उत्तरायण २०१४ - काsssssssssssssयपो छेssss (भाग ३)

मोदक's picture
मोदक in भटकंती
28 Jan 2014 - 1:49 pm

उत्तरायण २०१४ - पुणे ते बडोदा (भाग १)

उत्तरायण २०१४ - पुणे ते बडोदा (भाग २)

रात्री ११ नंतर पतंग बाजार कसा असेल (आणि असेल का?) अशा शंका होत्याच, मात्र एकदम...

.

वेगवेगळ्या आकाराचे, रंगाचे, प्रकारचे (कागदाचे, प्लॅस्टीकचे पतंग) आणि त्यातही पुन्हा वैविध्य होतेच!!

.

.

.

प्लॅस्टीकचे फॅन्सी पतंग.

.

दुकानाची पायरी किंवा शटर अशा स्केलने या पतंगाचा साईझ चेकवा.

.

पतंग साधारणपणे २० च्या प्रमाणात विकले जातात या २० च्या परिमाणाला "कौडी" म्हणतात.
(अमुक अमुक डझन केळी घेतली तस्सेच अमुक अमुक "कौडी" पतंग घेतले. ;) )

.

पतंग असेल तर मांजाही असणारच! मांजा तयार करण्यासाठी दोर्‍याची रिळेही विकायला होती.

.

मांजा तयार करण्याची प्रोसेसही भन्नाट असते.

.

वरील फोटोमध्ये पाठमोर्‍या बसलेल्या कारागीराच्या डोक्याच्या डाव्या बाजूला पाहिले तर पांढरे रीळ दिसेल. हेच ते मांजाचे रीळ. पुढ्यात असलेल्या पिवळ्या आणि आसपास असलेल्या लाल, निळ्या रंगांच्या पातेल्यात मांजाचा रंग आहे. सरस, अंडे असे चिकटपणा आणणारे पदार्थ घालून हे मिश्रण बनवले जाते. मांजा त्या पिवळ्या पातेल्यातून समोरच्या मोठ्या चक्रावर गुंडाळला जातो व नंतर वाळत ठेवला जातो. समोरच लाल आणि निळीजांभळी चक्रे वाळत ठेवली आहेत.
हे काम चौकाचौकात सुरू होते.

(हा फोटो थोडा व्यवस्थीत यायला हवा होता.. पण त्यावेळी लक्षात आले नाही.)

या वाळलेल्या चक्रांवरचा मांजा मोटार लावून "फिरकी / चक्री" वर गुंडाळला जातो

.

एकंदर सगळीकडे जत्रेचा माहौल होता. पिपाण्या, मुखवटे, पतंग उडवताना मांजामुळे बोटांना इजा होवू नये म्हणून चिकटपट्ट्या, गॉगल्स अशा अनेक वस्तू विकायला होत्या.

खरेदी आटोपल्यावर खादाडी मस्ट होती. ;)

पापडीनो लोट

.

आपल्याकडे पापडाच्या पिठाच्या लाट्या / गोळे असतात तोच प्रकार. तांदुळाचे पीठ / आणखी एका प्रकारच्या पापडाचे पीठ असे वैविध्य होतेच!

या गरम गरम लाट्यांना तेल, मसाला, लोणच्याचा खार आणि चटपटीत मसाले लावून द्रोणातून देतात.

.

सींग सोडा - फ्लेवर्ड सोड्यामध्ये मीठ+मसाल्याचे शेंगदाणे असतात - एक वेगळा प्रकार.

.

डोंबिवलीतून आळसवलेल्या अवस्थेत सुरू झालेला दिवस घोडबंदर रोड, ऑईल गळती, उंबाडियू, मॅकडॉनल्ड्स, काठेवाडी धाबे, पोंक असे सगळे नवीन अनुभव घेत पतंग बाजारानंतर संपला.
हे सगळे खूप दिवस लक्षात राहील हे नक्की!!!!!

पुढचा पूर्ण दिवस पतंगाला "किन्ना बांधणे" (आणि खादाडी!) हेच काम होते.

(पतंगाला मांजा बांधण्यासाठी दोरा बांधतात त्याला मराठीत काय म्हणतात..?)

