तवा पुलाव

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
25 Aug 2014 - 12:59 pm

Final 1

तवा पुलाव....पावभाजीच्या गाडिवर मिळणारा अजुन एक झटपट आणि चविष्ट पदार्थ. त्या भल्या मोठ्या तव्यावर पसरलेल्या भाजीमधलीच थोडि भाजी परत बटरवर परतुन त्यात शीजवलेला मोकळा भात मिक्स केला कि झाला तवा पुलाव!!!

ठण! ठण!! ठण!!! करीत मोठ्या कावीलथ्याने पुलाव तव्याच्या कडेवर आणतात आणि पटकन सार्विंग डिश मधे भरुन देतात. सोबत लिंबाची फोड आणि बारीक चीरलेला कच्चा कांदा. हाशहुश करत, मधेच कपाळावरील घाम टिपत (प्रचंड तापलेला तवा बाजुस असल्यामुळे) हा पुलाव खायला एक वेगळिच खुमारी येते. कॉलेज जीवनात तर हे तीन पदार्थ टॉप फेवरेट होते....पाव भाजी, सँडवीज (ग्रील्ड, साधं किंवा टोस्ट) आणि हा पुलाव....पोटभर शीवाय बजेटमधे!

चला भरपुर बोलुन झालं आता मुख्य पाकृ कडे वळुया.

साहित्यः
१. मोकळा शीजवलेला भात - २ बाउल
२. २ मध्यम चौकोनी चिरलेले कांदे
३. १ मध्यम चौकोनी चिरलेली हिरवी सिमला मिरची
४. बारीक चीरलेला टोमॅटो - १
५. फ्रोजन मटार - १ बाउल
६. एवरेस्ट पाव भाजी मसाला - २ चमचे (आपण आपल्या आवडिच्या ब्रँडचा घेउ शकता)
७. तिखट - पाव चमचा (आवडिप्रमाणे कमी/जास्त)
८. लसुण / सुख्या लाल मिरच्यांची पेस्ट - १ चमचा (खलबत्त्यातच कुटुन घ्या)
९. १/२ लिंबाचा रस
१०. बारीक चीरलेली कोथिंबीर
११. तेल - २ चमचे (बटर जळु नये म्हणुन)
१२. अमुल बटर क्युब्स - ३
१३. चवीनुसार मीठ

pulao 2

कृती:
१. तर मंद आचेवर नॉनस्टिक पॅन/कढई/तवा तापला कि अमुल बटर आणि तेल घालुन त्यात लसुण/लाल सुख्या मिरच्यांची पेस्ट घालुन परता

Pulao 3

२. पेस्टचा कच्चा वास गेला कि अनुक्रमे चौकोनी चिरलेला कांदा/सिमला मिरची घालुन परता

Pulao 4 Pualo 5

३. कांदा/सिमला मिरची मउ झाली कि बारिक चीरलेला टॉमॅटो घालुन एक ५ मि. परता. टोमॅटो शीजुन एकजीव झाला कि फ्रोजन मटार घालुन परत एक ५ मि. परता

Pulao 6 Pulao 7

४. आता त्यात अनुक्रमे पाव भाजी मसाला, तिखट, लिंबाचा रस, थोडि कोथिंबीर आणि चविनुसार मीठ घालुन परता

Pulao 8

५. मसाला छान परतला कि शीजवलेला भात घालुन हलक्या हाताने मिक्स करा

Pulao 9 Pulao 10

६. बारीक चीरलेली कोथींबीर पेरुन गरमा गरम तवा पुलाव सर्व करा

Final 2

टिपा:
१. खरं तर हा पुलावच ईतका फ्लेवरफुल असतो कि त्यासोबत कुठल्याच रायत्याची गरज भासत नाहि पण अगदि हवचं असेल तर काकडि-कांद्याचं दह्यातलं रायतं करुन घ्या

२. तव्यावर पुलाव मिक्स केला कि लगेच सार्विन्ग बाउल/प्लेट मधे काढुन घ्या अन्यथा भाताची शीतं कडक होउन नावाप्रमाणेच "कडक तवा पुलाव" म्हणुन पेश करावा लागेल :)

