===================================================================
मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९(समाप्त)...
===================================================================
इंडोनेशिया
इंडोनेशिया हा एक जगावेगळा देश आहे... ५० लाख चौ किमी पाण्याच्या क्षेत्रात सर्व मिळून २० लाख चौ किमी जमिनीचे क्षेत्रफळ असलेल्या १७,००० पेक्षा जास्त बेटांनी तो बनलेला आहे.
त्यातले सर्वात मोठे बोर्निओ नावाचे ७,४३,३३० चौ किमी क्षेत्रफळाचे आणि दोन कोटी लोकवस्ती असलेले जगातले तीन क्रमांकाचे बेट आहे तर अनेक लहान बेटे म्हणजे केवळ समुद्राच्या पाण्यातून जेमतेम काही सेंटिमीटर वर डोके काढणारी प्रवाळ बेटे आहेत.
इंडोनेशियाच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या आचे प्रांताची (तोच तो, जो २६ डिसेंबर २००४ ला तेथे झालेल्या भूकंपामुळे आणि भारतच नव्हे आफ्रिकेच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचलेल्या त्सुनामीच्या लाटांमुळे कुप्रसिद्ध झालेला भूभाग) सीमा भारतातील निकोबार बेटसमूहापासून केवळ २०० किलोमीटरच्या आसपास आहे तर पूर्वेकडच्या पापुआ या प्रांताची सीमा रेखांशांत पाहिली तर जपानच्या पूर्व सीमेच्या बरोबरीने उभी आहे ! हे पूर्वपश्चिम अंतर साधारण ५००० किमी चे आहे आणि त्यामुळे या देशात तीन स्थानीक प्रमाणवेळा आहेत.
इंडोनेशियाच्या उत्तरेला असलेल्या समुद्रापलीकडे ब्रह्मदेश, मलेशिया, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, चीन, दोन कोरिया, जपान, इत्यादी देशांची साखळी आहे; तर दक्षिणेकडे भारतीय महासागर आणि ऑस्ट्रेलिया खंडाचा जवळ जवळ दोन तृतियांश भाग आहे. इतका या देशाचा पूर्व ते पश्चिम आवाका आहे !
इंडोनेशिया (मूळ नकाशा जालावरून साभार)
३३ प्रांतांत विभागलेल्या या देशाची २४ कोटी लोकसंख्या जगातील तीन क्रमांकाची आहे. जगातील एका देशातील सर्वात मोठी मुस्लिम लोकसंख्या (२१ कोटी) या देशात आहे.
अश्या या वैशिष्ट्यपूर्ण देशात अजून एक जगप्रसिद्ध विशेष आहे... त्याचा एक छोट्या आणि इतर काही अगदी छोट्या बेटांनी बनलेला बाली प्रांत. या बाली प्रांताचे वैशिष्ट्य नीट समजण्यासाठी आपल्याला इंडोनेशियाच्या ऐतिहासिक आणि भैगोलिक जडणघडणीचा थोडासा परिचय आवश्यक आहे.
चीन आणि भारत व भारतापलीकडील आफ्रिका-मध्यपूर्वेतील देशांबरोबरच्या प्राचीन जलव्यापाराच्या मार्गाचा मोठा आणि मोक्याचा भाग इंडोनेशियाच्या ताब्यातल्या पाण्यातून जात असे. त्यामुळे सातव्या शतकापासून इंडोनेशियातील साम्राज्यांचे या व्यापारात अनन्यसाधारण महत्त्व होते. व्यापाराबरोबर प्रथम हिंदू, नंतर बौद्ध आणि शेवटी मुस्लिम धर्माचा प्रसार येथे झाला.
सातव्या शतकात हिंदू असलेल्या प्रबळ दर्यावर्दी श्रीविजय साम्राज्याच्या ताब्यात हा व्यापार होता. आठव्या शतकात शेतीने समृद्ध झालेल्या हिंदू मातरम् आणि बौद्ध शैलेन्द्र घराण्यांची सत्ता तेथे होती. मातरम् सम्राटांनी प्रम्बानन देवळांची तर शैलेंद्र सम्राटांनी जगातील सर्वात मोठ्या बोरोबुदूरच्या स्तूपाची रचना केली. तेराव्या शतकाच्या शेवटाला उत्तर जावामध्ये गजमद नावाच्या राजाने हिंदू महापहित साम्राज्य स्थापन केले. आधुनिक इंडोनेशियाच्या बहुतेक सर्व भूभागावर या साम्राज्याचा विस्तार झाला होता.
