Virat ची Adelaide ची innings बघितली .... १९९९ च्या Pakistan विरुद्ध ची आठवण ताजी झाली. आज एक वर्ष होऊन गेले त्याला retired होऊन . कित्येक आठवणी चित्रपटा प्रमाणे डोळ्यासमोर तरळल्या .
साल १९८७ , तुम्ही शाळेतून धावत पळत घरी येता , पाठीवरचे दप्तर ही न काढता T .V. लावता. हुश्श …!!! तो खेळत असतो . आई ने काय पानात वाढलंय तुमचे लक्ष नसते कारण तुमचे सगळे लक्ष त्याच्याकडे , भारताला जिंकायला ४१ runs बाकी …. आणि .... umpire च्या चुकीच्या निर्णयामुळे तो बाद होतो. आपण तो सामना १६ runs ने हारतो. ती त्याची शेवटची test innings असते . सामना अर्थातच पाकिस्तान विरुद्धचा बंगलोरचा . संध्याकाळी वडिल घरी येतात , थोडेसे उदास , नीट जेवत नाहित , म्हणतात सुनील गावस्कर ची शेवटची कसोटी , पुन्हा दिसणार नाही तो खेळतांना. खूप उदास भासतात , आपण खूप लहान असतो, आपल्याला कळत नाही ह्यात एवढे काय आहे ,
तुम्ही थोडे मोठे म्हणजे कळत्या वयाचे होता , १० पास होऊन junior college मध्ये जाता , नवीन वातावरण , नवीन विषय , आजूबाजूची मुले मुली जी भाषा बोलतात ती तुम्हाला नवीन ,तुम्ही गोंधळता … वाटंत हे सगळे आपल्याला झेपणार नाही … तेव्हाच तुम्ही त्याला प्रथम T .V. वर बघता , आपल्याच वयाचा , आपल्या सारखाच एक पण असामान्य … कारण तो तिकडे पाकीस्तान च्या Fast Bowling न घाबरता तोंड देत उभा असतो. वकारचा एक चेंडू नाकावर आपटला तरी … पुढचे दोन्ही चेंडू सीमापार करत. पुढच्या सामन्यात अब्दुल कादिर ला फोडून काढत … तेव्हापासूनच त्याची आणि आपली नाळ जुळते. पुढच्या पूर्ण आयुष्याची .
दरम्यानच्या काळात केवढे बदल घडतात , Cable T V चा शिरकाव झालेला असतो , One Day क्रिकेट पूर्णपणे रंगीत झालेले असते. तुम्ही सुधा थोडे stylish कपडे घालायला लागता , केस सेट करून घेता , English च्या सरावाच्या नावाखाली 'तसली ' Novels , Magazines वाचायला लागता . तो देखील बदलत असतो , Test मध्ये आपली पहिली Century करत , सामना वाचातावत तर One Day मध्ये धुवांधार फलंदाजी करत भारतासाठी सामना जिंकत . आपण आता अधिकच जवळ येत जातो .
पुढे तुम्ही Engineering ला जाता , घरापासून , ओळखीच्या वातावरणापासून दूर , होस्टेलचे राहाण , खाण , सगळच नवीन . तुम्ही तुमच्या Seniors ला टरकून असता . पण तो खेळत असतो , दूर ऑस्ट्रेलियात . जगातल्या Fastest आणि bounciest पिचवर शतक काढत , World Cup मध्ये पाकिस्तान ला हरवत.
तुम्ही Engineering ला रुळता , submissions , practicals जे इतर करतील तेच copy करता . कोण घेणार डोक्याला ताप .... risk नकोरे बाबा ... तिकडे तो कलकत्त्याला १ लाख लोकांसमोर साउथ आफ्रिका विरुद्ध हिरो कपच्या सेमी-फायनलला ,जेव्हा कोणीच bowling टाकायला तयार नसत , risk घ्यायला तयार नसतं ,तेव्हा स्वतः शेवटची ओवर टाकतो. न डरता … जर का आपण हरलो तर लोकं काय म्हणतील ह्याचा विचार न करता … भारत सामना जिंकतो आणि नंतर हिरो कप सुद्धा . तुम्ही बरेच दिवस त्याच्या जिगरबाज वृत्तीची चर्चा करत राहता.