३. भात शक्यतो शीळा आणि त्यातुन फडफडीत असेल तर उत्तम. ताजा करुन पुलाव करणार असाल तर भात मोकळा शीजवुन घ्या (फ्राईड राइस ला शिजवतो त्या प्रमाणे)

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

25 Aug 2014 - 1:04 pm | सुहास झेले

अतिशय आवडता खाद्यप्रकार.... कधीही, कुठेही आणि कितीही ;-)

अजया's picture

25 Aug 2014 - 1:39 pm | अजया

आजच करते!!

प्रभाकर पेठकर's picture

25 Aug 2014 - 1:54 pm | प्रभाकर पेठकर

मस्त आणि चविष्ट प्रकार.
मस्कतमध्ये माझा व्यवसाय हाच असल्यामुळे पावभाजी आणि तवा पुलाव माझेही अत्यंत आवडते आहेच. दुर्दैवाने, इथल्या महापालिकेच्या कायद्यानुसार कॅफेटेरिया वर्गात मोडणार्‍या माझ्या दुकानाला भात बनवायची परवानगी नाही. त्या साठी उपहारगृहाची (रेस्टॉरंट) परवानगी लागते. लवकरच ती मिळविणार आहे. पण आम्ही मागणी असेल तर 'टेक अवे' नावाखाली बनवून देतो. बरीच मागणी असते. मस्तं आहे हा प्रकार.

एस's picture

25 Aug 2014 - 1:58 pm | एस

मलासुद्धा करून बघता येईल. धन्यवाद.

एकही शित खाली पडू न देता मिक्स करण्याच्या तुझ्या कसबाला सलाम.

सस्नेह's picture

25 Aug 2014 - 4:09 pm | सस्नेह

तुम्ही पाहिलं का, सांडलं की नाही ते ?
तुम्हाला तेवढं बोलावतो वाटतं हा दीपक ?

दिपक.कुवेत's picture

26 Aug 2014 - 12:15 pm | दिपक.कुवेत

तु पण ये तुलाहि खायला घालतो. बोल कधी व्हिजा पाठवु??

अत्रुप्त आत्मा's picture

25 Aug 2014 - 3:32 pm | अत्रुप्त आत्मा

मेस बंद झाल्यावर .. मंजे रात्री ११ नंतर जेवायची वेळ आली,तर हाच पुलाव माझा आधार असतो.आमच्या हिंगण्याच्या चौकातल्या पावभाजीच्या गाडीवर मिळतो..फारसा अवडणारा प्रकार नाही. पण रात्रीचे पंजाबी किंवा तत्सम कैतरी गिळण्यापेक्षा हे फार बरे!

सानिकास्वप्निल's picture

25 Aug 2014 - 4:34 pm | सानिकास्वप्निल

झटपट व चविष्ट तवा पुलाव :)

माझा पावभाजीच्या गाडीवरील आवडता प्रकार.मस्तच आता घरी करीन.धन्यवाद.

माझा पावभाजीच्या गाडीवरील आवडता प्रकार.मस्तच आता घरी करीन.धन्यवाद.

प्यारे१'s picture

25 Aug 2014 - 5:14 pm | प्यारे१

'मला' फारसं आवडत नाही हे प्रकरण.
ह्यापेक्षा मी साध्या भाताला जिरं मोहरी, तेल, हळद, हिंग, हिरवी मिरची ह्याची फोडणी देऊन चवीपुरतं मीठ घालून परतून खाईन.

तरीही दीपक आम्हाला त्याच्या भारी रेसिपी खायला घालणार असल्यानं छान म्हणतो. ;)

आता थंडी पडणार गरमागरम चटकदार पदार्थ येत आहेत .दिपक छान .

