===================================================================
मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९(समाप्त)...
===================================================================
...समुद्राच्या लाटांपासून दोन हाताच्या अंतरावर असलेल्या वाळूवर टाकलेल्या टेबलांवर बालीच्या समुद्रान्नाची चव घेताना आजचा दिवस सार्थकी लागल्याचे समाधान मनात होते.
कालच्या अर्ध्या दिवसाच्या फेरीच्या अनुभवानेच बाली पर्यटकांचे इतके आवडते ठिकाण का आहे हा प्रश्नच निकालात निघाला होता. त्यामुळे सकाळी न्याहारी वगैरे करून तयार होऊन उत्सुकतेने लॉबीत पोहोचलो. कार्तिक त्याचा हसरा चेहरा आणि खेळकर स्वभाव घेऊन आमची वाट पाहत होता. तेव्हा वेळ न घालवता त्वरीत बाहेर पडलो.
शहराच्या बाहेर पडलो आणि बाली तिचे सौंदर्य मोकळेपणे उलगडू लागली. बालीला निसर्गाने हिरवेगार डोंगर, दाट झाडी, लहान-मोठी तळी यांच्या रूपाने सौंदर्य भरभरून दिले आहे. लोकांनीही त्या सौंदर्याची नीट जपणूक करून वर त्यात आपल्या कलाकृतींची आणि सणसमारंभांची भर घालून ते अधिक खुलवले आहे. गावां-शहरांतील स्वच्छता आणि नीटनेटकेपणा लक्षणीय आहे.
वातावरण ढगाळ आणि कुंद होते. पण शहर मागे पडल्या पडल्या हिरवी झाडी व भाताची शेते असलेला परिसर सुरू झाला आणि मनावरचे तरी मळभ दूर झाले...
.
बराच भाग अगदी जंगलातून चाललो आहे असे वाटावे असाच होता. मात्र रस्त्यावरची दुचाकी वाहने लोकवस्तीपासून फार दूर नसल्याची जाणीव करून देत होती...
मधून मधून छोटी पण स्वच्छ आणि नीटनेटकी गावे लागत होती...
तर मधूनच डोंगरउतारावरची हिरवाई आणि भातशेतीची खाचरे मन मोहून टाकत होती...
तास-दीड तासाच्या नयनरम्य प्रवासानंतर आम्ही आमच्या आजच्या पहिल्या आणि एका खास आकर्षणाजवळ, बेसाकी गावाजवळ, पोहोचलो...
बेसाकी गावातली पारंपरिक घरे
.
घराच्या आवारातली देवांची आणि पूर्वजांची देवळे
पुरा बेसाकीला बालीतल्या सर्व मंदिरांची माता समजले जाते. असे हे महामंदिर पाहण्याअगोदर बालीतील मंदिरांबद्दल थोडीशी सर्वसाधारण माहिती घेणे मनोरंजक आणि उपयोगी होईल. शिवाय ही माहिती आपल्याला पुढच्या सफरीतील इतर मंदिरे व स्थळे नीट समजून घ्यायलाही उपयोगी पडेल.
बालीतील मंदिरे
बालीतील मंदिरांची रचना इतर ठिकाणच्या बंदिस्त खोल्यांच्या मंदिरांसारखी नसते, तर उघड्या आकाशाखालील कूस असलेले एक आवार अशी असते. बेसाकीसारखे मोठे मंदिर असल्यास त्यातल्या अनेक उपमंदिरांची आवारे एकमेकाला अनेक कोरीव व्दारांनी जोडलेली असतात.
प्रकार:
बालीत मंदिरांच्या स्थानावरून त्यांचे खालीलप्रमाणे प्रकार पडतात :
१. पुरा काह्यांगन जगद् (Pura kahyangan jagad): ही मंदिरे पर्वतांच्या अथवा ज्वालामुखींच्या उतारावर बांधलेली आहेत. पर्वत आणि विषेशत: ज्वालामुखी यांना बाली हिंदू धर्मात असलेल्या उच्च स्थानामुळे या मंदिरांचा दर्जा सर्वात वरचा आहे. पुरा बेसाखी या प्रकारातले सर्वोच्च मंदिर आहे.
२. पुरा सेगारा (Pura segara): ही मंदिरे सागरकिनार्यावर बांधलेली आहेत.
३. पुरा देसा (Pura desa): ही मंदिरे बेटाच्या (देशाच्या) अंतर्भागात सपाटीवर बांधलेली आहेत.
४. पुरा तिर्ता (Pura tirta): ही मंदिरे पाण्याचा स्रोत (झरा, नदी, तळे, इ) असलेल्या (म्हणजे तीर्थाच्या) ठिकाणी बांधलेली आहेत. या मंदिरांच्या पुजार्यांना शेतीकरिता पाणीवाटप करण्यासाठी बनवलेल्या "सुबक" नावाच्या प्राचीन जलनियोजन व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान असते. ही प्राचीन धार्मिक-सामाजिक-आर्थिक व्यवस्था अजूनही बालीच्या काही विभागांत व्यवस्थितपणे चालू आहे !
