माझे साईपदयात्रेचे अनुभव - १ - http://misalpav.com/node/28447
माझे साईपदयात्रेचे अनुभव - २ - http://misalpav.com/node/28457
माझे साईपदयात्रेचे अनुभव - ३ - http://misalpav.com/node/28464
माझे साईपदयात्रेचे अनुभव - ४ - http://misalpav.com/node/28482
माझे साईपदयात्रेचे अनुभव - ५
आजचा ७ वा दिवस , १ एप्रिल २००९ . सकाळी १.०० च्या दरम्यान मंडळाचे सभासदांनी सर्वांना हाका मारुन उठवले.
नेहमीप्रमाणे सर्व आटपुन तयार झालो. आज पुर्ण अंग व पाय खुप दुखत होते. साधारण रात्री २.१५ ला चालायला सुरुवात केली आणी अचानक लक्षात आले की डाव्या पायाच्या अँकलची शीर खुप दुखत आहे. ५ व्या आणी ६ व्या दिवशीचे जास्त अंतर चालल्याने शीर खुप ठणकत होती. घाट उतरताना झटके बसुन बसुन कमरेची शीरही दुखत होती. पायाची मुरगळल्यासारखी अवस्था झाल्याने लंगडत लंगडत चालु लागले. जोडीदारांनी अँकल सपोर्ट बेल्ट लावला पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. मी थांबुन बेल्ट काढायला लावला. मला पुन्हा गाडीत बसायचंय का असं विचारण्यात आलं , मी नकारच दिला, उद्या तर शिर्डी पोहोचु, इतका पल्ला गाठला आता नाही बसणार. ह्ळु हळु चालायला लागले पण पाय टेकवेना, शेवटी एका बाजुने राउतचा भाउ अमोल व दुसर्या बाजुने राउतचे मामा ह्यांचे नाव श्रीकांत मामा ह्यानी असे दोघांनी मिळुन २ गमछाने मला सपोर्ट दिला. चालणे असह्य झाले होते. मरणप्राय वेदना सुरु झाल्या. बराच वेळ चाललो तरी खुप कमी अंतर कापले जात होते. काय करावे सुचत नव्हते. अजुन २२ ते २५ की,मी. अंतर पार करायचे होते. पदयात्रा सुरु करण्यापुर्वी एक महीना अगोदर घरच्यांबरोबर गाडीने शिर्डीला आले होते. परत येताना पदयात्री दिसत होते. एका पदयात्रीला दोघांनी सपोर्ट दिला होता आणि त्याची अवस्था अतिशय वाईट होती हे पाहुन माझे भाउजी म्हणाले होते कि आपल्या कविताला असेच आणावे लागेल असे वाटते आणि तसेच झाले. माझी अवस्था ही दयनीयच झाली होती.
खुप वेळ चालुन चालुन पाय आणखी ठणकु लागला. ईतके दिवस पुरेशी झोप नसल्याने डोळे ही जड झाले होते. खुप मागे पडलो. चालता चालता सारखे कीती वाजले असे विचारत होते , बरेच अंतर झाल्यावर ४ वाजल्याचे समजले , जोडीदार म्हणत होते आज काही सकाळचा आराम मिळणार नाही, आरामाचा थांबा बराच लांब होता , ते मला म्हणत होते कि पटापट पाउले उचल आरामाच्या थांब्यापर्यंत म्हणजे आराम करता येईल. मी शक्यतो प्रयत्न करत होते पण काही केल्या लवकर चालवेना. ते मला म्हणत होते देवाचे नाव घे, मी साईबाबांना हाका मारत होते. आजुबाजुला का़ळाकुट्ट अंधार होता. काय करावे समजत नव्हते कारण अंधारात कुठेही आरामासाठी थांबणे रीस्की होते. कसेबसे ४.४५ ला आरामाच्या थांब्यावर पोहोचलो. मी लगेचच जागा पाहुन पडले. १५ मिनिटात सर्व उठुन निघाले, आम्हीही उठलो. आता अजुन पाय दुखत होता. २ सपोर्टवर कशी बशी चालु लागले. ५ ची आरती सुरु झाली. मी साईबाबांचे नाव घेउ लागले. आता मात्र अवसान गळु लागले होते. हुंदके द्यायला सुरुवात झाली. आजचा दिवस परीक्षेचा होता. साईबाबांची आरती मनातल्या मनात बोलायला सुरुवात केली पण कुठले कडवे आपण आता म्हंटले आहे हेही विसरुन जात होते. थोडया वेळाने मी साईबाबांना मनातच सांगितले "बस आता यातुन सुटका करा, आता मरण आले तरी चालेल". अक्षरशः आज काही ह्यातुन वाचत नाही असेच वाटत होते आणी मरणाची वाट पाहत होते कारण मेले तर ह्या वेदनापासुन सुटका होईल त्यामुळे साईबाबांपुढे "देवा आता सुटका करा" असा धावा करु लागले पण काहीच फरक नाही. आता मात्र जोरजोरात हुंदके येउ लागले, जोडीदार बिचारे माझ्याकडे हळुच पाहत चालत होते त्यांनाही माझी ही अवस्था पाहुन खुप दया येत होती. थोडयावेळाने मी बाबांना मनातल्या मनात म्हणु लागले की आता तुम्हीच या आणि माझा हात पकडुन मला घेउन चला , आता काही सहन होत नाही. बराच वेळ असं बोलत होते. आम्ही खुप मागे पडलो होतो.