१४ तारीख उजाडली. आकाशभर पतंग पाहताना एकदम भारी वाटते.. शब्दात सांगता येवू शकत नाही इतका वेगळा अनुभव. अक्षरशः वर्णनातीत!!!

संपूर्ण शहर जणू आपापल्या घराच्या गच्चीवर रहायला येते.
उन्हापासून संरक्षणासाठी आडोसे / छत्र्या, पतंगांसाठी लागणार्‍या सगळ्या गोष्टी (कात्री, चिकटपट्टी, सेलोटेप, फेव्हीकॉल - हे फाटलेले पतंग उडवण्यासाठी!) आणि वेगवेगळ्या प्रकारची चिक्की, मिठाई, पापडपोहे, नमकीन्स हे खाद्यपदार्थ.. अशा सर्व तयारीसह पतंग उडवणे सुरू असते. ढिकचिक ढिकचिक करणारे डीजेही प्रत्येक ठिकाणी होतेच!

.

उजव्या कोपर्‍यात घराच्या गच्चीवर छत्री दिसत आहे.. दोन मोठ्ठे काळे चौकोन हे स्पीकर्स आहेत. दुसर्‍याचा पतंग काटला गेला की आपोआप त्या गच्चीवरून "हे ऽ ऽ ऽऽ ऽ ऽ ऽ य!!" असा आवाज येत होता. डीजेच्या आवाजाच्या वरताण करत ओरडणे.. पतंगांची चुरस, काटल्या गेलेल्या पतंगाचा मांजा परत मिळवण्यासाठी सुरू असलेली मांजाची ओढाओढ, मधुनच होणार्‍या एखाद्या प्रसंगामुळे उसळणारा हशा, डीजेवर थिरकणारे पाय असा उत्साही माहौल बनला होता.

.

आणखी एक मुद्दा - साधारण ४ ते ५ वेगवेगळ्या घरांना भेटी दिल्या व तेथे जावून पतंग उडवले. प्रत्येक घराच्या गच्चीवरच स्पीकर्स / गाणी यांच्या सोयीसाठी मुद्दाम इलेक्ट्रीक पॉईंट्स केले होते. गच्चीवर थोडातरी आडोसा होईल अशी सोय केली होती. याचे कारण विचारले तर.. हे सर्व उत्तरायणसाठी (बांधकामाच्यावेळीच!) केलेले असते असे कळाले.

उत्तरायणचे दोन दिवस गच्चीवरच राहणारे शहर!

.

संपूर्ण कुटूंब मिळून सण साजरा करतात.. आम्ही पतंग उडवताना ( मला पतंग उडवायला फारसे जमले नाही ;) ) भाभी आणि इतर स्त्रीवर्ग खाण्यापिण्याची काळजी घेणे, किन्ना बांधणे, मांजाची फिरकी धरणे अशा स्वरूपात मदत करत होत्या. थोड्यावेळाने मांजाची फिरकी स्टँडला अडकवून ते सर्वजण आम्हाला सामील झाले. :)

संध्याकाळ झाली आणि पतंगाचा भर थोडा ओसरू लागला.. आता सर्वजण "गुब्बारे" - बलून उडवण्यासाठी तयार झाले.

.

फोटोवरून आकाराचा अंदाज येईलच! हा कागदाचा फुगा असतो, आणि तळामध्ये प्रकाश दिसत आहे तेथे कापूर + मेण अशा मिश्रणाची एक वडी असते. कापरामुळे ती पेट घेते आणि मेणामुळे पेटतच राहते. या दरम्यान ज्योतीमुळे आजुबाजूची हवा गरम होवून फुग्यात भरते व फुगा हवेत उडतो - हॉट एअर बलूनचेच तत्त्व!

.

आरडाओरडा / दंगा करत गुब्बारे उडवण्यातही मजा येत होती.

संध्याकाळ झाल्यानंतर पतंगाचा भर थोडा कमी झाला आणि सगळे आकाश गुब्बार्‍यांनी व्यापून गेले.

.

(कॅमेर्‍याची काहीतरी सेटींग चुकले आहे - तज्ञांनी मार्गदर्शन करावे!)

.

आकाशात हळू हळू एक एक दिवा झेप घेत होता आणि अशा एक एक दिव्यांनी बघता बघता सर्व आकाशात जणू रोषणाई केली - हा क्षण टिपण्याचा प्रयत्नही केला नाही कारण तो अवर्णनीय अनुभव होता.. शब्दातीत!!!

