उत्तरायण २०१४ - बडोदा ते पुणे (भाग ५ - समाप्त)

मोदक's picture
मोदक in भटकंती
12 Feb 2014 - 6:43 pm

उत्तरायण २०१४ - पुणे ते बडोदा (भाग १)

उत्तरायण २०१४ - पुणे ते बडोदा (भाग २)

उत्तरायण २०१४ - काsssssssssssssयपो छेssss (भाग ३)

उत्तरायण २०१४ - अमुल डेअरी - आणंद (भाग ४)

आणंदहून परतताना एके ठिकाणी EME AREA अशी पाटी दिसली. EME Temple हे ठिकाण बडोद्यात असताना भेट देण्याच्या ठिकाणांमध्ये होतेच. गाडी तिकडे वळवली.

या मंदिराची एकूण रचना बघण्याची खूप उत्सुकता होती कारण Electrical and Mechanical Engineering (EME) या आर्मीच्या एका विभागाने हे मंदिर बांधले आहे असे वाचनात आले होते आणि आर्मीच्या अखत्यारीत असल्याने "सर्वधर्मसमावेशक मंदिर" असणे उघड होते.

आर्मी एरीयामध्ये प्रवेश करताना कडक तपासणी केली गेली. एका मोठ्या रजिस्टरमध्ये डिट्टेल माहिती भरून घेतली व आयडी प्रूफची मूळ प्रत त्यांच्याकडे ठेवून घेतली. बाहेर जाताना त्यांनी दिलेला तात्पुरता पास परत केला की आपला आयडी प्रूफ परत मिळत होता. आर्मीच्या पद्धतीनुसार हेल्मेट असेल तरच गाडी आत सोडत होते.

येथे माहिती नोंदवून घेणारा कोणी गोस्वामी नामक अधिकारी मी त्यांच्या रजिस्टरमध्ये माहिती भरताना एकदम उसळलेच..

गाडीचे पासींग आणि लायसन्स वरचा पत्ता पाहून..

गोस्वामीजी - इतना दूर गाडीपे क्यों घूम रहे हो..?
मी - उत्तरायण. फेस्टीवल के लिये आया हूं!
गोस्वामीजी - ठीक है. लेकीन गाडीपे..???
मी - हां!
गोस्वामीजी - क्यों करते हो ऐसा..?
मी - ठीक है ना सर.. ये सब अभी नही करेंगे तो कब करेंगे..?
गोस्वामीजी - तुम्हारा डॉक्युमेंट बिना भूले लेके जाना और संभालके जाओ!!

मान डोलावून पास ताब्यात घेतला. मंदिराच्या आवारात पोहोचलो. एका पीटी / परेड ग्राऊंडमध्ये जवानांना इकडून तिकडे पळवण्याचे सत्र सुरू होते.

मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर सर्वप्रथम जाणवते ती शांतता. हे मंदिर खूप चांगले व नीटनेटके ठेवले गेले आहे. मंदिराच्या आवारात पुरातनकालीन मुर्ती जतन करून ठेवल्या आहेत. वल्लीसाठी फोटो काढून घ्यावेत असा विचार केला पण कॅमेर्‍यावर बंदी होती, सगळीकडे कडक पहारा होता आणि आर्मीवाले अशा गोष्टींना खूप सिरीयसली घेत असल्याने फोटो काढण्याची रिस्क घेतली नाही.
( शिक्षा म्हणून दोन-तीन तास गवत उपटायला लावले तर काय घ्या..? ;) )

पुढील फोटो अंतर्जालावरून साभार..

.

हे संपूर्ण स्ट्रक्चर अॅल्युमिनीयमचे आहे.

डोमच्या वरचा कलश हिंदुत्वाचे प्रतिक आहे
डोम हे इस्लामचे
टॉवर हे ख्रिस्ती धर्माचे
टॉवरच्या वरचा सोनेरी कळस बौद्ध धर्माचे
आणि मंदिराचे प्रवेशद्वार जैन संस्कृतीचे प्रतिक आहे.

या मंदिराच्या भोवती छोटीशी बाग आहे व बागेमध्येही देवदेवतांची मंदिरे आहेत. एका कृत्रीम गुहेमध्ये शिवलिंग स्थापन केले आहे.