तेराव्या शतकात सुमात्रा बेटाच्या पश्चिमोत्तर टोकाला सुरुवात होऊन सोळाव्या शतकापर्यंत बहुतेक सर्व इंडोनेशिया मुस्लीमबहुल झाला होता. याला एकच अपवाद म्हणजे बाली बेट, जे आजतागायत हिंदूबहुल आहे. इजिप्तमधिल चर्चमध्ये असलेल्या बाराव्या शतकातील लिखाणांत सुमात्राच्या पश्चिमोत्तर टोकावरील बारूस येथे चर्च असल्याचा उल्लेख आहे. इंडोनेशियात मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन धर्म मुख्यतः पोर्तुगिज आणि डच वसाहतवाद्यांनी आणला. त्यांचा धर्म जरी तेथे प्रबळ झाला नाही तरी इंडोनेशियाला साडेतीनशे वर्षे वसाहतवादाच्या खोड्यात जखडून ठेवण्यात मात्र डच सफल झाले.
मुस्लिमबहुल असला, रोमन लिपी अंगिकारली असली आणि देशात एकूण ७४२ भाषा व उपभाषा असल्या तरी सर्वमान्य इंडोनेशियन भाषेवर प्राचीन भारतीय संस्कार अजूनही बऱ्यापैकी टिकले आहेत. या देशाचे बोधवाक्य "Bhinneka Tunggal Ika (भिन्नेका तुंगाल इका)" म्हणजेच " अनेक, परंतु एक" किंवा "युनिटी इन डायव्हर्सिटी" असे आहे. त्यांच्या एका राष्ट्रपतिंचे नाव सुकार्नोपुत्री (सुकार्नोची मुलगी) असे होते. या भाषेत बरेच संस्कृत शब्द मूळ रूपात आणि अपभ्रंशित रूपात दिसतात. इथले चलन रुपिया आहे. एक भारतीय रुपया म्हणजे साधारण २०० इंडोनेशियन रुपिया.
गणेशाचे चित्र असलेली २०,००० इंडोनेशियन रुपियाची नोट (जालावरून साभार)
भारतिय नागरिकांना इंडोनेशियाच्या विमानतळावर अथवा बंदरावर पोहोचल्यावर ३० दिवसांचा पर्यटक "व्हिसा ऑन अरायव्हल" मिळतो. त्यासाठीच्या आवश्यक अटींची इंडोनेशियाच्या सरकारी संस्थळावरची माहिती खालीलप्रमाणे:
१. आगमनाच्या तारखेपासून कमीत कमी ६ महिने वैध असलेले पारपत्र.
२. परतीचे तिकीट
३. रोख व्हिसा फी: USD 25
टीपः व्हिसाचे नियम बदलू शकतात. प्रवासापूर्वी एंबॅसीत अथवा त्यांच्या संस्थळावर चौकशी करून त्यावेळेचे नियम माहीत करून घेणे आवश्यक आहे, हेवेसांन.
बाली
इंडिनेशीयाच्या बाली प्रांताचे अनेक विशेष आहेत, त्यातील काही महत्त्वाचे खालीलप्रमाणे:
१. बालीच्या चाळीस लाख लोकसंख्येपैकी ८५% जनता हिंदू आहे.
२. इंडोनेशियाच्या पर्यटन व्यवसायाच्या उत्पन्नात या छोट्या बेटाचा सिंहाचा वाटा आहे.
३. बाली बेट त्याचे नैसगिक सौंदर्य, सुंदर सागरकिनारे, प्रवाळ बेटे, प्राचीन हिंदू मंदिरे, पारंपरिक नृत्यकला, दगड-लाकूड-कातडे-धातूंवरची कलाकुसर यामुळे जगातल्या सर्वोत्तम पर्यटन स्थळांमध्ये गणले जाते...
बाली (जालावरून साभार)
.
बालीमधिल मानवी वसाहतीची सुरुवात दक्षिणपूर्व आशियातील आणि ओशियानियातील लोकांच्या स्थलांतराने झाली असावी असे पुरातत्वशास्त्रिय पुरावे दर्शवितात. बालीच्या लोकांमधिल Y-क्रोमोसोम्सपैकी ८४% ऑस्ट्रेनेशियन वंशाचे, १२% भारतीय वंशाचे आणि २% मेलॅनेशियन वंशापासून आलेले आहेत. प्राचीन बालीत पाशुपत, भैरव, शिव शिदान्त (शिव सिद्धान्त), वैष्णव, बोधा, ब्रह्म, रेसी (ऋषी), सोरा, गाणपत्य असे नऊ हिंदू संप्रदाय होते. सद्या बाली हिंदूंत सुद्रा (शुद्र), वेसिया (वैश्य), क्सत्रियास (क्षत्रिय) आणि ब्राच्मन (ब्राम्हण) अश्या चार जाती मानल्या जातात. मात्र या जातींमध्ये रोटीबेटीचे व्यवहार भारतापेक्षा खूपच जास्त सहजपणे होतात.