७ वाजताच्या दरम्यान एके ठीकाणी आलो येथे शिर्डी संस्थानने पदयात्रीच्या आरामासाठी मंडपाची सोय केली आहे. आमचे पदयात्रीही इथे थांबले होते पण आम्ही पोहोचेपर्यंत त्यांची निघण्याची वेळ झाली होती. माझ्या जोडीदारांनी मंडळाच्या अध्यक्षांना सांगितले की हि खुप थकलीये आणी हिला नीट झोप सुद्धा मिळाली नाहीये हिला आरामाची खुप गरज आहे तर तुम्ही निघा आम्ही हिला घेउन येतो. तिथे मिळालेली छोटी वेफर्सची पाकीटे हातात देउन मंडळी पुढे निघाली. माझ्याबरोबर आता राउतचा भाउ अमोल, श्रीकांत मामा, निलेश आणि दिपक भाउ थांबले होते. दिपक भाउ पालघर्ला कुठल्यातरी कंपनीमधे झाडाला पाणी शिंपण्याचं काम करतात, दरवर्षी इतक्या उन्हातही शॉप फ्लोअरवर काम करताना घालण्याचे जाड सेफ्टी शुज घालुन पदयात्रा करतात. पदयात्रेत पडेल ते काम करतात मंडळ त्यांना थोडे फार पैसे देतं. थोडावेळ आराम करुन वेफर्स खाउन निघालो, उजेड झाल्याने उन जाणवु लागलं होतं , झोप मिळाल्याने थोडी हुशारी आली होती पण दुखणं कमी झालं नव्हतं, गमछाचा आधार होता. येणारे जाणारे माझ्याकडे दयेने पाहत होते. थोडया थोड्या वेळाने बसत होते. बसले तरी पायातले सॉक्स आणि अँकल सपोर्ट काढायला वाकायचेही त्राण नव्हते. थांबल्यावर अमोल माझ्या पायातले सॉक्स आणि अँकल सपोर्ट काढायचा आणी निघताना घालुनही द्यायचा. खुप मागे राहील्याने आमच्या मंडळाचा नाश्ता ही आम्हाला मिळाला नाही , खुप भुक लागली होती साईबाबांना म्हंटले बाबा भुक लागलीये काही तरी करा, थोडा वेळ चाललो तिथे दुसरे पदयात्री मंडळ नाश्ता देत होते वास्तविक प्रत्येक पदयात्री मंडळ आपापल्या पदयात्रींसाठी नाश्ता पुरवतं पण कुठल्याही पदयात्रीला खाणं पीणं नाकारत नाही. ते रोडवरच टेंम्पोत बसुन त्यांच्या पदयात्रीना नाश्ता देत होते आणि वडापाव असल्याने सगळे हातात घेउन खात खात पुढे जात होते. आम्हीही गेलो आम्हालाही वडापाव मिळाला. आता पाण्याची पंचाईत होती तेव्हा आतासारखे कुणी मोटरसाईकलवर पाणी वाटप करत नव्हते. एके ठीकाणी बसलो. बाजुलाव ५-६ पदयात्री नाश्ता करत बसले होते. स्वतःच चालत निघाले होते , जोडिला २ कार्स होत्या सामान ठेवण्यासाठी. आम्ही उठलो आणी मी दिपक भाऊंना रस्ता क्रॉस करुन समोरच्या दुकानातुन मिनरल वॉटर घेउन यायला सांगितले, त्या पदयात्रींना ऐकु आले आणि त्यांनी लगेच त्यांच्या कडच्या बिसलरीच्या २ बाटल्या मला दिल्या. तेवढ्यात दिपक भाउंनी देखील बाटल्या आणल्या. पाणी पिउन चारही बाटल्या