===================================================================
मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९(समाप्त)...
===================================================================
... आम्ही दोन एक तासाने सुरू होणार्या भटकंतीआधी थोडा आराम करायला आडवे झालो!
ताजेतवाने होऊन हॉटेलच्या स्वागतकक्षात आलो. कार्तिक तयारच होता. आम्ही फेरफटक्यासाठी बाहेर पडलो. पाच मिनिटांचा प्रवास झाला असेल नसेल, या कलाकृती दिसल्या आणि थांबून फोटो काढल्याशिवाय राहवले नाही...
एका प्रवेशव्दाराजवळच्या कलाकृती
.
गरूडावर आरूढ विष्णू
.
असुर
या प्रकाराची शिल्पे सर्व बालीभर सतत दिसतात. मंदिरांची, रिसॉर्ट्सची आणि मोठ्या इमारतींची आवारे व व्दारे तसेच सर्व मोठे चौक तेथील आखीव रेखीव आणि सौंदर्यपूर्ण शिल्पांनी सजवलेले आहेत. एक विशेष म्हणजे उघड्यावरची दगडी शिल्पे घासून पुसून साफ न करता त्यांच्यावर नैसर्गिकपणे वाढलेले शेवाळ तसेच ठेवले जाते. हाच प्रकार देवळातल्या देवांच्या सिंहासनांच्या बाबतीतही असतो.
अजून एक विशेष म्हणजे बालीत केवळ देवांचेच पुतळे आहेत असे नाही. तितकेच किंवा कदाचित त्यापेक्षा जास्त संखेने देवळांच्या आणि इमारतींच्या व्दारांचे संरक्षण करणार्या असुराचे पुतळे आहेत. म्हणजे सुर विरुद्ध असुर असा संघर्ष दिसण्यापेक्षा हे एक प्रकारचे सुरासूर सहजीवन असल्यासारखेच दिसते ! मात्र असुरांच्या पुतळ्यांना देवळाच्या आवारांत अथवा चौकाच्या मध्यभागातले मानाचे स्थान मिळत नाही. या सर्व मूर्तींचे आकार त्यांच्या वापराप्रमाणे लहानमोठे असतात... १५-२० सेंटिमीटर उंचीच्या इमारतींच्या आतल्या शोभेच्या मूर्तींपासून ते उघड्या आकाशाखालच्या दोन किंवा जास्त मीटर उंचीच्या मूर्ती दिसतात.
घरात ठेवण्यासाठी बनविलेल्या मूर्तींसाठी दगडाशिवाय लाकूड, कातडे आणि वेगवेगळ्या धातूंचाही वापर केला जातो. अश्या प्रत्येक माध्यमावर प्रावीण्य असलेल्या कलाकारांची वेगवेगळी गावे आहेत. त्यांना भेट देणे हे बाली पर्यटनातील एक आकर्षण आहे. यातील काही प्रसिद्ध गावांना आपण आपल्या भटकंतीत भेट देणार आहोत.
पुरा उलुवातु (उलुवातु मंदिर)
बालीच्या दक्षिणेला अंड्याच्या आकाराचा एक छोटा भूभाग जिंबारन नावाच्या जमिनीच्या चिंचोळ्या पट्टीने मुख्य बेटाला जोडलेला आहे. हे दोन्ही भूभाग मिळून बुखित व्दीपकल्प बनलेले आहे. बुखितच्या पूर्व टोकावर भारतीय महासागराच्या किनार्यावर पुरा उलुवातु उर्फ उलुवातु मंदिर आहे.