रचना:
मंदिरांची रचना सर्वसाधारणपणे पवित्र त्रिमंडल सूत्रावर बेतलेली असते:
१. निस्तामंडल उर्फ जबा पिसान: या सर्वात बाहेरच्या आणि कमी उंचीच्या आवारात सुशोभित बाग असते. तेथे मंदिरांतील समारंभांची तयारी करण्यासाठी लागणारी जागा राखीव ठेवलेली असते. धार्मिक समारंभातील नृत्य इत्यादी कार्यक्रमांसाठीही ही जागा वापरली जाते.
२. मद्यमंडल उर्फ जबा तेंगा: हे मध्यभागातील आवार भाविकांनी करण्याच्या धार्मिक विधींसाठी वापरले जाते. तेथे मंदिराचा मुदपाकखाना, भाविकांना पुजार्यांशी संवाद करण्यासाठीची जागा आणि मंदिराची वाद्ये ठेवण्याची जागा असते.
३. उतममंडल उर्फ जेरो: हे आवार मंदिराचा सर्वात पवित्र आणि सर्वात उंचीवरचा भाग असतो. तेथे अचिंत्यचे पद्मासन, पॅगोडासारखे एकावर एक अनेक छपरे असलेले "पेलिंग्गी मेरू" नावाचे मनोरे आणि वेदपठणासाठी राखीव जागा असते.
व्दारे:
बाली स्थापत्यकलेत मंदिरांची मुख्यतः दोन प्रकारची व्दारे असतात :
१. चंडी बेंतार (Candi bentar) म्हणजे दुभंगलेले व्दार. बालीत हे सतत दिसत राहते कारण मंदिराच्या सर्वात बाहेरच्या निस्तमंडलात प्रवेश करण्याच्या मार्गावर ते असते.
२. कोरी अगुंग किंवा पदुरक्ष (kori agung or Paduraksa) प्रकारचे व्दार मध्यमंडल आणि उत्तममंडलाला जोडते. वर छप्पर असलेल्या या व्दारावरचे कोरीवकाम आणि रंगरंगोटी अतिशय कलापूर्ण असते.
कोरी अगुंग
दारांच्या रचनेची आणि जागांची ही पद्धत मंदिरांप्रमाणेच राजेरजवाड्यांच्या (आणि आता श्रीमंतांच्या) महालांसाठीही वापरली जाते.
अगुंग पर्वतावरची मंदिरमाता पुरा बेसाकी
पुरा बेसाकी हे बालीतील सर्वात पवित्र आणि आकाराने सर्वात मोठे मंदिर आहे. याला बालीतील सर्व मंदिरांची माता समजले जाते. या मंदिराचे बेसाकी हे नाव ज्याचा समुद्रमंथनात दोरीसारखा उपयोग केला होता त्या सर्पराज बासुकी (वासुकी) याच्या नावावरून पडले आहे.
हे मंदिर सर्वप्रथम केव्हा स्थापित केले गेले याबाबत नक्की माहिती नाही. पण "पुरा पेनातरान अगुंग" या त्याच्या मुख्य भागातील दगडी चौथर्याच्या मेगॅलिथिक पिरॅमिडसारख्या रचनेवरून ते मंदिर कमीतकमी २००० वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असावे असे मत आहे. बालीतील धर्मग्रंथांप्रमाणे बालीत हिंदू धर्म सर्वप्रथम मार्कंडेय आणि अगस्ती ऋषींनी आणला. त्यापेकी मार्कंडेय ऋषींनी बेसाकीच्या प्राचीन मंदिराला हिंदू मंदिर बनवले असे मानले जाते. पुरा बेसाकीमध्ये हिंदू उपासना १२८४ साली जावातील हिंदू साम्राज्याच्या बालीवरील यशस्वी आक्रमणांच्या सुरुवातीने सुरू झाली असेही मानले जाते. पंधराव्या शतकामध्ये बालीमधिल गेलगेल या हिंदू राजघराण्याने त्याला राजमंदिराचा दर्जा दिला.
