===================================================================
मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९(समाप्त)...
===================================================================
...केवळ वेळेचे बंधन पाळायला हवे म्हणून जड पावलांनी गाडीच्या दिशेने निघणे भाग पडले.
गाडी रस्त्याला लागली आणि बालीच्या नयनरम्य निसर्गातून आमचा प्रवास सुरू झाला. आजच्या सहलीत अनेक छोटे मोठे रोचक थांबे होते. शिवाय प्रवासातल्या अनेक निनावी जागाही इतक्या सुंदर होत्या की डोळ्यांना आणि कॅमेर्याला मेजवानीच होती. इथे कार्तिकचा नेहमीचा अनुभव कामाला आला असणार, कारण आम्ही काही म्हणण्याच्या आधी "पाहिजे तेथे फोटो काढायला खुशाल गाडी थांबवायला सांगा" असे त्यानेच सांगून टाकले !
किंतामणी
अगुंग पर्वताच्या उत्तरपूर्वेला असलेल्या बातूर पर्वतावर बालीतील दुसरा महत्त्वाचा जिवंत ज्वालामुखी आहे. हल्लीच्या काळात म्हणजे १८०४ आणि १९६८ सालीही या ज्वालामुखीतून लाव्हाचा उद्रेक झाला होता. त्याच्या २३ ते २८ हजार वर्षांपूर्वी झालेल्या उद्रेकाने बनलेल्या प्रचंड विवरात १० X १३ किलोमीटर आकाराचे बातूर तळे आणि त्या तळ्याकाठी वसलेली प्राचीन पार्श्वभूमी असलेली अनेक गावे आहेत. हा किंतामणी नावाचा भाग त्याचा "स्फोटक" इतिहास, अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि प्राचीन संस्कृती यामुळे बालीतील एक महत्त्वाचे पर्यटक आकर्षण बनले आहे. येथील पर्वतराजीत अनेक सुंदर पर्वतारोहण (ट्रेक) करण्याचे मार्ग आहेत. त्यातले काही तर अगदी बातूर पर्वतशिखरावरील ज्वालामुखीच्या मुखापर्यंत घेऊन जातात. इ स २०१२ मध्ये UNESCO ने या प्रभागाला Global Geopark Network मध्ये स्थान दिले आहे.
अनेक आकर्षणे व अपुरा वेळा यामुळे या भागाचा मध्ये मध्ये फोटोथांबे घेत चारचाकीनेच धावता दौरा केला...
या रस्त्यावरून पुढच्या थांब्याकडे जाताना अनेक पारंपरिक बालीनीज घरे दिसत होती...
.
.
बातूर पर्वत आणि बातूर तळे
.
बातूर पर्वताच्या उतारावर आणि बातूर तळ्याच्या काठी वसलेल्या गावांचे विहंगम दृश्य
.
पुरा तिर्ता एंपुल
तंपाक सिरिंग गावाजवळचे हे मंदिर इ स ९६२ मध्ये वर्मदेव राजघराण्यातील राजा इंद्रजयसिंह याने स्थापन केले एका मोठ्या झर्याच्या ठिकाणी बांधले. एका दंतकथेप्रमाणे मयदानव नावाच्या असुराने देवांच्या सेनेवर विषप्रयोग केला आणि इंद्राने त्या सैनिकांना या झर्याची निर्मिती करून त्याच्या पवित्र पाण्याने परत जिवंत केले. त्यामुळे लोक या पवित्र तीर्थावर डुबकी घेऊन पुण्य कमावायला आणि रोगमुक्तीसाठी येतात. मंदिराच्या आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या शिलालेखांप्रमाणे या जागेचे नाव वेगवेगळ्या काळांत "तिर्ता री ऐर हांपुल", "तिर्ता हांपुल" व "तिर्ता एंपुल" असे बदलत गेले आहे. त्यातल्या पहिल्या नावाचा अर्थ "जमिनीतून बाहेर येणारे पाणी" असा आहे.
मंदिराच्या आवारात शिरल्या शिरल्या खुद्द देवांचा राजा इंद्र आपले स्वागत करतो...
...
इथले दुभंगव्दार इंद्राच्या नावाला शोभेल असे भव्य आणि कोरीवकामाने भरलेले आहे. त्याच्या मागे दिसणारा मंदिराचा हिरवागार परिसर मन प्रसन्न करतो...
