सोळावा दिवस. आज २० किमीवरील बुधीला मुक्काम होणार होता.
सकाळी पावणेसहाला चालायला सुरूवात केली. बॉडी चार वाजताच पुढे गेली होती. आठ लोकांनी एवढी जड खाट खांद्यावरून वाहून नेली होती. किती त्रास होत असेल त्यांना? नुसत्या विचारानेही कसेतरी होत होते. अनिता आणि मेहुणे घोड्यावरून आमच्याच बरोबर निघाले. मौसम खराबच होता, पावसाची रिपरिप सुरू होती. रेनकोट घालून हा कठीण चढ-उताराचा रस्ता, तुटक्या फुटक्या खडांज्या. त्यातच रस्ता निसरडा झालेला, रेनकोटमुळे भयंकर गरम होत होते. डाव्या हाताला कालीमैय्याने आज आणखीच रुद्रावतार धारण केलेला होता. नुसत्या आवाजाने धडकी भरत होती. गर्ब्यांगला अनिता आणि मेहुणे यांनी घोडे सोडून दिले. त्यांना फक्त दोघांनाच प्रवास करणे अशक्य झाले म्हणून ते आमच्यासाठी थांबले. आम्ही पोहोचल्यावर ते आमच्याबरोबर चालू लागले. अनिताच्या डोळ्याचे पाणी खळत नव्हते. साहजिकच होते ते. तिची आत्या गेली होती. छियालेक खिंडीअगोदरचे ग्लेशियर पार करताना त्या दोघांची तारांबळ उडाली. कारण येताना ते घोड्यावरुन आले होते, आणि आज कोणत्या प्रसंगात त्यांना यात्रा अर्धवट सोडून निघावे लागले होते. त्यातच दोन रात्री झोपही नव्हती. ॐ पर्वताच्या नभिढांगहून लिपुलेक खिंडीसाठी ते रात्री १-३० वाजता निघाले होते आणि थोड्याच वेळात अनिताची आत्या घोड्यावरुन पडायला लागली. घोडेवाल्या मुलाला वाटले तिला झोप येत आहे म्हणून तो तिला सावरत 'मॅडम, सोना नहीं!' असे म्हणत राहिला पण ती हाकेला ओ देईना तेव्हा सगळे थांबले आणि बघितले तर ती नव्हतीच. तिला घोड्यावरुन खाली घेऊन सर्वांनी प्रयत्न केला पण... मग एक गाइड आणि हे दोघे, घोडेवाला परत फिरले. वॉकीटॉकीवरून नभिढांगला कँपपोस्टला कळविले. सैनिकही लगेच आले. बाकी यात्रेकरू आणि दुसरा गाईड पुढे गेले लिपुलेक खिंडीमार्गे कैलास दर्शनाला.
अनिताची कशीबशी समजूत घालत कठीण छियालेकखिंड चढलो. मग आला बुधीचा तीव्र उतार. पावसाने रस्ता चिकचिक झाला होता, पाय सटासट घसरत होते. जपून पावले टाकत उतरलो एकदाचे, तेव्हा दुपारचे तीन वाजले होते. बॉडी एका बाजूच्या तंबूत ठेवली होती. अनिता आमच्याबरोबर आणि मेहुणे पुरुषांबरोबर असे राहिलो. आधी रसना प्यायलो, नंतर भोजन. त्या दोघांची समजूत घालून त्यांनाही जेवायला लावले. मग विश्रांती... थोड्या वेळाने अनिताला झोप लागली. दमली होती बिचारी पोर. तशी लहानच होती ती अशा भयंकर प्रसंगाला तोंड द्यायला. पाऊस पडतच होता, ढगही हटण्याचे नाव घेत नव्हते. उद्या मौसम निवळला तर हेलिकॉप्टर येऊ शकेल, नाहीतर उद्या पुन्हा २५ किमीवरील मांगटीपर्यंत आजच्यासारखीच न्यावी लागेल बॉडी. सगळा कँप गुमसुम होता. रात्री कढी-खिचडी खाऊन आता विश्रांती.
सतरावा दिवस. मौसम सुधारण्याचे काहीच चिन्ह नसल्याने बॉडी पहाटे चार वाजताच रवाना झाली होती. आमच्याही प्रवासात अनितासाठी बदल केला होता. एरवी आदिकैलासचे यात्रेकरू बुधीहून गालागढला मुक्कामाला जातात. नंतर सिर्खा नारायण-आश्रम मार्गे पांगू तवाघाट, धारचुला असा प्रवास असतो. पण आता बुधीहून निघाल्यावर लखनपूरहून खाली उतरून मांगटीला जायचे आणि तिथून बसने धारचुला. या कार्यक्रमामुळे गालागढच्या ४४४४ खडांज्या चढण्याचा त्रास वाचणार होता पण त्यासाठी बुधीहून १८ किमी असलेले लखनपूर दुपारी १२ च्या आत गाठणे आवश्यक होते. सकाळी ५-३० ला चालायला सुरवात केली. अनिताची समजूत घालून तिला घोड्यावरून पुढे पाठवले, कारण तिचे नातेवाईक अहमदाबादहून विमानाने धारचुलाला पोहोचले होते. मौसम खराबच होता, पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. रस्ता भयानक होता. कालच्यासारखेच भरभर चालत होतो. ८-३० ला मालपा आले. आता लखनपूर फक्त सहा किमी राहिले होते. आता उशीर होणार नाही, बाराच्या आत लखनपूरला नक्की पोहोचू या विचाराने जीव भांड्यात पडला.
लखनपूरसाठी कठीण खडांज्यांची चढाई आणि उतरण, पाऊस, रेनकोटमुळे भयंकर गरम होणे यातूनच चालत अकरा वाजता लखनपूर गाठले.