हे मंदिर बाली बेटाच्या किनार्यांवर असलेल्या मुख्य नऊ दिशादर्शक मंदिरांपैकी एक आहे. प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या या मंदिराचा एंपू कुतुरान नावाच्या जावातल्या एका ऋषीने अकराव्या शतकात जीर्णोद्धार केला. त्यानंतर १४८९ मध्ये पूर्व जावावरून आलेल्या डांग ह्यांग निरर्थ या नावाच्या ऋषीने तेथे पद्मासन देवळांची स्थापना केली. याच ऋषीने बालीतील देवळांत पद्मासन (निराकार "संघयांग विदी वसा" किंवा "अचिंत्य" या देवासाठी कलापूर्ण दगडी कोरीवकाम असलेले कमलासन) स्थापन करण्याची प्रथा पाडली. निरर्थ ऋषीला उलुवातुमध्ये मोक्षप्राप्ती झाली असे सांगितले जाते. बालीत जागोजागी असलेल्या पद्मासनांना धार्मिक महत्त्व तर आहेच. पण त्यांच्यावरील कलापूर्ण कोरीवकामांमुळे ती कलाकृती म्हणूनही प्रेक्षणीय आहेत...
...
...
पद्मासनांचे विविध प्रकार
उलुवातु मंदिराच्या आवारात शिरण्यापूर्वी मार्गदर्शक आपल्याला तेथे असलेल्या वानसेनेपासून सावध राहण्याचा इशारा देतो. आजूबाजूला घोटाळत राहून पर्यटकांच्या हातातल्या खाण्यापिण्याच्या वस्तू, कॅमेरे, पर्स, चष्मे, इत्यादी एखाद्या कसलेल्या पाकिटमाराच्या सफाईने काढून घेऊन झाडाच्या टोकावर पळून जाण्यात ही सेना पटाईत आहे...
वानरसेना
बालीतील देवळांच्या अंतर्भागात फक्त हिंदूंनाच आणि तेही केवळ पूजेअर्चेसाठीच प्रवेश मिळतो. बालीतील मंदिरांच्या आवारात प्रवेश करण्याअगोदर आपली वेशभूषा देवळाच्या पावित्र्याला साजेशी असणे आवश्यक असते. अपुरे कपडे परिधान केलेल्या पर्यटकांसाठी देवळाच्या व्दाराबाहेर निळ्या-किरमिजी, भगव्या किंवा पिवळ्या रंगाची लुंगीसारखी वस्त्रे (सरोंग) मोफत वापरायला मिळतात...
अंगभर कपडे असल्याने (आणि कार्तिकने अभिमानाने "हे हिंदू आहेत" असे सांगितल्यानेही असावे !) आम्हाला एक पिवळी फीत कमरपट्ट्यासारखी बांधली तरी पुरे असे सांगितले गेले.
देवळाच्या जवळपास गेल्यावर जमीन एकाएकी ७० मीटर खाली कोसळते आणि आपण एका उंच आणि लांबच लांब नागमोडी कड्याच्या टोकावर पोहोचलो आहोत हे ध्यानात येते...
मंदिराजवळचा कडा, सफेद वाळूचा किनारा आणि त्याच्या पायथ्याला धडका देणारा भारतीय दुग्ध-महासागर
हजारो वर्षांपासून समुद्र, वारा आणि पावसाच्या आघातांनी या चुनखडीच्या दगडांनी बनलेल्या किनार्याच्या होणार्या झिजेचा हा परिणाम आहे. मात्र यामुळे त्या कड्याच्या टोकावरचे हे मंदिर एक नेत्रदीपक स्थळ झाले आहे.
येथील चुनखडीच्या खडकांची झीज होऊन बनलेले पांढर्याशुभ्र वाळूचे सुंदर किनारे आणि खवळलेल्या भारतीय महासागरातील सर्फिंगसाठी योग्य अश्या लाटा हे सुद्धा पाश्चिमात्य पर्यटकांना खेचणारे महत्त्वाचे विशेष आहेत.
या मंदिराच्या मुख्य व्दाराच्या बाजूला संरक्षक म्हणून गणेशमूर्ती आहेत...
व्दारपाल गणेश
.