दरम्यान ब्रायन लारा world record करतो , आपल्याला तोसुद्धा आवडत असतो पण तो सर्वश्रेष्ठ फलंदाज हे मान्य नसतं , तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर तासनतास वाद घालता. वेगवेगळ्या ठिकाणी , म्हणजे आपल्यासाठी वेगवेगळ्या पीचवर , चहाच्या टपरी , पानाची गादी ते बियर बार मध्ये . तो मात्र शांत असतो दरम्यान तो आता One Day चा अतिशय स्पोठक opening batsman झालेला असतो आणि Test चा reliable and prized wicket असलेला २ down batsman . तुमची sixth semester ची Preparation Leave चालू असते , नेहेमीप्रमाणे अडखळत आपला अभ्यास सुरु असतो , तो खेळत असतो तिकडे शारजात , आपल्या रूम वर T V नसतो , आपण एका Electronics च्या दुकाना समोर footpath उभे राहतो , अनेक लोकांसोबत . तो वासिम आणि वकार ची bowling फोडून काढत , ७३ धावांची खेळी करतो , ज्यामध्ये वासिम ला Square Leg ला flick करून मारलेला षटकार असतो . खरच सांगतो ... त्यावेळेस त्या एका T V समोर १०० - १२५ लोक उभे असतात . अचानक एक फिल्म तुटावी तसा तो बाद होतो, आणि त्या क्षणाला त्या T V समोरूची गर्दी हटते , आपण सुधा तिथून हलतो ... भारताचा डाव अपेक्षेप्रमाणे गडगडतो , आपण हरतो . हे भविष्यात अनेक वेळा घडणार असतं ....
तुम्ही तुमच्या पहिल्या नोकरीमध्ये रूळण्याच्या प्रयत्नात असता , अडखळत , घाबरत ... नवीन सहकारी , Boss नावाचा प्राणी ह्यांच्याशी जुळवून घेत असता , तिकडे तो वानखेडे स्टेडीयम वर एकटाच उभा असतो , Warne , McGrath , Fleming च्या चिंधड्या उडवत .... आख्खं स्टेडीयम त्याच्या नावाचा गजर करतंय , पण एकच चिंता हा जर का मध्येच बाद झाला तर..... तसंच घडतं ९० धावा काढून तो out होतो ... आपण आपल्यावरच खूप चिडतो… का आपण आपली बसायची position बदलली ... स्टेडीयम रिकामे व्हायला सुरुवात होते , आपण अर्थातच हरतो … हेच पुन्हा Semi Final ला घडते .... तो बाद होतो आणि उरलेले batsman फक्त पीच वर जाऊन परततात ....
एप्रिल च्या रणरणत्या उन्हाळ्यात तुम्ही दूरच्या कोणत्या तरी छोट्या शहरात office च्या कामानिमित्त आलेले असता , तुम्हाला हॉटेलमध्ये A. C. रूम मिळत नाही , न चालणारा T.V. तुम्ही manager शी भांडून बदलून घेता ..... उकाड्याला वैतागत , शिव्या घालता . तिकडे शारजाला desert storm , त्याच्या Birthday च्या दिवशीची सेन्चुरी , बेंबी च्या देठापासून ओरडणारा Tony Greig.....Warne ला मारलेली Straight सिक्स , Kasprowicz ला परत स्टेडियम च्या छतावर मारलेली सिक्स.... "WHAT A PLAYER ...... WHAT A PLAYER ......!!!!" Tony Greig..ने दिलेली उपमा आपल्या डोक्यात घुमत असते ... आता फक्त तोच .... बाकीच्या सगळ्यांना त्याने मागे टाकलेले असते ... तुम्ही मात्र अजूनही करियर मध्ये चाचपडत असता , पुढे काय ह्याचा निर्णय होत नसतो , मध्येच कोणीतरी Henry Olanga त्याला आव्हान देतो , पुढच्याच सामन्यात तो त्याला अक्षरशः बुकलुन काढतो .... तुमचा अहं सुखावतो ... तुम्ही तुमच्या Boss ला काही बोलू शकत नसता.
