===================================================================
मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... (समाप्त)
===================================================================
...बाली थिएटरमध्ये असलेल्या भव्य मंचावर "बाली अगुंग" नावाचे महानाट्य सादर केले जाते. त्याची माहिती आपण पुढच्या भागात घेऊ...
बाली सफारी पार्कची खरी मजा घ्यायची तर पार्कमधील हॉटेलमध्ये दोनतीन दिवस राहून रात्रीची सफारी आणि बाली थिएटरमधील कार्यक्रमासह सगळी आकर्षणे पाहायला हवीत. पण आमच्या रूपरेखेत ते बसण्यासारखे नव्हते. शिवाय हा पार्क आणि त्यातल्या बाली थिएटरचा तर आमच्या भारतीय सहल कंपनीला पत्ताच नव्हता ! ऐन वेळेला आमच्या प्रवासाच्या रूपरेखेत या गोष्टी सामावून घेण्याच्या आमच्या इच्छेला पुरी करण्याचे श्रेय आमच्या मार्गदर्शकाला, कार्तिकला, जाते.
महानाट्य बाली अगुंग
"बाली अगुंग" या नाट्यामध्ये बालीचा इतिहास व दंतकथा यावर बेतलेल्या नाटकसंहितेचे नृत्य, संगीत, बालीच्या कठपुतळी बाहुल्या, चित्ताकर्षक वेशभूषा आणि जागतिक दर्जाचे नेपथ्य व प्रकाशयोजना वापरून अवर्णनीय सादरीकरण केले जाते.
स्वागतकक्ष
१२०० प्रेक्षकांना बसण्याची आरामदायी सोय असलेल्या या रंगमंदिराचा स्वागतकक्ष आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून त्याचा उपयोग छोटेमोठे स्वागतसमारंभ करण्यास तसेच नाटकांच्या अगोदर आणि मध्यांतरात प्रेक्षकांना धक्काबुक्की न करता आरामात पेयपान-अल्पोपाहाराचा आस्वाद घेता येईल इतका मोठा आहे. त्याला लागून असलेली बाग मनोहर आहे असे बालीत सांगणे म्हणजे व्दिरुक्तीच होईल...
......
स्वागतकक्ष : ०१ व ०२ (जालावरून साभार)
.
......
स्वागतकक्ष : ०३ व ०४ (जालावरून साभार)
.
स्वागतकक्षातला ड्रॅगन
रंगमंच
येथील रंगमंच ८० मीटर लांब, ४० मीटर रुंद आहे. याच्या उंचीबद्दल खात्रीलायक माहिती मिळाली नाही पण माझ्या अंदाजाप्रमाणे ती १५-२० मीटर किंवा जास्त असावी....
विशाल रंगमंच (जालावरून साभार)
रंगमंचावर वेगवेगळे आश्चर्यकारक देखावे निर्माण करण्यासाठी असलेल्या अनेक साधनांत ५०० किलोपर्यंतच्या वजनाच्या हालत्या-सरकत्या देखाव्यांतील वस्तू चपळाईने हालवण्यासाठी अनेक कायमस्वरूपाच्या यांत्रिक व्यवस्था, धुके-धूर तयार करणारी यंत्रे, वेगवेगळ्या ७५ दिव्यांची यंत्रणा, सायक्लोरामा, बॅकड्रॉप फ्रेम्स, उत्कृष्ट ध्वनीयंत्रणा, इ चा त्यात समावेश आहे. जमीन दुभंगून अचानक वर येणार्या व्यक्ती-वस्तूंच्यासाठी रंगमंचाच्या तळात तीन खास छुपे दरवाजे आहेत.
खास उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे रंगमंचासमोर पूर्ण लांबीचा आणि ४-५ मीटर रुंदीचा पाण्याने भरलेला खंदक आहे. त्याचा उपयोग काही प्रवेशांत गावाच्या नदीतीरावरचे प्रसंग व खर्याखुर्या नौकांसह नौकाविहाराचे प्रसंग रंगविण्यास केला जातो.
