पुढच्यासाठी

अमेय६३७७'s picture
अमेय६३७७ in जे न देखे रवी...
18 Dec 2013 - 4:16 pm

कुणास ठाउक बाग कुणाची
कुणी शिंपली हिरवी झाडे
तारुण्याचे मोल, कुणाच्या
हाडांची अन झाली काडे

हिरवळ दिसते, पानोपानी
मंजुळ किलबिल मंद स्वरांची
जागोजागी खूण सापडे
चराचरातिल अद्वैताची

विश्वाचा हा जरी कोपरा
कोप-यातले विश्व सुखाचे
भय- क्रोधाला इथे न थारा
इथे न वाढे तण्य फुकाचे

आनंदाने भोग दान हे
घाल तशी भर अपुली काही
किंवा केवळ पाही इतुके
कीड- वाळवी लागत नाही

ठेव आठवण त्या पहिल्याची
झाड लावले येथे ज्याने
आपसूक मग सुचेल तुजला
पुढच्यासाठी ठेवुन जाणे

-- अमेय

कविता

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

18 Dec 2013 - 4:18 pm | प्रभाकर पेठकर

सुंदर..

आदूबाळ's picture

19 Dec 2013 - 1:01 pm | आदूबाळ

नेहेमीप्रमाणेच लयबद्ध!

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Dec 2013 - 1:05 pm | बिपिन कार्यकर्ते

सुंदर

शैलेन्द्र's picture

19 Dec 2013 - 1:31 pm | शैलेन्द्र

सुंदर

जेपी's picture

19 Dec 2013 - 1:33 pm | जेपी

मस्त.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

19 Dec 2013 - 2:43 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सुंदर रचना...

कवितानागेश's picture

19 Dec 2013 - 3:03 pm | कवितानागेश

आहा!
फार सुंदर रचना. तुमच्या कविता अगदी लयबद्ध असतात.

सोनल कर्णिक वायकुळ's picture

19 Dec 2013 - 3:10 pm | सोनल कर्णिक वायकुळ

सुन्दर

प्यारे१'s picture

19 Dec 2013 - 3:24 pm | प्यारे१

आहा!

एक आक्खा लेख जे काम करु शकत नाही ते काम तुमच्या कविता करत आहेत.

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Dec 2013 - 4:41 pm | राजेंद्र मेहेंदळे

एक बदल सुचवु काय?

>>आपसूक मग सुचेल तुजला>> मग ऐवजी नंतर वापरले तर मीटरमध्ये बसेल.

अवांतर--इथे न वाढे तण्य फुकाचे--तण्य असा शब्द कधी ऐकला नव्हता.

शैलेन्द्र's picture

19 Dec 2013 - 5:13 pm | शैलेन्द्र

तण्य हा शब्द विशेषण म्हणुन शिकला होता. (ताणले जाण्याची क्षमता.), पण कविने तो "तन" या अर्थाने वापरलाय, ज्यात काही चूक नाही.

अमेय६३७७'s picture

19 Dec 2013 - 10:06 pm | अमेय६३७७

वृत्तानुसार 'नंतर' नाही चालायचा. पण लयीत नाही असं का वाटतेय? "आपसूक मग.. सुचेल तुजला" असा पादाकुलकाच्या नेहमीच्या लयीनुसार (८ + ८) वाचनक्रम आहे.
तण्य हा शब्द मी माझ्या आजोबांकडून (ज्यांना बागकाम आवडायचे) वारंवार ऐकलाय. चुकीचा असेल अशी शन्का नव्हती. आता तुम्ही काढलेल्या शंकेमुळे शोध घेतो. तण याच अर्थाने वापरलाय. चुकीचा असेल तर बदलेनच.

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Dec 2013 - 4:55 pm | राजेंद्र मेहेंदळे

अमेयजी ,माझा काही वृत्त मात्रा वगैरेचा फार अभ्यास नाही,सहज वाटले ते सांगितले.
अवांतर..नंतर ऐवजी "आणिक" "मागुन" चालेल काय? :)

पैसा's picture

19 Dec 2013 - 6:59 pm | पैसा

सुरेख कविता!

अत्रुप्त आत्मा's picture

19 Dec 2013 - 11:15 pm | अत्रुप्त आत्मा

आनंदाने भोग दान हे
घाल तशी भर अपुली काही
किंवा केवळ पाही इतुके
कीड- वाळवी लागत नाही >>> मर्मावर घाव!

ठेव आठवण त्या पहिल्याची
झाड लावले येथे ज्याने
आपसूक मग सुचेल तुजला
पुढच्यासाठी ठेवुन जाणे>>> आहाहा... नतमस्तक! __/\__

यसवायजी's picture

19 Dec 2013 - 11:19 pm | यसवायजी

कविता आवडली.