तुम्ही Job बदलता , नवीन office मधली एक मुलगी तुम्हाला खूप आवडते , तिच्याशी तुम्ही ओळख वाढवता आणि एके दिवशी हिम्मत करून तिला Propose करता , ती नाही म्हणते ..... तुम्ही कोसळता .... आजारपणाच्या रजेवर जाता ..... चेन्नईला पाकीस्तान विरुद्ध असाच तो एकटाच झुंजत असतो , कोणीच साथ द्यायला तयार नसतो , पाठदुखीने शेवटी हैराण होवून तो बाद होतो , उरलेले batsman राहिलेल्या १४ धावा सुध्दा काढू शकत नाहीत , आपण हरतो , त्याची सर्वोत्कृष्ठ खेळी वाया गेलेली असते , तो dressing room च्या बाहेर पडत नाही , तुम्ही आख्खा weekend घरात काढता , कोणाशीही न बोलता .... तीने नाकारल्याच्या दुःखापेक्षा हे तुम्हाला जास्त दिवस छळत .....
यथावकाश तुम्ही लग्न करता , नव्या नवलाईचे दिवस चालू होतात ...... तुम्ही तीचे मन जपता ..... आज तिला संध्याकाळी बाहेर जायचय , पण तुम्ही तुमच्या lucky खुर्चीतून उठत नाही …. नाही आज नाही , ती चिडते पण तुम्ही बधत नाही .... शोएब आलाय , तुमच्या छातीत धडधडत , पुढच्या क्षणी तुम्ही चित्करता …. त्याने शोएबला स्टेडियम मध्ये भिरकावलेले असते , पुढचे दोन चेंडू सीमापार ..... केवळ ३ चेंडूत त्याने शोएब ची आणि पाकिस्तान ची हवा काढलेली असते …. इथून पुढचा दीड तास तो चौफेर खेळत असतो , ती त्याची One Day मधली आपल्याला सर्वोत्कृष्ठ खेळी वाटते , तुम्ही खूप सुखावता , बायकोला घेऊन बाहेर celebrate करता.
तुमच्या आयुष्यात आता स्थैर्य आलेलं असतं , त्याचाहि खेळ आता बदललेला असतो , खुपसा risk free , तरीही तेवढाच परिणामकारक. तुम्हाला तुमचा Job आवडत नसतो , महिन्याच्या शेवटी मिळणाऱ्या पगाराशिवाय त्याच्यात काही स्वारस्य नसतं , पण तो तिथेच असतो , खेळावरचे प्रेम , निष्ठा एका कणानेही कमी न होता . Bad Patch , Tennis Elbow असूनही तो म्हणतो मला खेळायलाच हवं ,त्याला दुसरेकाही माहितीच नसतं .
तुम्ही नोकरी बदलता , नवीन Job Role ही तुम्हाला आवडेनासा होतो . Late Night calls मुळे रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबव लागते , अशाच एका रात्री हैद्राबादला तो एकटाच Australia च्या ३७५ धावांचा पाठलाग करत असतो , तुम्हाला आता घरी जाऊन T.V वर त्याला बघावास वाटते , पण आपण जागा बदलली आणि तो Out झाला तर ? तुम्ही तिथेच थांबता , तो १७५ वर Out होतो , भारत हरतो . तुम्ही दुसऱ्या दिवशी sick leave टाकता .