अजून एक गणेशमूर्ती आणि इतर कोरीवकाम
हिंदू असल्याचा (आणि कार्तिकच्या वशिल्याचा) फायदा आम्हाला बर्याच ठिकाणी देवळांत नेहमीपेक्षा जरा जास्त खुला प्रवेश मिळण्यासाठी झाला. मंदिरात अनेक कोरीवकामांचे नमुने आहेत. त्यापैकी काही खाली देत आहे...
असुर व्दारपाल
.
अंतःपुराचे व्दार
.
मंदिराच्या चौथर्याचा वाहक आणि रक्षक
.
खांबावरचे कोरीवकाम
.
दगडी खिडकीवरचे कोरीवकाम
मंदिराच्या दोन्ही बाजूंच्या कड्यांलगत बर्याच लांबीपर्यंत पायवाटा बनवलेल्या आहेत. उसळणार्या सागराचे दर्शन घेत पायवाटेवरून बरेच अंतर कापल्यानंतर मंदिर असलेल्या पूर्ण कड्यासकट मंदिराचे मनमोहक दर्शन होते...
कड्यालगत असलेली एक पायवाट
.
पायवाटेवरून दूरवरून दिसणारे उलुवातु मंदिर आणि त्याचा कडा
हजारो वर्षे निसर्गाचा आघात झेलत झिजत जाणारा हा भूभाग आता फारच अस्थिर आणि धोक्याचा होऊ लागला आहे. मंदिर असलेला कडा झिजून अगदी मंदिराच्या आवाराला टेकला आहे. पुढच्या काही वर्षांत / दशकांत तो तुटून मंदिराला धोका होऊ शकतो...
मंदिराच्या कुसापर्यंत झीजलेला कडा
.
समुद्रात गिळंकृत होत जाणारा किनारा
बालीतल्या मोठ्या मंदिरांपैकी एक नसले तरी कड्याच्या टोकावर बसलेले उलुवातु मंदिर उंच खडे कडे, कड्यांच्या लगत असलेल्या लांबच लांब पायवाटांवरून चालताना होणारे मंदिराचे आणि सागराचे मनमोहक दर्शन, आणि कड्यांवरून दिसणारा सूर्यास्त अशा अनेक कारणांनी एक कायम लक्षात राहणारे स्थळ बनले आहे.
===================================================================
केचक नृत्यनाट्य
उलुवातु मंदिराला संध्याकाळी भेट देण्याने अजून एक मोठा उद्देश सफल होतो. तो म्हणजे तेथे होणार्या केचक नृत्यनाट्याचा कार्यक्रम पाहणे.
मंदिराशेजारच्या एका खड्या कड्याच्या टोकावर, वर मोकळे आकाश, मागे अथांग हिंदी महासागर आणि मावळतीला जाणारा सूर्य अशी जगावेगळी "नेपथ्य आणि प्रकाशयोजना" असलेल्या खुल्या रंगमंचावर हा कार्यक्रम सादर केला जातो!...
केचकचा खुला रंगमंच
पूर्वी रोगाच्या साथीपासून गावाचे रक्षण करण्यासाठी केल्या जाणार्या "संघयांग" या धार्मिक कर्मकांडाची केचक ही सुधारलेली आवृत्ती आहे. त्यात रामायणाचे काही भाग (वायांग वोंग) सादर केले जातात. ५०,००० ओळींच्या मूळ बाली रामायणाच्या संहितेचा काही भाग पर्यटकांसाठी सादर केल्या जाणार्या या कार्यक्रमात दाखवला जातो.
या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य असे की यात वाद्ये वापरली जात नाहीत. त्याऐवजी एक ७० सहाय्यक कलाकारांचा ताफा तोंडाने "चकं-चकं, चकं-चकं" असा आवाज काढून पार्श्वसंगीत देतो. या जगावेगळ्या वाद्यसमुहाला तोंडाने विशिष्ट आवाज काढून मार्गदर्शन करणारा एक दिग्दर्शक असतो. या पार्श्वसंगीतामुळेच या नृत्याला केचक हे नाव पडले आहे. ही मंडळी नाट्यातल्या वेगवेगळ्या प्रसंगांत जंगलातली झाडे, लक्षमणरेखा, गरूडाचे साथी, रावणाचे साथी, वानरसेना, इत्यादी बनून नाटकातल्या सहकलाकारांचे आणि "प्रॉपर्टी"चेही काम करतात...