आणखी एक प्रकार बघायला मिळाला. पतंगबाजीतले अतीउत्साही शौकीन आता पांढरे पतंग उडवू लागले होते.. मिट्ट काळोखात पांढरे पतंग बिनविरोध लहरत होते.. आणि ते ही "कंदील" सह.

.

तलम कागदाचा आणि तळाशी जाड कागद असलेला कंदीलाच्या काचेच्या आकाराचा एक प्रकार. यात मेणबत्ती लावून आणि तो कंदिल मांजाला बांधून आकाशात सोडला जातो. वरील फोटोच्या मध्यापासून उजवीकडे खाली एका रेषेत चार दिवे दिसत आहेत.. हेच ते कंदील!

(कंदील आणि गुब्बार्‍यांमुळे अनेक ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडतात.. त्यामुळे यावर्षी त्यांवर बंदी होती मात्र अचानक बंदी उठवली गेली असावी किंवा पब्लीकने बंदी न जुमानता सण साजरा केला.)

दिवसभर इतके विविध प्रकार पाहिल्यानंतर सुखद धक्का देत रात्र पडल्यावर जणू दिवाळी सुरू झाली. नजर जाईल तेथे दिसणारे शोभेचे फटाके आणि गुब्बारे!!!!

.

.

.

रात्री नऊ साडेनऊ वाजून गेले तरी रोषणाई सुरूच होती.

२०१४ चे उत्तरायणही बरेच दिवस विसरले जाणार नाहीच!!

(क्रमशः)

***************************
या लेखमालेतील सर्व फोटो मोबाईल कॅमेर्‍याने काढले आहेत.
***************************

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

28 Jan 2014 - 2:43 pm | दिपक.कुवेत

मला वाटतं.....कणी. वर्णन आणि फोटो दोन्हि मस्त. पापडिनो लोट जब्रा!

दिपक.कुवेत's picture

28 Jan 2014 - 2:48 pm | दिपक.कुवेत

क्रमशः वाचुन सुखावलोय.

सौंदाळा's picture

28 Jan 2014 - 2:55 pm | सौंदाळा

मस्तच

स्मिता श्रीपाद's picture

28 Jan 2014 - 2:56 pm | स्मिता श्रीपाद

मस्त वर्णन...मज्जा आली वाचुन

(पतंगाला मांजा बांधण्यासाठी दोरा बांधतात त्याला मराठीत काय म्हणतात..?) >>
मंगळसुत्र पण म्हणतात ना ? नक्की आठवत नाहीये.

मंगळसुत्र पण म्हणतात ना ?

कोणत्या भागात म्हणतात..?

बादवे.. हा शब्दप्रयोग म्हणजे "सिंबॉलीक द्वेष!!!! सिंबॉलीक द्वेष!!!!" म्हणत दंगा करायला फुल्ल वाव आहे. ;)

ह.घ्या.

लेख आवडला.. नगर कडे मंगळसुत्र, सुत्तर म्हणतातसं आठवतय, मुंबई-ठाण्या कडे कन्नी.. :-)

रेवती's picture

29 Jan 2014 - 4:16 am | रेवती

मळसूत्र हा खरा शब्द आहे.

बॅटमॅन's picture

7 Feb 2014 - 3:39 pm | बॅटमॅन

मळसूत्र?????? हा शब्द तर स्क्रू साठी वापरला गेलेला पाहिला आहे.

सस्नेह's picture

7 Feb 2014 - 9:52 pm | सस्नेह

म्हणजे कर्णफुलाची फिरकी.

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Jan 2014 - 5:00 pm | llपुण्याचे पेशवेll

पुण्याकडं पण कन्नीच म्हणतात. काही लोक तर फार कष्टं न घेता. कन म्हणतात.

(पतंगाला मांजा बांधण्यासाठी दोरा बांधतात त्याला मराठीत काय म्हणतात..?)

आम्ही तरी 'कणी' बांधणे म्हणतो... :)

बाकी वॄत्तांत एकदम झकास आहे.

राही's picture

28 Jan 2014 - 3:09 pm | राही

किन्ना म्हणजे बहुतेक कन्नी, कण्णी, कणी, कण्णा, कणा.
मुंबईत तरी हेच शब्द ऐकले आहेत.

