उत्तरायण २०१४ - अमुल डेअरी - आणंद (भाग ४)

मोदक's picture
मोदक in भटकंती
3 Feb 2014 - 1:53 pm

उत्तरायण २०१४ - पुणे ते बडोदा (भाग १)

उत्तरायण २०१४ - पुणे ते बडोदा (भाग २)

उत्तरायण २०१४ - काsssssssssssssयपो छेssss (भाग ३)

गुजरात आणि बडोद्याचा नकाशा अभ्यासताना 'आणंद' वर नजर गेली.. जागतीक कुतुहलाचा विषय असलेली अमुल डेअरी बडोद्यापासून फक्त ४० किमी अंतरावरच आहे! हे लक्षात आल्यावर लगेचच एक पूर्ण दिवस आणंदसाठी राखीव ठेवला गेला.

मंगळवार व बुधवार उत्तरायण झाल्यानंतर लगेचच गुरूवारी आणंदला भेट देणे शक्य होते. जाण्याआधी एकदा डॉक्टर वर्गीस कुरीयन यांचे "माझंही एक स्वप्न होतं" हे आत्मचरित्र आणखी एकदा वाचले. इंटरनेटवर अमुलची सध्याची माहिती वरवर चाळली. गुजरात टुरीझमला पुन्हा फोनवून आणंदमधील प्रसिद्ध ठिकाणे व त्यांची माहिती मागवली.

डॉ कुरीयन यांचे आत्मचरित्र.. (फोटो अंतर्जालावरून साभार)

.

मायमराठीतील अनुवाद.. (दोन्ही पुस्तके येथे देण्याचे कारण म्हणजे दोन्हीची नितांतसुंदर मुखपॄष्ठे..)

.

(केरळमधील एक छंदीफंदी तरूण विज्ञानात रस आहे म्हणून सरकारी शिष्यवृत्ती मिळवतो मात्र विज्ञानाऐवजी दुग्धविकासाची शिष्यवृत्ती असल्याने नाईलाजाने आणंद येथे पोहोचतो. "मी याही महिन्यात तुमची फुकट शिष्यवृत्ती घेतली मला येथून मोकळे करा" असे सरकारला दर महिन्याला कळवणार्या या युवकाने पुढे कसा कसा इतिहास घडवला ही अमुलची यशोगाथा जाणून घेण्यासाठी वरील पुस्तक वाचणे मस्ट आहे.)

अमुल डेअरीला भेट देण्याची वेळ दुपारी २ ते ४ इतकीच असल्याने फार सकाळी बाहेर पडण्याची गरज नव्हती. साडेदहाच्या सुमारास बडोद्यातून बाहेर पडलो. प्रतापगंज, निजामपुरा भागातून NH-8 व नंतर हायवेवरूनच ३५ किमी प्रवास होता.

हायवे लागताना "हाच का तो हायवे ज्याच्यावरून आपण ४००+ किमी एका दिवसात पार केले...???" असा प्रश्न आणि बंपर टू बंपर ट्रॅफीक एकसाथ सामोरे आले, कारण त्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी जेथे हायवे आणि बडोद्यातून बाहेर पडणारा रस्ता एकत्र येतात तेथे फ्लायओव्हर नव्हताच आणि साधे सर्कलही नव्हते (अर्थात सर्कलमुळे वाहतूक सुरळीत राहते हे माझे मत, T सेक्शनला कितपत उपयोगी पडेल माहिती नाही!)

बडोदा आणंद रस्ता काय वर्णावा... प्रशस्त सहा लेनमधून आलेल्या वाहनांना दोन लेनमध्ये व अनेक ठिकाणी / अरूंद पुलावर सिंगल लेन रोडवर दाटीवाटीने जायला भाग पाडले होते. अर्थात तो रस्ता सहा लेनचा बनवण्याचे काम सुरू असल्याने ही गैरसोय होत होती. काही महिन्यातच हे ही काम पूर्ण होईल.

