आरोग्यवर्धक पाकक्रुती... भाग २ ... आल्याच्या वड्या.......

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in पाककृती
14 Feb 2014 - 10:14 pm

प्रथमतः काही गोष्टी:

१. ह्या अत्यंत घाई घाईत बनवल्याने हव्या तशा जमल्या नाहीत आणि मध्येच ऐन वेळी फोन आल्याने थोडी भानगड झाली.

२. श्री. आदूबाळ आणि जेपी ह्यांच्या आग्रहास्तव बनवल्या असल्याने, ही पा.क्रु. त्यांना अर्पण.

३. वड्या करायला शिकायचे असेल तर ही प्रथम शिकायला लागते.समजा चुकल्याच (जशा माझ्या चुकल्या) तर चहात वापरता येतात आणि उरलेल्या किसाचा (किंवा चोथ्याचा) उपयोग लोणच्यासाठी किंवा मुखशुद्धी बनवण्यासाठी करता येतो.

४. मोबाईल बंद ठेवा किंवा फोन घेण्यासाठी दुसर्‍या व्यक्तीची नेमणूक करा.

५. आले स्वतः आणायचे आणि स्वतःच किसायचे.जोडीदारने किसले आणि आल्यात जर रेषांचे प्रमाण जास्त असेल तर, "एक मेलं फक्त आलंच तर आणायचे होते.ते पण धड आणता येत नाही.", ह्या प्रथम वाक्याने सुरुवात होणारा अनेक वाक्यी अध्याय सुरु होईल.

६. हा पुरुषांनी करून आपापल्या बायकोला द्यायचा पदार्थ आहे.

७. वड्या पाडायला सुरुवात करण्यापुर्वी ओळखायची खूण, म्हणजे कढईच्या पातेल्याच्या कडेला साखर जमायला लागते.

८. ह्या आरोग्यवर्धक का? तर हिवाळ्यात ह्या खाल्या की सर्दी होत नाही.पावसाळ्यांत पचन चांगले सुधारते.उन्हाळ्यात आंबे,फणस खावून आलेले जडत्व कमी करायला मदत करतात.(हा माझा अनुभव आहे.वैद्यांच्या सल्ल्याशिवाय जास्त खावू नयेत.जास्त खाल्या तर, कोंबडी,मासे आणि बोकड-शेळी यांचे मरण सार्थकी लावायला, तुम्हाला जमणार नाही.मला अनुभव नाही.मी तब्येत राखून तब्येतीत खातो.)

तर आता आपण बघू या साहित्य.....

१. आले....आता आल्याच्या वड्यांत आले असणारच हे तुम्हाला माहीत आहे.पण वाचकाला असे एकदम ग्रुहीत धरता येत नाही.

असो,

आले शक्यतो भारतीय घ्या.चायनीझ आले असेल तर त्यात तिखट पणा नांवालाच असतो.वड्यांची चव बिघडते.

२. साखर... आल्याच्या तिखट पणावर अवलंबून.तरीपण एक वाटी आल्याच्या रसाबरोबर एक वाटी.मी अंदाजपंचे घालतो.

३. किसणी...आले किसून घ्यायला.आल्याचे तुकडे करून एकदा मिक्सर मधून फिरवून बघीतले आहे आणि ते पण बायकोच्या समोर.तुम्ही असला घोटाळा करू नका.

४. मिक्सर... पाटावरवंटा घेवून बघा.

५. तूप...२ चमचे

६. दुध... उगीच आपले १ ते २ चमचे.

७. साय... घ्या भरपूर...(आपल्या बापाचे काय जाते.खावु दे त्याला त्याच्या बायकोच्या शिव्या.)

क्रुती......

१. आले किसून घ्या.

२. आले मिक्सर मधून काढा आणि ते गाळणी मधून पिळून रस काढून घ्या.खालील फोटो बघा.

आल्याचा रस आणि उरलेला चोथा.

३. आता एका कढईत साखर + दूध + साय टाकून ती गरम करायला ठेवा.खालील फोटो बघा.

साखर + दूध + साय

४. थोडे गरम झाले आणि साखर थोडी विघळायला लागली की ह्या कढईमधल्या रसायनात आल्याचा रस घाला. आणि ताटाला तूप लावुन घ्या.एकदा उकळी यायला लागली की क्षणभर पण विश्रांती मिळणार नाही.खालील फोटो बघा.

