आजकाल मिसळपावाची "घटना" किंवा "नियमावली" लिहिण्याबाबत चर्चा होत आहे.
या बाबतीत "लोकशाही" हा शब्द पुष्कळदा वापरात आलेला दिसतो. देशांच्या/राज्यांच्या बाबतीत लोकशाही म्हणजे काय, याबद्दल आपण नागरिकशास्त्रात शिकलेलो आहोत, आणि जगातील विविध उदाहरणांनी "राज्यात लोकशाही म्हणजे काय?" या प्रश्नाचे उत्तर शोधू शकतो.
राज्यातले "लोक" कोण? याबद्दल एकमत नसेल तरी जवळजवळ एकमत आहे. राज्यात हक्काचे रहिवासी हे त्या राज्यातले लोक. जन्मजात रहिवाशांना तो हक्क जन्मतः मिळतो, आगंतुकांना तो क्रमक्रमाने अर्धवट-ते-पूर्ण मिळतो (साधारणपणे मतभेद या बाबत असतात, की हे हक्क किती लवकर, किती उशीरा, कसल्या निकषावर मिळावेत.)
राज्यात हक्काच्या रहिवाशांच्यासाठी शासनाचे उत्तरदायित्व असते अशा प्रकारची नीतीमत्ता लोकशाहींमध्ये मूलभूत मानतात. याचे कारण हे असू शकेल की राज्याचे त्या भौगोलिक प्रदेशात सार्वभौमत्व असते. मी (ग्राहक) आजपासून मुंबईतल्या खरेदीचा विक्रीकर माझ्या आवडत्या गोवा सरकारला भरीन, अशा प्रकारचे व्यक्तिगत स्वातंत्र्य माझ्यापाशी नसते. वगैरे, वगैरे. त्यामुळे या सार्वभौमत्वाखाली जे बळेच घेतले जातात, त्यांना हा जाब विचारायचा हक्क असतो, की सरकारने आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या की नाही.
अशा प्रकारचे सार्वभौमत्व, म्हणून नागरिकत्व, राज्यांचेच असते. संस्थांचे नाही.
संस्थांसाठी अशी काही घटक एकके असतात का? दोन प्रकार मनात येतात : (१) सदस्य (२) उपभोक्ते
सदस्यांना एककत्व देता येते, पण नेहमीच दिले जात नाही. उदाहरणार्थ : नफ्यासाठी उभ्या केलेल्या संस्थांचे समभाग घेऊन त्यांच्यात सभासदत्व (मालकी हक्क) घेता येते. पण तिथे एकक हे सभासद नसून समभाग असतो. शंभर समभाग असलेला सदस्य, एकसमभागी सदस्याच्या शतपट वजनाचा. अशा संस्थांमध्ये प्रत्येक समभाग-मालकाला (शतपट-मालक=शंभर मालक एका कुडीत) कंपनीच्या कार्यवाहीबद्दल जाब विचारण्याचा अधिकार असतो.
सेवाभावी संस्था साधारणपणे समभाग, किंवा मालकीहक्क विकत नाहीत. संस्थेचे दररोजचे उत्तरदायित्व संस्था स्थापणार्याने नेमलेल्या विश्वस्त मंडळाकडे असते. तरी नैतिकदृष्टीने बघता, चरम उत्तरदायित्व ज्यांना सेवा पुरवली जात आहे त्यांना जबाब देणे हे असते. त्यामुळे "उपभोक्ता" हा जबाबदारी पूर्ण केली नाही असा जबाब विचारणारा असतो. "उपभोक्त्याचे" एकक काय (जसे लोकशाहीत, मतदाता-एक-मनुष्य; कंपनीत एक-समभाग) हा प्रश्न पुढे चर्चेत आणू.
माझ्या मते मिसळपाव हे "सेवाभावी संस्था" या चौकटीच्या सर्वात जवळ जाऊ इच्छिते. (मराठी वाचन-लेखनाला स्थान उपलब्ध करून देणे ही नि:शुल्क सेवा.) याबद्दल दुमत असू शकते. याबाबत तुम्ही चर्चेत जरूर टिप्पणी मांडा. पण या बाबतीत निर्णय घ्यायचे संपूर्ण अधिकार मालकाच्याच अधीन आहेत, हे जाणा.