आणंदमध्ये पोहोचल्यावर पेट्रोल भरून घेतले. का कोण जाणे या अटेंडंटने पहिल्यांदा हजार रूपये स्वाईप करून घेतले व टाकी + बाटली असे पेट्रोल भरून देवून राहिलेले पैसे रोख परत दिले.

"कार्ड घिसालो.. हमारे मशीन में प्रॉब्लेम है!" (घिसालो..?? त्याला स्वाईप म्हणायचे होते. :D )

आणंद गावातून गुजराथी पाट्या बघत.. रस्ते शोधत १२ च्या सुमारास डेअरीसमोर पोहोचलो.

डेअरीबाहेर अमुलचे प्रशस्त आऊटलेट आणि हे ATM ठळक उठून दिसत होते.

.

सिक्युरीटी गार्डने दुपारी २ ते ४ हीच भेट देण्याची वेळ आहे असे सांगीतले. एक काठेवाडी जेवण देणारे ठिकाणही लगेचच सापडले. "मग मसाला" (मसालाच का नक्की ते आठवत नाहीये पण कदाचित वेगळेही नाव असेल) अशा नावाची डिश वेगळी वाटली म्हणून सांगितली. काठेवाडी पद्धतीने बनवतो, खाकर तो देखीये! वगैरे ऐकून उत्साहाने वाट बघू लागलो.
मुगाची सात्वीक उसळ सामोरी आली. सोबत बाजरीची जा ऽ ऽ ऽ ड भाकरी. कशीबशी अर्धी भाकरी संपवून दही मागवले. तरीही ते प्रकरण संपवण्यासाठी शेवेची मदत घ्यावी लागली.
उकडलेले मूग, दही आणि मीठमसालाविरहीत साधी शेव!
व्वाह्ह.. जेवणाचा बोर्या वाजला होता! :(

जेवण आवरून पुन्हा डेअरीच्या कॉम्प्लेक्समध्ये पोहोचलो.

अमुल डेअरीचे प्रवेशद्वार.

.

सिक्युरीटी चेकिंग पार पडले. झेब्रा क्रॉसींगवरूनच रस्ता क्रॉस करणे, फूटपाथवरूच चालणे अशा या सूचना दोन तीनदा दिल्या गेल्या.

डेअरीच्या प्रशस्त आवारात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम डोळ्यात भरते ती विस्तीर्ण हिरवळ आणि ठिकठिकाणी असलेले गोधनाचे पुतळे. ठिकठिकाणी असे जिवंत वाटणारे पुतळे आहेत. एखाद्या झाडाच्या सावलीत विश्रांती घेणारा गायीचा पुतळाही दिसतो.

.

.

एकच गाईड सुरूवातीपासून शेवटपर्यंत सोबत न देता ज्या त्या सेक्शनमध्ये त्या त्या ठिकाणचे गार्ड / गाईड मार्गदर्शन करत होते. डेअरी म्युझीयम मध्ये पोहोचेपर्यंत तीन सिक्युरिटी गार्ड्सनी (असेच पॉईंट टू पॉईंट) योग्य रस्ते दाखवले.

अमुल डेअरी म्युझीयम.

.

म्युझीयमच्या दारातच गप्पा मारणारे हे एक शेतकरी कुटूंब.

.

आणि हिरवळीवर अमुल गर्ल..

.

आंत प्रवेश केल्यानंतर समोर विराजमान असलेले डॉक्टर वर्गीस कुरीयन.

.

म्युझीयमच्या आत प्रवेशद्वाराची बाजू सोडून तिनही बाजूला प्रचंड मोठ्या पॅनल्सवरती अमूलची कथा चितारली आहे.

.

.

.

साधारण तीस फुट उंच व पन्नास फूट लांब आकार असावा एका बाजूचा.. अशा तीन बाजू!
माहिती गुजराथीतून दिली गेली.

नंतर डेअरीमध्ये प्रत्यक्ष बटर आणि दूध पावडर बनवण्याच्या प्लँट मध्ये आम्हाला नेण्यात आले. अमुलची सर्व उत्पादने दाखवण्यात आली.. आगामी उत्पादने काय असतील याचीही कल्पना दिली गेली (कोणती ते आता आठवत नाहीये.)

