हिंदुस्थानच्या पूर्व किना-यावर मद्रास आणि पश्चिम किना-यावर मँगलोर यांना जोडणारी सरळ रेषा काढली तर त्या रेषेवर मधोमध बंगलोर शहर येईल. समुद्रसपाटीपासून सुमारे ३००० फूट उंचावर असल्याने बंगलोरची हवा अत्यंत आल्हाददायक असते. अती थंड नाही आणि अती उष्णही नाही, अती पाऊस नाही आणि अगदी कोरडंही नाही असं तिथलं हवामान कोणालाही सुखद वाटण्यासारखंच आहे. आजचं बंगलोर हे दुस-या महायुध्दापूर्वी अगदी लहानसं आणि टुमदार शहर होतं. दुस-या महायुध्दात भौगोलीक स्थानवैशिष्ट्यामुळे आणि औद्योगीक प्रगतीमुळे बंगलोरची झपाट्याने वाढ झाली. महायुध्दापूर्वी आणि नंतरही इथे आलेल्या हजारो विस्थापितांमुळे शहराची लोकसंख्या किती तरी पटीने वाढली. आज बंगलोर हे संपूर्ण भारतातलं झपाट्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारं शहर बनलेलं आहे.
बंगलोर चहुबाजूंनी टेकड्यांनी वेढलेलं आहे. ४००० फूट उंचीवरल्या या टेकड्या शहरापासून ३५ मैलांच्या आतबाहेर चारही दिशांना पसरलेल्या दिसतात. उत्तरेला असलेली नंदीदुर्ग ही एकच टेकडी नसून तीन टेकड्यांचा तो एक समुह आहे. दुर्ग म्हणजे किल्ला. पूर्वेच्या या टेकड्यांच्या समुहातील सर्वात शेवटच्या टेकडीवर एका किल्ल्याचे अद्याप सुस्थितीतले अवशेष दिसून येतात. हा किल्ला म्हैसूरच्या टिपू सुलतानानं बांधला होता. या किल्ल्याच्या एका टोकाला ६०० फूटांचा कडा आहे. मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या कैद्यांना या कड्याच्या टोकाला असलेल्या एका फळीवर डोळे बांधून उभं केलं जात असे. फळीचं दुसरं टोक हे कड्यावरून पुढे दरीत घुसलेलं होतं. जर कैदी फळीच्या टोकापर्यंत जाऊन परत येण्यात यशस्वी झाला तर त्याची शिक्षा माफ होत असे ! माझ्या माहीतीप्रमाणे तरी एकही कैदी कडेलोटापासून स्वतःला वाचवण्यात यशस्वी झाला नव्हता.
बंगलोरच्या वायव्येला शिवगंगा टेकडी आहे. हिंदूंचं श्रध्दास्थान असलेलं एक प्रसिध्द मंदीर या टेकडीवर आहे. या मंदीराशेजारीच एक मोठी विहीर आहे. ही विहीर अंत नसलेली विहीर आहे अशी वदंता आहे. काही लोकांच्या मते ही विहीर हा ३५ मैलांवरच्या बंगलोर शहरात शिरणारा एक गुप्त भुयारी मार्ग आहे.
पश्चिमेला असलेली तिसरी टेकडी ही मागाडीची टेकडी म्हणून ओळखली जाते. शहरातून पाहील्यास एकच भासणारी ही टेकडी एकच नसून प्रत्यक्षात उंटाच्या पाठीवरच्या मदारीसारख्या दोन टेकड्या आहेत. या दोन्ही टेकड्यांच्या मध्ये असलेल्या दरीत घनदाट जंगल पसरलेलं आहे. या दरीत उतरणा-या वाटा या कमालीच्या निसरड्या आहेत. चुकून पाय घसरला तर कडेलोटाची शक्यताच जास्तं ! या टेकड्यांच्या परिसरातच मागाडी आणि आजूबाजूच्या भागात दहशत माजवणा-या चित्त्याचं आश्रयस्थान होतं.
मागाडीच्या आसपासचा परिसर निसर्गरम्य आणि नितांत रमणीय आहे. मागाडीच्या दक्षिणेला ७० मैल कावेरी नदीकाठच्या संगम गावापर्यंत घनदाट जंगल पसरलेलं आहे. अनेक लहानमोठ्या टेकड्यांवर पसरलेलं या जंगलाचा बराच भाग हा वनखात्याच्या राखीव अभयारण्यात येतो. मागाडीपासून सुमारे ४० मैलांवर क्लोस्पेट आणि कनकह्ळ्ळी शहरांच्या दरम्यानच्या टेकड्या या चांगल्याच उंच आहेत. या भागात बिबळ्यांचा सुळसुळाट आहे. इथल्या रहिवासी लोकांना या बिबळ्यांचा सतत उपद्रव होत असतो. माझा मुलगा डोनाल्ड याने आतापर्यंत या भागात गावक-यांची गुरं उचलणारे वीस तरी बिबळे टिपले आहेत. मागाडीच्या पश्चिमेला पसरलेल्या पठारी प्रदेशांत झुडूपांची दाटी आहे. सांबर, ससे, मोर अशी विपूल शिकार इथे उपलब्ध आहे. उत्तरेला ब-याच कमी उंचीच्या टेकड्या पसरलेल्या आहेत. पूर्वेकडील टेकड्या ब-याच खडकाळ आणि उंच आहेत. बंगलोरपासून २३ मैलांवर अर्कावर्ती नदीवर बांधलेलं धरण आहे. तिप्पागोंडहळ्ळी या नावाने ओळखल्या जाणा-या या धरणातून मोठ्या पाइपांमधून बंगलोर शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो.
या सर्व प्रकाराला दुस-या महायुध्दापूर्वी सुरवात झाली.
मागाडी टेकड्यांच्या पायथ्याशी असलेल्या खेड्यापाड्यांतून एका चित्त्याने काही बक-या आणि गावठी कुत्री उचलली. या भागात चित्त्यांचे असे उपद्व्याप अधून-मधून सुरूच असल्याने गावक-यांनी फारशी दखल घेतली नाही. चित्त्याचा धीटपणा हळूहळू वाढत गेला. आता त्याने गाई-बैलांचा फडशा पाडण्याचं सत्रं आरंभलं.
हिंदू धर्मात गाय आणि बैल ही दोन्ही जनावरं पवित्रं मानली जातात. हिंदूंना गोमांस निषिध्द असतं. बैल दिवसभर शेतात राबतो, गाड्या ओढतो आणि चुन्याचे खडक फोडून चुरा करणारी यंत्र देखील फिरवतो. गाय अर्थातच दूध देते आणि दुधापासून बनवलेल्या तुपाचा भारतभर जेवणात वापर केला जातो. त्यामुळे गाय-बैलाचा संहार करणारा वाघ अथवा चित्ता हा गावकर्यांच्या दृष्टीने उपद्रवी आणि गुन्हेगार ठरतो.