हे मंदिर बालीतील सर्वात उंच (३०३१ मीटर) आणि सर्वात पवित्र अश्या अगुंग पर्वताच्या (गुनुंग अगुंगच्या) दक्षिणपश्चिम उतारावर १००० मीटर उंचीवर वसलेले आहे. बाली पुराणे व लोककथांप्रमाणे अगुंग पर्वत ही विश्वाचा मध्य समजल्या जाणार्या मेरू पर्वताची प्रतिकृती आहे. काहींच्या मते "मेरू पर्वताचे पामीरचे पठार -> भारत -> पूर्व जावा -> पश्चिम जावा असे विस्थापन होताना अगुंग पर्वत हा त्याचा बालीमध्ये पडलेला एक तुकडा आहे". तर इतर काहींच्या मते "तो हिंदूंनी बालीत येताना बरोबर आणलेला मेरूचा तुकडा आहे". पर्वत आपल्या जागेवरून हलून / हलवून हजारो किलोमीटर दूर जाणे / नेणे हे वास्तवात शक्य नाही. त्यामुळे, ही कथा बहुतेक "दूरवर स्थलांतरीत होणार्या लोकांनी स्वतःची संस्कृती / मायभूमीची मूठभर माती बरोबर आणणे आणि ती नवीन जागेत रुजविणे / जागेच्या मातीत मिसळणे" या कृतीचे प्रतिकात्मक रूप असावे. ते काहीही असले तरी अगुंग पर्वताचे बालीच्या धर्मात आणि समाजजीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. (समुद्रमंथन : मानवाचे प्राचीन जलप्रवास या लेखात मी "मेरू हे प्राचीन काळातील समुद्रप्रवासाच्या आणि म्हणूनच सांस्कृतिक-व्यापारी-आर्थिक-राजकीय-दृष्ट्या महत्त्वाच्या केंद्राचे नाव असावे आणि त्या केंद्राची जागा काळाबरोबर बदलणार्या वस्तुस्थितीबरोबर बदलत गेली असावी." या कल्पनेच्या बाजूचे काही पुरावे मांडले होते. या केंद्राची नंतर पुराणांत आणि लोककथांत विश्वाचे केंद्र अशी "सुधारून वाढवलेली" आवृत्ती झाली असावी.)
अगुंग पर्वत त्याच्या उंचीमुळे पश्चिमेकडील समुद्रावरून आलेले ढग पूर्णपणे रोखून धरतो. त्यामुळे पुरा बेसाकी असलेला त्याचा दक्षिणपश्चिम उतार वर्षभर ढगांनी वेढलेला, थंड आणि हिरवागार असतो, तर त्याचा उत्तरेकडील उतार बाष्पाअभावी कोरडा आणि रखरखीत असतो. अगुंग पर्वतावर बालीतील सर्वात मोठा जिवंत ज्वालामुखी आहे. त्याच्या १९६३-६४ मध्ये झालेल्या उद्रेकात १७०० लोक मृत्युमुखी पडले होते. त्यावेळी लाव्हाचा ओघ मंदिरापासून केवळ काही मीटर दुरून गेला आणि (बालीकरांच्या मते दैवी चमत्कारामुळे) मंदिराला अजिबात धोका पोहोचला नाही.
बालीचे धार्मिक वर्ष २१० दिवसांचे असते. अश्या प्रत्येक वर्षात या मंदिरात कमीत कमी सत्तर मोठे सणसमारंभ साजरे केले जातात !
पर्वताच्या पायथ्याजवळ गाडीतून पायउतार होऊन चालू लागताच आजूबाजूचा सुंदर असलेला आणि "सुंदर राखलेला" परिसर आपले लक्ष वेधून घेतो...
पुरा बेसाकीकडे जाणार्या रस्त्यावर टिपलेले एक दृश्य
हे मंदिर म्हणजे "पुरा पेनातरान अगुंग" या मुख्य मंदिरासकट एकमेकाला लागून असलेल्या (बालीतील वेगवेगळ्या हिंदू संप्रदायांचे प्रतिनिधित्व करणार्या) २३ उपमंदिरांचे संकुल आहे. ह्या मंदिराची रचना "मंडल" प्रकारची आहे. या रचनेत पर्वताच्या उतारावर पिरॅमिडसारखे खालून वरपर्यंत सहा स्तर आहेत. मंदिराला दुभागणार्या एका मध्य आसाच्या दोन्ही बाजूला असलेल्या आवारांत उपमंदिरे आहेत. आवारांच्या बाजूंनीही वरखाली जाण्यासाठी पायर्या आहेत. मुख्य आसाभोवती दोन्ही बाजूंना समान असणारी रचना नैसर्गिक आणि आध्यात्मिक समतोलाचे निदर्शक समजली जाते. पूजनीय समजला जाणार्या अगुंग पर्वताच्या उतारावर असल्याने या रचनेला आपोआपच पावित्र्याची झालर आली आहे. मंदिराच्या सर्वोच्च स्तरावरून फक्त आजूबाजूचा परिसरच नाही तर बालीभोवतीचा समुद्रही दृष्टिक्षेपात येतो.
हे सर्व मंदिरसंकुल पाहायचा आध्यात्मिक आणि पर्यटन आनंद घेण्यासाठी शेकडो पायर्यांचा चढ-उतार करायची तयारी ठेवायला लागते हा आधिभौतिक मुद्दाही आतापर्यंत तुमच्या ध्यानात आला असेलच !
चला तर असे हे एकमेवाव्दितीय मंदिर पाहायला...
पुरा बेसाकीचा आराखडा
.
पुरा बेसाकीचे प्रथमदर्शन
.
...
...
पुरा बेसाकीचे काही संरक्षक
.
सर्वात खालच्या पहिल्याच स्तरावर जाण्यासाठी असलेल्या असंख्य पाहिर्या सुरुवातीलाच छातीवर दडपण आणतात ! त्या आपल्याला दुभंगलेल्या मेरुपर्वताच्या रूपातील चंडी बेंतार प्रकारच्या सर्वात बाहेरच्या मुख्यद्वारापर्यंत घेऊन जातात...
