रस्ता...

शब्दबम्बाळ's picture
शब्दबम्बाळ in जे न देखे रवी...
8 Apr 2015 - 6:19 pm

आयुष्याच्या रस्त्यावर चालताना मी कधी फार अडखळलोच नाही,
किंवा अडचणी काय असतात हे पाहायला, रस्त्याच्या त्या बाजूला मी कधी गेलोच नाही…

त्यांच जगणं तर मी रोजच पाहायचो,
जगणे ही लढाई आहे हे रोजच अनुभवायचो,
पण लढाईत त्यांची कुमक करायला मी कधी धजावलोच नाही,
कदाचित हरण्याच्या भीतीपायी मी त्या बाजूला कधी गेलोच नाही…

चटणी बरोबर पण जेवता येत हे मला माहीतच नव्हतं,
कधी कधी भुकेची आग शमवायला त्यांना पाणी देखील पुरेसं होत,
पण जेवणात मीठ कमी म्हणून टाकून द्यायला मी कधी वरमलोच नाही,
कदाचित उपासमारीच्या भीतीपायी मी त्या बाजूला कधी गेलोच नाही…

त्यांच्यासाठी डोक्याचा वापर फक्त ओझी वाहून न्यायलाच होता,
त्यात असलेला मेंदू जणू त्या ओझ्याखालीच दबला होता,
तरी त्यांना मूर्ख ठरवताना मी कधी शरमलोच नाही,
कदाचित मूर्ख ठरण्याच्या भीतीपायी मी त्या बाजूला कधी गेलोच नाही…

स्वतःच्या आयुष्यात सुख आणताना मी त्यांच दुःख कधी पाहीलंच नाही,
त्याचमुळे असेल कदाचित स्वतःच सुख कधी जवळच वाटलंच नाही,
मेंदूच्या मार्गाने जाताना मी मनाचं कधी ऐकलच नाही,
आता प्रश्न पडतो, का रस्त्याच्या त्या बाजूला मी कधी गेलोच नाही…

-आशिष

कविता

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

8 Apr 2015 - 9:30 pm | एक एकटा एकटाच

छान मांडलय

मदनबाण's picture

9 Apr 2015 - 9:24 am | मदनबाण

अप्रतिम...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ho Jaun Tera Madamiyan... ;) { Tevar }