लखनपूर ते मांगटी ५/६ किमी हाही रस्ता चढ-उताराचाच. एका ठिकाणी कालीला आलेल्या पुरामुळे पाणी रस्त्यावर आले होते. गुढग्याएवढे पाणी होते. वेगवान प्रवाह होता. जवळजवळ ५० फुटांचा रस्ता पाण्यात बुडाला होता. एका बाजूला पर्वत आणि दुसर्या बाजूला खवळलेली कालीमैय्या. आधी सुनील पित्रे, त्यांच्या मागे मी, हे, रिहिणी, मीना, सुनील शिंदे आणि सर्वात मागे पांडेजी असे उजव्या हाताने डोंगराचा आधार आणि डाव्या हाताने एकमेकांची काठी धरुन 'ॐ नमःशिवाय, ॐ नमःशिवाय' म्हणत जीव मुठीत धरून तो रस्ता पार केला. पण समोरून येणारे खांद्यावर छप्पराच्या पत्रांचे ओझे घेऊन बॅलन्स सांभाळत पायात फक्त स्लीपर घालून पूर आलेला रस्ता पार करणारे मजूर, ओझी लादलेले घोडे यांना पाहून आम्ही थक्क झालो. किती हे कठीण जीवन!
डोंगर चढून मांगटीला आल्यावरदेखील बसच्या रस्त्याने खूप वेळ खाली उतरावे लागले, कारण आमची बस आय.टी.बी.टी. च्या कॅंपवर उभी होती. तिच्यातच आमचे जेवणही होते. पोहोचलो एकदाचे बस जवळ. तिथे असलेल्या नळावर हात-पाय धुवून जेवायला बसलो. प्रचंड भूक लागली होती, दमायलाही झाले होते. घोड्यावरून आलेल्या मंडळींचे भोजन झाले होते. अनिता आणि मेहुणे धारचुलाला लगेचच गेले होते. जेवण करताना समजले की बस बिघडली आहे आणि जीपने धारचुलाला जावे लागेल. एक तास वाट बघितल्यावर दोन जीप आल्या. आठ-आठ जण एकेका जीप मध्ये बसून कच्च्या रस्त्यावरून धक्केधुक्के खात ३५ किमीवरील धारचुल्याच्या रिसॉर्टमध्ये तीन तासांनी संध्याकाळी सात वाजता पोहोचलो.
अहमदाबादहून नातेवाईक आल्याने व गुजरातला नेणे शक्य नसल्याने धारचुल्यातच अंत्यसंस्कार केले. निगमला या सर्व प्रकारात ५०,००० रुपये खर्च आला. बॉडी घेऊन येणार्या प्रत्येक मजुराला ३,००० रुपये दिले आणि हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले. रात्री अनिता, मेहुणे, त्या महिलेचा पती, आईवडील सर्वजण आम्हाला भेटायला आले. त्यांचे सांत्वन करणे फारच कठीण होते. त्या महिलेचे पतीही यात्रेला आले होते, पण धारचुल्यातील मेडिकलमध्ये ते अनफिट झाले म्हणून ते परत गेले आणि पूर्णतः फीट असल्याने त्यांची पत्नी पुढे गेली होती. पण परमेश्वरेच्छा बलियसी हेच खरे.
एकंदरीत या यात्रेत हे समजले की, कोणत्याही प्रसंगी निगम, सैनिक आणि आपले भारत सरकार यात्रेकरूंच्या पाठीशी ठामपणे उभे असते, मदतीत कुठलीही हयगय करत नाही.
---------------------
क्रमशः
प्रतिक्रिया
9 Sep 2014 - 6:52 pm | एस
हा लेख वाचून थोडा अंतर्मुख झालो. आपत्ती कोसळलेल्या जीवांचे काय हाल होतात, त्यापेक्षा त्यांना कोणत्या मन:स्थितीतून मार्ग काढावा लागतो आणि अशा प्रसंगी कुठली ओळख ना पाळख, कोण कोणाचे कोण अशा व्यक्तींकडून माणुसकीचा हात कसा पुढे होतो हे सगळे मनुष्यस्वभावाच्या चांगल्या पैलूंचे जसे दर्शन घडवते तसेच आयुष्यातील अपरिहार्य अस्थिरतेचीही आठवण करून देते.
तुमची लेखनशैली साधीसुधी आणि प्रवाही आहे. लिहीत रहा.
9 Sep 2014 - 7:03 pm | कवितानागेश
कठीण आहे हा प्रवास.
11 Sep 2014 - 5:36 am | स्पंदना
काय दैवलीला!!
अंत्यसंस्कार तेथेच करायचा निर्णय योग्यच.
वाचून कसतरी होतय.
पण एकदा कोल्हापुरची एक फॅमीली दक्षिण भारत बघायला खाजगी जीप घेउन गेली होती ते आठवल. त्यातले कर्ते गृहस्थ वय ५० हार्टअॅटॅकने जीपमध्येच वारले. बरोबर पत्नी, मुले साधारण १६च्या आसपासची, बहीण अन मेव्हणे. एका लहाण गावात जीप थांबवुन डॉक्टरकडुन वारल्याची खात्री झाल्यावर जीप तशीच मागे फिरवली. भयानक म्हणजे त्यात त्यांनी ती बॉडी तशीच बसवुन आणली पोलीसांना संशय येउ नये म्हणुन. दोन की तीन दिवस न थांबता प्रवास करुन घरी आले. अन मग अंत्यसंस्कार. तोवर त्या देहाला .......राहू दे. नाही सांगत. कल्पना असेलच बर्याचजणांना.