बर्था बेंझ - जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने.......

सौन्दर्य's picture
सौन्दर्य in जनातलं, मनातलं
8 Mar 2015 - 8:38 pm

सरदार हे जसे अकारण चेष्टेचा विषय झाले आहेत, त्याचप्रमाणे ‘स्त्रियांचे ड्रायव्हिंग’ हा सुद्धा एक चेष्टेचा, टवाळीचा विषय झाला आहे. गुगलवर सर्च केले असता असंख्य विनोदी विडीयो ह्या विषयावर दिसतील. परंतु जगातली सर्वात पहिली ऑटोमोबाईल, (स्वयंचलीत गाडी) ही एका स्त्रीने चालवली, आणि इतकेच नव्हे तर तिच्यामुळेच ‘ऑटोमोबाईल’ ही कल्पना नुसती रुजलीच नाही तर चांगलीच फोफावली, हे फारच कमी जणांना ठाऊक असेल. नील आर्मस्ट्रॉंगच्या चंद्रावरच्या पहिल्या पावलासारखे, प्रसिद्धीचे भाग्य दुर्दैवाने त्या महिलेच्या वाटेला आले नाही, आणि म्हणूनच बहुसंख्य पुरुष वर्गाची जीभ ‘स्त्रियांचे ड्रायव्हिंग’ म्हंटले की चुरूचुरू चालू लागते.

आमच्या येथे, (ह्युस्टनमध्ये) रोज सकाळी ७.४० ते ७.४५ ह्या वेळेत, रेडियोवर ‘Engines of our Ingenuity’ हा कार्यक्रम प्रक्षेपित केला जातो. ह्या पाच मिनटाच्या कार्यक्रमात, जगभरात विविध विषयात जे काही युगप्रवर्तक शोध लागले, मानवजातीच्या भविष्याला एक वेगळेच वळण लावणाऱ्या ज्या काही घटना-दुर्घटना घडल्या, आणि ज्यांच्या मुळे हे सर्व घडले अश्या व्यक्तींविषयी माहिती दिली जाते. काही दिवसांपूर्वी ह्या कार्यक्रमात ‘जगातली पहिली ऑटोमोबाईल ड्रायव्हर – बर्था बेंझ’ हिच्या विषयी ऐकले आणि जाणवले की समस्त मानवजातीसाठी, आणि खास करून महिला वर्गाच्या दृष्टीने ही एक अत्यंत अभिमानाची बाब आहे. स्त्रियांच्या ड्रायव्हिंगची जी चेष्टा केली जाते त्याला हे एक सडेतोड उत्तर आहे.

बर्था रींगर हीचा जन्म, फोर्झेम, (उच्चार बरोबरच असेल असे नाही) जर्मनी येथे १८४९ साली एका श्रीमंत कुटुंबात झाला. तिने, तिच्या होणार्या पतीच्या, कार्ल बेंझच्या वर्कशॉपमध्ये, ऑटोमोबाईलच्या शोधासाठी पैसे गुंतवले. तिने फक्त पैसेच गुंतवले असे नसून, पहिल्या ऑटोमोबाईलच्या निर्मितीत तीने कार्लच्य वर्कशॉपमध्ये, त्याच्या खांद्याला खांदा लावून काम देखील केले. २० जुलै १८७२ साली बर्था रींगर, कार्लशी विवाह करून बर्था बेंझ झाली. कार्ल बेंझने तिचा आपल्यावरचा विश्वास सार्थ ठरवत, जगातल्या पहिल्या ऑटोमोबाईलची निर्मिती केली आणि त्याचे पेटंट मिळविले. १८८८ पर्यंत कार्लने दोन गाड्या बनवल्या आणि तिसर्या गाडीवर त्याचे काम चालले होते. कार्ल हा एक उत्कृष्ट इंजिनीअर होता आणि त्याचा कल, ‘पूर्णपणे निर्दोष’ इंजिन बनवण्याकडे होता. जरी त्याने दोन स्वयंचलीत गाड्या बनवल्या होत्या तरी त्याचे, त्या गाड्यांच्या क्षमतेबद्दल पूर्ण समाधान झाले नव्हते म्हणून तो त्या गाड्या रस्त्यावर ‘फिल्ड ट्रायलसाठी’ काढत नव्हता. त्याच्या विरुध्द, बर्थाचे असे मत होते की जोपर्यंत गाडी रस्त्यावर चालवून त्याची फिल्ड ट्रायल घेतली जात नाही, तोपर्यंत त्यात ‘परफेक्शन’ आणलेच जाऊ शकत नाही. ह्यावर त्यांचे खूप वाद-विवाद होत पण कार्ल आपल्या निर्णयावर हटून बसला होता.

