नमस्कार मंडळी!
नेहमीच्या पेक्षा थोडा वेगळा विषय.
म्हणजे पटतंय का बघा. मला जे वाटतंय ते लिहीतोय.
अनेक क्षेत्रातील कला- अभिनय, दिग्दर्शन, गीतकार,
साहित्य- ह्यात कथा, कादंबर्या, कविता, सगळे प्रकार,
संगीत, क्रिडा नि अनेक अशाच क्षेत्रांतील बर्याच प्रतिभावंत लोकांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला हे लोक ज्या दर्जाच्या क्रिएशन्स (निर्मिती?) करतात तशा, त्याच दर्जाच्या क्रिएशन्स नंतर करु शकत नाहीत का?
उदाहरणादाखलः
ए आर रेहमान ह्या अत्यंत प्रतिभावान संगीतकाराची कुठली गाणी आपल्याला पटकन आठवतात?
मला रोजा, बॉम्बे अशा हातावर मोजण्या इतक्या चित्रपटांची नावं आठवतात.
दिल तो पागल है चे उत्तम सिंग एका चित्रपटानंतर गायब च झाले जणू.
मिलिंद इंगळे नि सौमित्रचा गारवा ऐकल्यानंतरची कुठली गाणी आठवतात?
अनेक कलाकार पहिल्या दोन चार चित्रपटांच्या कमाईच्या जोरावर पुढचे अनंत दिवस घालवतात.
सानिया मिर्झाचं टेनिस, अनेक लेखकांच्या पहिल्यावहिल्या कथा कादंबर्या कवितांना मिळणारं यश हेच शेवटचं यश असतं.
काय होतं नेमकं? प्रतिभा कमी पडते की प्रतिभेसाठी लागणारी साधना / कष्ट कमी पडतात...?
एकदा प्रसिद्ध झाल्यावर लोकानुवर्ती जीवनशैली, सातत्यानं समाजामध्ये राहणं किंवा साधनेला वेळ कमी मिळणं अशांमध्ये कालापव्यय होतो का? ह्याचबरोबर उलट उदाहरणं देखील आहेत मात्र ती अपवादानं नियम सिद्ध होतो अशा प्रकारची आहेत. हे लोक 'लिजंड्स' म्हणून ओळखले जातात.
प्रतिभेचं उगमस्थान नेमकं काय असतं? कुठून येतं हे सगळं?
अशा पार्श्वभूमीवर सांगायचं ते सांगून झालं म्हणून लेखणी न उचलणारे विंदा करंदीकर नि त्यांच्याच बरोबरीनं विस्मृतीत जाणार्या सिझनल कविता करणारे अनेक कवीवर्य ह्यात डावं उजवं करावं का???
सर्व क्षेत्रातील निरीक्षणं ह्यात यावीत असं वाटतं. निव्वळ हीच कारणं असतात की अपेक्षा, वयोमर्यादा, शारीरिक, मानसिक साथ, कौटुंबिक पार्श्वभूमी, सामाजिक जाण इ.इ.इ. सगळ्या गोष्टींचा विचार व्हावा अशी अपेक्षा आहे.
आपल्याला काय वाटतं?
प्रतिक्रिया
21 Nov 2013 - 1:49 am | मोदक
हर्षा भोगलेच्याच शब्दात बोलायचे झाले तर "एकदा एक विशिष्ट उंची गाठल्यानंतर तुमच्याकडे प्रतिभा आहे की नाही हा मुद्दा सर्वस्वी गौण ठरतो. तुमच्याकडे आहे त्या प्रतिभेचे तुम्ही काय करता? हा मुद्दा निर्णायक ठरतो"
लेखात उल्लेखलेली नावे वाचल्यावर एक लक्षात येते की या सर्व व्यक्ती नि:संदिग्धपणे गुणवान आहेत, प्रतिभावान आहेतच मात्र अशा प्रतिभावान व्यक्ती कामगिरीमध्ये सातत्य का राखू शकत नाहीत यालाही अनेक कारणे असतात. एकदा काहीतरी "achieve" केले की "आपण परिपूर्ण झालो" अशी भावना येत असावी.. या विचाराने प्रगती खुंटण्याची शक्यता जास्त!
खेळाडूंच्या बाबतीत एका ठिकाणच्या कामगिरीच्या तुलनेत दुसर्या ठिकाणची स्पर्धात्मक परिस्थिती, प्रतिस्पर्धी, असे घटक निर्णायक ठरतात. अंतर्गत / कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये पोत्याने पदके जिंकणारे समरेश जंग, अंजली वेदपाठक सारखे नेमबाज मोठ्या स्टेजवर आयत्यावेळी कामगिरी उंचावता न आल्याने मागे राहतात.