कलाकार
येथे होणार्या बाली अगुंग नावाच्या महानाट्याचा प्रयोगात १५० मानवी कलाकार, बालीच्या पारंपरिक कळसुत्री बाहुल्यांचे कलाकार, हत्ती आणि इतर प्राणी काम करतात.
कथा
लोकप्रिय राजा श्री जयपंगुस (११७९-११८१) आणि त्याची कांग चिंग वी ही चिनी वंशाची राणी यांची प्रेमकथा बालीचे महाकाव्य समजले जाते. ही मूळ कथावस्तू बालीच्या निसर्गाच्या, संस्कृतीच्या, सामान्य जनजीवनाच्या आणि नेत्रदीपक राजेशाही झगमगाटाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या कलात्मक रितीने सादर केली जाते. अनेक भव्य, चित्ताकर्षक आणि स्वप्नवत प्रवेशांनी हे नाटक प्रेक्षकांना खिळवून ठेवते आणि अनेकदा आश्चर्याने आ वासायला लावते.
बाली प्राचीन काळापासून त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहे. तसेच ते जलव्यापाराचे महत्वाचे केंद्रही होते.
बालीचा राजा श्री जयपंगुस बालीला भेट देणार्या एका चिनी व्यापार्याच्या कांग चिंग वी नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. नाटकातला चिनी जहाजाचा बालीच्या बंदरात प्रवेश आणि राजेशाही लग्नसमारंभ आपल्याला त्या काळाचे खरे दर्शन देऊन जातात. राजा राणीसाठी खास नगरी उभारतो आणि तेथे राजधानी हलवतो. मात्र त्यांच्या सुखी प्रेमकथेला गालबोट लागते. अनेक वर्षे जाऊनही राज्याला वारस मिळत नाही. निराश झालेला राजा मोठ्या जलपर्यटनास बाहेर पडतो. त्याचे जहाज प्रचंड वादळात सापडते आणि तो विचित्र प्राण्यांनी भरलेल्या एका अनोळखी जादुई बेटावर जाऊन पडतो. तेथे तो मन:शांतीसाठी तपस्या करू लागतो. जलदेवता दानूच्या आगमनाने त्याची तपश्चर्या भंग होते. देवी दानूच्या प्रेमात पडून राजा तिच्याशी लग्न करतो आणि तेथेच राहू लागतो. त्यांना एक मुलगा होतो.
अनेक वर्षे वाट पाहून राणी (कांग चिंग वी) राजाच्या शोधाला बाहेर पडते. तिला राजा आणि दानू त्यांच्या मुलासह सापडतात. राणी रागावून तिच्या सैनिकांना त्यांच्यावर हल्ला करायला सांगते... त्यांत अनेक विचित्र प्राणी आणि नैसर्गिक आपत्ती त्यांचे योगदान मिळून युद्ध अधिकच भिषण होते. राजाच्या पूर्वायुष्याचे सर्व सत्य पुढे आल्याने रागावून आपली दैवी ताकद वापरून देवी दानू राजा आणि राणीचे दगडी पुतळ्यांत रूपांतर करते. मात्र त्यानंतर तिचा राग शांत झाल्यावर बालीच्या लोकांची विनंती मान्य करून ती राजपुत्राला गादीवर बसवून राज्यकारभार सुरू करते.
अशी ही काहिशी ऐतिहासिक आणि काहिशी दंतकथा असलेली पण बालीच्या सामाजिक-धार्मिक-सांकृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली कहाणी आहे. राजा-राणीचे आत्मे "बारोंग लादुंग" नावाच्या सिंहासारख्या दिसणार्या पवित्र दैवी प्राण्याच्या रूपात आजही बालीचे रक्षण करत असल्याची बालीच्या लोकांना खात्री आहे. राजा, राणी आणि देवी दानू हे बालीत आजही वरिष्ठ देवतांपैकी मानले जातात. बालीमध्ये दरवर्षी (२१० दिवसातून एकदा) बारोंग लादुंगची मिरवणूक काढली जाते. देवी दानू बातूर सरोवराची जलदेवता आणि सुपीकतेची व धनधान्याची देवता मानली जाते.