दिपक भाउंनी बॅगेत भरल्या व चालु लागलो. आता त्यामानाने थोडं बरं वाटत होतं . सपोर्टर्स थोड्या थोड्या वेळाने माझ्या पायांना आराम मिळावा म्हणुन मधे मधे मला एकटीला चालायला लावत होते कारण त्यांनी सपोर्ट दिला की मला फास्ट चालावे लागे. हळु हळु करत चालत होतो, उन्हाचा त्रास होत होता. आता मध्ये मध्ये दुसरे पदयात्री मंडळही जोडीने चालत होतं . मध्येच ३ मुले आमच्या पुढे पूढे चालायचे मध्येच पुढे निघुन जायचे किंवा मागे राहायचे. हे तीघेजण खुप हसत खेळत चालले होते. मला तिघांचा ही चेहरा एकदाही दिसला नाही पण जो मधला मुलगा होता तो मागुन जितक्या वेळा दिसला तितक्या वेळा म्हणत होता की "साईबाबा येतील पण ओळखलं पाहीजे", मला ऐकुन शंका यायला लागली की कदाचित आज मला साईबाबा दर्शन देतील. पण मधे मधे वाटु लागलं की ते माझ्यासाठी इथे येतील इतकी माझी कुवत नाही ती पाहु पुढे काय होतं.
पुढे उन्हाचा त्रास खुप होउ लागला आणि चालणंही अवघड झाले. आता दोन्ही गमछा सपोर्टवर चालत होते. थोड्या थोड्या वेळाने बसत होते. वावी साधारण १.५ ते २ की.मी. राहील असेल , सकाळचे ९.५० झाले होते. रोडलगतच एक छोटंसं बंद पडीक हॉटेल होतं तिथे आजुबाजुला कडप्पा लावलेले होते, बसायची सोय असल्याने थांबायचे ठरवले आणि वळलो. तिथे दोन माणसबसली होती, एका माणसाने पांढरी बनियान, पांढरी पँट , डोक्याला साईबाबांसारखा पांढरा रुमाल गुंडाळला होता तो चिलीम ओढत होता. साईबाबा चिलीम ओढायचे हे मला माहीत होते व त्यांच्या ओरीजीनल फोटोमधे त्यांच्या बाजुला चिलीम ठेवल्या असल्याने त्यामाणसाच्या हातात चिलिम आहे हे मी ओळखले. माझे जोडीदार त्या माणसाशी गप्पा मारु लागले. अमोलने त्याला विचारले कि हे तुम्ही काय पित आहात तर मीच उत्तर दिले हि चिलिम आहे त्यावर तो माणुस म्हणाला हो ही चिलीमच आहे आणि ही फक्तं शिर्डीतच मिळते, ह्याचा एक झुरका जरी घेतला तरीही माणुस उलट पायी प्रवास करु शकतो. मला राहुन राहुन वाटत होते की हे साईबाबाच असावेत पण मी कुणालाही काही बोलंले नाही. चिलमीचा धुर अगदी माझ्या पर्यंत पोहोचत होता. आता निघायचं म्हणुन उठ्लो आणी रोडवर एका पदयात्री मंडळाचा थ्री व्हीलर आला त्यात साईबाबांचा ओरीजीनल फोटो आला आणी मी दोन्ही सपोर्ट सोडुन त्या थ्री व्हींलर मागे फास्ट चालु लागले. डोळयातुन अश्रुंच्या धारा वाहत होत्या. साई ढोल ताशा हे गाणं थ्री व्हीलर मधे लावलेलं "पायी हळुहळु चाला मुखाने साईनाथ बोला..." आणि मी अतिशय ईमोशनल झाले