पण सेवा उपभोगणार्याचे एकक काय? जो उपभोक्ता एकदा नाव नोंदवून पुन्हा निवडणुकीपर्यंत नाहिसा होतो (किंवा निवडणुकीच्या आदल्या दिवशी नाव नोंदवतो), आणि जो मिसळपावावर दररोज लेखन-वाचन करतो, दोघांचा उपभोगाधिकार, उपभोगसामर्थ्य एकच की वेगवेगळे? उपभोक्ता म्हणजे कोण, व्यक्ती की सदस्यत्व-नाव=आयडी? (या ठिकाणी एकाच व्यक्तीने अनेक आयडी घेतलेल्या आहेत, आणि अन्यत्र मीही अनेक आयडी घेतलेल्या आहेत - हे अनैतिक नाही असे मला वाटते.) पण मी दोन आयडी घेतल्या तर मी दुप्पट सदस्य की एकपटच? म्हणजे अमुक संपादक नेमावा/न नेमावा हा निर्णय बहुसंख्य उपभोक्त्यांनी घेतला म्हणजे काय? - म्हणजे >५१% आयडींनी तसे म्हटले तर चालेल, की >५१%,मनुष्य-व्यक्तींनी म्हणायला पाहिजे, की >५१% "सक्रिय" मनुष्य-व्यक्तींनी म्हणायला पाहिजे?
घटना वगैरे करायच्या आधी या प्रश्नांची उत्तरे हवीत :
१. मिसळपावाचे उद्दिष्ट हे कुठलीतरी सेवा पुरवणे (मराठी लेखन-वाचन करायला स्थळ) हे आहे काय? - तशी रजिस्टर करायची म्हणत नाही! तरी विचारांची ती चौकट वापरावी काय? तपशील घटनेत यावेत.
(हे उत्तर १ मिळाले तर...)
२. मिसळपावाचे उद्दिष्ट सफल झाले/नाही, बदल सुचवणे, अशा प्रकारचा जाब अंततोगत्वा विचारणारे कोण? उपभोक्ते काय? (येथे अंततोगत्वा म्हणजे स्पष्टपणे आणि प्रभावीपणे, अगदी अंततोगत्वा मिसळपावावरून चालते होऊन कोणीही "उद्दिष्ट सफल झाले नाही" असे गर्भितार्थाने सांगू शकतो.) उपभोक्ता ते कसे करेल ते तपशील घटनेत येतील.
(हे उत्तर २ मिळाले तर...)
३. उपभोक्त्याचे एकक काय?
(सर्किट यांचा "कल्पनागार" विदा आहे, त्यापेक्षा अधिक तपशील असलेला विदा ड्रुपलपाशी, सिक्वेलमध्ये आहे. हा वापरून उपभोक्त्याचे उपभोग-गुरुत्व निर्धारित करता येईल का? यात आयडीची खाजगी माहिती वापरू नये - केवळ मिसळपावाचा उपयोग/उपभोग.)
प्रतिक्रिया
16 Dec 2007 - 5:25 am | ऋषिकेश
सर्वप्रथम धनंजय यांचे इतक्या मुद्देसुद सुरवाती बद्दल अभिनंदन आणि आभार.
प्रश्न खुप मोलाचे आहेत अणि भरपूर चर्चा होईलच. हे वाचल्यावाचल्या काही सैल मुद्दे डोक्यत आले ते मांडतो आहे. पुढिल चर्चेनंतर चित्र स्पष्ट होईलच
१. मिसळपावाचे उद्दिष्ट हे कुठलीतरी सेवा पुरवणे (मराठी लेखन-वाचन करायला स्थळ) हे आहे काय? - तशी रजिस्टर करायची म्हणत नाही! तरी विचारांची ती चौकट वापरावी काय? तपशील घटनेत यावेत.
===> अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी , सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ अशी ओळख मुखपृष्ठावर दिअसते. त्यावरून मराठी भाषेमधुन लेखन, वाचन, चर्चा, वाद, काव्य आदिंद्वारे अभिव्यक्त होण्यासाठी असलेलं एक मोफत संकेतस्थळ अशी संज्ञा करता यावी.