रेवती's picture

28 Jan 2014 - 4:29 pm | रेवती

पतंगांचे रंग, त्यावरील नक्षीकाम, चित्रे छान आहेत. मोदीसाहेबांचे चित्र छापलेले पतंग नव्हते का? ;)
रात्रीच्यावेळी रोषणाईयुक्त पतंग उडवणे नवीनच पाहिले. सगळे वर्णन छान झाले आहे. पदार्थही वेगळे आहेत. सोड्यात शेंगदाणे घालून काय फरक पडणार अस प्रश्न मनात आला.

प्यारे१'s picture

28 Jan 2014 - 4:43 pm | प्यारे१

>>>मोदीसाहेबांचे चित्र छापलेले पतंग नव्हते का?

नसावेत.
आधीच कन्नी कापली गेली तर काय? असा विषय असावा.

मॉरलः मसाला चाट, मसाला सोडा मारुन मोदकाने मकरसंक्रांतीला मजा मारली.
(आमच्याकडं मी कार नाही म कार असतो)

लॉरी टांगटूंगकर's picture

28 Jan 2014 - 8:11 pm | लॉरी टांगटूंगकर

:) वाह! दिवाळीच्या दणक्यात साजरा करतात म्हणा की ओ. आधी न समजलेल्या बर्‍याचशा गोष्टी आता समजता आहेत. सिंङ सोडा अजूनही विचित्र वाटतोय. मागे फोटो दाखवलेले तेव्हा त्या लाट्या म्हणजे चिकनचा प्रकार वाटलेला.

उपास's picture

29 Jan 2014 - 1:36 am | उपास

आम्ही आठ-आठ रात्री न दमता कण्या बांधत असू संक्रांतीच्या आधी.. गिरगावात गुजराथी बरेच असल्याने अस्साच माहोल अनुभवलाय लहानपणापासून.. कौलांवर धावणे, पतंगासाठी जीव टाकणे सगळं आलं त्यात.. पण आताशा गेल्या काही वर्षात आडव्या तिडव्या टाकलेल्या केबल वायरींच्या जंजाळाने सगळा बाजार उठवलाय.. पतंग उडवायची ती मजा गेली ती गेलीच!

भावना कल्लोळ's picture

31 Jan 2014 - 5:42 pm | भावना कल्लोळ

त्यात गिरगावात पतंग बाजी कमीच होतेय, कारण गच्चीच उपलब्ध नाही आणि पक्षांना होणाऱ्या इजा. बाकी हे सर्वं मी लहानपणी खूप एन्जॉय केले आहे. लहानपणी (टोमबॉय) हे विशेषण आम्हाला असल्या कारणाने पतंगामागे धावणे, कौलावर चढणे. बाकी भुलेश्वरला गच्ची मध्ये पतंग उडवणाऱ्या मामाच्या मागे फिरकी घेऊन मामला चिअर करण्याची मजा काही औरच असायची. आता हे सर्वं क्षण माझ्या मुलामुळे पुन्हा अनुभवते आहे, आमच्या जुनिअरची संक्रात अजून संपली नाही आहे. :)

विजुभाऊ's picture

29 Jan 2014 - 2:04 am | विजुभाऊ

मस्त हो मोदक शेठ.
मी देखील असाच माहौल अनुभवला आहे. दर वर्षे जानेवारीत अहमदाबादची हमखास आठवण होते.
http://misalpav.com/node/16556

चित्रगुप्त's picture

29 Jan 2014 - 5:53 am | चित्रगुप्त

उत्तम विषय आणि सादरीकरण.

प्रचेतस's picture

29 Jan 2014 - 8:28 am | प्रचेतस

असेच म्हणतो.

धन्या's picture

29 Jan 2014 - 10:01 am | धन्या

मी सुद्धा असेच म्हणतो.

श्रीरंग_जोशी's picture

29 Jan 2014 - 9:11 am | श्रीरंग_जोशी

सुंदर फटु व ओघवते वर्णन.

विटेकर's picture

29 Jan 2014 - 9:37 am | विटेकर

मोदकजी , एकदम सुंदर , उत्कृष्ट प्रतिमा आणि ओघवते वर्णन !
" मंगळ सूत्र " हाच शब्द बरोबर आहे माझ्या माहितीप्रमाणे .