बालीत घराच्या आवारात देव आणि पूर्वजांच्या नावाने देवळे बांधण्याची प्रथा आहे. त्यामुळे या छोट्या बेटावर सार्वजनिक आणि घराशेजारची अशी सर्व मिळून २०,००० च्या आसपास देवळे (पुरा) आहेत. यावरून त्याला "हजार देवळांचे बेट (Island of a Thousand Puras)" आणि "देवांचे बेट (Island of the Gods)" अशी नावे पडली आहेत.
पहिल्या शतकापासून बाली संस्कृतीवर मुख्यतः भारतीय आणि काही प्रमाणात चीनच्या संस्कृतीची छाप आहे. इ स ९१४ मध्ये श्री केसरी वर्मदेव याने स्थापन केलेल्या ब्लांजोंग स्तंभावर आणि इतर अनेक शिलालेखातही "बालीव्दीप" हे नाव आढळते. याच काळात येथे "सुबक" या नावाच्या गुंतागुंतीच्या जलसिंचन प्रणालीवर आधारलेली भातशेती सुरू झाली. या काळातल्या रीतीभातींची छाप आजही तेथिल जनजीवनात जिवंत आहे.
जावामधील हिंदू महापहित साम्राज्याने (१२९३ - १५२०) इ स १३४३ मध्ये बालीवर आधिपत्य स्थापन केले. हे साम्राज्य विलयाला जाऊन मुस्लिम प्रभाव वाढायला लागल्यावर आपल्या मूळ संस्कृतीची जपणूक करण्यासाठी तेथील हिंदू बुद्धिमंत, धर्मोपदेशक, कलाकार इत्यादींनी बालीमध्ये स्थलांतर केले. सर्व बाजूंनी मुस्लिम संस्कृतीने वेढले गेल्यामुळे या बेटाची भारताशी असलेली सांस्कृतिक नाळ ५०० वर्षांपूर्वी तुटली. त्यामुळे तिथल्या आणि भारतातल्या आताच्या हिंदू संस्कृतींत बराच फरक पडला आहे. बालीतला हिंदू धर्म एकेश्वरी आहे, मुख्य देव "संघयांग विदी वसा" किंवा "अचिंत्य" असून इतर सर्व (विष्णू, शिव, इ) देव त्याचीच रुपे / अवतार समजले जातात. अचिंत्यची मूर्ती नसते. त्याऐवजी एका रिकाम्या सिंहासनाची स्थापना केली जाते. त्याभोवती पोलेंग नावाचे पांढऱ्या-काळ्या चौकड्यांचे वस्त्र लुंगीसारखे गुंडाळले जाते आणि त्यावर तेदुंग नावाची नक्षीदार छत्री असते. या सिंहासनावर देवांना अर्पिलेला प्रसाद व फुले ठेवली जातात. धर्माचरणामध्ये हिंदू देवांबरोबरच बुद्ध, पुर्वज, पंचमहाभूते आणि निसर्ग यांनाही महत्त्वाचे स्थान आहे. त्यांचीही अशीच देवळे बांधली जातात. त्यामुळे एकाच आवारात शेजारी शेजारी पाच-दहा सिंहासने असणे बालीत एक सामान्य गोष्ट आहे...
"अचिंत्य"चे सिंहासन
अचिंत्यची मूर्ती नसली तरी त्याची कसर बालीच्या कसलेल्या कारागीरांनी देवळातील आणि घरांतील अनेक कोरीवकामांनी आणि इतर कलाकृतींनी भरून काढली आहे.
मनमोहक निसर्गसौंदर्याने भरलेल्या या देशात पर्यटक वर्षभर गर्दी करतात. ते जेवढे बालीच्या समुद्रकिनाऱ्यांची आणि प्रवाळ बेटांची मजा उपभोगायला येतात तेवढेच ते बालीचे ज्वालामुखी व हिरवाईने नटलेले नैसर्गिक सौंदर्य; सुंदर देवळे व आकर्षक सांस्कृतिक वारसा; आणि कसलेल्या कारागिरांच्या कलाकुसरीने नटलेल्या कलावस्तू यांनी आकर्षित होऊन येतात.