२. मिसळपावाचे उद्दिष्ट सफल झाले/नाही, बदल सुचवणे, अशा प्रकारचा जाब अंततोगत्वा विचारणारे कोण? उपभोक्ते काय? (येथे अंततोगत्वा म्हणजे स्पष्टपणे आणि प्रभावीपणे, अगदी अंततोगत्वा मिसळपावावरून चालते होऊन कोणीही "उद्दिष्ट सफल झाले नाही" असे गर्भितार्थाने सांगू शकतो.) उपभोक्ता ते कसे करेल ते तपशील घटनेत येतील.
===> याबाबत माझ्या मते विभाग पाडता येतील. प्रत्येक विभागाचा प्रतिनिधी घोषित करता येईल आणि तो त्या विभागाच्या निगडित प्रश्नांना उत्तरदायी असेल. याशिवाय पंचायत समिती सदस्य हे उपभोक्त्यांचे प्रतिनिधी असतील व तेच केवळ प्रश्न विचारण्यास पात्र असतील. जर विभाग प्रमुख समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत तर मालक त्यांच्या अधिकारात निर्णय घेतील नी तो सगळ्यांना बंधनकारक ठरेल. बाकी सभासद त्या प्रतिनिधींकडे, म्हणजेच पंचायत समितीकडे स्थळ/धोरणांविषयी आक्षेप/मते नोंदवतील. (अर्थात सदस्यास वाटले की आपले प्रतिनिधी काम नीट करत नाही आहेत तर ते मालकांकडे तक्रार् व्यनी मधून करू शकतील)
३. उपभोक्त्याचे एकक काय?
===>माझ्या मते जो मिसळपावचा कमित कमि ३ महिने सभासद आहे व यावेळेत कमितकमी 'क्ष' वेळा लिखाण (यात प्रतिसादही धरले जावेत) केले आहे त्याला सामान्य उपभोक्ता म्हणता यावे. तर विभाग प्रमुख पदासाठी त्या विषयातील ज्ञान निकष असावा. तर प्रतिनिधी पदासाठी उपभोक्त्यापेक्षा अधिक महिने सभासद व अधिक लिखाण याची अट असावी
(विचारमग्न) ऋषिकेश
16 Dec 2007 - 5:50 am | सुशील
लोकशाही दील्यावर लोक कशी वाट लावतात हे मिसळपाववर सिद्ध झाले आहे. कशाला पाहिजे ती लोकशाही? माझ्या मते ही वेबसाइट तात्यानेच चालवावी. मिसळपावचे मनोगत झाले म्हणून रडणार्यांनी एक लक्षात ठेवावे की मनोगत ही महेश वेलणकरने चालवलेली वेबसाईट आहे आणि मिसळपाव ही तात्या अभ्यंकरने चालवलेली वेबसाईट आहे. हा दोनीतला मुख्य फरक आहे. त्यामुळे मनोगतात आणि मिसळपावमध्ये फरक काय? असे विचारू नये. ज्यांना खरोखर लिहायचे आहे ते थांबतील बाकीचे जातील.
16 Dec 2007 - 6:46 am | सर्किट (not verified)
लोकशाहीची वाट लोक लावतात, त्यांना तो अधिकारच आहे.
येथे लोकनियुक्त समितीच्या अधिकारांचे उल्लंघन हुकूमशहाकडून होत असेल, तर त्याला लोकशाही कृपया म्हणू नये.
हे दुसरे मनोगत आहे, असे जाहीर करावे, म्हनजे सर्वांनाच सोपे पडेल.
हे संकेतस्थळ सुरू केल्यापासून आजवर तात्या हे लोकशाही म्हणून चालवतो आहे, असे मला वाटते.
येथे लोकनियुक्त पंचायत समिती आहे. त्यांची नावे जाहीर आहेत. आणि आजवर ते अत्यंत पारदर्शक पद्धतीने येथील कारभार चालवत आहेत.
हे असेच सुरू रहावे, असे येथील सदस्यांना वाटणे साहजिकच आहे.