अर्धवटराव's picture

29 Jan 2014 - 12:44 pm | अर्धवटराव

तुम्ही किती पतंगांचे दोर कापले? ;)

मोदक's picture

30 Jan 2014 - 1:23 pm | मोदक

अगदी एखादा असेल.

मात्र दोनच दिवसात मी वर गेलेला पतंग खाली आणण्यासाठी जाम फेमस झालो ! ;)

संतोषएकांडे's picture

29 Jan 2014 - 12:53 pm | संतोषएकांडे

.
तिळगूळ आणी पतंग 'एकसाथ'

जेपी's picture

29 Jan 2014 - 1:25 pm | जेपी

मस्त .

नितीन पाठक's picture

29 Jan 2014 - 1:45 pm | नितीन पाठक

पतंग महोत्सवाचे एकूण साग्र-संगीत वर्णन वाचून - पाहून एकदम छान आवडले. मस्त लिहीले आहे. फोटो पण छान आले आहे.
पतंगाला मांजा बांधण्यासाठी दोरा बांधतात त्याला मराठीत काय म्हणतात..?)
नगर जिल्ह्या मध्ये सुत्तर (किंवा सुत्तड) बांधणे असे म्हणतात.
सुरत ते परत पूणे याचे सुध्दा प्रवास वर्णन येउ द्यात.

सुरत ते परत पूणे याचे सुध्दा प्रवास वर्णन येउ द्यात.

नक्की..!!

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jan 2014 - 2:01 pm | अत्रुप्त आत्मा

लै लै भारी फोटोंबद्दल आभारी हाओत! :)

पन येक निरिक्षान मिष्ट्येक हाय... @ सरस, अंडे असे चिकटपणा आणणारे पदार्थ घालून हे मिश्रण बनवले जाते. मांजा त्या पिवळ्या पातेल्यातून समोरच्या मोठ्या चक्रावर गुंडाळला जातो व नंतर वाळत ठेवला जातो. >>> हेच्यामंदी येक र्‍हायलं.. त्ये असं की त्या पातेल्यामदी सरस/अंड च्या बरोबर वस्त्रगाळ क्याल्याली काचेची पूड बी मिसळल्याली असतीया.. तिच्या शिवाय मांजा,मंजी करंट शिवाय मिसळ...किंवा कन्नीशिवाय पतांग! ह्ये म्हत्त्वाचं र्‍हायलं वो.. ! का लक्षात नाय आलं? :)

हेच्यामंदी येक र्‍हायलं.. त्ये असं की त्या पातेल्यामदी सरस/अंड च्या बरोबर वस्त्रगाळ क्याल्याली काचेची पूड बी मिसळल्याली असतीया

असे करतात ते माहिती आहे.. परंतु प्रत्यक्ष बघायला मिळाले नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Jan 2014 - 5:03 pm | llपुण्याचे पेशवेll

असे मांजाला खर्री करण्यासाठि करतात. म्हणजे दुसर्‍याचे पतंग कापायला उपयोगी पडतो खर्री मांजा.

आमच्या घरी लहानपणी थोरल्या चुलतभावाने एकदा हा घाट घातला होता तेव्हा हे पाहण्याचे भाग्य लाभले होते. यालाच मिरजेकडे मांजाला 'कारी' करणे असेही म्हटल्या जाते.

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Jan 2014 - 6:10 pm | बिपिन कार्यकर्ते

प्रणाम!

सुहास..'s picture

29 Jan 2014 - 7:06 pm | सुहास..

मस्त !!

अश्या ठिकाणांहुन परतताना, मन मात्र आपण तिथेच सोडुन आलेले असतो ..कॅमेर्‍यातले फोटो फक्त उजाळा देण्यासाठी :)

सानिकास्वप्निल's picture

29 Jan 2014 - 10:09 pm | सानिकास्वप्निल

फोटो आणी वर्णन आवडले.
चायनीज लँटर्न प्रकार हल्ली सगळीकडेच दिसू लागलाय :)

सरस, अंडे असे चिकटपणा आणणारे पदार्थ घालून हे मिश्रण बनवले जाते

गुजरातेत वेज्/जैन मांजा मिळत नाही का?