बालीला २०१० मध्ये Travel and Leisure कडून जगातले सर्वोत्तम बेट हा किताब मिळाला आहे. २०११ मध्ये BBC Travel ने बालीला ग्रीस खालोखाल जगातले दुसरे सुंदर बेट म्हणून नावाजलेले आहे. भारतीय संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या या बेटाला दरवर्षी ८० लाखांवर पर्यटक भेट देतात. मात्र त्यांत भारतीयांची संख्या नगण्य असते. परदेशी पर्यटकांत मुख्यतः ऑस्ट्रेलिया, फ्रांस, चीन, जर्मनी आणि अमेरिकन नागरिकांचा भरणा असतो.
एलिझाबेथ गिलबर्टच्या या अमेरिकन लेखिकेच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारलेल्या Eat, Pray, Love या प्रसिद्ध (No. 1 spot on the New York Times paperback nonfiction best-seller list) कादंबरीत तिच्या इटली (जिथे तिने भरपूर पास्ता खाल्ला), भारत (जिथे तिने देवाची खूप आराधना केली) आणि बालीतल्या (मीच सगळे सांगायला पाहिजे काय?... कादंबरी वाचा किंवा चित्रपट पहा ;) ) वास्तव्याचे वर्णन आहे. त्या कादंबरीवर बेतलेला त्याच नावाचा जुलिया रॉबर्ट्सने एलिझाबेथचे काम केलेला चलत्चित्रपटही खूप गाजला होता.
चला तर, जाऊया या देवांच्या बेटाच्या सफरीवर...
===================================================================
बालीसंबधी माहिती फार पूर्वी वाचली आणि तेव्हापासून तेथे जायची उत्सुकता लागली होती. त्यामुळे जेव्हा विमान बाली बेटाजवळ पोहोचले तशी ती शिगेला पोहोचली. जसजसे विमान खाली येऊ लागले आणि राजधानी देनपसारचे दर्शन होऊ लागले तसे बाली आपल्या प्रसिद्धीला जागणार आहे याची खात्री पटू लागली...
बालीचे प्रथमदर्शन : ०१ : देनपसारचे विहंगम दृश्य
.
बालीचे प्रथमदर्शन : ०२ : देनपसारचे विहंगम दृश्य
.
बालीचे प्रथमदर्शन : ०३ : देनपसारचे विहंगम दृश्य
.
देनपसारच्या बंदारा आय गुस्ति एंगुरा राय लक्षनकन (Bandara I Gusti Ngurah Rai Laksanakan) आंतरराष्ट्रीय विमानतळाची इमारत बालीच्या पारंपरिक शैलीत बांधलेली आहे...
बालीचे प्रथमदर्शन : ०४ : देनपसारचा आंतरराष्ट्रीय विमानतळ
.
विमानतळाबाहेर आमचा मार्गदर्शक पारंपरिक वेषात वाट पाहत उभा होता. त्याचे नाव आय गुस्ती पुतु कार्तिक (I Gusti Putu Kartika) त्याच्या नावातला "आय" म्हणजे कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा आणि "गुस्ती" हा शब्द तो बालीच्या राजघराण्यातील असल्याचे निदर्शक आहे. कार्तिक शिक्षणक्षेत्रात नोकरी करतो आणि मार्गदर्शकाचे काम स्वतःची आवड व अधिक उत्पन्नाचे एक साधन म्हणून करत असतो. त्याच्या हसर्या आणि खेळकर स्वभावाने आमचे बालीतील वास्तव्य फारच मजेत गेले...
आमचा मार्गदर्शक कार्तिक, त्याच्या नेहमीच्या स्मितहास्यासह
.
विमानतळाच्या आवाराच्या बाहेर पडता पडता हे बालीतले पारंपरिक व्दार दिसले...
बालीचे पारंपरिक व्दार
हे व्दार म्हणजे दुभंगलेला मेरू पर्वत आणि त्यातून पुढे गेल्यावर देवलोक (आणि शुभ काळ) सुरू होतो असा इथे समज आहे. त्यामुळे सर्व देवळांच्या, मोठ्या इमारतींच्या आणि मोठ्या खाजगी घरांच्या आवारांचे मुख्य व्दार याच शैलीत बांधलेले असते.
.
देनपसार इतक्या वेगाने वाढत आहे की तेथील रस्ते आता खूपच अपुरे पडू लागले आहेत हे काही मिनिटांतच ध्यानात आले...