प्रतिभेचं उगमस्थान नेमकं काय असतं? कुठून येतं हे सगळं?
प्रतिभा, गुणवत्ता वगैरे सगळे त्या त्या व्यक्तींकडे असतेच.. मात्र स्वतःला "किती प्रमाणात पणाला लावायचे" यावर अनेकदा "एंड रिझल्टस्" अवलंबून असतात.
जाता जाता -
रेहमानचे नाव वरील यादीत पाहून आश्चर्य वाटले. रोजा, बाँबे नंतरही पुकार, साथीया, रंग दे बसंती, लगान, दिलसे, ताल.. लंबी लिस्ट आहे!
21 Nov 2013 - 1:09 pm | प्यारे१
मोदकानं बर्याच दिवसांनी काही लिहीलं. बरं वाटलं.
(इ. ए. च्या धाग्यावर प्रतिक्रिया आहे एक )
>>>रेहमानचे नाव वरील यादीत पाहून आश्चर्य वाटले.
का कुणास ठाऊक पण पहिल्या ऐकण्यात रेहमानची गाणी ऐकवत नाहीत. हळूहळू आवडायला लागतात.
रोजा बॉम्बे चं प्रत्येक गाणं अप्रतिम होतं असं वैयक्तिक होतं.
साथिया वगैरे मेलोडी कधीमधीच...
माझा मुद्दा आहे तो हा की बरेच दिवसांच्या अभ्यास किंवा थॉट प्रोसेस नंतर एक विषय मूर्त आकार घेतो.
ज्यांच्या प्रतिभांची झेप कदाचित कमी आहे त्या लोकांकडून निघणारं पहिलं 'प्रॉडक्ट' हे त्यांच्या ह्या थॉट प्रोसेसमधून निघणारं एक चांगलं प्रॉडक्ट असतं.
ते बाहेर पडल्यानंतर जणू हे लोक रिकामे होत असावेत काय अशा प्रकारे निस्तेज होत जातात.
रामगोपाल वर्मा हे आणखी एक उदाहरण जाताजाता देऊ इच्छितो. पूर्वीचे चित्रपट नि आत्ताचे चित्रपट...
21 Nov 2013 - 4:22 am | स्पंदना
जेंव्हा तुमच नाव होतं, तेंव्हा तुम्ही एक उंची गाठलेली असते अन त्या उंचीचे सातत्य राखण जमेलच अस नाहे, किंबहुना अवघड होत. लोकांचा अपेक्षांचा भार सुद्धा वाढत जातो, अन मग पहिल्यासारख नाही जमल अशी मत व्यक्त होउ लागतात.
त्यातच स्वतःला एकदा सिद्ध केल्याने पुन्हा पुन्हा फक्त तेव्हढ्या यशावरच तोलल जाउ लागल्याने कलाकाराचा हिरमोड होत असावा. काहीजण त्या पहिल्या यशाच्या धुंदीत वाहून जात असावेत. काहीजण पुन्हा त्या तोडीच जमल तरच पुन्हा व्यक्त होत असावेत.
बाकी ए आर रहेमान सातत्य राखून आहे या मताची अपर्णा.
21 Nov 2013 - 7:45 pm | यसवायजी
अगदी असच म्हणतो.
21 Nov 2013 - 7:56 am | ग्रेटथिन्कर
एका राष्ट्रीय समस्येला वाचा फोडल्याबद्दल अभिनंदन.
21 Nov 2013 - 1:11 pm | प्यारे१
आभारी आहे.
अवांतरः असेच 'बसून' किती दिवस राहणार?