खचाखच भरलेल्या प्रेक्षागृहाचा एक भाग
.
व्दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात
.
सहकलाकार + वाद्यवृंद : एकावर एक फुकट ;)
.
वनवासात सीता आणि राम
.
सुवर्णमृगाच्या रूपातला मारीच दैत्य आणि राम
.
सीता लक्ष्मणाला रामाच्या मदतीला जायला सांगते
.
सीताहरण
.
जटायूवध
.
राम-लक्ष्मणाचा शोक
.
'आनोमान'चे (हनुमानाचे) आगमन
.
अशोकवनातील सीता
.
हनुमानाच्या मर्कटलीला
.
अशोकवनातील सीता-हनुमान भेट
.
या नाटकात सूर्याची फार फार महत्त्वाची भूमिका असते... योग्य "टायमिंग" साधून तो "एक्झिट घेतो" आणि नाट्याचा पुढचा प्रवेश सुकर होतो...
सूर्याने योग्य टायमिंग साधून घेतलेला एक्झिट
सुर्याजीरावांच्या एक्झिटने झालेल्या अंधारातील पुढच्या प्रवेशात रावणाचे सेवक "आनोमान" च्या शेपटीला आग लावतात आणि मग तो लंकादहनाचे तांडव सुरू करतो...
मग राम रावणवध करून सीतेची सुटका करतो. सरतेशेवटी, प्रेक्षकांनी केलेला टाळ्यांच्या कडकडाटाचा सत्कार स्वीकारायला सर्व कलाकार रंगमंचावर येतात. आठवण म्हणून प्रेक्षकांना कलाकारांबरोबर फोटो काढता येतात...
तिकिटाचे ४०,००० रुपिया (२०० भारतीय रुपये) व्याजासकट दामदुपटीने वसूल होतात असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. हा जगावेगळा रामायणाचा प्रयोग पाहिल्याशिवाय बालीची भेट पुरी होऊच शकत नाही.
केचक नृत्याची चित्रफीत (जालावरून साभार)...
("Kecak Dance" हे शब्द वापरून यु ट्युब विचारणा केल्यास अजून बरेच व्हिडिओ सापडतील.)
.
मुख्य कलाकारांचे आकर्षक पोशाख; "चकं-चकं-चकं-चकं" आवाजाचं पार्श्वसंगीत; महासागर व कड्याचे नैसर्गिक नेपथ्य; आणि प्रत्यक्ष सूर्यमहाराजांचा नेपथ्ययोजनेत सहभाग यांनी समृद्ध केलेला हा अनोखा नृत्यनाट्यप्रयोग ! रामायणाची कथा माहीत नसलेल्या पर्यटकांनाही तो पाहून एक अनोख्या अनुभूतीचा अनुभव नक्कीच येत असणार.
परतताना जंबारनच्या समुद्रकिनार्यावरील एका हॉटेलमध्ये जेवणाला थांबलो. त्याच्या स्वागतकक्षात ही गणेशमूर्ती होती...
समुद्राच्या लाटांपासून दोन हाताच्या अंतरावर असलेल्या वाळूवर टाकलेल्या टेबलांवर बालीच्या समुद्रान्नाची चव घेताना आजचा दिवस सार्थकी लागल्याचे समाधान मनात होते.
(क्रमशः )
===================================================================
मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९(समाप्त)...
===================================================================
प्रतिक्रिया
18 Jun 2014 - 1:29 am | नंदन
'पूर्वरंग' वाचल्यापासून केचक नृत्याबद्दल उत्सुकता होती, तेव्हा त्याचे फोटो पाहून मस्त वाटले. उलुवातु मंदिराचे आणि तिथल्या कोरीव कामाचे फोटोही फार सुरेख!