बालीचा रस्ता
आणि काही वर्षात ते इतर आधुनिक शहरांसारखे काँक्रीटचे जंगल बनून आपले नैसर्गिक सौंदर्य हरवून बसेल की काय अशी भिती वाटली.
पुरी सरोन या देनपसारच्या सेमिनयाक नावाच्या उपनगरातील हॉटेलमध्ये पोचलो. पारंपरिक कोरीवकामाने आणि सुंदर पुष्परचनेने सजलेला स्वागतकक्ष पाहून मन प्रसन्न झाले...
पुरी सरोन, सेमिनयाक : स्वागतकक्ष
.
हॉटेलचे आवारही सुंदर होते. एका बागेत अनेक लहानमोठ्या इमारतींत राहायची व्यवस्था होती...
पुरी सरोन, सेमिनयाक : आवाराचे प्रथमदर्शन
मात्र जेव्हा आम्हाला दिलेली खोली पाहिली तेव्हा निराशा झाली. खोलीचे एकंदरीत रूपरंग काही ठीक वाटले नाही. शिवाय आम्ही बुक केलेल्या स्तरापेक्षा ती खूपच कमी दर्जाची होती. परत रिसेप्शनवर येऊन तक्रार केली. तेथील कर्मचार्यांनी असमर्थता व्यक्त करून मॅनेजरशी बोला असे सांगितले. मॅनेजरशी पंधरा मिनिटे चर्चा होऊनही काही उपाय निघत नाही असे बघून, "आमच्या भारतातल्या टूर कंपनीशी बोलतो. योग्य खोली दिल्याशिवाय इथे राहणार नाही." असा निर्वाणीचा इशारा दिल्यावर मॅनेजरची वागणूक जरा नरमाईची झाला. तो आत जाऊन कोणाशीतरी चर्चा करून परत आला आणि म्हणाला, "दुसर्या खोल्या दाखवतो. त्यातली पसंत करा." या तोडग्यामधून एक बागेकडे व्हरांडा असणारी खोली पसंत पडली आणि मॅनेजर व आम्ही दोघांनीही हुश्श म्हटले !
आम्ही दोन एक तासाने सुरू होणार्या भटकंतीआधी थोडा आराम करायला आडवे झालो !
(क्रमशः )
===================================================================
मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९(समाप्त)...
===================================================================
प्रतिक्रिया
15 Jun 2014 - 2:32 pm | भाते
आणखी एक सफर! मज्जा आहे.
इतिहास वाचल्यामुळे ज्ञानात थोडी आणखी भर पडली.
पुन्हा मी पयला!
रच्याकने… काका, हा तुम्ही बघितलेला कितवा देश?
मागे तुम्ही पाहिलेल्या देशांचा काही आकडा दिला होतात. आता किती देश बघायचे बाकी राहिले आहेत? :)
15 Jun 2014 - 2:34 pm | यसवायजी
*good* *clapping*
15 Jun 2014 - 2:57 pm | मुक्त विहारि
अजून एका अप्रतिम लेखमालेतील पहिलाच भाग जोरदार...
बादवे,
इंडोनिशिया, व्हियेतनाम आणि थायलंडला जायला व्हिसा लागतोच का?
की, ऑन अरायव्हल विसा मिळू शकतो?
15 Jun 2014 - 7:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
या देशांच्या व्हिसाची सद्याची अवस्था अशी आहे:
१: इंडोनेशिया: व्हिसा ऑन अरायव्हल
२. व्हिएतनामः ऑनलाईन व्हिसा
३. थायलंडः स्थानिक देशाच्या एंबॅसीतून व्हिसा घेणे आवश्यक
16 Jun 2014 - 11:27 am | दिपक.कुवेत
मला वाटतं त्या साठि तुमच्या पारपत्राची कॉपी, एक फोटो आणि १००० भात (थायी चलन) आवश्यक आहे. तसंहि बहुतेक पर्यटक त्यांच्या देशाच्या एंबसीतुन व्हिसा घेउन आल्यामुळे ह्या ऑन अराव्हयल व्हिसाच्या काउंटरवर फार कमी गर्दि असते. सहकुटुंब एकदा नक्कि थायलंडला भेट द्या. फार स्वस्तात टुर होते. खासकरुन पुखेत तर फारच सुंदर आहे. मी ह्या भटकंती वरचे काहि फोटो टाकले होते अर्थात ते नुसते फोटो आणि माफक वर्णन आहे. एक्का साहेबांसारखा काय आपला अभ्यास नाहि. त्या सफरीचे अजुन दोन भाग टाकायचे आहेत. बघु कधी मुहुर्त निघतोय ते.