बंगलोर शहरात मुनुस्वामी नावाची एक अफलातून वल्ली राहते. हा एक नंबरचा थापाड्या मनुष्य स्वतःला शिकारी गाईड म्हणवून घेत असे. बंगलोरच्या आसपासच्या परिसरातील शिकारीची संधी असलेल्या बातम्या घेऊन तो शहरात आलेल्या नवख्या शिका-यांभोवती घोटाळत असे.
" साहेब, बारा मैलांवरच्या व्हाईटफिल्ड परिसरात चाळीस रानडुकरांचा कळप आला आहे ! "
अथवा
" साहेब, मागाडीच्या रस्त्यावर १० व्या मैलाजवळ आणि म्हैसूरच्या रस्त्यावर १८ व्या मैलाच्या आसपास हरणांचे अनेक कळप मी कालच पाहीले आहेत. तुम्ही घाई केलीत तर तुम्हांला चांगली शिकार मिळेल !"
शिका-यांकडून तो नेहमी आगाऊ पैशांची मागणी करत असे. शिकारी त्या परिसरात गेल्यावर त्याच्या नजरेस एकही डुक्कर अथवा हरिण दिसून येत नसे. कारण डुकरांचे आणि हरिणांचे कळप हे मुळातच मुनुस्वामीच्या कल्पनेतून प्रगटलेले असत. शिका-याने त्याला छेडलं तर त्याचं उत्तर मात्र तयार असे.
" मी तुम्हांला आधीच येण्याची विनंती केली होती साहेब, पण तुम्ही आला नाहीत ! कालच बरेच लष्करी अधिकारी तिथे आले होते. त्यांनी दोन डुकरं मारल्यामुळे बाकीची पळून गेली. पुढच्या वेळी मी खबर आणली की तुम्ही लगेच निघा !"
रानडुक्कर आणि सांबरांच्या बातम्या म्हणजे मुनुस्वामीसाठी तशा लहान-सहानच होत्या. त्याचा हातखंडा असलेला खेळ म्हणजे चित्याच्या शिकारीची बातमी !
डाकबंगल्यात आलेल्या नवख्या शिका-याची बातमी कळली की मुनुस्वामी त्याला गाठून आपली ओळख करून देत असे.
" साहेब, मी या भागातला शिकारी गाईड आहे. तुम्हाला मी रानडुकरं, सांबर, मोर, हरिण जे म्हणाल ते जनावर कुठे मिळेल सांगू शकतो. डिसेंबर महिन्यात इथे अनेक प्रकारची जंगली बदकं येतात. या परिसरात आताच एक मोठा चित्ता आला आहे. त्याची शिकारदेखील तुम्हाला करता येईल. कनकहळ्ळीच्या रस्त्यावर पंधरा मैलांवर मी त्याचे ठसे पाहीले आहेत. तुम्ही मला पंधरा रुपये द्या. मी चित्त्यासाठी आमिष म्हणून गाढव बांधतो. मला माचाण बांधता येतं. चित्त्याने गाढव मारलं की मी माचाण बांधून तुम्हाला लगेच बातमी देईन. तुम्हांला ही शिकार सहज मिळून जाईल !"
नवख्या शिका-याला मोह पडे. पंधरा रुपयांत चित्ता ! तो देखील इतक्या जवळ ! कोण म्हणतं शिकार हा महागडा आणि फार दमवणारा प्रकार आहे म्हणून ?
मुनुस्वामीला हमखास पंधरा रुपये मिळत. मग तो साहेबाकडून खाण्यापिण्यासाठी दोन रुपये आणि चित्त्याने गाढवाचा बळी घेतल्यावर बातमी आणण्याचा प्रवासखर्च म्हणून आणखीन तीन रुपयांची मागणी करत असे. हाती पैसे पडले की समाधानाने तो साहेबाचा निरोप घेत असे.
" चित्त्याने गाढव मारलं की मी माचाण बांधून तुम्हांला कळवतो साहेब ! तुम्ही तयारीत रहा ! "
साहेबाचा निरोप घेऊन निघाल्यावर सर्वात प्रथम मुनुस्वामी ताडीचं दुकान गाठत असे ! दोन - तीन बाटल्या ताडी पिऊन आणि भरपेट जेवण आटपल्यावर घर गाठून तो दुस-या दिवशी सकाळपर्यंत ताणून देत असे. सकाळी उठल्यावर साहेबाला कबूल केलेल्या ' चित्त्या ' साठी भक्ष्यं बांधण्याच्या कामगिरीवर तो बाहेर पडत असे.
बंगलोर शहरात दोन कोंडवाडे आहेत. भटकी गुरं, कुत्री आणि गाढवं पकडून या कोंडवाड्यात कोंडली जात असत. कोंडवाड्यातून आपलं गाढव सोडून नेण्यास एक रुपया आकारण्यात येत असे. दहा दिवसांत आपलं जनावर कोणी सोडवून न नेल्यास त्यांचा लिलाव करण्यात येत असे. जनावरांना दहा दिवसांत चारा देण्यासाठी येणा-या खर्चाची त्यातून वसुली होत असे. हे लिलाव आठवड्यातून दोन दिवशी होत असत. मुनुस्वामी एखादं गाढव आपलंच आहे असं सांगून अथवा आपल्या एखाद्या मित्रामार्फत मिळवत असे किंवा कधी लिलावात विकत घेत असे. सर्व गाढवं सारखीच दिसत असल्यामुळे त्याला फारसे प्रयास पडत नसत. फारतर दोन रुपयांमध्ये तो जनावर मिळवी पण शिका-याकडून मात्र त्याने पंधरा रुपये घेतलेले असत. तब्बल साडेसहाशे पट फायदा ! चांगला धंदा होता !
गाढव ताब्यात मिळताच मुनुस्वामी पुढच्या उद्योगाला लागत असे. चित्त्याचा वावर ज्या परिसरात आहे असं त्याने साहेबाला सांगीतलेलं असे, त्या भागात तो गाढव बांधून ठेवत असे. शिका-याला गाढव बांधल्याची खबर देण्यास तो चुकत नसे. दोन रात्री गाढव बांधल्यावर तिसर्या पहाटे मुनुस्वामी स्वत:च ते गाढव मारून टाकत असे ! चाकू, हूक अशा विचित्र शस्त्रांनी गाढव मारल्यावर त्याच्या नरड्यात चित्त्याचे दात रुतल्याच्या खुणा बेमालूमपणे करण्यास तो विसरत नसे ! गाढवाचं पोट फाडून त्याचं आतडं काढून तो काही अंतरावर नेऊन टाकत असे. मांसाचे तुकडे फाडून काढल्याचा आभास निर्माण करण्यातही तो तरबेज होता. हे सगळं कमी होतं म्हणून की काय, त्याच्याजवळ चित्त्याचा एक पेंढा भरलेला पंजादेखील होता ! या नकली पंज्याच्या सहाय्याने तो गाढवाच्या आसपास काही अंतरापर्यंत चित्त्याच्या पंजांचे अगदी खरे भासतील असे ठसे उमटवून ठेवत असे ! हे सर्व काम तो इतक्या सफाईदारपणे करत असे की पाहणा-याची अशी समजूत व्हावी की खरंच चित्त्याने गाढवाचा बळी घेतला आहे आणि गाढवाचं मांस खाण्यास तो निश्चीतच परतुन येईल !