थोड्यावेळाने घरी पोहोचलो, बॅग ठेवली व पुन्हा बाहेर पडलो. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज मार्केट सुरू होणार होते. श्रीराम टमटमवाल्याला भेट द्यायची होती. नमकीन्स आणि मसाले खरेदी करायचे होते.

टमटम

.

वेगवेगळे नमकीनचे प्रकार, कांदा, लिंबू, द्राक्षे आणि तीनचार वेगळेच मसाले भुरभुरून केलेला एक टेस्टी प्रकार. मजा आली.

बडोदा ट्रीप जवळजवळ पूर्ण झाली होती. उद्या सकाळी बाहेर पडायचे होते.

सकाळी लवकर उठलो चार एक तास झोप झाली होती. फ्रेश होतो. आज एकाच दिवसात पुण्याला पोहोचायचे की येताना मुंबईत थांबलो तसेच एक मुक्काम करून पुण्यात पोहोचायचे हे ठरले नव्हते म्हणून मुद्दाम थोडे लवकर उठलो, आवरून पांच वाजता गाडीला किक मारली..!!

बडोदा शहरातून जाणारा रस्ता असला तरी भल्या पहाटेची वेळ असल्याने क्वचित एखादी गाडी दिसत होती. अर्ध्यातासाने हायवे सुरू झाला. प्र चं ड थंडी होती. दोन जर्कीन घालूनही थंडी वाजतच होती. तासाभरातच पहिला चहाचा ब्रेक घेतला. सुर्योदयानंतर थंडी कमी होण्याची अपेक्षा होती.. पण गारठा जाणवत होताच. थोडा वेळ प्रवास केल्यानंतर कडाका आणखी वाढला.
नर्मदा नदीच्या सान्निध्यात असल्याने वातावरण थंडगार झाले होते. नर्मदा नदीवर फक्त दोन लेनचे आणि थांबायला आजीबात जागा नसलेले असे अरूंद पूल होते. दोन्ही वेळा फोटो काढता आला नाही.

जाता जाता - "गंगास्नाने यमुनापाने नर्मदादर्शने तापी स्मरणे..."
असा एक श्लोक आहे. गंगेमध्ये स्नान केल्याने, यमुनेचे जल प्राशन केल्याने, नर्मदेचे दर्शन केल्याने आणि तापीचे स्मरण केल्याने.. (पुढची ओळ माहिती नाही. पुण्य मिळेल वगैरे असावी. पूर्ण श्लोक माहिती आहे का कोणाला..??)

सलग ६० चा स्पीड पकडून चाललो होतो. थंड हवा असली तरी आता बोचरी थंडी कमी झाली होती. आजुबाजूला विरळ झाडी असलेल्या रस्त्यावरून, एक एक गांव मागे पडत होते. अचानक अंकलेश्वर जवळ धुक्याच्या पडद्यामध्ये प्रवेश केला.

.

.

खूप दाट धुके होते. रोंरावत जाणारे ट्रक, कंटेनर्स आणि सुसाट सुटलेल्या गाड्यांचे स्पीड आपोआप कमी झाले होते.

.

परतीच्या प्रवासात वेळेवरती काटेकोर लक्ष ठेवले होते व थांबेही कमी केले होते. जाताना तीन तासात १०० किमी पार करत गेलो होतो, तो वेळ आता अडीच तासांपर्यंत आणला होता. दरम्यान चहाचे आणखी एक दोन ब्रेक झाले होते.

वाटेत लागलेला असाच एक बंधारा.

.

वाटेत एका सरदारजीच्या धाब्यावरती बटर फ्राईड आलू पराठा आणि दोन मोठ्ठे ग्लास भरून चहा असे खाणे आवरले. शाजीचा मोठा भाऊ शोभावा असा प्राठ्याचा आकार होता.

रस्ता खूपच चांगला होता.. (NHAI, गुजरात सरकार, केंद्रातले सरकार जे जे कोणी भागीदार असतील त्यांना धन्यवाद्स देत देत गाडी पळवत होतो..!)

.

5:00 AM बडोदा - 00 KM
7:30 AM अंकलेश्वर - 102 KM
9:30 AM चिखली - 193 KM
1:00 PM मनोर - 325 KM

असा एका लयीत प्रवास सुरू होता.