16 Jun 2014 - 12:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
आम्ही थायलंडला गेलो होतो तेव्हा नियम वेगळे होते... आता व्हिसा ऑन अरायव्हल मिळतो.
जास्त माहिती येथे मिळेल.
बघा, लेखात चौकटीत टाकलेला ढीस्क्लेमर कामी आला किनाय? ;)
16 Jun 2014 - 12:03 pm | गजानन५९
थायलंडला पण ओन अरायव्हल विसा मिळतो (साधारण १८००/- रु खर्च होतो आणि ३० मिनिटात काम होते (डायरेक्ट फुकेत ला गेलात तर १५ मिनिटात पण काम होते )
बाकी पहिला भाग नेहमीप्रमाणे ढासू होता काका विशेष करून बालीचा इतिहास तर मस्त सांगितलात तुम्ही.
15 Jun 2014 - 3:06 pm | अजया
॑चला आता बालीला जायचं तर ! इतक्यात मिपा कंटाळवाणं चाललं होतं. तुमची नवी सफर बघुन हायसं वाटलं.
15 Jun 2014 - 3:13 pm | लॉरी टांगटूंगकर
भारी आहे. पुढील भागांची वाट बघतो आहे.
15 Jun 2014 - 3:16 pm | मनुराणी
बालीला ऑन अरायव्हल विसा मिळतो.
बालीला जाऊन आलोय. पण तुम्ही दिलेली माहिती सुरेखच. आम्ही एवढे सगळे शोधायचा प्रयत्न पण केला नव्हता.
बाली खरोखर सुंदर आहेच पण तुमच्या नजरेतून परत बाली फिरायला खूप उत्सुक आहे.
15 Jun 2014 - 7:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
बालीच्या सौंदर्याबद्दल एकदम सहमत ! बाली मला आवडलेल्या पर्यटन स्थळांमध्ये फार वरच्या स्थानी आहे.
15 Jun 2014 - 4:17 pm | चाणक्य
आपण एकदम तयार आहे नवीन ट्रीपसाठी
17 Jun 2014 - 6:15 pm | राजेंद्र मेहेंदळे
आपणसुद्धा तयार..तसंपण आजकाल हपिसात काम नाहीये *i-m_so_happy* *HAPPY* :happy: :HAPPY: :Happy: ^^
15 Jun 2014 - 4:25 pm | मदनबाण
भाते क्या सही बोलते... :)
अगदी हेच म्हणायचं हाय.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरे Dil Ka तुमसे Hai केहना... ;) { Armaan }
15 Jun 2014 - 10:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
15 Jun 2014 - 4:48 pm | सुबोध खरे
आपली प्रवासवर्णन लिहिण्याची शैली फारच छान आहे. एकही लेखात लिखाण कंटाळवाणे झालेले नाही उलट पुढे काय येणार याची उत्सुकता लागून राहिलेली असते. सर्व स्थळ प्रत्यक्ष डोळ्यापुढे उभी राहतात.लिहिण्याची हातोटी वाखाणण्यासारखी आहे. लिहिते राहा
15 Jun 2014 - 10:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
स्वतः उत्तम लिखाण करणार्याकडून असा प्रतिसाद वाचून खूप आनंद झाला.
22 Jun 2014 - 8:49 pm | अनिरुद्ध प
+१ सहमत, बाकि सहल मालिक हि नेहमि प्रमाणेच उत्तम असणार्,यात शंकाच नाही.
15 Jun 2014 - 7:40 pm | प्रचेतस
बालीच्या लिखाणाची वाट पाहातच होतो.
आता तुमच्याबरोबर सफरीत सहभागी झालोच आहे.
इंडोनेशियन रुपियाचे भलतेच अवमूल्यन झालेले दिसतेय.
15 Jun 2014 - 8:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
इंडोनेशियन रुपियाचे भलतेच अवमूल्यन झालेले आहे हे खरे आहे. मात्र सद्या तिथली अर्थव्यवस्था सुधारू लागली आहे आणि इंडोनेशियाला दक्षिणपश्चिम आशियातील उभरती अर्थव्यवस्था (emerging market) समजले जात आहे.
15 Jun 2014 - 7:48 pm | यशोधरा
बालीचे अजून वर्णन लिहालच ना?
15 Jun 2014 - 8:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
आताच तर पोहोचलोय तिथे. पुढच्या भागापासून भटकंती सुरू होईल. क्रमशः लिवलंय न्हवं? ;)
15 Jun 2014 - 8:18 pm | यशोधरा
हो, हो :) लिहा पटापट.