लोकशाशी कठीण आहे. येथील सदस्य हुकुमशाहीसारख्या सोप्या शाहीशी अगदी परिचीत आहेत.
त्यांना हे समजणे कठीण जाणारच !
जानम समझा करो !
- सर्किट
16 Dec 2007 - 7:58 am | सुशील
मिसळपावचा केवळ द्वेष करणे ह्या एकमेव उद्देशाने येणार्या किमयागाराचे अकाउंत डीलिट केलेले दिसते. मला सांगा हे लोकशाहीत शक्य असते का? तेव्हा ही साइट तात्यानेच चालवावी.
16 Dec 2007 - 8:19 am | गारंबीचा बापू
दोन तास झाले नाहीत तुम्हाला इथे येऊन पण मिसळपावचे पूर्वजन्मीचे ज्ञान तुम्हाला बरेच दिसते.
मिसळपाववर केवळ उपद्रव निर्माण करून या संकेतस्थळाची वाट लावणार्यांवर कारवाई न करता त्यांचा उपद्रव सहन करत बसणे म्हणजे ' लोकशाही' का?
जे लोक चांगले चाललेले संकेतस्थळ बिघडवण्यासाठी येतात त्यांना ठेचायचं नाही तर काय पदराखाली घ्यायचं?
बापू
16 Dec 2007 - 8:58 am | सुशील
जे लोक चांगले चाललेले संकेतस्थळ बिघडवण्यासाठी येतात त्यांना ठेचायचं नाही तर काय पदराखाली घ्यायचं?
अहो तात्या तेच तर म्हणतोय ना मी पण!! पण हे त्या लोकशाहीत शक्य होते का? उलट इतके दिवस त्या किमयागाराला शेफारुनच ठेवले होते ना लोकशाहीने! आता आहे हे बरे आहे.
16 Dec 2007 - 6:22 am | प्राजु
ज्यांना खरोखर लिहायचे आहे ते थांबतील बाकीचे जातील.
हे म्हणणे नाही पटले. कारण माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये मी मिसळपाव ही एक चांगली मराठी साईट म्हणून ओळख करून दिली आहे. सभासद नसले तरी कहीतरी चांगले वाचण्याच्या उद्देशाने हे सर्व इथे येतात. भारताबाहेर राहून मराठी लेखनाशी किंवा वाचनाशी संपर्कात राहण्यासाठी सगळे येतात इथे. अशावेळी इथे एकमेकांवर शिंतोडे उडवणे, गलिच्छ लेखन किंवा शिव्या वाचताना त्यांना कौतुक नक्किच वाटत नसेल. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये बराच फरक आहे. तो समजून घेणे आणि आचरणांत आणणे हे महत्त्वाचे.
मग तात्या मालक असो किंवा वेलणकर असोत... लिहायचे ते थांबतिलच पण वाचकांशिवाय लेखन काय उपयोगाचे?
आणि कोणताही सूज्ञ वाचक गलिच्छ साहित्य वाचणे पसंत करणार नाही.
- प्राजु (सूज्ञ वाचक)
16 Dec 2007 - 6:59 am | सर्किट (not verified)
लोकशाही वरील आपले भाष्य स्वागतार्ह आहे.
परंतु, मला एक खुलासा हवा आहे.
ज्या राष्ट्रात, उदा. पाकिस्तानात, लोकशाही कागदोपत्री आहे, तेथे समजा लोकनियुक्त प्रतिनिधींना बाजूला ठेवून, स्वतः मुशर्रफ सगळे कायदे हाती घेतात, तेव्हा त्याअ राष्ह्ट्रात लोकशाही आहे, असे म्हणणे योग्य आहे का ?
मग ते राष्ट्र उत्तर कोरिया अथवा चीन पेक्षा फारसे वेगळे आहे का ?
लोकशाही कठीण आहे. ती पार पाडायला, मन घट्ट करणे आवश्यक आहे.
शुभेच्छा !