आल्याचा रस + साखर + दूध + साय

५. आता हे रसायन थोडेसे उसाच्या रसा सारखे दिसायला लागेल.त्याला मस्त उकळायला ठेवा.खालील फोटो नीट बघा.इथे जरा उसंत मिळाली म्हणून हा फोटो घेऊ शकलो.

आल्याचा रस + साखर + दूध + साय ह्या मिश्रणाला उकळी येतांना

६. आता रसायन थोडे घट्ट होवू लागले असेल.आणि बराचसा फेस पण यायला लागला असेल.आता ढवळत बसा...कुठपर्यंत तर कढईच्या कडेला साखर दिसायला लागे पर्यंत.

थोडे रसायन आणि बरीचशी साखर टाईप दिसायला लागले की गॅस बंद करा आणि परत ढवळा.आता रसायनाला फेस यायला लागला असेल.

लगेच त्याला तूप लावलेल्या ताटावर घ्या आणि गरम अस्तांनाच वड्या पाडायला घ्या.

मला नेमका ह्याच वेळी फोन आला आणि थोडा घात झाला.मिश्रण १५/२० सेकंदच मंद गॅसवर होते...पण ह्या ठराविक वेळेलाच खूप महत्व असते.

असो...

वड्या तर तयार झाल्या आणि डब्यात पण गेल्या.आता उद्यापासून जातील आपापल्या माणसांकडे.

तयार झालेल्या वड्यांचा फोटो खाली देत आहे.

,

वड्या थोड्या घट्ट झाल्यामुळे पूड जरा जास्त आहे आणि वड्यांचा आकारपण चौकोनी न होता, त्यांनी त्यांना हवा तसा आकार घेतला आहे.

नेहमी प्रमाणे बायकोला हा नजराणा पेश केला...बघू आता आमची व्हॅलेंटाइन खूष होते का ते.....

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

14 Feb 2014 - 10:19 pm | आदूबाळ

आभार्स! करुन बघतो आणि फोटो चिकटवतो...

दिव्यश्री's picture

15 Feb 2014 - 2:43 am | दिव्यश्री

कृपया , जरा इकडे पार्सल करता का?
तुम्ही अगदी निष्णात बल्लव आहात असे मला तरी वाटते.अतिशय पद्धतशीर माहिती दिली आहे. खूप सोप्या भाषेत पाककृती लिहिल्यामुळे माझ्या सारख्या शिकाऊ लोकांना प्रोत्साहन मिळेल काहीतरी वेगळ करण्याच.
तसं वड्या करणं हि जरा अवघड गोष्ट आहे.नीट वड्या पडल्या तर ठीक नाहीतर तो भुगाच संपवावा लागतो . :D

मुक्त विहारि's picture

15 Feb 2014 - 8:19 am | मुक्त विहारि

१००% मान्य....

म्हणूनच आधी आल्याच्या वड्या करून बघायच्या.

भूगा झाला तरी वाया जात नाही.एकदा आल्याच्या वड्या जमल्या ही मग...

श्रीखंडाच्या वड्यांना हात घालायचा.(नवशिक्यांनी ह्या एका विशिष्ट दिवशी करायच्या.चुकल्या तर त्यांत पाणी मिसळून पियुष करता येते.)

>>श्रीखंडाच्या वड्यांना हात घालायचा.

ह्यांची रेसिपी द्याच आता.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Feb 2014 - 4:10 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आल्याच्या चोथ्याचं काय करायचं?

मी फार बालपणी या वड्या करायचे. काही महिने मनसोक्त हादडल्यावर फार प्रेम राहिलं नाही, मग करायचंही बंद केलं. आता प्रमाण, पाकृ काहीही आठवत नाही.

पण त्यात आल्याचा चोथा आणि रस वेगळा काढल्याचं आठवत नाही. मला पाकृ शिकवणाऱ्या काकूने त्यात चिमूटभर मीठही घालायला सांगितलं होतं, जे मी टाळायचे. पण दोघींच्या वड्यांची चव काही वेगळी लागायची नाही.

मुक्त विहारि's picture

15 Feb 2014 - 8:28 am | मुक्त विहारि

उरलेल्या चोथ्याचे ३ पदार्थ करता येतात.