होते. त्या भावना मी व्यक्तच करु शकत नाही. माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता, साईबाबा माझ्यासाठी आले होते, अगदी साईबाबा मला स्वत़ हाताने धरुन नेत आहेत असे वाटत होते, आणी मी बराच वेळ ईतकी फास्ट चालत होते, ढसा ढसा रडत होते , मागे वळुन पाहीले तर माझे जोडीदार माझ्याहुन अर्धा ते पाउण की. मी. मागे होते , रस्ता सरळ असल्याने आम्ही एकमेकांना पाहु शकत होतो, ते मला पुढे जा असं खुणावत होते मी पुन्हा वळले आणी साईबाबांच्या समोर हात जोडुन चालु लागले, डोळ्यातुन अश्रुधारा चालुच होत्या. मन शांत होत होते , आजही केव्हाही हा क्षण आठवला की खुप रडते, आताही हा प्रसंग लिहिताना डोळ्यात पाणी येतंय . जे त्या पडीक हॉटेलजवळ भेटले होते ते साईबाबाच होते याची खात्री पटली. जव़ळ जवळ १.५० ते २.०० कीमी अशीच चालत गेले. वावीला शिर्डी संस्थानचा पदयात्रींच्या आरामासाठी २ रा मंडप आहे तिथे जाउन हे थ्री व्हीलर थांबलं , रडतच साईबाबांसमोर डोकं टेकवलं आणि मंडपात प्रवेश केला. इथे बरेच पदयात्री मंडळ प्रवास करतात, इथे संस्थान ने मोफत चहा - नाश्ता आणि डॉक्टर्स ची सुविधा ठेवली आहे . मी नाश्ता घेतला तोपर्यंत जोडीदार आले. मला निलेश म्हणाला की तु जात असताना आम्हाला साईबाबांचा फोटो जिवंत असल्याचाच भास होत होता, त्या फोटोत एक वगळंच तेज जाणवत होतं आता काहीही झाले तरी या पुढे शेवट पर्यंत मी तुझ्याबरोबरच चालणार. आणी आज ही त्याने माझी साथ सोडलेली नाही दर वारीला तो माझ्या बरोबरच असतो मी कीतीही मागे पडले आणि कीतीही त्रास झाला तरीही तो मला केव्हाच एकटं सोडत नाही. नंतर कळले की तो माझा लांबचा नातेवाईकच आहे. नाश्ता करुन आम्ही जमलेल्या पदयात्री मंडळाच्या पालख्या पाहु लागलो. काही मंडळांनी पालखी बरोबर छान आरास केली होती, एक पालखि तर चांदीची बनवलेली होती जवळपास सर्व पालख्या मुंबई, कल्याण , डोंबीवली, नवी मुंबई ह्या भागातल्या होत्या. बाजुलाच अॅक्युपंक्चर , अॅक्युप्रेशर पद्धतीने मसाज करणे चालु होते. मला माझ्या जोडीदारांनी आधीच आधीच सांगितले होते की मसाज करुन घेउन नकोस अजुन अंग दुखेल म्हणुन मसाज कसा करतात हे पाहायला गेलो, तिथे एक माणुस ज्याला मसाज करुन घ्यायचा होता तो उताणा झोपला होता आणी जो मसाज करणार होता त्याने डायरेक्ट त्या माणसांच्या पोटर्यंवर उडीच मारली , मी घाबरुन जोरात ओरडले 'अय्या..." आणी सगळे मला पाहुन हसायला लागले तशी मी ही हसायला लागले, खुप मज्जा आली.