तुम्ही World Cup प्रत्येक चेंडू बघता . त्याची England , South Africa विरुद्धची शतके , तो Dale Steyn ला हूक केलेला षटकार , Graeme Swann ला back to back मारलेल्या Sixes !!! Semi Final मधली Pakistan विरुद्धची अडखळत पण महत्वाची खेळी आणि मग शेवटी मुंबईला उसळलेला विजयाचा उत्सव !!!! पूर्ण team ने त्याला उचलणे आणि सर्वात शेवटी कोहलीचे बोल "एवढे वर्ष त्याने भारतीय क्रिकेट आपल्या खांद्यावर वाहिले आज आमची वेळ आहे त्याला खांद्यावरून न्यायची " त्याने तुमच्या मनातलीच गोष्ट सांगितलेली असते . सगळीकडे आसवे वहात असतात , तुमच्या गालावर सुद्धा .
आज तुम्हाला वानखेडे वर जायचंय , त्याला शेवटचे खेळताना बघायला . पण तुम्ही जात नाही , त्याला जाताना पाहणं तुम्हाला सहन नाही होणार . तुम्ही घरीच T V वर त्याला बघता , त्याची पुन्हा एकदा भूतकाळात नेणारी त्याची last innings , त्याचे Drives , त्याचे Cuts , त्याचा Backfoot Punch .... सगळं सगळं तुम्ही डोळे भरून पाहता , मनात साठवता आणि त्याची ती शेवटची exit ..... Pitch ला नमस्कार करून केलेली .... आता मात्र तुम्ही तुमचे अश्रू रोखू शकत नाही . तुमचा मुलगा विचार करतो "ह्यात काय एवढं ? " तुम्ही २६ वर्षांपूर्वी केला होता तसा. तुम्हाला वाटतं आता काहीच उरलं नाही बघण्यासारखं , आपला आत्माच सोडून चालला आहे. तुम्ही काही काळ क्रिकेट बघणं सोडता , भारताच्या परभावाच सुद्धा दुःख होईनासं होतं .
त्याने कधीच म्हटले नव्हते माझ्यावर एवढे प्रेम करा , तरी आम्ही केले . त्याने कधीच म्हटले नव्हते मी out झाल्यावर T.V. बंद करा , पण आम्ही केला . त्याने कधीच म्हटले नव्हते माझ्यासाठी प्रार्थना करा , पण आम्ही केल्या . त्याने कधीच म्हटले नव्हते माझ्याकडे Role Model म्हणून बघा , तरी आम्ही पहिले . त्याने कधीच म्हटले नव्हते मला देव म्हणून पुजा , तरी आम्ही पूजले . त्याने कधीच म्हटले नव्हते मी नसण्याने क्रिकेट मधला Charm निघून जाईल , तरी हृदयाच्या कोपऱ्यात आम्हाला वाटले.
खरंच काय होत त्याचं आणि तुमचं नातं ? का ऐवढे प्रेम केलं तुम्ही त्याच्यावर ? कि तुम्ही आणि तो वेगळे नव्हताच? तो तुमच्याच एक भाग होता , तुम्हाला करावाश्या वाटणाऱ्या गोष्टी लिलया करणारा , तुम्ही पाहिलेली प्रत्येक स्वप्न पूर्ण करणारा. हे काय नातं आहे हे जाणण्यासाठी तुम्ही आमच्या पिढीचे असायला हवेत , त्याच्या बरोबरच वाढलेले असायला हवे .
तुम्ही अतिशय सुदैवी आहात . तुम्ही त्याच्या बरोबर वाढलात . Cherish those magic moments !!!
प्रतिक्रिया
26 Dec 2014 - 9:41 am | टवाळ कार्टा
:(
26 Dec 2014 - 10:26 am | असा मी असामी
खरच आम्ही सुदैवी होतो. त्याचा प्रत्येक सामना तुम्ही लिहला आहे तसाच अनुभवला आहे. आणि त्याने क्रिकेट सोडल्यावर मी पण क्रिकेट बघणं सोडले आहे.
