तिचे अभंग…।
आयुष्याची जेंव्हा, होते उजळणी,
तिच्या आठवणी, खंडीभर..!
तीच तीच असे, निळ्या ह्या आकाशी,
स्पंदने उराशी, तिचीच रे..!
कसे तिचे असे, मधाळ बोलणे,
मिठाने चोळणे, जखमांना..!
उगाच एवढी, केली उठाठेव,
तिच्या डोळी देव, दिसायचा..!
काय काय सांगू, काय रे व्हायचे,
मोर नाचायचे, ग्रीष्मातही..!
ऋतुन्नी केवढा, मांडला गोंधळ,
पदरात जाळ, श्रावणाच्या..!
इवल्याश्या देही, किती उलाढाल,
तिच्या लेखी झालं, काही नाही..!
ह्याचीही तक्रार, कधी मी ना केली,
झोळी हि भरली, आठवांनी..!
अशात नेहमी, हवे ते ना घडे,
अश्रुंचेच सडे, जागोजागी..!
नको ते घडले, इथेही नेमके,
चांदण-चटके, काळजाला..!
शेवटची भेट, काळजाला पेट,
वणव्याचा थेट, झाला घाव..!
एकदाच तिने, यावे माझ्यासाठी,
भरेन मी ओटी, कवितेनं..!
मग जावे तिने, अगदी खुशाल,
कवितेची शाल, माझ्या अंगा..!
तिच्याशी जुळले, कवितेचे धागे,
आता तिच्या मागे, कविताच..!
तिला पडू नये, कशाची वानवा,
तिचे सुख दवा, माझ्यासाठी..!
एवढे मागणे, ऐक रे श्रीरंग,
पडो हा अभंग, तिच्या पायी..!
- © चेतन दीक्षित (अस्मादिक)
प्रतिक्रिया
3 Jun 2014 - 3:14 pm | अनुप ढेरे
मस्तं !
आणि
हे विशेष आवडलं.
3 Jun 2014 - 3:27 pm | मुक्त विहारि
मस्त
3 Jun 2014 - 5:40 pm | राही
ओव्या फार आवडल्या. 'मिठाने चोळणे जखमांना' आणि 'पदरात जाळ श्रावणाच्या' हे खासच.
4 Jun 2014 - 12:11 am | अत्रुप्त आत्मा
लै भारी!!!
5 Jun 2014 - 12:13 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
छान
5 Jun 2014 - 12:58 pm | प्यारे१
कविता आवडली. :)
9 Jun 2014 - 2:37 pm | वटवट
सर्वान्चे खूप आभार...
12 Jun 2014 - 10:31 am | मदनबाण
च्यामारी एकदम झकास ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अपर्णा तप करिते काननी :- {चित्रपट :-तांबडी माती}
14 Jun 2014 - 4:42 pm | माम्लेदारचा पन्खा
बहोत खूब… तिच्या पायाशी पडेलच हा अभंग कधीतरी पण आमच्या हृदयात मात्र आताच उतरलाय !!
16 Jun 2015 - 9:00 pm | धनावडे
<blockquote>तिला पडू नये, कशाची वानवा,
तिचे सुख दवा, माझ्यासाठी..!</blockquote>
मस्तच
16 Jun 2015 - 9:00 pm | धनावडे
<blockquote>तिला पडू नये, कशाची वानवा,
तिचे सुख दवा, माझ्यासाठी..!</blockquote>
मस्तच
16 Jun 2015 - 9:57 pm | एक एकटा एकटाच
मस्त
17 Jun 2015 - 4:12 pm | क्रेझी
व्वाह! अप्रतिम :)
24 Nov 2016 - 8:18 pm | धनावडे
मस्त