पुन्हा निघालो. बरंचसं बरं वाटत होतं पण पाय मात्र दुखत होते. उन खुपच चढलं होतं , ह्या रस्त्यावर आराम करायला सावलीचं एक झाड सुद्धा नाही सगळीकडे बाभळीची झाडे, आता मात्र चालायला त्रास होत होता. उन्हातच थांबुन थाबुन चालत होते. आणी मंडळी मला सांगत होती की आता १० मिनीटांवर आलंय आणी मी त्यांना सांगत होते की तुम्ही खोटं फसवता नेहमी असंच म्हणता , ते म्हणाले अगं असं सांगितलं नाही तर जो नवीन पदयात्री येतो त्याचं कसं होईल अजुन खुप चालायचंय असं सांगितलं तर त्याचा धीरच सुटेल. अजुन ७-८ की,मी. अंतर पार करायचं होतं. कसंतरी १.३० - २.०० च्या दरम्यान दुपारच्या जेवणाच्या थांब्याला पोहोचलो. मला अतिशय त्रास होत होता, तापासारखं जाणवत होतं. सर्वजण जेवुन आंघोळ करुन आराम करत होते. आज सर्वांच्या घरुन बरीच मंडळी एस.टी. ने या थांब्यावर पोहोचली होती कारण उद्या शिर्डीला पोहोचणार होतो. एक घर होते त्यात बायका बसल्या होत्या, मी जेवुन त्या घरात गेले, मी जवळच बसलेल्या एका मुलीच्या हातात आयोडेक्सची बाटली दिली आणी तिला सांगितलं की प्लीज माझ्या पायाला आयोडेक्स चोळुन दे मला खुप त्रास होतोय मी झोपले. ती मुलगी माझ्या पायाला आयोडेक्स चोळु लागली आणी तिला जाणवले की मला भरपुर ताप भरलाय तीने लगेचच तिच्या भावाला जयचंद्रला बोलावले जो मंडळाचा उपाध्यक्ष होता. बरीच मंडळी आत आली. जयचंद्रने लगेचच बर्फ आणला आणी माझा पाय वाकडा करुन माझ्या तळपायावर त्याने बर्फाचा तुकडा ठेवला पण मी रीस्पॉन्स देत नव्हते , मला जाणवत होते की माझ्या बाजुला बायका आणी सभासद जमलेत , उपाय करतायत पण मी डोळे सुद्दा उघडु शकत नव्हते. जयचंद्र म्हणत होता की ताप भरपुर भरलाय म्हणुन बर्फाचा तुकडा ईतका वेळ तळपायवर ठेवुन सुद्धा हिला काहीच जाणवत नाहीये. त्यांनी बायकांना माझ्याकडे लक्ष ठेवायला सांगितले आणी थोडा वेळ वाट पाहु नाहीतर हिला डॉक्टरकडे नेउ असे ठरवले.
दोनेक तासांनी माझा ताप उतरला आणि मी उठुन बसले, सगळे येउन माझ्या तब्येतीची चौकशी करु लागले. बर्फाचा शेक दिल्याने पाय दुखायचे थांबले होते. बाजुच्या घरात जाउन आंघोळ केली , आता खुपंच बरे वाटु लागले. माझ्या घरुन कुणीच आले नव्हते. संध्याकाळी फक्त पाचच की.मी. चालायचे असल्याने अध्यक्षांनी सांगितले आराम करा. ५ वाजता निघायचे आहे. ५ वाजता चालायला सुरुवात केली. जास्त अंतर चालायचे नसल्याने आरामात हळुहळु विदाउट सपोर्ट चालत होते. आता शिर्डी अवघ्या २० की,मी अंतरावर होती. ७ वाजेपर्यंत रात्रीच्या थांब्यावर पोहोचलो. जेवणं झाली, झोपलो.
प्रतिक्रिया
14 Aug 2014 - 4:57 pm | प्यारे१
असं कसं विटेकर साब? मग वाद कसा घालणार आम्ही? ;)
14 Aug 2014 - 7:06 pm | तिमा
एका दमात पांचही भाग वाचून काढले. पांचव्या भागापर्यंत येईपर्यंत डोळे खूप दुखायला लागले होते. पण त्याची पर्वा न करता, वाचन नेटाने चालू ठेवले. चिलीम ओढणार्या बाबांचा उल्लेख आल्याबरोबर, डोळ्यांतून झरझर अश्रु वाहू लागले. ते इतके की वाचणे कठिण झाले. पण साईकृपेने, स्क्रीनच्या मध्यभागी साईंची मूर्ति आशीर्वाद देताना दिसली. म्हणून वाचन चालूच ठेवले. म्हटलं, डोळ्यांच्या खाचा झाल्या तरे चालेल, आता अगदी अंतिम भागापर्यंत वाचन थांबवायचे नाही.
एक हृदयस्पर्शी अनुभव दिल्याबद्दल कविताताईंचे आभार!
14 Aug 2014 - 7:10 pm | प्यारे१
तिमा तिमा असं नाही करायचं. असं करुन कसं 'चालेल' बरं?
14 Aug 2014 - 7:27 pm | कविता१९७८
धन्यवाद पण सर्व प्रतिसाद वाचुनच हा प्रतिसाद दिलायस ना, म्हणजे पुढच्या प्रतिसादांना तोंड द्यायला तयार आहेस ना.
14 Aug 2014 - 7:55 pm | कवितानागेश
"तिमा" काका आहेत! =))
15 Aug 2014 - 11:16 am | स्पंदना
:))
हो! त्यांना मिश्या आहेत. :))
14 Aug 2014 - 7:52 pm | कविता१९७८
तिमा, अंतिम भाग अजुन बाकि आहे.