शेवटी बर्थाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला. ऑगस्ट ५, १८८८ च्या दिवशी ती पहाटे उठली, आपल्या, रिचर्ड आणि युजेन ह्या अनुक्रमे १३ आणि १५ वर्षांच्या मुलांना उठवले आणि त्यांना आपला बेत समजवला. आधीतर मुले थोडी घाबरली, पण नंतर त्यांना देखील ह्या धाडसाची मजा वाटू लागली. आई आणि मुलांनी, कार्लने बनवलेली गाडी ढकलत ढकलत वर्कशॉप मधून बाहेर काढली. ढकलत अश्यासाठी की गाडीचे इंजिन सुरु करण्याच्या आवाजाने कार्ल जागा होईल ही भीती. गाडी तशीच ढकलत घरापासून दूर नेली आणि पुरेश्या अंतरावर गेल्यावर गाडी सुरु केली. बर्थाने गाडी घेऊन आपल्या माहेरी म्हणजे फ़ोर्झेइम शहरी, आपल्या आईला भेटायला जाण्याचे ठरवले होते आणि हे अंतर होते १०६ किलो मिटर म्हणजे जवळ जवळ ६६ माईल्स. बर्था आणि तिच्या नवर्याने ह्या शोधापाठी, फक्त पैसेच नव्हे तर आपले श्रम, वेळ, आणि कौटुंबिक जीवनात खूप त्याग केला होता. जेव्हा दुसरी कुटुंबे सण-वार साजरे करीत असंत, मुला-बाळात रमत, त्यावेळी बर्था आणि कार्ल, वर्कशॉपमध्ये आपल्या शोधावर काम करीत असंत. दिवस-रात्र मेहनत करून त्यांनी गाड्यांची दोन मॉडेल्स बनवून त्यांचे पेटंट्स घेतले होते, पण त्यांच्या व्यावसाईकदृष्ट्या यशस्वी होण्यावरच त्या मॉडेल्सचे आणि कार्ल-बर्थाचे भवितव्य अवलंबून होते. कार्लचा ‘परफेक्शनिस्ट’ स्वभाव त्याला गाडी रस्त्यावर काढायला परवानगी देत नव्हता, परंतु बर्थाची हुशारी, तिची हिम्मत आणि कार्ल आणि स्व:तावर असलेल्या विश्वासामुळे तिने, कार्लला न विचारता हा काळाच्या पुढचा निर्णय घेतला होता. वरकरणी आईला भेटणे हे जरी कारण दिसत असले तरी बर्थाला, आपल्या नवऱ्याला, हे सिद्ध करून दाखवायचे होते की जर त्या गाडीच्या उपयुक्तते आणि योग्यतेविषयी आम जनतेची खात्री पटली तरच गाडीचा हा शोध यशस्वी होऊ शकतो. आणि तशी खात्री पटविण्यासाठी गाडी घेऊन रस्त्यावर निघणे हाच एक पर्याय होता.

ह्या आधी वेगवेगळ्या एन्जिनीअर्सनी, इंजिन्स बनवली होती, गाड्यांची मॉडेल्स देखील बनवली होती, परंतु एकाही गाडीची फिल्ड ट्रायल घेतली गेली नव्हती. फार फार तर अगदी वर्कशॉपच्या आसपास, मेकॅनिकल असीस्टंटला, बरोबर घेऊन मारलेल्या त्या चकरा असंत. परंतु ही अगदी पहिलीच, पथदर्शक ट्रायल होती जी जनसामान्यात कायमची ठसा उमटवून गेली.

ह्या सफरीत बर्थाने अनेक अडचणींचा सामना केला. ‘लीग्रोईन’ हे गाडीचे इंधन त्याकाळी ‘क्लिनिंग फ्युएल’ म्हणून फक्त केमिस्टच्या दुकानात मिळायचे. त्यासाठी बर्थाला, मध्ये मध्ये थांबून ते विकत घ्यावे लागायचे. गाडीची चेन दुरुस्त करण्यासाठी तिने एका लोहाराची मदत घेतली, आणि एका मोच्याच्या मदतीने ब्रेक पेडल दुरुस्त करताना तिने ब्रेक लायनिंग’चा देखील शोध लावला. हॅट पिन वापरून तिने फ्युएल पंप मधील कचरा साफ केला, आणि पायमोज्याचे बंद, इन्सुलेटर्स म्हणून वापरले. वाटेत येणाऱ्या लहानमोठ्या टेकड्यांवर गाडी, तिघांचे वजन घेऊन चढेना तेव्हा तिने आसपासच्या शेत मजुरांची मदत, गाडी ढकलायला घेतली. एव्हढ्या सगळ्या अडचणींवर मात करून ती संध्याकाळी माहेरी पोहोचली, आणि लगेच कार्लला आपल्या सुखरूप पोहोचल्याची तार पाठवली.