गाढवाची मनाजोगती व्यवस्था झाल्यावर मुनुस्वामी डहाळ्यांनी ते झाकून ठेवत असे. मग बंगलोरकडे जाणारा ट्रक गाठून आठ आण्यात तो शहरात परतत असे आणि घाईघाईत साहेबाच्या भेटीला जात असे.
चित्त्याने गाढवाची शिकार केल्याचं ऐकताच साहेब उत्साहाने शिकारीच्या तयारीला लागे. आपली आवडती बंदूक तो स्वतः साफ करत असे. त्यात गोळ्या भरत असे. जास्तीच्या गोळ्या, टॉर्च, रात्री खाण्यासाठी सॅंडविचेस्, बाटली भरून चहा आणि इतर सटर फटर वस्तू गोळा करुन तो मुनुस्वामीसह शिकारीची जागा गाठत असे.
शिकारीच्या जागी पोहोचताच मुनुस्वामी गाढवाच्या नरड्यात उमटलेल्या चित्त्याच्या दातांच्या खुणा साहेबाला दाखवून देत असे. आजूबाजूच्या जमिनीवर उमटलेले चित्त्याच्या ठशांकडे साहेबाचं लक्षं वेधण्यास तो विसरत नसे. चित्त्याच्या पंजांचे ठसे पाहून साहेबाची पक्की खात्री पटत असे आणि तो मुनुस्वामीला माचाण बांधण्याची सूचना देई. माचाण बांधण्यासाठी मुनुस्वामी बारा आणे मजुरीच्या हिशेबाने दोन मजूरांची नियुक्ती करत असे. साहेबाकडून मात्र मजुरी म्हणून प्रत्येकी दोन रुपये तो घेई !
माचाण बांधून झाल्यावर साहेब माचाणावर चढण्यापूर्वी मुनुस्वामी साहेबापाशी आपल्या बक्षीसीचा विषय काढी ! साहेबाने चित्ता मारला तर मुनुस्वामीला वीस रुपये द्यावे. काही कारणाने चित्त्याला टिपण्यात साहेब अयशस्वी झाला तर मुनुस्वामीला दहा रुपये द्यावेत. चित्ता त्या रात्री आलाच नाही तरीही केलेल्या मेहनतीसाठी आणि साहेबाला अचूक खबर देण्याबद्दल मुनुस्वामीला पाच रुपेय मिळावेत ! चित्ता निश्चीतच येणार या अपेक्षेने साहेब मुनुस्वामीचं म्हणणं मान्य करत असे.
रात्रभर माचाणावर शिकारी चित्त्याची वाट पाहत बसे. चित्ता अर्थात येतच नसे. मुळात चित्ता तिथे नसताना येणार कसा ? सकाळी परतुन मुनुस्वामी साहेबाची गाठ घेई. आपले पाच रुपये खिशात घालून तो साहेबाची समजूत घालत असे.
" साहेब, या वेळी चित्ता आला नाही म्हणून तुम्ही निराश होऊ नका ! चित्त्यासारखा कावेबाज प्राणी अनेकदा अनपेक्षीत पणे वागत असतो ! आपण असं करू, मला तुम्ही आणखीन वीस रुपये द्या, मी दुसरं गाढव बांधतो ! या वेळी चित्ता नक्कीच येईल !"
आणि हे सत्रं असंच चालू राहत असे. चित्ता कधीच येत नसे कारण चित्ता त्या परिसरात नसेच मुळी. शेवटी अशा बेभरवशाच्या प्राण्याचा नाद सोडून शिकारी जंगली बदकं किंवा एखादा मोराच्या शिकारीवर समाधान मानत असे. इथेही साहेबाला मुनुस्वामीचा उपयोग होत असे.
आता तुम्ही मला विचाराल मला हे सगळं कसं कळलं ?
एकेकाळी मी देखील नवशिकाच होतो आणि मुनुस्वामीने मला एक-दोन नाही तब्बल चार वेळा चित्त्याच्या शिकारीच्या नादाने गंडवलं होतं ! पण एकदा मुनुस्वामीच्या दुर्दैवाने त्याचं सोंग उघडकीला आलं. पाचव्या वेळी तो मला चित्त्याने बळी घेतलेलं गाढव दाखवण्यास घेऊन गेला होता. धुळीत उमटलेले चित्त्याचे ठसे आम्ही पाहत असताना एक गावठी कुत्रा एका झुडूपातून एक कापडी पिशवी तोंडात प़कडून बाहेर आला, कुत्र्याच्या तोंडात पिशवी पाहताच मुनुस्वामी त्याच्या अंगावर धावून गेला. कुत्र्याने धूम ठोकली पण तत्पूर्वी त्या पिशवीतून एक नमुनेदार वस्तू बाहेर पडली. ती उचलून पाहताच मुनुस्वामीची चलाखी माझ्या ध्यानात आली. तो चित्त्याचा पेंढा भरलेला पंजा होता ! त्याला खोदून खोदून विचारल्यावर आणि पोलीसांच्या ताब्यात देण्याची धमकी दिल्यावर त्याने माझे पाय धरले आणि वर वर्णन केलेली कथा मला सांगीतली ! चारवेळा मी स्वतःच फसल्यामुळे तो सांगत असलेला शब्दन् शब्द खरा असल्याची मला खात्री पटली.
अर्थात मी हे सर्व तुम्हांला सांगीतल्यावरही मुनुस्वामीचे उद्योग बंद पडणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे. तो दरवेळी वेगवेगळ्या नावाने आपली ओळख करून देत असे. कधी रामैय्या, कधी पुनैय्या, कधी रामस्वामी अशा हजारो नावांनी तो वावरत असतो ! अद्यापही बंगलोर शहरांत येणा-या नवशिक्या शिका-याना गंडवण्याचे त्याचे कारभार सुरुच असतील याबद्दल मला पक्की खात्री आहे.तुम्ही जर कधी बंगलोरला आलात आणि शिकार करण्याची तुम्हांला हौस असेल, तर मुनुस्वामीची आणि तुमची भेट होण्याची दाट शक्यता आहे. स्वतःला शिकारी गाईड म्हणवणारा उंच, बारीक, वयस्कर आणि केसांची टोकाला गाठ मारणारा आणि वर्णाने काळ्याभोर अशा माणूस तुम्हाला भेटला तर तुम्ही एकच करा, आपलं पैशाचं पाकीट जपून ठेवा ! धोतर आणि टोपी, लंगोटी, शॉर्ट्स अशा कोणत्याही वेशभूषेत तो तुम्हाला येऊन भेटेल !