रंगमंदिरात फोटो काढायला मनाई आहे. परंतू या महानाट्याच्या जालावरून साभार जमा केलेल्यांपैकी काही फोटो येथे दिल्याशिवाय राहवत नाही. त्यांच्यावरून ह्या नाट्याची पूर्ण कल्पना येणार नाही. पण त्याचे शब्दात वर्णन करणे कसे शक्य नाही याची थोडीशी कल्पना जरूर येईल.
कलाकारांचे पोशाख
कलाकारांचे पोशाख
.
......
राजा, त्याच्या उजवीकडे राणी वी आणि डावीकडे देवी दानू.....................राजा आणि राणी
.
जलदेवता दानू
नाटकातील क्षणचित्रे
राजाचा दरबार
.
चिनी व्यापारी आणि त्याच्या मुलीचे आगमन
.
राजा त्याच्या प्रेयसीचे स्वागत करताना... दोन खर्या हत्तींच्या सलामीसह
.
विवाहानंतरचा राजदरबार
.
समुद्रप्रवासात आलेल्या वादळात विचित्र जलचरांशी सामना करणारा राजा
.
अनोळखी बेटावरील विचित्र प्राण्यांशी सामना करणारा राजा
.
देवी दानूचे आगमन : ०१
.
देवी दानूचे आगमन : ०२
.
देवी दानू, राजपुत्र, पांढर्या कपड्यातले राजाराणीचे आत्मे आणि जनता... नवीन राज्यकारभाराची सुरुवात... पार्श्वभूमीवर पवित्र बातूर पर्वत
.
या महानाट्याचा सोहळा पाहणे हा एक अवर्णनीय अनुभव असतो. बालीला जाऊन तो न अनुभवणे कल्पनेपलीकडचे आहे.
.
इतर काही थोडेसे... इकडचे तिकडचे
बालीच्या शिल्पकलेचे अजून काही नमुने
......
दोन खास संरक्षक असुर
.
......
राम .......................................................कुंभकर्ण
.
बाली अजून काही गोष्टींकरिता जगप्रसिद्ध आहे. अपुर्या वेळेमुळे त्या सर्व बघणे शक्य नव्हते अथवा त्या बघण्यासाठीची वेळ जुळून आली नाही. पण त्यांच्या उल्लेखाशिवाय बालीचे वर्णन अपुरे राहील म्हणून त्यांचा थोडक्यात उल्लेख...
बारोंगची मिरवणूक
(जालावरून साभार)
दहनविधी
हा सोहळा अर्थातच सुखकारक नाही आणि त्याकरिता बालीला प्रवासाला कोणीही जात नाही. पण कर्मधर्मसंयोगाने जर कोण्या खास माणसाच्या संदर्भात हा सोहळा बघायला मिळाला तर तो एक जगावेगळा अनुभव नक्कीच असेल...
(जालावरून साभार)
बालीचे समुद्रकिनारे
बाली सुंदर आणि सर्फिंगसाठी जगप्रसिद्ध असलेले समुद्रकिनारे आणि समुद्रकिनार्यावरील रिसॉर्ट यासाठीही प्रसिद्ध आहे. अपुर्या वेळेमुळे माझ्या सहलीच्या प्राधान्यक्रमात ते बरेच खाली असल्यामुळे मी त्यांना काट दिली होती. पण वेळ आणि आवड असल्यास यांचा आनंद जरूर घ्यावा...
......
(चित्रे जालावरून साभार)
.
इनमिन चार दिवसांचा सहवास... पण, विमान उडाले आणि बाली सोडताना मनात सहजच वियोगाचे दु:ख साठले होते...
.