21 Nov 2013 - 1:16 pm | अनिरुद्ध प
प्यारेकाका तुसि 'ग्रेट' हो
21 Nov 2013 - 9:02 am | चित्रगुप्त
सुरुवातीला शिकायचं म्हणून, कलासाधना म्हणून कलावंत जे काही करत असतो, त्यात एक टवटवी, उत्साह, अद्भुतता, समर्पण इ.इ. असतं, मात्र लौकीक यश, पैसा मिळू लागला, मानसन्मान लाभले, व्यावहारीक गाडी चालू पडली, की बहुतेकांसाठी कला ही कला न रहाता धंदा बनतो, पुष्कळ कामे मिळू लागली की कसेतरी नगास नग करून देणे, अन्य लोकांकडून करून घेऊन स्वतःच्या नावाने विकणे असे प्रकार सर्रास चालू होतात. कलेच्या दर्जाऐवजी प्रसिद्धी, गवगवा यांचेमागे कलावंत लागतात. त्यांना भरीस घालणारे खुषमस्करे, त्यांच्या निर्मितीतून पैसा कमावणारे डीलर, गॅलरीवाले, चित्रपट निर्माते, एजंट वगैरे ठेकेदार मंडळींना हवी तशी निर्मिती कलावंत करून देऊ लागतात. या कलावंतांचे बाजारमूल्य सतत वाढते राहण्यात या ठेकेदारांचा, कलेत पैसा गुंतवणार्यांचा लाभ असल्याने त्यांना मानसन्मान, पद्मपुरस्कार वगैरे मिळवून देणे, नसलेली लायकी सुद्धा असल्याचे बांधलेल्या समिक्षकांकरवी आणि अन्य प्रचारतंत्रातून जनतेच्या गळी उतरवणे, असे अनेक प्रकार घडू लागतात. कलेच्या दर्जाच्या बाबतीत आपली घसरण होत असल्याचे कित्येक कलावंतांना कळतही नसावे, किंवा त्यांना त्याची गरज सुद्धा वाटेनाशी होते. कुटुंबियांना तर त्यांच्या कलेच्या दर्जापेक्षा मिळणार पैसा, मानसन्मान वगैरेंमधेच रस असतो. पूर्वीची उदाहरणे द्यायची, तर शंकर-जयकिशन, लक्ष्मी-प्यारे वगैरे प्रतिभावान संगीतकार सुद्धा कालांतराने कसे संगीत देऊ लागले, रझा, हुसेन सारख्या चित्रकारांची चित्रे एका अवस्थेनंतर कशी सरधोपट,एका साच्याची होऊ लागली, लेखक मंडळी कसा रतीब घालू लागली, अशी अनेक उदाहरणे दिसून येतील.
याउलट ज्यांचा धंदा फारसा चालला नाही, वा सुरुही झाला नाही, अशी काही मंडळी सुरुवातीच्याच उत्साहाने वा निरागसपणाने वृद्धापकाळापर्यंत कलासाधना करत असलेली माझ्या प्रत्यक्ष माहितीत आहेत. मी त्यांना सुप्रसिद्ध वगैरे कलावंतांपेक्षा श्रेष्ठ मानतो.
21 Nov 2013 - 3:28 pm | बॅटमॅन
अतिशय अचूक अन नेमका प्रतिसाद!!! मान गये (पुनरेकवार) _/\_
21 Nov 2013 - 9:11 am | अग्निकोल्हा
.
21 Nov 2013 - 11:31 am | चित्रगुप्त
राईट्ट सर. आठवा यल्ल. मंगेशकरांची पन्नासच्या दशकातली गाणी.
21 Nov 2013 - 3:27 pm | बॅटमॅन
"यल्ल मङ्गेशकर"
जबराट आवडले. यच्च मङ्गेशराव आठवले एकदम- त्यांसोबत 'तुम्बिन मोरी' त तोंड घालणार्या वरदाबाईपण =))
21 Nov 2013 - 9:23 am | खबो जाप
राज्य मिळवणं सोप असता पण टिकवणे अवघड असते म्हणतात त्यातला प्रकार आहे …. बस्स एव्हडच
21 Nov 2013 - 11:07 am | नानबा
१००% सहमत.
तुम्ही लेखात म्हटलंय ते ए आर रहमानच्या बाबतीत प्रचंड जाणवतं. रोजा, बॉम्बे, ताल, सपने, दिल ही दिल में, दिल से, लगान अशा एक से एक संगीतांनंतर त्यांचं पुढल्या चित्रपटांचं संगीत अगदीच सो सो आलं. मध्ये स्वदेस आला, पण रावन (अभिषेक ऐश्वर्याचा), जाने तू या जाने ना यांच्या संगीतातून रहमान प्रभाव दिसला नाही. (जाने तू चं संगीत त्याच्या कोण्या ज्युनियर गायक की कंपोझरने बनवलं होतं, आणि ते रहमानच्या नावावर वापरलं असं कुठेतरी वाचलं होतं)
नुकत्याच आलेल्या रॉकस्टार मधून पुन्हा रहमानी संगीत दिसलं खरं, पण तुमचा मुद्दा त्याने पुराव्याने शाबित केला.
21 Nov 2013 - 11:37 am | आतिवास
प्रतिभाशक्तीची ही गंमत आहे. ती अनंत मानली (सदैव आपल्यासोबत राहील अशी खात्री बाळगली), की ती नाहीशी होते आणि ती गेली आहे आपल्याला सोडून असं मानलं की अचानक ती उगवते पुन्हा. मला वाटतं की प्रतिभावंतांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचं तिच्याशी असणारं नातं बनवतो - तयार करतो.