चित्त्याच्या शिकारीची कथा सांगायचं सोडून मी मुनुस्वामीचीच कथा सांगत बसलो आहे असं तुम्हाला वाटेल, पण या चित्त्याशी खरोखरच त्याचा जवळून संबंध आला होता. त्या निमीत्ताने तुम्हाला या अफलातून वल्लीची जराशी ओळख करून देण्याची संधी मी साधली एवढंच. मात्रं मुनुस्वामीसारखी दुसरी वल्ली माझ्या पाहण्यात तरी आलेली नाही.
बंगलोर शहरातील अनेक शिकारी कधी ना कधी मुनुस्वामीच्या बतावणीला फसलेले होतो. त्यांच्यापैकी कधीच कोणालाचा चित्त्याचं नखही दृष्टीस पडलेलं नव्हतं. त्यामुळे शिकारी गाईड म्हणून त्याची प्रतिमा खालावत चाललेली होती. शहरातील कोणत्याही शिका-याकडे हल्ली त्याची डाळ शिजत नव्हती. मुनुस्वामीला त्याची कल्पना आली होती आणि त्यावर काय उपाय करता येईल या विचारत तो होता.
मागाडीच्या या चित्त्याची बातमी कळल्यावर त्याचं विचारचक्र सुरू झालं. मुनुस्वामी जरी स्वत:च्या कल्पनेतून खोट्या चित्त्यांचा आभास निर्माण करत असला, तरी त्याला ख-या - खु-या चित्त्यांचीही चांगलीच माहीती होती. आपल्या तरूणपणीच्या काळात तो स्वतः चांगला शिकारी होता. बसने मागाडीचा परिसर गाठून त्याने चित्त्याची आणि त्याच्या बळींची नीट चौकशी केली आणि तो बंगलोरला परतला.
आपण स्वतःच या चित्त्याच्या मागावर जाण्याचा त्याने निश्चय केला. चित्त्याची शिकार केल्यावर तो चित्त्यासह स्वतः बंगलोर शहरातून फेरफटका मारणार होता. मृत चित्त्याशेजाची उभा राहून तो स्वतःचं छायाचित्रंही काढून घेणार होता. या छायाचित्राच्या प्रती तो पोस्टाने सर्वांना पाठवणार होता. त्याच्याबरोबर आजपर्यंत आलेल्या एकाही शिका-याला त्याने सर्व प्रकारची मदत करूनही चित्त्याची शिकार करणं जमलं नव्हतं. शेवटी स्वतः मुनुस्वामीने चित्त्याची शिकार केली होती अशा आशयाचं पत्रं तो छायाचित्रासह सर्वांना पाठवणार होता. त्यामुळे त्याची खालावलेली प्रतिमा उंचावण्यास मदत होणार होती.
मुनुस्वामीने त्याची बंदूक पूर्वीच विकली होती. एका मित्राकडून त्याने ठासणीची बंदूक मिळवली आणि ती जागा गाठली. गावकर्यांना त्याने आपण एकेकाळी व्हाईसरॉय आणि जनरलच्या खास मर्जीतले शिकारी असल्याचं दडपून सांगीतलं ! टेकडीपासून वायव्येला चार मैलांवर असलेल्या मागाडी गावात त्याने मुक्काम टाकला. चित्त्याने पुन्हा बळी घेतल्यास आपल्याला खबर देण्याचं गावकर्यांना बजावण्यास तो विसरला नाही.
दोन दिवसांनी चित्त्याने एका गाईला मारून टाकलं. ही खबर मिळताच मुनुस्वामी माचाण बांधून चित्त्याची वाट पाहत बसला. रात्री चित्ता येताच त्याने ठासणीच्या बंदुकीतून चित्त्याच्या खांद्यावर दोन गोळ्या झाडल्या. चित्ता झुडूपांत झेप टाकून दिसेनासा झाला. दुस-या दिवशी सकाळी मुनुस्वामीला चित्त्याच्या रक्ताचे माग दिसले. काही अंतरापर्यंत शोध घेतल्यावर चित्त्याच्या माग घेण्याचा बेत अर्ध्यावर सोडून तो बंगलोरला परतला. जखमी चित्त्याच्या मागावर जाण्याचा धोका पत्करण्यापेक्षा बंगलोर शहरातून चित्त्याच्या मृतदेहासह मिरवण्यावर पाणी सोडावं असा विचार त्याने केला असावा.
काही आठवडे शांततेत गेले. मग मागाडी आणि क्लोस्पेट या बावीस मैलाच्या रस्त्यावरच्या गावांतून चित्त्याने पुन्हा शेळ्या-बक-या आणि गावठी कुत्री उचलण्यास प्रारंभ केला. दोन वेळा गुरा़ख्यांनी आरडा-ओरडा करून चित्त्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. एक माणूस आणि लहान मुलगा आपल्या शेळ्या वाचवताना चित्त्याच्या हल्ल्यात जखमी झाले.
एके रात्री म्हैसूरहून आलेल्या गाडीतून तीन प्रवासी क्लोस्पेट स्टेशनवर उतरले. त्यांचं गाव दहा मैलांवर होतं. रात्रीच्या वेळी चालत जाण्यापेक्षा घोड्याच्या बग्गीतून गावी जाण्याचा त्यांनी बेत केला. दहा मैलांचा प्रवास करून ते त्या गावी पोचले. बग्गीच्या मालकाने रात्री परतण्यापेक्षा झोप काढून सकाळी क्लोस्पेटला परत जावं असा विचार केला. बग्गीचं तट्टू त्याने मोकळं सोडलं आणि बरोबर आणलेली चा-याची पिशवी त्याच्यासमोर ठेऊन तो झोपी गेला.
पिशवीतलं गवत संपताच ते तट्टू गावातल्या रस्त्यांवरून भटकू लागलं. गावाला लागूनच असलेल्या जंगलातलं कोवळं गवत खाण्यासाठी ते त्या दिशेने निघालं. गावातल्या शेवटच्या झोपडीजवळून जात असतानाच झोपडीमागून अचानक चित्त्याने झेप घेतली आणि तट्टाचा गळा धरला ! तट्टू मोठ्याने खिंकाळलं आणि गावातल्या रस्त्यावरून मालकाच्या दिशेने धावत सुटलं. त्याच्या गळ्यावरची चित्त्याची पकड सुटली होती. वेदनेने आलेला तट्टाच्या खिंकाळण्याचा आवाज आणि चित्त्यात्या डरकाळीमुळे मालकाला एव्हाना जाग आली होती. चित्ता पसार झाला होता.