बाली हे इंडोनेशियाच्या १७०० पेक्षा जास्त बेटांपैकी तुलनेने एक लहान बेट. पण ते जागतीक स्तराच्या आकर्षणांच्या यादीमध्ये खूप वरच्या ठिकाणी आहे. खरी बाली बघायची असली तर, तिची सहल करायची नसते... पूर्णपणे झोकून देऊन, बालीनीज बनून, बाली अनुभवायची असते. मग बाली तुमच्या मनात कायमचे घर करून राहते... सतत आठवत राहते... परतण्यासाठी सतत खुणावत राहते !
(समाप्त)
===================================================================
मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... (समाप्त)
===================================================================
प्रतिक्रिया
11 Jul 2014 - 1:15 am | मधुरा देशपांडे
एका उत्तम लेखमालेसाठी अनेक आभार. वाखू साठवते आहे. :)
11 Jul 2014 - 4:57 am | रेवती
सुरेख लेखमाला. डोळे सुखावले.
रामाचा पुतळा, नाटकाचा भव्य सेट खरोखर सुंदर!
धन्यवाद.
11 Jul 2014 - 9:49 am | प्रचेतस
अतिशय सुंदर लेखमाला.
सुरेख मंदिरे, भव्य पुतळे, देखणे समुद्रकिनारे, नेत्रसुखद हिरवाई, रंगेबिरंगी लोकनृत्ये खरंच कमालीचा सुंदर देश.
11 Jul 2014 - 9:58 am | एसमाळी
अप्रतिम प्रवासवर्णन.
चित्रांसकट दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद.
11 Jul 2014 - 10:19 am | पामर
खुप मस्त वर्णन! फोटो पण अप्रतिम ! अगदी घरबसल्या बाली अनुभवता आली...तुम्हाला पुढील प्रवासाला शुभेच्छा !
रामाचा पुतळा विशेष आवडला..त्याच्या शेजारचा पुतळा बकासुरापेक्षा कुंभकर्णाचा वाट्टोय हो..त्याच्या अवाढव्य शरीरावर चढ्लेली लांब शेपटीची वानरं आहेत बहुतेक...
11 Jul 2014 - 10:35 am | स्पा
अतिशय सुंदर देश
धन्यवाद एक्का साहेब
11 Jul 2014 - 10:38 am | पामर
एक्का साहेब खुप मस्त वर्णन..अगदी घरबसल्या बाली फिरवुन आणलीत की ! पुढील प्रवासाला शुभेच्छा!...रामाचा पुतळा विशेष आवडला !! पण तो दुसरा पुतळा बकासुरापेक्षा कुंभकर्णाचा वाट्टोय हो..त्याच्या अवाढ्व्य शरीरावर चढ्लेली लांब शेपट्यांची वानरं आहेत बहुतेक...
11 Jul 2014 - 1:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
कुंभकर्ण आहे तो. तसा बदल केला आहे. धन्यवाद !
11 Jul 2014 - 11:15 am | अजया
अ त्यंत वाचनिय आणि नेत्रसुखद लेखमालिका .सुंदर वर्णनं ,फोटो..सर्वच आवडलं.
11 Jul 2014 - 11:36 am | खटपट्या
खूपच सुन्दर मालीका !!
11 Jul 2014 - 12:20 pm | स्वाती दिनेश
बालीची लेखमाला सगळी एकत्र वाचून काढली, आवडली..
स्वाती
11 Jul 2014 - 12:34 pm | एस
काय मस्त लिहिलंय तुम्ही! प्रवासवर्णनांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या प्रदेशाची नुसतीच कोरडी ओळख करून देणारी चकचकीत माहितीपुस्तिका आणि प्रवासवर्णनांमध्ये फरक असतो. प्रवासवर्णनात त्या व्यक्तीच्या डोळ्यांनी आपण तो प्रदेश, तिथले लोक, संस्कृती, निसर्ग इत्यादी बघत असतो. त्यामुळे यशस्वी प्रवासवर्णनात त्या व्यक्तीतील लेखकाचे लेखनकौशल्य जितके तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचे असते तितकेच त्या व्यक्तीतला माणूस त्या प्रदेशाशी एकरूप होणे आणि ते समत्व मग लेखनातही उतरणे परिणामकारक असते. तरच मग प्रवासवर्णन हे वाचकांच्या हृदयात घर करू शकते.