मनोर नंतर झाडी दाट होवून लागली.. घनदाट झाडीच्या मागून डोंगर डोकावू लागले होते. महाराष्ट्रात खर्‍या अर्थाने प्रवेश केला आहे याची जाणीव झाली.

.

.

३८० किमी पार करून घोडबंदर रोड आला तेंव्हा दुपारचे दोन वाजले होते. एका नीरा वाल्यापाशी गाडी बाजुला घेतली व थोडावेळ गाडीला विश्रांती दिली.

आजच पुणे गाठणे शक्य होते.

वेग आहे तोच ठेवला. पनवेल मार्गे मुंबई पुणे रोड पकडला व साडेचारच्या सुमारास कर्जतला पोहोचलो.

कर्जत लोणावळा रूट एकदम गोंधळात टाकणारा आहे - दुचाकीसाठी. नक्की कुठून कसे जायचे कळत नाही. मध्ये एकाच दिशेला जाणारे पण वेगवेगळे दोन रस्ते सामोरे आले. तेथेही पाट्या नव्हत्या. जीपीएस रस्ता दाखवत होते पण तो रस्ता एक्प्रेस हायवेवर जात होता. दोनेक मिनीटे तेथेच थांबलो तर एक मारूती अल्टो अवतरली. त्यातले बाबाजी पुण्यालाच चालले होते. त्यांना विचारून त्यांच्या मागोमाग लोणावळा गाठले. घरी हव्या असलेल्या चिक्कीची खरेदी केली.

संध्याकाळी सात वाजता चिंचवड. मित्रांना भेटलो व रात्री साडेदहाच्या दरम्यान घरी पोहोचलो.

दिवसभरात एकून ५६० किमी रनींग झाले होते (१५ तास!!). विश्रांतीची गरज भासावी इतकी दमणूकही झाली नव्हती.

जवळपास महिनाभर सुरू असलेल्या प्लॅनींगची मनजोगती सांगता झाली होती. एक अविस्मरणीय आणि अनेक नवीन अनुभव देणारी ट्रीप व्यवस्थीत पार पडली होती.

आता हिमालय खुणावतो आहे.. बुलेटवर!

******************************************************

व्यनी, खव आणि धाग्यात विचारलेल्या प्रश्नांची एकत्रीत उत्तरे द्यायचा प्रयत्न करत आहे.

"गाडीवरून एक दूरची ट्रीप करायची आहे" हे दरवर्षी घोकत होतो पण मजल फारतर दरवर्षी दापोली(~५०० किमी), अनेकदा सांगली/कोल्हापूर (~६०० किमी) आणि एकदाच बेळगांव (~६६० / ७०० किमी) इतकीच जात होती. ऑक्टोबर / नोव्हेंबरच्या दरम्यान एकदा मित्रांच्यात हाच विषय निघाला व नंतर काही कारणाने रद्दही झाला. मात्र या वर्षी कुठेतरी जायचेच्च्च असे ठरवले व संक्रांत + बडोदा असा प्लॅन ठरला.

मनरावची लेह वारी आणि अजिंक्य नामक भटक्या मित्राने अक्षरशः जॉब सोडून तीन महिने उत्तर भारतात १० हजार किमीहूनही अधिक अंतराची केलेली भटकंती यांमुळे थोडी जास्त जळजळ झाली. यावर उतारा म्हणूनही ही ट्रीप मस्ट होती. ;)

२००८ साली उत्तरायण निमीत्तानेच बडोदा भेट झाली होती. जाताना बस व येताना रेल्वे. त्यावेळी व्यवस्थीत असलेले ४ लेनचे रस्ते आणखी मोठे - ६ लेनचे करण्याची युद्धपातळीवरची तयारी (ट्रॅफीकजॅममध्ये अडकून) पाहिली होती. त्यामुळे रस्त्यांबाबत काही टेन्शन नव्हते. मुख्य काळजी होती ती गाडीची. इतक्या लांब पॅशन प्लसवरून जावे की नको हा कळीचा मुद्दा होता.

संपूर्ण प्रवासात गाडीने अप्रतीम सोबत केली. कोणताही त्रास झाला नाही. सोबत नेलेली ट्युब आणि क्लच केबल अजून वेष्टणातच सुरक्षीत आहे. (टचवुड!!) :)

जाताना ६८ चे माईलेज मिळाले. येताना थोडा वेग जास्ती ठेवल्याने ६० च्या दरम्यान माईलेज मिळाले.