पुरा बेसाकी : पहिल्या स्तरावरच्या मुख्य चंडी बेंतार प्रकारच्या व्दाराकडे नेणार्या पायर्या
.
मदिराच्या दोन्ही बाजूने सहाही स्तरांवर जाण्यासाठी पायर्या आहेत. त्यांच्यावरून वर जाताना उपमंदिरांची बाहेरच्या बाजूची चंडी बेंतार व्दारे लागतात. प्रत्येक दोन स्तरांमधिल उंचीच्या फरकात पिरॅमिडच्या पायर्यांसारखी पण त्यापेक्षा जास्त गुंतागुंतीची कलापूर्ण रचना आहे. या रचनेत अनेक ठिकाणी झाडेझुडुपे आणि फुलझाडे लावून सुंदर बागा केल्या आहेत...
पुरा बेसाखीतील दोन स्तरांमधली पायर्या-पायर्यांची आकर्षक रचना
.
पुरा बेसाखीतील दोन स्तरांमधल्या रचनेतील बागा आणि बाहेरून दिसणारी उंच कोरीव पद्मासने आणि व्दारे
.
पुरा बेसाकीच्या उतममंडलात प्रवेश करण्यासाठी असलेले कोरी अगुंग (जालावरून साभार)
.
सर्वात उंच असलेल्या उतममंडलातील पद्मासनांवर देवाला वाहिलेला प्रसाद व फुले ठेवतात, तर मोकळ्या आवाराचा उपयोग भाविकांना बसून प्रार्थना करण्यासाठी व प्रवचन ऐकण्यासाठी होतो. येथे मेरू पर्वताचे रूपक असलेली पॅगोडासारख्या वर वर लहान होत जाणार्या छपरांच्या अनेक मजली इमारती असतात. त्यांची छपरे गवताच्या खास प्रकारच्या रचनेने बनविलेली असतात...
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०१
.
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०२ : पॅगोडासारखे दिसणारे मनोरे (पेलिंग्गी मेरू)
.
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०३
.
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०४
.
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०५
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०६
.
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०७ : पुजारी मंडळींच्या नावाची यादी... मोबाईल फोन नंबर सकट
.
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०८ : मंदिरातली खास बालीनीज वाद्ये
.
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०९ : पार्श्वभूमीवर दिसणारा पर्वतराज अगुंग... क्षणभर ढगाआडून डोकावून दर्शन देताना
.
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : १० : अचिंत्यची पद्मासने
.
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ११
.
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : १२
या देवळाच्या अंतर्भागातली दृश्ये जेवढी अनवट आहेत, तेवढेच एक किलोमीटर उंचीवरून दिसणारे परिसराचे दृश्य नयनरम्य आहे. हे महादेवूळ, ज्वालामुखीसह असलेला अगुंग पर्वत, हिरवाईने नटलेला परिसर; सगळे मनाला भारून टाकते. हजारेक वर्षांपूर्वी भारतातून येथे स्थलांतरीत होणार्या आणि या भूमीत मुळे रोवून प्रतिकूल परिस्थितीत अजूनही आपला धर्म आणि संस्कृती केवळ जतन करणार्याच नाही तर दर दिवशी अभिमानाने साजरा करणार्या बालीच्या जनतेबद्दल मनात काय भावना येतात हे सांगणे कठीण आहे !
केवळ वेळेचे बंधन पाळायला हवे म्हणून जड पावलांनी गाडीच्या दिशेने निघणे भाग पडले.
(क्रमशः )
===================================================================
मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९(समाप्त)...
===================================================================
प्रतिक्रिया
21 Jun 2014 - 12:38 am | रेवती
अप्रतीम लेखन व छायाचित्रे! पहिल्या फोटूतील आकाशाचा रंग पाहूनच मन मोहून गेले पण पुढील प्रत्येक फोटू खिळवून ठेवणारा आहे. दुसरा फोटो कोकणात असल्यासारखा आहे. कोरी अगुंग केवळ सुंदर. पुरा बेसाकीच्या आतील चित्रेही सुंदर आलीयेत. इतकी प्रशस्त देवळे आहेत म्हटल्यावर येथील लग्नकार्ये देवळांमध्येच होत असावीत का? असा प्रश्न पडला. साहेब, आता तुम्ही एक पुस्तक छापायचे मनावर घ्याच! आम्ही ते नक्की विकत घेऊ.
21 Jun 2014 - 5:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
मला बालीतले लग्न बघण्याची संधी मिळाली नाही, पण तो विधी मोठा रंगीबेरंगी आणि चित्ताकर्षक असतो असे वाचून-ऐकून आहे.
त्यामुळे सद्या बालीनीज लग्नसमारंभाची काही चित्रे पाहूनच समाधान करून घेणे भाग आहे :( (सर्व चित्रे जालावरून साभार)
मुख्य समारंभ...
.
रुखवत...
...
करवल्या...

वरात...
.
पाश्चिमात्यही बालीत हा विधी करवून घ्यायला येतात...
.