प्रचेतस's picture

25 Aug 2014 - 6:05 pm | प्रचेतस

मारतोस काय रे?
जाम भारी बनवलंस

भारी प्रकरण दिसतय हो दिपकराव!
मी कधी खाल्ला नाहीये. एकदा कुठेतरी पाकृ वाचून करायला गेले आणि काहीतरी जाम चुकले होते. त्यापेक्षा फोडणीचा भात छान लागला असता असे या भाताबद्दल मत झाले होते. पण तुमची पाकृ वेगळी वाटतिये. फोटू चांगला आलाय.

दिपक.कुवेत's picture

26 Aug 2014 - 12:17 pm | दिपक.कुवेत

खर तरं अगदि सोपा आहे हा प्रकार. वर दिलेल्य प्रमाणे आता करुन बघ आणि कळवं कसं होतेय ते. ऑल दि बेस्ट

रेवती's picture

26 Aug 2014 - 7:15 pm | रेवती

धन्यवाद.

सूड's picture

25 Aug 2014 - 9:12 pm | सूड

एकच नंबर !!

मुक्त विहारि's picture

25 Aug 2014 - 9:39 pm | मुक्त विहारि

आता डोंबोलीत आलास की कट्टा आमच्या कडे..

पेयपानाची व्यवस्था आमच्या कडे,

खाण्याची व्यवस्था तुमच्याकडे.काय लागतील ते जिन्नस आणू. (बादवे, हापूस आंबे अद्याप फ्रीजर मध्ये आहेत, हे वेसांनल)

इतके चमचमीत आणि चवदार खायला कुवैतला येण्यापेक्षा, डोंबोलीतच कट्टा करू या.

आणि

सोमवारी न चुकता पा.क्रु. टाकल्याबद्दल मनापासून धन्यवाद...

दिपक.कुवेत's picture

26 Aug 2014 - 12:31 pm | दिपक.कुवेत

मस्त बेत ठरवु. आधी रंगीत पाण्याबरोबर साईड चखणा म्हणुन बेबी कॉर्न सीगार्स, बाईट साईज ब्रेड पिझ्झा, काबुली चणा सॅलेड किंवा अंडे के पकोडे. मग मेन कोर्स मधे मिर्ची का सालन, पनीर-पिस्ता हरीयाली, प्रॉन्स - मशरुम करी, दुधी - सोडे रस्सा किंवा चीकन रेझाला आणि मग शेवट गोड करण्यासाठि पनीर्-पिस्ता बहार, डाळिंब - गुलकंद आईसक्रिम किंवा ऑरेंज-चीली आईसक्रिम, मँगो मुस, पॅना कोता, मँगो-गुलाबजाम चीज केक. सर्वात शेवटि मसाला पान (ते मात्र रेडिमेड). काय कसा वाटतोय मेनु?? मग कधी करायचा कट्टा?

मुक्त विहारि's picture

26 Aug 2014 - 2:41 pm | मुक्त विहारि

आयला,

हा असा मेन्यु असेल तर किमान महिनाभर रोज कट्टा करू....

तुम्ही या तर खरं...मग मस्त धमाल करू....

काय हा दुष्टपणा.लीस्ट काय देताय पदार्थांची.असल्या कट्टयाला आम्ही येणार म्हणजे येणार .

मुक्त विहारि's picture

26 Aug 2014 - 11:40 pm | मुक्त विहारि

बल्लवाच्या जीवावर वाढपी उदार...

टवाळ कार्टा's picture

27 Aug 2014 - 9:13 am | टवाळ कार्टा

मी पण मी पण...

मुक्त विहारि's picture

27 Aug 2014 - 9:20 am | मुक्त विहारि

डोंबोली आपलीच आहे...

पैसा's picture

25 Aug 2014 - 10:08 pm | पैसा

जबरदस्त पाकृ आहे!

खटपट्या's picture

26 Aug 2014 - 12:59 am | खटपट्या

आज करुन बघतो

उदय के'सागर's picture

26 Aug 2014 - 10:16 am | उदय के'सागर

अरे सोप्पा वाटतोय हा प्रकार, कधी विचारचं केला नव्हता तवा पुलाव करून पहायचा. लागणारं सामानही नेहमीचं घरातलं आहे (सिमला मिरची सोडल्यास, अनायासे तेही आहेच सध्या माझ्या घरात). लवकरच करून बघेन.

