप्त

व्वा. पुढील भागांच्या प्रतिक्षेत.

नूतन सावंत's picture

17 May 2015 - 9:45 pm | नूतन सावंत

सुरुवातच सही.फोटो भरपूर टाक.इटलीची सफर करायला उत्सुक आहे तुझ्यासोबत.

प्रचेतस's picture

17 May 2015 - 9:46 pm | प्रचेतस

मस्त सुरुवात
पुभाप्र.

छान सुरूवात. अनाहिता टच आवडला. सफर मस्त होणार यात शंका नाही. पुभाप्र.

स्वप्नांची राणी's picture

17 May 2015 - 11:07 pm | स्वप्नांची राणी

प्रतिसादकांच्या कंपूत मी पण..!! पुभाप्र....

उमा @ मिपा's picture

17 May 2015 - 11:29 pm | उमा @ मिपा

धम्माल लिहिलयस गं! पटापट येऊ देत पुढचे भाग.
कंपूबाजी सॉलिड!

प्रगत समजला जाणार्‍या युरोपला जायला असा पेपर लागावा?

इटली प्रगत आहे हे कोण सांगितलं? या देशातल्या प्रवासी अनुभवांबद्दल आणि इमिग्रंट्स बद्दल आंतरजाला वर वाचलंत तर तुम्हाला बरंच काही नवीन आणि आश्चर्यकारक कळेल. इटली सहा गोष्टींबद्दल प्रसिद्ध आहे. १. तिथले लोक (फक्त स्त्रियाच नव्हे, तर पुरुष सुद्धा) अप्रतिम सुंदर आहेत. फक्त गोरं असणं म्हणजे सुंदर असणं नव्हे. त्यांची चेहरेपट्टी पाहिली तर रेखीवपणा म्हणजे काय याची साक्ष पटते. २. तो एक वर्णद्वेषी देश आहे. भारतीय तर काळेच. पण हे लोक इतर युरोपियन्स व अमेरिकन लोकांचाही तिरस्कार करतात. आफ्रिकन्स ची तर गोष्टच सोडा. ३. तिथली लाल फीत ही भारतापेक्षा बळकट आहे. कुठलीही गोष्ट ही दिवसांत नव्हे तर महिन्यांत केली जाते. ४. इटालियन्स ना बदलायची, प्रगतीची जरा सुद्धा इच्छा नाही. आपण जसे आहोत तसेच रहावं ही त्यांची इच्छा आहे. आपलं खाणं सर्वश्रेष्ठ आहे, आपलं रहाणीमान उच्च आहे आणि आपण देवाची लाडकी लेकरं आहोत यावर त्यांची श्रद्धा आहे. यांना इंग्लिश येत नाही आणि ती भाषा किती महत्वाची आहे त्याची त्यांना जाणीवसुद्धा नाही. ५. तिथला भ्रष्टाचार भारताच्या तोडीस तोड आहे. ६. पर्यटकांसाठी इटली स्वर्ग आहे. जगातले सारे म्युझियम्स एका बाजूला आणि इटली दुसर्‍या बाजूला इतक्या अप्रतिम सुंदर कलाकृती तिथे आहेत. अर्थात, पर्यटक म्हणजे अमेरिकन्स. तुम्ही फक्त काळ्या गुलामांपैकी एक आहात हे ते तुम्हाला कधी ना कधी जाणवून देतीलच.

आदूबाळ's picture

18 May 2015 - 12:50 am | आदूबाळ

जबरी सुरुवात! पुभाप्र.

एका मित्राने सांगितलेली अजून एक मनोरंजक माहिती. इटलीत दोन वेगवेगळी पोलिस खाती आहेत. एकाचं नाव कारबानेरी पण दुसऱ्याचं विसरलो. या दोन्ही खात्यांकडे एकच कार्यभार आहे. त्यांच्यात रीतसर भांडणं वगैरे होतात. मलीदा खाण्यासाठीही आणि जबाबदारी टाळण्यासाठीही!

काळा पहाड's picture

18 May 2015 - 1:16 am | काळा पहाड

काराबिनिएरी ही स्पेशल पोलीस डिव्हिजन आहे जी मिलिटरी पोलिसांनी बनलेली असते पण सिव्हिलियन ड्यूटीज पण करते. हे लेकाच्यांना ज्या गाड्या चालवायला मिळतात त्याचं काय सांगावं?
http://www.ilfaroonline.it/imgart/mini/alfa-159-carabinieri.jpg
http://static.blogo.it/eurocarblog/l/lot/lotus-evora-s-carabinieri-03/lo...
साध्या पोलिसांना पोलिझिया म्हणतात.

यातलं फक्त पहिला दुसरा आणि सहावा मुद्दा माहिती होता. बाकीची माहिती गरगरवणारी आहे. काय काय लोकं भरली आहेत जगात. आपली सर्वसमावेशक संस्कृती अशा वेळी बावळट वाटायला लागते.