14 Aug 2014 - 7:58 pm | कविता१९७८
सॉरी तिमाकाका
15 Aug 2014 - 11:15 am | स्पंदना
हे राम!
:))
14 Aug 2014 - 8:38 pm | हाडक्या
कवि लेखिका उत्तम कसोटीपटू आहेत असे निरिक्षण नोंदवतो. कुठला चेंडू खेळायचा, कुठला तटवायचा, कुठे कट मारायचा आणि कधी षटकार ह्याचे टायमिंग अफलातून आहे हो. जरा सराव करा मिपा गाजवाल तुम्ही..
(पुरातन मिपा-निरिक्षक)
14 Aug 2014 - 8:58 pm | कंजूस
महायोगी ,साधुसंत एकदा का तिथून गेले की नंतर उरतो बाजार असे मला वाटते .
पदयात्रा कशी होते या वर्णनाबद्दल कविताताई अनेकानेक धन्यवाद .मागे एकदा नर्मदापरिक्रमाचे पंचेचाळीस भाग मन लावून वाचले होते .ते साठवून ठेवले आहेत .आपण केलेले प्रयत्न त्यातल्या यशापयशासह सर्वांसमोर मांडणाऱ्या लोकांबद्दल आदर वाटतो .ते अनुभव कोणत्याही क्षेत्रातील असोत त्याची नोंद होते हे फारच स्तुत्य आहे .
14 Aug 2014 - 10:20 pm | कविता१९७८
माझी नर्मदा परिक्रमा करायची ईच्छा आहे, जमलं तर नक्की करेन आणि ते ही अनुभव ईथे मांडेन.
15 Aug 2014 - 11:14 am | धन्या
हे खरं आहे. पाठीमागे जे राहतात ते त्या महात्म्याच्या योग्यतेचे नसतात. त्यांची ईच्छा प्रामाणिक असेलही मात्र त्या महात्म्याची शिकवण आचरणात आणण्यापेक्षा, ती शिकवण समाजापर्यंत पोहचवण्यापेक्षा त्या महात्म्याच्या दैवतीकरणाकडे सारे लक्ष असते. यात मग त्या महात्म्याचे चरीत्र लिहिले जाते. त्यात परीकथेला लाजवतील अशा सुरस कथा टाकल्या जातात. यात्रा भरते, उत्सव होतो. पैसा येऊ लागतो. पैसा आला की हौशे, नवशे आणि गवशे सारेच वाहत्या गंगेत हात धुवून घेऊ लागतात.
15 Aug 2014 - 11:31 am | कविता१९७८
सहमत
15 Aug 2014 - 12:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
पाठीमागे जे राहतात ते त्या महात्म्याच्या योग्यतेचे नसतात. त्यांची ईच्छा प्रामाणिक असेलही मात्र त्या महात्म्याची शिकवण आचरणात आणण्यापेक्षा, ती शिकवण समाजापर्यंत पोहचवण्यापेक्षा त्या महात्म्याच्या दैवतीकरणाकडे सारे लक्ष असते. यात मग त्या महात्म्याचे चरीत्र लिहिले जाते. त्यात परीकथेला लाजवतील अशा सुरस कथा टाकल्या जातात. यात्रा भरते, उत्सव होतो. पैसा येऊ लागतो. पैसा आला की हौशे, नवशे आणि गवशे सारेच वाहत्या गंगेत हात धुवून घेऊ लागतात.
हेच ते चलाख आस्तिक !
15 Aug 2014 - 2:02 pm | प्रभाकर पेठकर
>>>> पैसा येऊ लागतो. पैसा आला की हौशे, नवशे आणि गवशे सारेच वाहत्या गंगेत हात धुवून घेऊ लागतात.
हे सर्व, चर्मचक्षु आणि मनःचक्षुंनी सुद्धा न दिसणारे, आणि म्हणून अंधश्रद्ध भक्त(?), स्वतःच्या पराकोटीच्या भक्तीची वर्णने करून इतरेजनांना स्तिमित करीत आणि स्वतःचा 'अहं' कुरुवाळत असतात. त्यांना कोण काय म्हणतंय, इतरांचे काय विचार आहेत ह्या बद्दल चर्चा आणि स्वतःचे मतपारिवर्तन नको असते. त्यांच्या दृष्टीने तशी आवश्यकताही नसते. अशी माणसे, टिकाकारांना 'नास्तिक', 'खोडसाळ', 'आध्यात्माचा वाराही न लागलेले' अशी लेबलं लावून नाकारणे, वरपांगी 'सहमती' दर्शवून धोरणी वृत्तीचा आभास निर्माण करणे ह्याच कोशात राहणे पसंत करतात.