बाली लग्न करण्यासाठीचे आणि दुसर्यांदा लग्नाच्या आणाभाका पुन्हा घेण्यासाठीचे (रिन्युअल ऑफ वाव्ज) एक जानेमाने आंररराष्ट्रिय ठिकाण बनले आहे. हे समारंभ देऊळ, बौद्धमंदिर, रिसॉर्ट, खास व्हिला, चर्च, इ हवे तिथे करता येतात. हे काम करणार्या बर्याच कंत्राटी कंपन्या तेथे आहेत.
देवळात कोणताही विधी करायला हिंदू असणे जरूरीचे असते. पुरा बेसाखी अथवा इतर मोठी मंदिरे बडेजावासह केलेल्या समारंभाना वापरता येत नाहीत.
21 Jun 2014 - 5:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
मला बालीतले लग्न बघण्याची संधी मिळाली नाही, पण तो विधी मोठा रंगीबेरंगी आणि चित्ताकर्षक असतो असे वाचून-ऐकून आहे.
त्यामुळे सद्या बालीनीज लग्नसमारंभाची काही चित्रे पाहूनच समाधान करून घेणे भाग आहे :( (सर्व चित्रे जालावरून साभार)
मुख्य समारंभ...
.
रुखवत...
...
करवल्या...

वरात...
.
पाश्चिमात्यही बालीत हा विधी करवून घ्यायला येतात...
.
बाली लग्न करण्यासाठीचे आणि दुसर्यांदा लग्नाच्या आणाभाका पुन्हा घेण्यासाठीचे (रिन्युअल ऑफ वाव्ज) एक जानेमाने आंररराष्ट्रिय ठिकाण बनले आहे. हे समारंभ देऊळ, बौद्धमंदिर, रिसॉर्ट, खास व्हिला, चर्च, इ हवे तिथे करता येतात. हे काम करणार्या बर्याच कंत्राटी कंपन्या तेथे आहेत.
देवळात कोणताही विधी करायला हिंदू असणे जरूरीचे असते. पुरा बेसाखी अथवा इतर मोठी मंदिरे बडेजावासह केलेल्या समारंभाना वापरता येत नाहीत.
21 Jun 2014 - 9:21 pm | रेवती
धन्यवाद. लग्नकार्ये रंगीबेरंगी असल्याने बरे वाटले. वरात जरा विनोदी आहे तरी बाकी सगळे लग्न छान आहे. डोलारे, फुलोरे यांची रेलचेल. रुखवत भारी आहे.
21 Jun 2014 - 9:25 pm | डॉ सुहास म्हात्रे
अहो, त्या "बालीच्या समुद्रकाठची वरात" या खास आयटेमाला ईंटरनॅशनल क्लायंटांचा लै डिमांड असतो असं ऐकून आहे ! :)
22 Jun 2014 - 4:37 am | रेवती
होय, असेलही! त्यांना बालपणापासून स्ट्रोलरमध्ये बसायची सवय असते ना! ;)
21 Jun 2014 - 8:00 am | यशोधरा
सहमत!
फार सुरेख धागा. फोटो पाहताना कोकण प्रांताची आठवण झाली.
21 Jun 2014 - 8:11 am | खटपट्या
जबरदस्त !!! अनेक अनेक धन्यवाद !!
21 Jun 2014 - 9:01 am | प्रचेतस
जबरदस्त.
काय प्रचंड मंदिर संकुले आहेत ही.
लेखनही अगदी माहितीपूर्ण आणि तपशीलवार.
21 Jun 2014 - 9:08 am | धन्या
काका तुम्ही भाग्यवान आहात.
दुचाकीस्वाराबरोबर मागे बसलेल्या व्यक्तींनीही शिरस्त्राण घातलेले पाहून भरुन आले.
22 Jun 2014 - 11:17 am | एस
हेच म्हणणार होतो. एक पुणेकर म्हणून तर खूपच हो.
(हेल्मेट वापरणारा पुणेकर)
22 Jun 2014 - 2:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
हेल्मेट वापरणे ही बालीत सहजपणे होणारी क्रिया आहे. पोलीस कोणाला हेल्मेटकरता थांबवून चौकशी करत आहे असे एकदाही दिसले नाही. याबाबतीतही (आणि एकंदरीत शिस्तीच्या बाबतीत) बालीकर पुणेकरांपेक्षा (आणि एकंदरीत भारतीयांपेक्षा) फार पुढे आहेत असे दु:खाने नमूद करावयाला लागते आहे :(
21 Jun 2014 - 9:39 am | मुक्त विहारि
वाचत आहे...
21 Jun 2014 - 11:09 am | मृत्युन्जय
खुपच सुंदर मंदिरे. उत़्कृष्ट फोटो आणि उत्तम वर्णन. इएंच्या पोतडीतुन अजुन एक उपहार.
21 Jun 2014 - 12:27 pm | चौकटराजा
मी भारतात पाहिलेल्या मंदिरांच्या समूहापेक्षा अगदी वेगळ्या शैलीची मंदिरे आहेत ही. त्यातील 'कोरी अगुंग' चे प्रवेशद्वार तर
नजरेला गुंगून स्तब्ध करणारे आहे. ते बाली चे टिपिकल प्रवेशद्बार ही एका चित्रात दिसतेय. काही प्रमाणात नेपाळी, जपानी
शैलीचा छाप दिसतो काय..... ?