चित्त्ताच्या दातांमुळे तट्टाच्या गळ्याला चांगलीच जखम झालेली होती. त्या अवस्थेत त्याला बग्गी ओढणं अशक्यंच होतं. सकाळी मालकाने क्लोस्पेट गाठलं आणि पोलीसांना या घटनेची माहीती दिली. या परिसरात एक धोकादायक चित्ता वावरत असून तो कधीही नरभक्षक होण्याची शक्यता असल्याची बातमी सर्वत्र पसरली.
काही दिवसांनीच मागाडी गावापासून दोन मैलांवर चित्त्याने एका माणसावर हल्ला केला. माणसाच्या आरोळीचा आवाज ऐकून जवळच्या शेतात काम करणा-या माणसांनी त्याच्या मदती साठी धाव घेतली. तो माणूस जखमी होऊन रस्त्यावर पडला होता. चित्त्याच्या दातांमुळे आणि नख्यांमुळे त्याला अनेक जखमा झाल्या होत्या. गावक-यांनी त्याला मागाडीच्या दवाखान्यात नेलं आणि पोलीसांना खबर दिली. खबर मिळताच तिथला दफ्फेदार एका शिपायासह तपासणीसाठी त्या जागी निघाला.
गावकर्यांनी दफ्फेदाराला चित्त्याने ज्या जागी हल्ला केला होता ती जागा दाखवली. तिथल्या परिस्थितीचा तो पंचनामा करत असतानाच अचानक एका गावक-याची नजर दोन फर्लांगांवर असलेल्या छोट्या टेकडीच्या कपारीवर गेली. चित्ता तिथे आरामात पहुडला होता ! दफ्फेदाराच्या नजरेस चित्ता पडताच त्याने शिपायाची सायकल घेतली आणि पोलीस चौकीतून तीन पैकी एक रायफल घेऊन तिथे परतला.
दफ्फेदार रायफलसह परत येईपर्यंत चित्ता टेकडीवरून निघून गेला होता. टेकडीला वळसा घालून गेल्यास टेकडी उतरणा-या चित्त्याला अद्यापही गाठणं शक्य होतं. दफ्फेदाराने एका गावक-याला वाट दाखवण्यास आपल्याबरोबर घेतलं आणि मोठ्या धाडसाने तो चित्त्याच्या मागावर निघाला. त्याच्याजवळ .३०३ ची जुनी रायफल होती. सैन्यातल्या शिपायांकडे याच रायफली असल्या तरी सावधगीरीचा उपाय म्हणून पोलीसांजवळच्या रायफलमधलं मॅगझीन काढून टाकलेलं असतं. त्यामुळे एका वेळेस एकच गोळी या रायफलमधून झाडता येते. दफ्फेदाराच्या रायफलमध्ये एक काडतूस होतं आणि उरलेली तीन त्याच्या खिशात होती.
द्फ्फेदार आणि गावकरी टेकडीच्या दुस-या बाजूला पोहोचले. चित्त्याची चाहूल लागली नव्हती. अनेक मोठमोठ्या शिळा तिथे अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. गावक-याच्या सूचनेवरून ते काही पावलं टेकडी चढून जातात न जातात तोच अकस्मात एका मोठ्या खडकामागून चित्ता प्रगटला. चकीत झालेल्या दफ्फेदाराने रायफल खांद्याला लावण्याच्या भानगडीत न पडता कमरेच्या उंचीवर असतानाच गोळी झाडली. गोळी साफ चुकली. चित्त्याने दफ्फेदारावर झडप घालून त्याला खाली लोळवलं आणि त्याच्या छातीचे आणि हाताचे चावे घेण्यास सुरवात केली ! चित्त्याने झेप घेताच गावक-याने धूम ठोकली.
सुदैवाने चित्ता अद्याप नरभक्षक झाला नव्हता. आपला राग शांत झाल्यावर जखमी दफ्फेदाराला तशाच अवस्थेत सोडून तो खडकांच्या आड दिसेनासा झाला.
पळून गेलेल्या गावक-याने दफ्फेदाराबरोबर आलेला शिपाई आणि इतर गावक-याना गाठलं आणि चित्त्याने हल्ला केल्याची बातमी दिली. त्याबरोबर शिपायाने चौकी गाठून उरलेल्या तीन शिपायांना बरोबर घेतलं आणि बाकीच्या दोन रायफलीं आणि दोन लाठ्या घेऊन गावक-यासह ते त्या टेकडीवर आले. दफ्फेदार मेला असावा अशी त्यांची कल्पना झाली होती परंतु गंभीर जखमी होऊनही तो अद्याप जीवंत होता. त्या सर्वांनी ताबडतोब त्याला गावातल्या दवाखान्यात नेलं. दुस-या दिवशी सकाळी त्याला बंगलोरच्या व्हिक्टोरीया हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं.
चित्त्याच्या आतापर्यंतच्या हालचालींचे केवळ रिपोर्ट लिहीण्यापलीकडे पोलीसांनी काहीही केलं नव्हतं. पण आपला एक दफ्फेदार मरणाच्या दारात पोहोचलेला पाहून पोलीस चौकशीला वेग आला. बारकाईने चौकशी करताच या सर्व प्रकरणातील मुनुस्वामीचा सहभाग उघड झाला. त्याने माचाण बांधल्याचं आणि चित्त्याला गोळी झाडून जखमी केल्याचं निष्पन्न झालं. पोलीसांनी मुनुस्वामीला अटक केली. त्याच्यापाशी बंदूक कोठून आली ? त्याच्याजवळ बंदुकीचा परवाना होता का ? की त्याने विनापरवाना बंदूक जवळ बाळगली होती ? त्याने बंदूक कोणाकडून उधार आणली होती ? कोणाकडून ? कधी ? कशासाठी ? बंदूकीच्या मालकाकडे परवाना होता का ? मुनुस्वामीने किती गोळ्या वापरल्या होत्या ? त्या कुठून आणल्या होत्या ? पोलीसांच्या या प्रश्नांचा मुनुस्वामीवर भडीमार केला. दफ्फेदाराचा मृत्यू झाला तर मृत्यूला जबाबदार असण्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात येईल असं त्यांनी मुनुस्वामीला सांगीतलं.
मुनुस्वामीला आपलं भविष्य अंधःकारमय असल्याची कल्पना आली. त्याचं विचारचक्र जोरात फिरू लागलं. त्याला यातून सुटण्याचा एकच मार्ग दिसत होता. त्याने जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखाकडे एक विलक्षण मागणी केली.
" मला फक्त चार दिवस द्या साहेब ! चार दिवसांच्या आत मी चित्त्याची शिकार करून त्याचा देह तुमच्यासमोर आणून टाकतो. मी यशस्वी झालो तर माझ्यावरचे सर्व आरोप रद्द केले जावेत. चार दिवसांत चित्त्याची शिकार करण्यात मी अपयशी ठरलो तर तुम्ही खुशाल माझ्यावर कारवाई करा !"