अवांतर -
शिजलेला मोकळा भात कसा करावा ह्याबद्दल थोडक्यात कोणी मार्गदर्शन करेल काय? मी करतो तेव्हा नेहमी वर-वरचा भात मोकळा असतो पण खालचा भात अती-शिजलेला आणि थोडा चिकट असतो किंवा सगळेच तांदळाची शितं एकसारखी शिजलेली नसतात.
माझी कृती - मी तांदूळ १-२ तास पाण्यात भिजत ठेवतो, मग मोठ्या भांड्यात (पातेल्यात) उकळत आलेल्या पाण्यात भिजवलेले तांदूळ घालतो, पाण्यात मीठ आणि १-२ चमचे तूप किंवा तेल टाकतो. मग भाताची काही शितं तपासत रहातो, भाताची शितं शिजलेली (९०% शिजलेली, बिर्याणीसाठी साधारण अर्धाकच्च्याहून थोडा जास्त शिजवलेला ठेवतो) वाटली की आच बंद करून अधिकच पाणी काढून टाकतो (ह्या पाण्याचा अजून काही सदुपयोग करू शकत असू तर ते ही सांगा - जसं कणकेत टाकणे वगैरे) मग गार पाण्याने पुन्हा निथळून घेतो. तर कृपया सांगा माझी ही पद्धत बरोबर आहे का? मी काही विसरतोय किंवा चुकिचं करत असेल तर मार्गदर्शन करा. शिजलेला भात पसरवून कधी ठेवला नाहीये, त्याने फरक पडेल काय? धन्यवाद!

पैसा's picture

26 Aug 2014 - 10:42 am | पैसा

भाताचे पाणी अजिबात टाकू नका. भाजीत वगैरे घाला. मी खरे तर पाणी काढत नाही कधी. कूकरमधे तांदूळ जसे असतील त्या मानाने दीडपट ते दुप्पट पाणी घालून भात शिजवणे उत्तम. पुलावासाठी अगदी मोकळा भात हवा असेल तर तांदूळ धुवून अर्धा तास पातळ पंचावर पसरून ठेवा, आणि मग शिजवताना बासमती किंवा तत्सम तांदुळांना एक वाटी तांदूळ असतील तर एक वाटी पाणी हे प्रमाण योग्य ठरते.

उदय के'सागर's picture

26 Aug 2014 - 10:54 am | उदय के'सागर

धन्यवाद पैसातै!

मग शिजवताना बासमती किंवा तत्सम तांदुळांना एक वाटी तांदूळ असतील तर एक वाटी पाणी हे प्रमाण योग्य ठरते.

बाकी हे एक वाटी तांदळासाठी एक वाटी पाणी घालून कूकर मधेच शिजवायचं का? नाही म्हणजे कुकर मधे अती-शिजेल अशी शंका वाटली, पण कदाचित बेतास पाणी असल्याने तुम्ही म्हणता त्याप्रमाणे भात फडफडीत होईल खरा. धन्यावाद, करून बघतो हा प्रयोग, सोप्पी आणि झटपट पद्धत वाटते आहे (शिवाय कुकर मधे शिजवायचं म्हणजे मॉनिटर करायची पण गरज नाही).

पैसा's picture

26 Aug 2014 - 11:14 am | पैसा

प्रेशर कूकर हा भात-डाळ शिजवायचा सर्वात कमी व्यापाचा आणि कमी वेळ खाणारा प्रकार आहे. प्रेशर कूकर वापरताना मी एक शिटी येईपर्यंत मोठा गॅस ठेवते, मग शिटी झाल्यावर गॅस बारीक करून २/३ मिनिटे ठेवते. अगदीच उकडे तांदूळ असतील तर जरा जास्त वेळ ठेवावे लागते. हॉकिन्सच्या पुस्तिकेत लिहिलेली पद्धत.