बाकी अंतर्भागांचे दर्शन ही सुखद आहे. धन्यवाद शेअर केल्याबद्द्ल.
22 Jun 2014 - 2:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
दुभंगलेल्या व्दाराची कल्पना बालीची खासियत आहे. सर्वात बाहेरच्या कूसाला तसे व्दार ठेवण्याची पद्धत असल्याने बालीच्या सफरीत ते सतत समोर येते.
21 Jun 2014 - 2:54 pm | इशा१२३
हिरवागार परिसर,सुंदर रेखीव मंदिरे आणि 'कोरी अगुंग'...सगळेच फोटो सुंदर!
21 Jun 2014 - 3:08 pm | माधुरी विनायक
कित्ती सुरेख आणि देखणी मंदिरं आहेत. प्रत्येक छायाचित्रात जाणवणारी अकृत्रिम स्वच्छताही वाखाणण्याजोगी. तुम्ही दिलेली माहितीही अभ्यासपूर्ण आहे. धन्यवाद.
21 Jun 2014 - 4:02 pm | अत्रुप्त आत्मा
आहाहाहाहा... !!! केवळ अफाट!
21 Jun 2014 - 4:59 pm | पैसा
सुंदर आणि केवळ सुंदर! इथल्या बहुरेक नावांचा कोणत्यातरी संस्कृत शब्दांशी संबंध जोडता येतो आहे. हजार वर्षांपूर्वी समुद्र पार करून तिकडे गेलेल्या लोकांनी संस्कृती जिवंत ठेवण्याचा आटापिटा करावा हे विशेषच!
पायर्या पायर्यांची भातशेती पाहून कोकणातल्या डोंगरांवरच्या लहान लहान दळ्यांची आठवण झाली.
21 Jun 2014 - 5:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
यशोधरा, खटपट्या, वल्ली, धन्या, मुकत विहारि, मृत्युन्जय, चौकटराजा, इशा१२३, माधुरी विनायक, अत्रुप्त आत्मा आणि पैसा : सर्वांचे उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल अनेक धन्यवाद !
21 Jun 2014 - 7:05 pm | दिपक.कुवेत
एक प्रश्न आहे....कुठल्याहि ठिकाणाची ईतकि तपशीलवार माहिती तुम्हि कशी जाणुन घेता? आय मीन आयटनरी मधे जी ठिकाणं पहायची आहेत त्याची आधी माहिती घेउन ती टुर गाईड बरोबर पडताळता का त्या त्या ठिकाणाचा टुर गाईड तुम्हाला हि माहिती देतो? केवळ उत्सुकता म्हणुन विचारतोय हो. राग नसावा. कारण तुमची चिकाटि, जिद्द, मेहनत त्यात दिसुन येते. फार कमी लोक ईतकि माहितिपुर्ण सहल करतात. पुढिल भागांच्या प्रतिक्षेत.
21 Jun 2014 - 7:48 pm | मुक्त विहारि
+ १
(आम्ही पण त्यातच मोडतो... लेणी बघायला म्हणून जातो, अन बियर आणि भूर्जी-पाव खावून परत येतो.)
21 Jun 2014 - 8:27 pm | भाते
कुठेही सफर करायची असेल तर विकी, गुगल आधी मिपावर एक्का काकांचे धागे बघायचे. बाकी कुठेही मिळणार नाही इतकी सुरेख माहिती एक्का काकांच्या धाग्यांवर मिळते.
21 Jun 2014 - 9:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
या सगळ्याचं मुख्य कारण म्हणजे माझ्या सहलींमागे मला असलेले नवीन जागेचे कुतुहल. मग बाकीचे आपोआप होते. वेळ आणि पैसा खर्च करून सहलीला जायचे तर ती जा खरंच तितकी आकर्षक आहे की नाही आणि असली तर कोणत्या गोष्टी बघणे आवश्यक आहे हे जाण्याअगोदर माहिती करून घेणे आपोआपच होते. कारण परतल्यावर असे हे राहीले, ते राहीले हे मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते !
परदेशातल्या (आणि अर्थातच अनोळखी) जागेवर योग्य माहिती देणारा मार्गदर्शक ही मी फार आवश्यक गोष्ट मानतो. कारण योग्य मार्गदर्शकावर होणार्या खर्चाच्या तुलनेत कमी / अथवा चुकीच्या पद्धतीने बधितलेल्या अकर्षणांमुळे आपण जास्त तोट्यात जातो असे मला वाटते. मार्गदर्शकांना आपण जर (अगोदर थोडीफार माहिती असल्याने) योग्य प्रश्न विचारले तर त्यांनाही हुरुप येउन त्यांचा "पाटी टाकणे" मोड बंद होऊन "आत्मियता" मोड सुरू होतो असा माझा अनुभव आहे. त्यामुळे आपल्याला खरेच जागेत रस आहे हे कळल्याने बरीच अधिक रोचक आणि अंतर्गत महिती कळते असा माझा अनुभव आहे.