पैशांसाठी ह्या गंगेत उतरलेल्यांनाही, त्यांचे दुकान चालू राहावे म्हणून, अशा भक्त(?) गणांची आवश्यकता असते त्यामुळे तेही अशा भक्ता(?)च्या पाठीशी उभे राहतात. लालबागच्या गणपतीपासून सिद्धीविनायक आणि दगडूशेठ गणपतीसकट अनेक सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्री उत्सव, दहिहंडी अशा अनेक देव, सण, उत्सव ह्यांचा स्वार्थी लोकांनी 'इव्हेंट' केलेला आहे आणि तथाकथित भक्त(?) त्याला कळत-नकळत खतपाणी घालीत आहेत. ज्या उद्देशाने लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला होता त्याची आता गरजच नाहीए. उलट समाजात एकी व्हावी/राहावी ह्या उद्देशाला केंव्हाच हरताळ फासला गेला आहे, हे नाक्यानाक्यावर होणार्या मारामार्या, दोन राजकिय पक्षातील वैर, बलात्कार, खून, दरोडा आणि असहाय्य पोलीस यंत्रणा ह्यातून सतत जाणवत राहतं.
दहिहंडी जी पूर्वीच्या काळी लहान प्रमाणात साजरी केली जायची त्यातला गोडवा जाऊन सत्तेचा आणि अर्थकारणाचा प्रभाव वाढला आहे. मुळात दहिहंडी हा कृष्णभक्तीचा खेळ म्हणून पाहिला जातो. मग तुम्ही कृष्णाप्रमाणे दहिहंडी खेळा नं. पूर्वीच्या काळी मांजरांपासून सुरक्षित म्हणून दही, दूध, लोणी हे शिंकाळ्यात ठेवून जमीनीपासून ६-७ फूट(च) उंच असायचे. अशावेळी आपल्या २-४(च) सवंगड्यांसमवेत कृष्ण ते दही, दूध, लोणी पळवून खायचा. तुम्ही तुमची भक्ती दाखवायला तसे करा. कृष्णाने दहिहंडीचे ९-९, १०-१० थर लावले नव्हते, दहिहंडीला नोटांची पुडकी तर कधीच बांधली नव्हती. पण आपल्याला दिसतं काय? कोणाची डोकी फुटताहेत, कोणी जन्माचे लंगडे, अधू जीवन जगताहेत आणि राजकारणी उंच उंच दहिहंड्यांचे समर्थन करीत आहेत. कोर्ट, 'हिंदूच्या सणांवर, पारंपारीक चालीरितींवर घाला घालीत आहे' असे गळे काढीत आहेत. कारण त्यांचं दुकान त्यावरच चालू आहे, ते तसेच सुखनैव चालू राहावे. दहिहंडीच्या वरच्या थरांवर (किंवा तळाच्या थरातही) ह्या राजकारण्यांची मुले नसतात. इतरांची मुले असतात. मग मरेनात का ती, ही वृत्ती आहे. कृष्ण्भक्ती पेक्षा 'आमच्या एरियातली दहिहंडी किती उंच आणि किती लाखांची आहे' ह्याचीच शेखी मिरवली जाते. त्यालाच भक्ती(?) मानले जाते. महाराष्ट्रात पाण्याचे दुर्भिक्ष असताना आसारामबापू भक्त गणांवर पाण्याचे फवारे उडवून मूर्ख आणि मनाने दूर्बल भक्तजनांना(?) आपला अनुग्रह वाटण्यात सार्थक मानतात. आज आसारामबापू तुरुंगाची हवा खात आहेत. अजून तरी त्यांच्या भक्तगणाचे(?) डोळे उघडले असतील का? मला नाही वाटत. त्यांनी कोणी दुसरा 'बापू' शोधला असेल, त्याच्या मागे धावत असतील. मेंढ्या तशाच राहिल्या फक्त मेंढपाळ बदलला.
देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी
देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई
देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे
देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी
देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी
देव मूर्तीत ना मावे, तीथर्क्षेत्रात ना गावे
देव आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे
तुझ्या माझ्या जड देही देव भरुनिया राही
'झाला महार पंढरीनाथ' चित्रपटासाठी लिहिलेल्या ह्या गीतातील बावनकशी सोन्याच्या शब्दांना कोणी आचरणात आणू इच्छित नाही ही सुशिक्षित समाजाची दारूण हार आहे.