15 Jun 2014 - 8:07 pm | डॉ सुहास म्हात्रे
भाते, यसवायजी, अजया, मन्द्या आणि चाणक्य : सहलित स्वागत आहे !
15 Jun 2014 - 8:13 pm | चौकटराजा
अपल्याशी झालेल्या प्रत्यक्ष भेटीत हा धागा येण्याचे ठरलेच होते. त्यामुळे लगेच सरसावून वाचायला बसलो. नेहमीप्रमाणेच चित्र व वर्णन प्रत्यय देणारे आहे. बालीचे पारंपारिक प्रवेशद्वार हे एकदम वेगळे दिसतेय. परमेश्वर हा चिंतनाच्या पलीकडचा
विषय आहे हे फार पूर्वी " चिंतन" करूनच आपल्या पूर्वजानी ठरवलेले दिसतेय ! " वाली" शी बाली या नावाचा काही संबंध
असावा का ?
15 Jun 2014 - 8:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
वाली पेक्षा बालीचा "बली" या शब्दाशी (ताकदवान या अर्थाने) संबद्ध असल्याचे संदर्भ सापडतात !
यामुळे "बळीराजाला वामनाने पाताळात म्हणजेच बालीला पाठवले किंवा काय?" हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो :) . मात्र ते खरे असल्यास बळीराजाला दरवर्षी ओनमसाठी भारताची फेरी मारणे वास्तवात शक्य होते !
15 Jun 2014 - 9:33 pm | आदूबाळ
जब्बरदस्त! वाट पहातो आहे.
15 Jun 2014 - 9:35 pm | अत्रुप्त आत्मा
*i-m_so_happy* ......... *i-m_so_happy*
15 Jun 2014 - 10:17 pm | मधुरा देशपांडे
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण आणि छान वर्णन.
15 Jun 2014 - 11:04 pm | खटपट्या
पु. भा. प्र.
15 Jun 2014 - 11:18 pm | आयुर्हित
अप्रतीम सौदर्याने नटलेल्या बालीचे वर्णन आणि ते सुद्धा ईए च्या सिद्धहस्त लेखणीतून म्हणजे दुग्ध शर्करा योगच!
इए आणि बाली(उमर)को सलाम!
15 Jun 2014 - 11:53 pm | शिद
+१... असेच म्हणतो.
पु. भा. प्र.
16 Jun 2014 - 1:37 am | एस
चला! अजून एक मेजवानी सुरू होत आहे. 'वदनी कवळ...' सुरू करतो ! :-)
16 Jun 2014 - 2:30 am | रेवती
नेहमीप्रमाणेच अफलातून सफर चालू झालीये. तुम्ही शेवटी मला बालीला जायला भाग पाडणार की काय अशी शंका येतीये.
16 Jun 2014 - 10:51 am | डॉ सुहास म्हात्रे
ही लेखमाला वाचल्यावर तुम्हाला बालीला जावे असे वाटले नाही तर माझ्या प्रवासवर्णनात नक्कीच फार मोठी तृटी राहिली आहे असे समजा आणि ताबडतोप बालीचे तिकीट काढा :)
16 Jun 2014 - 10:45 am | डॉ सुहास म्हात्रे
आदूबाळ, अत्रुप्त आत्मा, मधुरा देशपांडे, खटपट्या, आयुर्हित, शिद आणि स्वॅप्स : सहलित मनःपूर्वक स्वागत आहे !
16 Jun 2014 - 11:19 am | दिपक.कुवेत
परत एकदा फोटोंची चंगळ्/मेजवानी. माहिती घेउन ठेवतोय. एकदा बालीला नक्कि जाणार!!!
16 Jun 2014 - 12:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
नक्की जा ! खूप आनंददायक सहल होईल.
16 Jun 2014 - 12:33 pm | vrushali n
किती मस्त लिहीलय...बाली My dream destination
16 Jun 2014 - 12:37 pm | तुमचा अभिषेक
नुकतेच मायबोलीवर बालीच्या सफरीची लेखमाला वाचण्यात आली होती, त्यात जे बालीचे सुंदर रूप पाहिलेय त्यावरून हि सफर सुद्धा आम्हा वाचकांसाठी प्रेक्षणीय होणार यात शंका नाही. तुमच्या खास अभ्यासपुर्ण डिट्टेलवार शैलीत वाचण्यास उत्सुक, ज्याची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झोकात झाली आहे.