तुमच्या लेखमालांमधून आम्हांला किती लाभ होतोय हेवेसांनल.
चला, पुलेमाप्र. :-)
13 Jul 2014 - 10:30 am | डॉ सुहास म्हात्रे
सविस्तर उत्साहवर्धक प्रतिसादासाठी धन्यवाद ! तुमच्यासारख्या रसिक वाचकांमुळेच मला ही प्रवासवर्णने लिहायला मजा येत आहे.
12 Jul 2014 - 3:12 pm | दिपक.कुवेत
आवडुन गेलेय आणि हे सगळं अनुभवायला एकदा तरी तीथे नक्कि जाणार. भाग ८ मधे सांगीतल्याप्रमाणे बाली पार्कची भेट संस्मरणीय का झाली ते सांगणार होतात ना???
12 Jul 2014 - 6:23 pm | चित्रगुप्त
खूपच वाचनीय आणि प्रेक्षणीय लेखमाला. आता पुढील लेखमाला कश्यावर?
13 Jul 2014 - 12:40 am | मुक्त विहारि
दादा, आता पुस्तक काढाच.
(आता आमच्या फसलेल्या नेपाळ ट्रिपचे काय घंटा वर्णन करणार?)
13 Jul 2014 - 9:45 am | अत्रुप्त आत्मा
बाली की जय हो..................................................!!!!!!!!!!!!!!!! *i-m_so_happy*
राम,कुंभकर्ण लैच भारी!
13 Jul 2014 - 9:50 am | मदनबाण
अप्रतिम लेखमालिका... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Independent Women Part 1" (With Lyrics) :- Destinys Child
13 Jul 2014 - 10:54 am | डॉ सुहास म्हात्रे
मधुरा देशपांडे, रेवती, वल्ली, एसमाळी, स्पा, अजया, खटपट्या, स्वाती दिनेश, चित्रगुप्त, मुक्त विहारि, अत्रुप्त आत्मा आणि मदनबाण : अनेक धन्यवाद !
14 Jul 2014 - 11:36 am | इशा१२३
मस्त लेखमाला...आणि बाली आता माझ्या सहलींच्या ठिकाणांच्या यादिमधे वरच्या स्थानावर आलेय.. =) :smile:
14 Jul 2014 - 8:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
जरूर भेट द्या बालीला... नक्कीच आठवणीत राहणारी सहल होईल.
14 Jul 2014 - 1:03 pm | बॅटमॅन
च्यामारी यांची लोकेषन्स भारी, लेखन भारी अन फटूबी भारीच! यांचं सगळंच लय भारी!!!!
ही लेखमाला फार मनापासून अन निगुतीने लिहिलेली आहे हे जाणवतंय. फार आवडली.
14 Jul 2014 - 8:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
बाली फार मनात भरलेलं ठिकाण आहे. परत जायचा योग आला तर बाली आणि अंगकोर सर्वात वरच्या ठिकाणी आहेत !
14 Jul 2014 - 2:29 pm | सूड
मस्त लेखमाला.
14 Jul 2014 - 2:39 pm | प्यारे१
खूप खूप आभार!
ह्या सगळ्या लेखमालांची पुस्तकं करावीत असं सुचवतो.
(आधीच कुणी सुचवलं असल्यास त्याला सविनय अनुमोदन)
14 Jul 2014 - 3:19 pm | शिद
झकासच झाली तुमची बाली ट्रिप आणि तुमच्या लेखनाद्वारे आमची सुध्दा... धन्यवाद.
क्या बात!!!