१. लोणचे .

नेहमीचा लोणचे मसाला आणि थोडे संधव मीठ.तेलाची फोडणी द्यायची नाही.

२. उन्हाळा असेल तर ,,,,

आल्याचा चोथा अधिक आवळ्याचा कीस समप्रमाणात एकत्र करून वाळवणे.वाळवल्यानंतर त्याला संधव मीठ लावणे.पावसाळ्यांत पचन शक्ती कमी झाली तर ही आवळा सुपारी कामाला येते.

३. पाचक....जे मी बनवले....

ह्या आल्याच्या चोथ्यांत थोडे सैंधव मीठ्,मिरपूड आणि लिंबाचा रस मिसळायचा.हे मिश्रण काचेच्या बाटलीत भरुन शीत कपाटात ठेवायचे. निदान १ महिना टिकते.

पाचक बनवतांनाचा फोटो काढला नाही.पण पाचक बनवल्या नंतरचा फोटो काढून चिकटवत आहे.

,

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Feb 2014 - 9:13 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला वाटलं ते लिहायचं राहिलं का काय? आल्याचा चोथा नाही, बाकी काही नाही, वडीला वस्तुमान मिळतं कशातून?

आता आठवलं, काकूच्या पाकृनुसार यात खसखसही घालायचे, आणि आलं किसून (किंवा मी मिक्सरमधून काढत असेन, आळस हा माझा मित्र आहे.) ते सगळं प्रकरणच त्यात घालायचे.

कोणाला तशा पाकृचं प्रमाण माहित्ये काय? उद्या लहर येऊन कहर करायचं ठरवलं तर ... तेव्हा हे प्रकरण बनवणं सोपं वाटलं होतं. (पक्षी - प्रयत्न कधीच फसला नाही.)

मुक्त विहारि's picture

15 Feb 2014 - 9:29 am | मुक्त विहारि

साखरे मुळे....

थोडक्यात आपण साखरेच्या पाकात, आल्याचा अर्क मिसळत असतो.

शिवाय आल्यात पण थोडासा साका असतोच.आल्याचा रस जर एक अर्धा तास ठेवला तर खाली साका जमायला सुरुवात होते.

आले किसून किंवा चोथ्यासकट घातले तर, खातांना मध्येच चोथा लागतो.आपण इथे चोथा काढून टाकत आहोत.त्यामुळे निव्वळ आल्याचा अर्क आणि साखर असल्याने,मला ह्या वड्या जास्त खुमासदार लागतात.

अर्थात, प्रत्येक पा.क्रु. विविध प्रकारे बनवता येते.त्यामुळे मी म्हणतो तेच खरे, असे खाद्य-पेयाच्या बाबतीत मुळीच होवू शकत नाही.

साधे कोंबडीचेच बघा ना...

कुणाला हाडांशिवाय तर कुणाला हाडांसकट, आवडते.

जेपी's picture

15 Feb 2014 - 6:12 am | जेपी

आवडल मुवी .

बाती आताच जागा झालोय . सविस्तर प्रतिसाद नंतर .(डोळे चोळणारी स्मायली)

मिपाकरांना धष्टपुष्ट करण्याचा चंग बांधलाय .

वड्यांइतकीच पाककृती
झणझणीत .

उरलेल्या किसाला मीठ लावून वाळवा .चटणीत ,
पावभाजीत अथवा
चघळायला वापरा .

मुक्त विहारि's picture

15 Feb 2014 - 10:31 am | मुक्त विहारि

चटणीत ,
पावभाजीत अथवा
चघळायला वापरा .

सहमत....

कच्ची कैरी's picture

15 Feb 2014 - 8:22 am | कच्ची कैरी

खाउन बघेन आता

भारीच आहे पा.कृ.! सौ. म.ज.फा. यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत !!
तुम्ही धाडसाने फसलेल्या पा.कृ. टाकल्याने अनेक होतकरु बल्लवांना त्यांच्या पा.कृ. टाकायचा धीर येणार हे नक्की. त्याबद्दल तुमचे इस्पेशल हबिणंदन!

उरलेली पूड आल्याच्या ऐवजी चहात टाकायला आजपासूनच सुरुवात केली आहे.

