माझ्याबरोबर आनंद दादा होते. काल रात्रीची शंका विचारली,
"हे सेनापती कापशी काय आहे?", मी.
"गावाचं नाव".
"पण मग गावाच्या नावाला सेनापती का जोडलं?".
"अरे तुमचं कोण ते संताजी कापशीतलंच न्हवं का", प्रोफेसरांनी बोलण्यामधे ग्रामीण बाज जिवंत ठेवला होता.
"कोण संताजी घोरपडे?"
"व्हय तेच".
मी भलताच खूश झालो. माझा आवडत्या विषयावरची माहीती मिळाली. गावाला गप्पा हाणायला ओळख असण्याची आवश्यकता नाही. आपण शहरी माणसेच प्रत्येकाला संशयाच्या चष्म्यातून पाहतो. बाजूला नाधवड्याचा माणूस बसला होता. त्यानेही गप्पात भाग घेतला.
"कापशीत संताजी घोरपड्याचं कूळ राहतयं. पाचवी का सहावी पिढी आसंल".
"त्यांची आताची पिढी सुद्धा सेनापतींसारखे राहतात का?" माझा प्रश्न.
"तर वो. राजंच ते. नेमबाजीत लई हुशार. अजून बी शिवारात कुनी नेम धरून डुकार मारलं तर लोक म्हनत्यात नेम लई अचूक हाय पठ्ठ्याचा जनू याला कापशीकरानं काढलाय". सार्वजनिक जागेत शिवराळ भाषा वापरण्यात त्या गॄहस्थाला काहीच वाटत नव्हतं. ऐकणार्यानाही त्याचं काही वाटत नव्हतं. शिव्या आम्हा कोल्हापुरकारांच्या भाषेचाच एक भाग आहे.
मी आनंद दादांना म्हणालो आपण कापशीला जाऊच. आनंद दादा एका पायावर तयार.
वेळात वेळ काढून आनंद दादा, त्यांची दोन लहान मुलं आणि मी असे चार जण मोटारसायकल वरून निघालो.
त्याचं सौंदर्य पाहून छायाचित्र घ्यायचा मोह काही आवरला नाही.
इतक्यात कुठूनतरी माणसांचा मोठा घोळका आला. कित्येक बाया, बाप्ये आणि त्यांची मुलं. कुठल्याश्या वेगळ्याच भाषेत बोलू लागली. लहान मुले विठ्ठलाभोवती, पिंडीभोवती गोळा होऊन बोलू लागली. एकच कालवा झाला. पुजार्यानं सगळ्यांना दम देऊन शांत केलं. आम्ही निघालो.
शिवाजी महारांजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस त्यांना बर्याच जणांनी विरोध केला. फक्त क्षत्रियच राजा होऊ शकतो असा नियम होता त्या काळात. जातियता शिवरायांसारख्या युगपुरूषालाही चुकली नाही हेच आमच दुर्दैव! हा विरोध करताना महाराजांचा पराक्रम ते लोक पार विसरुन गेले. आश्चर्याची बाब म्हणजे या विरोधकांमध्ये राजांच्या राज्यकारभारात मोलाचे कार्य करणारे आण्णाजी दत्तो सुद्धा सामिल होते! महाराजांच्या मॄत्यूनंतर हेच आण्णाजी दत्तो पुढे शंभू राजांचे कट्टर विरोधक बनले. अगदी संभाजी राजांना अटक करण्याचा हुकूम काढण्यापर्यंत त्यांची मजल गेली. म्हणजे महाराजांच्या संपर्कातील लोक अशी सर्वसामान्यच होती. त्यांच्यातही क्रोध, मत्सर, तिरस्कार, संधीसाधूपणा असे गुण-अवगुण होते. या अशा लोकांना बरोबर घेऊन शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं यातच त्यांचं संघटन कौशल्य, नेतॄत्वगुण दिसून येतात. राज्याभिषेक सुरळीत पार पाडण्यासाठी भोसले घराण्याचा वंशवॄक्ष तपासण्यात आला. त्यातून महाराजांचे पूर्वज हे रजपूतांच्या सिसोदिया घराण्यातले असल्याचे सिद्ध झाले आणि राज्याभिषेक सोहळा पार पडला. त्याकाळच्या एका प्रवाशाने सुद्धा महाराज हे अस्सल रजपूतांसारखे दिसतात असं लिहून ठेवलं आहे. घोरपडे, घाटगे ही राजघराणी म्हणजे याच रजपूत वंशवॄक्षाच्या फांद्या. ही पुर्ण वंशांवळ मला कुठल्यातरी पुस्तकात मिळाली.
राणोजी घोरपडे, विक्रमसिंह घाटगे ही नावं सुद्धा रजपुतांचा अंश अजूनही कुठेतरी असल्याचं दर्शवित होती.