आणखी एकः सदैव प्रतिभेच्या शिखरावर एखादी व्यक्ती अपवादानेच राहू शकते. बाकी अनेकदा प्रतिभेच्या दोन क्षणांच्या दरम्यान बरंच काही मामुली असतं! प्रतिभाधारित धंदा (व्यवसाय या अर्थाने) केला की उत्तुंग आणि मामुली दोन्ही दिसतं.
21 Nov 2013 - 1:20 pm | सुहास..
डोक्याबाहेरचा विषय :(
अवांतर : पेर्या , हुच्चभ्रु व्हायच्या वळणावर जात आहेस याची नोंद घेतली आहे ;)
21 Nov 2013 - 2:49 pm | कवितानागेश
अवांतराशी सहमत! ;)
21 Nov 2013 - 3:17 pm | प्यारे१
श्या द्याचं काम न्हाई आदीच सांगुन ठिवतोय!
23 Nov 2013 - 8:14 pm | विनायक प्रभू
प्यारे १ च्या प्रतिभेला सं पू र्ण निखार आलेला दिसतोय.
23 Nov 2013 - 8:20 pm | प्यारे१
___/\___ कृ शि सा न वि वि सर!
21 Nov 2013 - 1:50 pm | जे.पी.मॉर्गन
प्रतिसादांमधल्या बर्याच मुद्द्यांशी सहमत.
मोदकाच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे - "एकदा एक विशिष्ट उंची गाठल्यानंतर तुमच्याकडे प्रतिभा आहे की नाही हा मुद्दा सर्वस्वी गौण ठरतो." रादर त्यानंतर प्रतिभा असणं हे गृहितच धरलेलं आहे. चित्रगुप्तनी म्हटल्याप्रमाणे गाणी असोत, सिनेमे असोत अथवा लेखन असो. सोर्या घेऊन जिलब्या टाकायची सवय लागली की संपलं!
मी एक विचार मांडतो. तुमची प्रतिभा ही "प्रॉडक्ट" झाली की तिचा तुम्ही mass अथवा batch manufacturing सारखा उपयोग करायला लागता. पण तुमच्या प्रत्येक कलाकृतीकडे stand alone product म्हणून बघितलंत तर तुम्हीदेखील त्यात नाविन्य आणायला बघता. आणि आधीच्या यशाच्या प्रेमात न पडता समोर असलेल्या कामाकडे पुन्हा एक आव्हान म्हणून बघितलं तर तुमची पुढची कलाकृती पुन्हा एकदा फ्रेश असण्याची शक्यता वाढते.
अजून एक म्हणजे अजिबात समाधान आणि हार न मानणं. सच्यानी बोर्डरला मागे टाकल्यावर "धिस इज इट" म्हटलं असतं, मूर्तींनी ५०० इन्फी लोकांची झाल्यावर हुश्श केलं असतं, किंवा थोरल्या बच्चनसाहेबांनी "लाल बादशाह", "तूफान", "इंद्रजीत" वगैरे नंतर "नाही बुवा झेपत आता" म्हणून निवृत्ती घेतली असती तर ही लोकं आज आहेत त्या ठिकाणी पोचली असती का?
अजय-अतुलच्या एका मुलाखतीत त्यांनी ह्याचं सार एका वाक्यात मांडलं होतं.
"आम्ही प्रत्येक गाण्याला सुरुवात करताना हे आमचं पहिलं गाणं आहे अश्या भावनेनं सुरुवात करतो आणि ते संपवताना हे आपलं शेवटचं गाणं आहे अश्या भावनेनी जीव तोडून काम करतो."
जे.पी.
21 Nov 2013 - 2:24 pm | पिशी अबोली
एक प्रसिद्ध कथा आहे ना, ज्यात एक चित्रकार अप्रतिम चित्रं काढत असतो. त्यांच्या गावातील धनिक ते बघून आश्चर्यचकित होऊन ते चित्र स्पर्धेला पाठवतो. त्याला अर्थात पुरस्कार मिळतो. पुढच्या वर्षीही चित्रकार चित्र काढतो, पाठवतो, पण त्याला काहीच मिळत नाही. त्या धनिकाने विचारल्यावर तो उत्तर देतो, 'आधी मी आनंदासाठी चित्रं काढायचो, यंदा स्पर्धेसाठी काढलं, प्रसिद्धीसाठी काढलं. यंदा त्याच्यात साधना नव्हती, महत्त्वाकांक्षा होती.'
यश मिळाल्यावर साधनेची महत्त्वाकांक्षा बनते, म्हणून असं होत असेल का?