अर्थात मार्गदर्शक हवा की नको ते सहलीच्या जागेवर अवलंबून असते. पाश्चिमात्य देशांत उत्तम माहितीपत्रके मिळतात आणि स्वत:च्या जबाबदारीवर उत्तम प्रकारे सहल करता येते. भाषेचीही समस्या नसते. शिवाय तेथे खाजगी मार्गदर्शकाची फी भयानक महाग असते. त्यामुळे तेथे पुर्वाभ्यास (आंतरजालाचा विजय असो !) आणि जागेवरची माहितीपत्रके पुरेशी असतात. मात्र चीन, दक्षिणपूर्व आशियातील देशांमधे (सिंगापूरसारखे काही मोजके सन्माननिय अपवाद वगळता) बरोबर याविरूद्ध परिस्थिती आहे.
अर्थातच एकच किंवा एका बाजूचाच उपाय सगळ्या सहलींना लागू नसतो... मग हायब्रिड उपाय बनवायचा, हाकानाका. असा प्रत्येक वेळी परिस्थितीप्रमाणे वेगवेगळा निर्णय होतो.
प्रवासवर्णन लिहीताना माहिती विश्वासू असणे जरूर आहे. त्यामूळे ती परत पडताळून बधितली जातेच. तेव्हा त्यांत सनावळी इ ची अजून थोडी भर पडते (त्यांचे कोण लेकाचा पाठांतर करतो काय? ते तर मी शाळेतही करत नव्हतो ;) ). पण या सर्वात माझी जिज्ञासा अधिकच पुरी झाल्याने माझा सहलीचा आनंद व्दिगुणीत होतो !
21 Jun 2014 - 8:24 pm | भाते
काका, पहिल्या प्रतिसादात रेवाक्का यांच्या म्हणण्यानुसार खरंच तुमच्या या लेखांचे पुस्तक (खंड१, २, …) काढा.
पुरा बेसाकी… सुरेख, फोटो आणि माहितीसुध्दा.
21 Jun 2014 - 9:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
अनेक धन्यवाद !
22 Jun 2014 - 2:42 am | मधुरा देशपांडे
सगळे फोटो, वर्णन, माहिती, हे सगळे लिहून आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ची मेहनत, सगळ्यासाठी सलाम. फारच सुंदर.
22 Jun 2014 - 10:52 am | आतिवास
लेखमालिका पूर्ण झाली की मगच ती (सलग) वाचणार आहे, तोवर पास :-)
22 Jun 2014 - 11:25 am | एस
वरच्या प्रत्येक प्रतिसादाला सलाम. तुमचे लेख मला एक छायाचित्रकार म्हणून किती जळवतात हे सांगू शकत नाही. मी तुम्हांला ISO4000 + f/0.95 + BULB + EC+5.0 देऊन ब्लोआउट करून टाकणार आहे. :-)
बाकी हाही लेख आपल्या लौकिकास साजेसा आहे. (वाक्प्रचार वाङ्मय चौर्य श्रेय - चौरा)
22 Jun 2014 - 2:13 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुमच्यासारख्या फोटोग्राफीतल्या जाणकाराकडून असा सुंदर प्रतिसाद म्हणजे काय म्हणावे ! असाच लोभ असु द्या.
खरं तर मला फोटोग्राफितले फार काही कळत नाही. डोळ्याला काही भावले की त्याला शक्य तितके कॅमेर्याच्या फ्रेममध्ये पकडून ठेवणे यापलिकडे माझे तांत्रिक ज्ञान जात नाही. माझ्या मनाला भावलेले प्रेक्षक-वाचकांपर्यंत बर्यापैकी पोहोचले की माझा आनंद व्दिगुणीत होते, इतकेच. त्यात कॅमेर्याच्या तांत्रिक ताकदीचा माझ्या कलाकारीपेक्षा जास्त मोठा वाटा आहे हे नक्की.
22 Jun 2014 - 1:18 pm | वेल्लाभट
काय मस्त आहे हो !!
22 Jun 2014 - 2:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
22 Jun 2014 - 1:57 pm | माझीही शॅम्पेन
"पुरा बेसाकीचे काही संरक्षक" याना कपडे का घातलेत ?
22 Jun 2014 - 10:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
बालीत सर्वच पुतळ्यांना आणि देवांच्या सिंहासनांना, इतकेच काय तर मोठ्या पवित्र समजल्या जाणार्या वृक्षांनाही लुंगीसारखे सरोंग हे वस्त्र नेसवतात... सणासुदीला तर नक्कीच.
23 Jun 2014 - 12:04 pm | बॅटमॅन
ती तमिळ पद्धत असावी. तमिळनाडूतही कैक ठिकाणी देवळांत मूर्त्यांना कपडे नेसवले जातात-मुख्य देव नव्हे तर अन्य संरक्षक किंवा उपदेवांना म्हणतोय.
22 Jun 2014 - 2:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
मधुरा देशपांडे, आतिवास आणि माझीही शॅम्पेन : अनेक धन्यवाद ! तुमच्या सहलितील सहभागाने पुढेचे वर्णन लिहीण्यास उत्साह मिळत आहे.