टायर प्रेशर थोडे जास्ती ठेवले होते. नंतर त्यामध्ये काहीही बदल केला नाही.

गुजरात पोलीसांनी बाहेरची गाडी आहे हे बघून्ही कोणत्याही प्रकारे त्रास दिला नाही. बडोद्यात फिरताना किंवा आणंदमध्ये एकदा रस्ता बरोबर आहे की नाही याची खात्री करून घेताना मुद्दाम ट्रॅफीक पोलीसांना रस्ते विचारत होतो. व्यवस्थीत सहकार्य मिळाले.

महाराष्ट्र गुजरात बॉर्डरही सहजगत्या पार पडली. कारण कुणी अडवलेच नाही. ओव्हरसाईझची बॅग बघून थांबवतील असे वाटले होते. पण नाही. (ही काळजी करण्यासारखी गोष्ट असावी का..?)

आल्यानंतरही कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. दुसर्‍याच दिवशी एक बुक क्लबचा सेशन, अडीच/तीन तास बॅडमिंटन आणि संध्याकाळी वसंतोत्सव हे ही सहजगत्या एकाच दिवसात जमले.

******************************************************
उत्साहपूर्ण प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार. :)
******************************************************

प्रतिक्रिया

जेपी's picture

12 Feb 2014 - 6:58 pm | जेपी

सगळे भाग आवडले . आणी प्रश्नाची उत्तरे हि मिळाली .

इकडे ट्रफीक पुलीस एवढे चांगले असते तर आमीपण दुचाकीवरुन हिंडलो असतो .

(त्रस्त)जेपी

आदूबाळ's picture

12 Feb 2014 - 7:25 pm | आदूबाळ

लय भारी!

एका मित्राने बुलेटवर हिमालय केला आहे. काही मदत/सल्ला लागल्यास जरूर सांगणे!

बुलेटवारीला अजून दोन / तीन वर्षे अवकाश आहे. तरीही माहिती लागली तर विचारेनच - धन्यवाद.

बादवे - आदूबाळ आणि झकासराव, ५६० किमी - १५ तास. प्लीज नोट. ;)

हे सगळं ऐकूनच (आणि ऐकायलाच) मला बरं वाटतं. स्वतः कुठलंही वाहन चालवण्याचा मला भयंकर म्हणजे भयंकर कंटाळा आहे...

वाह! मस्त झाली ट्रीप! फोटू, माहिती अगदी हवे तसे येत गेल्याने मजा वाटली. किती वर्षांनी आपल्याकडचे रस्ते पाहून बरे वाटले. तुला दुचाकीवर फिरायची हौस आहे वगैरे ठीक आहे पण आमचे नाही तरी त्या हापिसरचे तरी ऐकावेस असा न विचारता दिलेला सल्ला आहे.

सानिकास्वप्निल's picture

12 Feb 2014 - 8:41 pm | सानिकास्वप्निल

बडोदे ट्रीप आवडली बरं का आणी सगळे फोटो, वर्णन उत्तम
मस्तं मस्तं :)

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Feb 2014 - 9:43 pm | बिपिन कार्यकर्ते

दंडवत!

प्रचेतस's picture

12 Feb 2014 - 10:15 pm | प्रचेतस

मस्त रे.
झकास लेखमाला झाली.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Feb 2014 - 11:44 pm | अत्रुप्त आत्मा

तुफ्फान...!

रस्ते पाहून बसल्याजागीच १२०चा स्पीड आला आहे.

कवितानागेश's picture

12 Feb 2014 - 11:53 pm | कवितानागेश

मजा केलीस की. :)

झकासराव's picture

13 Feb 2014 - 10:05 am | झकासराव

सुप्पर प्रवास आणि लेखमाला. :)

१५ तास आणि ते ५६० किमी वाचुन घशाला कोरड पडली आहे.
पाठ दुखण्याचं फीलीन्ग आलय.
बैठकीस मुन्ग्या आल्यात. :D

तुझ्यासोबत बाइक ट्रिप काढावीच एक तरी.
वनडे ट्रिप करुयात.