21 Nov 2013 - 2:45 pm | आतिवास
बाकी 'सान्त' शब्द पहिल्यांदाच 'सांत' असा वाचनात आला :-)
21 Nov 2013 - 2:48 pm | प्यारे१
तरी वाटतच होतं काहीतरी चुकल्यासारखं
आत जाईपर्यंत : ए कोणे रे तिकडे? जरा बगा तै काय म्हनतेत ते!
आत गेल्यावर : जरा दुरुस्ती करता का प्लिज?
(संपादकांनी ह घ्या. नि दुरुस्तीनंतर उडवून टाका.)
21 Nov 2013 - 3:26 pm | बॅटमॅन
सांत आणि सान्त दोन्हींचाही उच्चार एकच आहे, सिमिलर उदा. म्हणजे घंटा-घण्टा, अंबा-अम्बा, शंख-शङ्ख, पंच-पञ्च, इ.इ.इ.
21 Nov 2013 - 10:54 pm | अग्निकोल्हा
मला सांत मधे उगाच सा नाकात व् वरच्या पट्टीत परिणामी काहीसा दीर्घ बोल्ल्याचा भास होतो
तर
सान्त मधे न चा उच्चार तितकी पातळी/तीव्रता वरची व् दीर्घ राखत नाही वाटायचे
21 Nov 2013 - 11:42 pm | बॅटमॅन
तो उच्चार हिंदीत साँत असा दाखवतात. म्हणजे मेरे पास माँ है मधला माँ चा उच्चार. जो मराठीत मां म्हणून लिहितील तो. पण अनुस्वारानंतर क ते म या रेंजमधील ङ,ञ,ण,न,म हे वर्ण वगळता कुठलेही अक्षर आले तरी नुस्ता तो नाकातला उच्चार असा येत नै. तुम्ही म्हणता तो उच्चार संस्था, संवाद, इ. शब्दांत येतो, 'सौंस्था', 'सौंवाद', इ.इ.
22 Nov 2013 - 9:27 am | अग्निकोल्हा
.
23 Nov 2013 - 9:16 pm | आनंदी गोपाळ
संत, सन्त, सन्^त अशा तीन प्रकारे लिहिल्याचे आठवले.
24 Nov 2013 - 6:17 pm | मिहिर
युगान्त, वेदान्त वगैरे अन्तान्त्य शब्द युगांत (युगांमध्ये), वेदांत (वेदांमध्ये) वगैरेंपासून वेगळे दाखवण्यासाठी अंतान्त्य न लिहिता अन्तान्त्य लिहावेत असा नियम आहे. सगळ्या नियमांची यादी विकीवर सापडेल. त्याच प्रकारे त्यामुळे सान्त हा सांत (सांमध्ये (अनेक)) पासून वेगळे दाखवण्यासाठी सान्त असा नेहमी लिहिला जात असावा असा अंदाज आहे.
21 Nov 2013 - 3:05 pm | पैसा
असा सर्वसाधारण नियम करता येणार नाही. आठवा, जी ए आणि पु ल. आणि असे अनेक लेखक कवी, लता आशा, भीमसेन जोशी असे गायक, अनेक नर्तक. गायक आणि नर्तक नवे असताना बहुतांश कोणाची तरी नक्कल करताना आढळतात. काही काळाने त्यांना स्वतःचा सूर सापडतो. सतत अभ्यास करणार्याला नवी नवी शिखरे खुणावत रहातात.
इतर काहींच्या बाबतीत ते आपल्याला पहिल्या भेटीत एकदम मनावर मोहिनी घालतात, पण नंतर परिचयांती ती जादू तेवढीशी जाणवत नाही, कारण आपण काही एक गोष्ट त्यांच्याकडून अपेक्षित असतो. काहीजणांची कुवत टिकून रहाण्यासारखी नसते. केवळ काही कारणाने ते एखादी चांगली कामगिरी करून जातात, पण मग ती परिस्थिती सतत न मिळाल्याने मग ते हळूहळू मागे पडतात. ज्यांचे सुरुवातीचे यश हे परिस्थितीवर जास्त अवलंबून असते त्यांच्या बाबतीत असे व्हायची शक्यता जास्त. मात्र जे खरे प्रतिभावंत आहेत आणि मेहनती आहेत त्यांची प्रतिभा आयुष्याच्या अंतापर्यंत साथ देते.
