आता पुन्हा निवडणुका येणार
तेच उमेदवार हात जोडत येणार
मग आपण खोटं खोटं हसणार
मग मधेच डोक्यात प्रश्न येणार
हे आज इथे कशाला येणार ?
काय रे देवा.…
मग तो पडलेला प्रश्न विचारता नाही येणार
मग आम्ही तो गिळणार
मग गिळूनही तो पुन्हा विचारावासा वाटणार
मग समोरच्या उमेदवाराच्या डोळ्यातही तो दिसणार
तो निर्लज्ज असेल तर त्यावर हसणार
त्याच्याही मनाला टोचत असेल तर नजर चुकवणार
मग नसताच बघितलं तसं तर बरं झालं असतं असं वाटणार
आणि ह्या सगळ्याशी त्याचं काहीच देणं घेणं नसणार
मग त्यावेळी नेमकी दुसरी प्रचारटोळी येणार
मग त्यात मागच्या वेळी निवडून दिलेला उमेदवार असणार
मग त्याने तेव्हा बरीच आश्वासनं दिलेली असणार
मग त्यातली अर्धी त्याला आठवत सुद्धा नसणार
उरलेली अर्धी त्याने पूर्ण केलेलीच नसणार
मग आधीचा उमेदवार पण नेमकं असंच नाही करणार कशावरून, असं वाटणार
मग डोक्यात एक लक्कन विचार येणार
ह्या सगळ्यांशी न घेणं न देणं
पण फुकाचे नमस्कार चमत्कार करावेच लागणार
काय रे देवा ….
मग डोक्याच्या संवेदना बधिर होऊन जाणार
डोळ्यात रोजच्या त्रासाची आणि कटकटीची आसवं जमा होणार
मग वळल्या गेलेल्या आपल्याच मुठीवर ती टपटपणार
मग आपल्याला येत असलेल्या दहावीस शिव्या अपुऱ्या वाटणार
मग अजून नवीन शिव्या शिकाव्याश्या वाटणार
त्या शिव्या मनसोक्त समोरच्या माणसाला द्याव्याश्या वाटणार
मग साराच कसा मूर्खांचा बाजार वाटणार
पण आपलं तोंड तसं उघडूच नाही शकणार
आपण फक्त दात ओठ खात राहणार
काय रे देवा…
निवडणुका येणार
मग हवेत फक्त बेहोशी पसरणार
मग पक्षापक्षात चैतन्य दाटणार
त्यातले काही लोक ह्या फांदीवरून त्या फांदीवर जाउन बसणार
पण सगळ्यांनाच ते नाही जमणार
मग ते तोंडावर जबरदस्त आपटणार
पण ते नाही ओशाळणार
पुन्हा तिसऱ्या पक्षाच्या दाराशी जाणार…. नाहीतर अपक्षच राहणार
लोकात लाज जाऊ नये म्हणून उलट्या बोंबा मारणार
पण लोकांचा संयम केव्हाच संपलेला असणार
दलबदल्यांचा तमाशा सगळ्या जगाला दिसलेला असणार
इतकं सगळं होऊनही त्यांच्या जागी तेच राहणार
आणि आपल्या जागी आपण राहणार …. कारण आपल्याकडे गेंड्याची कातडी नसणार
डोळ्यातला विखार अजूनही चांगल्या जगण्याच्या अपेक्षेत कुठेतरी विरून जाणार
निवडणुका मागेही झाल्या
निवडणुका पुढेही होणार
काय रे देवा ….
प्रतिक्रिया
26 Sep 2014 - 6:14 pm | पैसा
खरोखरच देव असला तर त्यालाच इथे उतरावं लागेल, काहीतरी व्यवस्था आणण्यासाठी! ;)
26 Sep 2014 - 8:22 pm | माम्लेदारचा पन्खा
जबरदस्त ट्यार्पी मिळणारा एकमेव कार्यक्रम !
28 Sep 2014 - 1:01 pm | माम्लेदारचा पन्खा
काय रे देवा.....
29 Sep 2014 - 1:00 pm | माम्लेदारचा पन्खा
मिपाच्या बाजारात उठाव नाही…का रे देवा ??
29 Sep 2014 - 2:39 pm | ज्ञानोबाचे पैजार
सुपरमॅनची चड्डी घातली म्हणजे सुपरमॅनसारखे उडता येतेच असे काही नसते.
पैजारबुवा,
29 Sep 2014 - 4:36 pm | माम्लेदारचा पन्खा
आमी कुटं म्हनलं आमची चड्डी लाल...आमी आदीच माफी मागित्ली खरेबुवांची !!
29 Sep 2014 - 2:47 pm | एस
छान!
29 Sep 2014 - 4:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
निवडणुका मागेही झाल्या
निवडणुका पुढेही होणार
काय रे देवा ….
असू द्या हो... दु:खात सुख असे की निवडणूका न होणार्या देशांची स्थिती खूपच खराब आहे. :)
30 Sep 2014 - 8:34 pm | llपुण्याचे पेशवेll
कविता छान साधली आहे. व्हॉट्स अॅप वरून फिरवा मस्त ट्यार्पी कमवेल.