14 Jul 2014 - 4:09 pm | सौंदाळा
मस्त, सही, सुंदर, नयनरम्य, दणकेबाज
मज्जा आली.
14 Jul 2014 - 8:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
सूड, प्रशांत आवले, शिद आणि सौंदाळा : अनेक धन्यवाद !
14 Jul 2014 - 8:21 pm | यशोधरा
सुरेख. रामराया किती देखणा आहे! :)
14 Jul 2014 - 9:35 pm | मराठे
अप्रतिम लेखमाला. लेख वाचून लगेच बालीचा प्लॅन बनवावासा वाटतोय... हेच लेखाचं यश आहे.
15 Jul 2014 - 12:18 pm | झकासराव
तुम्ही ग्रेट आहात. :)
15 Jul 2014 - 1:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
यशोधरा, मराठे आणि झकासराव : अनेक धन्यवाद !
15 Jul 2014 - 3:28 pm | जय२७८१
तुमचे बालीचे वर्णन वाचून,फोटो पाहून बाली मला खूपच आवडले.तुमचे लिखाण हि अप्रतिमच ........बाली पाहण्याची मला हि इच्छा आहे.कृपया साधारण एका माणसाला किती खर्च आला मला सांगाल का ?
15 Jul 2014 - 5:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
बाली पर्यटन दृष्ट्या सुधारलेले आहे. तेथे स्वस्तापासून ते पंचतारांकित हॉटेल-रिसॉर्ट्स आणि वाहतूकव्यवस्था उपलबध आहे. त्यामुळे होणारा खर्च प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे बराच कमी-जास्त होऊ शकतो. स्थानिक आकर्षणांची संख्या आणि राहण्याचे दिवस इ. प्रमाणे खर्च वरखाली होतो हेवेसान. विमानप्रवासाचा खर्चही सहल करण्याच्या वेळेप्रमाणे बराच बदलू शकतो. शिवाय तुमच्या ठरवलेल्या वेळेस खास ऑफर्स चालू असल्यास खर्चात बरीच बचत होऊ शकते.
सुदैवाने, आपल्या इच्छेप्रमाणे (वेळ, दिवस, हॉटेल, इ) सहल केल्यास किती खर्च होईल ते प्रत्येकाने जालावरून शोधून काठणे सहज शक्य आहे. माझ्या माहितीची काही संस्थळे खाली देत आहे...
yatra.com
MakeMyTrip.com
windmillholidays.in
बाली टुरीझमच्या या संस्थळाला जरूर भेट द्या.
जालावर अजूनही बरीच संस्थळे सापडू शकतील. निर्णय पक्का करण्याअगोदर त्यांच्यवरही जरूर नजर टाका.
15 Jul 2014 - 8:58 pm | सखी
सुरेख लेखमाला, सगळे लेख आता निवांत वाचुन काढले, अनेक धन्यवाद. आयुष्यात एकदा जीवाची बाली करुन बघायची इच्छा आहे. वर्णन छानच, त्यांच्या संस्कृतीची डिटेल ओळख आवडली, निसर्ग भरभरुन असला तरी त्या लोकांनी त्याची घेतलेली काळजी, बहुतेक ठिकाणची स्वच्छता जाणवते.
फोटो सगळे एक-से-एक आहेत. थोडं फार खादाडीचं वर्णन चाललं असतं, किंवा काही मिळतं नाही असं आहे का? मुख्य म्हणजे गवती पाला खाणा-यांना कारण त्यांच्याही जेवणात भात+मासे असं प्रमाण अधिक असतं ना?
16 Jul 2014 - 11:10 am | डॉ सुहास म्हात्रे
जेव्हा हा प्रवास केला तेव्हा मिपावर वावर नव्हता. त्यामुळे खादाडीच्या फोटोंना इतके महत्व असेल असे वाटले नव्हते :) यानंतर केल्या जाण्यार्या सहलींमध्ये ये गुस्ताखी नही होंगी... प्रॉमिस !