वर्णद्वेष आहे.जाणवुन गेलाच.त्याबद्दल पुढे लिहिनच.

श्रीरंग_जोशी's picture

18 May 2015 - 12:13 am | श्रीरंग_जोशी

भ्रमणगाथेच्या लेखमालिकेची सुरुवात एकदम जोरदार झाली आहे.

कुठल्याही प्रकारच्या व्हिसासाठी विवाहित स्त्रीने पतीच्या परवानगीचे पत्र अर्जाबरोबर जोडावे असा सल्ला ट्रॅव्हल एजंट कडून मिळाल्याचे प्रथमच बघतोय. अक्षरशः काहीच्या काही सल्ला आहे.

यशोधरा's picture

6 Jul 2015 - 1:14 am | यशोधरा

हेच म्हणते!

जुइ's picture

18 May 2015 - 1:04 am | जुइ

व्हिसासाठी प्रथमच अशा विचित्र अटी कळाल्या.

चला! इटली सफरीसाठी तय्यार आहे! सुरुवात दमदार झालीये.

सुरुवात जबरदस्त .इतक्या अटी घालणाय्रा टुअ रवाल्याकडे जायचेच कशाला?इकडे टुअरिझम प्रदर्शनात(सप्टेंबर,फेब्रुआरी-गोरेगाव)हव्या त्या कंपनीकडे काउंटरवरच बुकिंग होते.असो.पिपिएफचे पासबुक उपयुक्त-केक खाताही येतो आणि दाखवताही येतो.माझे मत चुकीचे असेल.

चुकलामाकला's picture

18 May 2015 - 6:37 am | चुकलामाकला

उत्कंठावर्धक सुरुवात! आत्तापासून खात्यात शिल्लक टाकायचे ठरवले आहे.
पुभाप्र

बिपिन कार्यकर्ते's picture

18 May 2015 - 8:21 am | बिपिन कार्यकर्ते

लिहा...

सतिश गावडे's picture

18 May 2015 - 9:35 am | सतिश गावडे

छान सुरुवात.

पुढील भागांची वाट पाहतोय, फोटोसहित. अर्थात फेसबुकवर फोटो पाहिले आहेतच. :)

अरे वा अजुन एक देश फिरायला मिळणार तर
मस्त सुरवात

लवकर येउद्नेत पुढील भाग

स्नेहल महेश's picture

18 May 2015 - 11:32 am | स्नेहल महेश

वाह! मस्त सुरुवात............पुढचे भाग पटापट येऊदेत

पिलीयन रायडर's picture

18 May 2015 - 12:12 pm | पिलीयन रायडर

ते परवानगी पत्रा बद्दल कळालं तेव्हाही फार आश्चर्य वाटलं होतं.. पण तू काही ते सहजासहजी देणार नाहीस हे ही माहिती होतंच!!

सुरवात दणक्यात!! लवकर लवकर पुढचे भाग टाका!

चौकटराजा's picture

18 May 2015 - 12:43 pm | चौकटराजा

अजया,लेखन ओघवत्या व् मजेदार शैलीतले आहे!वीसा साठी से व्हिंग वरचा आकडा महत्वाचा की यूरो असलेले कार्ड अधिक वजनदार ठ रावे?

सेव्हिंग्ज अकाऊंट जास्त वजनदार हवे!!

आकाश खोत's picture

18 May 2015 - 12:51 pm | आकाश खोत

छान सुरुवात

अनिता ठाकूर's picture

18 May 2015 - 1:00 pm | अनिता ठाकूर

छान सुरुवात आहे.पुढील भागांविषयी उत्सुकता आहे. 'उपोद्घात' हा एक क्वचित लिहिला वाचला जाणारा शब्द पाहून बरे वाटले.असे शब्द वापरात राहिल्रे पाहिजेत असे वाटते.

स्पंदना's picture

18 May 2015 - 2:29 pm | स्पंदना

बयो.
तेथली शिल्पकला पहायला जायच्या आधी तूच छन्नी हातोडा हाती घेतला आहेस!!
घडवलीस की नाही त्या माणसाची(पक्षी ट्रॅव्हल एजंट्ची) मुर्ती?

बोले तो झकास!!

..केलीतच का शेवटी इटली ट्रिप, इतक्या भित्या घालूनही?

..आता डीटेलवार येऊ द्या.

झकास सुरुवात..पुभाप्र.

सुरुवात मस्त.. ओघवती.. पुढील लिखानाच्या प्रतिक्षेत

Mrunalini's picture

18 May 2015 - 4:44 pm | Mrunalini

मस्तच ताई.. आवडेश. ;)
सुरवात खुप छान झालीये.. आता पुढचे भाग पण टाक लवकर आणि फोटो. :)

पॉइंट ब्लँक's picture

18 May 2015 - 4:58 pm | पॉइंट ब्लँक

आयला प्रवास वर्णन म्हणून वाचायला आलो आणि इथं भलतच झालय. असो लेखन मजेशीर केलं आहे. खर्या प्रवास वर्णनाच्या प्रतिक्षेत ;)

राही's picture

18 May 2015 - 5:09 pm | राही

सुंदर विनोदी शैलीतली दणदणीत सुरुवात. पंचेस मस्त. अनाहिता जागी होणे, प्रशिक्षित नवरा वगैरे.