पोलीस प्रमुख अत्यंत व्यवहारी होता. चित्त्याचा निकाल लावणं हे त्याच्या दृष्टीने मुनुस्वामीवर खटला चालवून त्याला शिक्षा देण्यापेक्षा जास्तं महत्वाचं होतं. चित्त्याच्या आत्तापर्यंतच्या हालचाली पाहता तो नरभक्षक होण्याच्या मार्गावर होता हे उघड होतं. फसवणूक करण्यात कितीही पटाईत असला तरी मुनुस्वामी नरभक्षक होण्याची शक्यता अजीबात नव्हती ! चार दिवसांत चित्त्याचा निकाल लावण्याची तंबी देऊन मुनुस्वामीची मुक्तता करण्यात आली.
त्या दुपारी मुनुस्वामी माझ्या दारी आला. त्याच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली होती. अर्थात त्यात त्याच्या नाटकाचा भाग किती होता हा प्रश्न अलाहिदा. त्याने सुरवातीपासून सगळी कथा मला सांगीतली. मला हसू आवरणं मुष्कील झालं होतं.
" हसू नका साहेब !" डोळे पुसत तो म्हणाला, " चार दिवसांत चित्ता सापडला नाही पण मला बरीच वर्षे तुरूंगात जावं लागेल !"
" तू पळून का गेला नाहीस ?"
" मी पळून जाण्याचा विचार केला होता साहेब ! पण आख्ख्या हिंदुस्थानात इतक्या सहजा-सहजी माझ्यावर विश्वास ठेवणारे शिकारी साहेब आणि एक-दोन रुपयांत गाढवं मिळणारी दुसरी कोणती जागा आहे ? या चित्त्याला मारून मला वाचवा साहेब ! तो नरभक्षक झाला तर ज्या लोकांचे प्राण घेईल त्यांना बळी जाण्यापासून वाचवा साहेब !"
" हे बघ, तुला वाचवण्याची माझी मुळीच ईच्छा नाही !" मी स्पष्टपणे त्याला सांगून टाकलं, " केवळ त्या चित्त्याने माणसांना मारू नये म्हणून मी त्याची शिकार करेन ! पण या सगळ्या शिकारीत तू माझ्याबरोबर राहून मला मदत केली पाहिजेस. नाहीतर मी तुला पोलीसांच्या ताब्यात देऊन टाकेन !"
" मी आता या क्षणी देखील तुमच्याबरोबर येण्यास तयार आहे साहेब !" तो म्हणाला. त्याचं रडणं एका क्षणात बंद पडलं !
त्या दिवशी संध्याकाळी मी पोलीस प्रमुखाची गाठ घेतली. मुनुस्वामीने सांगीतलेली सगळी कथा त्याला सांगताना मला हसू आवरत नव्हतं. चार दिवसात चित्त्याचा निकाल लावणं कठीण असल्याने त्याने मुनुस्वामीला दिलेल्या मुदतीविषयी फार ताणून धरू नये अशी मी त्याला विनंती केली. मी या चित्त्याच्या मागावर जात होतो आणि मला मुनुस्वामीच्या मदतीची जरूर होती. चार दिवसांनी पोलीसांनी मुनुस्वामीला धरून नेल्यास माझी अडचण झाली असती हे मी त्याला पटवून दिलं.
पोलीस प्रमुखाने माझी विनंती मान्य केली. मला मदत करण्याविषयी त्या परिसरातील पोलीसांना एक पत्रं लिहून त्याने ते माझ्या हवाली केलं. अर्थात मुनुस्वामीला मी यातल्या कुठल्याच गोष्टीचा थांगपत्ता लागू दिला नाही. उलट पोलीस प्रमुखाचा चार दिवसांची दिलेली मुदत कमी करून तीन दिवसांवर आणण्याचा विचार होता आणि केवळ माझ्या शब्दाखातर त्याने चार दिवसांची मुदत कायम ठेवल्याची लोणकढी थाप मी ठकास महाठक या हिशोबाने त्याला ठेवून दिली ! माझ्या या बतावणीमुळे तो निघण्यासाठी आणखीनच अधीर झाला.
दुस-या दिवशी सकाळी आम्ही मागाडी टेकडीचा पायथा गाठला आणि तिथल्या खेड्यापाड्यांतून चौकशीस प्रारंभ केला. मुनुस्वामीने जिथे चित्त्यावर गोळी झाडली होती त्या भागाची मी पाहणी केली. नंतर मागाडी गाव गाठून दफ्फेदाराची सुटका करणा-या पोलीस शिपायांची मी गाठ घेतली. रस्त्याकाठच्या गावांत चौकशी करत असतानाच आम्ही चित्त्याने त्या तट्टवर जिथे हल्ला केला होता त्या खेड्यात पोहोचलो. क्लोस्पेट शहर गाठून मी तिथल्या पोलीसांना माझ्याजवळचं पत्रं दाखवताच त्यांनी त्या बग्गीवाल्याला बोलावण्याची व्यवस्था केली. त्याच्याकडून मला सगळी हकीकत तपशीलवार ऐकायला मिळाली.
सगळी चौकशी करुन होईपर्यंत संध्याकाळ झाली होती. परंतु चित्त्याविषयी काही विशेष माहीती अथवा त्याचं निवासस्थान कुठे असावं याची काहीच माहीती आमच्या हाती लागली नव्हती. पोलीस प्रमुखाने दिलेल्या चार दिवसांतला एक दिवस असाच फुकट गेल्यामुळे मुनुस्वामी भलताच अस्वस्थं झाला होता. आम्ही मागाडी गावात परतलो आणि डाकबंगल्यावर मुक्काम टाकला.
दुस-या दिवशी सकाळी एक कृश बांध्याचा माणूस माझी भेट घेण्याकरता डाकबंगल्यावर आला. तो आपल्या उपजिवीकेसाठी जंगलातून मध आणि औषधी मुळ्या गोळा करून विकत असे. जोडीला ससे, मोर आणि इतर पक्ष्यांची शिकारही करत असे. आम्ही चित्त्याच्या शोध घेत असल्याचं कळल्यावरून तो मला भेटण्यासाठी आला होता.
मागाडी टेकड्यांच्या मध्यभागी असलेल्या खोलगट खडकाळ भागात चित्त्याची गुहा असल्याची त्याची पक्की खात्री होती. काही आठवडे अगोदर जंगलातून मुळ्या गोळा करण्यासाठी तो त्या परिसरात गेला असताना त्याला एके ठिकाणी रक्ताचा माग दिसला होता. एखादं जखमी जनावर त्या मार्गाने पुढे गेलं होतं. सावधपणे रक्ताचा माग घेत काही अंतर गेल्यावर त्याला चित्त्याच्या पंजांचे ठसे दिसून आले. त्याबरोबर मागे फिरून त्याने गाव गाठलं होतं. गावात परतताच त्याला आदल्या रात्री कोणीतरी चित्त्यावर गोळी झाडल्याची बातमी समजली ! ही गोळी अर्थात मुनुस्वामीने झाडली होती.