बालीनीज शाकाहारी आणि मांसाहारी हे दोन्ही प्रकार चवदार असतात आणि सहज मिळतात, त्यामुळे काळजी नसावी.
16 Jul 2014 - 11:45 pm | सखी
खादाडीच्या फोटोंना इतके महत्व असेल असे वाटले नव्हते - नाही फक्त त्यासाठीच नाही फक्त एक अंदाज यायला तिथलं जेवण कशाप्रकारचं असेल.
दोन्ही प्रकार चवदार असतात आणि सहज मिळतात - धन्यवाद एक्कासाहेब.
16 Jul 2014 - 11:55 am | ज्ञानोबाचे पैजार
एका सुंदर देशाची तेवढीच सुंदर ओळख.
सर्व फोटो अतिशय सुंदर आणि त्या बरोबरीने येणारे वर्णन तर केवळ अप्रतिम. संपुर्ण लेख मालिका अत्यंत उत्कंठावर्धक होती.
वाखु साठवल्यागेली आहे.
पुलेशु
पैजारबुवा,
17 Jul 2014 - 12:13 pm | डॉ सुहास म्हात्रे
अनेक धन्यवाद !
17 Jul 2014 - 12:16 pm | विशाल चंदाले
बालीच्या सुंदर सफरीसाठी धन्यवाद, पुढील प्रवासासाठी शुभेछ्या.
17 Jul 2014 - 12:33 pm | आतिवास
नेहमीप्रमाणेच सुंदर लेखमाला - सर्व भाग आज वाचले. मजा आली!
18 Jul 2014 - 2:10 am | डॉ सुहास म्हात्रे
विशाल चंदाले आणि आतिवास :अनेक धन्यवाद !
21 Jul 2014 - 9:09 pm | मिसळ
सुन्दर सफर. सुन्दर फोटो. धन्यवाद.
22 Jul 2014 - 8:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
22 Jul 2014 - 2:09 pm | कोट्या धीश
नेहमी सारखीच सुरेख लेखमाला
वाचल्याचे आणि अनुभवल्याचे सुख & संपल्याची खंत
तुमच्या लिखाण मधला एकमेव न आवडणारा शब्द म्हणजे "(समाप्त)"
एक्का काका , आता पर्यंत तुमचे सगळे प्रवासवर्णने वाचून काढली आहेत ,
१ विनंती आहे - तुम्ही जो आनंद फक्त MI PAकरांना देता, तो बाकी खूप लोकां पर्यंत का नाही पोचवत ??
तुमची लेखन शैली इतकी छान आहे कि तुम्ही तुमचे सर्व प्रवासवर्णने पुस्तक रुपात सर्वांच्या भेटीस का नाही आणत ??
अर्थात - हे माझे म्हणणे आहे , तुम्ही या वर विचार कराल ( माझ्या बद्दल काहीही राग न ठेवता ) अशी आशा करतो
22 Jul 2014 - 8:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुमच्या खूपच उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद ! पुस्तकाबद्दल अजून काही नक्की नाही. अगदी मराठीत लिहीणेही दीडएक वर्षापूर्वी अगदी मनातही नसलेली गोष्ट होती. पण तुमच्यासारख्या रसिक वाचकांच्या प्रोत्साहनामुळे मिपावर लिहायला मजा येत आहे, त्यातच सध्या खूष आहे. नंतर केव्हा जर या लेखनात छापून प्रकाशित करण्या इतका दम आहे असा विश्वास वाटला तर बघू :)
4 Aug 2016 - 6:48 pm | पक्षी
अतिशय छान प्रवास आणि वर्णन.
पूर्ण लेखमाला वाचून काढली..मस्त
4 Aug 2016 - 8:11 pm | विवेकपटाईत
बाली खरोखरच सुंदर आहे.
तिथे कपडे हि स्वत: मिळतात. एका मंदिरात हनुमान सेनेच्या एका योध्यासोबत घेतलेले छायाचित्र