- सर्किट
16 Dec 2007 - 7:59 am | सुशील
आपण कोणीही इथे पैशे भरून येत नाही तेव्हा इथे काय असावे आणि काय नाही ह्याचा हट्ट धरणारे आपण कोण? ह्याचा सुधा विचार करा
16 Dec 2007 - 8:17 am | गारंबीचा बापू
तुम्ही वर केलेली विधाने आणि हे विधान यात बरीच विसंगती आहे. तुम्ही दोन्ही बाजूंनी ढोल वाजवून भांडणांची आणि वादविवादांची भट्टी चालू ठेवण्याची जबाबदारी पार पाडत आहात.
बापू
16 Dec 2007 - 8:23 am | सुशील
तात्या तुम्ही आता 'विसोबा खेचर' ह्या आयडीतून उत्तरे द्या बघू. हे बापू नाना आता बस झाले.
16 Dec 2007 - 8:30 am | गारंबीचा बापू
विषयाला फाटे फोडू नकोस. लोकांची दिशाभूल करू नकोस.
किमयागाराची तुला माहिती आहे आणि बापूची नाही?
वेड पांघरून पेडगावला चाललायसं?
का तुझा खरा उद्देश इथे मांडला म्हणून काही तरी बळरतो आहेस?
बापू
16 Dec 2007 - 8:49 am | सुशील
तात्या, असे मांजर डोळे मिटून दूध पित असल्यासारखे का करताय? सगळ्यांना माहित आहेत तुमचे आयडी.
मी खरंच तुमची बाजू घ्यायला आलो आहे. मला तुमचे लेखन खूप आवडते. तुम्ही असा गैरसमज का करताय?
16 Dec 2007 - 10:39 am | धनंजय
>ज्या राष्ट्रात, उदा. पाकिस्तानात, लोकशाही कागदोपत्री आहे,
> तेथे समजा लोकनियुक्त प्रतिनिधींना बाजूला ठेवून, स्वतः
> मुशर्रफ सगळे कायदे हाती घेतात, तेव्हा त्या राष्ट्रात
> लोकशाही आहे, असे म्हणणे योग्य आहे का ?
योग्य नाही. मुशर्रफ हे राष्ट्र-प्रमुख असल्यामुळे, त्यांचे असे म्हणणे योग्य नव्हे, केवळ दांडगाई आहे, कारण राष्ट्र हे मालकीहक्काचे नसते. मालकीहक्काच्या या संकेतस्थळावर शेवटी कायदा काय ते मालकच सांगणार. मालकाने "माझी ब्याट, माझी ब्याटिंग" म्हटले तर चालेल, पण ते स्पष्ट म्हटले पाहिजे. पण मिसळपावाच्या मालकाने असे म्हटल्यास - स्पष्ट म्हटल्यास - काहीही चुकले नाही. ज्या लोकांना आवडणार नाही, ते लोक मिसळपावावर येणार नाहीत, किंवा मालकाच्या मर्जीने येतील; ते त्यांचे स्वातंत्र्य आहे. उलटपक्षी मालकाने मानले, की माझी ब्याट असली तरी अंपायरचे म्हणणे मानले जाईल, तर मग अंपायरिंगचे नियम प्रसिद्ध व्हावेत. अंपायरच्या नेमणुकीबाबत खेळाडूंना, प्रेक्षकांना, पूर्ण माहिती द्यावी, वगैरे...
राष्ट्र नसलेल्या संस्थेसाठी राष्ट्रीय लोकशाहीची वैचारिक चौकट योग्य नाही. एक तर मालकीशाही (एका व्यक्तीची, किंवा समभागमालकांची) चौकट वापरता येईल, किंवा सेवाभावी संस्थेची "उपभोक्त्यास बांधीलकी" ही चौकट वापरता येईल. कुठली चौकट वापरावी हे सर्वस्वी मालकाच्या स्वाधीन आहे.
"लोकशाही" शब्दाचा सैल वापर सोडून, "उपभोक्त्याच्या सेवेची बांधीलकी" हा त्यातल्या त्यात व्यवहार्य कल्पना स्वीकारली जावी, असा एक विचार मी पुढे करतो आहे. माझे म्हणणे आहे, की मिसळपावावर "लोकशाही" आहे की नाही असे म्हणण्यापूर्वी "लोक" कोण? या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. राष्ट्रीय लोकशाहीत लोक म्हणजे मतदार (शक्यतोवर राष्ट्राचे सर्व प्रौढ निवासी.) आंतरजालावरचे मराठी "लोक" कोण, त्यांची ओळख काय, त्यांचा आकडा काय, त्यांच्यापैकी ५१% मते मिळालीत असे कधी समजणार... या चर्चा संपणार्या नाहीत, आणि कदाचित भाकड आहेत.