आणि अद्याप एक पण पदार्थ न बिघडलेला बल्लव किंवा सुगरण ह्या जगांत नाही.

खरा बल्लव किंवा सुगरण कोण?

तर जो पदार्थ बिघडला तरी वाया जावू देत नाही.

दिव्यश्री's picture

15 Feb 2014 - 2:10 pm | दिव्यश्री

खरा बल्लव किंवा सुगरण कोण?

तर जो पदार्थ बिघडला तरी वाया जावू देत नाही.>>>
व्वा ...काका भारीच .
[चला म्हणजे मी सुगरण ह्या समूहात (केटगरीत) आले. :D ]

सुबोध खरे's picture

15 Feb 2014 - 9:28 am | सुबोध खरे

वा मुवि,
वड्या शिल्लक असतील तर डोंबिवली ला याव म्हणतोय. बाकी लेख अगदी खुसखुशित आहे.

कधी पण या.मुलुंड हून निघण्यापुर्वी फोन करा.

तुम्ही येईपर्यंत वड्या तयार झाल्या असतील.

अगदी आले आणण्यापासून, ह्या वड्या बनवायला जेमतेम १ तास लागतो.

प्रचेतस's picture

15 Feb 2014 - 10:51 am | प्रचेतस

आता घारापुरीला खजुराच्या वड्यांसोबत आल्याच्या वड्याही मिळणार. :)

आता मुविंनी वर श्रीखंडाच्या वड्यांचा उल्लेख केलाच आहे तर त्याच येऊ दे!! कसें?

प्रचेतस's picture

15 Feb 2014 - 7:03 pm | प्रचेतस

त्याहीपण येऊ दे असे म्हण. :)

स्वाती दिनेश's picture

15 Feb 2014 - 6:10 pm | स्वाती दिनेश

ह्या वड्या चवीला चांगल्याच झाल्या असणार पण वड्या बिघडायला काहीही कारण पुरते.. फार नाजूक आणि नजाकतीने करण्याचे काम आहे ते..
तुम्ही आल्याचे साल काढत नाही का किसायच्या आधी? मी सालं काढते.(ती सालं वाया जात नाहीत,चहात घालता येतात.) तसेच दुधाची पावडरही घालते थोडी.. त्याने मिश्रण पटकन आळ्ते.
स्वाती

प्यारे१'s picture

15 Feb 2014 - 6:36 pm | प्यारे१

छानच! तरी लांबूनच रामराम!
आल्याच्या वड्यांनी तोंड भाजलेला.

ओ भय्या, तकियेमें अल्ला का बचा चोथा नही डाला क्या? ;)

अनन्न्या's picture

15 Feb 2014 - 7:33 pm | अनन्न्या

नेहमी प्रमाणे बायकोला हा नजराणा पेश केला...बघू आता आमची व्हॅलेंटाइन खूष होते का ते.....
हे तिखट गिफ्ट दिलेत? वड्यांची अदलाबदल करायला हवी होती, म्हणजे खजुराच्या वड्या व्हॅलेंटाइन डे ला द्यायला करायला हव्या होत्या.

मुक्त विहारि's picture

15 Feb 2014 - 11:47 pm | मुक्त विहारि

त्यामुळे आल्याच्या वड्या द्या की चॉकलेटच्या वड्या द्या .

एक दिवस प्रेमाचा उरलेले दिवस कटाक्षाचे, हेच खरे

दिपक.कुवेत's picture

16 Feb 2014 - 11:48 am | दिपक.कुवेत

पण साखरेच्या पाकाचा माझा अजुनहि गोंधळ होतो त्यामुळे तुम्हि आणल्यात तर किंवा आयत्या घेऊन खाल्ल्याचं समाधान करीन. ह्या आल्याच्या रस + चोथ्या (किंवा नुसता आल्याचा रस) वरुन अजुन एक गोष्ट करता येईल. हे असं चोथा + आल्याचा रस एकत्र करुन आईसट्रे मधे फ्रिज करुन बर्फासारखे त्याचे क्युब्स करायचे. मग चहा करताना एक क्युब टाकला कि काम झाले. वेळ आणि श्रम दोन्हि वाचतात.

साती's picture

17 Feb 2014 - 11:34 am | साती

मस्तं. चोथारहित पाकृ करायची ़कल्पना आवडली.