त्याला गुहा कुठे होती ती नेमकी जागा ठाऊक होती. अनेकदा गुहेच्या समोरच्या खडकांना लटकलेल्या पोळ्यांतून त्याने मध गोळा करुन आणला होता. दोन दिवसांपूर्वीच तो गुहेच्या परिसरात फिरत असताना त्याला एका जनावराचा गुरगुराट ऐकू आला होता ! जखमी चित्त्याचे ठसे त्याच परिसरात दिसल्याची आठवण होताच तो घाईघाईतच तिथून बाहेर पडला होता. आठवडाभर क्लोस्पेट शहरात गेलेला असल्याने चित्त्याने दफ्फेदारावर हल्ला केल्याची त्याला काहीच कल्पना नव्हती.
त्याचं नाव अलिमुथू होतं. मला त्या गुहेपाशी नेण्याची त्याने तयारी दर्शवली. मात्र तिथे पोहोचण्यासाठी किमान फर्लांगभर तरी लँटनाच्या जंगलातून हाता-पायांवर रांगत जावं लागणार होतं. मुनुस्वामीला आमच्याबरोबर येण्यास मी फर्मावलं. या चित्त्याला गोळी घालून अधीक आक्रमक करण्यास तोच कारणीभूत होता. तो भीतीने नकार देईल अशी माझी कल्पना होती, पण उरलेल्या तीन दिवसांत चित्त्याची शिकार साधता आली नाही तर होणार्या परिणामांची अशी दहशत त्याच्या मनात बसली होती की त्यापेक्षा चित्ता परवडला !
माझी सकाळची न्याहारी मी आटपली. चित्त्याला दिवसभरासाठी गुहेत झोप काढण्यासाठी वेळ देणं आवश्यक होतं. मी सकाळी लवकर त्याच्या गुहेपाशी गेलो असतो आणि तो जागा असता तर त्याने कदाचित हल्ला चढवला असता किंवा गुहा सोडून तो दुसरीकडे निघून गेला असता. दोन्ही गोष्टी परवडण्यासारख्या नव्हत्या.
दहा वाजता आम्ही डाकबंगला सोडून निघालो आणि पंधरा मिनीटांतच मागाडी टेकड्यांच्या समोर झाडाच्या सावलीत गाडी थांबवली. मी माझी रायफल आणि मॅगझीनमधल्या गोळ्या तपासल्या. मागाडी टेकड्यांचा पायथा रस्त्यापासून दोन मैलांवर होता. पायथा गाठून आम्ही दाट जंगलात प्रवेश केला आणि टेकडी चढण्यास सुरवात केली. सुमारे तासाभराच्या खड्या चढणीनंतर आम्ही लँटनाचा समुद्र पसरलेल्या भागात पोहोचलो.
हाता-पायांवर रांगत आम्ही लँटनाच्या त्या जंगलात शिरलो. अलिमुथू पुढे, त्याच्यापाठी मी आणि मला जवळजवळ चिकटून माझ्यापाठी मुनुस्वामी. सुमारे फर्लांगभराचं अंतर पार करणं म्हणजे एक दिव्यं होतं. लॅंटनाच्या काट्यांनी आम्हांला अक्षरशः ओरबाडून काढलं होतं ! ते फर्लांगभर अंतर पार करून जाईपर्यंत मी घामाघूम झालो होतो. माझ्या खाकी शर्ट-पँटच्या चिंध्या होऊन लोंबत होत्या. माझे हात-पाय आणि चेह-यावरच्या कातड्याचे नमुने मी तिथल्या काट्याकुट्यांवर ठेवून आलो होतो !
लँटनाच्या समुद्रातून पार होऊन अखेर आम्ही त्या टेकड्यांच्या मध्ये असलेल्या खोलगट दरीत पोहोचलो. या दरीत ठिकठिकाणी मोठ्या शिळा पडलेल्या होत्या. कित्येक शिळांच्या अर्ध्या उंचीपर्यंत गवत वाढलेललं होतं. चित्त्याची गुहा दरीच्या दुस-या टोकाच्या दिशेने तीन-चतुर्थांश अंतरावर डाव्या हाताला होती. इथे अफाट जंगल पसरलेलं होतं. दहा वाघ आणि पंचवीस चित्ते तिथे एकच वेळी लपले असते तरी पत्ता लागला नसता !
आता मी पुढे निघालो. माझ्यापाठी अलिमुथू आणि त्याच्या पाठोपाठ मुनुस्वामी. मी उजव्या दिशेला वळलो आणी त्या टेकडीचा पायथा गाठला. चित्त्याचा हल्ला झाला तर आमच्या डाव्या बाजूने होणार होता. तो आमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी आम्हांला दिसणं आवश्यक होतं. सावधपणे मार्गक्रमणा करत आम्ही गुहेच्या समोर पोहोचलो. गुहेच्या वरती छताप्रमाणे पुढे आलेली भलीमोठी शिळा होती. त्या शिळेला पूर्वी कधीतरी मधमाशांची पोळी लटकल्याच्या खुणा खालूनही दिसत होत्या. गुहेच्या जमिनीचा भाग गुहेसमोर वाढलेल्या उंच गवतामुळे दिसत नव्हता. गुहेच्या आजूबाजूला लहान-सहान दगड इतस्ततः पसरलेले होते.
आणि आम्हाला गुरगुरण्याचा हलकासा आवाज आला !
कोणाचा आवाज असावा ? अस्वल का चित्ता ?
काही क्षण मी परिस्थितीचा विचार केला.
गुरगुरण्याचा आवाज निश्चीतच समोरून आला होता. माझ्यापुढे दोन मार्ग होते. गुहेच्या परिसरात दगडांचा वर्षाव करून जनावराला उठवणं किंवा पुढे सरकून गोळी झाडण्याचा प्रयत्न करणं. दुसरा पर्याय धोक्याचा होता. मी पुढे सरकलो असतो तर अस्वल असो वा चित्ता, माझ्यापेक्षा उंचीवरून मला पाहण्याची आणि हल्ला करण्याची त्यांना संधी मिळाली असती. अशा परिस्थितीत जनावराने हल्ला करण्यापूर्वी मी त्याला पाहू शकलो नाही अथवा माझी पहिली गोळी अचूक वर्मी लागली नाही तर माझी खैर नव्हती.
अलिमुथू आणि मुनुस्वामीला मी गुहेत दगडफेक करण्याची सूचना केली.
काहीही झालं नाही.
कोणत्याही क्षणी गोळी झाडण्याच्या तयारीत समोर पुसटशीही हालचाल दिसते का यावर माझं लक्षं होतं.