वेल्लाभट's picture

31 Jan 2014 - 6:46 am | वेल्लाभट

एवढं भारी वर्णन ऐकून जायलाच पायजे झालंय !

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Jan 2014 - 9:12 am | कैलासवासी सोन्याबापु

पतंगा ला बांधायचा धागा , सुत्तर्डे, सुत्तर, कन्नी म्हणजे वेगळे असते पतंगाची आडवी काडी जर एका बाजुने वजनदार असली तर पतंग बॅल्न्स व्हायसाठी विरुद्ध दिशेला जो दोरा, सुताचा, मांजाचा पुंजका बांधतात तो म्हणजे कन्नी किंवा कन्ना होय.
मांजा बनवायच्या विधीला "मांजा सुतणे" असे म्हणतात, बेस मधे मजबुत सुती धागा असतो शक्यतो बुलेट (मध्यम), गन (थोडा जास्त जाड, हा ट्वाईल्चा मांजा बनवायला पण वापरतात) अन संकल (साखळी ब्रँड) हा अतिशय मजबुत पण पिळाने बारीक असा सहातारी धागा असतो (बरेली अन खैचु, म्हणजेच पतंगाला लेग ब्रेक देऊन समोरच्याची पतंग उडवायचा मांजा)ह्यात संकल सुतला जातो (शक्यतो डार्क कलर वापरुन) ढिल वाला मांजा असला तर त्यात बुलेट वापरतात, बल्ब फोडलेले उत्तम पण सर्वात बेस्ट सोडा बॉटल असतात

मांजा सुतायची व्यावसाईक अन घरगुती पद्धत वेगळी असते, व्यावसाईक तुम्ही प्रचि दिलेत घरगुती इज अ‍ॅज फॉलोज

प्रथम काचा कुटुन घ्या
एका पातेलीत स्टोव्ह वर साबुदाणा शिजवा (१ पाव + २ ग्लास पाणी)
त्यात वरतुन १५० ग्रॅम शिरस घाला
सिरस वितळेपर्यंत शिजवा, आता ह्यात मनाला येईल् तो रंग अन काच पुड घाला
अजुन ५ मिनटे साबुदाण्याचा दाणा मोडे पर्यंत शिजवा
आता एक दाभण घ्या ,दाभणाच्या नेढ्यातुन कच्या धाग्याचे एक टोक ओवुन घ्या ते बाहेर काढुन ज्या रिळावर मांजा गुंडाळायचा आहे त्याला बांधुन घ्या आता दाभण नेढ्याच्या बाजुने त्या शिजवलेल्या मिश्रणात बुडवुन उभी धरा , अंदाजे ८-९ फुट दुर ज्याला मांजा गुंडाळायला सांगितलं आहे त्याला रिळावर हळु हळु मांजा गुंडाळायला सांगा (ढिला गुंडालायचा नाही सत्यानाश होईल), अजुन जर तेज मांजा हवा असेल तर एका सुती कापडात वस्त्रगाळ काचपुड घ्या अन नेढ्यातुन निघालेला फ्रेश सुतलेला मांजा अन रिळाच्या मधे चिमुट धरा.

टिप :- अंडे टाकु नये, चिकटपणा साबु ने येतो, अंड्याने मांजा सडु शकतो
मांजा रिळावर घट्ट लपेटावा, साबुदाण्याचा दाणा मोडलेला असावा अन्यथा मांजावर साबुचे फेतके जमतील अन मांजा फुस्स होईल, मिळाल्यास मिश्रन शिजताना त्यात २०-३० ग्रँम समुद्र फेस ( सुकलेले प्रावाळ) टाका, मांजाला ग्लेझ येईल. शक्यतो धागा तुटेल इतकी घट्ट काचेची चिमुट पकडु नये, मांजा तुटु शकतो, नवीन मांजात गाठ म्हणजे आपण रेस बाहेर!!!!.
मिश्रणातुन सुतुन घोटुन रिळावर घट्ट लपेटलेला मांजा सावलीत रीळ ठेऊन सुकवावा

उत्तरायणाच्या दिवशी दिवसभर गच्चीवर बोंबलत फिरावे!!!!