उदय के'सागर's picture

26 Aug 2014 - 11:21 am | उदय के'सागर

अच्छा, पुन्हा एकदा धन्यवाद!

दिपक.कुवेत's picture

26 Aug 2014 - 12:14 pm | दिपक.कुवेत

मी फडफडित भातासाठि मात्र तुम्हि दिलेलीच पद्धत वापरतो. निदान माझ्या कुकरचा मला तरी अंदाज येत नाहि. त्यापेक्षा बाहेर उकळताना तो मॉनीटर करणं सोपं वाटतं. कधी कधी भाताच्या क्वॉलीटिवर पण अवलंबुन असतं. ईथे आम्हि जो तांदुळ घेतो तो रेशनचा असतो. तो अगदि एक १५-२० मिम जरी भीजत ठेवला तरी पुरतो आणि भात फडफडित होतो ह्या उलट मी भारतात गेलो आणि अगदि बासमती अर्धा-पाउण तास जरी भीजत ठेवला तरी भात म्हणावा तसा फुलत नाहि. ईथला तांदुळ तर उकळताना मी तेल/तुप सुद्धा काहि घालत नाहि. मात्र भात चाळणीत काढला कि ताटात पसरुन मात्र ठेवतो. शेवट काय तर करा, खा आणि खायचा आनंद लुटा!

आयुर्हित's picture

26 Aug 2014 - 12:32 pm | आयुर्हित

१)फडफडित भात हवा असेल तर तांदूळ घ्यावा. धुतल्यानंतर ३०मिनिटे भिजवून फक्त वाफेत शिजवावा. त्यासाठी वेगळा विजेवर चालणारा स्टीम कुकर मिळतो.

२)रोजच्या वापरासाठी स्टीम कोलम नावाने(पुण्यात)मिळणारा सर्वात जास्त फुलणारा तांदूळ घ्यावा. एक वाटी तांदुळासाठी २ वाटी पाणी लागतेच व भात खुप फुलतो व मुख्य म्हणजे कुकर मध्येहि फडफडित होतो.
मी मात्र १ चमचा साजूक तुप घालतो शिजतांना!

प्रत्येक बासमती तांदूळाचा दर्जा वेगवेगळा असतो. कांही चवीला चांगले असतात पण शिते मध्यम लांबीची असतात. कांहींची शिते चांगली लांब असतात पण चव जरा कमी असते.
फडफडीत भात शिजविण्यासाठी तांदूळ २ ते ३ वेळा धुवून घेतल्यावर २० ते ३० मिनिटे भरपूर पाण्यात भिजत ठेवायचे. नंतर रोळीत काढून १० मिनिटे निथळवायचे. पातेल्यात थोडे साजूक तुप तापवून (हवे असल्यास थोडे मिरे, लवंग आणि तमालपत्र फोडणीस घालायचे, नको असल्यास फोडणी शिवाय) त्यात तांदूळ घालून हलक्या हाताने परतून घ्यायचे. जेव्हढ्यास तेव्हढे (एक वाटी तांदूळास एक वाटी) पाणी घालून अगदी मंद आंचेवर (गव्हाच्या दाण्या एव्हढ्या बारीक आंचेवर) घट्ट झाकण ठेवून, वर वजन ठेवायचे (मी खलबत्यातला खल ठेवतो) १५-२० मिनिटांनी झाकण काढून भात हलक्या हाताने (शितं न मोडता) वरखाली करून पुन्हा झाकण आणि वजन ठेवायचे. भाताची शिते अतिशय लांब होऊन भात अगदी मोकळा होतो. पाणी फेकावे लागत नाही, ह्याला बैठा भात असेही म्हणतात.