ह्या सर्व सफरीत तिची ही नवीनच, घोडा, गाढव किंवा तत्सम जनावरांच्या मदतीशिवाय, आपोआप चालणारी गाडी बघून, कित्येक लोकं घाबरली, कित्येक जण तिच्या गाडीमागे उत्सुकतेने पळत येऊ लागले. ती जेथे जेथे थांबली तेथे अनेक लोकं गोळा होऊन, तिच्याकडे आणि तिच्या ह्या नाविन्यपूर्ण गाडीकडे बघत, गाडीला हात लावून बघत. बर्थाच्या अंदाजा आणि इच्छेप्रमाणे तिच्या ह्या गाडीला खूपच प्रसिद्धी लाभली. ऑटोमोबाईलच्या प्रगती आणि विकासात तिची ही सफर एक आधारशीला बनली. सफरीहून परतल्यावर, बर्थाने, प्रवासात आलेल्या एकूण एक अडचणी कार्लला सांगितल्या आणि त्या दोघांनी मिळून त्यांच्या ह्या मॉडेलमध्ये अनेक सुधारणा केल्या. त्यातील महत्त्वाच्या सुधारणा म्हणजे, टेकडी किंवा उंचावटा चढण्यासाठी एका नवीन गीअरचा शोध आणि ब्रेकला अधिक शक्ती मिळावी म्हणून ब्रेक लायनिंगची सोय. आज १२६ वर्षांनंतरही, कोणतीही गाडी ह्या दोन सुविधांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही, ह्यावरून बर्था-कार्लची दूरदृष्टी आणि तांत्रिक बुद्धीमत्ता दिसून येते. बर्था-कार्ल बेंझच्या गाडीच्या ह्या मॉडेलने यशाची शिखरे गाठली हे सांगायला कोणी ज्योतिषी नकोच.

आणि हे सर्व शक्य झाले ते बर्थाच्या हिम्मतीमुळे, दूरदृष्टीमुळे आणि स्व:ता आणि कार्लवरच्या दुर्दम्य विश्वासामुळे.

आणि बर्था ही एक स्त्री होती.

आजच्या 'आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या' निमित्ते सर्व स्त्रियांच्या गौरवासाठी लेख समर्पित.

(रेडियोवर हा कार्यक्रम ऐकल्यावर, आंतरजालावरून ही माहिती गोळा केली आहे. मला बर्था, कार्ल, आणि त्यांच्या पहिल्या गाडीचे फोटो लावायचे होते, पण ते कसे लावावेत हे न कळल्यामुळे लाऊ शकलो नाही. ह्या बाबतीत मदत हवी आहे)

सौंदर्य

हे ठिकाण

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

8 Mar 2015 - 8:54 pm | एक एकटा एकटाच

लेख आवडला.

पुढिल लेखनासाठी शुभेच्छा

श्रीरंग_जोशी's picture

8 Mar 2015 - 8:57 pm | श्रीरंग_जोशी

उत्तम समयोचित लेखन. बर्था बेंझ यांच्या या मुहूर्तमेढ रोवणार्‍या कामगिरीविषयी कॅप्टन जॅक स्पॅरो यांच्या या लेखात थोडक्यात वाचले होते.

तुमच्या लेखात त्याचा यथायोग्य विस्तार झाला आहे.

मदत -मिपावर फोटो चिकटवणे.

डिस्कवरी वर एका कार्यक्रमात बार्थाचा प्रवास रुपांतरीत करून दाखवला होता .
आज पुर्ण माहिती कळाली.
धन्यवाद .

खेडूत's picture

8 Mar 2015 - 9:43 pm | खेडूत

सुंदर माहिती.
स्टूटगार्टच्या संग्रहालयात ही गाडी पाहिल्याचं आठवतंय. रंगीत फोटो पण काढलाय तो मिळाला तर चिकटवीन.
तोपर्यंत अंदाज येण्यासाठी हा जालावरून साभार :

a

प्रफुल्ल पा's picture

8 Mar 2015 - 10:15 pm | प्रफुल्ल पा

बर्था-कार्ल बेंझ
ला त्रिवार नमस्कार

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Mar 2015 - 10:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्तं लेख.

aa

बेंझ दांपत्य.