26 Dec 2014 - 11:15 am | मुक्त विहारि
सेम हियर.....
26 Dec 2014 - 10:53 am | अल्पिनिस्ते
तो जितके सुन्दर खेलला , तुम्ही तेव्ह्डेच सुन्दर लिहिले आहे !!! __/\__
26 Dec 2014 - 11:09 am | बोका-ए-आझम
त्याने हेही म्हटले नव्हते की माझ्या निवृत्तीला एक वर्ष झाल्यावरही माझी आठवण ठेवा...
आम्ही ठेवली!
26 Dec 2014 - 11:41 am | अभिदेश
त्याला विसरणे ह्या जन्मी तरी शक्य नाही
26 Dec 2014 - 11:16 am | मुक्त विहारि
जबरदस्त.....
कं लिवलंय...
26 Dec 2014 - 12:45 pm | उमा @ मिपा
हे त्याने वाचलं पाहिजे. खूप छान लिहिलंय!
26 Dec 2014 - 12:50 pm | माधुरी विनायक
खूप छान लिहिलंय तुम्ही...
शाळकरी वयात क्रिकेट या खेळाचा भयंकर तिटकारा होता. इतका की कोणी घरात टिव्हीवर मॅच लावली की नसलेला अभ्यास काढून बसायचे आणि टिव्ही बंद करायला लावायचे... तो आला आणि सगळं चित्र पालटलंच. त्याच्यामुळे मी क्रिकेट पाहू लागले, थोडंफार समजू लागलं. एक काळ तर असा आला की महत्वाच्या परीक्षा सुरू असतानाही अभ्यास गुंडाळून त्याची खेळी बघण्यात रमू लागले. कधीतरी रात्री उशीरा सामना संपत आलेला असे, कमी चेंडू आणि जास्त धावांचं आव्हान. घरात सगळे झोपलेले, फक्त मी आणि लहान भाऊ सोडून... पण हार दिसू लागली की भाऊही चिडून पाय आपटत निघून जायचा झोपायला. मी मात्र त्याच्यावरच्या विश्वासाने सामना शेवटपर्यंच बघायचे. अशक्य ते शक्य व्हायचं आणि मग त्याने विजयी धाव घेतल्यावर भावाला, जिंकलो रे आपण... असं सांगत बोलवायचे. मग तो अक्षरश: धावत यायचा तिथे आणि आम्ही पुन्हा त्याच्या खेळीत रमून जायचो... एका रक्षाबंधनच्या संध्याकाळी एका सामन्यात त्याची खेळी सुरू असताना मामा आलेला... आईची पाट मांडण्यासाठी सुरू असलेली लगबग आणि एवढा ओव्हर संपू दे ना... म्हणणारी मी... खूप खूप आठवणी जागवल्यात..
सुदैवाने नवऱ्याचीही आवड जुळली आणि अनेक सामन्यांचा एकत्र आनंद घेता आला. मात्र तो निवृत्त झाला आणि खूप मोठा आनंद संपूनच गेल्यासारखं वाटलं... माझं क्रिकेटप्रेम आटलं.. आता मी क्रिकेट बघत नाही... त्याच्या खेळीने दिलेला आनंद मात्र कायम सोबत राहणार आहे...
26 Dec 2014 - 1:22 pm | बाबा पाटील
डोळ्यात चुकुन पाणी आल,काही तरी हरवल्यासारख वाटतय रे.*sorry2*
26 Dec 2014 - 1:38 pm | टवाळ कार्टा
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
26 Dec 2014 - 1:58 pm | तुषार काळभोर
माझे डोळे पण पाणावलेत...
लेखाने... कदाचित...
हिरो कपची सेमीफायनल, शारजाचं वादळ, पाकिस्तनविरुद्धचा चेन्नईतला पराभव, ते १७५... कदाचित...