आत शिरल्या शिरल्या एका बाजूने बालीनीज ढबीत हिंदी गाणी ऐकू आली. त्या बाजूला पाहिले तर एक बाली महिला गात होती. आश्चर्याने थांबून ऐकू लागलो तर तिने धडाधड आठ-दहा गाण्यांचे मुखडे म्हणून दाखवले. हे सगळे केवळ भारतीय लोक (आम्ही) दिसल्याने गमतीने चालले होते. आमचा फोटो काढा असे म्हणून खरंच फोटो काढताना मात्र बाईसाहेबांनी चेहरा झाकून घेतला...
हिंदी चित्रपट आणि गाणी बालीत खूप लोकप्रिय आहेत याचे प्रत्यय पुढेही येत राहिले.
.
देवळाच्या आवारात शिव, विष्णू, ब्रम्हा, बातूर पर्वत आणि इंद्राची देवळे आहेत. भाविकांना आराम करण्यासाठी एक मोठा सुंदर सजावट केलेला मंडप आहे...
मंडप
.
पुरा तिर्ता एंपुलचे कोरी अगुंग
.
...
पुरा तिर्ता एंपुलमधिल अजून दोन कलापूर्ण व्दारे
.
इथले सर्वात महत्त्वाचे आकर्षण आहे इथले कोई माश्यांनी भरलेले कुंड आणि त्यात झर्याचे पवित्र पाणी सोडणार्या (आपल्याकडे गोमुखे असतात तशा) बारा झरण्या. भाविक प्रथम देवळात जाऊन पूजा करतात आणि मग कुंडात उतरून स्नान आणि प्रार्थना करतात. इथले पाणी (गंगाजलासारखे) बाटल्यांत भरून घरी नेण्याचीही प्रथा आहे...
पवित्र कुंड
देवळाचा संपूर्ण परिसर वृक्षराजीने व वाहत्या पाण्याच्या झर्यांनी समृद्ध आणि मन प्रसन्न करणारा आहे...
.
.
देवळाचा परिसर अनेक सुंदर दगडी, लाकडी कलाकृतींनी आणि नयनरम्य रंगरंगोटीने भरलेला आहे. त्यातले काही नमुने आपण पाहूया...
...
.
.
.
.
.
काय बघू आणि काय नको असे होते. कॅमेर्याला ह्या मंदिरात जराशीही फुरसत मिळत नाही. इतक्या सुंदर कलाकृती असलेल्या मंदिरात संरक्षक नाहीत असे कसे होईल ? त्यातले हे दोन नमुने...
...
.
येथील परिसराला निसर्गाने भरभरून सौंदर्य बहाल केले आहे. त्यामुळे या मंदिरातली मानवी कलाकुसर बघणे हा जितका आनंददायी अनुभव आहे तितकाच आनंद आपली नजर मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरातील निसर्गावर गेल्यावर होतो. या देवळाशेजारी १९५४ मध्ये इंडोनेशियाच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षाने (सुकार्नो) आपली सुटी व्यतीत करण्यासाठी एक प्रशस्त बंगला बांधलेला आहे...
बंगल्याचे दोन टेकड्यांवरील दोन भाग जोडण्यासाठी एक खाजगी पूल आहे !...
आजकाल हा बंगला देशाच्या खास पाहुण्यांच्या पर्यटनासाठी वापरला जातो.
.
हे होते बालीतील अजून एक ठिकाण, जिथून पाय निघणे कठीण होत होते. नाईलाजाने आमचा पुढचा प्रवास सुरू करावा लागला. निसर्गरम्य परिसरातून आमचा रस्ता कधी छोट्या गावातून जात होता...
तर कधी केवळ काही शाकारलेली घरे आणि भाताची खाचरे असलेल्या ग्रामीण भागातून जात होता...
.
(क्रमशः )
===================================================================
मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९(समाप्त)...
===================================================================
प्रतिक्रिया
24 Jun 2014 - 1:41 am | आयुर्हित
बारिक कलाकुसर असलेले मूर्तीकाम खरोखरच अद्भुत आणि मनमोहक आहे.
सुंदर, निसर्गरम्य फोटो आणि लेख!
24 Jun 2014 - 7:00 am | यशोधरा
वा!
24 Jun 2014 - 7:16 am | अजया
अप्रतिम !
24 Jun 2014 - 9:24 am | प्रचेतस
खूपच हिरवंगार आहे बाली.
पुरा तिर्ता एंपुल मंदिराच्या आवारातील इन्द्राचा पुतळा अलीकडचा आहे का तोही तितकाच प्राचीन आहे?
24 Jun 2014 - 1:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
त्या पुतळ्याचे वय माहित नाही. पण तो प्राचीन नक्की नाही.
24 Jun 2014 - 3:17 pm | प्रचेतस
हम्म.
तसं वाटलंच होतं एकंदरीत ठेवणीवरून.