21 Nov 2013 - 5:50 pm | सस्नेह
प्रतिभेला मर्यादा नाहीत ! मर्यादा आहेत त्या मनवी देहाला आणि जीवनाला. ज्ञानेश्वर आणखी जगले असते तर ज्ञानेश्वर्या' अनंत झाल्या असत्या. गांधीजी राहिले असते तर सत्य आणखी प्रखर झाले असते. न्यूटन अन आईनस्टाईन यांची आयुष्ये वाढली असती तर आपण आज कदाचित चंद्रा-मंगळावर रहात असू.
प्रतिभा हा एक प्रवाह आहे. किती किनारे सरले तरी वहातच आहे. सरत्या जिवांनी उगवत्या जिवांना दिलेलं व्रत आहे. किती जीवने सरली तरी प्रतिभा नाही सरणार !
22 Nov 2013 - 4:48 am | अर्धवटराव
सुंदर प्रतिसाद.
22 Nov 2013 - 5:24 am | स्पंदना
सुंदर प्रतिसाद.
24 Nov 2013 - 3:12 pm | प्यारे१
अप्रतिम!
21 Nov 2013 - 6:42 pm | घाटावरचे भट
दोन मुद्दे
१) पैसा प्रसिद्धी या गोष्टी क्षणभर बाजूला ठेवू. कलावंताला स्वतःच्या प्रयत्नांशी (मी मुद्दाम इथे प्रतिभा हा शब्द वापरत नाहीये) प्रामाणिक राहून काही सुचले, त्याने ते प्रत्यक्षात आणले (साहित्य,गाणे,चित्र, काहीही) आणि जर ते जनतेला आवडले नाही तर त्या कलावंताची प्रतिभा संपली असे म्हणायचे का?
२) सोर्याने जिलब्या पाडणार्या लोकांविषयी चर्चा वरच्या प्रतिसादांमधे वाचली. एखाद्या कलाकृतीला जेव्हा व्यावसायिक स्वरूप देणे आवश्यक असते तेव्हा त्याला नैसर्गिकपणे टाईमलाईनचे बंधन येते. पण त्या टाईमलाईनप्रमाणे काम केल्यावर जर आधीच्या आणि नंतरच्या कलाकृतीमधे काही साम्य आढळले तर कलावंताची प्रतिभा संपली असे म्हणायचे का?
अजून एका अँगलने पाहिल्यास कलावंताच्या प्रतिभेचे (वाढत्या/घटत्या) मोजमाप त्याच्या एकापाठोपाठच्या कलाकृतींमधल्या साम्यस्थळांवर करायचे की फरकांवर करायचे?
21 Nov 2013 - 6:57 pm | एम.जी.
रहमानचा विषय निघालाच म्हणून ....
तामिळ अॅन्थेम बाय रहमान.. ऐकून बघा..
अप्रतिम कॉम्पोझिशन आहे.. व्हिजुअल्स सुरेख.
करुणानिधी यांनी लिहिली आहे.
22 Nov 2013 - 10:37 am | पिवळा डांबिस
धागा उत्तम आहे. वर मंडळींनी काही उत्तम प्रतिसादही दिले आहेत....
माझे दोन पैसे. .....
प्रतिभा ही अनंतच असते.....
पण कधिकधी जर प्रतिभावंत मनस्वी असेल तर त्याला/तिला आपल्या कलाकृतीचं कसं स्वागत/मूल्यमापन होतंय याचीही काळजी असू शकते.
जर ते मूल्यमापन ठराविक असेल, मग स्वागत म्हणा वा टीकात्मक म्हणा, तर त्या प्रतिभावंताला कंटाळा येऊ शकतो...
आणि जर त्या प्रतिभावंताचं पोट त्या कलाकृती करण्यावर अवलंबून नसेल,
तर तो कलाकॄती निर्माण करणं थांबवू ही शकतो!!!
काय म्हणता?
22 Nov 2013 - 11:21 am | अभ्या..
एकदम परफेक्ट.
म्हणजे अशा कलाकृती घडवुन घेणे दोन हाताची टाळि आहे.
मग क्कलाक्रुतिसाठि प्रतिसाद की प्रतिसादासाठि कलाकृती?
23 Nov 2013 - 5:20 am | यशोधरा
कलेसाठी कलाकृती आणि कलेच्या अविष्काराला मनापासून दाद म्हणून प्रतिसाद.
23 Nov 2013 - 8:20 am | मन१
चित्रगुप्त,मोदक, जेपी ह्यांचे प्रतिसाद वाचनीय
23 Nov 2013 - 9:27 am | मदनबाण
कुठलीही कलाकॄती घडुन यायला बर्याच वेळा अनेक गोष्टी एकत्र घडुन याव्या लागतात... त्या एकत्र आल्या की मिळतो तो केवळ आनंद. :)
ए आर रेहमान नाव घेतलं की मला Spirit of Unity Concert हेच आठवत बघं...त्याच संगीत मला आवडत पण हे थीम म्युझिक देणारा रेहमान कुठेतरी हरवला असे का कुणास ठावुक पण मला वाटते.