चैत्रबन's picture

19 Dec 2013 - 11:56 pm | चैत्रबन

Farach chan kavita :)

चैत्रबन's picture

19 Dec 2013 - 11:59 pm | चैत्रबन

farach sundar kavita asa mhanaych hota... :)

पहाटवारा's picture

20 Dec 2013 - 7:46 am | पहाटवारा

फारच साध्या सोप्या .. कळणार्या भाषेत लिहितो ब्वा तु मित्रा .. ऊगाचा शब्दांचा ना रुपकांचा .. कसलाच सौंदर्यफुफाटा (शरदीनी फेम) नाहि .. मस्त !

म्हैस's picture

20 Dec 2013 - 12:19 pm | म्हैस

सुन्दर

नगरीनिरंजन's picture

20 Dec 2013 - 12:41 pm | नगरीनिरंजन

छान!
आपल्या आयुष्यातला प्रचंड विरोधाभास अधोरेखित करणारी लयबद्ध कविता आवडली.

पद्मश्री चित्रे's picture

20 Dec 2013 - 4:48 pm | पद्मश्री चित्रे

छान कविता

चाणक्य's picture

20 Dec 2013 - 6:11 pm | चाणक्य

एकदम लयबद्ध झाली आहे. आवडली

आतिवास's picture

20 Dec 2013 - 7:14 pm | आतिवास

कविता लयबद्ध आहे - नेहमीच असतात तुमच्या कविता.
पण ...
असे बरेच 'पण' डोक्यात आले वाचताना - ते अप्रस्तुत ठरतील इथं म्हणून लिहित नाही :-)

अमेय६३७७'s picture

20 Dec 2013 - 7:57 pm | अमेय६३७७

कवितेविषयी काही 'पण' असतील तर नक्कीच वाचायला आवडतील. अर्थात या कवितेच्या अनुषंगाने कवितेव्यतिरिक्त काही विचार आले असतील आणि इथे मांडणे अप्रस्तुत वाटत असेल, तर संवादाचे इतर मार्गही आहेत. :)

अप्रतिम!! लयबद्ध तर आहेच हेवेसांनल.

पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे's picture

20 Dec 2013 - 8:23 pm | पंडित मयुरेश ना...

काय म्हणु सांग मित्रा........खुपच खास......कवितेच्या सुरवातीची दोन कडवी वाचतो तेव्हा नेहमीची साधी कविता वाटते.....

तिसरे कडवे कविता म्हणुन खुपच खास.........तर शेवटची दोन कडवी कवितेला खुपच उंचावर नेतात.......

पुर्वीचे संत कसे साध्या सोप्या अभंगातुन खुप मोथे काहितरी सांगुन जायचे........अगदी तसच काहीतरी......

चतुरंग's picture

21 Dec 2013 - 4:25 am | चतुरंग

अतिशय आवडली.
तुमची कविता निराळी आहे हे नक्की. अत्यंत साध्या सोप्या, नेहेमीच्या वापरातल्या शब्दांतून काव्य फुलते आणि मनाचा ठाव घेते. कोणतेही जडजंबाळ शब्द, उपमा अलंकार यांची खैरात न करताही उत्तम कविता कशी असावी याचा वस्तुपाठच. (विश्वाचा हा जरी कोपरा - कोप-यातले विश्व सुखाचे सारख्या ओळीतून मर्ढेकरांची आठवण व्हावी..)

-चतुरंग

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Dec 2013 - 9:27 am | ज्ञानोबाचे पैजार

सुंदर अतिशय सुंदर रचना, साधी सोपी तरी मनाला भावलेली.

पाषाणभेद's picture

24 Dec 2013 - 3:47 am | पाषाणभेद

+१ सुंदर कविता...

सुधीर's picture

21 Dec 2013 - 9:39 am | सुधीर

सुंदर कविता!

चिन्मना's picture

21 Dec 2013 - 9:49 am | चिन्मना

वा! साध्या सोप्या शब्दांचा वापर करुन मनाचा ठाव घेणारी कविता!

इंद्रधनुष्य's picture

21 Dec 2013 - 10:01 am | इंद्रधनुष्य

खुप छान

यशोधरा's picture

21 Dec 2013 - 10:05 am | यशोधरा

आवडली.

राघव's picture

23 Dec 2013 - 6:47 pm | राघव

प्रतिसाद द्यायला भाग पाडणारी, सरळ, साधी, सोपी अन् तरीही आशयगर्भ कविता.
खूप आवडली. धन्यवाद. :)

मदनबाण's picture

24 Dec 2013 - 2:12 pm | मदनबाण

ठेव आठवण त्या पहिल्याची
झाड लावले येथे ज्याने
आपसूक मग सुचेल तुजला
पुढच्यासाठी ठेवुन जाणे

सुरेख...

अमेय शेठ ची कविता खूप दिवसांत वाचली नव्हती. ही काढून वाचली आणि शेवटचे कडवे परत एकदा भिडून गेले. _/\_