ठिकठिकाणी विविध राष्ट्रातील उच्चपदस्थांच्या भेटीचे फोटो, शुभेच्छात्मक संदेश आणि वेगवेगळे अॅवॉर्डस काळजीपूर्वक डिस्प्ले केले होते.

भारताच्या सर्व राष्ट्रपतींच्या भेटींचेही फोटो आणि संदेश होतेच.

डेअरीच्या आवारात, म्युझीयममध्ये शेतकरी / दुग्धोत्पादक शेतकरी दिसाव्यात अशा अनेक महिला पर्यटकांप्रमाणेच वावरत होत्या. त्या कोण आहेत असे सोबतच्या गाईडला विचारले तर "वह सब लोग शेअरहोल्डर्स है, हमारे मालिक है. उन्होने भेजे हुए दूध का यहाँ पे क्या क्या होता है वह देखने आए है!" असे मनापासून आदर दर्शवणारे उत्तर मिळाले.

.

.

डेअरी प्लँट पाहिल्यानंतर सिक्युरीटी गार्डने बाहेरचा रस्त्याच्या दिशा व डेअरीच्या आवारात असलेले अमुल पार्लर दाखवले.

डेअरीमध्ये वरील सर्व गोष्टी फक्त एकाच तासात आवरल्या होत्या.

पुन्हा एकदा म्युझीयमध्ये चक्कर मारली.. अजस्त्र पॅनेल्स कॅमेर्यात पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

अचानक म्युझीयमच्या मागे एक पत्र्याचे खोपटे दिसले. अत्यंत व्यवस्थित वातावरणात ते कसेसेच दिसत होते. शेजारी एक कारंजा आणि दोन कसलेले ग्रॅनाईटचे ठोकळे होते. बघुया काय आहे म्हणून मोर्चा तिकडे वळवला.

.

हेच ते गॅरेज जेथे डॉ. कुरीयन यांनी त्यांच्या आणंदमधील आयुष्याला सुरूवात केली होती.

.

.

डॉ कुरीयन व त्यांच्या पत्नीचे मेमोरीयल.

.

डेअरीच्याच आवारात डॉ. कुरीयन यांचा प्रशस्त बैठा बंगला आहे.

.

मॉली कुरीयन व डॉक्टर वर्गीस कुरीयन

.

डॉ. कुरीयन यांचे आत्मचरित्र वाचल्यानंतर आणंदला भेट द्यायची इच्छा होती. ती अचानक पूर्ण झाल्याने आणंदमधील बाकीचे काही बघावेसे वाटले नाही.

परतताना प्रचंड ट्रॅफीकमधून कशीबशी वाट काढत व एका ठिकाणी हायवे सोडून कोणत्यातरी गावातून (जीपीएसच्या भरवश्यावर) मोठ्ठा वळसा मारून दीडएक तासात पुन्हा बडोद्यात प्रवेश केला.

उद्या पुन्हा पुण्यासाठी बाहेर पडायचे होते...

(क्रमशः)

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

3 Feb 2014 - 2:00 pm | सौंदाळा

मस्त, अनोखी सफर घडवलीस.
डॉ. कुरियन यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. बरं झाले त्यांच्या चरित्राची माहीतीदेखिल दिली. वाचनालयातुन मिळवुन नक्की वाचेन.

अनिरुद्ध प's picture

3 Feb 2014 - 2:03 pm | अनिरुद्ध प

वर्णन आवडले,(फोटु दिसत नाहित्),पु भा प्र.

कैलासवासी सोन्याबापु's picture

3 Feb 2014 - 2:11 pm | कैलासवासी सोन्याबापु

पवित्र झालात!!! अन ह्या धाग्यानिमित्ताने आम्हाला ही पवित्र केलात!!!!

अहो राष्ट्रतिर्थ आहे हे!!!!, कोण म्हणते राष्ट्रतिर्थे फक्त युद्धभुमीवरच असतात!!!!

-बाप्या :)

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Feb 2014 - 2:15 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त!