(लहानपण, नॉस्टॅल्जिया, एडीसनी कार्ये, अन गावठी संगोपन झालेला) बाप्या :)

मोदक's picture

31 Jan 2014 - 12:16 pm | मोदक

__/\__ व्यासंगास सलाम.

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Jan 2014 - 6:40 pm | कैलासवासी सोन्याबापु

हे हे हे मोदकशेठ, व्यासंगच म्हणा आता काय म्हणणार अजुन!!! ५ रुपये तासाने पार्लर मधे विडीओगेम्स पण चैन होती, पुल ची क्यु पुण्यात आलो तेव्हा प्रथम पकडली हाती तवंर हे असले गावठी शौकच केले लहानपणीपासुन!! हा तरी थोड्या पैश्याचा खेळ होता! बाकी बिन पैश्याचे पण लै खेळ खेळायचो!! :)

अत्रुप्त आत्मा's picture

1 Feb 2014 - 6:58 am | अत्रुप्त आत्मा

मांजा क्रुती परफेक्ट! आंम्ही साबुुदाण्याऐवजी डायरेक्ट खळ वापरायचो. आणी मांजाला दोरा ११नंबर वाल्या साखळीचा! बाकी सगळं शेम टू शेम! :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Feb 2014 - 8:33 am | कैलासवासी सोन्याबापु

पर्फेक्ट नसणार काय! पु-या वेटाळातली लहानथोर शाबु शिजवायला बोलवायची अत्रुप्त साहेब आम्हाला!!! अन तेव्हा ही मांजा ची "लुद्दी वा रुद्दी" शिजवण्यातच "आपण स्वयंपाक केल्याचा" आनंद मिळायचा हे हे हे हे

फारच मजा आली उत्तरायणची .
पुढच्या वर्षाची काहीजण वाट पाहात असतील .
तिकडे जंगी मिपा बडोदा कट्टा होईल असे वाटते .

वाळवंटात पाच जण गेलेतरी कट्टा होतो .
शहरात एकटा गेलतरी
अडवेंचर होते .

तुमचे बडोदा अडवेँचर फारच आवडण्यात आले आहे .

सोन्याबापूना असली मांजा
पाककृतीबद्दल धन्यवाद .

पुढील बडोदा कटट्याला
बाइक ,जीपिएस ,कैमरा ,पोपटी ,पोक ,कणी ,मांजा ,पतंग ,गुब्बारा इत्यादि स्पेशालिस्टांना आवताण देण्यात यावे .

पैसा's picture

5 Feb 2014 - 4:47 pm | पैसा

प्रत्यक्ष तिथे जाऊन आल्यासारखं वाटलं! सोन्याबापूंची माहिती पण एकदम लै भारी!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

6 Feb 2014 - 10:42 pm | निनाद मुक्काम प...

मजा आली वाचून , जुने बालपणीचे दिवस आठवले.
पंतग उडवणे , काटा काटी लावणे ,तारी मांजा , कंदील , मग बाकीच्या मुलांनी ढील दे , लपेट म्हणून ओरडणे , कटलेली पतंग पडण्यासाठी रस्त्यावरून रहदारी ची पर्वा न करता पळणे असे सर्व शौक आवडीने बालपणी जोपासणाऱ्या आमच्या सारख्या मुलांना डोंबिवलीत वाया गेलेली मुले असले पतंगबाजी चे धंदे करतात असे वर्णिले जायचे , सलमान चा शिनेमा पाहीपर्यंत
ह्या पतंग बाजीला गुजरात मध्ये एवढी लोकप्रियता आहे हे पाहून खूप बरे वाटले ,
हि दोन माझी पतंगबाजी वर आधारित आवडती गाणी

मदनबाण's picture

7 Feb 2014 - 9:57 pm | मदनबाण

वा.वा..वा... :) समाधान झाले ! :)

आम्ही जुने गेलेले बल्ब जमा करुन त्याची जमेल तशी बारीक पूड करुन एखाद्या जुन्या डब्यात भरत असु,त्यावेळी लाल रंगाच्या डिंकाच्या छोट्या बाटल्या येत, मग त्या आणुन डब्यात मिश्रण केले जात असे,बर्‍याच वेळा बोट कापल्याचा अनुभव आल्यानंतर ,बोटांना बँडेडच्या पट्ट्या बांधुन हा,आणि पतंग उडवण्याचा उध्योग केला जायचा.