24 Jun 2014 - 10:29 am | स्पा
सहीच
24 Jun 2014 - 11:00 am | प्रमोद देर्देकर
सही बाली दर्शन.
तुमचे नाव चतुर असायला हवे होते. तुम्ही भारताबाहेर फिरता कधी, भारतात येवुन कटट्याला हजेरी लावता कधी. सगळं लाजवाब आहे.
24 Jun 2014 - 11:47 am | बॅटमॅन
बाली एकदम हिरवेकंच आहे. कोकण+दक्षिण भारत असे काहीसे वर्णन करेन. डोळे निवताहेत.
24 Jun 2014 - 1:05 pm | दिपक.कुवेत
परीसर बघुन किती निवांत वाटतय तर प्रत्यक्षात तुमची काय हालत झाली असेल त्याचा अंदाज येतोय.
24 Jun 2014 - 1:20 pm | एस
नेहमीप्रमाणेच. अजून काय लिहायचं आता हे कळत नाही. :-)
24 Jun 2014 - 1:59 pm | डॉ सुहास म्हात्रे
आयुर्हित, यशोधरा, अजया, स्पा, प्रमोद देर्देकर, बॅटमॅन, दिपक.कुवेत आणि स्वॅप्स : अनेक धन्यवाद !
24 Jun 2014 - 2:13 pm | मुक्त विहारि
पु भा प्र.
24 Jun 2014 - 2:14 pm | शिद
मस्त मनमोहक फोटो.
प्रश्नः बालीला कायम म्हणजे १२ महिने असा हिरवेगारपणा असतो का कि आपल्यासारखे फक्त पावसाळ्यात वैगरे?
24 Jun 2014 - 6:27 pm | एस
मला वाटतं तिकडं पावसाळाच बारा महिने असतो विषुववृत्तीय हवामानामुळे.
24 Jun 2014 - 11:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
सहमत ! ऑक्टोबर-एप्रिल पावसाळा आणि मे-सप्टेंबर उन्हाळा असला तरी पावसाच्या सरी केव्हाही येऊ शकतात. त्यामुळे सगळे बेट वर्षभर हिरवेगार असते.
24 Jun 2014 - 2:36 pm | आदिजोशी
एक्का काकांमुळे कैक सहलींचे पुण्य पदरात पडले आहे. ईबुकं काढाच आता एकेकाची.
24 Jun 2014 - 2:44 pm | बॅटमॅन
डिट्टो हेच म्हणतो.
सरजी, ईबुकं काढाच.
24 Jun 2014 - 2:54 pm | शिद
+१११...अनुमोदन.
24 Jun 2014 - 3:10 pm | सूड
सहीच!! पुभाप्र.
24 Jun 2014 - 3:48 pm | रेवती
वाह! नजर जाईल तिकडे मानवनिर्मित आणि निसर्गसौंदर्य!
24 Jun 2014 - 11:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
मुक्त विहारि, शिद, स्वॅप्स, आदिजोशी, बॅटमॅन, शिद, सूड आणि रेवती : अनेक धन्यवाद !
25 Jun 2014 - 7:18 am | मदनबाण
स्वर्गीय अनुभव ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Apollo 440 - Charlie's Angels
25 Jun 2014 - 3:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
25 Jun 2014 - 8:24 am | चौकटराजा
यातील फोटो कळस. एकूणच तेथील प्रवेशद्वारे अगदी अनोख्या शैलीची वाटतात.
25 Jun 2014 - 3:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
ही व्दारे बालीची खासियत आहे. व्दारे कशी असावित, प्रत्येक प्रकारावर कोणती नक्षी असावी / असू नये आणि प्रत्येक प्रकार कोणत्या ठिकाणाचे प्रवेशव्दार असावे याचे एक शास्त्रच आहे तेथे !
25 Jun 2014 - 4:07 pm | माधुरी विनायक
डोळे निवले... तृप्त झाले. देखणी शिल्पं, त्यांच्या वरताण निसर्ग, पुन्हा त्याहून कुशल कलाकुसर. काय बघु आणि काय नको, असं झालं. देखणी सफर घडवल्याबद्दल धन्यवाद.
3 Jul 2014 - 7:46 pm | राजेंद्र मेहेंदळे
+१ असेच म्हणतो
25 Jun 2014 - 4:11 pm | पिंगू
निव्वळ अप्रतिम...
25 Jun 2014 - 11:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
माधुरी विनायक आणि पिंगू : अनेक धन्यवाद !
26 Jun 2014 - 1:56 pm | इशा१२३
मस्तच..फोटो अप्रतिम
28 Jun 2014 - 11:43 am | पैसा
खासच!
28 Jun 2014 - 10:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
इशा१२३ आणि पैसा : धन्यवाद !