22 Jun 2014 - 3:19 pm | प्यारे१
डोळे निवले... अप्रतिम!
इ ए प्रत्येक गोष्ट निगुतीनं सजवतात.
पी एम पी चा असाही फायदा होतो काय? ;)
22 Jun 2014 - 6:47 pm | विवेकपटाईत
लेख आणि माहिती आवडली. खर म्हणावे तर बाली म्हणजे स्वर्ग. निसर्गरम्य, स्वच्छ नितळ वातावरण. भरपूर फुले झाडे, जुने मंदिर आणि माकडे ही. भारतातच आल्या सारख वाटते. मला ही बालीच्या समुद्र किनार्यावर एक अनुभव आला होता
बालीचा समुद्र किनारा आणि जलपरी/ एक अनुभव
22 Jun 2014 - 10:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्रशांत आवले आणि विवेकपटाईत : धन्यवाद !
22 Jun 2014 - 10:09 pm | मदनबाण
शब्द कमी पडु लागले आहेत आता... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dick Dale & The Del Tones"Misirlou" 1963
23 Jun 2014 - 12:07 pm | बॅटमॅन
निव्वळ अप्रतिम. बघूनच डोळ्यांचे पारणे फिटले _/\_
एक बाऽरीक करेक्शन: जावा बेटात हिंदू लोकांचे प्रथम आगमन इ.स. १२८४ च्या बर्याच अगोदर झालेले होते. जावानीज रामायणाची तारीख ८७० इ.स. आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Kakawin_Ramayana
अवांतरः हे रामायण म्ह. भट्टिकाव्याचे भाषांतर आहे असे म्हटल्या जाते. भट्टिकाव्य म्ह. नावापुरते रामायण, पण त्यातील प्रत्येक श्लोकाद्वारे पाणिनीच्या व्याकरणाचा एकेक नियम सोदाहरण स्पष्ट केलेला आहे.
23 Jun 2014 - 3:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
पुरा बेसाकीमध्ये हिंदू उपासना १२८४ साली जावातील हिंदूंच्या पहिल्या आगमनाबरोबर सुरू झाली असेही मानले जाते.
हे वाक्य जावा बेटातील हिंदू धर्माच्या आगमनाबद्दल नसून बाली बेटावरील बेसाकी मंदिरामध्ये हिंदू उपासना सुरु होण्याबद्दल आहे. अर्थात त्यातही जरासा गोंधळ आहे. तिकडे लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद !
ते वाक्य खालील प्रमाणे दुरुस्त केले आहे...
"पुरा बेसाकीमध्ये हिंदू उपासना १२८४ साली जावातील हिंदू साम्राज्याच्या बालीवरील यशस्वी आक्रमणांच्या सुरुवातीने सुरू झाली असेही मानले जाते."
अजून थोडेसे...
तेराव्या शतकापूर्वीची जावानीज साम्राज्ये मुख्यत: सुमात्रा आणि जावा बेटावरच मर्यादित होती. आधुनिक इंडोनेशियाच्या बहुतेक सर्व बेटांवर सत्ता गाजविणारे महापहित (१२९३ -१५२०) हे पहिले साम्राज्य होते. त्याने सर्व बाली बेटाला १३४३ मध्ये आपल्या अधिपत्याखाली आणले. तरीही बालीत हिंदू धर्म जोमाने वाढीस लावण्याचे आणि कायम ठेवण्याचे बरेचसे श्रेय महापहित साम्राज्याच्या र्हासानंतर जावातून बालीत स्थलांतरीत (आणि एकवटीत) झालेल्या राजेसरदारांना, धर्मपंडीतांना आणि कलाकारांना दिले जाते.
23 Jun 2014 - 3:54 pm | बॅटमॅन
अंमळ घोळच झाला खरा. माहितीकरिता धन्यवाद!
बाकी मध्ये कधीतरी तुम्ही सांगितल्याप्रमाणे जावाहून बालीला एकजण कुणी गेला तो परत येईल अशी काहीशी दंतकथा आहे त्याची या निमित्ताने आठवण झाली.
23 Jun 2014 - 3:39 pm | स्पा
अहाहा , काय अप्रतिम देश आहे
फोटो पण सुरेख, एक्का काका , हे फुल साईझ मध्ये बघायला मिळतील काय ?
इथे खूप छोटे छोटे आलेत
23 Jun 2014 - 3:45 pm | डॉ सुहास म्हात्रे
सर्व चित्रे मूळ स्वरूपात बघायला: चित्रावर राईट क्लिक करून "Open image in new tab" निवडा. हाकानाका ! :)
23 Jun 2014 - 3:42 pm | म्हैस
१ प्रश्न
तुम्ही एकूण किती लोक गेला होतात ? तोतल खर्च किती आलाय ? तुमचं तुम्ही सगळं arrange केलंत कि travel कंपनी च्या मदतीने ? आणि guide कसा मिळवायचा ?
23 Jun 2014 - 3:49 pm | सूड
हा ही भाग सुरेख!! पुभाप्र.