उदय के'सागर's picture

26 Aug 2014 - 1:18 pm | उदय के'सागर

धन्यवाद दिपक, आणि बरोबर आहे तांदळाच्या प्रकारावर पण खूप अवंलबून असतं. इव्हन बासमती मधे पण प्रत्येक कंपनी (दावत्/कोहीनूर इ.) प्रमाणे थोडं फार प्रमाण /अंदाज बदलतात.
आयुर्हित - मी सुरती कोलम बद्दल ऐकले आहे आणि वापरला ही आहे एकदा. अतिशय मऊ आणि हलका भात होतो. तसा महाग ही असतो हा. पण स्टीम कोलम बद्दल कधी ऐकलं किंवा कधी पाहिला नाही. एकदा जरुर वापरून पाहीन - धन्यवाद.
@पेठकर काका - धन्यवाद. तांदूळ थोडे परतल्यामूळे मोकळा भात होत असावा. छान युक्ती आहे ही, नक्की करून पाहीन. बाकी पैसातै सुद्धा जेवढ्यास तेवढं पाणी वापरण्याचा सल्ला देतात - त्यामुळे तेच खरं अचुक नी फडफडीत भाताचं मुळ असावं :)
सर्वांचे मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद!

आत्ताच करून बघितला. सर्वांना आवडला.
धन्यवाद

दिपक.कुवेत's picture

26 Aug 2014 - 12:33 pm | दिपक.कुवेत

करा, खा, खीलवा आणि आनंद घ्या.

मस्त आवडता प्रकार.पण नेमक्या चवीचा जमत न्हवता.आता या पद्धतीने करून पहाते.

मस्त!! पावभाजी फारशी आवडत नाही - पण हा पुलाव आवडतो अजूनही! छान, छान रेसिपी देऊन राहिले दिपक भाऊ इथे! ;-)

मधुरा देशपांडे's picture

27 Aug 2014 - 2:19 am | मधुरा देशपांडे

झक्कास. फोटो पण मस्तच.

मस्त तवा पुलाव आजच केला.

बहुगुणी's picture

28 Aug 2014 - 12:09 am | बहुगुणी

(चक्क मलादेखील) जमला! :-) धन्यवाद, कुवेती दिपकराव!

दिपक.कुवेत's picture

29 Aug 2014 - 5:12 pm | दिपक.कुवेत

तुम्हाला जमायलच हवा....तुमच्या नावातच बहु गुण आहेत :D

मदनबाण's picture

30 Aug 2014 - 7:40 am | मदनबाण

मेरिकु मांगताच ये पुलाव ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टिम टिम टिंबाली... {बाप्पाचे कोळी गीत}

मदनबाण's picture

14 Nov 2015 - 9:16 pm | मदनबाण

दिपकराव कुवेतवाले.... आज मी घरात ३र्‍यांदा हा पुलाव बनवला, आणि मी सुद्धा मस्त पुलाव बनवु शकतो हा विश्वास दॄढ झाला. :)
काही दिवसांपूर्वी माझ्या बायडीने संध्याकाळी काय करु असे विचारले असता, अस्मादिकांनी पुलाव अशी घोषणा करुन मोकळे झाले... नंतर अचानक स्वतःच पुलाव करण्याचे मनावर घेतले ! मग काय मिपा आहेच मदतीस... :) बरेच प्रकार पाहिल्यावर आमची नजर या धाग्यावर स्थिर झाली आणि पुलाव बनवण्याच्या माझ्या प्रयत्नाला सुरुवात झाली... पहिला पुलाव जरास तिखट झाला पण चविष्ठ झाला होता,नंतरचा मस्त आणि आजचा द ब्येस्ट झाला ! :)
बायकांना स्वयंपाक करुन कंटाळा येतो आणि मग कधी असे दुसर्‍याच्या हातचे चविष्ठ खायला मिळाले की त्यांना बरे वाटते... असे माझ्या बायडीने पुलाव चाखल्यावर आणि समाधान झाल्यावर गुपचुप कानात सांगितले ! :) माझ्या पिल्लाने तर पुलावाचे ताट चाटले... बास्स्स... और क्या चाहिये ? :)
इतकी मस्त पाकॄ दिल्या बद्धल आभार... आणि त्यासाठीच हा धागा वर आणला.
धन्यवाद... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira Syahira