23 Nov 2013 - 12:18 pm | मोदक
त्याच संगीत मला आवडत पण हे थीम म्युझिक देणारा रेहमान कुठेतरी हरवला असे का कुणास ठावुक पण मला वाटते.
+१११११
(पुढील थीम्स ऐकताना हेडफोन जरूर वापरावेत..)
__/\__
23 Nov 2013 - 9:53 pm | मदनबाण
मोदकराव मग हे दोन पीस पण ऐका :-
बाकी अदनान सामी बद्धल सुद्धा माझं हेच मत झालयं जे एआर बद्धल ! त्यांचीही काही माझी आवडती गाणी देतो इथे :-
24 Nov 2013 - 11:01 am | आनंद घारे
"ती येते आणिक जाते येतांना कधी कळ्या आणिते आणि जातांना फुले मागते" असे आरती प्रभू यांनी प्रतिभेबद्दल लिहिले आहे. ती लहरी असते. कधी येईल, कसल्या कळ्या आणेल, त्या कितपत फुलतील वगैरे काही सांगता येत नाही. शिवाय कलेच्या बाबतीत बरे, चांगले, उत्तम, अप्रतिम, टाकाऊ, टुकार, असह्य वगैरेबद्दल सर्वमान्य निकषही नसतात. त्याशिवाय कोणतीहे कलाकृती हा प्रतिभेचा आविष्कार आहे की कलाकुसर आहे हे सुद्धा नक्की ठरवता येत नाही.
24 Nov 2013 - 11:11 am | सुहास..
मादक ....आपल हे ...मोदक ...ही पण एक प्रतिभा ..
24 Nov 2013 - 11:49 am | विनायक प्रभू
मुवि ची आवडती (पहीला प्रतिसाद) प्रतिभा अशांत आणि अनंत म्हणावी का?
24 Nov 2013 - 1:52 pm | प्रभाकर पेठकर
प्रतिभा भूगर्भातील तेला प्रमाणे असावी. कुठला साठा लवकर संपतो तर कुठला दीर्घकाळ चालतच राहतो, चालतच राहतो.
प्रतिभावंतासही आपल्या प्रतिभेवर जबरदस्ती करता येत नसावी. एकदा झालेले नांव चलनी नाण्यासारखे वापरल्यासारखे होते. परंतु, प्रामाणिकपणे साधना आणि त्या प्रतिभेची आर्जवे केल्यास पुन्हा कधी कधी प्रतिभा प्रसन्न होते आणि एखादी अजरामर कलाकृती साकार होते. मीपणा विसरून संपूर्ण समर्पण असेल तर कदाचित प्रतिभेला पुन्हा बहर येत असावा.
24 Nov 2013 - 3:03 pm | चित्रगुप्त
प्रतिभेला खालील गोष्टींचे वावडे असते, असे दिसते:
हव्यास, अहंकार, फाजील महत्वाकांक्षा, मत्सर, खोटारडेपणा, आळस, वगैरे. यांच्यामुळे प्रतिभा झाकोळली जाते.
प्रतिभेला लागणारे विशेषण 'नवनवोन्मेषशालिनी' असे आहे. त्यामुळे साचेबंद पुनरावृतीत प्रतिभेला ग्रहण लागल्याचे जाणवते.
24 Nov 2013 - 3:25 pm | प्यारे१
सगळ्याच वाचक नि मुख्यत्वे प्रतिसादकांचे हार्दिक आभार.
सगळ्यांचेच प्रतिसाद भावले.
मनाचा मोकळेपणा कुठल्याही प्रकारे व्यापला गेला की प्रतिभेला ग्रहण लागतं असं थोडकयात म्हणता येईल.
काहीही सुचायला मन मोकळं असावं लागतं.
विचार करुन करुन एखादी गोष्ट मूर्त स्वरुप धारण करेल पण कन्सेप्ट फेज मध्ये तिची ठिणगी पडायला नि ती जाणवायला मन मोकळंच असावं लागतं.
आपलं मन सातत्यानं विचार करत असतं. त्यात सातत्यानं तरंग उमटत राहतात त्यामुळं त्याचा ठाव घेणं अवघड होऊन बसतं. तळ सापडत नाही. एखादी नवी कल्पना कधी विरुन गेली कळत देखील नाही.