गुहेच्या दिशेने आणखीन दगड फेकले गेले.
माझ्या उजव्या हाताला असलेल्या गवतात किंचीत हालचाल झाल्याचं जाणवलं. गवताचा तो पट्टा गुहेच्या तोंडाच्या बाजूने टेकडीच्या वर पर्यंत जाऊन मागच्या भागात उतरत होता.
कदाचित वा-याच्या झुळुकीमुळे गवताची हालचाल झाली असेल किंवा एखाद्या जनावरामुळे. जनावर असलंच तर ते अस्वल नव्हतं याची मला एव्हाना खात्री झाली होती. एकतर तपकीरी छटेच्या गवतात अस्वलाचा काळा रंग माझ्या सहज ध्यानात आला असता. दुसरी गोष्ट म्हणजे अस्वल धसमुसळं असतं आणि अशी बेमालूम हालचाल करणं त्याच्या आवाक्याबाहेरचं असतं. एखाद्या जागी ते धडपडत प्रगट होतं किंवा ओरडा-आरडा करत पळून जातं.
डोळे ताणून मी पाहत राहिलो आणि चित्त्याच्या कातडीवरचे ठिपके मला स्पष्ट दिसले. गुहेच्या वर छताप्रमाणे आलेल्या त्या शिळेजवळ ! तो वर चढाताना मध्येच थांबला होता. निश्चीतच तो मागे वळून आमच्याकडे पाहत असावा. मात्र गवतात त्याचा चेहरा अथवा डोकं कुठे असावं याचा मला अंदाज येत नव्हता. आणखी काही क्षणांतच तो पसार झाला असता.
मी त्या कातडीच्या भागावर नेम धरून गोळी झाडली.
गोळी बसतात चित्ता उंच उसळला आणि उतारावरून मागे घसरत जात अदृष्य झाला. धावतच एका शिळेवर चढून तो कुठे दिसतो आहे ते पाहण्याचा मी प्रयत्न केला. मला काहीही दिसलं नाही.
मी दहा मिनीटं वाट पाहिली. चित्त्याचा बारीकसाही आवाज आला नाही.
अलिमुथू आणि मुनुस्वामीला सुरक्षीत आसरा घेण्यास सांगून मी पुढे झालो. एकेक पाऊल जपून टाकत आणि अचानकपणे होऊ शकणा-या हल्ल्याला तोंड देण्याची तयारी ठेवत मी पुढे सरकत होतो. मध्येच रांगत एखाद्या शिळेवर चढून चित्ता दिसतो आहे का यावर हे पाहत होतो.
अखेर एके ठिकाणी मला तो मरून पडलेला दिसला !
मी अंदाजाने मारलेली गोळी त्याच्या वर्मी लागली होती. मानेच्या मागच्या भागातून शिरून गोळीने त्याची कवटी फोडली होती.
चित्त्याची पाहणी केल्यावर मुनुस्वामीने झाडलेली गोळी त्याच्या पाठीमधून जाऊन खांद्याजवळून बाहेर पडली होती. ही जखम चांगलीच चिघळली होती. त्यात किडे वळवळत होते ! मुनुस्वामीच्या गोळीचे आणखीन दोन छरे चित्त्याच्या कातडीत शिरलेले मला आढळले. त्या जखमा भरून येत होत्या. खांद्यावरच्या जखमेच्या वेदना असह्य होऊन तो पुढे-मागे नरभक्षक होण्याची दाट शक्यता होती.
लँटनाच्या त्या जंगलातून त्याचा देह ओढून काढताना आमच्या नाकी नऊ आले.
त्या दिवशी संध्याकाळी आम्ही पोलीस प्रमुखासमोर चित्त्याचा मृतदेह ठेवला. त्याने मुनुस्वामीला दिलेल्या चार दिवसांपैकी दोन दिवसातच चित्त्याला गाठण्यात आम्ही यशस्वी ठरलो होतो. पोलीस प्रमुखाने आनंद व्यक्त केला. मुनुस्वामीची सहीसलामत सुटका झाली हे सांगायला नकोच !
( मूळ कथा : केनेथ अँडरसन )
( ही कथा अँडरसनच्या पुस्तकात चित्त्याबद्दल म्हणून नमूद केलेली आहे. )
प्रतिक्रिया
20 Apr 2014 - 8:37 am | स्पंदना
तुम्ही लेखन प्रकार निवडताना "अनुवाद" असा निवडा स्पार्टाकस.
अर्थात त्याने काही जास्त फरक पडत नाही कारण तुम्ही मुळ कथेचा स्त्रोत आणि लेखकाचे नाव दिले आहेच.
उगाच एक मुनुस्वामीपणा! ;)
फारच छान अनुवाद! रसाळ लिहीता.
20 Apr 2014 - 12:25 pm | अनुप ढेरे
आवडली कथा.
20 Apr 2014 - 2:06 pm | अजया
आवडली कथा !पु.अ.शु.!!
21 Apr 2014 - 12:18 pm | भ ट क्या खे ड वा ला
ओघवता अनुवाद
21 Apr 2014 - 3:04 pm | सार्थबोध
स्पार्टाकस खुप छान अनुवाद...
21 Apr 2014 - 8:01 pm | कवितानागेश
वॉव. मस्त लिहिलय. :)
22 Apr 2014 - 1:04 am | सुहास झेले
जबरदस्त... तुमचे लेख म्हणजे पर्वणीच. अजून येऊ देत :)
22 Apr 2014 - 4:04 am | प्रश्नलंका
मस्तच हो..! फक्त एक सुधारणा सुचवायची आहे.. 'लँटना' याला मराठीमध्ये 'घाणेरी' असं नाव आहे.. अनुवाद उत्तमच, पण हा फार कमी माहितीतला शब्द टाळून बर्यापैकी माहित असलेला मराठी शब्द वापरू शकाल.
23 Apr 2014 - 1:33 pm | कुसुमावती
सुरस. अजुन कथा येवुंदेत.
23 Apr 2014 - 4:52 pm | पैसा
मुनुस्वामी म्हणजे नमुना आहे. अनुवाद छान. पण या शिकारींमुळे सगळे वन्यप्राणी नामशेष व्हायच्या मार्गावर आहेत हे आठवत रहातं.
23 Apr 2014 - 10:52 pm | शुचि
वा!! कथा खरच सुरस आहे. आवडली.
23 Apr 2014 - 11:41 pm | खटपट्या
आवडली !!!
24 Apr 2014 - 1:47 am | बहुगुणी
मस्त रंजक कथा आहे. धन्यवाद!
28 Apr 2014 - 5:04 pm | अमोल मेंढे
आणखी येवु द्या
21 May 2019 - 5:21 pm | llपुण्याचे पेशवेll
शिकारी कथा चांगली वाटली. पण भारतीय चित्ते यामुळेच नामशेष झाली .