उदय के'सागर's picture

31 Aug 2014 - 12:39 am | उदय के'सागर

आज तवा पुलाव करुन पाहिला, फारच उत्तम झाला होता. घरी सगळ्यांना आवडलाच आणि काहींंना तर बाहेरून पार्सल आणला एवढा छान वाटला :) धन्यवाद दिपकजी रेसीपी शेअर केल्याबद्दल. भाताचा अजून एक प्रकार मी शिकलो ह्याचा अत्यानंद होतोय ;)
पेठकर काका आणि पैसातै, मोकळा भात होण्यासाठी तुम्ही दिलेली टिप - जेवढ्यास तेवढे पाणी अगदी मस्त फायद्याची ठरली. एवढा मोकळा भात कधीच माझ्याकडुन झाला नव्हता तो आज झाला तुमच्या अमुल्य एका टिप मुळे - खुप खुप खुप धन्यवाद तुमचे :)

मी केलेल्या तवा-पुलावाचा फोटू :

दिपक.कुवेत's picture

31 Aug 2014 - 11:00 am | दिपक.कुवेत

टेम्टिंग आलाय आणि पुलावाचा कलर तर अगदि गाडिवर मिळतो अगदि डिट्टो तसाच आलाय.

आदूबाळ's picture

31 Aug 2014 - 6:11 pm | आदूबाळ

दिपकभाव, बहुत आभार.

आजच करून पाहिला. जमला.

मोकळा भात असल्याने मूद पडली नाही.

किसन शिंदे's picture

31 Aug 2014 - 7:06 pm | किसन शिंदे

आयला झक्कास झालाय रे तवा पुलाव.! :)

दिपकभौ,धन्यवाद्स!!मस्त झाला होता पुलाव.सर्वांना फार आवडला!!
.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Sep 2014 - 12:17 pm | अत्रुप्त आत्मा

आता...मी पण तवा...घ्यावाच म्हणतो हातात..! ;)

दिपक.कुवेत's picture

1 Sep 2014 - 12:58 pm | दिपक.कुवेत

तवा आपसुकच येईल :D

प्रभाकर पेठकर's picture

1 Sep 2014 - 1:03 pm | प्रभाकर पेठकर

हे: हे: हे: 'तवा पुलाव' फार फार महागात पडेल हो अतृप्त आत्मा साहेब.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Sep 2014 - 5:42 pm | अत्रुप्त आत्मा

@तवा आपसुकच येईल >>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif
दिपक शेठ..तुमच्या तिकडे बघा ना कुणी हिंदू-पुरोहिताशी लगीन करायला-तयार आहे का ते!? :D
मग तवाच काय? तिकडची कुक्री =)) पण येइल सगळी..इकडे!!! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif

प्रचेतस's picture

3 Sep 2014 - 5:44 pm | प्रचेतस

तुमच्या तिकडे बघा ना कुणी हिंदू-पुरोहिताशी लगीन करायला-तयार आहे का ते!?

पण तुम्ही स्वतःला सेक्क्युलर पुरोहित म्हणवता ना?

अत्रुप्त आत्मा's picture

3 Sep 2014 - 5:50 pm | अत्रुप्त आत्मा

असोच्च्च! :-/

प्रचेतस's picture

3 Sep 2014 - 5:53 pm | प्रचेतस

=))

अत्रुप्त आत्मा's picture

4 Sep 2014 - 12:00 am | अत्रुप्त आत्मा

वल्ली - Wed, 03/09/2014 - 18:23

=)) >>> :-/ हलकट छळू हत्ती!http://www.easyfreesmileys.com/smileys/free-fighting-smileys-546.gif

नको रे बाबा....सगळं जमवुन सुद्धा "अत्रुप्तच" राहिलात तर??? फुक्कट माझ्या मान्गुटिस बसाल :D

दिपक.कुवेत's picture

1 Sep 2014 - 1:10 pm | दिपक.कुवेत

होउ द्या (एकदाच) खर्च....तवा होईल घरचं (कायमचं :)