16 Jun 2014 - 1:20 pm | प्रसाद गोडबोले
सुंदर फोटोस !
एवढे मस्त फिरताहात ....तुमचा हेवा वाततो एक्काराव !
पुढील भागाची वाट पहात आहे !
16 Jun 2014 - 1:24 pm | नन्दादीप
पुढील भागाची वाट पहात आहे...! नेहमीप्रमाणेच सुंदर सुरुवात आणि सुंदर वर्णन..
16 Jun 2014 - 5:45 pm | डॉ सुहास म्हात्रे
vrushali n, तुमचा अभिषेक, प्रसाद गोडबोले आणि नन्दादीप : या भटकंतीत स्वागत आहे !
17 Jun 2014 - 7:10 am | निमिष ध.
झकास सुरुवात झाली आहे. बाली बद्दल अजुन माहिती येउ द्या आणि फोटु तर मस्तच आहेत!
17 Jun 2014 - 7:32 am | धन्या
मस्त प्रवासवर्णन. आवडलं.
17 Jun 2014 - 12:02 pm | सस्नेह
बालीची सफर रंग भरते आहे...
17 Jun 2014 - 12:23 pm | अस्मी
व्वा...मस्त!! एकदम छान सुरवात...फोटु नेहमीप्रमाणेच सुंदर!!
चला पुढच्या सफरीसाठी आम्ही एकदम तय्यार आहोत...
17 Jun 2014 - 12:23 pm | इशा१२३
नेहेमीप्रमाणेच सुंदर फोटो आणि सुंदर वर्णन.बालीबद्दल खूप उत्सुकता आहे..
17 Jun 2014 - 12:31 pm | पिलीयन रायडर
बालीची ट्रिप करायची डोक्यात होतं.. आता चिंता मिटली...!!!
17 Jun 2014 - 2:29 pm | प्यारे१
नेहमीप्रमाणे मस्तच!
17 Jun 2014 - 2:33 pm | बॅटमॅन
बालीची निवड यथार्थ आहे. 'बालीवाले बेटे' या लेखात पुलंनी जे वर्णन केलेय त्यामुळे अगोदरपासून उत्सुकता आहेच, आता तुमच्या लेखमालेमुळे ती पूर्ण होईल बर्याच अंशी हे निर्विवाद!!!! ईगरलि वेटिंग फॉर द नेक्स्ट भाग. :)
17 Jun 2014 - 7:26 pm | स्वाती दिनेश
सुरुवात झकास... पुभाप्र,
स्वाती
17 Jun 2014 - 9:57 pm | डॉ सुहास म्हात्रे
निमिष ध., धन्या, स्नेहांकिता, अस्मी, इशा१२३, पिलीयन रायडर, प्रशांत आवले, बॅटमॅन आणि स्वाती दिनेश : अनेक धन्यवाद !
18 Jun 2014 - 10:19 am | ब़जरबट्टू
छान लिहलेय, अजून येऊ द्या पटापट... :)
बालीचा इतिहास एवढा अभ्यासपुर्वक मांडल्याबद्दल विशेष आभार...
18 Jun 2014 - 10:23 pm | पैसा
अप्रतिम! तिथला देव अचिंत्य म्हणजे त्या काळात 'निर्गुण, निराकार' याची उपासना करणार्यांचे प्राबल्य झाले असावे.
19 Jun 2014 - 1:06 pm | प्रभाकर पेठकर
नका हो भटकू सगळीकडे. बसा की घरीच जरा गपगुमान. तुमच्या मुळे आम्हालाही मग हुक्की येते भटकायची. आता आलं नं बालीला भेट देणं.
20 Jun 2014 - 12:23 am | डॉ सुहास म्हात्रे
पायावरचे चक्र काय स्वस्थ बसून देत नाही यात आमचा गरिबाचा काय बरे दोष ? ;)
जावा तुमीबी बालीला. लईच जंक्शन जागा हाय :)
20 Jun 2014 - 12:17 am | डॉ सुहास म्हात्रे
ब़जरबट्टू आणि पैसा : अनेक धन्यवाद !
20 Jun 2014 - 10:53 am | जागु
मस्त भाग आणि फोटो.
21 Jun 2014 - 11:25 am | गौरव जमदाडे
मस्त सुरुवात काका, तुम्ही अगदी घरबसल्या आम्हाला संपूर्ण जगाची सफर घडवत आहात.
धन्यवाद.
21 Jun 2014 - 11:58 am | डॉ सुहास म्हात्रे
जागु आणि गौरव जमदाडे : धन्यवाद !