विठ्ठलवारी असो नाहीतर साईपदयात्रा असो. ही कर्मकांडं आहेत. खर्या भक्तीसाठी ह्याची गरज नसते. सिद्धीविनायकाला रस्त्याने लोळत जाण्याचीही गरज नसते. मनाचे सामर्थ्य वाढविण्याचेही योग, प्राणायाम, ध्यानधारणा असे अनेक साधे, सोपे आणि वैयक्तिक मार्ग आहेत. अजून राजकारण्यांचे इथे लक्ष गेलेले नाही नाहीतर विठ्ठलवारी, साईपदयात्रेचाही इव्हेंट होऊन लाखो-करोडो जनसमुदायाच्या सहभागाने ८ दिवस महामार्ग वगैरे वाहतुकीसाठी बंद ठेवून पदयात्रा काढल्या तर आश्चर्य वाटायला नको. असो.
हे सर्व विवेचन लेखिकेला उद्देशून नसून समाजातील उथळ आणि अंधश्रद्ध भक्तांना आणि अशा भक्तांचा गैरफायदा घेऊन स्वतःचे उखळ पांढरे करून घेणार्या सर्वांनाच उद्देशून आहे.
15 Aug 2014 - 2:13 pm | संजय क्षीरसागर
शेवट अत्यंत भारी केलायं!
आता कविताजी तुमच्याशी `सहमती दर्शवून'.... पुढचा भाग लिहायला मोकळ्या.
15 Aug 2014 - 2:27 pm | शिद
पेठकर काका... _/\_
नेमके मनातले विचार मांडले आहेत. मस्तच.
15 Aug 2014 - 2:33 pm | हाडक्या
+१ पेठकर काका.. अतिशय उत्तम प्रतिसाद..
तुमच्या मतांशी क्वचितच असहमत व्हायची वेळ येते.. :)
15 Aug 2014 - 11:02 pm | कविता१९७८
अतिशय सुंदर विवेचन
15 Aug 2014 - 11:07 pm | संजय क्षीरसागर
"आता कविताजी तुमच्याशी `सहमती दर्शवून'.... पुढचा भाग लिहायला मोकळ्या."
14 Aug 2014 - 9:28 pm | संजय क्षीरसागर
>कोणत्याही कारणाने का होईना, पण इतके अंतर चालणे हे सामान्य माणसाच्या रोजच्या जिंदगीतून हद्दपार झालं आहे कोणाचं ध्येय साईबाबा असेल किंवा कोणाचं आणखी काही. त्याविषयी बोलण्यात काही अर्थ नाही.
पदयात्रेतला `साई' हा शब्द काढून टाकला की धागा व्यर्थ होतो. आणि मग लेखिका चालायला राजी होईल का विचारा..... विषय संपला.
_________________________________
ते नको असेल तर `पदयात्रा' हा शब्द काढून `माझे साईचे अनुभव' असं शीर्षक करा. सगळा भ्रमिष्टपणा उघड होईल. आणि धाग्याची वाट लागेल.
________________________________
निव्वळ फिटनेससाठी असली जीवघेणी पदयात्रा कुणीही करणार नाही. आणि पदयात्रेनं साई भेटेल ही आशा व्यर्थ आहे कारण साईबाबा ही स्मृती आहे, व्यक्ती नाही.
________________________________
त्यात काही सदस्य `आपले आध्यात्मिक अनुभव चारचौघात सांगू नयेत वगैरे सल्ले देतायंत. ही तर सगळ्यांची दिशाभूल करणारी विचारसरणी आहे. अशानं चुकीच्या प्रथा पिढ्यानपिढ्या चालू राहतात आणि व्यक्ती नवनवीन भ्रमात सापडत जाते. इथे चर्चा घडली त्यातनं किमान सारासार विचार तरी जागृत होण्याची शक्यता निर्माण होते.
15 Aug 2014 - 10:59 am | कवितानागेश
राक्षसराज!!!!!!
15 Aug 2014 - 11:19 am | संजय क्षीरसागर
स्वतःच्याच राज्याचा असा उपमर्द!
15 Aug 2014 - 10:55 pm | कवितानागेश
यडा बनके पेडा खानेका! =))