मिसळपाव डॉट कॉमचा सदस्य झाल्यापासून खाद्यसंस्कृतीबद्दल मला जास्तच आस्था वाटायला लागली आहे. त्यावर निर्माण होत असलेल्या अनमोल साहित्यात आपणही अल्पशी भर घालावी असे वाटल्यामुळे हा लेख लिहिला आहे. वेळ वाचवण्यासाठी 'गागरमें सागर' म्हणतात ना तसे पांचशे पंचावन्न पदार्थ एका पोटळीत बांधून सादर करायचे ठरवले आहे.
साहित्य:१)पावरोटीची लादी किंवा ठोकळा किंवा स्लाइस्ड ब्रेड (पांढरी किंवा तपकिरी रंगाची). बनपाव, फ्रूट ब्रेड, मिल्क ब्रेड, डोनट आदी गोड प्रकार 'पावाची पाचशे पंचावन्न पक्वान्ने' या प्रस्तावित लेखासाठी राखून ठेवले आहेत.एकंदर पर्याय: ४२) स्निस्ग्ध पदार्थ : लोणी, साय, पाश्चराइज्ड बटर, पीनट बटर, चीज स्प्रेड, चीज वगैरेपैकी एक वा दोनएकंदर पर्याय :६३) भाज्या: काकडी, गाजर, मुळा, बीटरूट, कांदा, बटाटा, टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना, भोपळी मिरची इत्यादी एकंदर पर्याय: १०५) चटण्या: ओले किंवा सुके खोबरे, शेंगदाणे, तीळ, कारळे, लसूण, भोपळ्याची साल, दोडक्याच्या शिरा इत्यादीपासून तयार केलेल्याएकंदर पर्याय: ८ चे वर६)अवांतर: टोमॅटो सॉस किंवा केचप, हॉट अँड स्वीट, स्वीट अँड सॉवर, चिली गार्लिक इत्यादी बाटलीतली पातळ किंवा दाट द्रव्ये, चवीला तिखट, मीठ, निरपूड, साखरएकंदर पर्याय: ५ पेक्षा अधिक
कृती:पावाला आडवा छेद देऊन त्याचे काप करावेत. आधीच कापून मिळालेल्या स्लाइस्ड ब्रेडच्या कडा, पाठ व पोट वाटल्यास कापून बाजूला ठेवावेत. त्यांचा चुरा करून त्यापासून इतर स्वादिष्ट पदार्थ बनवता येतील. पावरोटीच्या लादीचे पाठपोट कापू नयेत. नाहीतर "तेलही गेलं, तूपही गेलं आणि धुपाटणे हांती आलं" अशी अवस्था होईल.
कापाच्या एका अंगाला आपल्याला हवा असेल आणि उपलब्ध असेल त्या स्निग्ध पदार्थाचा बोथट सुरीने लेप लावावा. चीजच्या लाट्या घेतल्या किंवा ते किसून घेतले तर पसरवण्यास सोपे जाईल. लेपाच्या थराची जाडी आपल्या आवडीच्या सम प्रमाणात आणि कोलेस्टेरॉलबद्दल मनात वाटत असलेल्या भीतीच्या व्यस्त प्रमाणात ठेवावी.
भाज्यांचे पातळ काप करावेत किंवा त्या बारीक चिरून किंवा किसून घ्याव्यात. कोबी, गाजर व बीटरूट वाटल्यास वाफेवर किंचित नरम करून घ्यावेत. मंद आंचेवर तेलात परतून घेतल्यास त्यांना, विशेषतः कांद्याला, अधिक चव येते. बटाटा आधी उकडून घेऊन नंतर सोलून त्याचे काप करावेत. उलट क्रमाने केल्यास वेळ आणि जिन्नस या दोन्हीचा अपव्यय होईल.
स्निग्ध पदार्थाचा लेप दिलेल्या बाजूवर हव्या त्या चटणीचा पातळसा थर द्यावा किंवा पाहिजे ती पेस्ट पसरावी. त्यावर हव्या तेवढ्या भाज्यांचे काप, कीस किंवा चुरा पसरावा. थराची जाडी आपल्या आवडीच्या सम प्रमाणात आणि कोलेस्टेरॉलबद्दल वाटत असलेल्या भीतीच्याही सम प्रमाणातच ठेवावी. त्यावर चवीनुसार तिखट, मीठ, मिरपूड, साखर वगैरे बारीक चिमटीने शिंपडावी. शिंपडण्यासाठी खास छिद्रयुक्त झाकणे असलेल्या छोट्याबाटल्यासुद्धा मिळतात. त्यांचा उपयोग करता येईल. पावाचा दुसरा काप त्यावर ठेवून चारी बाजूंनी एकदम हलकेसे दाबावे.