कलेच्या (सगळ्याच प्रकारच्या) अभिव्यक्तींची सुरुवात अशीच होत असावी. कलाकार तोच जो त्या ठिणगीला इतर भावभावनांच्या तुलनेत जास्त अवकाश देतो, तिला फुलवतो, मोठं करतो. प्रतिभावंतांच्या मांदियाळीत अनेकानेक लोक असताना देखील एखादाच 'लिजंड' बनतो त्याचं कारण देखील त्यानं मनाला जास्त मोकळं ठेवलेलं असतं.
काही काम नाही म्हणून माणूस रिकामा असू शकतो, मोकळा नाही.
का रे? आज तू मोकळा आहेस का असं विचारताना त्याला तू रिकामटेकडा आहेस का असं नाही विचारत आपण!
तू त्या कामातून मला वेळ काढून देऊ शकतोस का असा त्याचा अर्थ.
'लिजंड्स' असं करु शकत असावेत. मनाची कवाडं स्पर्धा, ईर्ष्या, मत्सर, क्रिया, प्रतिक्रिया, आनंदाचा, दु:खाचा आवेग, आशा, निराशा नि इतर सगळ्यासाठी हळूच बंद करुन मनाला मोकळं ठेवलं की आत आनंद निधान कायम आहेच की. आपण सगळेच असं करु शकतो. ठिणगी आपल्या आत देखील आहेच. क्रिया प्रतिक्रियांचे खेळ थांबवले तर!
पटतंय???
25 Nov 2013 - 6:41 am | अर्धवटराव
कदाचीत इथेच ग्यानबाची मेख आहे. कलाकाराच्या "आत" जे काहि शिजतय ते मनाचे पापुद्रे फाडुन एखाद्या विशिष्ट पद्धतीने व्यक्त होणे म्हणजे जर कला असेल तर ज्या ज्या वेळी मनाचे पापुद्रे अलगद उलगडण्याजोगे असतील तेंव्हा नियमीत कलाकृती जन्मास येईल. जिथे मनाचं आवरण घट्ट्/टणक असेल त्यावेळी कलेला उफाळुन वर यायला वाव कमि मिळणार. आणि मनावर तर कोणाचा ताबा असुच शकत नाहि... त्यामुळे कलेच्या प्रदर्शनाबाबबत सातत्य राखणं अशक्य असावं. रियाज/सराव करुन एखादं स्किल डेव्हलप करणं वेगळं. बघणार्याला कदाचीत ति कला वाटेल पण कलाकार स्वतःला फसवु शकत नसणार.
अर्थात... आमच्या बाबतीत सगळ्याच जर-तर च्या गोष्टी... इस मामलेले अपना हाथ थोडा तंग है :D
19 Oct 2015 - 3:34 am | तर्राट जोकर
प्यारें, आपने सही नस पकडी है,
माझे दोन पैसे.
प्रतिभा आटत नाही. हरवते. वर म्हटल्याप्रमाणे इतर भावना वरचढ होतात तेव्हा प्रतिभा हरवते. परफॉर्मन्सचं प्रेशर, डेडलाइनचं प्रेशर, लोकांच्या अपेक्षांचे प्रेशर. वैयक्तिक राग-लोभ-अहंकाराचं प्रेशर अशी अनेक कारणं वरचढ झाली की प्रतिभेला जे पाण्यासारखं पारदर्शक मन लागतं ते मिळत नाही. कलाकृती एक काम होतं, कामात मजा येत नाही. जे कलासाधनेत पूर्ण रममाण होतात, ध्यानस्थ होतात, तयांची प्रतिभा आटत नाही, हरवत नाही.
काही लोक सतत उच्च दर्जा कायम राखतात. त्यांनी एक्स्पोजर लिमिटेड ठेवलेलं असतं. जे अतिशय चांगलं झालंय तेच पुढे मांडलं. जगात कोणीही सदासर्वदा चांगलंच काम करू शकत नाही. खरा कलाकार सतत नाविण्याच्या ध्यासाने पिसाटलेला असतो. झालेली कलाकृती चांगली की वाईट हे रसिकांच्या मान्यतेवर ठरते. कलाकाराच्या मान्यतेवर नाही. असंख्य कलाकृतींतून काही चांगल्या लक्षात राहतात. त्या चांगल्यांच्या अस्तित्वात येण्यासाठी त्या असंख्य वाईट कलाकृतीही मदत करत असतात. केवळ उत्त्मच काम करेन असे म्हणून कोणी कलाकार आयुष्यात काहीच साध्य करू शकणार नाही.
19 Oct 2015 - 11:32 am | पद्मावति
रोचक विषय. उत्तम मांडणी आणि प्रतिसादही पटण्यासारखे. वाचतेय.