उपभोक्त्यांची सेवा करणारी संस्था, आणि उपभोक्त्यांपाशी बांधीलकी असणारी सेवा, असे मानल्यास, उपभोक्ता कोण? वगैरे व्यवहार्य प्रश्न विचारले जाऊ शकतील.
मला "लोकशाही" या निसरड्या शब्दापासून दूर जायचे आहे, आणि चर्चा करणार्यांच्या मनात जे काही प्रिय तत्त्व "लोकशाही" या शब्दाखाली दडले आहे, त्याच्यापाशी पोचायचे आहे. व्याख्येसह, घट्ट, व्यवहार्य अर्थासकट पोचायचे आहे.
सारांश : "लोकशाही" शब्दापासून तात्पुरते दूर जावे, आणि त्या संकल्पनेचे मिसळपावास लागू होईल असे स्पष्टीकरण करावे. त्या संकल्पनेच्या अधिकाधिक जवळ जावे. त्याचे नियम निश्चित केल्यावर, त्या व्यवहार्य चौकटीला कोणी "लोकशाही" असे पुन्हा म्हणू लागल्यास काही हरकत नाही. ती चौकट कोणती, याबाबत ही चर्चा.
16 Dec 2007 - 8:30 am | ऋषिकेश
धनंजयरावांच्या या अभ्यासपूर्ण लेखावर सांगोपांग चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. परंतू ये रे माझ्या मागल्या.. पुन्हा वैयक्तीक आरोप प्रत्यारोप सुरु झालेले दिसताहेत.. कृपया लेखनाच्या विषयावर चर्चा घडेल काय? ज्यांना वेगळ्या विषयावर चर्चा करायची आहे / वैयक्तीक टिप्पणी करायची आहे त्यांनी कृपया नवी चर्चा सुरू करावी असे वाटते.
-ऋषिकेश
16 Dec 2007 - 8:40 am | गारंबीचा बापू
हेच म्हणतो. पण दोन तासापूर्वी पूर्वजन्मीचे ज्ञान घेऊन आलेले लोक विषयाला फाटे फोडत आहेत. तसे होऊ नये. धनंजयरावांचे मुद्देच चर्चेत रहावेत म्हणून या कैवार्यांना सांगावे लागले.
बापू
17 Dec 2007 - 5:49 am | धनंजय
हा विषय पुन्हा समर्पक होईल तेव्हा पुन्हा ही चर्चा सुरू करू या.
17 Dec 2007 - 8:41 am | विसोबा खेचर
हा विषय पुन्हा समर्पक होईल तेव्हा पुन्हा ही चर्चा सुरू करू या.
जरूर करू धन्याशेठ. तुम्ही दाखवलेल्या इंटरेस्टबद्दल मनापासून धन्यवाद!
काही मंडळी जरा अतीच इंटरेस्ट दाखवायला लागली होती त्यामुळे तूर्तास ही चर्चा थांबवली आहे...
तात्या.
17 Dec 2007 - 10:00 am | सुशील
अहो नको ते आता. पून्हा त्या कटू आठवणी काढू नका. आहे हे खूप छान वाटते आहे.
22 Jul 2010 - 11:26 pm | क्रेमर
लेख आवडला.
-(जुन्या क्लासिक्सची पुनर्मुद्रीते आवडीने वाचणारा) क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
22 Jul 2010 - 11:31 pm | आमोद शिंदे
हाहाहा... कोण आहेत ही सुशील, बापू वगैरे मंडळी? क्रेमरनी वर आणलेल्या धाग्यात एवढे मृत आयडी का आहेत? आयडी मरून गेल्याने त्यांची भूते झाल्यासारखे वाटते. असो..मस्त टाईमपास आहे..उत्खनन चालू ठेवावे :-)