('उलुवातु' आधी तद्भव शब्द असू शकेल असं वाटलं होतं, पण जालावर शोधल्यावर उलु = कडा/टोक/शिर, वातु = दगड अशी माहिती मिळाली.)
18 Jun 2014 - 1:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
बरोबर !
पुरा = मंदिर; उलुवातु = कड्याचे टोक; पुरा उलुवातु = कड्याच्या टोकावरचे मंदिर :)
18 Jun 2014 - 1:41 am | आयुर्हित
अप्रतिम!!!!
खरं तर हा शब्द देखील तोकडा वाटतोय, इतके सुरेख फोटो आणि वर्णन!!!
18 Jun 2014 - 2:06 am | रेवती
वर्णन व फोटू सुंदर आहेत. येथे समुद्र आहे म्हटल्यावर समुद्री जीव जेवणात मिळणं ठीक आहे पण शाकाहारींसाठी काही मिळते का?
18 Jun 2014 - 1:46 pm | डॉ सुहास म्हात्रे
बालीत शाकाहारी जेवणाची समस्या नाही. बालीतील पुजारी मंडळी (ब्राच्मन) शुद्ध शाकाहारी आहेत.
18 Jun 2014 - 6:33 pm | रेवती
हां, मग ठीक आहे.
18 Jun 2014 - 2:52 am | खटपट्या
खूपच छान माहीती आणि फोटो. दगडी खिड्कीवरचे नक्शीकाम तर अशक्य वाट्तय !!
18 Jun 2014 - 7:00 am | मदनबाण
नेहमी प्रमाणेच म्हणतो... झ-का-स ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बगदाद धोक्यात
18 Jun 2014 - 7:05 am | मदनबाण
नेहमी प्रमाणेच म्हणतो... झ-का-स ! :)
गरूडावर आरूढ विष्णूची मूर्ती विशेष आवडली.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बगदाद धोक्यात
18 Jun 2014 - 9:03 am | यशोधरा
फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले. पूर्वरंगची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही.
18 Jun 2014 - 9:13 am | कवितानागेश
मस्त फोटो. लन्कादहनाचा फोटो पण छान आहे. प्रत्यक्ष बघताना अजून इफेक्टिव्ह होत असेल.
18 Jun 2014 - 9:16 am | मुक्त विहारि
झक्कास...
पु भा प्र.
18 Jun 2014 - 10:08 am | प्रमोद देर्देकर
खुप छान माहिती.
18 Jun 2014 - 10:16 am | चित्रगुप्त
व्वा. फार पूर्वी पुलंच्या लेखातून केचक नृत्याबद्दल कळले होते. त्यानंतर आज प्रथमच त्याची चित्रफीत बघितली. नेहमीप्रमाणेच सुंदर फोटो आणि लेख. तुमच्या चिकाटीचे कौतूक वाटते.
18 Jun 2014 - 11:00 am | मितान
व्वा ! सध्या प्रवासवर्णनांची मेजवानी आहे. माझ्यासाठी त्यातली ही मेन डीश ! :)
वर यशोधराने म्हटल्याप्रमाणे पूर्वरंग आठवलेच !
18 Jun 2014 - 11:14 am | अत्रुप्त आत्मा
आहाहाहाहाहाहाहा........! काय काय पाहू,कुठे कुठे मी राहू?..
केचक नृत्य...लै लै भारी!
सुवर्णमृगाच्या रूपातला मारीच--हा अत्यंत महारीच वाटतोय! ;)
आनोमान आणि त्याचं दहन-तांडव! हे तर फक्त आणि फक्त प्रत्यक्ष बघितल्यानीच समाधान देइल,याची खात्री वर्णन आणि फोटोवरून पटते आहे.