पिलीयन रायडर's picture

13 Feb 2014 - 12:31 pm | पिलीयन रायडर

२ दिवस ऑफिसला १५-१६ किमी बाईक वर गेले तर पाठ दुखतेय...
धन्य आहेस बाबा तू..

शिद's picture

13 Feb 2014 - 3:21 pm | शिद

जबरा अनुभव... पुढिल प्रवासासाठी शुभेच्छा..!!

स्पा's picture

13 Feb 2014 - 3:32 pm | स्पा

मस्त ट्रीप
गाडीने मायलेज सही दिला

प्यारे१'s picture

13 Feb 2014 - 3:53 pm | प्यारे१

बेष्ट रे!

पैसा's picture

13 Feb 2014 - 10:00 pm | पैसा

सगळ्या मालिकेचा झकास शेवट! पुढच्या सफरीला शुभेच्छा!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Feb 2014 - 6:26 am | निनाद मुक्काम प...

मस्त झाली ट्रीप
आपल्याला १५ तास प्रवास करायला सहज जमते पण स्वतः वाहन हाकून प्रवास करणे हा विचार स्वप्नात सुद्धा येणे शक्य नाही ,
तो आपला प्रांत नव्हे
तेथे पाहिजे जातीचे ...

नाखु's picture

14 Feb 2014 - 9:00 am | नाखु

संकल्पनेबर हुकुमी प्रवास आणि सविस्तर वर्णन दोन्हीला कडक सलाम.

स्पंदना's picture

17 Feb 2014 - 4:07 am | स्पंदना

आत्ताच सगळे भाग व्यवस्थीत रवंथ करत वाचले.
उत्तरायणेचे फोटो तर पुन्हा,पुन्हा पाहिले.
प्रवासात कोठेही रिस्क घेतल्याचे जाणवले नाही अन तेच जास्त आवडले.
पुढच्या तयारीला मनापासून शुभेच्छा अन ही ट्रीप पार पाडल्याबद्दल अभिनंदन.

एवढ्या लांब बाईकवरून जाण्यासाठी त्रिवार दंडवत!

अक्षया's picture

18 Feb 2014 - 6:24 pm | अक्षया

वाह छान धागा आणि फोटो.. :)

भावना कल्लोळ's picture

18 Feb 2014 - 6:52 pm | भावना कल्लोळ

पूर्ण लेखमाला आणि फोटो सर्वंच छान.

बॅटमॅन's picture

18 Feb 2014 - 7:10 pm | बॅटमॅन

जबराट!!!! लै आवडलं. :)

मस्त!! फोटो मात्र एकाही धाग्यात दिसले नाहीत. सगळे चौकोन चौकोन.

श्रीवेद's picture

21 Feb 2014 - 12:30 pm | श्रीवेद

खुप छान ट्रीप.
उत्तरायणेचे फोटो आवडले.
अभिनंदन.

नितीन पाठक's picture

21 Feb 2014 - 5:13 pm | नितीन पाठक

मी उत्तरायणाचे सर्व भाग अगदी आवडीने आणि मनापासून वाचले आहे. अतिशय छान अशा ओघवत्या शैली मध्ये लिहीले आहे. प्रत्यक्ष जाउन आल्या सारखे वाटते. अभिनंदन.
मी सुध्दा माझ्या बाईक वर बाहेरगावी जात असतो, परंतु माझी मजल अजून ३२५ किमी च्या पुढे गेली नाही. तुम्ही एका दिवसात ५६० किमी चा प्रवास केला हे वाचून खूपच भारी वाटले.
मला तुम्ही काही एवढ्या प्रवासात काही गोष्टीवर मात कशी केली याची उत्सुकता आहे. उदा. - एकट्याने प्रवास करतांना कंटाळा कसा आला नाही. एवढ्या लांबच्या प्रवासामध्ये हात भरून येणे, पाठीला रग लागणे, पाय आखडल्यासारखे होणे आणि महत्वाचे 'पार्श्वभाग' हुळहुळा होणे या गोष्टी कशा काय सहन केल्या ?
बाकी एकूण ट्रीप मस्त्च. तुमच्या पुढच्या ट्रीप ला शुभेच्छा आणि लवकर्च आम्हाला पुढील प्रवास वर्णन वाचावयास मिळेल अशी अपेक्षा.