आम्ही तटबंदीच्या कमानीतून आत गेलो तर वाड्यातली दोन पाळीव कुत्री भुंकू लागली. काही पावलं पुढे टाकली तर अंगावर धावून आली. तेवढ्यात वाड्यातून कोणी मुलगी बाहेर आली. आमचा वाडा पाहण्याचा इरादा तिला सांगितला, तर म्हणाली मुख्य वाडा तोडून आम्ही नवीन वाडा बांधत आहोत. त्यामुळे मुळ वाड्यातले पाहण्यासारखे काही उरले नाही. मी निराश झालो. मध्यभागात जुन्या दगडी वाड्याचे काही भग्न अवशेष दिसत होते. आणि मध्येच सिंमेंट-कॉंक्रीटचं अधर्वट असलेलं बांधकाम आणि पुढ्यात एक आलिशान चार चाकी गाडी.
आनंद दादांनी तिच्याकडे तगादा लावला,
"अहो आसंल तेवढं तरी पाहून जातो".
"अहो पण काही नाहीच आहे तर काय पाहणार?".
"तरी पण जेवढं आसंल तेवढं..." असं म्हणत आनंद दादा खुशाल वाड्याबाहेर ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन बसले.
इतक्यात उजव्या बाजूच्या खोलीतून राणोजी घोरपडे बाहे आले. पाठीचा कणा एकदम ताठ. सदरा आणि लेंगा घातलेला. आमच्याकडे फक्त काही क्षणच नजर टाकली. खुर्चीवर बसता बसता शांतपणे म्हणाले,
"काय सांगितलं तिनं ऐकलं? वाडा दाखवत न्हाई म्हनून सांगितलं न्हवं एकदा. का अजून काय येगळं सांगितलं?".
राणोजींच्या आवाजात जरब होती, बेफिकिरी होती. चेहर्यावर राजेशाही तेज होतं. आमच्या सारख्या कोण कुठल्या चार माणसांशी बोलण्यात त्यांना काही स्वारस्य वाटत नव्हतं.
आनंद दादा तसे कुणाला न ऐकणारे. गोड बोलून बोलून आपल्याला पाहिजे ती गोष्ट पदरात पाडून घेणारे. पण राणोजींचे रोखठोक, स्पष्ट आणि कुणाची मुलाहिजा न बळगता केलेलं बोलणं ऐकून तेही चक्रावले. काही क्षण फक्त ऐकतच राहिले. मीच मग राणोजींना नम्रपणे विचारलं,
"मग वाड्याचे बाहेरून फोटो काढले तर चालतील का?"
"व्हय काढा की", यावेळी राणोजींचा आवाज जरा खाली आल्यासारखा वाटला.
"मग या बांधाकामांपैकी जुनं बांधकाम कोणतं?"
"हे व्हय दिसतंय ते सगळं जुनच हाय की", बसल्या जागी हातवारे करीत राणोजी म्हणाले.
राणोजींचा मूड बदलण्याआगोदर मी सर्व जुन्या बांधकामांचे फोटो काढून घेतले!
तो पर्यंत आनंद दादांचं बोलणं परत सुरू झालं.
"ते धनाजी जाधव कुठले? कोल्हापुरचेच का?" ज्यांची उत्तरे माहीत आहेत ते प्रश्न उगाचच पुन्हा पुन्हा विचारण्याची आनंद दादांची खोड आहे.
"ते अमरावतीचे"
"मग पेठ वडगावला काय आहे?", पुन्हा ज्याचं उत्तर माहित आहे असा प्रश्न. कदाचित खात्री करून घेण्यासाठी असेल.
"तिथं त्याला मारलं".
"त्यांचा इथं कुठं वाडा आहे का?"
"एहॅ त्यातलं एवढं काय म्हाईत न्हाई." असं म्हणत राणोजींनी एक मोठ्ठी जांभई दिली. आम्ही काय समजायचं ते समजलो!
आनंद दादा निघण्यासाठी ख्रुर्ची वरून उठले. राजघराण्याची प्रथा म्हणून राणोजींच्या पायाला हात लावण्यसाठी खाली वाकले.
राणोजींनी हात वर करत "र्हाऊ दे. त्याची काय गरज न्हाई" म्हटलं.
राणोजींचा मूड यावेळी जरा चांगला वाटला. म्हणून मी एक धाडस केलं.
"साहेब तुमची परवानगी असेल तर तुमचा एक फोटो घेऊ का?"
"या असल्या कपड्यात नको" राणोजी सदर्याची छाती धरत म्हणाले.
"तुमची भेट झाली तसं तुमचा एक फोटो मिळाला असता म्हणजे बरं झालं असतं." मी विनंती करत म्हणालो.
"अजिबात नको. या असल्या कपड्यात फोटो काढताय व्हय? काय तरी खुळ्यागत."
आपले अस्तित्वात असलेले सर्व फोटो आपल्या राजेशाही थाटातच असावेत असा राजांचा आग्रह दिसला. मी शाहू महाराजांचे राजेशाही थाटातले एक छायाचित्र पाहिले होते. राणोजी अशा प्रकारच्या पोषाखात कसे दिसतील त्याचा विचार करू लागलो. कॅमेरा बंद करून व्यवस्थित ठेऊन दिला. माझी निराशा झालेली राणोजींच्या बहूदा लक्षात आली असावी. ते म्हणाले,
"एक काम करा, जाताना गावतलं जुन हनुमान मंदिर, राममंदिर पाहून जा. तिथं माझा एक फोटो लावला आहे. तो पहा."