हा धागा अत्यंत रोमांचित करणारा आहे......... __/\__
18 Jun 2014 - 1:57 pm | डॉ सुहास म्हात्रे
बालीची सफर नक्की कराच ! संस्कृती आणि निसर्गसौंदर्याचा इतका सुंदर मिलाफ दुसर्या जागेवर फार क्वचितच बघायला मिळतो !!
18 Jun 2014 - 11:20 am | दिपक.कुवेत
खुपच छान माहिती आणि त्याबरोबरचे फोटो देखील. बॅंकॉक मधे सुद्धा काहि ठिकाणी जो देवळांचा भाग आहे तिथे देखील फुल पॅन्ट घालणे आवश्यक आहे. नसल्यास बाहेर भाड्याने लेंगे मिळतात.
18 Jun 2014 - 12:11 pm | इशा१२३
केचक नाचाचे वर्णन पुर्वी पुर्वरंग मधे वाचले होतेच.आता फोटोही बघायला मिळाले.बाकी "आनोमान" चा मेकअप मात्र भलताच उग्र.आपल्या हनुमानाची सर नाही.
18 Jun 2014 - 12:38 pm | रायनची आई
खूप छान लिहिलय..आम्ही काही वर्षापूर्वीच बाली ला जाउन आलो आहोत..ती सगळी ट्रिप आठवते आहे..आम्हीपण घरूनच सगळ अरेंज करून गेलो होतो..दहा दिवस तिथे फिरलो..उबुड मंकी फॉरेस्ट, ऊलुवाटू, गुहा गजः, बातुर लेक, तन्हा लोत टेंपल, सानुर बीच, पुरा बेसखी टेंपल, बाली सफारी सर्व पाहीले...जिमबारेन बीच ला समुद्रालगत सी फुड खाल्ल. त्याची चव अजुन आठवते..मधे जूलीया रॉबर्ट्स चा पिक्चर येऊन गेला ना "ईट प्रे लव" त्यात पण बालीचे चित्रण खूप सुंदर केले आहे..माझा नवरा तर बाली च्या प्रेमातच पडला आहे.
18 Jun 2014 - 1:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
आयुर्हित, खटपट्या, मदनबाण, यशोधरा, लीमाउजेट, मुक्त विहारि, प्रमोद देर्देकर, चित्रगुप्त, मितान, दिपक.कुवेत, इशा१२३ आणि रायनची आई : तुमच्या सहभागाने सहलिची मजा व्दिगुणीत होत आहे !
18 Jun 2014 - 2:09 pm | प्यारे१
अफाट!
18 Jun 2014 - 2:21 pm | सूड
मस्तच !! पुभाप्र.
18 Jun 2014 - 2:22 pm | सस्नेह
केचक नृत्य खरोखर रोचक आहे !
18 Jun 2014 - 3:56 pm | संजय क्षीरसागर
नेमकं टायमिंग जमवून काढलेले फोटो! धन्यवाद.
18 Jun 2014 - 5:06 pm | पिलीयन रायडर
काय सुंदर फोटो आहेत!!! आता तर जायचंच बालीला...!!
18 Jun 2014 - 5:37 pm | बॅटमॅन
पूर्वरंगची हटकून आठवण आली. अप्रतिम फटू आणि रोचक वर्णन!!!!! पुलंच्या पुस्तकातले वर्णन मूर्तिमंत साकार झालेले पाहून फारचफार गार्गार वाटलं. :)
18 Jun 2014 - 5:43 pm | प्रचेतस
उलुवातु मंदिर, केचक नृत्य, तिथले कडे, तिथला समुद्र सर्वच आवडलं.
तिथले द्वारपालांचे चेहरे हे मला सिंहमुखाशी साधर्म्य असलेले वाटत आहेत. कदाचित इथल्या किर्तीमुखांवरून प्रेरणा घेऊन अशी शिल्पे घडवली जात असावीत.