कुरियन यांचे आगमन फ्रायडे द थर्टीन्थला झालेले बघून गंमत वाटली. त्यांच्या आगमनाइतकी शुभ घटना दुसरी नसावी, या भागासाठी. :)

मोदक's picture

12 Feb 2014 - 6:10 pm | मोदक

सहमत.

हे फ्रायडे द थर्टींन्थचे माझ्याही लक्षात आले नव्हते. ;)

डॉ कुरीयन यांचाही अमावस्या, तारखा, शुभ-अशुभ गोष्टींवर विश्वास नव्हता याअनुषंगाने एक किस्सा वाचला होता. संदर्भ सापडला की देतो.

अवांतर - आणंदला जाणार म्हटल्यावर बडोद्यातील परिचित, अमुलशी दुरान्वयेही संबंध न आलेले लोकही जिव्हाळ्याने बोलत होते. एक दोन जणांनी डॉ कुरीयन यांच्याबद्दल "शैतान आदमी था, किसीकी सुनता नही था लेकीन सबकी भलाई चाहता था, एकदम अच्छा आदमी, किसानोंका बहोत भला किया उसने!" असे उद्गारही काढले.

(डॉ. नितु मांडकेंबद्दल अनेक जण जसे जिव्हाळ्याने बोलतात.. "विक्षीप्त होते, फटकळ होते पण देवमाणूस होते" तसेच काहीतरी.)

नाखु's picture

3 Feb 2014 - 2:22 pm | नाखु

नाहीत त्याशिवाय वर्णन वाचले. पण (आखडते) घेतले आहे असं का वाटतय ते माहीत नाही..
पु.भा.प्र.

प्यारे१'s picture

3 Feb 2014 - 2:37 pm | प्यारे१

आवडला हा ही भाग!

जेपी's picture

3 Feb 2014 - 2:55 pm | जेपी

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:

मृत्युन्जय's picture

3 Feb 2014 - 2:56 pm | मृत्युन्जय

फोटो नाही रे दिसत. पण अमूल म्हणजे बेष्टच असणार.

मदनबाण's picture

3 Feb 2014 - 3:06 pm | मदनबाण

वाचतोय... :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Feb 2014 - 3:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

वर्णन थोडक्यात वाटले तरी हा भाग खूप आवडला... आतापर्यंतचा सर्वात जास्त आवडलेला भाग.

"वह सब लोग शेअरहोल्डर्स है, हमारे मालिक है. उन्होने भेजे हुए दूध का यहाँ पे क्या क्या होता है वह देखने आए है!" हे आणंदचा कर्मचारी म्हणत असतानाचे छायाचित्रण घेऊन ते एअर इंडिया सकट सर्व सरकारी उद्योगांच्या कर्मचार्‍यांच्या प्रशिक्षणाच्या वेळेस बघणे सक्तीचे केले पाहिजे... अर्थात याने त्यांना काही जनाची नाहीतर मनाची वाटेल हे स्वप्नरंजनच वाटतेय, तरीसुद्धा करून बघायला हरकत नाही.

कवितानागेश's picture

3 Feb 2014 - 4:00 pm | कवितानागेश

हा भाग फार आवडला. :)

अनुप ढेरे's picture

3 Feb 2014 - 4:24 pm | अनुप ढेरे

आवडलं !

प्रमोद देर्देकर's picture

3 Feb 2014 - 4:36 pm | प्रमोद देर्देकर

खुप छान माहिती आणि फटू.

मलाही भेट द्यायची आहे या प्रकल्पाला! कधी जमेल ते देव जाणे!
सगळे फोटू व माहिती आवडली. अमूल एटीएम चांगले आहे.

इरसाल's picture

3 Feb 2014 - 4:41 pm | इरसाल

तुम इदर भी जाके आया बोले तो.