हा पदार्थ वाटल्यास थंड गार खावा, वाटल्यास तव्यावर किंवा घडीच्या टोस्टरमध्ये भाजून घ्यावा. पॉपअप टोस्टरमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करू नये. वाटल्यास पहिल्या पायरीनंतर लगेच पावाचे काप त्यात वेगळे भाजून घ्यावेत आणि त्यानंतरच्या कृती कराव्यात.
ही सगळेच सॅँडविचेस आहेत असे कोणी म्हणेल, पण प्रत्येकाची रुची वेगळी आहे हे ध्यानात घ्यावे. वर दिलेल्या साहित्याच्या यादीतील प्रत्येक वस्तूला अनेक पर्याय आहेत, तसेच कृतीमधील प्रत्येक पायरीवर कांही पर्याय आहेत. यांच्या परम्यूटेशन्स आणि कॉंबिनेशन्स करून एकंदर किती प्रकारचे पदार्थ बनू शकतील त्याचे गणीत मांडण्याचे 'फॅक्टोरियल'युक्त फॉर्म्यूले मराठी भाषेत मला लिहिता येणार नाहीत. पण संख्याशास्त्राच्या प्राथमिक नियमाप्रमाणे सर्व पर्यायांचा साधा गुणाकार करून येणारी संख्या (४x६x१०x८x५xअनेक) देखील पाचशे पंचावनपेक्षा अनेकपटीने मोठी होईल. त्यातील आपल्या आवडीप्रमाणे हव्या त्या पाचशेपंचावन्न कृतींची निवड करावी. साहित्याची उपलब्धता, वैयक्तिक आवड निवड वगैरेंचा विचार करून काटछाट केली तरी पाचशे पंचावन्न वेगवेगळ्या चवी असलेले पदार्थ त्यातून बनू शकतीलच. मांसाहार वर्ज्य नसल्यास उकडलेले किंवा तळलेले अंडे, शिजवलेला खिमा, माशाचे किंवा चिकनचे शिजवलेले, भाजलेले किंवा तळलेले हाडविरहीत बारीक तुकडे भाजीच्या ऐवजी त्यात घालता येतील. तेही कमी पडले तर वडा पाव, उसळ पाव, मिसळ पाव, पावभाजी, बर्गर वगैरेंचे अनेक प्रकार खाऊन घ्यावेत. त्यांच्या रेसिपींसाठी मिसळपाववरील लेख आणि चर्चा आहेतच. हे सगळे प्रकार स्वतःच करून पहावेत असा माझा मुळीच आग्रह नाही. जिथे कुठे ते चांगले मिळत असतील तिथे जाऊन खाण्यास कांहीच हरकत नसावी. तरीसुद्धा आणखी पदार्थ हवे असल्यास 'पावाची पाचशे पंचावन्न पक्वान्ने' मिळण्याची वाट पहावी.
प्रतिक्रिया
25 Feb 2008 - 11:06 pm | प्राजु
तुम्ही गंमत म्हणून या ५५५ रेसिपिज् करून पाहिल्यात कि काय?
बाकी आपले गणित विषयातील ज्ञान चांगले आहे बरं का.. :) ह. घ्या.
- (सर्वव्यापी)प्राजु
26 Feb 2008 - 1:26 am | स्वाती राजेश
एवढ्या ट्राय करायला जवळ्जवळ दिड ते दोन वर्ष पुरेल..... पण छान आहे, असे वर दिले त्याप्रमाणे एक कोष्टक तयार करून किचन मध्ये लावावे म्हणजे ऐनवेळी घरात काय आहे काय नाही याचा अंदाज येऊन सँडविचकरता येते.
26 Feb 2008 - 1:50 am | ब्रिटिश टिंग्या
हे ब्येस झालं.....आता दर्रोज येकेक पदार्थ ट्राय करीन.....बाकी '५५५' म्हंजे आमच्यासारख्या सडाफटिंग लोकांसाठी संजीवनीच की हो......
आपला,(सदा'फुकिंग') छोटी टिंगी ;)
10 Jul 2014 - 10:59 pm | भृशुंडी
हीच ती सब-वे ची सुरुवात.
नाहीतर पहिले पाढे ५५५