"बरं धन्यवाद", म्हणुन आम्ही निघालो.
रविवार असल्याकारणाने वाड्याची चावी संभाळणारा युवक गावाबाहेर होता. हा वाडासुद्धा आतून पाहता आला नाही. एका दरवाजाच्या चौकटीवर काही देव कोरले होते. त्यातला मोठ्या पोटाचा गणपती ओळखता आला. दुर्दैवाने गणरायाचे मुख तुटले होते. इतर देव काही ओळखता आले नाहीत. देवांचं कोरीव काम फारच आवडलं.
दुसर्या दिवशी सकाळी सुरेख धुकं पडलं होतं. सकाळी दारात बसल्या बसल्याच घेतलेला हा फोटो.
प्रतिक्रिया
3 Nov 2008 - 3:49 pm | अभिरत भिरभि-या
चांगली सचित्र सहल झाली आमची. वडाप सारखे कोल्हापुरी शब्द आलेत.
अजाणत्यांसाठी - वडाप म्हणजे ट्राक्स, सुमो अशा सर्व वाहनांसाठीचा हा कोल्लापुरी शब्द
वायरची जागा बदलण्या ऐवजी कमानच तोडली! नाणीबाई थोडीच येणार आहे दाद मागायला. उरल्यासुरल्या दरवाजाची अब्रू गावकरी लघवी करुन घालवतात!
सांस्कृतिक वारसा जपण्यात आपण किती नालायक आहोत याचे आणखी एक उदाहरण !
त्यातून महाराजांचे पूर्वज हे रजपूतांच्या सिसोदिया घराण्यातले असल्याचे सिद्ध झाले
महाराज सिसोदिया राजघराण्याचे वारस हा पूर्वापार समज आहे. पण प्रत्यक्षात महाराष्ट्राची परंपरा आपण समजतो तितकी उत्तराभिमुख नाही. "शिखर-शिंगणापूरचा शंभुमहादेव" व इतर रचनेतून रा.चि. ढेर्यांनी शिवरायांचे कुळ दक्षिणेशी किती नाते सांगते ते छान दाखवलेय. त्यांच्या म्हणण्यानुसार मुळात "भोसले" हे उपनामही दक्षिणेतल्या "होयसळ" राजघराण्यावरून आलेय.
3 Nov 2008 - 4:18 pm | रम्या
"शिखर-शिंगणापूरचा शंभुमहादेव" व इतर रचनेतून रा.चि. ढेर्यांनी शिवरायांचे कुळ दक्षिणेशी किती नाते सांगते ते छान दाखवलेय. त्यांच्या म्हणण्यानुसार मुळात "भोसले" हे उपनामही दक्षिणेतल्या "होयसळ" राजघराण्यावरून आले
याबद्दल अजुन माहीती कुठे मिळेल?
3 Nov 2008 - 5:34 pm | अभिरत भिरभि-या
नेटवर जास्त माहिती नाही. मूळ आणि विश्वसनीय माहिती म्हणजे ढेर्यांचे पुस्तक.
ह्या दुव्यावर थोडीशी माहिती आहे. पण पूर्वग्रहदूषित आहे. पुस्तकाचे नावही शिखर-शिंगणापूरचा शंभुमहादेव नव्हे तर शिखर-शिंगणापूरचा शंभुमहाराज असे लिहिलेय.
अर्थात महाराष्ट्राबाबत चुकीच्या समजूती पसरवणारे हे नेटवरचे एकमेव उदाहरण नाही.
http://www.kamat.com/jyotsna/blog/kannada_roots_of_shivaji.htm
3 Nov 2008 - 4:00 pm | झकासराव
शाबास रे भावा!!!!!!!!
:)
कापशीत गेलास आणि मग तिकड मिळणार खासखास कोल्हापुरी चप्पल घेतल न्हायीस व्हय रे??
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
3 Nov 2008 - 4:15 pm | रम्या
कोल्हापुरी चप्पल लिंगनूर मध्ये छान मिळतात. मडिलगे गावातही मिळतात. पण त्या महाग असतात (अंदाजे १०००-१२००).
मी सहा महिन्यापुर्वी लिंगनूर मध्ये ३५० ला एक भुईवादी चप्पल घेतली होती. छान आहे.
3 Nov 2008 - 4:15 pm | घाशीराम कोतवाल १.२
ते काही ही असो चांगलि माहीति दिल्या बद्दल आपले आभार
मी आता तसा कोतवाल नाही बरं?
3 Nov 2008 - 4:32 pm | बिपिन कार्यकर्ते
रम्या, मस्त सचित्र छान सफर घडिवलिस की रं मर्दा... बर्याच गोष्टी कळल्या. मस्त ओघवतं लिहिलं आहेस.
बिपिन कार्यकर्ते
3 Nov 2008 - 5:20 pm | विसोबा खेचर
सुंदर चित्र, उत्तम माहिती. वाचनीय व संग्राह्य लेख...
तात्या.