मस्त मोदका, बडोदा व्हिजीट सत्कारणी लावलीस म्हणायची........तरी पण शेवटी मी हेच म्हणणार की मला नाय भेटलास हे चांगले नाही केलेस.(म्हणुनच देवाने तुला जाड भाकरी खायला लावली :)) ;))

मोदक's picture

3 Feb 2014 - 8:22 pm | मोदक

श्रीराम टमटमवाला..
सयाजी बाग..
EME टेंपल..
लीलो चेवडो..
सेव उसल..
मसाले आणि नमकीन्सची दुकाने..
आणि
लक्ष्मी विलास पॅलेसचे गेट. (उत्तरायणच्या दिवशी पॅलेस बंद होता)

लंबी लिस्ट है...! 8)

अनन्न्या's picture

3 Feb 2014 - 4:43 pm | अनन्न्या

एकदाच गेलेय बडोद्याला, पण फक्त पावागड्ला जाऊन आलो.

हा भागही छान जमला आहे .फोटोपण योग्य दिलेत .

कुरिअन हे बडोद्याचे दुधाचे
आणि गवळ्यांचे राजे .यांना
नंतर अमूलमधून का हाकलले ?

आदूबाळ's picture

3 Feb 2014 - 6:23 pm | आदूबाळ

काय मस्त भाग!

पिलीयन रायडर's picture

3 Feb 2014 - 6:46 pm | पिलीयन रायडर

सगळ्यात मस्त भाग!!!

विकास's picture

3 Feb 2014 - 9:25 pm | विकास

नक्कीच जाऊन बघायला आवडेल!

सानिकास्वप्निल's picture

3 Feb 2014 - 9:44 pm | सानिकास्वप्निल

मस्तं झालाय हा भाग
आवडला :)

मधुरा देशपांडे's picture

3 Feb 2014 - 10:06 pm | मधुरा देशपांडे

सगळेच भाग आवडले.

श्रीरंग_जोशी's picture

3 Feb 2014 - 10:14 pm | श्रीरंग_जोशी

फारच छान. वर्णन व फटु आवडले.

लेखमालिकेतील हा भाग म्हणजे मोदकावर ओतलेले अमुल तूप :-).

रमेश आठवले's picture

4 Feb 2014 - 11:06 am | रमेश आठवले

आनंद येथील दुग्ध संस्थेच्या विकासाची माहिती देणारा मंथन या नावाचा एक उत्कृष्ट सिनेमा श्याम बेनेगाल यांनी १९७६ साली दिग्दर्शित केला होता. त्यात कुरियन ची भूमिका गिरीश कर्नाड यांनी केली होती व नायिकेचे काम स्मिता पाटील यांनी केले होते. मंथन ला बरीच बक्षिसे मिळाली होती आणि त्यातील एक गाणे- मेरो काम काथापारे- हे खूप लोकप्रिय झाले होते. आजही ते ऐकाला आवडेल -
http://www.youtube.com/watch?v=IRK72kSm25c

अत्रुप्त आत्मा's picture

5 Feb 2014 - 12:42 am | अत्रुप्त आत्मा

हा ही भाग फारच छान!

समांतरः- ते अमुलचं चॉकलेट.. ४ प्रकारात मिळणारं ! अनेकदा अठवतं.पण गेल्या काहि वर्षात सहजपणे कुठ्ठेही मिळालेलं नाही. :( मला त्यातलं विशेषतः डार्क ग्रीन/गोल्डन वेष्टणातलं (अता नाव पण विसरलोय!) लै लै अवडतं... पण... :(

पैसा's picture

7 Feb 2014 - 1:43 pm | पैसा

अमूलची कथा आवडली.

अमूल व्हिजिट केलास हे लय भारी काम केलास बघ मोदका!!!! भारी, लैच भारी.

येस्स.. वरती सोन्याबापू म्हणाले तशीच काहीशी भावना होती.

डॉ कुरीयन यांचे घर, ते गॅरेज बघताना वेगळाच आनंद वाटला होता.

सुधीर's picture

7 Feb 2014 - 6:22 pm | सुधीर

कधी योग आला तर जरूर भेट देईन.

सस्नेह's picture

7 Feb 2014 - 10:07 pm | सस्नेह

अटर्ली बटर्ली टेस्ट नाही केलंस ?