आमच्या खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरावरची ही कोरीव दगडी खिडकी बघा. किती सारखी. :)
18 Jun 2014 - 7:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
तिथले द्वारपालांचे चेहरे हे मला सिंहमुखाशी साधर्म्य असलेले वाटत आहेत. कदाचित इथल्या किर्तीमुखांवरून प्रेरणा घेऊन अशी शिल्पे घडवली जात असावीत.
आमच्या खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरावरची ही कोरीव दगडी खिडकी बघा. किती सारखी.
दक्षिणपूर्व आशियाच्या सगळ्याच देशांवर भारतिय संस्कृतीचा खोलवर प्रभाव आहे. हे केवळ विचारांचे आदानप्रदान किंवा व्यापारी संबद्ध नव्हते तर त्याकाळात तेथे जाऊन धर्म, राजसत्तेचा आणि कलेचा वारसा घेऊन जाणार्या दर्यावर्दी भारतियांचा हजारो वर्षांचा इतिहास आहे. त्या देशांतील सर्व धर्मांना छेद देत जाणारा लोकजीवनात असलेला रामायण-महाभारताचा आणि संस्कृत भाषेचा प्रभाव असेच नाही तर तिथल्या जनतेत असलेले १०-१५% भारतीय Y-क्रोमोसोम्स हा पण त्या वस्तुस्थितीचा ठाम शास्त्रिय पुरावा आहे.
या सर्व गोष्टी त्या देशांत, अगदी सद्या मुस्लीम असलेल्या देशांमध्येसुद्धा, ऐतिहासिक वारसा म्हणून सहजपणे आणि अभिमानाने सांगितल्या जातात आणि संग्रहालयांत जपून ठेवल्या जातात. स्वार्थी राजकारण, स्वतःबद्दलची कमीपणाची भावना (लो सेल्फ एस्टीम) किंवा तद्दन अज्ञान यामुळे भारतात दुर्दैवाने अगदी याविरुद्ध अवस्था आहे !
पंधराव्या शतकापासून भारतात व तेथे झालेल्या मुस्लीम आक्रमणांमुळे आणि नंतर पाश्चिमात्य वसाहतवादामुळे ही प्रक्रिया खंडली. वसाहतवाद संपल्यावर बदललेल्या समिकरणांमुळे ती प्रक्रिया पुनःस्थापीत करण्यात कोणालाच रस राहिला नव्हता. तरीसुद्धा तेथिल जनमानसावरचा तो ठसा अजूनही कायम आहे हे विशेष.
18 Jun 2014 - 10:06 pm | प्रचेतस
धन्यवाद.
भारतीय संस्कृती खोलवर झिरपलेली दिसतेच.
आपल्या देशांत मात्र प्राचीन वास्तू अनास्थेचे बळी ठरत आहेत.
18 Jun 2014 - 9:09 pm | रेवती
क्या बात है! बाली आणि खिद्रापूर येथील दोन्ही कोरीवकामे सुंदर आहेत आणि सारखेपणाही आहे.
19 Jun 2014 - 9:49 am | चौकटराजा
@ वल्ली ,आपल्याकडे हळेबीडू , बेलूर, पत्तडकल ई ठिकांणी अशा खिड्क्यात वेगवेगळ्या फुलांच्या आकाराचा वापर केलेला दिसेल.
@ ईस्पिक साहेब , धागा वाचून इस्पिकरावानी आमचे इप्सित साध्य केले असे वाटतेय !
19 Jun 2014 - 9:52 am | प्रचेतस
तसे बरेच ठिकाणी दिसते. अगदी हिनयानकाळापासून फुलाफुलांच्या नक्षीकामाची पद्धत चालत आली आहे.