26 Dec 2014 - 1:45 pm | श्रीगुरुजी
मस्त लिहिलंय. तो असावा असं अजूनही वाटतंय. त्याच्याशिवाय भारतीय संघ अळणी वाटतो.
१९८७ पर्यंत देव्हार्यात गावसकर विराजमान होता. नंतर २ वर्षे देव्हारा रिकामा राहिला. १९८९ मध्ये त्याची प्रतिष्ठापना झाली. १ वर्षापूर्वी देव्हारा परत रिकामा झाला. आता फक्त त्याची आठवण काढत क्रिकेट बघतो.
26 Dec 2014 - 2:36 pm | आतिवास
छान, भावूक लेख. वाचताना उगाच हा लेख आठवला. अशा भावना अजून अनेकांच्या असतील हे नक्की.
26 Dec 2014 - 2:48 pm | चाणक्य
खूप आवडला लेख आणि पाणी तरारलं डोळ्यात.
26 Dec 2014 - 2:58 pm | स्पंदना
सुरेख!
आमचा सच्या!!
26 Dec 2014 - 3:33 pm | अस्मी
सुंदर लिहीलंय..खरंच डोळ्यात पाणी आलं.
सचिssssन...सचिssssन!!!
26 Dec 2014 - 7:15 pm | सुजित पवार
डोळ्यात पाणी आलं.... शेवट्चि म्याच पाह्तान झालेलि हालत आज परत अनुभवलि.
तुम्ही काही काळ क्रिकेट बघणं सोडता , भारताच्या परभावाच सुद्धा दुःख होईनासं होतं ..... अगदि असच झालय
26 Dec 2014 - 10:16 pm | अमित खोजे
++११११
28 Dec 2014 - 11:04 pm | सिरुसेरि
शंभर कोटी भारतीय जनतेच्या अपेक्षांचे ओझे वीस वर्षे सांभाळणे ही महान कामगिरी आहे .
28 Dec 2014 - 11:50 pm | बहुगुणी
अभिदेशः तुमच्या इथल्या जेमतेम एक महिन्याच्या वास्तव्यातला हा पहिला लेख दिसतोय, आणि सचिनने ज्याप्रमाणे सफाईने वीस वर्षे कर्तृत्व गाजवलं, त्याच सफाईने तुम्ही या लेखात असंख्य चाह्त्यांच्या भावना शब्दबद्द केल्या आहेत हे उल्लेखनीय!
29 Dec 2014 - 3:04 am | अभिदेश
आभारी आहे.
29 Dec 2014 - 2:45 am | फारएन्ड
जबरी आलेख! लेख आवडला प्रचंड. क्रिकेटचे संदर्भही अचूक आहेत. खरा फॅनच से लिहू शकतो! त्या सगळ्या मॅचेसच्या आठवणी परत जाग्या झाल्या.
29 Dec 2014 - 3:07 am | अभिदेश
खरय. त्याच्या सगळ्या खेळ्या मेन्दुत फीत्ट बसल्या आहेत..
29 Dec 2014 - 9:51 am | मदनबाण
सुरेख लेखन ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Make in India: Ministries told to prefer domestically-manufactured electronic goods
29 Dec 2014 - 12:13 pm | बॅटमॅन
अतिशय सुरेख लेखन. खरा फॅनच असं लिहू शकतो!!!!!!!!!!!!!!!!
29 Dec 2014 - 1:32 pm | नन्दादीप
अंमळ डोळे पाणावले....
(वर्ल्ड्कपच्या वेळी क्वार्टर, सेमि आणि फायनल तर उभा राहून बघितल्या... जाहिरात लागली कि बसायचो...का तर मी बसलो कि विकेट पडायची म्हणून....)
24 Apr 2022 - 1:04 pm | अभिदेश
आज त्याचा वाढदिवस ...