मधुरा देशपांडे's picture

8 Mar 2015 - 10:29 pm | मधुरा देशपांडे

लेख आवड्ला. बर्थाचा आईकडे जाण्याचा हा संपुर्ण मार्ग 'बर्था बेंझ मेमोरियल रुट' या नावाने ओळखला जातो. योगायोगाने आम्ही सध्या ज्या ठिकाणी राहतो, तिथुन चार घरांपलीकडचा रस्ता म्हणजे हा बर्था बेंझ मार्ग.
हा त्याचा दिशादर्शक फलक.
https://lh6.googleusercontent.com/-GSmj5Y9hK-0/VPx-oemwTjI/AAAAAAAAEZU/jS6vcnYfa0Y/w731-h534-no/IMG_20150308_170409.jpg

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Mar 2015 - 10:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

एक वाढीव माहिती म्हणुन सांगतो. त्याकाळी बर्था बेंझला एक स्त्री आहे ह्या कारणामुळे पेटंट नाकारलं गेलं होतं.

अन्या दातार's picture

8 Mar 2015 - 11:27 pm | अन्या दातार

आज विटेकर काकांनी फेसबुकवर बर्था बेंझचा फोटो शेअर केला होता. लेख वाचायला मिळाल्याने माहितीत भर पडली.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Mar 2015 - 12:05 am | अत्रुप्त आत्मा

सुप्पर लाइक!

hitesh's picture

9 Mar 2015 - 3:26 am | hitesh

छान...

लेख खूप आवडला. नवीन माहिती मिळाली. मधुराच्या घराजवळ बर्थाबाईंचा मार्ग आहे हा छान योगायोग!

छान माहिती मिळाली.मधुराच्या घराजवळच हा मार्ग असल्याने उगाचच अापलेपणा पण वाटला!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Mar 2015 - 12:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेख खूप आवडला... आणि प्रसंगोचित असल्याने त्याचे अजूनच खास महत्व आहे !!

असंका's picture

9 Mar 2015 - 12:18 pm | असंका

सुरेख!!

धन्यवाद..!!
(अगदी तीर लाऊन बसला होतात काय हो? टायमिंग अगदी पर्फेक्ट ज्म्लंय म्हणून विचारलं...
कृ. ह. घ्या.)

स्पंदना's picture

9 Mar 2015 - 12:48 pm | स्पंदना

अरे व्वा!!
अतिशय सुंदर माहीती. फार अभिमान वाटला त्या बर्था बाईंचा.
धन्यवाद सौंदर्य.

मितान's picture

9 Mar 2015 - 1:05 pm | मितान

खूप चांगली माहिती मिळाली.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा !

लेख आवडल्याचे कळविल्याबद्दल तसेच त्यात चित्रांची आणि इतर माहितीची भर घातल्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि अभिनंदन. श्रीरंग जोशी, मिपावर फोटो कसे उपलोड करायचे ह्याची लिंक कळविल्याबद्दल आभार. माधुरी जी, बर्था बेंझ मार्गाचा दिशादर्शक फलक एकदम मस्त, त्याने लेखाला जान आली. एखाद्या महिलेचे, तिच्या अभूतपूर्व कामगिरीबद्दल सन्मान करण्यासाठी, 'जागतिक महिला दिना'हून समर्पक दिन सापडला नसता म्हणून त्याच दिवशी हा लेख पोस्ट केला. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार.

आनन्दिता's picture

10 Mar 2015 - 7:40 pm | आनन्दिता

लेख आवडला

आदिजोशी's picture

10 Mar 2015 - 8:57 pm | आदिजोशी

बर्था ह्यांच्या धाडसाचे कौतूक करावे तेव्हढे कमीच आहे.
.
पण...
पण...
पण...
.
त्यामुळे जगातल्या यच्चयावत स्त्रीया ह्या अत्यंत कुशल वाहनचालक असून त्यांच्या ड्रायव्हींगची विनाकारण चेष्टा केली जाते हे सिद्ध होत नाही.
मी कुचेष्टा करणार्‍यांतला नाही. मुळात मला स्वतःला ड्रायव्हींग येत नाही.

पॉइंट ब्लँक's picture

10 Mar 2015 - 10:21 pm | पॉइंट ब्लँक

बरोबर आहे. बर्था अपवाद असेल. पण रस्त्यावरचे रोजचे बहुतांश अनुभव वेगळे सांगतात.
बाकी लेख माहितीपूर्ण आणि छान.

अजो's picture

12 Mar 2015 - 6:57 am | अजो

लेख आवडला.

जुइ's picture

18 Mar 2015 - 1:32 am | जुइ

नविन माहिती मिळाली.