20 Jun 2014 - 4:28 am | खटपट्या
हे एक अजून अशक्य कोरीव काम. कोणते टूल्स वापरले असतील ? संगमरवरी जाळ्या बऱ्याच पाहण्यात आल्यात पण काळ्या दगडात केलेली जाळी म्हणजे जबरीच. (गणपती मध्ये थर्माकोल मध्ये जाळी बनवायला नाकी नऊ येतात)
18 Jun 2014 - 6:15 pm | अस्मी
आह्ह्हाहा अतिशय सुंदर फोटो आणि ओघवतं वर्णन!!!
उलुवातु मंदिर, कडा आणि समुद्राचे फोटो तर खासच. केचक नृत्य आणि त्याच्या नेपथ्याचे वर्णन पण मस्त. अगदी तो समुद्र, मावळतीचा सूर्य सग्गळं डोळ्यासमोर आहे असं वाटलं.
18 Jun 2014 - 8:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्रशांत आवले, सूड, स्नेहांकिता, संजय क्षीरसागर, पिलीयन रायडर, बॅटमॅन आणि अस्मी : सहलितील सहभागासाठी धन्यवाद !
18 Jun 2014 - 10:25 pm | शिद
जबरा प्रवासवर्णन तितक्याच नयनरम्य फोटोंसहीत... मस्तच.
बालीमधील रामलिला पण झकासच दिसतेय. रावण व हनुमानाचे कॅरेक्टर एकदम जमून आलं आहे.
पु.भा.प्र.
18 Jun 2014 - 11:45 pm | सखी
अप्रतिम फोटो आणि केचक नृत्याचे वर्णन ऐकुन तर लगेच तिथे जावेसं वाटतयं, कड्याचा फोटो फारच सुरेख आहे, तिथे प्रत्यक्ष काय अनुभव येत असेल ही फक्त कल्पनाच करु शकते.
19 Jun 2014 - 9:40 am | पैसा
सगळंच सुंदर आहे. केचकबद्दल वाचताना 'पूर्वरंग'ची आठवण आलीच!
19 Jun 2014 - 11:15 am | डॉ सुहास म्हात्रे
रेवती, चौकटराजा, शिद, सखी आणि पैसा : अनेक धन्यवाद !
19 Jun 2014 - 1:46 pm | म्हैस
सुंदर , मस्त , अप्रतिम . आयुष्यात एकदा बालीला जायचं ठरलं. आत्तापासून saving सुरु .
20 Jun 2014 - 12:16 am | डॉ सुहास म्हात्रे
बालीला जरूर भेट द्या, ती सहल नक्कीच सुखकारक होईल. तुमच्या सहलीसाठी शुभेच्छा !
19 Jun 2014 - 3:13 pm | म्हैस
आत्ता जो भारत आहे तो अर्यावार्ताचा केवळ १ तुकडा आहे . भारत , पाकिस्तान , बांगलादेश, अफगाणिस्तान, इराण , इंडोनेशिया , मलेशिया, थायलंड, नेपाल, भूतान , तिबेट , कंबोडिया असा सगळा अखंड हिंदू भाग होता. पुढे बौद्ध आणि इस्लाम धर्मामुळे ह्या भागाचे तुकडे होवून वेगवेगळे देश निर्माण झाले . इस्लाम धर्माला तर इतर कोणताच धर्म आणि त्यांची संस्कृती मान्य नसल्यामुळे अतिशय सुंदर सुंदर sculpures , चित्रे , ग्रंथ , विद्यालये नष्ट करण्यात आली . हा धर्म नसता तर आज जग खूप वेगळं असलं असतं
20 Jun 2014 - 12:57 am | मराठे
कड्यावरच्या मंदीराचा फोटो जीवघेणा आहे. केचकचे नुसते फोटो बघूनच एवढं रोमांचीत वाटतंय, प्रत्यक्ष बघताना काय होत असेल.
21 Jun 2014 - 6:18 pm | त्रिवेणी
वाचते आहे ही पण मालिका. अतिशय सुंदर फोटो प्रेमात पडावे असे.
पण खादाडीचे फोटो का नाही टाकले. ते पण टाका बर.
आणि टुर कशी प्लॅन केली.