मोदक's picture

24 Feb 2014 - 6:28 pm | मोदक

धन्यवाद!

एकट्याने प्रवास करतांना मला कंटाळा येत नाही. आवड हेच कारण असावे. वेळ घालवण्यासाठी आधी सांगीतल्याप्रमाणे पंक्चरचे दुकान दिसले की किलोमीटर रिडींग आणि वेळ पाहून ते घोकत होतो - पुढचे पंक्चरचे दुकान दिसेपर्यंत..! (हा खूपच कंटाळवाणा प्रकार आहे याची कल्पना आहे.. पण गाडी पंक्चर झाली असती तर हाल हाल झाले असते म्हणून "किती मागे जावे लागेल" याचे गणित सतत सुरू होते.)

१०० किमीचे टप्पे ठरवले होते. किती वेळात ते टप्पे पार करायचे.. दिवसाच्या कोणत्या वेळी कोठे असायला हवे.. किती वाजता नाष्टा, जेवण यांचे सर्वसाधारण आखाडे बांधले होते. एखादा टप्पा लवकर पार पडला तर मधल्या वेळेत एखाद्या धाब्यावरती चहा, वेफर्स असा टाईमपासही करत होतो.

गाडी चालवताना एखादा ५० / ६० च्या वेगाने जाणारा ट्रक सापडला तर त्याच्या बरोब्बर मागून सावधपणे जात होतो. थंडी वाजत नाही, आपण आपोपाप सावध होतो आणि थोडासा बदल.. (हा प्रकार आपापल्या जबाबदारीवर करावा.)

गाडीला अगदी पहिल्या दिवसापासून सॉफ्ट ग्रीप जोडली आहे त्यामुळे पंजे / तळहात भरून येत नाहीत.

प्रोबायकरचे रायडींग ग्लोव्हज वापरले.

.

चित्रात दिसत आहेत त्याप्रमाणे या ग्लोव्हज मुळे पकड चांगली राहते, कोणत्याही दिशेने; सर्वप्रकारच्या अपघातांपासून संपूर्ण तळहाताला व्य व स्थी त प्रोटेक्शन मिळते. (सर्व ग्लॉसी भाग हार्ड प्लॅस्टीकचे आहेत.)

बोटांच्या मधल्या पेरांवरती हवेसाठी जाळी आहे. त्यामुळे हाताला घाम येत नाही. त्यामुळे विनाकारण अस्वस्थ वाटणे / चिकट हात वगैरे प्रकार होत नाहीत.

सॅक जड झाली होती मात्र बराच वेळ घालवून ती व्यवस्थीत भरली होती आणि बसल्यावर मागच्या सीटवर व्यवस्थीत
टेकेल व खांदे, पाठ व हातावर कोणताही भार येणार नाही याची काळजी घेतली.

पाय आखडले नाहीत आणि 'पार्श्वभाग' हुळहुळला नाही. रस्त्याकडे आणि प्रवासाकडेच इतके लक्ष दिले गेले असावे की आणखी कोठेही लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही. ;)

अवांतर -

आपल्याला अतीश्रमानंतर होणार्‍या वेदना आणि अस्वस्थता अनेकदा मानसिक स्वरूपाच्या असतात. विचार करण्यासाठी किंवा लक्ष देण्यासाठी दुसरे काहीतरी मिळाले की वेदनांचा विसर पडतो*. तसे काहीसे झाले असावे. ...आणि आपले शरीर किती आणि काय सहन करू शकते हे पडताळून पाहणे हाही एक वेगळा अनुभव असतो. :)

(*हे माझे वैयक्तीक मत आहे.)

सुनीताबाई देशपांडेंनी "किमयागार" माधव आचवलांवर लिहिलेल्या एका लेखामध्ये आचवलांनी साकारलेले "बडोद्यातील अनोखे डिझाईन असलेले अ‍ॅल्युमिनीयमचे मंदीर" असा उल्लेख आणि त्या मंदिराचे केलेले वर्णन या धाग्याच्या सुरूवातीला वर्णन केलेल्या EME Temple ला लागू पडत आहे.

याबाबत अधिक माहिती कोणाला आहे का..?

(लेख अलिकडेच वाचनात आला म्हणून खोदकाम प्रपंच.)