सूड's picture

18 May 2015 - 5:14 pm | सूड

ह्म्म, पुभाप्र!!

स्वाती राजेश's picture

18 May 2015 - 5:17 pm | स्वाती राजेश

भाषाशैली..मस्त सुरवात.. तुझ्याबरोबर आम्ही ही सहल करत आहोत...इटलीची... :)
येउ दे पुढचा भाग...वाट पाहतोय...

स्वाती राजेश's picture

18 May 2015 - 5:17 pm | स्वाती राजेश

भाषाशैली..मस्त सुरवात.. तुझ्याबरोबर आम्ही ही सहल करत आहोत...इटलीची... :)
येउ दे पुढचा भाग...वाट पाहतोय...

अनन्न्या's picture

18 May 2015 - 5:31 pm | अनन्न्या

आता तुझ्यासोबत प्रवास सुरू. अनाहिता असल्याचा तुला फायदा झाला हे फार महत्त्वाचे आहे. चला कधी निघायचं पुढच्या प्रवासाला?

आनन्दिता's picture

18 May 2015 - 5:52 pm | आनन्दिता

मला वाटलं कंपूबाजी केली तर कॉन्स्युलेट फार तर कविता करेल,विडंबन टाकेल पण व्हिसा नाही म्हणजे बॅन केल्यासारखं वाटतं राव

=))))

काय ते पंचेस!! तुझ्या विसाच्या सुरम्य कहाण्या आधी ऐकल्यात तरीही हे लेटर प्रकरण वाचुन आश्चर्य वाटले.

प्रीत-मोहर's picture

19 May 2015 - 9:03 am | प्रीत-मोहर

अगदी सहमत
(कंपुबाज प्रतिसादक अनाहिता) प्रीमो

बाकीट्पुभाप्र. उरलेले प्रतिसाद पुढल्या भागात.

मस्त सुरुवात!! पुभाप्र!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 May 2015 - 10:07 am | ज्ञानोबाचे पैजार

सुरवात तर झकास झाली आहे.
पुढचे भाग पटापटा टाका.

पैजारबुवा,

अजया's picture

19 May 2015 - 1:50 pm | अजया

सर्वांना धन्यवाद!

सविता००१'s picture

19 May 2015 - 4:13 pm | सविता००१

मस्त जबरी सुरुवात. व्हीसा प्रकरण माहीत होतं तरी तेवढीच धम्माल परत आली वाचताना.
चला, तुझ्याबरोबर इटली फिरते आता.

पैसा's picture

19 May 2015 - 4:25 pm | पैसा

लै भारी सुरुवात! आता पुढचा भाग वाचते.

सुरवात तर दनक्यात झाली...आता पुढचा भाग वाचते

पेट थेरपी's picture

21 May 2015 - 10:18 am | पेट थेरपी

छान लिव्हलंय हो. विडो बाईने कोणाची परवानगी आणायची? असा प्रश्न पडला. इटली लायनीत आहे.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

21 May 2015 - 5:24 pm | भाग्यश्री कुलकर्णी

हे लैच भारी.अजया ताई.खरच आमची पण ट्रीप होणार तर इटलीची.

तिमा's picture

22 May 2015 - 3:49 pm | तिमा

मला बायकोची परवानगी आण, असं सांगितलं तरी राग नाही येणार! कारण जगातील सर्वात व्यवहारशून्य माणूस मीच आहे याची, तिच्यापेक्षाही माझी खात्री आहे.
वर्णनाच्या प्रतीक्षेत.

काळा पहाड's picture

22 May 2015 - 4:37 pm | काळा पहाड

हा युनिव्हर्सल टोमणा दिसतोय.

दिपक.कुवेत's picture

25 May 2015 - 1:31 pm | दिपक.कुवेत

आता पुढिल भाग वाचायला घेतो....

प्रभाकर पेठकर's picture

9 Jun 2015 - 3:51 pm | प्रभाकर पेठकर

आत्ताच वाचला हा पहिला भाग. वाचून आश्चर्य वाटलं.

मी गेलो होतो तेंव्हा माझ्या पत्नीचा व्हिसा भारतातील जर्मन एम्बसीने दिला होता. तेंव्हा असे कांही, नवर्‍याकडून NOC आणण्याचे, बंधन नव्हते. तिला तसा काहीच अनुभव आला नाही.
माझा व्हिसा मस्कतमधून मी मिळविला होता आणि ते व्हिसा अर्जात नमूद केले नव्हते. असो.

इटलीच्या पर्यटनाचा पूर्वरंग मस्त, खुसखुशीत आणि उत्कंठा वर्धक झाला आहे. आता क्रमाने सर्व लेख वाचून काढतो.